मराठी

न्यायनिवाडा

पवित्र तासाचा क्रम

बोध: स्वतःच्या मृत्यूच्या वास्तवाचा विचार करणारे थोडेच असतात; मृत्यूनंतर आपला न्याय होणार आहे, याचा विचार करणारे कदाचित त्याहूनही कमी असतात. मृत्यूनंतर तुम्हाला दोन प्रकारच्या न्यायाला सामोरे जावे लागेल: मृत्यू होताच ‘वैयक्तिक न्याय’ आणि जगाच्या शेवटी ‘अंतिम न्याय’.

सर्वप्रथम, तुमचा मृत्यू झाल्यावर तुमच्या आत्म्यावरील प्रत्येक पाप तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट होईल. देव तुमच्या आत्म्याकडे जसा पाहतो, तसाच तो तुम्हालाही दिसेल. काहींना हे भयावह आणि धक्कादायक वाटेल. ‘मी चांगली व्यक्ती आहे’ या खोट्या खात्रीच्या आधारावर अनेक जण जगतात. ‘मी चांगली व्यक्ती आहे, त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर सर्व काही ठीक होईल,’ असा निष्कर्ष अनेक जण काढतात. अशा लोकांना या चिंतनाची विशेष गरज असू शकते.

‘चांगले’ असण्याचा अर्थ संत होण्यासाठी तुम्ही झटला आहात असा असेल, तर सर्व काही ठीक होईल. पण ‘चांगले’ असण्याचा अर्थ तुम्ही याहून कमी काही घेत असाल, तर तुमचा वैयक्तिक न्याय हा तुम्हाला लज्जेला आणि शुद्धीकरणाला सामोरे जावे लागण्याचा क्षण असेल. न्यायाच्या वेळी तुमच्या आत्म्यावरील प्रत्येक पाप, ते कितीही लहान असले तरी, तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. कशासाठी? ते नाहीसे व्हावे म्हणून. पण हे शुद्धीकरण इथे आणि आत्ता जितके कठीण आहे, त्यापेक्षा मृत्यूनंतर सोपे असणार नाही. तुम्ही आता केवळ ‘चांगले’ जीवन जगावे आणि मग मृत्यूनंतर देवाने तुमच्या सगळ्या लहानसहान दोषांकडे दुर्लक्ष करावे, असे होणार नाही. उलट, मृत्यूच्या वेळी प्रत्येक दोष, प्रत्येक अनुचित आसक्ती आणि प्रत्येक पाप तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. देवाच्या प्रेमाच्या शुद्ध करणाऱ्या अग्नीने तुम्हाला शुद्ध करावे, यासाठी तुम्हाला स्वतःला त्या अग्नीच्या स्वाधीन करावे लागेल. या शुद्धीकरणाच्या वेळी तुम्हाला वेदना होतील. हीच शुद्धिस्थानाची अवस्था आहे.

याचा विचार तुम्ही आत्ताच का करावा? कारण तुमचे शुद्धीकरण या पृथ्वीवरील जीवनातच व्हावे, अशी देवाची इच्छा आहे. मग वाट कशाला पाहायची? प्रत्येक पापापासून आणि पापाच्या प्रत्येक डागापासून तुम्हाला आजच शुद्ध करण्याची त्याची इच्छा आहे. यासाठी तुम्ही मृत्यूनंतरपर्यंत वाट पाहावी, असे त्याला वाटत नाही. तो जसा परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हावे, ही त्याची आज्ञा तुम्ही पाळली आहे का? बहुधा नाही. पण त्या वाटेवर पाऊल टाकायला अजून उशीर झालेला नाही.

चिंतन: सध्या तुमच्या आत्म्यावर असलेल्या प्रत्येक पापावर, अगदी लहानसहान पापांवर आणि प्रत्येक उणिवेवर काही मिनिटे चिंतन करा. तुम्ही शेवटचे केलेले सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण क्षणभर आठवा. (मौन चिंतन)

तुमच्यात कोणत्या सद्गुणाची उणीव आहे आणि तुमच्या दुर्बलता कोणत्या आहेत, यांवर चिंतन करा. (मौन चिंतन)

ज्या पापांचे ओझे तुम्ही बराच काळ वाहत आला आहात, त्या पापांवर विशेषतः चिंतन करा. (मौन चिंतन)

न्यायाच्या दिवशी तुमचा आत्मा देवासमोर शुद्ध आणि पवित्र असा उभा राहावा, म्हणून तुमच्या जीवनातून प्रत्येक पाप नाहीसे व्हावे, मग ते कितीही मोठे किंवा लहान असो, अशी देवाची इच्छा आहे. न्यायाच्या त्या गौरवशाली दिवसासाठी तुमची अधिक चांगली तयारी व्हावी, म्हणून आत्ताच स्वतःला या शुद्धीकरणासाठी खुले करण्याचा तुमचा निर्धार किती दृढ आहे? (मौन चिंतन)

पायाभूत ध्यानांची ओळख

  1. देव : सर्व अस्तित्वाचा निर्माणकर्ता
  2. देव : तुमच्या जीवनाचा जिव्हाळ्याचा मार्गदर्शक
  3. देव : तुमच्या जीवनाचे ध्येय, प्रयोजन आणि अंतिम गंतव्य
  4. देवदूतांचे पाप
  5. आदाम आणि हव्वा यांचे पाप
  6. पापाचे सर्वसाधारण परिणाम
  7. सातव्या ते नवव्या ध्यानांची ओळख
  8. वैयक्तिक पाप : दैवी सूर्याच्या प्रकाशात
  9. माझ्या जीवनातील वैयक्तिक पापे
  10. अपमान आणि नम्रता
  11. मृत्यू
  12. न्यायनिवाडा
  13. नरक

वहीत लिहिण्याचे सराव

अनुक्रमणिका

मुख्य चित्र: संत योसेफांचा मृत्यू