पवित्र शास्त्राचे वाचन: खालील उताऱ्यांपैकी काही किंवा सर्व उतारे प्रार्थनापूर्वक वाचा:
मत्तय 26:57–68
मार्क 14:53–72
योहान 18:24–27
संदर्भ: हन्नाने चौकशी केल्यानंतर येशूंना कैफा या मुख्य याजकाच्या घरी आणले जाते. तेव्हाही पेत्र दुरून हा सगळा गोंधळ पाहत राहतो. ‘तू येशूचा शिष्य आहेस,’ असा आरोप त्याच्यावर होतो, तेव्हा तो तीनदा ते नाकारतो. योहानाच्या शुभवर्तमानानुसार, येशू हन्नासमोर असताना पेत्राने पहिल्यांदा नाकारले. मात्र, समदर्शी शुभवर्तमानांनुसार, येशू कैफासमोर असताना पेत्राने तीनदा नाकारले. पण एक गोष्ट स्पष्ट आहे: येशूंनी आधीच सांगितल्याप्रमाणे पेत्राने त्यांना तीनदा नाकारले.
कैफा येशूंची चौकशी करत असताना अनेक जण पुढे आले आणि त्यांनी खोटी व परस्परविरोधी साक्ष दिली. येशूंनी पूर्वी उघडपणे सांगितलेल्या अनेक गोष्टींचा विपर्यास करून आणि त्या संदर्भाबाहेर मांडून, त्यांना दोषी ठरवण्यासाठी त्यांचा पुरावा म्हणून वापर केला जात होता, हे स्पष्ट आहे. सुरुवातीला येशू मौन बाळगतात. पण शेवटी ते कैफाला स्पष्ट सांगतात की ते स्वतः ख्रिस्त, देवाचे पुत्र आहेत आणि लवकरच आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान होतील. हे ऐकून कैफा आपली वस्त्रे फाडतो आणि येशूंना ईशनिंदेबद्दल दोषी ठरवतो. तिथे उपस्थित असलेले बाकीचे सर्व जण येशूंची थट्टा करू लागतात, त्यांच्यावर थुंकतात, त्यांना मारतात आणि त्यांना ठार मारावे म्हणून ओरडतात.
चिंतन: या प्रसंगावर प्रार्थनापूर्वक चिंतन करा. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा उपयोग करा.
- रात्रीच्या अंधारात शास्त्री आणि वडीलजन मुख्य याजक कैफाच्या घरी जमत आहेत, अशी कल्पना करा. ते रचत असलेले कट, त्यांचा मत्सर, संताप, कपट आणि दुष्ट हेतू यांचा विचार करा.
- बांधलेल्या येशूंना नेत असताना त्यांच्याशी कशी निर्दय वागणूक केली जाते, त्यांची कशी थट्टा केली जाते आणि मग त्यांना त्या धर्मनेत्यांसमोर कसे आणले जाते, हे मनाच्या डोळ्यांनी पाहा.
- पेत्र दुरून पाहत आहे आणि येशूंना एकदा, दोनदा, तीनदा नाकारतो, या प्रसंगावर मनन करा. कोंबडा आरवला आणि येशूंनी वळून त्याच्याकडे पाहिले, तेव्हा पेत्र किती हादरला असेल, याची कल्पना करा. आपण नुकतेच काय केले, या जाणिवेने तो तिथून निघून जातो आणि रडू लागतो, हे दृश्य डोळ्यांसमोर आणा.
- कैफाने येशूंची केलेली चौकशी (मार्क 14:61–64) पुन्हा वाचा. कैफा आणि इतर धर्मनेते स्वतःलाच किती नीतिमान समजत होते, याचा विचार करा. सत्य बोलल्याने आपला छळ होईल आणि आपल्याला मृत्यूला सामोरे जावे लागेल, हे माहीत असूनही येशू किती आत्मविश्वासाने सत्य बोलले, यावरही मनन करा.
- त्यानंतर येशूंना कसे हिणवले गेले, त्यांच्यावर कसे थुंकले गेले, त्यांच्या श्रीमुखात कसे मारले गेले आणि त्यांची कशी थट्टा केली गेली, याची कल्पना करा. रात्रभर कैदेत असताना त्यांनी केलेल्या प्रार्थनेवर आणि त्यांच्या अंतःकरणातील भावांवर मनन करा.
मुख्य चित्र: अंतोनियो देल्ला कोर्ना – कैफासमोर ख्रिस्त
प्रायश्चित्तकाळातील ध्यानांची प्रस्तावना
- जीवनातील निर्णय आणि संकल्प
- झावळ्यांचा रविवार
- पवित्र गुरुवारापूर्वीच्या घडामोडी
- शेवटचे भोजन
- बागेत येशूची व्याकुळता
- येशूला अटक करून अन्नाससमोर आणले जाते
- येशूला कैफाससमोर आणले जाते
- येशूला पिलातासमोर आणले जाते
- येशूला हेरोदासमोर आणले जाते
- पिलातासमोर दुसरी सुनावणी
- येशू आपला क्रूस वाहतो आणि त्याला क्रूसावर खिळले जाते
- येशू क्रूसावरून बोलतो
- येशू क्रूसावर प्राण सोडतो
- आईच्या कुशीत येशूचे पार्थिव शरीर
- येशूला कबरीत ठेवले जाते
- पवित्र शनिवार
