मराठी

सत्ताविसावा दिवस : आळस की तत्परता?

प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा शुक्रवार

सखोल सदसद्विवेकपरीक्षण केल्याशिवाय प्रायश्चित्तकाळ फलदायी ठरणार नाही. पुढील सात दिवस आपण हे परीक्षण टप्प्याटप्प्याने करू. त्यामुळे समेटाच्या सुंदर आणि शुद्ध करणाऱ्या संस्कारासाठी तुम्हाला तयारी करता येईल. अनेक जण आपले सदसद्विवेकपरीक्षण टाळतात, त्याचे एक कारण म्हणजे आपण सर्वप्रथम ज्यावर चिंतन करणार आहोत ते पाप—आळस.

आळस म्हणजे अशी सुस्ती, जिच्यामुळे आपण देवाप्रती आणि इतरांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो. आळशी माणूस शिस्तीपेक्षा आरामाला, कामापेक्षा विश्रांतीला आणि तत्परतेपेक्षा उदासीनतेला प्राधान्य देतो. आळसामुळे आध्यात्मिक खिन्नता, निराशा, सुस्ती, चीड, निष्क्रियता, अस्वस्थता, उधळपट्टी आणि अपवित्र कुतूहल निर्माण होते. आळसाची सवय लागली की, सर्वांत सोपे आणि सुखावह काय करता येईल, हाच विचार दररोज सर्वप्रथम मनात येतो. उदाहरणार्थ, समाजमाध्यमांवर अतिप्रमाणात वेळ घालवल्याने माणूस आळशी बनू शकतो. ही वाईट सवय मोडण्याची प्रेरणा मिळण्यासाठी परिश्रम, तत्परता, जबाबदारीची जाणीव, इतरांविषयी कळकळ आणि चांगला बदल घडवण्याची इच्छा आवश्यक आहेत.

तत्परता (किंवा कर्तव्याबद्दलचा उत्साह) हा आळसाच्या विरुद्ध असलेला सद्गुण आणि त्यावरचा उपाय आहे. या सद्गुणामुळे आपण रोजच्या कर्तव्यांची जबाबदारी स्वीकारून ती देवाच्या इच्छेनुसार पार पाडू शकतो. कामाच्या आहारी जाणे हे दुसरे टोक आहे; तो आळसावरचा उपाय नाही. तत्परतेचा सद्गुण आपल्याला आपल्या सर्व कृतींमध्ये योग्य तो समतोल राखायला शिकवतो. देव आपल्याला जे करायला बोलावतो ते आपण निष्ठेने आणि उत्साहाने करतो आणि ताण व अनावश्यक ओझे निर्माण करणाऱ्या गोष्टींचा अतिरेकी ध्यास घेणे टाळतो.

इतरांशी वागताना, आपण स्वतःच्या आवडीनिवडींपासून लक्ष दूर करून आपल्या सभोवतालच्या लोकांवर प्रेम कसे व्यक्त करता येईल आणि त्यांची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष दिले, तर ख्रिस्ती प्रेम आपल्याला आळसावर मात करायला मदत करते. आळस आपले लक्ष स्वतःपुरतेच मर्यादित ठेवतो. प्रेमामुळे आपण इतरांकडे लक्ष देतो आणि त्यांचे जीवन अधिक चांगले कसे करता येईल याचा विचार करतो, मग त्यासाठी मोठा त्याग करावा लागला तरीही. त्या त्यागात आपल्याला आनंद मिळतो.

देवाशी असलेल्या आपल्या नात्यात, आळसामुळे आपल्याला रोजची प्रार्थना टाळण्याचा मोह होतो. आपल्या प्रार्थनांचा काही परिणाम होत नाही, किंवा आपण आपल्या कृतींतून देवाची सेवा करतो आणि आपले काम हीच आपली प्रार्थना आहे, अशी कारणे आपण स्वतःला देऊ शकतो. रोज प्रार्थना करण्याच्या संकल्पाशी निष्ठावान राहणे आणि त्या वेळी दुसरे काहीही न करता केवळ प्रार्थनेसाठी दररोज वेळ राखून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. खरे तर, तुम्ही प्रार्थनेसाठी बसताच किंवा आपल्या प्रभूसमोर गुडघे टेकताच प्रार्थना सोडून देण्याचा मोह झाला, तर त्या मोहावर मात केल्याने आळस दूर होण्यास मदत होईल.

प्रार्थनेतून सांत्वन मिळत नाही म्हणून आपण खचतो आणि प्रार्थना सोडून देतो, तेव्हा आध्यात्मिक आळस आपल्या जीवनात शिरतो. प्रार्थनाजीवनाच्या सुरुवातीला, ध्यानातून आणि आध्यात्मिक जाणिवांतून मिळणाऱ्या व प्रत्यक्ष अनुभवाला येणाऱ्या सांत्वनांद्वारे देव अनेकदा आपल्याला आध्यात्मिक प्रोत्साहन देतो. पण अशीही वेळ येईल, जेव्हा ही सांत्वने नाहीशी होतील आणि आपल्याला रिकामेपणा जाणवेल. या अनुभवाने आपण गोंधळून जाऊ शकतो आणि प्रार्थनाजीवन सोडून देऊ शकतो; हाच आध्यात्मिक आळस आहे. या कोरडेपणाच्या काळातही खचून न जाता प्रार्थनेत टिकून राहणे हे आपले ध्येय असले पाहिजे.

वधस्तंभावर मरणाच्या क्षणी येशू मोठ्याने म्हणाला, “मला तहान लागली आहे!” शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे त्याला काही प्रमाणात शारीरिक तहान लागली असावी. पण अधिक खोल अर्थाने, ज्यांना त्याच्या प्रेमाची गरज होती अशा प्रत्येक आत्म्यासाठी येशू तहानलेला होता. आपल्या स्वतःच्या आत्म्यासह सर्व आत्म्यांच्या तारणासाठी येशूला लागलेल्या तहानेत आपण सहभागी झालो, तर ही आध्यात्मिक तहान आपल्याला सर्व प्रकारच्या आळसावर मात करण्यास प्रवृत्त करेल.

हे माझ्या तहानलेल्या प्रभू, सर्व लोकांवर तुझ्या दयेचा वर्षाव करावा, ही तुझ्या आत्म्याची उत्कट इच्छा होती. त्यांनी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याने तुझे पवित्र हृदय तृप्त झाले आणि तुला त्यांच्यावर आणखी प्रेम करण्याची प्रेरणा मिळाली. तुझी दैवी तहान माझ्या आत्म्यात भरून दे—प्रथम माझ्या आत्म्याच्या तारणासाठी आणि ज्यांची सेवा करण्यास तू मला बोलावतोस त्यांच्या भल्यासाठीही. मला प्रार्थनेत तत्पर आणि जीवनातील माझ्या कर्तव्यांशी निष्ठावान बनव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हेही पाहा: सत्ताविसावा दिवस : वधस्तंभाच्या पायाशी 40 दिवस

अनुक्रमणिका

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य