पवित्र शास्त्राचे वाचन: 1 करिंथकरांस 15:3–11
ऐच्छिक वाचन: गलतीकरांस 1:11–17; प्रेषितांची कृत्ये 9:3–9
संदर्भ: पुनरुत्थानानंतर येशूंनी दिलेल्या दर्शनांवरील आपल्या शेवटच्या शास्त्रचिंतनाचा आधार प्रेषित पौल यांचे वर्णन आहे. विशेष म्हणजे, 1 करिंथकरांस 15:6–8 मध्ये येशूंनी कोणाकोणाला दर्शन दिले, त्यानुसार इग्नेशियस या चिंतनाचे तीन भाग करतात:
- वचन 6: येशूंनी एकाच वेळी 500 लोकांना दिलेले दर्शन
- वचन 7: येशूंनी याकोबाला दिलेले दर्शन
- वचन 8: येशूंनी स्वतः संत पौल यांना दिलेले दर्शन
येशूंनी अरिमथियाच्या योसेफाला दर्शन दिले, असे परंपरा सांगते. त्या दर्शनावरील चिंतनाचाही इग्नेशियस समावेश करतात.
या चिंतनांसाठी इग्नेशियस फारसा तपशील देत नाहीत. तरीही, करिंथकरांस लिहिलेल्या पत्रातील वर दिलेला उतारा, म्हणजे 3–11 ही वचने, संपूर्ण संदर्भासह प्रार्थनापूर्वक वाचणे आणि ज्यांना दर्शन झाले त्यांच्यापैकी एकेका व्यक्तीचा विचार करणे उपयुक्त ठरेल. पवित्र शास्त्रात या दर्शनांचा केवळ उल्लेख आहे, पण प्रत्येक दर्शनाचा ते पाहणाऱ्यांवर झालेला परिणाम मोजता येणार नाही इतका मोठा होता.
संत पौल विशेष नम्रतेने कबूल करतात की ख्रिस्ताने आपल्याला दर्शन द्यावे, यासाठी आपण सर्वथा अपात्र होतो. प्रेषितांची कृत्ये या ग्रंथातील तो प्रसंग आठवा: पौलांची दृष्टी जाते आणि येशू त्यांना विचारतात की ते आपला छळ का करीत आहेत.
संत इग्नेशियस आणखी एका दर्शनाचा उल्लेख करतात. अब्राहाम, मोशे, संदेष्टे आणि जुन्या करारातील सर्व पवित्र जन यांचे निधन झाले होते, पण ते तारणाच्या देणगीची वाट पाहत होते. ख्रिस्ताने त्यांनाही दर्शन दिले. विश्वासघोषणेत आपण “तो अधोलोकात उतरला…” असे म्हणतो, तेव्हा आपण हाच विश्वास व्यक्त करतो. मृत्यूनंतर ख्रिस्त त्या प्रतीक्षास्थळी गेला, जे आधीच मरण पावले होते त्यांच्याविषयी आपला न्यायनिर्णय जाहीर करण्यासाठी आणि त्यांना आपले प्रतिफळ देण्यासाठी.
कल्पना करा की येशूंनी दर्शन दिले, तेव्हा त्यांना पाहणाऱ्या त्या 500 लोकांपैकी तुम्हीही एक होता. किंवा येशूंनी तुम्हाला एकांतात दर्शन दिले, अशी कल्पना करून त्यावर चिंतन करा. तुमचा विश्वास कमी पडतो आहे आणि येशू त्या कमतरतेविषयी तुमच्याशी बोलत आहेत, अशी कल्पना करा. जगाच्या इतिहासातील या परम गौरवशाली घटनेवरील तुमचा विश्वास या चिंतनातून अधिक दृढ व्हावा, असा प्रयत्न करा.
मनन: 1 करिंथकरांस 15:3–11 (ऐच्छिक वाचन: गलतीकरांस 1:13–14; प्रेषितांची कृत्ये 9:3–9) या उताऱ्यावर तुम्हाला परिचित झालेल्या ध्यान आणि चिंतनाच्या पद्धती वापरून प्रार्थनापूर्वक मनन करा.
मुख्य छायाचित्र: पिक्साबेवरील छायाचित्र
- येशूचे पुनरुत्थान आणि पहिले दर्शन
- दुसरे दर्शन
- तिसरे दर्शन
- चौथे दर्शन
- पाचवे दर्शन
- सहावे दर्शन
- सातवे दर्शन
- आठवे दर्शन
- नववे दर्शन
- इतर दर्शने
- येशूचे स्वर्गारोहण
- दैवी प्रेम प्राप्त करण्यासाठी चिंतन
