मराठी

परिचय

विवाहित जोडप्यांसाठी शनिवार-रविवारी आयोजित केलेल्या एका आध्यात्मिक कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो आणि सादरीकरणही करत होतो. त्या वेळी माझ्या पत्नीला पत्र लिहिण्यासाठी मी थोडा वेळ काढला. ते पत्र लिहिताना मी वापरत असलेल्या वहीत अचानक हे शब्द लिहिले: “तू मला येऊ दिलेस तर मी तुझ्या जीवनात येऊ शकतो.” ते शब्द लिहिताक्षणी मला आश्चर्य वाटले आणि मी आतून हादरून गेलो. कारण ते माझ्या पत्नीला लिहिलेल्या पत्राचा भाग नव्हते, तर देव थेट माझ्याशी बोलत होता, हे मला उमगले. त्याच वेळी, यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती अशी गाढ शांतता मला जाणवली.

आम्ही घरी परतल्यावर, जेव्हा जेव्हा मी मन शांत करून प्रार्थना करायचो, वही घ्यायचो आणि हातात पेन घेऊन लिहायला सुरुवात करायचो, तेव्हा तेव्हा मला आध्यात्मिक चिंतन लिहिता येत असे. लिहिताना शब्द नेहमीपेक्षा जवळजवळ पाचपट वेगाने ओघाने येत आहेत, असे वाटायचे. मनात जे उमटत होते त्याचा विचारही मला करावा लागत नसे. शब्द आपोआप ओघाने येत. काही काळानंतर मला उद्देशून उच्चारलेले हे शब्द मी स्पष्ट ऐकले: “तू एक पुस्तक लिहिशील आणि ते अनेक जण वाचतील.”

त्यानंतर अनेक वर्षे केलेल्या या प्रयत्नांतून या पुस्तकातील लेखन साकारले. हे देवाकडून आले आहे, असा माझा विश्वास आहे. कारण जेव्हा इतकी गाढ शांतता अनुभवायला मिळते, तेव्हा ती वरून लाभलेली आहे, या जगातून आलेली नाही, हे आपोआप कळते.  

या देणगीशी जुळवून घेताना मला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला आणि तो आजही सुरू आहे. या देणगीचा ठसा माझ्या अंतरात उमटला होता आणि ती माझ्यात आहे याची मला नेहमीच जाणीव होती. ती मला कधीच सोडून गेली नाही. ती कायमची होती. त्या काळात काही मित्रांनी माझ्या मूळ वहीतली चिंतने टंकलिखित केली, पण ती कशी प्रकाशित करावीत हे आम्हाला ठरवता आले नाही. योग्य वेळ आल्यावर मदत करावी आणि मार्ग दाखवावा, अशी मी देवाला विनंती केली. प्रकाशनाचा मार्ग दिसायला सदतीस वर्षे लागली. याबद्दल मी कृतज्ञ आहे, कारण मला मिळालेली सूचना त्यामुळे पूर्णत्वाला गेली आहे.  

अनेक जण या पुस्तकाचे स्वागत करतील आणि यातून मिळणाऱ्या प्रेरणेने अनेक चांगले परिणाम घडतील, अशी मला आशा आहे. काळाच्या ओघात मला मिळालेला सर्वांत चांगला सल्ला असा होता: या लेखनाचे मोल त्यातून मिळणाऱ्या फळांवरून ठरवा.

लेखनाची ही क्षमता खरोखरच देवाची देणगी आहे, हे मला ठाऊक आहे. ती जपून आणि आदराने वापरली पाहिजे. अभिमानाला थारा देता कामा नये; नम्रताच वरचढ ठरली पाहिजे. आपल्या अंतःकरणाच्या गाभ्यातून येणारे ऐकण्याऐवजी त्यात स्वतःचे विचार मिसळण्याचा मोह होऊ शकतो, याची जाणीव ठेवली पाहिजे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा कधीतरी असे लिहिता यावे, अशी मी प्रार्थना करतो. हा निर्णय मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेवर सोपवतो.


अर्पणपत्रिका

हे लेखन प्रकाशित करण्यासाठी मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या पत्नीला. हे पुस्तक प्रकाशित करण्याची सोय करून देणाऱ्या माझ्या मुलाला आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना. स्वर्गात असलेल्या माझ्या मुलीला, जिने तिच्या परीने मला प्रेरणा दिली. ही पाने वाचून त्यांचे संपादन करणाऱ्या आणि या लेखनातून प्रेरणा घेणाऱ्या काही मित्रांना.  

पवित्र आत्म्याचे शब्द ऐकण्याची देणगी मला देणाऱ्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला.

या लेखनाद्वारे आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाचा गौरव होवो.


लेखक: रॉबर्ट रेमंड

“रॉबर्ट रेमंड” हे लेखकाने निवडलेले टोपणनाव आहे. ‘रॉबर्ट’ हे दृढीकरण संस्काराच्या वेळी लेखकाने घेतलेले नाव आहे, तर या कार्यावर पेन्याफोर्टचे संत रेमंड यांचा आशीर्वाद लाभावा म्हणून ‘रेमंड’ हे नाव निवडले आहे.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी संत रेमंड तत्त्वज्ञान शिकवत होते. तिशीच्या सुरुवातीलाच त्यांनी नागरी कायदा आणि चर्चचा धर्मविधीविषयक कायदा (कॅनन कायदा) या विषयांत पदव्या मिळवल्या होत्या. संत रेमंड इतके निपुण होते की राजे, पोप आणि बिशप या सर्वांनी त्यांची सेवा मागितली. पोप ग्रेगरी नववे यांनी त्यांची सदिच्छा संपादन केली. पेन्याफोर्टचे संत रेमंड यांनी चर्चच्या कायद्यांचा एक विशाल संग्रह सुसूत्रपणे संकलित करून चर्चला चिरस्थायी योगदान दिले. विसाव्या शतकापर्यंत हा संग्रह कॅनन कायद्याच्या तज्ज्ञांसाठी मूलभूत संदर्भग्रंथ होता.

जीवनातील विविध प्रसंगांत विशेष संरक्षण मिळावे म्हणून लेखक अनेक वर्षांपासून दररोज संत रेमंड यांची नोव्हेना म्हणत आला आहे.

हे संत रेमंड, या जीवनात आम्हाला भेडसावणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारे शहाणपण आज आम्हाला शिकवा आणि आम्हाला साहाय्य करा. आमच्यासाठी मध्यस्थी करा. या जगातून आमची वाट पाहत असलेल्या स्वर्गीय राज्यात जाताना आमच्यासोबत राहा.

स्वामित्व हक्क © 2019 रॉबर्ट रेमंड. सर्व हक्क राखीव. कोणत्याही चर्चला किंवा संस्थेला अव्यावसायिक हेतूंसाठी पुनर्मुद्रण करण्याची परवानगी आहे.


अनुक्रमणिका