मराठी

चौदावा दिवस – “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा”


व्हिडिओ आवृत्ती

द्राक्षारस संपत आला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याकडे द्राक्षारस नाही.” [तेव्हा] येशू तिला म्हणाला, “बाई, तुझ्या या काळजीचा माझ्याशी काय संबंध? माझी घटका अजून आलेली नाही.” त्याची आई सेवकांना म्हणाली, “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” योहान 2:3-5

येशूच्या पहिल्या चमत्काराच्या वेळी आपल्या धन्य मातेने हे शब्द उच्चारले: “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” या गहन आणि सामर्थ्यशाली शब्दांवर आपण आपले आध्यात्मिक जीवन सहज उभारू शकतो.

क्रुसाच्या पायथ्याशी आपल्या धन्य मातेने आपल्या पुत्राला काही सांगितले असते, तर ती काय म्हणाली असती? तिच्या शब्दांत निराशा, संभ्रम, वेदना किंवा राग व्यक्त झाला असता का? नाही, काना येथील लग्नात ती जे बोलली होती, तेच ती पुन्हा म्हणाली असती. पण या वेळी ते शब्द तिने सेवकांना नव्हे, तर आपल्या पुत्राला सांगितले असते. “माझ्या लाडक्या पुत्रा, माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. स्वर्गातील पिता तुला जे काही सांगेल ते कर.”

अर्थात, येशूला या सल्ल्याची गरज नव्हती, तरीही तो आपल्या आईकडून मिळावा अशी त्याची इच्छा होती. परिपूर्ण प्रेमाने भरलेले हे शब्द आपल्या आईच्या मुखातून ऐकण्याची त्याला इच्छा होती. क्रुसावरील येशूच्या वेदनेच्या क्षणी आपली धन्य माता आणि तिचा दैवी पुत्र एकमेकांकडे पाहत असताना, काना येथे एकदा उच्चारलेल्या त्या शब्दांचे चिंतन करताना त्यांच्यात गाढ ऐक्य निर्माण झाले असावे. आजवर ज्ञात असलेले सर्वांत मोठे कल्याण त्याच्या मृत्यूने साधले, हे माता आणि पुत्र दोघांनाही माहीत होते. स्वर्गातील पित्याची इच्छा परिपूर्ण आहे, हेही त्या दोघांना उमगले असावे. ही पवित्र इच्छा पूर्ण व्हावी अशी त्या दोघांनाही उत्कट आस असावी आणि त्यांनी ती कुठलाही आडपडदा न ठेवता पूर्ण मनाने स्वीकारली असावी. नि:शब्दपणे एकमेकांकडे पाहत असताना हे शब्द त्या दोघांच्याही हृदयात असावेत:

“माझ्या प्रिय आई, आपला पिता तुला जे काही सांगेल ते कर.”

“माझ्या प्रिय पुत्रा, तुझ्या स्वर्गीय पित्याची तुझ्याकडून जी काही अपेक्षा आहे, ती पूर्ण कर.”

आज या शब्दांवर मनन करा आणि हे शब्द माता आणि पुत्र तुम्हालाही सांगत आहेत, हे लक्षात घ्या. जीवनात तुम्हाला कशालाही सामोरे जावे लागले, तरी आपली धन्य माता आणि तिचा दैवी पुत्र तुम्हाला प्रेमाची व आज्ञापालनाची ही गौरवशाली आज्ञा पाळण्यास बोलावत आहेत. प्रत्येक संघर्षात, चांगल्या आणि कठीण काळात, दुःखात आणि आनंदात विश्वासू राहण्याचा आग्रह ते तुम्हाला करतात. जीवनात तुम्हाला कोणताही अनुभव आला, तरी हे शब्द तुमच्या मनात आणि अंतःकरणात सदैव घुमत राहिले पाहिजेत. “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” हे पवित्र शब्द ऐकण्यास आणि स्वीकारण्यास संकोच करू नका.

हे परमप्रिय माते, तुझे शब्द परिपूर्ण ज्ञानाने भरलेले आहेत. स्वर्गातील पित्याच्या परिपूर्ण इच्छेचा स्वीकार करण्यास तू आपल्या सर्व प्रिय लेकरांना बोलावतेस. हे शब्द केवळ मला उद्देशून नाहीत. ते प्रथम तुझ्याच अंतःकरणाच्या गाभाऱ्यात तुला सांगितले गेले. मग तुला भेटलेल्या प्रत्येकाला तू प्रेमाची ही आज्ञा सांगितलीस. आपल्या दैवी पुत्रालाही तू हे शब्द निःशब्दपणे सांगितलेस.

माझ्या प्रेमळ माते, तू मला सांगत असलेले हे शब्द ऐकण्यास मला मदत कर. तुझ्या प्रार्थनांच्या सामर्थ्याने, माझ्या जीवनात देवाच्या परिपूर्ण इच्छेचा स्वीकार करण्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यास मला मदत कर.

हे माझ्या अत्यंत प्रिय येशू, तू मला जे काही आज्ञापित करतोस ते सर्व करण्याचा मी निश्चय करतो. तुझी इच्छा मी निःसंकोचपणे स्वीकारतो आणि तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्यास तू मला बोलावतोस, हे मला ठाऊक आहे. क्रुसाच्या वाटेवरील कष्टांमुळे मी कधीही मागे हटू नये, तर तुझ्या परिपूर्ण इच्छेच्या सामर्थ्याने माझे रूपांतर व्हावे.

हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पंधरावा दिवस – देवाचे वचन ऐकणे आणि पाळणे

अनुक्रमणिका

ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध!