चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!
सार्वजनिक पश्चात्ताप
आगमनकाळातील दुसरा रविवार (वर्ष अ)
अनेक परुशी आणि सदुकी बाप्तिस्मा घेण्यासाठी आपल्याकडे येत आहेत, हे पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो! येणाऱ्या कोपापासून पळून जाण्याचा इशारा तुम्हाला कोणी दिला? तुमच्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगले फळ द्या.” मत्तय 3:7–8
ही भेट अतिशय कठोर, तरीही अत्यंत पवित्र होती. बाप्तिस्मा देणारा संत योहान लोकांमध्ये बराच लोकप्रिय आणि आदरणीय झाला होता, आणि लोक त्याला महान संदेष्टा मानत होते. त्याने परुशी आणि सदुकी यांना कठोर शब्दांत सुनावले, म्हणून या भेटीत इतकी तीव्रता होती. “अहो विषारी सापांच्या पिलांनो!” असे तो म्हणतो. परुशी आणि सदुकी यांच्याशी सहसा कोणी अशा रीतीने बोलत नसे.
योहान असा बोलतो, कारण तो जे बोलला ते खरे होते. हे धार्मिक नेते कोणालाही देवाच्या जवळ नेत नव्हते. येशू पुढे परुशी आणि सदुकी यांना जे काही म्हणणार होता, त्यावर नुसते चिंतन केले तरी हे धार्मिक नेते कशा प्रकारचे लोक बनले होते, ते समजते.
म्हणून हा प्रसंग नक्कीच तीव्र आहे. पण तो तितकाच पवित्रही आहे. तो पवित्र आहे, कारण या “विषारी सापांच्या पिलांना” खडसावण्याची गरज होती. त्यांच्या वागणुकीचा निषेध करणे आणि त्यांना बदलण्याचे आव्हान देणे आवश्यक होते. त्यांना नम्र होण्याची गरज होती. आणि आपल्या पापांबद्दल सर्वांसमोर मनापासून पश्चात्ताप करण्याइतके नम्र करणारे दुसरे काहीही नाही.
योहान या नेत्यांना सरळ धुडकावून लावत नाही, हे लक्षात घ्या. उलट, तो त्यांच्याकडे त्यांच्या पश्चात्तापाचा ‘पुरावा’ मागतो. का? कारण आपल्या गर्वामुळे, आपणच नीतिमान आहोत या समजुतीमुळे, दांभिकपणामुळे, लोकांकडून मान मिळवण्याच्या हौसेमुळे आणि इतरांना दोषी ठरवण्याच्या वृत्तीमुळे या लोकांनी इस्राएलच्या जनतेची आध्यात्मिक हानी केली होती. त्यांनी श्रद्धेचे स्वरूप इतके विकृत केले होते की त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वांसमोर पश्चात्ताप करणे आवश्यक होते. ते खरोखर बदलले आहेत, याची खूण म्हणून त्यांच्या जीवनात प्रामाणिक परिवर्तनाची चांगली फळे सर्वांना दिसणे गरजेचे होते. परुशी आणि सदुकी यांच्यासाठी ही मागणी कठीण असली, तरी पवित्रतेकडे जाण्याचा त्यांचा मार्ग हाच आहे.
हीच गोष्ट आपल्यालाही लागू होते. परुशी आणि सदुकी ज्या सापळ्यांत अडकले, त्यांपैकी काहींत तुम्हीही अडकला असाल, तर नम्रपणे केलेले आणि इतरांनाही स्पष्टपणे दिसणारे परिवर्तन तुमच्यासाठीही फार हिताचे ठरेल. आपणच नीतिमान आहोत असे मानणे, बोलताना सतत उणेदुणे काढणे, ‘मी तुमच्यापेक्षा अधिक पवित्र आहे’ अशी वृत्ती बाळगणे किंवा इतरांना दोषी ठरवणे या सवयींशी तुमचा झगडा चालू असेल, तर तुम्हालाही नम्रपणे आणि सर्वांसमोर पश्चात्ताप करण्याची मोठी गरज असू शकते.
आज परुशी आणि सदुकी यांच्याविषयी चिंतन करा. त्यांचे पाप काय होते आणि योहानाने त्यांना ‘सापांची पिलावळ’ का म्हटले, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांचा गर्व आणि आपणच नीतिमान आहोत ही वृत्ती तुमच्या स्वतःच्या अंतःकरणातही दिसली, तर बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा हा उपदेश जणू तो थेट तुम्हालाच देत आहे, अशा रीतीने ऐका: ‘तुमच्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगले फळ द्या.’ असे करा, आणि देव तुम्हाला खऱ्या नम्रतेची देणगी देऊन मुक्त करील.
हे माझ्या नम्र प्रभू, तू अत्यंत नम्रतेने आणि प्रामाणिकपणे सर्वांना पश्चात्ताप करण्यासाठी बोलावतोस. माझे पाप मला दिसावे आणि त्याला सामोरे जाण्याचे मी कधीही टाळू नये, यासाठी मला मदत कर. मग तू मला त्या पापाच्या घाणीपासून मुक्त करून पवित्रतेच्या मार्गावर अधिक दृढपणे उभे करू शकशील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
वाळवंटात जाण्याचे पाचारण
आगमनकाळातील दुसरा रविवार (वर्ष ब)
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरुवात.
यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात असे लिहिले आहे: पाहा, मी माझ्या संदेशवाहकाला तुझ्यापुढे पाठवत आहे; तो तुझा मार्ग तयार करील. वाळवंटात हाक देणाऱ्याचा आवाज: “प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.” मार्क 1:1–3
संत मार्कच्या शुभवर्तमानाच्या या सुरुवातीच्या ओळी आपल्याला बाप्तिस्मा देणाऱ्या संत योहानाची ओळख करून देतात. मशीहाच्या आधी जो येईल, असे यशयाने भाकीत केले होते, तो हाच योहान. जगाच्या तारणाऱ्याच्या आगमनाची अगदी जवळून तयारी करण्याची जबाबदारी आणि विशेष मान योहानाला मिळाला.
प्रभूचा मार्ग उत्तम रीतीने कसा तयार करावा हे योहानाला सांगण्याचे काम बहुतेक लोकांवर सोपवले असते, तर त्यांनी कदाचित त्याला असा सल्ला दिला असता: आधी लोकांच्या नेत्यांकडे, नागरी अधिकाऱ्यांकडे आणि समाजातील प्रभावशाली व प्रतिष्ठित व्यक्तींकडे जा आणि त्यांचा पाठिंबा मिळव. त्या काळच्या नेत्यांचा पूर्ण पाठिंबा मशीहाला असणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष अनेकांनी काढला असता. पण योहानाने तसे केले नाही, हे स्पष्ट आहे.
पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बाप्तिस्मा देणारा योहान सर्वांत प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांच्या घरांकडे गेला नाही, नागरी राज्यपालांच्या सभागृहांकडेही गेला नाही, तसेच सभास्थानांकडे किंवा मंदिराकडेही गेला नाही. उलट, पवित्र आत्म्याने त्याला वाळवंटात जाण्यास प्रवृत्त केले. त्या कोरड्या, ओसाड वाळवंटात योहानाने अनेक लोकांना आपल्याकडे आणि आपल्या पश्चात्तापाच्या संदेशाकडे आकर्षित केले.
आजही देव अनेकांना बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्यास बोलावतो. योहान ही खरोखर होऊन गेलेली व्यक्ती होती आणि एका विशिष्ट काळात त्याला एका खऱ्या कार्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याने पार पाडलेले कार्य आजही निरनिराळ्या प्रकारे पुढे नेण्याची गरज आहे. ‘प्रभूचा मार्ग’ अजूनही तयार करायचा आहे. प्रभू आजही अनेकांकडे येऊ इच्छितो, आणि तो आपल्या कृपेद्वारे सतत येत राहावा म्हणून त्याचा मार्ग तयार करणाऱ्या संदेष्ट्यांची त्याला गरज आहे. तुम्ही त्यांपैकी एक आहात का?
खरे सांगायचे तर, आपण श्रीमंत असो वा गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, तरुण असो वा वृद्ध, देव आपल्यापैकी प्रत्येकाला दररोज आपल्या कृपेद्वारे येण्यासाठी मार्ग तयार करण्यास बोलावतो. इतरांना मनापासून पश्चात्ताप करण्याचे आणि आपले जीवन बदलून देवाकडे वळण्याचे आवाहन करून हा मार्ग तयार करण्यासाठी आपल्याला पाचारण आहे. आपल्या कृतींच्या साक्षीतून, आपल्या शब्दांतून आणि देव दाखवतो त्या इतर अनेक मार्गांनी आपण हे करतो. देव तुम्हाला त्याचे कार्य कसे करायला बोलावत आहे? तो तुम्हाला नक्कीच बोलावत आहे. तुम्हाला फक्त त्याची हाक मोकळ्या मनाने ऐकायची आहे आणि उदारपणे प्रतिसाद द्यायचा आहे.
ख्रिस्ताच्या आगमनासाठी स्वतःची आणि इतरांची तयारी व्हावी म्हणून ज्या ‘वाळवंटात’ जाण्याचे तुम्हाला पाचारण आहे, त्याविषयी आज चिंतन करा. जिथे काही उणीव आहे आणि जिथे आपला प्रभू नाही, अशी प्रत्येक जागा म्हणजे ते वाळवंट. ते तुमच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, तुमच्या समाजात, मित्रपरिवारात किंवा देवाच्या कृपेची विपुलता नसलेल्या कोणत्याही ठिकाणी असू शकते. अशा वाळवंटांत जाण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपल्या प्रभूची कृपा पोहोचवण्याचे माध्यम होण्यासाठी मन खुले ठेवा.
हे प्रभू, दररोज माझ्याकडे आणि तुझ्या सर्व लेकरांकडे यावे, अशी तुझी इच्छा आहे. तुझ्या दैवी आगमनासाठी माझे हृदय आणि आत्मा तयार करण्यास मला मदत कर. एवढेच नव्हे, तर इतरांनाही तुझ्या भेटीसाठी तयार करण्याचे काम माझ्याकडून करून घे. मला सुज्ञपणा, करुणा, अंतर्दृष्टी आणि बळ दे, म्हणजे संत योहान बाप्तिस्ताचा आदर्श घेऊन तुझ्या कृपेने तुझ्या परम गौरवशाली आगमनाचा मार्ग मी तयार करू शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
कृपेच्या वाटेतील अडथळे दूर करणे
आगमनकाळातील दुसरा रविवार (वर्ष क)
“प्रत्येक दरी भरून काढली जाईल आणि प्रत्येक पर्वत व टेकडी खाली केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील आणि खडबडीत वाटा सपाट केल्या जातील, आणि सर्व मानव देवाचे तारण पाहतील.” लूक 3:5–6
संदेष्टा यशयाचे हे शब्द संत योहान बाप्तिस्ताच्या कार्याविषयी होते. “प्रभूचा मार्ग तयार करणे” आणि “त्याच्या वाटा सरळ करणे” हे योहानाचे कार्य होते. हे भाकीत करताना यशया योहानाच्या सेवाकार्याचे जिवंत चित्र उभे करतो. त्या कार्यात पर्वत आणि दऱ्या समतल केल्या जातील, प्रत्येक वळणावळणाचा रस्ता सरळ केला जाईल आणि खडबडीत जमीन सपाट केली जाईल. दुसऱ्या शब्दांत, देवापर्यंत पोहोचण्यातले सर्व अडथळे दूर करून मशीहाची भेट घेणे लोकांना सोपे व्हावे, म्हणून योहान आला.
योहान हे कार्य कसे पूर्ण करतो? तो त्या काळच्या लोकांना अशा कोरड्या, ओसाड वाळवंटात बोलावतो, जिथे सर्व फसवी आकर्षणे नाहीशी होतात. आपल्यासमोर असलेल्या अनेक पापांपासून आणि प्रलोभनांपासून मन दूर करून लोकांनी हे साधले. पश्चात्ताप करून ते देवासमोर नम्र झाले, त्यांनी आपली पापे कबूल केली आणि आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे हे मान्य केले. या नम्र कबुलीने आणि आपले आचरण बदलण्याच्या निश्चयाने एकामागून एक हृदये प्रभू ख्रिस्ताद्वारे मिळालेल्या कृपेचा आणि दयेचा स्वीकार करण्यास तयार झाली.
आज अनेकांना देवाची कृपा स्वीकारण्याच्या वाटेत असंख्य अडथळे येतात. काही जण ऐहिक संपत्ती आणि भौतिक सुखसोयींत इतके रमले आहेत की त्यांना देवाची फारशी गरज वाटत नाही. इतरांना या जगाकडून फारसे काही मिळालेले नाही; पण पैशाची आणि त्यातून मिळणाऱ्या क्षणभंगुर सुखांची हाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आणखी काही जण निरनिराळ्या पापांकडे आणि फसव्या सुखांकडे ओढले जातात. पण काही जण कोरड्या, ओसाड वाळवंटासारखे आहेत. ते देवाच्या कृपेचा हलका पाऊस शोषून घेण्याची वाट पाहत आहेत. या जगाच्या खोट्या आश्वासनांपासून मन दूर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कृपेचा वर्षाव होईल तेव्हा तो स्वीकारता यावा म्हणून ते ‘रिकामे’ आणि ‘कोरडे’ राहतात. या पवित्र जीवांनी पश्चात्तापाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे आणि आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे हे नम्रपणे मान्य केले आहे.
आज चिंतन करा: तुमचा आत्मा त्या कोरड्या, ओसाड वाळवंटासारखा आहे का? या जगाच्या साऱ्या फसव्या आणि क्षणभंगुर सुखांची आसक्ती सोडून केवळ देवाची दया आणि कृपा शोषून घेण्यास तो तयार आहे का? पश्चात्तापामुळे आसक्ती सुटते आणि आसक्ती सुटल्याने आत्मा देवाच्या भेटीसाठी तयार होतो. जेव्हा तुम्ही खरोखर आसक्तीतून मुक्त होता आणि देवाच्या भेटीतले अनेक अडथळे दूर होतात, तेव्हा देवाकडून तुमच्या आत्म्यापर्यंत येणारी वाट सरळ आणि सुगम होते. आज आपल्या आत्म्याकडे पाहा आणि कोणत्या अपायकारक आसक्ती अजून आहेत, याचा विचार करा. मनापासून पश्चात्ताप करा, म्हणजे देवाची विपुल कृपा आणि दया स्वीकारण्यास जे पूर्णपणे तयार आहेत, त्यांच्यात तुम्हीही असाल.
हे प्रभू, माझ्या गरजेत मी तुझ्याकडे वळतो. या जगातील अनेक खोट्या गोष्टींना आणि सुखाच्या फसव्या आश्वासनांना भुललो, याबद्दल मी पश्चात्ताप करतो. जे काही तुझ्यापासून आलेले नाही, त्या सर्वांतून मला मुक्त कर. म्हणजे कोरडे, ओसाड वाळवंट जसे हलका पाऊस शोषून घेते, तसा माझा आत्मा तुझा आणि तुझ्या दयेचा स्वीकार करण्यास अधिक तयार होईल. माझ्या प्रभू, मी स्वतःला तुझ्यासाठी खुले करतो. ये, माझा आत्मा भरून टाक आणि त्याची तृष्णा भागव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
गर्विष्ठ आणि उद्धट लोकांवर प्रेम करणे
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील सोमवार
काही जण एका पक्षाघात झालेल्या माणसाला खाटेवर घेऊन आले. त्याला आत नेऊन येशूसमोर ठेवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण गर्दीमुळे त्याला आत नेण्याचा मार्ग सापडेना, म्हणून ते छपरावर चढले आणि कौलांमधून त्याला खाटेसकट खाली उतरवून सर्वांच्या मध्ये, येशूसमोर ठेवले. लूक 5:18–19
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पक्षाघात झालेल्या माणसाचे विश्वासू मित्र त्याला छपरावरून येशूसमोर खाली सोडत होते, तेव्हा येशूभोवती “गालील व यहूदिया येथील प्रत्येक गावातून आणि यरुशलेमहून” आलेले परुशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते (लूक 5:17). हे धार्मिक नेते मोठ्या संख्येने आले होते. ते यहुद्यांमधील सर्वांत विद्वान लोकांपैकी होते आणि त्या दिवशी येशूचे बोलणे ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांत तेही होते. त्यांच्यापैकी इतके जण येशूभोवती जमले होते की, पक्षाघात झालेल्या माणसाच्या मित्रांना येशूपर्यंत पोहोचण्यासाठी छप्पर उघडण्याचे धाडसी पाऊल उचलावे लागले. गर्दीचे तेही एक कारण होते.
मग पक्षाघात झालेल्या माणसाला छपरावरून आपल्यासमोर खाली सोडले जात असताना पाहून येशू काय करतो? तो त्या माणसाला सांगतो की त्याच्या पापांची क्षमा झाली आहे. दुःखाची गोष्ट अशी की, हे शब्द ऐकताच त्या धार्मिक नेत्यांनी मनातल्या मनात येशूवर कडाडून टीका केली. ते आपापसांत म्हणाले, “देवनिंदा करणारा हा कोण? एकट्या देवाशिवाय पापांची क्षमा कोण करू शकतो?” (लूक 5:21).
पण येशूला त्यांच्या मनातले विचार माहीत होते. म्हणून या धर्मनेत्यांच्या भल्यासाठी त्याने आणखी एक कृती करण्याचे ठरवले. येशूने प्रथम पक्षाघात झालेल्या माणसाच्या पापांची क्षमा केली, ती त्या माणसाच्या भल्यासाठी. पण विशेष म्हणजे, येशूने त्याला शारीरिक व्याधीतून बरे केले, ते मुख्यतः स्वतःला मोठे आणि नीतिमान समजणाऱ्या या परुश्यांसाठी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांसाठी होते, असे दिसते. “मनुष्यपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला कळावे” म्हणून येशू त्या माणसाला बरे करतो (लूक 5:24). येशूने हा चमत्कार करताच सर्व जण “विस्मयचकित झाले” आणि त्यांनी देवाचा गौरव केला, असे शुभवर्तमान सांगते. इतरांना दोष देणारे ते धर्मनेतेही त्यांच्यात होते, असे दिसते.
मग यातून आपल्याला काय शिकायला मिळते? हे धर्मनेते इतके गर्विष्ठ होते आणि इतरांना दोष देण्यात इतके तत्पर होते, तरीही येशूचे त्यांच्यावर किती गाढ प्रेम होते, हे यातून दिसते. त्याला त्यांची मने जिंकायची होती. त्यांनी मनपरिवर्तन करावे, नम्र व्हावे आणि त्याच्याकडे वळावे, अशी त्याची इच्छा होती. ज्याला पक्षाघात झाला आहे आणि ज्याला आधीच नाकारले गेले आहे व अपमानित केले गेले आहे, अशा व्यक्तीला प्रेम आणि करुणा दाखवणे तुलनेने सोपे असते. पण गर्विष्ठ आणि उद्धट लोकांचीही मनापासून काळजी घेण्यासाठी विलक्षण प्रेम लागते.
या धर्मनेत्यांवर येशूचे किती प्रेम होते, यावर आज चिंतन करा. ते त्याच्यात दोष शोधायला आले होते, त्याच्याविषयी चुकीचा न्याय करत होते आणि त्याला सापळ्यात अडकवण्याचा सतत प्रयत्न करत होते. तरीही त्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न येशूने कधीच सोडला नाही. आपल्या प्रभूच्या या दयेचे चिंतन करताना, तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तीवर प्रेम करणे तुम्हाला सर्वांत कठीण वाटते, तिचाही विचार करा. आपल्या दैवी प्रभूचे अनुकरण करून त्या व्यक्तीवर पूर्ण मनाने प्रेम करण्याचा पुन्हा निर्धार करा.
हे माझ्या परमदयाळू प्रभू, इतरांवर दया करणारे आणि त्यांना क्षमा करणारे हृदय मला दे. विशेषतः ज्यांच्यावर प्रेम करणे मला सर्वांत कठीण वाटते, त्यांची मनापासून काळजी घेण्यास मला मदत कर. तुझ्या दैवी दयेचे अनुकरण करताना सर्वांशी निःसीम प्रेमाने वागण्याचे बळ मला दे, जेणेकरून त्यांना तुझी अधिक खोलवर ओळख होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आपल्या प्रभूचा आनंद
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुम्हाला काय वाटते? एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरे असतील आणि त्यांपैकी एक वाट चुकले, तर तो नव्याण्णव मेंढरांना डोंगरावर सोडून त्या वाट चुकलेल्या मेंढराच्या शोधात जाणार नाही काय?” मत्तय 18:12
शुभवर्तमानातील या उताऱ्यात पुढे म्हटले आहे की, ते एक वाट चुकलेले मेंढरू सापडल्यावर त्या माणसाला “वाट न चुकलेल्या नव्याण्णव मेंढरांपेक्षा त्या एकामुळे अधिक आनंद होतो.” पहिल्यांदा वाचताना हे अन्यायकारक वाटू शकते. वाट न चुकलेल्या नव्याण्णव मेंढरांचा त्याला अधिक आनंद का वाटू नये? या उताऱ्यावर भाष्य करताना संत हिलरी सांगतात की, त्या एका वाट चुकलेल्या मेंढराला शोधायला जाणारा माणूस म्हणजे देवाचा पुत्र. वाट चुकलेल्या मानवजातीला शोधण्यासाठी तो ‘नव्याण्णव’, म्हणजे स्वर्गीय सैन्यांचे वैभव, मागे सोडून पृथ्वीवर उतरला. संपूर्ण मानवजात म्हणजे ते एक हरवलेले मेंढरू. त्यात आपल्या सर्वांचा समावेश आहे.
या अर्थावरून सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट होते: आपण वाट चुकून स्वर्गातील पित्यापासून दूर गेल्यानंतर, आपल्यापैकी प्रत्येकाला शोधण्यासाठी देवाच्या पुत्राला पाठवण्यात आले. आपण परत येऊ म्हणून पिता नुसता वाट पाहत बसला नाही. उलट, आपला कसोशीने शोध घेऊन आपल्याला पुन्हा आपल्या दैवी कळपात आणण्याची कामगिरी त्याने पुत्रावर सोपवली.
या उताऱ्यावर चिंतन करताना, आपला प्रभू किती आतुरतेने आणि दृढनिश्चयाने आपला शोध घेतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनात तुम्हाला हे दिसते का? देवाचा शोध घेण्याची जबाबदारी मुख्यतः आपलीच आहे, असे कधी कधी आपल्याला वाटते. ही जबाबदारी आपल्यावर नक्कीच आहे. पण प्रभू किती उत्कटतेने आपल्याला शोधतो आणि आपण वाट चुकतो तेव्हा आपल्याला शोधून काढण्याची त्याला किती ओढ असते, हे उमगले की आपले कर्तव्य पार पाडणे खूप सोपे होते. दिवसेंदिवस आपला शोध घेण्यासाठी प्रभूने जे काही केले आहे, ते आपल्याला स्वर्गातच पूर्णपणे समजेल. पण आत्ता आपण हे आध्यात्मिक सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून येशू इतक्या आस्थेने आपल्याला शोधत असताना आपण त्याला अधिक मोकळ्या मनाने प्रतिसाद देऊ.
या उताऱ्यातून दुसरी गोष्टही उलगडते: देवाच्या पुत्राला आपण सापडतो आणि तो आपल्याला उचलून पापापासून दूर नेतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या हृदयात किती आनंद होतो! देव आपल्यावर रागावलेला आहे, तो सतत आपले दोष पाहतो आणि आपल्याला दोषी ठरवतो, असे मानण्याची चूक आपण फारदा करतो. पण आपण वाट चुकतो तेव्हा आपल्याला शोधण्यासाठी देवाच्या पुत्राने किती काही केले, आणि आपण सापडलो व त्याने आपल्याला उचलून पापापासून दूर नेले तेव्हा त्याच्या हृदयात किती आनंद झाला, हे जर आपल्याला उमगले, तर प्रत्येक वेळी तो कृपेद्वारे आपल्याकडे येईल तेव्हा आपण त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमळ आमंत्रणांसाठी आणि त्याच्या दयाळू हृदयासाठी अधिक सहजपणे आपले मन उघडू.
आज यावर चिंतन करा: आपला प्रभू स्वतः तुमचा शोध घेत असताना त्याच्या हृदयात किती उत्कंठा आहे! तुम्हाला उचलून हळुवारपणे पुन्हा पित्याकडे नेताना त्याचे हृदय ज्या आनंदाने भरून जाते, त्या आनंदाची ही उत्कंठा आहे. आपल्या प्रभूच्या हृदयातील हा आनंद पूर्णत्वाला जाऊ द्या, म्हणजे तुम्हालाही या विपुल आनंदात सहभागी होता येईल.
हे माझ्या प्रभू, तू रात्रंदिवस माझा शोध घेतोस. मी अधिक पूर्णपणे तुझ्याकडे परत यावे म्हणून मला सतत हाक देताना तू कधीच थकत नाहीस. तुझ्या प्रेमाच्या आणि दयेच्या हळुवार आमंत्रणांना नेहमी प्रतिसाद देऊन तुझे हृदय आनंदाने भरून टाकण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आपली ओझी उतरवणे
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील बुधवार
“कष्ट करणाऱ्यांनो आणि ओझ्याने दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या; मी तुम्हाला विश्रांती देईन.” मत्तय 11:28
झोप ही जीवनातल्या सर्वांत आनंददायी आणि आरोग्यदायी गोष्टींपैकी एक आहे. गाढ आणि ताजेतवाने करणारी झोप मिळते तेव्हा हे विशेष जाणवते. गाढ झोप घेतलेली व्यक्ती जागी झाल्यावर ताजीतवानी होते आणि नव्या दिवसाला सामोरी जायला तयार असते. अर्थात, याच्या उलटही खरे आहे. झोप लागायला त्रास होत असेल आणि लागलेली झोपही अस्वस्थ असेल, तर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. चांगली झोप न मिळणे ही नेहमीचीच गोष्ट झाली, तर हे विशेष जाणवते.
आपल्या आध्यात्मिक जीवनातही असेच आहे. अनेकांना “आध्यात्मिक विश्रांती” म्हणजे काय, याचा अनुभवच नसतो. ते दर आठवड्याला काही प्रार्थना म्हणत असतील, मिस्सात सहभागी होत असतील किंवा पवित्र तासही पाळत असतील. पण आपल्यापैकी प्रत्येक जण खोलवर नेणाऱ्या आणि अंतःकरण बदलणाऱ्या प्रार्थनेत तल्लीन झाला नाही, तर आपल्याला आवश्यक असलेली आंतरिक आध्यात्मिक विश्रांती अनुभवता येणार नाही.
आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला “माझ्याकडे या…” असे आमंत्रण देतो. आपल्या रोजच्या जीवनातील ओझी त्याला हलकी करू देत असताना, आपले अंतःकरण बदलू देण्याचे हे आमंत्रण आहे. मोह, संभ्रम, निराशा, राग अशा अनेक आध्यात्मिक अडचणींना आणि आव्हानांना आपल्याला रोज सामोरे जावे लागते. दुष्टाच्या खोट्या बोलण्याचा वारंवार मारा होतो, धर्मापासून अधिकाधिक दूर जाणाऱ्या संस्कृतीचा विरोध सहन करावा लागतो आणि आपण रोज पाहत, ऐकत व वाचत असलेल्या विविध माध्यमांमधून आपल्या इंद्रियांवर भडिमार होतो. दिवसेंदिवस अशा अनेक गोष्टींना सामोरे जाताना आपण आतून, आध्यात्मिकदृष्ट्या, थकून जातो. म्हणूनच केवळ आपल्या प्रभूकडून मिळणाऱ्या आध्यात्मिक ताजेपणाची आपल्याला गरज आहे. खोलवर नेणाऱ्या आणि नवी चेतना देणाऱ्या प्रार्थनेतून मिळणारी आध्यात्मिक “झोप” आपल्याला हवी आहे. अशी प्रार्थना तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपण ख्रिस्ताच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन आपल्या संपूर्ण अस्तित्वानिशी त्याच्याकडे येतो आणि आपण जसे आहोत तसे स्वतःला, तसेच रोज आपल्या वाट्याला येणाऱ्या सर्व गोष्टी, त्याला समर्पित करतो.
तुम्हाला कधी कधी थकवा जाणवतो का, यावर आज चिंतन करा. विशेषतः मानसिक किंवा भावनिक थकव्याचा विचार करा. असा थकवा अनेकदा मुळात आध्यात्मिक असतो, म्हणून त्यावर आध्यात्मिक उपायाची गरज असते. आपला प्रभू देत असलेला उपाय शोधा: त्याचे आमंत्रण स्वीकारून सखोल प्रार्थनेत त्याच्याकडे या आणि त्याच्या सान्निध्यात विसावा घ्या. असे केल्याने तुम्ही ज्या जड ओझ्यांशी झगडत आहात, ती हलकी होण्यास मदत होईल.
हे माझ्या प्रेमळ प्रभू, तुझ्याकडे येऊन तुझ्या गौरवमय सान्निध्यात विसावा घेण्याचे तुझे आमंत्रण मी स्वीकारतो. हे प्रिय प्रभू, कृपेने आणि दयेने ओसंडून वाहणाऱ्या तुझ्या हृदयाकडे मला ओढून घे. मला तुझ्या सान्निध्यात घे, म्हणजे मला तुझ्यामध्ये विसावा मिळेल आणि जीवनातील अनेक ओझ्यांतून माझी सुटका होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आत्म्याच्या शत्रूंवर हल्ला करणे
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील गुरुवार
“बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या दिवसांपासून आजपर्यंत स्वर्गाच्या राज्यावर हिंसक हल्ले होत आहेत, आणि हिंसक लोक ते बळाने हस्तगत करत आहेत.” मत्तय 11:12
स्वर्गाचे राज्य “बळाने” हस्तगत करणाऱ्या त्या “हिंसक” लोकांपैकी तुम्ही आहात का? तुम्ही त्यांच्यापैकी असाल, अशी आशा आहे!
येशूचे शब्द कधीकधी समजायला कठीण जातात. वरील उतारा हे त्याचेच एक उदाहरण आहे. या उताऱ्याविषयी संत होसेमारिया एस्क्रिवा म्हणतात की, ज्या वातावरणात श्रद्धेला विरोध असतो, तिथे “धैर्य” आणि “निर्भयता” दाखवणारे ख्रिस्ती म्हणजे हे “हिंसक” लोक (पाहा ख्रिस्त जवळून जात आहे, 82). अलेक्झांड्रियाचे संत क्लेमेंट म्हणतात की स्वर्गाचे राज्य “स्वतःशी लढणाऱ्यांचे” आहे (कोणत्या धनिकाचे तारण होईल?, 21). दुसऱ्या शब्दांत, स्वर्गाचे राज्य हस्तगत करणारे “हिंसक” लोक म्हणजे ते मिळवण्यासाठी आपल्या आत्म्याच्या शत्रूंशी निकराने लढणारे लोक.
आत्म्याचे शत्रू कोणते? परंपरेनुसार आपण जग, देह आणि सैतान यांचा उल्लेख करतो. देवाच्या राज्यात राहण्यासाठी झटणाऱ्या ख्रिस्ती लोकांच्या आत्म्यांत या तीन शत्रूंनी मोठी हिंसा घडवली आहे. मग आपण त्या राज्यासाठी कसे लढायचे? बळाने! काही भाषांतरांमध्ये असे म्हटले आहे की “हल्ला करणारे” राज्य बळाने हस्तगत करत आहेत. याचा अर्थ ख्रिस्ती जीवन केवळ निष्क्रियपणे जगता येत नाही. नुसते हसतमुख राहून आपल्याला स्वर्गात जाता येणार नाही. आपल्या आत्म्याचे शत्रू खरे आहेत आणि ते आक्रमक आहेत. म्हणून आपणही आक्रमक झाले पाहिजे, पण ते या अर्थाने की ख्रिस्ताच्या धैर्याने आणि निर्भयतेने या शत्रूंना थेट सामोरे गेले पाहिजे.
हे आपण कसे करावे? उपवास आणि आत्मसंयम यांद्वारे आपण देहाच्या वासनांशी सामना करतो. ख्रिस्ताच्या सत्यात, म्हणजेच शुभवर्तमानाच्या सत्यात, दृढ राहून आणि आपल्या काळातील तथाकथित “शहाणपणाप्रमाणे” वागण्यास नकार देऊन आपण जगाचा सामना करतो. आणि सैतान आपल्याला फसवण्यासाठी, गोंधळात टाकण्यासाठी आणि प्रत्येक बाबतीत चुकीच्या मार्गाला नेण्यासाठी जे दुष्ट डाव रचतो, ते आपण ओळखतो. अशा रीतीने आपण त्याला दटावू शकतो आणि आपल्या जीवनातील त्याच्या कारवाया झिडकारू शकतो.
आपल्या अंतरंगावर हल्ला करणाऱ्या शत्रूंशी लढण्यासाठी धैर्य आणि निर्भयता वाढवण्याचे जे आवाहन तुम्हाला आहे, त्यावर आज चिंतन करा. या लढाईत भीतीचा काही उपयोग नाही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर आणि दयेवर दृढ भरवसा ठेवणे, हेच आपल्याला आवश्यक असलेले एकमेव शस्त्र आहे. त्याच्यावर विसंबून राहा आणि ख्रिस्ताची शांती तुमच्याकडून हिरावून घेण्यासाठी हे शत्रू जे नाना मार्ग अवलंबतात, त्यांना बळी पडू नका.
हे माझ्या गौरवशाली आणि विजयी प्रभू, माझ्यावर तुझ्या कृपेचा वर्षाव करशील असा मला तुझ्यावर विश्वास आहे, जेणेकरून जगाला, माझ्या देहाच्या मोहांना आणि खुद्द सैतानालाही मी खंबीरपणे तोंड देऊ शकेन. मला धैर्य, निर्भयता आणि मनोधैर्य दे, म्हणजे श्रद्धेचा चांगला लढा मला देता येईल आणि तुझा व माझ्या जीवनासाठी असलेल्या तुझ्या परमपवित्र इच्छेचा शोध घेण्यात मी कधीही डळमळणार नाही. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
नृत्य आणि विलाप
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार
येशू लोकसमुदायाला म्हणाला, “या पिढीची तुलना मी कशाशी करू? ती बाजारपेठेत बसून एकमेकांना हाक मारणाऱ्या मुलांसारखी आहे. ती म्हणतात, ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत; आम्ही शोकगीत गायले, पण तुम्ही विलाप केला नाहीत.’” मत्तय 11:16–17
“आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली…” आणि “आम्ही शोकगीत गायले…” असे म्हणताना येशूला काय सांगायचे आहे? प्राचीन संदेष्ट्यांनी ज्या देववचनाची घोषणा केली, तेच या “बासरी” आणि “शोकगीत” या प्रतिमांतून व्यक्त होते, असे चर्चचे पिते स्पष्ट करतात. येशूसाठी मार्ग तयार करण्यास त्याच्याआधी कितीतरी जण आले, पण पुष्कळांनी त्यांचे ऐकले नाही. बाप्तिस्मा देणारा योहान हा शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ संदेष्टा होता. त्याने लोकांना पश्चात्ताप करण्याचे आवाहन केले, पण थोड्याच लोकांनी त्याचे ऐकले. हेच दुःखद सत्य येशू आपल्या निदर्शनास आणून देतो.
आज आपल्या काळात, जुन्या करारातील संदेष्ट्यांव्यतिरिक्त आपल्याला आणखी कितीतरी काही लाभले आहे. संतांची अद्भुत साक्ष, चर्चची अचूक शिकवण, संस्कारांचे वरदान आणि नव्या करारात नोंदवलेले खुद्द देवपुत्राचे जीवन व त्याची शिकवण आपल्याला लाभली आहे. तरीही, दुःखाची गोष्ट अशी की, कितीतरी जण ऐकण्यास नकार देतात. शुभवर्तमानाला प्रतिसाद म्हणून कितीतरी जण ना “नाचतात”, ना “विलाप करतात”.
आपण “नाचले” पाहिजे, याचा अर्थ असा की, ख्रिस्त येशूच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे आपल्याला मिळालेली देणगी ही आपल्या मनःपूर्वक आनंदाचे आणि चिरंतन आराधनेचे कारण ठरली पाहिजे. जे देवपुत्राला खरोखर ओळखतात आणि त्याच्यावर प्रेम करतात, ते आनंदाने भरून जातात! त्याचबरोबर, आपल्या स्वतःच्या आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनातील असंख्य पापांबद्दल आपण “विलाप” केला पाहिजे. पाप ही वस्तुस्थिती आहे आणि ते सर्वत्र आढळते. त्याला एकमेव योग्य प्रतिसाद म्हणजे पापाबद्दलचे पवित्र दुःख. तारण ही वस्तुस्थिती आहे. नरकही खरा आहे. या दोन्ही सत्यांना आपण आपल्या संपूर्ण जीवनाने प्रतिसाद दिला पाहिजे.
शुभवर्तमानाचा तुमच्या स्वतःच्या जीवनावर कितपत प्रभाव पडू दिला आहे? संतांच्या जीवनातून आणि आपल्या चर्चद्वारे देवाने जे सांगितले आहे, ते तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकता? प्रार्थनेत देव तुमच्या सदसद्विवेकबुद्धीच्या गाभ्यात तुमच्याशी बोलतो, तेव्हा त्याच्या वाणीकडे तुमचे लक्ष असते का? तुम्ही ऐकता का? प्रतिसाद देता का? त्याच्या मार्गाने चालता का? ख्रिस्ताच्या आणि त्याच्या कार्याच्या सेवेसाठी तुम्ही आपले संपूर्ण जीवन अर्पण करता का?
जगाच्या तारणाऱ्याचे सुस्पष्ट, निःसंदिग्ध, परिवर्तन घडवणारे आणि जीवन देणारे शब्द व त्याची उपस्थिती यांवर आज चिंतन करा. तो जे काही स्पष्टपणे बोलला आहे, त्याकडे आणि त्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीकडे तुम्ही आपल्या जीवनात किती लक्ष दिले आहे, याचा विचार करा. देवाच्या गौरवासाठी तुम्ही “नाचत” नसाल आणि तुमच्या जीवनात व आपल्या जगात उघडपणे दिसणाऱ्या पापांबद्दल “विलाप” करत नसाल, तर ख्रिस्ताचे आमूलाग्र अनुसरण करण्याचा नव्याने निश्चय करा. शेवटी, युगानुयुगे देवाने प्रकट केलेले सत्य आणि त्याची पवित्र व दैवी उपस्थिती यांनाच खरे महत्त्व आहे.
हे माझ्या गौरवशाली प्रभू येशू, माझ्या जीवनात आणि माझ्या सभोवतालच्या जगात तुझे दैवी सान्निध्य आहे, हे मी मान्य करतो. तू दररोज असंख्य मार्गांनी माझ्याशी बोलतोस आणि माझ्याकडे येतोस; त्यांकडे अधिक लक्ष द्यायला मला मदत कर. तुझी आणि तुझ्या पवित्र वचनाची ओळख मला होत असताना मला आनंदाने भरून टाक. माझे पाप आणि जगातील पापे मला दिसतात, तेव्हा मला खरा पश्चात्ताप होऊ दे, म्हणजे माझ्या स्वतःच्या पापाशी झुंज देण्यासाठी आणि ज्यांना सर्वांत जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत तुझे प्रेम आणि दया पोहोचवण्यासाठी मी अथक प्रयत्न करीन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
देवाच्या वचनाकडे कसे वळावे
आगमनकाळातील दुसऱ्या आठवड्याचा शनिवार
“मी तुम्हांला सांगतो की एलिया आधीच आला आहे. त्यांनी त्याला ओळखले नाही; उलट त्यांना वाटेल तसे ते त्याच्याशी वागले. त्याचप्रमाणे मनुष्यपुत्रालाही त्यांच्या हातून दुःख भोगावे लागेल.” तेव्हा येशू आपल्याशी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाविषयी बोलत होता, हे शिष्यांना समजले. मत्तय 17:12–13
जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा मलाखी होता. ख्रिस्ताच्या आगमनाच्या सुमारे 400 वर्षे आधी त्याचे सेवाकार्य संपले. मशीहासाठी मार्ग तयार करायला त्याच्याआधी एक “दूत” येईल, अशी भविष्यवाणी मलाखीने केली. प्रभूचा दिवस येण्यापूर्वी “एलिया संदेष्टा” येईल, असेही मलाखी पुढे सांगतो (पाहा: मलाखी 3:1–24).
येशूच्या काळातील अनेकांना ही भविष्यवाणी समजली नव्हती; अनेकांना तर तिची माहितीही नव्हती. त्यामुळे शास्त्र्यांनी या भविष्यवाणीचा आधार घेऊन अनेकांचा गोंधळ उडवला. “एलिया” अजून आलेला नाही, म्हणून येशू हा वचन दिलेला मशीहा असूच शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
नवा एलिया म्हणून येणारा “दूत” म्हणजे बाप्तिस्मा देणारा योहान, आणि तो आधीच आला आहे, हे येशूने शिष्यांना स्पष्ट केले. हे सांगताना येशूने हेही स्पष्ट केले की पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्यात शास्त्री चुकत होते आणि आपल्या चुकीच्या अर्थामुळे लोकांची दिशाभूल करत होते.
यावरून एक गोष्ट आपल्याला कळते: देवाच्या वचनाकडे आपण नम्रतेने वळले पाहिजे. आपल्याकडे काहीतरी विलक्षण शहाणपण आहे, असा शास्त्र्यांना गर्व होता; पण प्रत्यक्षात तसे नव्हते. त्यामुळे देवाच्या लोकांना योग्य आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात ते कमी पडले.
जुन्या करारातील भविष्यवाण्याच नव्हे, तर स्वतः येशूने उच्चारलेली वचनेही नीट समजून घेण्यासाठी देवाच्या वचनासमोर नम्र असणे अत्यावश्यक आहे. ही नम्रता नसेल, तर आपल्या प्रभूच्या सुंदर आणि पवित्र वचनांचा चुकीचा अर्थ आपल्यापैकी कोणाकडूनही सहज लावला जाऊ शकतो.
पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट गहन, सखोल आणि सत्य आहे. देवाच्या या पवित्र वचनाद्वारे आपली खुद्द देवाशी भेट होते. पण आपण मनात गर्वाला शिरू दिले, तर शास्त्र्यांप्रमाणे आपणही देवाच्या वचनाचा चुकीचा अर्थ लावू शकतो. त्यामुळे आपल्या मनात देवाची चुकीची प्रतिमा तयार होईल आणि ती आपल्या प्रेमळ प्रभूशी होणाऱ्या वैयक्तिक भेटीत अडथळा ठरेल. पण देवाने आपल्याला जे काही प्रकट केले आहे त्यासमोर आपण सदैव नम्र राहिलो, तर तो आपल्या हृदयाला सांगू इच्छित असलेली अत्यंत गहन आणि सुंदर सत्ये अधिक सहजपणे स्वीकारू शकू.
आज चिंतन करा: देवाचे वचन समजून घेताना कोणकोणत्या बाबतीत तुमचा गोंधळ उडाला आहे? आपला प्रभू तुम्हाला जे सांगू इच्छितो, त्यासाठी नम्रतेने आपले हृदय अधिक खुले करण्याचा प्रयत्न करा. खुले मन आणि हृदय ठेवून ऐका आणि श्रद्धेच्या निर्मळ देणगीला तुमचे मार्गदर्शन करू द्या, म्हणजे ती तुम्हाला आपल्या श्रद्धेतील सर्वांत गहन सत्यांपर्यंत नेईल.
हे माझ्या गूढ आणि सुंदर प्रभू, तुझ्या लिखित वचनातून तू जीवनातील अत्यंत गहन आणि सखोल रहस्ये आम्हाला उलगडून दाखवली आहेत. तुझ्या वचनाकडे मी नेहमी नम्रतेने आणि खुल्या मनाने वळावे, म्हणजे मला तुझी अधिक पूर्ण ओळख होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!
(लवकरच उपलब्ध होईल!)
अॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल


