मराठी

सातवे दर्शन

पवित्र तासाचा क्रम

पवित्र शास्त्रवाचन: योहान 20:24–29

संदर्भ: ईस्टरच्या रविवारी प्रभू इतर शिष्यांना प्रकट झाला, तेव्हा थोमा त्यांच्याबरोबर नव्हता. येशूचे पुनरुत्थान झाले याबद्दल थोमाला शंका होती असे म्हणण्यापेक्षा, त्याने जाणूनबुजून त्यावर विश्वास न ठेवण्याचे ठरवले, असे दिसते. येशूच्या पुनरुत्थानाचा हा नकार केवळ त्याला ते समजले नाही म्हणून नव्हता; ती अधिक करून त्याची स्वतःची निवड होती.

अभिमानामुळे सुवार्ता स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सर्वांची वृत्ती थोमाच्या उदाहरणातून आपल्याला दिसते. आपण नसताना येशूने इतर शिष्यांना दर्शन देण्याचे निवडले, हे कळल्यावर कदाचित तो नाराज झाला असेल. थोमाच्या या सुरुवातीच्या नकारातून आपण हे शिकले पाहिजे की देवाची सत्ये आपण स्वेच्छेने स्वीकारावीत आणि त्या आड आपला अहंकार कधीही येऊ देऊ नये.

लक्षात घ्या, येशू पुन्हा शिष्यांना प्रकट झाला तो आठ दिवसांनंतरच. आठ दिवस! हा प्रसंग मनात घोळवत असलेल्या थोमाला हे आठ दिवस जणू संपतच नाहीत असे वाटले असेल. आपल्या प्रभूचे दर्शन होण्याचे वरदान त्यांना लाभले होते; त्याविषयी इतर शिष्य एकमेकांशी पुन्हा पुन्हा किती आनंदाने बोलत होते, हे त्याने ऐकले असेल. पण आपल्याला मात्र प्रभूचे दर्शन झाले नाही, म्हणून थोमा खिन्न होऊन बसण्यापलीकडे काही करू शकत नव्हता.

अर्थात, देवाच्या अपार दयेमुळे हे सारे बदलले. येशू पुन्हा शिष्यांना प्रकट झाला आणि या वेळी थोमा त्यांच्याबरोबर होता. आपल्या महान दयेने येशू थोमाला आमंत्रण देतो की त्याने आपल्या जखमांना स्पर्श करावा, स्वतःच्या नकारावर आणि अभिमानावर मात करावी आणि विश्वास ठेवावा. न पाहताच विश्वास ठेवणे कितीतरी श्रेष्ठ असले, तरी येशू थोमासमोर स्वतःला नमवतो आणि त्याला पाहू देतो. आपल्या प्रभूची ही केवढी नम्रता! अभिमानाशी झुंजणाऱ्यांशी कसे वागावे, याचा हा आपल्यासाठी मोठा धडा आहे.

थोमाचे अपयश आणि त्यातून झालेला त्याचा उद्धार यांचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की आपल्यात परिवर्तन घडवण्यासाठी देव किती दूरवर जाण्यास तयार आहे. थोमा उद्गारतो, “माझ्या प्रभू, माझ्या देवा!” आपण सारेही थोमासारखेच आहोत, हे मान्य करण्यासाठी ख्रिस्तसभेच्या इतिहासात अनेकांनी परंपरेने पवित्र भाकरीच्या अभिषेकाच्या क्षणी हे शब्द उच्चारले आहेत.

या मननात विशेषतः हे तपासून पाहा: देव पवित्र शास्त्राद्वारे आणि ख्रिस्तसभेद्वारे आपल्याला जे काही शिकवतो, त्यापैकी कशावर तुम्ही अभिमानामुळे विश्वास ठेवण्यास नकार देता? विश्वास ठेवा. तुमचा अविश्वास देवाच्या हाती सोपवा.

चिंतन: तुम्हाला परिचित झालेल्या मनन आणि चिंतनाच्या पद्धती वापरून योहान 20:24–29 या उताऱ्यावर प्रार्थनापूर्वक विचार करा.

प्रमुख चित्र: शंका घेणारा थोमा — ग्वेर्चिनो

पास्का काळातील ध्यानांची ओळख

  1. येशूचे पुनरुत्थान आणि पहिले दर्शन
  2. दुसरे दर्शन
  3. तिसरे दर्शन
  4. चौथे दर्शन
  5. पाचवे दर्शन
  6. सहावे दर्शन
  7. सातवे दर्शन
  8. आठवे दर्शन
  9. नववे दर्शन
  10. इतर दर्शने
  11. येशूचे स्वर्गारोहण
  12. दैवी प्रेम प्राप्त करण्यासाठी चिंतन

अनुक्रमणिका