ऐच्छिक चिंतने
पुढील तीन चिंतने करण्याची प्रेरणा तुम्हाला वाटत असेल, तर चिकाटीने ती पूर्ण करा. त्यांतील विषय कठीण वाटू शकतात; पण ते सखोलपणे समजून घेतल्याने क्षमा, दया आणि देवाशी एकरूपता यांवरील पुढील चिंतनासाठी आवश्यक पाया तयार होईल. ही पायाभूत चिंतने वगळणे म्हणजे पाया न घालता घर बांधण्यासारखे आहे. असे घर शेवटी कोसळेल. आध्यात्मिक जीवनाचेही तसेच आहे. स्वतःच्या पापाची, मृत्यूची, न्यायनिवाड्याची आणि नरकात जाण्याच्या शक्यतेची सखोल जाणीव असल्याशिवाय तुम्ही तारण आणि नवजीवनाच्या दिशेने पुढे जाऊ शकत नाही.
मृत्यू
आपल्याला एक दिवस मरण येणार आहे, या वास्तवाचा नियमितपणे विचार करणारे लोक फार थोडे आहेत. पण वय वाढत जाते, तसतसा हा विचार करणे सोपे होते. आपल्याला नम्र करणाऱ्या या सत्याचा क्षणभर विचार करा. (मौन चिंतन)
या जीवनाच्या कालावधीची तुलना अनंतकाळाशी करणे म्हणजे एका अणूची तुलना देवाने निर्माण केलेल्या संपूर्ण विश्वाशी करण्यासारखे आहे. तरीही, देवाने तुम्हाला संपूर्ण अनंतकाळ बहाल केला असताना, केवळ हेच जीवन (हा ‘अणू’) तुमच्या वाट्याला आले आहे, अशा रीतीने तुम्ही कितीतरी वेळा जगता. हे जीवन म्हणजे अनंतकाळाची तयारीच आहे, हे कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल. तुमची वाट पाहत असलेल्या शाश्वत जीवनाच्या तुलनेत हे जीवन इतके अल्प आहे की त्याची मोजदादच करता येत नाही. तुम्ही त्यासाठी कितपत तयारी करत आहात?
तुम्ही अनंतकाळ स्वर्गात किंवा नरकात घालवाल. तुम्ही कशावर विश्वास ठेवता आणि कोणते निर्णय घेता, यावर या दोन्हींपैकी कोणतीही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते. पण अनंतकाळाचा विचार करण्याआधी त्याच्या प्रवेशद्वाराकडे, म्हणजे मृत्यूकडे, पाहा. तुमचा मृत्यू कोणत्या दिवशी येईल? तो लवकरच येईल का? की अनेक वर्षांनी येईल? बहुतेकांना मृत्यू अजून बराच दूर वाटतो, म्हणून फार थोडे लोक त्याचे चिंतन करतात. पण मृत्यू कधी येईल हे माहीत नसणे, ही त्याकडे आशेने पाहून त्याचा विचार टाळण्याची सबब होऊ शकत नाही. तो लवकर येवो किंवा उशिरा, तो दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात येणारच आहे. पुन्हा क्षणभर थांबा आणि तुमच्या मृत्यूच्या दिवसाचा विचार करा. तो दिवस कसा असेल, याची कल्पना करून पाहा. (मौन चिंतन)
तुमच्या मृत्यूच्या क्षणी तुमचे शाश्वत भवितव्य निश्चित होईल. तुम्ही मृत्यूशय्येवर आहात, मागे वळून आपल्या आयुष्याकडे पाहत आहात आणि आता अनंतकाळात प्रवेश करणार आहात, अशी कल्पना करा. त्या क्षणी तुम्हाला कशाची खंत वाटेल का? वाटेल तर कशाची? की तुम्ही घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल आणि तुम्हाला लाभलेल्या कृपेबद्दल मन कृतज्ञतेने भरून जाईल व तुम्ही शांत असाल? (मौन चिंतन)
मृत्यूच्या वेळी तुम्हाला असे वाटेल का की आपण आणखी पैसा कमवायला हवा होता, अधिक लोकप्रिय व्हायला हवे होते, अधिक मान्यता मिळवायला हवी होती किंवा आणखी शिक्षण घ्यायला हवे होते? आशा आहे की असे वाटणार नाही. (मौन चिंतन)
मृत्यूच्या वेळी, आपण अधिक प्रेम केले नाही, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवला नाही किंवा क्षमा केली नाही, याची तुम्हाला खंत वाटेल का? स्वतःच्या सुखातच रमून आयुष्य घालवले, मनात अढी ठेवली, क्रूरपणे किंवा अप्रामाणिकपणे वागलो, याची खंत वाटेल का? (मौन चिंतन)
मृत्यूच्या वेळी, हे जीवन तुम्ही अनंतकाळाची तयारी करत जगलात, याबद्दल तुमचे मन कृतज्ञतेने भरून जाईल का? तुम्ही मनापासून सद्गुण जोपासण्याचा प्रयत्न केलात, याबद्दल? तुम्ही आयुष्यभर दररोज कळकळीने प्रार्थना केलीत, याबद्दल? दररोज क्षमा करण्याचा, सलोखा साधण्याचा, करुणा आणि दया दाखवण्याचा, इतरांशी अत्यंत प्रेमळपणे आणि आदराने वागण्याचा, तसेच सर्व शक्तीनिशी देवाची इच्छा जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, याबद्दल? या सर्वांबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटेल, अशी आशा आहे.
मृत्यू सर्वकाही बदलून टाकतो. तो अनंतकाळाचे प्रवेशद्वार आहे. पण अनंतकाळाची तयारी आताच करायची आहे. मृत्यूचा तो क्षण डोळ्यांसमोर ठेवून जगण्याचा आणि त्यासाठी मनापासून तयारी करण्याचा निश्चय करा. म्हणजे मृत्यूच्या उंबरठ्यावर तुम्ही दृढ विश्वासाने, आशेने आणि पुढे तुमची वाट पाहत असलेल्या महान गोष्टींच्या उत्सुकतेने उभे राहाल. आताच स्वतःचा संकल्प करा. (मौन चिंतन)
- देव : सर्व अस्तित्वाचा निर्माणकर्ता
- देव : तुमच्या जीवनाचा जिव्हाळ्याचा मार्गदर्शक
- देव : तुमच्या जीवनाचे ध्येय, प्रयोजन आणि अंतिम गंतव्य
- देवदूतांचे पाप
- आदाम आणि हव्वा यांचे पाप
- पापाचे सर्वसाधारण परिणाम
- सातव्या ते नवव्या ध्यानांची ओळख
- वैयक्तिक पाप : दैवी सूर्याच्या प्रकाशात
- माझ्या जीवनातील वैयक्तिक पापे
- अपमान आणि नम्रता
- मृत्यू
- न्यायनिवाडा
- नरक
मुख्य चित्र: ‘संत योसेफ यांचा मृत्यू’ — सिमोने बाराबिनो
