मराठी

चौदावा दिवस: अतिआत्मविश्वासाने गृहीत धरणे

प्रायश्चित्तकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील गुरुवार

पहिल्या प्रलोभनात सैतान आपल्या प्रभूला पुढे म्हणतो, “…या दगडांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा दे.” येशू देवाचा पुत्र आहे की नाही, अशी शंका सूचकपणे उपस्थित करून या प्रलोभनाची सुरुवात होते, यावर आपण आधीच चिंतन केले आहे. पण त्यानंतर सैतान अतिआत्मविश्वासाने एक गोष्ट गृहीत धरण्याची चूक करतो. चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यामुळे येशूला इतकी भूक लागली असेल की ती भागवण्यासाठी दगडांच्या भाकरी करण्याची संधी तो लगेच साधेल, असे सैतानाने गृहीत धरले.

यातून सर्वप्रथम सैतानाचा मूर्खपणा दिसून येतो. रखरखीत आणि कठोर अशा वाळवंटात चाळीस दिवस प्रार्थना व उपवास करून येशूला जे आध्यात्मिक अन्न लाभले, ते म्हणजे स्वर्गातील आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणे. हे आध्यात्मिक अन्न सोडून येशू पोट भरण्यासाठी अन्न निवडेल, असे सैतानाला वाटलेले दिसते. आपल्या प्रभूने हे प्रलोभन नाकारले, तरी आपण अनेकदा स्वेच्छेने त्याला बळी पडतो. 

सैतान आपल्याकडे पाहून आपल्याला मोहात पाडायचे ठरवतो, तेव्हा आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भूक आहे आणि ती भागवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास आपण तयार आहोत, असे तो सहसा गृहीत धरतो. ही भूक केवळ अन्नाचीच असेल असे नाही; ती तृप्ती मिळवण्याची आपली कोणतीही अवाजवी इच्छा असू शकते. कोणत्या गोष्टींचा तुम्ही सर्वाधिक विचार करता, कोणत्या गोष्टींचा तुम्हाला ध्यास लागतो, कशाची तुम्हाला तीव्र ओढ वाटते किंवा स्वार्थापोटी तुम्ही काय टाळता, हे आठवून पाहा. त्यातून तुमच्या स्वतःच्या जीवनातील अवाजवी इच्छा तुम्हाला दिसून येतील. दुर्दैवाने, आपल्याबद्दलचा सैतानाचा अंदाज अनेकदा खरा ठरतो. जे सर्वांत सोपे आहे, ज्यातून सर्वाधिक आनंद आणि सुख मिळते व जे लगेच समाधान देते, तेच आपण अनेकदा निवडतो. सैतान आपल्याला म्हणतो, “ही मौज करण्याचा तुला हक्क आहे. तू ती कमावली आहेस. स्वतःला हे बक्षीस दे.” किंवा तो असे म्हणून आपल्याला मोहात पाडू शकतो, “हे फार कठीण आहे. तुझ्याकडून ही फार मोठी अपेक्षा आहे. स्वतःवर असे ओझे लादू नकोस.”

प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे लक्ष एकाच ध्येयावर असले पाहिजे. काहीही झाले तरी आपण देवाची इच्छा पूर्ण करणेच निवडले पाहिजे, मग त्यासाठी कितीही त्याग करावा लागला तरी. हे करणे सोपे जावे म्हणून, आपल्याबद्दल सैतान कशाच्या आधारावर इतक्या खात्रीने अंदाज बांधतो, हे आपण ओळखले पाहिजे. तुम्ही खाण्यापिण्यात नेहमी सुख शोधता, हे सैतानाला माहीत आहे का? मग तो त्याच मार्गाने तुम्हाला मोहात पाडेल. आळसावर मात करणे तुम्हाला कठीण जाते, हे त्याला माहीत आहे का? मग तो त्याचाच उपयोग करेल. कोणत्या प्रलोभनांना आपण बळी पडू असे सैतान गृहीत धरतो, ते ओळखणे आणि त्याला वाव देणाऱ्या सवयी शुद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, हे आपले ध्येय असले पाहिजे. अशा रीतीने त्या दुष्टाचा अंदाज खोटा ठरेल.

सैतान तुमच्याबद्दल काय काय गृहीत धरतो, यावर चिंतन करा. आपल्या प्रभूने ते चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास करावा अशी पित्याची इच्छा होती. त्या इच्छेशी निष्ठावान राहण्याऐवजी आपली शारीरिक भूक भागवण्याचा मोह त्याच्यापुढे आला, तेव्हा काय निवडायचे हे त्याच्यासाठी सोपे होते. देहाची भूक भागवण्याला येशूच्या दृष्टीने काहीच महत्त्व नव्हते, कारण मानवी जीवनाची त्याला लाभलेली परिपूर्ती कितीतरी अधिक खोल होती. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच त्याचे अन्न आणि हेच त्याचे समाधान होते. आपण आपल्या प्रभूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कितीही किंमत मोजावी लागली तरी, सोपा मार्ग, देहसुख किंवा स्वतःचे लाड पुरवणे यांपेक्षा आपण नेहमी पित्याची इच्छा पूर्ण करणेच निवडले पाहिजे. असे केले तर सैतानाची प्रलोभने केवळ निष्फळच नव्हेत, तर मूर्खपणाचीही आहेत, हे आपल्याला दिसून येईल.

हे माझ्या प्रभू, तुलाही प्रलोभनाला सामोरे जावे लागले. चाळीस दिवसांच्या उपवासानंतर तुला भूक भागवण्याचा मोह पाडता येईल, असे सैतानाला त्याच्या मूर्खपणामुळे वाटले. आपले पवित्र जीवन बलिदान म्हणून अर्पण करण्याचा तुझा निर्धार किती दृढ होता, हे त्याला मुळीच समजले नाही. त्याच मूर्खपणामुळे सैतानाने तुझ्याविरुद्ध द्वेष भडकवला आणि त्यातून तुला क्रुसावर खिळण्यात आले. तुझ्या निःस्वार्थतेचा आणि बलिदानाचा अखेरीस नेहमीच विजय झाला. तुझे अनुकरण करण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे, म्हणजे पापाच्या मूर्खपणावर आणि त्या दुष्टाच्या प्रलोभनांवर मात करण्यासाठी लागणारे धैर्य आणि सामर्थ्य मला लाभेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हेही पाहा: चौदावा दिवस: क्रुसाच्या पायाशी 40 दिवस

अनुक्रमणिका

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य