
“माझा जीव प्रभूची महती गातो; माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंदित होतो. कारण त्याने आपल्या दासीच्या दीन अवस्थेकडे पाहिले आहे; पाहा, यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.” लूक 1:46-48
आपली धन्य माता आपल्या पुत्राच्या क्रुसासमोर उभी होती, त्या क्षणाला “सर्व पिढ्या” खरोखरच “धन्य” म्हणतील का? आपल्या पुत्राचा क्रूर आणि निर्दय मृत्यू पाहताना, ती आपल्या स्तुतिगीतात म्हणते त्याप्रमाणे खरोखरच धन्य होती का?
क्रुसाच्या पायथ्याशी तिने अपार वेदना, दुःख आणि त्याग अनुभवला असला, तरी तो अपार आशीर्वादाचाही क्षण होता. क्रुसावर खिळलेल्या आपल्या पुत्राकडे ती प्रेमाने पाहत उभी होती, तो विलक्षण कृपेचा क्षण होता. त्या क्षणी दुःखसहनाद्वारे जगाचे तारण झाले. प्रेमाचे हे परिपूर्ण बलिदान स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याचे आणि आपल्या अंतःकरणात त्याचे चिंतन करण्याचे तिने निवडले. इतक्या वेदनांतून इतके भले घडवू शकणाऱ्या देवामध्ये आनंद मानण्याचे तिने निवडले.
आपल्या जीवनात संघर्षांना आणि दुःखांना सामोरे जाताना, मन दुखावल्यामुळे आणि निराशेमुळे आपल्याच कोशात गुरफटून जाण्याचा मोह आपल्याला सहज होतो. जीवनात आपल्याला मिळालेल्या आशीर्वादांचाही सहज विसर पडू शकतो. पित्याने आपल्या पुत्रावर आणि आपल्या धन्य मातेवर वेदना व दुःख लादले नाही; पण त्यांनी त्या कठोर छळाच्या प्रसंगाला सामोरे जावे, अशी त्याची इच्छा होती. त्या प्रसंगाचे रूपांतर करण्यासाठी आणि सर्व दुःखांचा उद्धार करण्यासाठी येशू त्याला सामोरा गेला. आपल्या पुत्रामध्ये जिवंत असलेल्या देवाच्या प्रेमाची आणि सामर्थ्याची पहिली व सर्वश्रेष्ठ साक्षीदार होण्यासाठी आपल्या धन्य मातेने त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे निवडले. क्रुसासमोर उभे राहून त्याला सामोरे जाण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते, तेव्हा पिताही आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या धन्य मातेसोबत आनंद करण्यासाठी दररोज आमंत्रित करतो.
वर उद्धृत केलेल्या पवित्र शास्त्राच्या उताऱ्यात आपली धन्य माता येशूला उदरी घेऊन एलिझाबेथला भेटायला गेली, तेव्हा तिने उच्चारलेल्या शब्दांची आठवण करून दिली आहे. पण हे शब्द तिच्या ओठांवर सदैव असले असते. तिने पुन्हा पुन्हा प्रभूची थोरवी गाइली असती, आपला तारणारा देव याच्यामध्ये आनंद मानला असता आणि जीवनात लाभलेल्या असंख्य आशीर्वादांचा आनंद मनोमन अनुभवला असता. एलिझाबेथच्या भेटीसारख्या प्रसंगीही तिने असे केले असते आणि क्रुसावर खिळण्याच्या प्रसंगीही तिने असे केले असते.
आज आपल्या धन्य मातेच्या शब्दांवर आणि तिच्या अंतःकरणावर चिंतन करा. आज आपल्या प्रार्थनेत हे शब्द उच्चारा. जीवनात सध्या ज्या परिस्थितीतून तुम्ही जात आहात, ती ध्यानात ठेवून हे शब्द म्हणा. देवावरील तुमच्या श्रद्धेचा आणि आशेचा ते रोजचा झरा बनू देत. प्रभूची थोरवी गा, तुमचा तारणारा देव याच्यामध्ये आनंद माना आणि हे लक्षात ठेवा की जीवनात कोणतेही अनुभव आले, तरी देवाचे आशीर्वाद दररोज विपुल असतात. जीवनात दिलासा मिळतो, तेव्हा त्यातला आशीर्वाद पाहा. जीवनात वेदना होतात, तेव्हाही त्यातला आशीर्वाद पाहा. देवमातेची साक्ष तुमच्या जीवनात दररोज तुम्हाला प्रेरणा देऊ दे.
हे परमप्रिय माते, एलिझाबेथच्या भेटीत देवाची थोरवी गाताना तू उच्चारलेले शब्द देहधारणेच्या अपार आनंदातून ओसंडून आले. तुझ्या या आनंदाला सीमा नाहीत. पुढे आपल्या बाळाचा क्रूर, निर्दय मृत्यू पाहत तू उभी होतीस, तेव्हा याच आनंदाने तुला बळ दिले. परम दुःखाच्या त्या क्षणी, आपल्या बाळाला उदरी धारण केल्याचा आनंद पुन्हा एकदा तुझ्या हृदयाला स्पर्शून गेला.
हे परमप्रिय माते, तुझे स्तुतिगीत माझ्याही जीवनात उतरवायला मला मदत कर. जीवनाच्या प्रत्येक अंगात देवाचे आशीर्वाद पाहायला मला मदत कर. तुझ्या प्रेमळ नजरेने मला पाहायला शिकव, म्हणजे तुझ्या प्रिय पुत्राच्या बलिदानाचे तेज मला दिसेल.
हे माझ्या परमप्रिय प्रभू येशू, तू या जगातील सर्वांत मोठा आशीर्वाद आहेस. सारे आशीर्वाद तुझ्यातच आहेत! जे काही चांगले आहे ते सर्व तुझ्याकडून येते. दररोज माझी दृष्टी तुझ्यावर खिळवून ठेवायला आणि तुझ्या प्रेममय बलिदानाचे सामर्थ्य पूर्णपणे जाणून घ्यायला मला मदत कर. या देणगीचा मी आनंद मानावा आणि सदैव तुझी थोरवी गावी.
हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आठवा दिवस – सर्व गोष्टींत निष्ठा
ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध!

