टीप: 16 डिसेंबरपर्यंत या प्रकरणातील चिंतनांचा उपयोग करा. 17 डिसेंबरला त्या दिवसाच्या चिंतनांसाठी थेट पुढच्या प्रकरणाकडे जा.
खरे मोठेपण प्राप्त करणे
आगमनकाळातील तिसरा रविवार (वर्ष अ)
“आमेन, मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणाऱ्या योहानापेक्षा कोणीही मोठा झाला नाही; तरी स्वर्गराज्यातील सर्वांत लहान व्यक्तीही त्याच्यापेक्षा मोठी आहे.” मत्तय 11:11
आपल्या प्रभूने हे शब्द तुमच्याविषयी म्हटले आहेत, अशी कल्पना करा. पण खरे तर हे शब्द तुम्हालाही लागू होतात! जेव्हा तुम्ही ख्रिस्ताच्या कृपेत सहभागी होता आणि त्याच्या गौरवशाली राज्याचे सदस्य म्हणून राहता, तेव्हा तुम्ही “स्वर्गराज्यातील सर्वांत लहानांपैकी” एक असता. म्हणूनच तुमचे खरे मोठेपण काय आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि त्याचा आनंद मानला पाहिजे.
योहानाच्या काळात पापात पतित झालेल्या मानवजातीसाठी स्वर्गाची दारे अजून उघडली नव्हती. येशूचा मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण अजून झाले नव्हते. त्यानंतरच तो चर्चवर पवित्र आत्म्याचा वर्षाव करणार होता आणि आपल्याला आपल्या गौरवशाली राज्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देणार होता. पण आज आपल्याला केवळ कृपेच्या अवस्थेत मरण आल्यावर स्वर्गात जाण्याचे आमंत्रण लाभले आहे असे नाही; जीवनाचा प्रवास करत असतानाच, इथे आणि आत्ताही, स्वर्गराज्याच्या वैभवात सहभागी होण्याचे आमंत्रण आपल्याला मिळाले आहे.
वरच्या वचनातून आपला प्रभू एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो: जे आता देवाला समोरासमोर पाहत स्वर्गातील परिपूर्ण आनंद अनुभवत आहेत, ते खरोखरच मोठे आहेत. पण प्रभू आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो: जीवनाचा प्रवास करत असतानाच आपण हे मोठेपण आचरणात आणू लागू शकतो.
अनेकदा आपण अनेक निरर्थक गोष्टींवर आपली ओळख आधारतो. स्वतःच्या स्वार्थासाठी मिळवलेले यश, आपली कौशल्ये, आपले रूप, आपली आर्थिक स्थिती अशा गोष्टींमधून आपण “मोठेपण” मिळवू पाहतो. पण यांपैकी कोणतीही गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने मोठे बनवत नाही. खरे मोठेपण केवळ ख्रिस्ताचे शरीर असलेल्या चर्चचे सदस्य होण्यात आणि त्याद्वारे देवाच्या राज्याचे सदस्य होण्यात आहे.
आज बाप्तिस्मा देणाऱ्या संत योहानाचे तेजस्वी उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याच्या जीवनावर चिंतन करताना त्याच्या उपदेशावरही आपण चिंतन केले पाहिजे. त्याच्या उपदेशात दोन मुख्य संदेश होते. पहिला म्हणजे, प्रत्येकाने आपल्या पापांचा पश्चात्ताप करून देवाकडे वळावे, असे आवाहन त्याने केले. योहानाच्या उपदेशाच्या काळात हा संदेश जितका खरा होता, तितकाच तो आजही आपल्या जीवनात खरा ठरला पाहिजे. त्याचा दुसरा मुख्य संदेश होता: आपले लक्ष ख्रिस्ताकडे वळवणे. येशू हाच संत योहानाच्या जीवनाचा एकमेव हेतू होता. आपल्या अनुयायांना प्रभूकडे वळवून त्याने आपल्या उपदेशाची सांगता केली.
बाप्तिस्मा देणारा संत योहान आजही आपला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, यावर आज चिंतन करा. नाताळाचा गौरवशाली काळ जवळ येत असताना, ज्या पापाशी तुमचा संघर्ष चालू आहे त्याचे परीक्षण करण्यासाठी वेळ काढा आणि अशा रीतीने अधिक चांगली तयारी करा. ते पाप नम्रपणे आणि प्रामाणिकपणे कबूल करा. मग दया आणि क्षमा यांचा स्रोत असलेल्या येशूकडे दृष्टी वळवा. ज्या मोठेपणासाठी तुम्हाला पाचारण मिळाले आहे, त्याकडे तो तुम्हाला बोलावत आहे, हे ऐका. त्याच्यावर दृष्टी खिळवून, आजच, आत्ताच त्याला तुम्हाला आपल्या राज्यात अधिक पूर्णपणे सामावून घेऊ द्या. अशा रीतीने, स्वर्गराज्यातील सर्वांत लहानांपैकी एक म्हणून, देवाचा पुत्र किंवा कन्या असण्याचे मोठेपण तुम्हाला समजेल आणि ते तुम्ही आपल्या जीवनात प्रकट कराल.
हे माझ्या गौरवशाली राजा, पश्चात्तापाचा उपदेश करण्यासाठी आणि आम्हाला तुझ्याकडे बोलावण्यासाठी तू बाप्तिस्मा देणाऱ्या संत योहानाला आमच्याकडे पाठवलेस. हे प्रिय प्रभू, योहानाने दिलेल्या संदेशासाठी माझे मन आणि हृदय खुले कर. त्याच्या शब्दांकडे अधिक मनापासून लक्ष देण्यास मला मदत कर, जेणेकरून ज्या महान जीवनासाठी तू मला बोलावले आहेस, त्यात मला सहभागी होता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सर्वशक्तिमान प्रभूला ओळखणे
आगमनकाळातील तिसरा रविवार (वर्ष ब)
“मी पाण्याने बाप्तिस्मा देतो; पण तुमच्यामध्ये असा एक जण आहे, ज्याला तुम्ही ओळखत नाही. तो माझ्यानंतर येत आहे. त्याच्या पादत्राणाचा पट्टा सोडण्यासही मी पात्र नाही.” योहान 1:26–27
हे शब्द खऱ्या नम्रतेचे आणि सुज्ञपणाचे आहेत. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे पुष्कळ अनुयायी होते. अनेक जण बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याकडे येत होते आणि त्याची ख्याती वाढत होती. पण त्या ख्यातीचा त्याला गर्व झाला नाही. उलट, ‘जो येत आहे’ त्याच्यासाठी मार्ग तयार करणे ही आपली भूमिका आहे, हे त्याला उमगले होते. येशूचे सार्वजनिक सेवाकार्य सुरू होत असताना आपले महत्त्व कमी झाले पाहिजे, हे त्याला समजले होते. म्हणून तो नम्रपणे इतरांना येशूकडे वळवतो.
या उताऱ्यात योहान परुश्यांशी बोलत होता. योहानाच्या लोकप्रियतेचा त्यांना हेवा वाटत होता, हे स्पष्ट होते. त्यांनी त्याला विचारले की तो कोण आहे. तो ख्रिस्त आहे का? की एलिया? की तो संदेष्टा? योहानाने या सर्व प्रश्नांना नकार दिला. आपल्यानंतर जो येत आहे, त्याच्या पादत्राणांचे बंद सोडण्याचीही आपली पात्रता नाही, असे त्याने सांगितले. अशा प्रकारे योहान स्वतःला ‘अपात्र’ समजतो.
पण याच नम्रतेमुळे योहान खऱ्या अर्थाने महान ठरतो. स्वतःला मोठे समजल्याने किंवा स्वतःची प्रसिद्धी केल्याने मोठेपण मिळत नाही. देवाची इच्छा पूर्ण केल्यानेच खरे मोठेपण लाभते. बाप्तिस्मा देणे आणि आपल्यानंतर येणाऱ्याकडे इतरांना वळवणे, हीच योहानासाठी देवाची इच्छा होती.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या: आपल्यानंतर येणाऱ्याला ‘तुम्ही ओळखत नाही,’ असे योहानाने परुश्यांना सांगितले. दुसऱ्या शब्दांत, जे गर्वाने भरलेले आहेत आणि स्वतःलाच नीतिमान समजतात, त्यांना सत्य दिसत नाही. त्यांना स्वतःपलीकडे पाहता येत नाही; यात त्यांच्या सुज्ञपणाचा किती मोठा अभाव आहे, हे दिसून येते.
बाप्तिस्मा देणाऱ्या संत योहानाच्या या सद्गुणांचे अनुकरण करण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या पाचारणावर आज चिंतन करा. आपली दृष्टी ख्रिस्तावर स्थिर ठेवणे आणि इतरांना त्याच्याकडे वळवणे, हेच आपल्या जीवनाचे एकमेव कर्तव्य आहे असे तुम्हाला वाटते का? येशूचे महत्त्व वाढले पाहिजे आणि तुम्ही केवळ त्याचे अपात्र सेवक आहात, हे तुम्ही नम्रपणे मान्य करता का? पूर्ण नम्रतेने देवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हीही खऱ्या अर्थाने सुज्ञ व्हाल. आणि योहानाच्या सेवेमुळे जशी अनेकांना ख्रिस्ताची ओळख झाली, तशीच तुमच्या पवित्र सेवेमुळेही अनेकांना त्याची ओळख होईल.
हे प्रभू, माझे अंतःकरण खऱ्या नम्रतेने भरून टाक. तू मला दिलेल्या अद्भुत कृपामय जीवनास मी पात्र नाही, याची मला जाणीव होऊ दे आणि हे सत्य मला मनापासून मान्य करता येऊ दे. पण ही जाणीव नम्रपणे स्वीकारताना, संपूर्ण अंतःकरणाने तुझी सेवा करण्यासाठी आवश्यक ती कृपा मला दे, जेणेकरून माझ्याद्वारे इतरांनाही तुझी ओळख होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
देवाच्या अग्नीने शुद्धीकरण
आगमनकाळातील तिसरा रविवार (वर्ष क)
योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, “मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देत आहे, पण माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान असा एक जण येत आहे. त्याच्या पादत्राणांचे बंद सोडण्याचीही माझी पात्रता नाही. तो तुम्हाला पवित्र आत्म्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा देईल. आपले खळे स्वच्छ करण्यासाठी आणि गहू आपल्या कोठारात साठवण्यासाठी त्याच्या हातात सूप आहे; पण भुसा तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.” लूक 3:16–17
या रविवारी पुन्हा एकदा आपल्याला बाप्तिस्मा देणाऱ्या संत योहानाची गौरवशाली साक्ष ऐकायला मिळते. आपल्या या उपदेशात योहान सांगतो की येशू येईल आणि ‘पवित्र आत्म्याने आणि अग्नीने’ बाप्तिस्मा देईल. ‘अग्नीने’ बाप्तिस्मा मिळण्याच्या या प्रतिमेवर चिंतन करणे उपयुक्त ठरेल. आपल्या आत्म्यांचे किती खोलवर शुद्धीकरण व्हावे अशी येशूची इच्छा आहे, हे या प्रतिमेतून विशेषत्वाने दिसून येते.
शुद्ध होणे म्हणजे काय? एक गोष्ट अशी की, आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण होताना वेदना होतात. पण त्या वेदनांतही एक गोडवा असतो. पापापासून दूर वळून देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो आणि स्वतःला देवाच्या हाती सोपवावे लागते. त्यासाठी देवाला आपल्या अंतःकरणात त्याच्या सामर्थ्याने कार्य करू देणेही आवश्यक आहे. आणि देवाला आपल्या अंतःकरणात जे सर्वांत सामर्थ्यशाली कार्य करायचे आहे, ते म्हणजे आपले शुद्धीकरण.
मृत्यूनंतर शुद्धिस्थान आहे, हे सत्य आपली कॅथलिक श्रद्धा आपल्याला उलगडून दाखवते. शुद्धिस्थान हे तीव्र आध्यात्मिक वेदनांचे ठिकाण आहे, असे म्हटले जाते. तरीही त्या वेदनांत एक प्रकारची गोडी आहे. ज्या गोष्टी आपण सोडाव्यात अशी देवाची इच्छा आहे, पण ज्या आपण अजूनही धरून ठेवतो, त्या सर्वांपासून आपल्याला वेगळे केले जाते. म्हणून ही प्रक्रिया वेदनादायक असते. तसेच, आपण जे आहोत आणि ज्यावर आपण प्रेम करतो, त्या दोन्हींत संपूर्ण परिवर्तन घडते, म्हणूनही ते वेदनादायक असते. आपण केवळ देवावरच प्रेम करायला शिकतो. आणि देवावरील या प्रेमात आपण सर्व लोकांवर प्रेम करायला शिकतो.
या अनुभवात गोडवाही आहे, कारण शुद्ध होत असताना आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जातो आणि पावित्र्यात वाढतो. त्यामुळे पापाचे ओझे दूर होते आणि जसे प्रेम करायला हवे तसे प्रेम करण्यास आपण मोकळे होतो.
पण आपले शुद्धीकरण शुद्धिस्थानातच सुरू व्हावे असे नाही. येथे आणि आत्ताच या शुद्धीकरणाला सुरुवात करण्याचे आवाहन आपल्या सर्वांना आहे. योहान बाप्तिस्ताच्या शब्दांकडे आज लक्ष द्यावे आणि पवित्र जीवन जगण्यात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल पश्चात्ताप करून त्यांपासून दूर वळावे, असे आवाहन आपल्याला आहे.
देव तुम्हाला कोणत्या बाबतीत शुद्ध होण्यास बोलावत असेल, यावर आज चिंतन करा. ज्या गोष्टीतून तुम्ही मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे, तरीही तुम्ही ती धरून ठेवली आहे, ती कोणती? देवाच्या प्रेमाच्या शुद्ध करणाऱ्या अग्नीला स्वतःला सोपवा आणि या आगमनकाळात त्या प्रेमाला तुम्हाला शुद्ध करू द्या.
हे प्रभू, तू माझा आत्मा शुद्ध करावास, अशी मला मनापासून ओढ आहे. माझे जीवन पवित्र व्हावे, अशी माझी इच्छा आहे. या शुद्धीकरणाला येथे आणि आत्ताच सुरुवात करण्यास मला मदत कर, म्हणजे तू माझ्यासाठी राखून ठेवलेला आनंद आणि स्वातंत्र्य मी अनुभवू लागेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
टीप: 17 डिसेंबरपासून दररोजच्या चिंतनासाठी पुढील अध्याय पाहा. 17 डिसेंबरपूर्वी आठवड्यातील इतर दिवसांसाठी याच अध्यायातील चिंतन वाचत राहा.
येशूच्या अधिकाराला आपला प्रतिसाद
आगमनकाळातील तिसऱ्या आठवड्याचा सोमवार
येशू मंदिराच्या प्रांगणात आला आणि तेथे शिकवत असताना मुख्य याजक आणि लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ आले व म्हणाले, “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? आणि हा अधिकार तुला कोणी दिला?” मत्तय 21:23
मुख्य याजकांनी आणि वडीलजनांनी जरा धाडसच केले. त्यांचा काहीतरी हेतू होता आणि येशूमुळे ते अस्वस्थ झाले होते, हे स्पष्ट होते. किती खेदाची गोष्ट!
क्षणभर याचा विचार करा. सर्वशक्तिमान देव, सनातन पुत्र येशू या व्यक्तीत, अनंत जीवनाची वचने शिकवत आहे. येशू मंदिराच्या परिसरात आहे, आणि त्याच्यामुळे मुख्य याजक व वडीलजन अस्वस्थ झाले होते. येशू सामर्थ्याने व अधिकाराने बोलत होता, आणि हे सर्वांनी ओळखले. पण मुख्य याजक व वडीलजन त्याच्यावर रागावलेले दिसत होते आणि त्यांना त्याचा हेवाही वाटत होता. त्याला हा अधिकार कोठून मिळाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे नीट समजून घेतले तर किती धक्कादायक आहे, आणि त्या काळचे धार्मिक नेते योग्य मार्गापासून किती दूर गेले होते, हेही दिसते. ते स्पष्टपणे सत्य पाहू शकत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी येशूच्या अधिकाराला दिलेल्या आव्हानावरून दिसते की सत्य स्वीकारण्याची किंवा देवाची तारणयोजना स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. उलट, ते आत्मकेंद्री वृत्तीने, गर्वाने आणि मत्सराने भरलेले होते.
कल्पना करा की येशू बोलत असताना तुम्ही त्या मंदिराच्या परिसरात आहात. त्याला तुमचा प्रतिसाद कसा असेल? तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल का? तुम्हाला त्याच्याबद्दल कुतूहल वाटेल का? त्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल का, किंवा तुम्हाला त्याचा हेवा वाटेल का? की त्याचे दैवी सामर्थ्य, प्रेम आणि अधिकार ओळखून तुम्ही त्याचा शोध घ्याल?
आपल्या प्रभूची भेट तुम्हाला दररोज कशी घडते, यावर आज चिंतन करा. त्या मंदिराच्या परिसरात प्रत्यक्ष जाऊन येशूचे बोलणे ऐकणे आपल्याला शक्य नसले, तरी तीच संधी आपल्या सभोवती दररोज असते. देव आजही असंख्य मार्गांनी बोलत आहे, हे खरे आहे. त्याची उपस्थिती आणि त्याचा आवाज तुम्हाला किती सहजपणे जाणवतात, याचा विचार करा. आणि जेव्हा तो तुमच्याशी बोलत असल्याचे तुम्हाला जाणवते, तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद देता?
प्रभू, तुझा दैवी आवाज दररोज ऐकायला मला मदत कर. मी जिथे जाईन तिथे तुला ओळखायला मला मदत कर. तुझा शोध घेताना तू मला सापडलास की मला आनंद होऊ दे आणि तू जे काही सांगतोस त्याला पूर्ण विश्वासाने प्रतिसाद द्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
टीप: 17 डिसेंबरपासून दररोजच्या चिंतनासाठी पुढील अध्याय पाहा. 17 डिसेंबरपूर्वी आठवड्यातील इतर दिवसांसाठी याच अध्यायातील चिंतन वाचत राहा.
पाप्याच्या ठायी स्वतःला पाहणे
आगमनकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार
येशू त्यांना म्हणाला, “आमेन, मी तुम्हाला सांगतो, जकातदार आणि वेश्या तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात प्रवेश करत आहेत. योहान नीतिमत्तेच्या मार्गाने तुमच्याकडे आला, तेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; पण जकातदारांनी आणि वेश्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.” मत्तय 21:31c–32a
वडीलजनांना आणि मुख्य याजकांना येशूने जे सांगितले, त्यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण गेले असेल. जकातदार आणि वेश्या खरोखरच या धर्मनेत्यांच्या आधी देवाच्या राज्यात प्रवेश करत होते का? वेश्या आणि जकातदार या धर्मनेत्यांपेक्षा अधिक पवित्र होते, असे येशूला खरोखरच म्हणायचे होते का? होय, त्याला तेच म्हणायचे होते!
विशेषतः आपल्या गर्वामुळे या धर्मनेत्यांना येशूचे हे शब्द खरे म्हणून स्वीकारणे कठीण गेले. स्वतःबद्दल त्यांचे फार उच्च मत होते आणि इतरांनीही आपल्याला मोठे मानावे, अशी त्यांची अपेक्षा होती. आपण नीतिमान आहोत, अशी त्यांची पक्की समजूत होती. हे सगळे फारच विद्रूप दिसत होते.
पण येशूने या सगळ्याला छेद दिला. त्याने वेश्या आणि जकातदारांना देवाच्या राज्यात स्थान दिले. ही त्या धार्मिक नेत्यांच्या जणू सणसणीत ‘श्रीमुखात’ होती! पण त्यांच्या स्वतःच्या आत्म्यांच्या भल्यासाठी त्यांना अशा धक्क्याची गरज होती.
यावर चिंतन करताना सर्वांत उपयुक्त प्रश्न असा आहे: आपल्याला कोणामध्ये आपले प्रतिबिंब अधिक सहज दिसते? त्या काळच्या गर्विष्ठ धर्मनेत्यांमध्ये तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसते का? की जकातदार आणि वेश्या यांच्यात ते अधिक दिसते? कदाचित यांपैकी कोणत्याही गटाशी आपले साम्य आहे हे कबूल करणे कठीण वाटेल. आपल्यात काही दुर्बलता किंवा दोष आहेत हे मान्य न करता, आपण चांगले आणि नीतिमान आहोत असे स्वतःला समजण्याकडे आपला कल असू शकतो. पण येशू आपल्यासमोर असा गट ठेवत नाही.
खरे तर आपण सगळ्यांनी स्वतःला जकातदार आणि वेश्या यांच्या गटात पाहिले पाहिजे. का? कारण आपण सगळे पापी आहोत. आपण कदाचित त्यांच्यासारखेच पाप केले नसेल; पण आपण पाप केले आहे आणि ते आपल्याला कबूल करावे लागेल. खरे पाहता, आपली दुर्बलता आणि आपले पाप आपण मान्य करू शकत नसू, तर आपल्यात आणि त्या वडीलजनांमध्ये व मुख्य याजकांमध्ये काही फरक नाही. आपणही आपल्या गर्वात आणि आपणच नीतिमान आहोत या समजुतीत अडकून पडलो आहोत.
आज चिंतन करा: तुम्हाला स्वतःचे सर्वांत जास्त साधर्म्य कोणाशी दिसते? वेश्या आणि जकातदार यांच्यासारखे आपणही पापी आहोत, हे मान्य करणे तुम्हाला कठीण जात असेल, तर त्या धार्मिक नेत्यांप्रमाणे तुम्हीही कदाचित गर्वाच्या पापात असाल. नम्रतेसाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला जसे पाहतो तसेच तुम्हालाही स्वतःकडे पाहता यावे, म्हणून प्रार्थना करा. या सत्याच्या प्रकाशातच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल.
प्रभू, माझे हृदय नम्रतेने भरून टाक. त्या नम्रतेने माझे खरे स्वरूप पाहायला मला मदत कर. माझे पाप मला दिसू दे, पण तुझ्याविषयीची माझी ओढही मला जाणवू दे. मी पापात असतानाही तुझ्याकडे वळायला आणि तुझ्या राज्यात प्रवेश करणाऱ्यांचा आनंद व स्वातंत्र्य अनुभवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
टीप: 17 डिसेंबरपासून दररोजच्या चिंतनासाठी पुढील अध्याय पाहा. 17 डिसेंबरपूर्वी आठवड्यातील इतर दिवसांसाठी याच अध्यायातील चिंतन वाचत राहा.
आपल्या प्रभूमुळे अडखळू नका
आगमनकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील बुधवार
येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे पाहिले व ऐकले ते योहानाला सांगा: आंधळ्यांना पुन्हा दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिऱ्यांना ऐकू येते, मृतांना पुन्हा जिवंत केले जाते आणि गरिबांना शुभवर्तमान सांगितले जाते. आणि माझ्यामुळे जो अडखळत नाही, तो धन्य.” लूक 7:22–23
येथे येशू ‘आंधळे, लंगडे, कुष्ठरोगी, बहिरे, मृत आणि गरीब’ यांच्याविषयी बोलतो. या सर्वांना येशूच्या सेवाकार्यातून आशीर्वाद मिळाला, असे येथे दाखवले आहे.
नाताळ जवळ येत असताना आपण आपल्या दुर्बलतेकडे पाहत राहिले पाहिजे. आपणही कोणत्या प्रकारे आंधळे, लंगडे, कुष्ठरोगी वगैरे आहोत, हे आपण पाहिले पाहिजे. अर्थात, या शारीरिक व्याधी त्याहूनही खोलवरच्या गोष्टीकडे बोट दाखवतात. त्या आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या आध्यात्मिक व्याधींकडे निर्देश करतात.
येशू आणखी एक विचार करायला लावणारी गोष्ट सांगतो. तो म्हणतो, “आणि माझ्यामुळे जो अडखळत नाही तो धन्य.” येशूमुळे आपण का अडखळावे? या शब्दांचा नेमका अर्थ काय?
येशू अगदी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे बोलतो. तो जे काही सांगतो ते निखळ सत्यच असते. पण कठीण गोष्ट अशी की कधीकधी सत्य बोचते. आध्यात्मिकदृष्ट्या आपले सर्व काही ठीक आहे, असे समजून आपण आयुष्य जगत राहू शकतो. त्यामुळे येशू ज्या सत्याचा उपदेश करायला आला, त्याची आपल्याला गरज नाही, असेही आपल्याला वाटू शकते. अशा वेळी आपले पाप किंवा स्वीकारायला कठीण जाणारे एखादे सत्य ख्रिस्त आपल्यासमोर आणतो, तेव्हा त्याचे बोलणे आपल्याला खटकू शकते.
शुभवर्तमानातील संपूर्ण सत्य स्वीकारण्यास तुमचे मन किती उघडे आहे, यावर आज चिंतन करा. येशू जे काही जाहीर करतो ते सर्व ऐकण्याची तुमची तयारी आणि इच्छा आहे का? संपूर्ण शुभवर्तमान आपल्या जीवनात स्वीकारण्याची तुमची तयारी आणि इच्छा आहे का? आपल्या प्रभूला तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते सर्व ऐकण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा तुमचा निश्चय या आगमनकाळात अधिक दृढ होऊ द्या. आणि त्याच्या एखाद्या शिकवणीचा तुम्हाला ‘आक्षेप’ वाटत असल्याचे लक्षात आले, तर बहुधा त्याच बाबतीत तुम्हाला स्वतःवर सर्वांत जास्त काम करण्याची गरज आहे, हे ओळखा.
हे प्रभू, या आगमनकाळात तुझ्यासाठी माझे अंतःकरण तयार करत राहण्यास मला मदत कर. तुझे वचन ऐकण्यास आणि तू जे काही सांगतोस त्याप्रमाणे वागण्यास मला मदत कर. प्रत्येक गोष्टीत मी तुझे अनुसरण करावे, तुला सर्व गोष्टींपेक्षा अग्रस्थान द्यावे आणि तुझे वचन मला कधीही खटकू नये. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
टीप: 17 डिसेंबरपासून दररोजच्या चिंतनासाठी पुढील अध्याय पाहा. 17 डिसेंबरपूर्वी आठवड्यातील इतर दिवसांसाठी याच अध्यायातील चिंतन वाचत राहा.
देवाच्या प्रेरणा
आगमनकाळातील तिसऱ्या आठवड्याचा गुरुवार
(जकातदारांसह ज्या सर्वांनी हे ऐकले आणि योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता, त्यांनी देवाचा न्यायीपणा मान्य केला; पण ज्यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता, त्या परुशी व नियमशास्त्रज्ञांनी देवाने त्यांच्यासाठी केलेली योजना नाकारली.) लूक 7:29–30
श्रद्धेत वाढण्यासाठी श्रद्धेने एक पाऊल पुढे टाकावे लागते. आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला हा बोध मिळू शकतो. कारण ज्यांनी श्रद्धेने पुढे येऊन योहानाकडून बाप्तिस्मा घेतला, त्यांनी ‘देवाचे न्यायीपण मान्य केले.’ ज्यांनी योहानाचा बाप्तिस्मा स्वीकारण्यास नकार दिला, त्यांनी ‘देवाने त्यांच्यासाठी केलेली योजना नाकारली.’
हेच सत्य आपण आपल्या जीवनाला लावून पाहिले, तर ते अनेक प्रकारे लागू होते, हे आपल्या लक्षात येईल. सर्वप्रथम, बाप्तिस्म्याद्वारे आपण आधीच ख्रिस्ताशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे योहानाचा बाप्तिस्मा प्रत्यक्ष घेण्याचे आवाहन आपल्याला नाही. पण ‘योहानाचा बाप्तिस्मा’ हा आपल्या जीवनात पवित्र आत्म्याकडून मिळणारे आरंभीचे आमंत्रण म्हणूनही समजता येईल.
उदाहरणार्थ, ‘हे पुस्तक वाच,’ असे देव आपल्याला सांगत आहे असे जाणवले आणि त्या प्रेरणेकडे आपण दुर्लक्ष केले, तर आपल्या जीवनासाठी देवाने केलेल्या योजनेतील आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठा भाग आपण नाकारत असू. किंवा एखाद्या व्यक्तीला क्षमा करावी, प्रार्थनेत अधिक वेळ घालवावा किंवा कुटुंबासोबत आणखी थोडा वेळ घालवावा, असे देव आपल्याला सुचवत आहे असे जाणवले आणि आपण त्याप्रमाणे वागलो, तर आपल्या जीवनात आणखी कितीतरी अद्भुत कृपादानांसाठी दार उघडते, असा अनुभव आपल्याला येऊ शकतो.
एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा ती देवाकडून आली आहे असे मानून स्वीकारण्यासाठी देव तुम्हाला बोलावत आहे का, यावर आज चिंतन करा. ती गोष्ट क्षुल्लक वाटली तरी देवाचे ते पहिले आमंत्रण नाकारू नका; उलट ते मनापासून स्वीकारा. ते स्वीकारल्यावर, तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा रीतीने देव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो, असा अनुभव कदाचित तुम्हाला येईल.
हे प्रभू, माझ्या जीवनात तू दररोज देत असलेल्या आमंत्रणांना प्रतिसाद देण्यास मला मदत कर. तुझी पवित्र इच्छा मला नेहमी ओळखता यावी आणि कोणताही हातचा राखून न ठेवता मला तिच्याप्रमाणे जगता यावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
टीप: 17 डिसेंबरपासून दररोजच्या चिंतनासाठी पुढील अध्याय पाहा. 17 डिसेंबरपूर्वी आठवड्यातील इतर दिवसांसाठी याच अध्यायातील चिंतन वाचत राहा.
देव तुमच्या अंतःकरणाशी बोलतो
आगमनकाळातील तिसऱ्या आठवड्याचा शुक्रवार
“तुम्ही योहानाकडे दूत पाठवले आणि त्याने सत्याची साक्ष दिली. . . . योहान हा जळणारा आणि प्रकाश देणारा दिवा होता, आणि थोडा वेळ तुम्ही त्याच्या प्रकाशात आनंद मानण्यात समाधानी होता. पण माझ्याकडे योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी साक्ष आहे. पित्याने मला पूर्ण करण्यासाठी दिलेली जी कार्ये मी करतो, तीच कार्ये पित्याने मला पाठवले आहे अशी माझ्याविषयी साक्ष देतात.” योहान 5:33, 35–36
सुरुवातीला योहानाने येशूविषयी दिलेल्या साक्षीमुळे यहुद्यांना आनंद झाला. योहान हा ‘तेवत राहून प्रकाश देणारा दिवा’ होता. त्याच्या साक्षीने मशीहा असलेल्या येशूचे देवत्व उजेडात आले. त्या सुरुवातीच्या टप्प्यावर हे चांगलेच होते. पण, असे म्हणता येईल की, अंतिम ध्येय ते नव्हते.
यामागचा अंतिम हेतू काय होता? यहुद्यांनी प्रथम योहानाचा उपदेश ऐकून येशूकडे वळावे आणि मग त्याहून कितीतरी मोठ्या साक्षीमुळे येशूवर विश्वास ठेवावा, हा तो हेतू होता. ही मोठी साक्ष केवळ येशूने केलेल्या चमत्कारांतून नव्हे, तर त्याच्या वचनाच्या सामर्थ्यातून आणि जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या त्याच्या स्वतःच्या दैवी उपस्थितीतूनही मिळाली.
हे आपल्या जीवनाला लावून पाहिले, तर देव प्रथम आपल्याला कसा बोलावतो आणि मग आपल्या अंतरंगात कितीतरी खोलवर परिवर्तन कसे घडवतो, हे आपल्याला दिसेल. सुरुवातीला एखाद्या प्रभावी उपदेशामुळे किंवा दुसऱ्या कोणाच्या साक्षीमुळे आपण अनेकदा ख्रिस्ताकडे आकर्षित होतो. आपल्या जीवनात बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाची भूमिका पार पाडण्यासाठी अनेकांना पाचारण केले जाते.
पण एकदा ख्रिस्ताची भेट झाली आणि त्याच्यावर आपली श्रद्धा जडली की, तो स्वतः आपल्या श्रद्धेच्या आणि प्रार्थनेच्या जीवनाची सूत्रे हाती घेऊ लागतो. येशू स्वतः आपल्याला जी साक्ष थेट देतो, ती सुरुवातीला आपल्याला त्याच्याविषयी येणाऱ्या कोणत्याही अनुभवापेक्षा कितीतरी अधिक खोलवर परिणाम करणारी आणि खात्री पटवून देणारी असते. आपली श्रद्धा जसजशी वाढते, तसतसा येशू अधिक प्रभावीपणे आणि थेट आपल्याशी बोलू लागतो आणि स्वतःच्या दैवी उपस्थितीची व सामर्थ्याची साक्ष स्वतःच देतो.
आज आपल्या श्रद्धेच्या प्रवासात आपण कुठे आहोत, यावर चिंतन करा. कदाचित ख्रिस्ताची साक्ष देणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रेरणा मिळण्याची गरज असेल. ही चांगली गोष्ट आहे, कारण ती व्यक्ती तुमच्यासाठी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानासारखी ठरू शकते. पण येशू तुमच्या आत्म्यात याहून कितीतरी खोलवर कसे कार्य करू इच्छितो, यावरही चिंतन करा. शेवटी, त्याची दैवी उपस्थितीच तुम्हाला त्याच्या प्रेमाची आणि तो तुमची घेत असलेल्या काळजीची साक्ष देवो.
हे प्रभू, माझे श्रद्धाजीवन अधिक सखोल कर. दररोज तुझ्या मार्गाने चालताना, माझी आध्यात्मिक वाटचाल जिथवर झाली आहे तिथेच मी कधीही समाधानी राहू नये, म्हणून मला मदत कर. तू माझ्या अंतःकरणाशी अधिकाधिक खोलवर संवाद साधावा, यासाठी माझे मन तुझ्यापुढे उघडे ठेवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध
ॲमेझॉन.कॉम – गुगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल

