मराठी

राखेच्या बुधवाराचा आठवडा

प्रार्थना करा, उपवास करा, दान द्या

राखेचा बुधवार (वर्ष अ)

“आणि गुप्तपणे पाहणारा तुमचा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.” मत्तय 6:4b

प्रायश्चित्तकाळ सुरू होतो. प्रार्थना करण्यासाठी, उपवास करण्यासाठी आणि देवावरील व शेजाऱ्यावरील प्रेमात वाढण्यासाठी हे 40 दिवस आहेत. दरवर्षी आपल्याला या काळाची गरज असते: थोडे थांबून आपल्या जीवनाचे पुन्हा परीक्षण करायला, पापांपासून दूर वळायला आणि देव ज्या सद्गुणांची देणगी आपल्याला इतक्या उत्कटतेने देऊ इच्छितो, त्या सद्गुणांत वाढायला. प्रायश्चित्तकाळाचे हे 40 दिवस म्हणजे येशूने वाळवंटात घालवलेल्या 40 दिवसांचे अनुकरण करण्याचा काळ. खरे तर, येशूच्या वाळवंटातील दिवसांचे केवळ “अनुकरण” करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याबरोबर, त्याच्यामध्ये आणि त्याच्याद्वारे हा काळ जगण्यासाठी आपल्याला पाचारण केले आहे.

अधिक पवित्र होण्यासाठी येशूला स्वतःला वाळवंटात 40 दिवस उपवास व प्रार्थना करण्याची गरज नव्हती. तो स्वतःच पावित्र्य आहे! तो देवाचा पवित्र जन आहे. तो स्वतःच परिपूर्णता आहे. तो परमपवित्र त्रैक्याची दुसरी व्यक्ती आहे. तो देव आहे. तरीही येशू उपवास व प्रार्थना करण्यासाठी वाळवंटात गेला. त्या 40 दिवसांचे दुःख सहन करताना त्याने आपल्या मानवी स्वभावात जे परिवर्तन घडवणारे गुण प्रकट केले, ते आपल्यालाही प्राप्त व्हावेत आणि आपण त्याच्यासोबत राहावे, म्हणून त्याने आपल्याला आमंत्रण दिले. आपल्या प्रभूबरोबर वाळवंटात 40 दिवस घालवायला तुम्ही तयार आहात का?

वाळवंटात असताना येशूने आपल्या मानवी स्वभावातील प्रत्येक परिपूर्ण गुण प्रकट केला. स्वर्गातील पित्याशिवाय हे कोणी पाहिले नाही, तरी येशूने वाळवंटात घालवलेला काळ संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत फलदायी ठरला. आपल्यापैकी प्रत्येकासाठी तो अत्यंत फलदायी ठरला.

ज्या “वाळवंटात” जाण्यासाठी आपल्याला पाचारण केले आहे, ते आपल्या भोवतालच्या लोकांच्या नजरेपासून लपलेले आहे, पण स्वर्गातील पित्याला ते दिसते. ते “लपलेले” आहे, याचा अर्थ असा की आपण सद्गुणांत वाढण्याचा प्रयत्न दिखाऊपणासाठी, स्वार्थापोटी स्वतःची वाहवा मिळवण्यासाठी किंवा जगाकडून प्रशंसा मिळवण्यासाठी करत नाही. ज्या वाळवंटात आपण 40 दिवस घालवले पाहिजेत, ते आपल्याला अधिक गहन प्रार्थनेकडे नेते, देवाशी संबंध नसलेल्या गोष्टींची आसक्ती सोडायला शिकवते आणि रोज भेटणाऱ्या लोकांबद्दल आपल्या मनात प्रेम भरते. अशा रीतीने ते आपल्यात परिवर्तन घडवते.

या 40 दिवसांत आपण प्रार्थना केली पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रार्थना म्हणजे अंतःकरणात देवाशी संवाद साधणे. मिस्साला उपस्थित राहणे किंवा मोठ्याने प्रार्थना म्हणणे एवढ्यावरच आपण थांबत नाही. प्रार्थना म्हणजे सर्वांत आधी देवाशी साधलेला गुप्त, अंतरीचा संवाद. आपण बोलतो, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण लक्ष देऊन ऐकतो, देवाचे म्हणणे ग्रहण करतो, ते समजून घेतो आणि त्याला प्रतिसाद देतो. या चारही गोष्टी नसतील, तर प्रार्थना ही प्रार्थना राहत नाही. तो “संवाद” ठरत नाही. ते केवळ आपले स्वतःशीच बोलणे ठरते.

या 40 दिवसांत आपण उपवास केला पाहिजे.  विशेषतः आजच्या काळात सततची धावपळ आणि गोंगाट यांचा आपल्या पाचही इंद्रियांवर मारा होत असतो.  दूरदर्शन, रेडिओ, संगणक यांसारख्या माध्यमांमधील दृश्ये आणि आवाज यांचा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर सतत भडिमार होतो.  चविष्ट पदार्थ, मिठाई आणि मनाला समाधान देणारे आवडते पदार्थ आपण सतत खात असतो, अनेकदा अतिरेक होईपर्यंत.  जगातील या सुखांच्या भडिमारापासून आपल्या पाचही इंद्रियांना विश्रांतीची गरज आहे, जेणेकरून आपण देवाशी एकरूप होऊन जगण्यात मिळणाऱ्या अधिक खोल आनंदाकडे वळू शकू.

या 40 दिवसांत आपण दान केले पाहिजे.  लोभाची पकड आपल्यावर किती घट्ट बसली आहे, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही.  आपल्याला हेही हवे असते आणि तेही हवे असते.  आपण अधिकाधिक भौतिक वस्तूंचा उपभोग घेत राहतो.  कारण आपण या जगात समाधान शोधत असतो.  जे काही आपले लक्ष देवापासून विचलित करते, त्याची आसक्ती आपण सोडली पाहिजे. ही आसक्ती सोडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे उदारता.  

आज या तीन साध्या गोष्टींवर मनन करा: प्रार्थना करा, उपवास करा आणि दान करा.  या प्रायश्चित्तकाळात या गोष्टी अशा रीतीने आचरणात आणण्याचा प्रयत्न करा की त्या फक्त देवालाच कळतील.  तुम्ही असे केले, तर तुमच्या जीवनात किती अद्भुत गोष्टी घडू शकतात याची आज तुम्हाला कल्पनाही नसेल, इतकी मोठी अद्भुत कार्ये प्रभू करू लागेल.  अनेकदा आपल्याला जखडून ठेवणाऱ्या स्वार्थातून तो तुम्हाला मुक्त करील आणि त्याच्यावर व इतरांवर एका नव्या, अधिक खोल रीतीने प्रेम करण्यास तुम्हाला समर्थ करील.

हे प्रायश्चित्ताचा मार्ग दाखवणाऱ्या माझ्या प्रभू, या प्रायश्चित्तकाळात मी स्वतःला तुला अर्पण करतो.  या 40 दिवसांच्या वाळवंटात मी स्वेच्छेने पाऊल टाकतो आणि यापूर्वी कधी केले नाही इतक्या मनःपूर्वक प्रार्थना करण्याचा, उपवास करण्याचा आणि स्वतःचे दान करण्याचा संकल्प करतो.  या प्रायश्चित्तकाळात तू माझे अंतःकरण बदलावे, अशी मी प्रार्थना करतो.  हे प्रिय प्रभू, तुझ्यावर आणि इतरांवर पूर्ण अंतःकरणाने प्रेम करण्यापासून मला रोखणाऱ्या सर्व गोष्टींपासून मला मुक्त कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


प्रायश्चित्तकाळ—खऱ्या प्रार्थनेचा काळ

राखेचा बुधवार (वर्ष ब)

पण तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा, दार बंद कर आणि गुप्तपणे आपल्या पित्याची प्रार्थना कर. आणि गुप्तपणे केलेले पाहणारा तुझा पिता तुला प्रतिफळ देईल. मत्तय 6:6

खऱ्या प्रार्थनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या आत्म्याच्या आतल्या दालनात, अगदी खोलवर घडते. तुमच्या अस्तित्वाच्या त्या गाभ्यातच तुम्हाला देव भेटेल. आपल्या ख्रिस्तसभेच्या इतिहासातील महान आध्यात्मिक लेखिकांपैकी एक असलेल्या आविलाच्या संत तेरेसा आत्म्याचे वर्णन देव वास करतो असा एक किल्ला म्हणून करतात. देवाला भेटण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी आणि त्याचा सहवास अनुभवण्यासाठी आपल्याला आपल्या आत्म्याच्या या किल्ल्यातील सर्वांत आतल्या, गाभ्यातल्या दालनात प्रवेश करावा लागतो. त्या अंतरतम निवासस्थानीच देवाचे संपूर्ण वैभव आणि सौंदर्य आपल्याला उलगडते.

देव केवळ ‘तिकडे’ दूर स्वर्गात असलेला देव नाही. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतका तो आपल्या जवळचा, आपल्या अंतरंगाशी एकरूप झालेला आहे. वर्षातील इतर कोणत्याही काळापेक्षा या प्रायश्चित्तकाळात आपण अंतर्मुख होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून परमपवित्र त्र्येक देव आपल्यामध्ये वास करतो हे आपल्याला उमगेल.

या प्रायश्चित्तकाळात देव तुमच्याकडून काय अपेक्षा करतो? एखादा आवडता पदार्थ न खाणे किंवा नेहमीपेक्षा एखादे अधिक सत्कृत्य करणे, अशा वरवरच्या संकल्पांनी प्रायश्चित्तकाळाची सुरुवात करणे सोपे असते. काही जण आपली शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी या काळाचा उपयोग करतात, तर काही जण आध्यात्मिक वाचनाला किंवा इतर भक्तिसाधनांना अधिक वेळ देण्याचे ठरवतात. हे सर्व चांगले आणि उपयुक्त आहे. पण एक गोष्ट नक्की: या प्रायश्चित्तकाळात तुम्ही प्रार्थना करावी, हीच आपल्या प्रभूची तुमच्यासाठी सर्वांत खोल इच्छा आहे.

अर्थात, प्रार्थना म्हणजे केवळ प्रार्थनेचे शब्द म्हणणे नव्हे; ती त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. प्रार्थना म्हणजे केवळ जपमाळ म्हणणे, पवित्र शास्त्रावर मनन करणे किंवा सुंदर रचलेल्या प्रार्थना म्हणणे नव्हे. प्रार्थना म्हणजे, शेवटी, देवाशी असलेले नाते. तुमच्यामध्ये वास करणाऱ्या त्र्येक देवाशी ती एक भेट आहे. खरी प्रार्थना ही तुम्ही आणि तुमचा प्रिय प्रभू यांच्यातील प्रेमाची कृती आहे. त्यात एकमेकांना स्वतःचे अर्पण आहे: तुम्ही तुमचे जीवन देवाला देता आणि देव स्वतःचे जीवन तुम्हाला देतो. प्रार्थना ही ऐक्याची आणि सहभाजितेची कृती आहे: तिच्याद्वारे आपण देवाशी एकरूप होतो आणि देव आपल्याशी एकरूप होतो.

प्रार्थनेचे अनेक टप्पे असतात, असे महान गूढानुभवी संतांनी आपल्याला शिकवले आहे. जपमाळीसारख्या सुंदर प्रार्थना म्हणण्यापासून आपण अनेकदा सुरुवात करतो. त्यानंतर आपण आपल्या प्रभूच्या आणि त्याच्या जीवनातील रहस्यांवर ध्यान, मनन आणि सखोल चिंतन करतो. आपली त्याच्याशी अधिक खोल ओळख होते आणि हळूहळू आपल्या लक्षात येते की आता आपण केवळ देवाचा विचार करत नाही, तर त्याच्याकडे समोरासमोर पाहत आहोत.

प्रायश्चित्ताच्या या पवित्र काळाला सुरुवात करताना, तुम्ही कशी प्रार्थना करता यावर विचार करा. येथे उलगडलेली प्रार्थनेची रूपे तुम्हाला जाणून घ्यावीशी वाटत असतील, तर त्यांचा आणखी शोध घेण्याचा संकल्प करा. प्रार्थनेत देवाचा शोध घेण्यास स्वतःला वाहून घ्या. प्रार्थनेतून देव तुम्हाला किती खोलवर नेऊ इच्छितो, याला मर्यादा नाही, अंत नाही. खरी प्रार्थना कधीच कंटाळवाणी नसते. खरी प्रार्थना तुम्हाला गवसते तेव्हा देवाचे अनंत रहस्य तुम्हाला उलगडते. आणि हा शोध जीवनात तुम्ही कल्पना करू शकाल अशा कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक वैभवशाली आहे.

हे माझ्या दैवी प्रभू, या प्रायश्चित्तकाळात मी स्वतःला तुला अर्पण करतो. मला तुझ्याजवळ ओढून घे, म्हणजे तुझी मला अधिक ओळख होईल. माझ्या अंतःकरणाच्या गाभ्यात तुझे दैवी सान्निध्य मला जाणवू दे; तिथून तू मला स्वतःकडे बोलावतोस. हे प्रिय प्रभू, खऱ्या प्रार्थनेची देणगी मला नव्याने उमगू दे आणि त्यातून तुझ्यावरील माझे प्रेम व माझी भक्ती अधिक दृढ होऊ दे. असा हा प्रायश्चित्तकाळ गौरवमय होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


प्रेम करण्यासाठी मुक्त होणे

राखेचा बुधवार (वर्ष क)

हे प्रभू, आमच्यावर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे. (पाहा स्तोत्र 51)

दया. या सगळ्याच्या केंद्रस्थानी दयाच आहे. प्रायश्चित्तकाळाच्या सुरुवातीला दया म्हणजे काय, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे ही उत्तम सुरुवात ठरेल.

प्रायश्चित्तकाळाचा विचार करताना अनेकदा आपल्या मनात थोडी धाकधूक असते. “मला काहीतरी सोडावं लागणार,” असं आपल्याला अनेकदा वाटतं. पण आपण एवढाच विचार केला, तर त्यामागचा खरा हेतू आपल्या लक्षात येत नाही. मला खरोखरच काहीतरी सोडावं ‘लागतं’ का? याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. आपण आत्मत्याग आणि आत्मसंयम पाळावा, अशी देवाची इच्छा आहे आणि त्याने आपल्या चर्चद्वारे आपल्याला ही साधना शिकवली आहे, हे खरं आहे. पण हे आपल्यावर लादलेलं ओझं नसून देवाची कृपा स्वीकारण्याचं आमंत्रण आहे.

काहीतरी सोडण्याचा खरा हेतू म्हणजे देवाची विपुल दया अधिक खोलवर अनुभवणे. जे काही आपल्याला जखडून ठेवते त्यापासून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे. ज्या नवजीवनाची आपल्याला मनापासून आस आहे, ते अनुभवायलाही यामुळे मदत होते. एखादा पदार्थ न खाणे किंवा एखादे पेय न पिणे, इतकाही साधा हा त्याग असू शकतो. किंवा थोडाफार आत्मत्याग करावा लागेल अशी कोणतीही कृती आपण जाणीवपूर्वक निवडू शकतो. आणि हे आपल्या भल्याचंच आहे! का? कारण यामुळे आपले आत्मिक बळ आणि इच्छाशक्ती वाढते. देवाला पूर्ण मनाने ‘हो’ म्हणण्याचा आपला निर्धार अधिक दृढ होतो.

जीवनात कितीतरी वेळा आपल्या भावना आणि इच्छा आपल्यावर ताबा मिळवतात. काहीतरी हवंसं वाटतं किंवा काहीतरी करावंसं वाटतं, आणि अनेकदा आपण त्या इच्छांच्या किंवा उर्मींच्या आहारी जातो. आत्मत्यागाचा सराव केल्याने आपल्या अयोग्य प्रवृत्तींच्या आहारी जाण्याऐवजी त्यांच्यावर ताबा ठेवण्याचं बळ आपल्याला मिळतं. ही गोष्ट केवळ खाण्यापिण्यापुरती मर्यादित नाही. ती आपल्या जीवनाच्या अनेक अंगांना लागू होते. सद्गुण आचरणात आणतानाही, विशेषतः देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करताना, हे बळ उपयोगी पडतं.

दयेच्या मुळाशी प्रेम आहे. आपण जसे प्रेम करावे अशी देवाची इच्छा आहे, तसे प्रेम करणे म्हणजे दया. प्रेमाने आपले संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकावे यासाठी मोकळे होणे म्हणजे दया, जेणेकरून शेवटी प्रेम करण्याशिवाय आपल्याला दुसरे काहीच नकोसे वाटेल. असे प्रेम आचरणात आणण्याची सवय लावणे कठीण असू शकते, पण त्यातच आपल्या आनंदाचा आणि जीवनाच्या परिपूर्णतेचा उगम आहे.

विशेषतः दया ही प्रेमाची अशी कृती आहे की ती मिळवण्याचा हक्क, एका अर्थाने, समोरच्या व्यक्तीला नसतो. ती केवळ प्रेमापोटी विनामूल्य दिलेली देणगी आहे. देव आपल्यावर नेमकं असंच प्रेम करतो. त्याचं प्रेम दयेनं ओतप्रोत भरलेलं आहे. आपल्याला ती दया स्वीकारायची असेल, तर आपणही इतरांवर दया केली पाहिजे. आणि इतरांवर दया करायची असेल, तर त्यासाठी आपण आपलं मन तयार केलं पाहिजे. आत्मत्यागाच्या आपल्या छोट्या कृतींनी अशा मनाची जडणघडण होण्यास मदत होते.

म्हणून हा प्रायश्चित्तकाळ फलदायी करा. या काळातील त्याग म्हणजे केवळ ओझे आहे, या विचारात अडकू नका. देव आपल्याला जे जीवन देऊ इच्छितो, त्याकडे नेणाऱ्या वाटेचा ते एक आवश्यक भाग आहेत.

हे माझ्यासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या प्रभू, हा प्रायश्चित्तकाळ माझ्या जीवनात खरोखर फलदायी ठरो. तू मला जे काही देऊ इच्छितोस, ते सारे स्वीकारणे ही माझ्यासाठी कृपेची आणि आनंदाची गोष्ट ठरो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


जग की तुमचा आत्मा?

राखेच्या बुधवारनंतरचा गुरुवार

“एखाद्या माणसाने सारे जग मिळवले, पण स्वतःलाच गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याचा त्याला काय लाभ?” लूक 9:25

अनेक जण लॉटरी जिंकण्याचं स्वप्न पाहतात. आणि अनेकदा ते स्वप्न कित्येक दशलक्ष डॉलर जिंकण्याचं असतं. एका क्षणात तुमच्याकडे लाखो किंवा अब्जावधी डॉलर आले, तर तुम्ही काय कराल, याची कल्पना करा. तुम्हीही अशी दिवास्वप्नं पाहता का?

असे असेल, तर वर दिलेल्या प्रश्नावर थोडा विचार करा. इतिहासातील सर्वांत मोठी लॉटरी जिंकून तुम्ही पृथ्वीवरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झालात, पण तुमच्या जीवनात देवाची कृपा आणि श्रद्धा नसली, तर त्याचा काय उपयोग? अफाट संपत्ती आणि सारे जग मिळवण्याच्या बदल्यात तुम्ही तुमची श्रद्धा सोडाल का? बहुधा अनेक जण तसे करतील; नाहीतर येशूने हा प्रश्न विचारलाच नसता.

जीवनात आपण अनेकदा चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतो. शाश्वत परिपूर्णतेपेक्षा लगेच मिळणारं समाधान आणि सुख यांच्या मागे आपण लागतो. शाश्वत जीवन लक्षात ठेवून जगणं अनेकांना कठीण जातं.

काही जण म्हणतील, “मी तर दोन्ही निवडतो! मला सारे जगही हवे आणि माझ्या आत्म्याचे तारणही हवे!” पण येशूच्या प्रश्नामागे हे गृहीत आहे की आपल्याला दोन्ही मिळू शकत नाहीत. आपण कशाचा पाठपुरावा करणार, हे ठरवले पाहिजे. श्रद्धेचे जीवन आणि आपल्या आत्म्याचे तारण निवडायचे असेल, तर या जगातील अनेक गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात. देवाने आपल्याला या जगात पुष्कळ काही दिले, तरी आपल्या किंवा इतरांच्या शाश्वत तारणासाठी ते हिताचे ठरणार असेल, तर त्या गोष्टी स्वेच्छेने ‘सोडून द्यायला’ आपण तयार असले पाहिजे. अशा रीतीने जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे करणे कठीण आहे आणि त्यासाठी देवावर अतिशय खोल प्रेम असावे लागते. पवित्रतेचा ध्यास घेणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, अशी आपल्या अंतःकरणात खोलवर खात्री असली पाहिजे.

आज येशूच्या या गहन प्रश्नावर चिंतन करा. तो हा प्रश्न तुम्हालाच विचारत आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही काय उत्तर द्याल? देवाला आणि त्याच्या विपुल दयेला तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवण्यास संकोच करू नका. तुमच्या अंतःकरणातील सर्वांत मूलभूत इच्छा आणि ध्येय यांचा गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रायश्चित्तकाळ हा वर्षातील सर्वांत अनुकूल काळांपैकी एक आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा देवाला प्राधान्य द्या; या निवडीबद्दल तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल.

हे माझ्या शाश्वत प्रभू, या प्रायश्चित्तकाळाच्या सुरुवातीला, मी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो हे तपासण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. माझ्या जीवनाला दिशा देणारी सर्वांत मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली प्रेरणा कोणती आहे, हे प्रामाणिकपणे ओळखायला मला मदत कर. इतर सर्व गोष्टींपेक्षा तुझी निवड करायला मला मदत कर, म्हणजे तुझ्या सहाय्याने माझ्या जीवनातल्या साऱ्या गोष्टींना तुझ्या पवित्र इच्छेनुसार योग्य स्थान मिळेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


उपवास आणि मांसवर्जनाचा दिवस

राखेच्या बुधवारानंतरचा शुक्रवार

“असे दिवस येतील, जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर नेले जाईल; तेव्हा ते उपवास करतील.” मत्तय 9:15

प्रायश्चित्तकाळातील शुक्रवार… त्यांच्यासाठी तुम्ही तयार आहात का? प्रायश्चित्तकाळातील प्रत्येक शुक्रवार हा मांसवर्जनाचा दिवस आहे. म्हणून आज आपल्या संपूर्ण चर्चच्या ऐक्यात हा छोटासा त्याग अवश्य करा. संपूर्ण चर्चने एकत्र येऊन त्याग अर्पण करणे हा केवढा मोठा आशीर्वाद आहे!

प्रायश्चित्तकाळातल्या शुक्रवारी (आणि खरे तर वर्षभरातील शुक्रवारीही) चर्च आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रायश्चित्त करायला सांगते. मांस न खाणे हा नक्कीच प्रायश्चित्ताचा एक प्रकार आहे; पण तुम्हाला मांस आवडत नसेल आणि मासे फार आवडत असतील, तर तो तुमच्यासाठी त्याग ठरणार नाही. प्रायश्चित्तकाळातल्या शुक्रवारांबद्दल सर्वांत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की प्रत्येक शुक्रवार हा त्यागाचा दिवस असावा. येशूने शुक्रवारी सर्वोच्च बलिदान अर्पण केले आणि आपल्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी अत्यंत तीव्र वेदना सहन केल्या. आपणही आपला त्याग अर्पण करायला आणि तो ख्रिस्ताच्या बलिदानाशी आध्यात्मिक रीतीने जोडण्याचा प्रयत्न करायला कचरू नये. आपण असं का करावं?

या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी पापापासून आपली मुक्ती कशी होते, हे मुळात समजून घेणे आवश्यक आहे. याविषयी आपल्या कॅथलिक चर्चची वैशिष्ट्यपूर्ण आणि गहन शिकवण समजून घेणे महत्त्वाचे आहे. येशू हाच जगाचा एकमेव तारणहार आहे, हा विश्वास जगभरातील इतर ख्रिस्ती बांधवांप्रमाणे आपण कॅथलिकही बाळगतो. त्याच्या क्रूसाद्वारे मिळालेली मुक्ती हाच स्वर्गाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. एका अर्थाने, येशूने आपल्या पापांसाठी मृत्यूची ‘किंमत चुकवली’. त्याने आपली शिक्षा स्वतःवर घेतली.

पण हे अमूल्य दान स्वीकारताना आपली भूमिका आणि जबाबदारी काय आहे, हेही आपण समजून घेतले पाहिजे. “ठीक आहे, मी किंमत चुकवली; आता तुमच्यावर काहीच जबाबदारी नाही,” असे म्हणून देव हे दान देत नाही. उलट, तो जणू असे म्हणतो, असा आपला विश्वास आहे: “माझ्या दुःखसहनाने आणि मृत्यूने मी तारणाचे दार उघडले आहे. आता त्या दारातून माझ्याबरोबर आत येण्याचे आणि तुमची दुःखे माझ्या दुःखाशी जोडण्याचे आमंत्रण मी तुम्हाला देतो, जेणेकरून तुमच्या दुःखाशी एकरूप झालेले माझे दुःखसहन तुम्हाला तारणाकडे आणि पापापासून मुक्तीकडे नेईल.” म्हणून, एका अर्थाने, आपली जबाबदारी संपलेली नाही; उलट, आपले जीवन, दुःखे आणि पापे ख्रिस्ताच्या क्रूसाशी जोडून मुक्ती आणि तारण मिळवण्याचा मार्ग आता आपल्यासाठी खुला झाला आहे. कॅथलिक म्हणून आपण हे समजतो की तारणासाठी किंमत मोजावी लागली आणि ती किंमत केवळ येशूचा मृत्यू एवढीच नव्हती; त्याच्या दुःखसहनात आणि मृत्यूत आपण स्वेच्छेने सहभागी होणे हाही त्या किंमतीचा भाग आहे. अशा रीतीने त्याचे बलिदान आपल्या प्रत्येक पापाचे रूपांतर घडवते.

प्रायश्चित्तकाळातल्या शुक्रवारी स्वतःच्या इच्छेने आणि स्वेच्छेने येशूच्या बलिदानाशी एकरूप होण्याचे आपल्याला विशेष आमंत्रण आहे. ते बलिदान अर्पण करताना येशूला मोठा निःस्वार्थपणा आणि आत्मत्याग दाखवावा लागला. तुम्ही निवडलेले छोटे उपवास, काही गोष्टींपासून दूर राहणे आणि आत्मत्यागाच्या इतर कृती यांमुळे तुमची इच्छा ख्रिस्ताच्या इच्छेशी अधिक जुळू लागते. अशा रीतीने तुम्ही त्याच्याशी अधिक पूर्णपणे एकरूप होऊ शकता आणि तारणाची कृपा स्वीकारू शकता.

या प्रायश्चित्तकाळात, विशेषतः त्यातल्या शुक्रवारी, कोणते छोटे त्याग करायला तुम्हाला बोलावले आहे, यावर आज चिंतन करा. आज त्याग करण्याची निवड करा. जगाच्या तारणाऱ्याशी अधिक गाढ एकरूप होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे, हे तुम्हाला उमगेल.

हे परम त्यागी प्रभू, तुझ्या दुःखात आणि मरणात तुझ्याशी एकरूप होण्याचा निर्णय मी आज घेत आहे. माझे दुःख आणि माझे पाप मी तुला अर्पण करतो. माझ्या पापाची क्षमा कर आणि माझ्या दुःखाचे, विशेषतः माझ्या पापामुळे आलेल्या दुःखाचे, तुझ्या स्वतःच्या दुःखाद्वारे रूपांतर होऊ दे, जेणेकरून मला तुझ्या पुनरुत्थानाच्या आनंदात सहभागी होता येईल. मी तुला अर्पण करत असलेल्या छोट्या त्यागांनी आणि आत्मसंयमाच्या कृतींनी तुझ्याशी माझे ऐक्य अधिक दृढ होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


दैवी वैद्याला आजाऱ्यांची ‘गरज’ आहे

राखेच्या बुधवारानंतरचा शनिवार

“निरोगी लोकांना वैद्याची गरज नसते; आजारी लोकांना असते. नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.” लूक 5:31–32

रुग्णच नसतील तर डॉक्टर काय करेल? कोणीच आजारी पडले नाही तर? बिचाऱ्या डॉक्टरचा व्यवसायच बंद पडेल. म्हणून, एका अर्थाने, आपले काम करण्यासाठी डॉक्टरला रुग्णांची गरज असते, असे म्हणणे योग्य ठरेल.

येशूविषयीही असेच म्हणता येईल. तो जगाचा तारणारा आहे. पण पापी कोणीच नसते तर? मग येशूचे मरण व्यर्थ ठरले असते आणि त्याच्या दयेची गरज पडली नसती. म्हणून, एका अर्थाने, जगाचा तारणारा म्हणून येशूला पाप्यांची गरज आहे, असे आपण म्हणू शकतो. ज्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, देवाच्या नियमाचे उल्लंघन केले, स्वतःच्या आणि इतरांच्या प्रतिष्ठेचा अनादर केला आणि जे स्वार्थी व पापीपणाने वागले, अशा लोकांची त्याला गरज आहे. येशूला पाप्यांची गरज आहे. का? कारण येशू तारणारा आहे आणि तारण करणे हेच तारणाऱ्याचे कार्य आहे. तारण करण्यासाठी तारणाऱ्याला अशा लोकांची गरज असते, ज्यांना तारणाची गरज आहे!

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण हे समजले की आपल्या पापाचा सारा मळ घेऊन आपण येशूकडे येतो, तेव्हा त्याच्या हृदयाला किती आनंद होतो, हे आपल्याला अचानक उमगेल. त्याला आनंद होतो, कारण एकमेव तारणारा म्हणून दया दाखवून पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य त्याला पूर्ण करता येते.

येशूला त्याचे कार्य पूर्ण करू द्या! त्याला तुमच्यावर दया करू द्या! त्यासाठी तुम्हाला दयेची गरज आहे, हे कबूल करा. आपल्या असहाय आणि पापी अवस्थेत त्याच्याकडे या: आपण दयेस पात्र नाही, तर केवळ अनंत दंडास पात्र आहोत, हे मान्य करा. अशा रीतीने तुम्ही येशूकडे आलात की पिता परमेश्वराने त्याच्यावर सोपवलेले कार्य त्याला पूर्ण करता येते. दयेने ओसंडून वाहणारे आपले हृदय त्याला प्रत्यक्ष कृतीतून प्रकट करता येते. आपले कार्य पूर्ण करण्यासाठी येशूला तुमची “गरज” आहे. त्याला ही भेट द्या आणि त्याला तुमचा दयाळू तारणारा होऊ द्या.

आज देवाच्या दयेवर एका नव्या दृष्टिकोनातून चिंतन करा. बरे करण्याचे आपले कार्य पूर्ण करण्यास उत्सुक असलेल्या दैवी वैद्याच्या, म्हणजेच येशूच्या, दृष्टिकोनातून देवाच्या दयेकडे पाहा. आपले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला तुमची गरज आहे, हे जाणून घ्या. तुम्ही आपले पाप कबूल करावे आणि त्याच्याकडून बरे होण्यास तयार असावे, अशी त्याची इच्छा आहे. असे केल्याने दयेची दारे उघडतात आणि आपल्या या काळात तिचा विपुल वर्षाव होऊ शकतो.

हे प्रिय तारणाऱ्या आणि दैवी वैद्या, तारण करण्यासाठी आणि बरे करण्यासाठी तू आलास, म्हणून मी तुझे आभार मानतो. माझ्या जीवनात तुझी दया प्रकट करण्याची तुला उत्कट इच्छा आहे, याबद्दल मी तुझे आभार मानतो. मला नम्र कर, जेणेकरून बरे करणारा तुझा स्पर्श मी स्वीकारू शकेन आणि तारणाच्या या देणगीद्वारे तुला तुझी दैवी दया प्रकट करू देईन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

प्रायश्चित्तकाळाचा पहिला आठवडा

अनुक्रमणिका


मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध