जिवंत पाण्याने आपली तहान भागवणे
प्रायश्चित्तकाळाचा तिसरा रविवार (वर्ष अ)
(टीप: आत्मपरीक्षणाचे विधी होत असतील, तेव्हा वर्ष ब & क यांसाठीही या शुभवर्तमानाचे वाचन ऐच्छिक आहे.)
“मी जे काही केले ते सगळे मला सांगणारा एक माणूस आहे. या, त्याला पाहा. तोच ख्रिस्त असेल का?” योहान 4:29
ही विहिरीवर येशूची भेट झालेल्या एका स्त्रीची कथा आहे. ती पापी स्त्री होती. गावातल्या इतर स्त्रिया आपल्याला दोष देतील या भीतीने त्यांची भेट टाळण्यासाठी ती भर दुपारच्या उन्हात विहिरीवर येते. विहिरीवर तिला येशू भेटतो. येशू तिच्याशी थोडा वेळ बोलतो. सहजपणे सुरू झालेला हा संवाद तिच्या मनाला खोलवर स्पर्श करतो आणि तिचे जीवन बदलून टाकतो.
सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, येशू तिच्याशी बोलला, या गोष्टीनेच तिच्या मनाला स्पर्श केला. ती शोमरोनी स्त्री होती आणि येशू यहुदी पुरुष होता. यहुदी पुरुष शोमरोनी स्त्रियांशी बोलत नसत. पण येशूने तिला आणखी काही सांगितले, जे तिच्या मनाला खोलवर भिडले. ती स्त्री स्वतःच सांगते त्याप्रमाणे, तो तिला म्हणाला नव्हे, तर त्याने तिला “मी जे काही केले ते सगळे सांगितले.”
एखाद्या मनकवड्या माणसाप्रमाणे किंवा जादूगाराप्रमाणे येशूला तिचा सगळा भूतकाळ माहीत होता, एवढ्याचेच तिला आश्चर्य वाटले असे नाही. येशूने तिला तिच्या गतकाळातील सर्व पापे सांगितली, यापलीकडेही त्या भेटीत काहीतरी घडले. येशूला तिच्याविषयी सगळे माहीत होते—तिच्या गतायुष्यातील सर्व पापे आणि तिची तुटलेली नातीही. तरीही त्याने तिला अत्यंत आदराने आणि सन्मानाने वागवले. हीच गोष्ट तिच्या मनाला खऱ्या अर्थाने भिडली असे दिसते. हा तिच्यासाठी अगदी नवा अनुभव होता!
लोकांमध्ये वावरताना तिला रोज एक प्रकारची लाज वाटत असणार, यात शंका नाही. ती पूर्वी ज्या रीतीने जगत होती आणि आताही ज्या रीतीने जगत होती, ती जीवनपद्धती समाजाला मान्य नव्हती. तिला त्याची लाज वाटत होती. वर म्हटल्याप्रमाणे, याच कारणामुळे ती भर दुपारी विहिरीवर आली होती. ती इतरांना टाळत होती.
पण इथे तिच्यासमोर येशू होता. तिच्याविषयी सर्व काही माहीत असूनही तिला जिवंत पाणी द्यावे, अशी त्याची इच्छा होती. तिच्या आत्म्याला लागलेली तहान त्याला भागवायची होती. तो तिच्याशी बोलत असताना त्याचा सौम्यपणा आणि तो आपल्याला स्वीकारतो याची जाणीव तिला झाली, आणि तिची तहान भागू लागली. कारण तिला खरोखर ज्याची गरज होती, आणि आपणा सर्वांनाही ज्याची गरज आहे, ते म्हणजे येशू देतो ते परिपूर्ण प्रेम आणि स्वीकार. त्याने तिला ते दिले आणि तो आपल्यालाही ते देतो.
विशेष म्हणजे, ती स्त्री विहिरीजवळ “आपली पाण्याची घागर ठेवून” निघून गेली. ज्या पाण्यासाठी ती आली होती, ते पाणी तिने घेतलेच नाही. पण खरेच तिला पाणी मिळाले नाही का? तिने विहिरीजवळ घागर सोडली, ही कृती येशूशी झालेल्या भेटीत तिची तहान भागल्याचे प्रतीक आहे. निदान आध्यात्मिक अर्थाने तरी ती आता तहानलेली नव्हती. स्वतः जिवंत पाणी असलेल्या येशूने तिची तहान भागवली.
तुमच्या अंतर्यामी असलेल्या आणि नाकारता न येणाऱ्या तहानेवर आज चिंतन करा. त्या तहानेची जाणीव झाल्यावर, येशूला जिवंत पाण्याने ती भागवू देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घ्या. असे केलात तर फार काळ तुमची तहान भागवू न शकणाऱ्या अनेक “घागरी” तुम्हीही मागे सोडून द्याल.
हे येशू, माझ्या आत्म्याला ज्या जिवंत पाण्याची गरज आहे, ते तूच आहेस. माझ्या दिवसाच्या रणरणत्या उन्हात, जीवनातील परीक्षांत, तसेच लज्जा आणि अपराधीपणाच्या भावनेतही मला तुझी भेट घडो. अशा क्षणी मला तुझे प्रेम, तुझी कोमलता आणि तू मला स्वीकारतोस याचा अनुभव येवो. तुझ्यामध्ये मला लाभणाऱ्या नव्या जीवनाचा उगम ते प्रेम ठरो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
देवाचा पवित्र संताप
प्रायश्चित्तकाळातील तिसरा रविवार (वर्ष ब)
त्याने दोऱ्यांचा चाबूक बनवला आणि मेंढरे व बैल यांच्यासह त्या सर्वांना मंदिराच्या आवारातून हाकलून दिले. त्याने सराफांची नाणी विखरून टाकली व त्यांची मेजे उलथून टाकली. कबुतरे विकणाऱ्यांना तो म्हणाला, “ही येथून घेऊन जा आणि माझ्या पित्याच्या घराचा बाजार करू नका.” योहान 2:15–16
येशूच्या या कृतीने मोठी खळबळ उडाली. मंदिराची बाजारपेठ बनवणाऱ्यांना तो थेट सामोरा गेला. बलिदानासाठी जनावरे विकणारे लोक यहुदी धर्मातील पवित्र विधींचा वापर करून नफा कमवू पाहत होते. देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी ते तिथे नव्हते; ते स्वतःचाच स्वार्थ साधत होते. त्यामुळे आपल्या प्रभूचा पवित्र संताप प्रकट झाला.
येशूचा संताप हा त्याचा संयम सुटल्यामुळे नव्हता, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भावनांवरचा ताबा सुटून अनावर रागाचा उद्रेक झाला, असेही नव्हते. उलट, येशूचा स्वतःवर पूर्ण ताबा होता आणि त्याने प्रखर प्रेमापोटी आपला संताप व्यक्त केला. या प्रसंगी त्याचे परिपूर्ण प्रेम तीव्र संतापातून प्रकट झाले.
राग येणे हे सामान्यतः पाप समजले जाते, आणि स्वतःवरचा ताबा सुटल्यामुळे राग उसळतो तेव्हा तो पाप ठरतो. पण रागाची तीव्र भावना ही स्वतःतच पाप नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तीव्र भावना ही एक प्रबळ प्रेरणा असते आणि ती निरनिराळ्या प्रकारे प्रकट होते. स्वतःला विचारण्यासारखा मुख्य प्रश्न हा आहे: “या भावनेला चालना कशामुळे मिळते?”
पापाचा द्वेष आणि पापी माणसावरचे प्रेम यांमुळे येशूच्या मनात हा पवित्र संताप उसळला. मेजे उलथून टाकून आणि चाबकाने लोकांना मंदिराबाहेर हाकलून देऊन येशूने हे स्पष्ट केले की ज्या पित्याच्या घरात ते होते, त्या पित्यावर त्याचे प्रेम होते. त्या लोकांवरही त्याचे इतके प्रेम होते की ते करत असलेल्या पापाबद्दल त्याने त्यांना कळकळीने आणि कठोरपणे फटकारले. त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, हा त्याच्या कृतीचा अंतिम हेतू होता.
येशू तुमच्या जीवनातील पापाचाही तितक्याच तीव्रतेने आणि तितक्याच निर्दोषपणे द्वेष करतो. आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी कधीकधी अशा पवित्र कानउघाडणीची गरज असते. या उपवासकाळात प्रभूने तुमची अशी कानउघाडणी करावी, याला घाबरू नका.
आज तुमच्या जीवनातील ज्या गोष्टी येशू शुद्ध करू इच्छितो, त्यांवर चिंतन करा. त्याला तुमच्याशी थेट आणि ठामपणे बोलू द्या, जेणेकरून तुम्ही पश्चात्ताप करून देवाकडे वळाल. प्रभू तुमच्यावर परिपूर्ण प्रेम करतो आणि तुमचे जीवन सर्व पापांपासून शुद्ध व्हावे, अशी त्याची इच्छा आहे.
हे उत्कट प्रेम करणाऱ्या माझ्या प्रभू, मी पापी आहे, हे मला ठाऊक आहे. मला तुझ्या दयेची आणि कधीकधी तुझ्या पवित्र संतापाचीही गरज आहे. तू प्रेमाने दिलेली तंबी नम्रपणे स्वीकारायला आणि माझ्या जीवनातून सर्व पाप घालवून देण्यास तुला वाव द्यायला मला मदत कर. हे प्रिय प्रभू, माझ्यावर दया कर. विनंती आहे, माझ्यावर दया कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दयेच्या ‘माती’चा कस घालवणे
प्रायश्चित्तकाळातील तिसरा रविवार (वर्ष क)
“मालक, यंदाचे वर्षही हे झाड राहू द्या. मी त्याच्या भोवतालची जमीन खणून त्याला खत घालीन. पुढे कदाचित त्याला फळ येईल. नाही आले, तर तुम्ही ते तोडून टाका.” लूक 13:8–9
चांगली फळे येण्यासाठी चांगली माती असणे काही अंशी आवश्यक आहे, हे प्रत्येक माळ्याला ठाऊक असते. पण चांगली फळे येण्यात इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. झाड रोगमुक्त असले पाहिजे, त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, ते उबदार ठिकाणी लावलेले असले पाहिजे, त्याची योग्य छाटणी झाली पाहिजे आणि त्याला वाढायला पुरेशी जागा मिळाली पाहिजे. या सर्व गोष्टी अनुकूल असल्या की चांगली फळे नक्की येतात.
आपल्या जीवनाचेही तसेच आहे. देवाची दया हीच ती माती आहे, जिच्यात आपण रुजायचे आहे. आपल्या जीवनात सद्गुण बहरण्यासाठी याहून सुपीक माती नाही. आपल्या वाढीसाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाऊस आणि ऊबही देवच देतो. पण ही उपमा पुढे नेली, तर आपण आपली छाटणी होऊ दिली पाहिजे. मातीची निरनिराळ्या प्रकारे मशागत होऊ दिली पाहिजे आणि तीत खतही घालू दिले पाहिजे. येशू आपल्या जीवनाचा माळी आहे. तरी एका अर्थाने आपणही माळी आहोत, असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आपल्या आध्यात्मिक जीवनाची निकोप वाढ व्हावी आणि आपल्या जीवनात सद्गुणांचे चांगले फळ यावे, यासाठी निर्मात्याने दिलेल्या अलौकिक साधनांवर विसंबून आपण आपल्या प्रभूला सहकार्य केले पाहिजे.
वरील उतारा हा अंजिराच्या झाडाच्या दाखल्याचा शेवट आहे. या उताऱ्याच्या अगोदर द्राक्षमळ्याचा मालक, म्हणजे देवपिता, फळ न देणारे अंजिराचे झाड तोडून टाकण्याची आज्ञा देतो, जेणेकरून ते यापुढे जमिनीचा कस घालवणार नाही. पण आपल्या जीवनाच्या मातीची मशागत करण्यासाठी पित्याने पाठवलेला आपला दयाळू प्रभू आपल्याला आणखी एक संधी देऊ इच्छितो, आणि पिता प्रेमापोटी ती विनंती मान्य करतो. आपले हे जीवन म्हणजे ते ‘वर्ष’ आहे, ज्या काळात प्रभू आपल्या भोवतालच्या मातीची मोठ्या कळकळीने मशागत करतो. रोजची प्रार्थना, त्याच्या आज्ञांचे निष्ठेने पालन, प्रेमापोटी केलेले त्याग आणि त्याच्या ईश्वरी व्यवस्थेवर भरवसा ठेवून केलेले आत्मसमर्पण यांद्वारे आपण त्याला सहकार्य केले पाहिजे. शेवटी, आपल्या प्रभूला त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू दिले, तर आपल्या जीवनाला चांगले फळ येईल.
पण दुसरी बाजूही लक्षात ठेवा: आपल्या जीवनाला चांगले फळ आले नाही, तर आपल्याला ‘तोडून टाकले’ जाईल, यात शंका नाही. चांगले फळ देणे ऐच्छिक नाही; ते आवश्यक आहे. ते आपल्या आध्यात्मिक आरोग्याचे स्पष्ट लक्षण आहे. आपल्याला शाश्वत प्रतिफळ मिळेल की शाश्वत मरण, याचा तो निकष ठरेल. आपल्या प्रभूच्या अशा कठोर शब्दांनी घाबरून जाऊ नका. आपल्या जीवनात चांगले फळ देण्याची आपल्यावर किती गंभीर जबाबदारी आहे, हे आपल्याला कळावे म्हणून तो प्रेमाने असे बोलला.
आज तुमच्या अंतरंगातील आध्यात्मिक आरोग्य कोणत्या बाह्य लक्षणांतून दिसते, यावर चिंतन करा. तुमच्या जीवनात सद्गुणांना अंकुर फुटताना तुम्हाला दिसतात का? तुमच्या आत्म्याची मशागत करण्यासाठी आणि कृपेने व दयेने त्याला पोषण देण्यासाठी देव तुमच्यात कोणते कार्य करू इच्छितो, याची तुम्हाला जाणीव आहे का? आज त्याला ‘हो’ म्हणा आणि त्या कृपेला तुमच्या जीवनात भरपूर चांगले फळ आणू द्या.
हे सद्गुणसंपन्न प्रभू, माझ्या आत्म्याची मशागत करण्यासाठी आणि त्याला तुझ्या कृपेचे खत घालण्यासाठी मी तुला माझ्या अंतरात येण्याचे आमंत्रण देतो. माझ्या पापांची छाटणी कर आणि तुझ्या दयेचे पोषण मला मिळावे म्हणून माझी मुळे खोलवर रुजण्यास मदत कर. माझ्या जीवनात जिथे जिथे फळ द्यायला मी कमी पडलो, त्याबद्दल मला खेद आहे. आता मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो, जेणेकरून तुझ्या देखभालीने माझे सर्व विकार आणि दुर्बलता दूर होतील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझा जीव तहानला आहे!
उपवासकाळातील तिसऱ्या आठवड्याचा सोमवार
माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानला आहे. मी केव्हा जाऊन देवाचे मुख पाहीन? (पाहा स्तोत्र 42:3)
असे म्हणता येणे किती सुंदर आहे! ‘तहानला’ हा शब्द नेहमीच्या बोलण्यात फारसा वापरला जात नाही, पण त्या एका शब्दावरही चिंतन करण्यासारखे आहे. त्यातून अशी तळमळ व्यक्त होते की आपली तहान केवळ देवाने नव्हे, तर ‘जिवंत देवाने’ भागवावी आणि आपल्याला ‘देवाचे मुख पाहायला’ मिळावे.
अशा गोष्टीची ओढ तुम्हाला कितीदा लागते? देवाची आस आपल्या आत्म्यात कितीदा प्रज्वलित होऊ देता? अशी इच्छा, अशी ओढ असणे ही किती सुंदर गोष्ट आहे! खरे तर, ही इच्छाच जीवनात मोठे समाधान आणि परिपूर्णतेची अनुभूती देऊ लागण्यास पुरेशी आहे.
एका वृद्ध संन्याशाची गोष्ट आहे. तो एकांतवासी म्हणून जगला आणि एका मठातील धर्मभगिनींच्या समुदायासाठी याजक व आध्यात्मिक सेवक म्हणून त्याने सेवा केली. त्याने आपले बहुतांश आयुष्य एकांतात, प्रार्थना, अभ्यास आणि काम यांत अतिशय शांतपणे घालवले. आयुष्याच्या अखेरीस एके दिवशी त्याला विचारले गेले, “इतकी वर्षे तुम्हाला तुमचे जीवन कसे वाटले?” क्षणाचाही विलंब न लावता त्याचा चेहरा उजळून निघाला आणि तो गहिऱ्या आनंदाने भरून गेला. पूर्ण खात्रीने तो म्हणाला, “किती वैभवशाली आहे माझे जीवन! दररोज मी मरणाची तयारी करतो.”
या संन्याशाच्या जीवनाचे एकच ध्येय होते: देवाचे मुख पाहणे. बाकी कशालाही खरे महत्त्व नव्हते. त्या गौरवशाली परमसुखद दर्शनात देवाला समोरासमोर पाहण्याचा क्षण यावा, अशी आस त्यांना होती आणि दररोज ते त्या क्षणाची वाट पाहत होते. याच विचारामुळे त्यांना दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे त्या गौरवशाली भेटीच्या तयारीत मिस्सा अर्पण करत आणि देवाची आराधना करत पुढे जाता आले.
तुम्हाला कशाची तहान आहे? ‘माझा आत्मा …साठी तहानला आहे,’ हे वाक्य तुम्ही कसे पूर्ण कराल? नेमके कशासाठी? कितीतरीदा आपण कृत्रिम आणि क्षणभंगुर गोष्टींसाठी तहानलेले असतो. आनंदी होण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो, तरीही कित्येकदा तो आनंद आपल्याला मिळत नाही. पण जे खरोखर आवश्यक आहे, ज्यासाठी आपली निर्मिती झाली आहे, त्याची आस आपण आपल्या अंतःकरणात प्रज्वलित होऊ दिली, तर जीवनातल्या इतर सर्व गोष्टींना त्यांचे योग्य स्थान मिळेल. आपल्या सर्व आसांच्या, आशांच्या आणि इच्छांच्या केंद्रस्थानी देव असेल, तर इथे आणि आत्ताच आपण खरोखर ‘देवाचे मुख पाहू’ लागू. देवाच्या गौरवाचे ओझरते दर्शनही आपल्याला इतके तृप्त करेल की जीवनाकडे पाहण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलेल आणि आपण जे काही करतो त्यात आपल्याला स्पष्ट व निश्चित दिशा मिळेल. त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक नात्यावर होईल, आपल्या प्रत्येक निर्णयाला पवित्र आत्मा दिशा देईल आणि आपण शोधत असलेले जीवनाचे ध्येय व अर्थ आपल्याला सापडतील. आपल्या जीवनाचा विचार करताना, आपण ज्या वाटेवर आहोत तिचे चिंतन करून आपला चेहरा दर वेळी उजळून निघेल. वाटेच्या शेवटी आपली वाट पाहणाऱ्या शाश्वत प्रतिफळाच्या आशेने त्या वाटेवर पूर्ण जोमाने पुढे जाण्याची ओढ आपल्याला लागेल.
आज आपल्या ‘तहाने’वर चिंतन करा. पोकळ आश्वासनांवर आपले आयुष्य वाया घालवू नका. सांसारिक आसक्तीत अडकू नका. देवाचा शोध घ्या. त्याच्या मुखदर्शनाची आस धरा. त्याची इच्छा काय आहे ते जाणून घ्या आणि त्याचा गौरव अनुभवण्याचा प्रयत्न करा. मग ही तळमळ तुम्हाला ज्या वाटेने नेईल, त्या वाटेवरून मागे फिरावेसे तुम्हाला कधीच वाटणार नाही.
हे येशू, माझ्या जिवंत देवा, एके दिवशी मला तुझ्या संपूर्ण तेजाचे आणि गौरवाचे दर्शन घडो. मला तुझे मुख पाहता येवो आणि तेच ध्येय माझ्या जीवनाचे केंद्र बनो. या उत्कट इच्छेने माझे सारे अस्तित्व व्यापून जावो आणि या प्रवासाच्या आनंदात मला न्हाऊन निघता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्षमा करणे आणि क्षमा मिळणे
प्रायश्चित्तकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार
तो सेवक त्याच्या पाया पडला आणि त्याला वंदन करून म्हणाला, “मला थोडी उसंत द्या; मी तुमचे सगळे देणे फेडीन.” त्या सेवकाच्या मालकाला त्याची दया आली. त्याने त्याला जाऊ दिले आणि त्याचे कर्ज माफ केले. मत्तय 18:26–27
ही कथा क्षमा करण्याबद्दल आणि क्षमा मिळण्याबद्दल आहे. विशेष म्हणजे, क्षमा मागण्यापेक्षा क्षमा करणे अनेकदा सोपे असते. मनापासून क्षमा मागण्यासाठी आपण आपले पाप प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे, आणि ते करणे कठीण असते. आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारणे सोपे नसते.
या दाखल्यात कर्ज फेडण्यासाठी मुदत मागणारा सेवक प्रामाणिक वाटतो. तो आपल्या धन्याच्या ‘पाया पडला’ आणि त्याने दयेची व मुदतीची याचना केली. धन्यानेही दया दाखवून त्याचे संपूर्ण कर्ज माफ केले. सेवकाने जे मागितले होते, त्याहूनही अधिक त्याला मिळाले.
पण तो सेवक खरोखरच प्रामाणिक होता की त्याने फक्त चांगले नाटक केले? त्याने नाटकच केले असे दिसते. कारण त्याचे एवढे मोठे कर्ज माफ होताच त्याला एक असा माणूस भेटला, ज्याच्याकडून त्याला खरोखरच पैसे येणे होते. पण स्वतःला मिळाली तशी क्षमा त्याला देण्याऐवजी, “त्याने त्याला पकडले, त्याचा गळा दाबू लागला आणि म्हणाला, ‘माझे देणे फेड.’”
क्षमा खरी असेल, तर तिचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर झाला पाहिजे. आपण क्षमा मागितली पाहिजे, इतरांना क्षमा केली पाहिजे, मिळालेली क्षमा स्वीकारली पाहिजे आणि पुन्हा इतरांना क्षमा केली पाहिजे. विचार करण्यासारखे काही मुद्दे असे आहेत:
तुम्ही स्वतःचे पाप प्रामाणिकपणे ओळखू शकता का, त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का आणि तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला “मला माफ करा” असे म्हणू शकता का?
तुम्हाला क्षमा मिळते तेव्हा तुमच्यात काय बदल होतो? त्यामुळे तुम्ही इतरांशी अधिक दयाळूपणे वागता का?
देवाकडून आणि इतरांकडून ज्या प्रमाणात क्षमा व दया मिळावी अशी तुम्ही आशा करता, त्याच प्रमाणात तुम्हीही इतरांना क्षमा करू शकता आणि त्यांच्यावर दया दाखवू शकता का?
या सर्व प्रश्नांना तुम्ही ‘हो’ असे उत्तर देऊ शकत नसाल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी लिहिली आहे. दया आणि क्षमा या देणग्यांमध्ये तुमची वाढ व्हावी, यासाठी ती लिहिली आहे. या प्रश्नांना सामोरे जाणे कठीण आहे; पण राग आणि मनात साचलेल्या कटुतेच्या ओझ्यातून मुक्त व्हायचे असेल, तर त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे. राग आणि कटुता यांचे ओझे आपल्याला दबवून टाकते, आणि त्यातून आपण मुक्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे.
आज वरील प्रश्नांवर मनन करा आणि प्रार्थनापूर्वक आपल्या कृतींचे परीक्षण करा. यांपैकी एखाद्या प्रश्नाला सामोरे जाण्यास तुमचे मन तयार नसेल, तर ज्या गोष्टीने तुम्ही अस्वस्थ होता तिच्याकडे लक्ष द्या. ती गोष्ट प्रार्थनेत देवासमोर मांडा आणि जीवनाच्या त्या भागात अधिक खोल परिवर्तन घडवण्यासाठी देवाच्या कृपेला तुमच्या अंतःकरणात कार्य करू द्या.
हे दयाळू प्रभू, मी माझे पाप कबूल करतो. पण तुझ्या विपुल कृपेच्या आणि दयेच्या प्रकाशात ते कबूल करतो. माझ्या जीवनात तुझी दया स्वीकारताना मलाही इतरांशी तितकेच दयाळूपणे वागायला शिकव. काहीही मनात न ठेवता, मोकळ्या मनाने आणि पूर्णपणे क्षमा करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
देवाची नियोजित वेळ
प्रायश्चित्तकाळातील तिसऱ्या आठवड्याचा बुधवार
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “नियमशास्त्र किंवा संदेष्टे यांना रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यासाठी नव्हे, तर परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे.” मत्तय 5:17
कधीकधी देव फार हळू… अगदीच हळू कार्य करतो असे वाटते. आपल्या जीवनात देवाने ठरवलेल्या वेळेची धीराने वाट पाहणे आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी कठीण गेले असेल. आपल्यालाच काय योग्य ते अधिक चांगले कळते आणि आपण जरा अधिक आर्ततेने प्रार्थना केली की देवाला कृती करायला भाग पाडू आणि शेवटी तो आपल्या मागण्याप्रमाणे करील, असे सहज वाटते. पण देव अशा रीतीने कार्य करत नाही.
वरील पवित्र शास्त्रवचनातून देवाच्या कार्यपद्धतीची थोडी झलक आपल्याला मिळते. देवाचे कार्य संथ गतीने पण सातत्याने पुढे जाते आणि ते परिपूर्ण असते. येशू ‘नियमशास्त्र आणि संदेष्टे’ यांचा उल्लेख करून सांगतो की तो त्यांना रद्द करण्यासाठी नव्हे, तर परिपूर्ण करण्यासाठी आला आहे. हे खरे आहे. पण हे कसे घडले, ते नीट पाहण्यासारखे आहे.
हे अनेक हजार वर्षांच्या काळात घडून आले. देवाची परिपूर्ण योजना उलगडायला वेळ लागला. पण ती देवाने ठरवलेल्या वेळी आणि त्याच्या पद्धतीने उलगडली. कदाचित जुन्या कराराच्या काळातील सर्व जण मशीहा येऊन सर्व गोष्टी पूर्ण करील, याची आतुरतेने वाट पाहत होते. एकामागून एक संदेष्टे आले आणि गेले, आणि ते मशीहाच्या भावी आगमनाकडे लक्ष वेधत राहिले. जुन्या करारातील नियमशास्त्रही मशीहाच्या आगमनासाठी देवाच्या लोकांना तयार करण्याचे एक साधन होते. पण ही प्रक्रियाही हळूहळू घडली: नियमशास्त्र आकाराला आले, ते इस्राएलच्या लोकांसाठी लागू करण्यात आले, त्यांना ते समजून घेता आले आणि मग ते त्यानुसार जगू लागले.
अखेर मशीहा आला, तेव्हाही अनेकांना उत्साहाच्या आणि आवेशाच्या भरात वाटत होते की त्याने तिथल्या तिथे सर्व काही पूर्ण करावे. आपले पृथ्वीवरील राज्य प्रस्थापित व्हावे आणि नुकतेच सापडलेल्या मशीहाने आपल्या राज्याची सूत्रे हाती घ्यावीत, अशी त्यांची इच्छा होती!
पण देवाची योजना मानवी शहाणपणाच्या कल्पनांपेक्षा कितीतरी वेगळी होती. त्याचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा कितीतरी उंच होते. आणि आजही त्याचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा कितीतरी उंच आहेत! जुन्या करारातील नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची वचने यांतील प्रत्येक गोष्ट येशूने पूर्ण केली, पण अनेकांना अपेक्षित होती त्या रीतीने नव्हे.
यातून आपण काय शिकतो? यातून आपण खूप संयम बाळगायला शिकतो. तसेच देवाला शरण जायला, त्याच्यावर विश्वास ठेवायला आणि आशा बाळगायला शिकतो. आपल्याला कळकळीने आणि चांगली प्रार्थना करायची असेल, तर ती योग्य रीतीने केली पाहिजे. प्रार्थना करण्याची योग्य रीत म्हणजे सतत असे म्हणणे: तुझी इच्छा पूर्ण होवो! हेही सुरुवातीला कठीण असते. पण आपल्या जीवनासाठी आणि आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संघर्षासाठी व परिस्थितीसाठी देवाकडे नेहमीच परिपूर्ण योजना असते, हे समजून त्यावर विश्वास ठेवला की ते सोपे होते.
आज, प्रभूच्या मार्गांवर तुमचा किती विश्वास आहे आणि तुम्ही किती धीर धरता, यावर मनन करा. तुमच्या जीवनासाठी त्याच्याकडे एक परिपूर्ण योजना आहे आणि ती बहुधा तुमच्या योजनेपेक्षा वेगळी आहे. त्याला शरण जा आणि त्याच्या पवित्र इच्छेला प्रत्येक गोष्टीत तुमचे मार्गदर्शन करू द्या.
हे माझ्या परिपूर्ण प्रभू, माझे जीवन मी तुझ्या हाती सोपवतो. माझ्यासाठी आणि तुझ्या सर्व प्रिय लेकरांसाठी तुझ्याकडे परिपूर्ण योजना आहे, असा मला विश्वास आहे. तुझी वाट पाहण्याचा आणि माझ्या जीवनात तुझी दैवी इच्छा तुलाच पूर्ण करू देण्याचा संयम मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे!
देवाचे वचन मोकळेपणाने सांगणे
प्रायश्चित्तकाळातील तिसऱ्या आठवड्याचा गुरुवार
येशू एका मुक्या दुष्ट आत्म्याला बाहेर काढत होता. तो दुष्ट आत्मा बाहेर पडल्यावर तो मुका मनुष्य बोलू लागला आणि जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. लूक 11:14
देवाचे वचन उघडपणे, प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगण्यात तुम्हाला कोणती अडचण येते? कितीतरी लोकांना शुभवर्तमानाची नितांत गरज आहे. कितीतरी लोक जीवनात गोंधळून गेले आहेत आणि चुकीच्या वाटेने चालत आहेत. ती वाट त्यांना आणखी गोंधळाकडे आणि विनाशाकडे नेते. ते त्या वाटेने जात असताना आपण मात्र गप्प राहतो. का?
वरील शुभवर्तमानात एका माणसाविषयी सांगितले आहे. एका दुष्ट आत्म्यामुळे त्याला बोलता येत नव्हते. येशूने त्या दुष्ट आत्म्याला हाकलून दिल्यावर तो मुका माणूस बोलू लागला आणि अनेकांना आश्चर्य वाटले. बहुधा तो माणूस त्या दुष्ट आत्म्याच्या पूर्ण ताब्यात होता आणि त्याच्या जाचामुळे त्याला बोलताही येत नव्हते. त्या दुष्ट आत्म्याच्या प्रभावातून मुक्त होताच तो मोकळेपणाने बोलू लागला.
दुष्ट आत्म्यांचा प्रभाव आपल्याला तितक्या तीव्रतेने जाणवत नसला, तरी आपली वाचा रोखणारे असेच आत्मे अनेकदा आपल्याला अडवतात आणि त्रास देतात. देवाचा संदेश ज्यांना ऐकण्याची सर्वांत जास्त गरज आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहोचावा अशी देवाची इच्छा आहे. पण त्यांना शुभवर्तमान मोकळेपणाने, मनापासून आणि विलंब न करता सांगायला आपल्याला भीती वाटावी, असा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न तो दुष्ट अनेकदा करतो. दुसऱ्या कोणाला आपल्या श्रद्धेविषयी सांगण्याची संधी मिळते, तेव्हा हे ‘वाचा रोखणारे आत्मे’ अनेकदा आपल्याला अडवतात, गोंधळात टाकतात किंवा आपल्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करतात. आपण त्यांच्या पूर्ण ताब्यात जाणे दुर्मीळ असले, तरी अनेकदा त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि ते आपल्या आड येतात.
हे दुष्ट आत्मे खरोखर आहेत आणि कितीतरी लोकांना ऐकण्याची गरज असलेला सत्याचा संदेश आपण सांगू नये म्हणून ते आपल्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतात, यावर आज चिंतन करा. त्यांच्या प्रभावाला आपण घाबरू नये. अशा सर्व आत्म्यांवर येशूचा पूर्ण अधिकार आहे. आपण त्याला तसे करू दिले, तर तो आपल्यावरचा त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यास मागेपुढे पाहणार नाही. आपण त्याच्या प्रेमाचा संदेश कोणताही संकोच न बाळगता सांगावा, यासाठी त्याला आपल्याला मुक्त करायचे आहे, जेणेकरून इतरांना त्याची आणि त्याच्या परिपूर्ण प्रेमाची ओळख होईल. सत्य आणि प्रेम यांचे साधन म्हणून त्याला तुमचा उपयोग करू द्या.
हे देवाच्या सनातन वचना, गरजू लोकांना तुझ्या प्रेमाचे शब्द सांगण्यासाठी तू मला बोलावतोस, तेव्हा कधीकधी भीती माझ्यावर मात करते. काय बोलावे हे मला सुचत नाही आणि जणू माझी वाचाच बंद होते. हे प्रिय प्रभू, मला या भीतीतून मुक्त कर, म्हणजे मी तुझ्या वचनाचे पवित्र साधन होईन आणि ज्यांना तुझ्या सत्याची फार गरज आहे, त्यांच्यापुढे ते धैर्याने जाहीर करीन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सर्वांत श्रेष्ठ कृती करण्यास उशीर करू नका!
प्रायश्चित्तकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवार
एका शास्त्र्याने येशूकडे येऊन त्याला विचारले, “सर्व आज्ञांमध्ये पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “पहिली आज्ञा ही आहे: हे इस्राएला, ऐक! प्रभू आपला देव हाच एकमेव प्रभू आहे! तू आपला देव प्रभू ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण सामर्थ्याने प्रेम कर.” मार्क 12:28–30
आपल्या संपूर्ण अस्तित्वाने देवावर प्रेम करणे ही जीवनात तुम्ही करू शकणारी सर्वांत श्रेष्ठ कृती आहे, याचे तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. म्हणजेच, त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करणे. आपल्या सर्व मानवी क्षमता पणाला लावून देवावर सर्वांपेक्षा अधिक प्रेम करणे, हेच ध्येय साधण्यासाठी तुम्ही आयुष्यभर झटले पाहिजे. पण याचा नेमका अर्थ काय?
सर्वप्रथम, प्रेमाची ही आज्ञा आपल्या अस्तित्वाच्या विविध अंगांचा उल्लेख करते. त्यातून ती अधोरेखित करते की आपल्या अस्तित्वाचे प्रत्येक अंग देवावर संपूर्णपणे प्रेम करण्यासाठी अर्पण केले पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्या अस्तित्वाची ही विविध अंगे अशी सांगता येतील: बुद्धी, इच्छाशक्ती, आवेग, भावना, भावावेग आणि इच्छा. या सर्व अंगांनी आपण देवावर प्रेम कसे करावे?
आपण सुरुवात आपल्या बुद्धीपासून करतो. देवावर प्रेम करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याला जाणून घेणे. याचा अर्थ असा की आपण देवाला आणि त्याच्याविषयी आपल्याला प्रकट झालेल्या सर्व गोष्टी समजून घेण्याचा, त्यांचा अर्थ उमजून घेण्याचा आणि त्यांवर श्रद्धा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच, विशेषतः पवित्र शास्त्राच्या आणि चर्चच्या इतिहासात दिलेल्या असंख्य प्रकटीकरणांच्या माध्यमातून देवाच्या जीवनाचे गूढ अधिक खोलवर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
दुसरे म्हणजे, देवाची आणि त्याने प्रकट केलेल्या सर्व गोष्टींची आपल्याला अधिक सखोल ओळख झाली की, त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचा आणि त्याच्या मार्गांनी चालण्याचा निर्णय आपण स्वेच्छेने घेतो. त्याची ओळख झाल्यानंतरच हा निर्णय घेतला पाहिजे, आणि तो त्याच्यावरील श्रद्धेची कृती ठरतो.
तिसरे म्हणजे, देवाच्या जीवनाचे रहस्य आपल्याला उलगडू लागले आणि त्याच्यावर व त्याने प्रकट केलेल्या सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवण्याचा निर्णय आपण घेतला, की आपले जीवन बदलताना आपल्याला दिसेल. आपल्या जीवनात एक ठळक बदल असा होईल: आपल्याला देवाची ओढ लागेल आणि त्याची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण व्हावी असे वाटेल. त्याचा अधिकाधिक शोध घ्यावासा वाटेल, त्याच्या मार्गाने चालण्यात आपल्याला आनंद मिळेल आणि हळूहळू आपल्या मानवी आत्म्याच्या सर्व शक्ती देवाच्या आणि त्याच्या मार्गांच्या प्रेमाने व्यापून जात आहेत, हे आपल्याला जाणवेल.
आज देवावर प्रेम करण्याच्या पहिल्या पैलूवर विशेष चिंतन करा. देवाला आणि त्याने प्रकट केलेल्या सर्व गोष्टींना जाणून घेण्याचा व समजून घेण्याचा तुम्ही किती मनापासून प्रयत्न करता, याचा विचार करा. या जाणिवेवरच तुम्ही संपूर्ण जीवाने देवावर करीत असलेले प्रेम आधारलेले असले पाहिजे. इथून सुरुवात करा आणि बाकीच्या गोष्टी त्यातून घडू द्या. यासाठी एक मार्ग म्हणजे आपल्या कॅथलिक श्रद्धेच्या सर्व अंगांचा अभ्यास सुरू करणे (पाहा: www.mycatholic.life).
हे प्रभू, तू स्वतःला माझ्यासमोर प्रकट करतोस. सर्वांपेक्षा अधिक प्रेम तुझ्यावर करण्यासाठी आधी तुला जाणून घेतले पाहिजे, हे मला उमगते. तुला जाणून घेण्याच्या माझ्या निश्चयाशी एकनिष्ठ राहण्यास आणि तुझ्या जीवनातील सर्व गौरवशाली सत्यांचा शोध घेण्यास मला मदत कर. तू मला जे काही प्रकट केले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझे जीवन आणि तू केलेले प्रकटीकरण अधिक सखोलपणे जाणून घेण्यासाठी आज मी स्वतःला समर्पित करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
अहंकार सोडून देणे
प्रायश्चित्तकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील शनिवार
“दोन जण प्रार्थना करण्यासाठी मंदिराच्या प्रांगणात गेले. त्यांपैकी एक परुशी होता आणि दुसरा जकातदार. परुशी आपल्या जागी उभा राहून मनात अशी प्रार्थना करू लागला, ‘हे देवा, मी तुझे आभार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा लोभी, अप्रामाणिक किंवा व्यभिचारी नाही; या जकातदारासारखाही नाही.’” लूक 18:10–11
अहंकार आणि आपणच नीतिमान असल्याची भावना या दोन्ही गोष्टी फार कुरूप आहेत. या शुभवर्तमानात स्वतःला नीतिमान समजणारा परुशी आणि नम्र जकातदार यांच्यातला फरक दिसतो. परुशी वरवर नीतिमान दिसतो. पण त्याला स्वतःचा इतका अभिमान आहे की देवापुढे प्रार्थना करतानाही तो स्वतःच्या चांगुलपणाची बढाई मारतो. आपण इतर लोकांसारखे नाही, म्हणून तो देवाचे आभार मानतो. बिचारा परुशी! आपण सत्याकडे किती आंधळे आहोत, याची त्याला कल्पनाही नाही.
पण जकातदार सत्य बोलतो; तो नम्र आणि प्रामाणिक आहे. त्याने कळवळून विनवणी केली, “हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर.” येशू स्पष्ट सांगतो की या नम्र प्रार्थनेमुळे जकातदार देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरून घरी गेला, पण परुशी नीतिमान ठरला नाही.
दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा आणि नम्रता पाहिली की आपल्या मनाला स्पर्श होतो. असे दृश्य प्रेरणादायी असते. स्वतःचे पाप कबूल करून क्षमा मागणाऱ्या व्यक्तीवर टीका करणे कठीण असते. अशा नम्रतेने अगदी कठोर अंतःकरणही जिंकता येते.
मग तुमचे काय? हा दाखला तुम्हाला उद्देशून आहे का? आपणच नीतिमान आहोत, या समजुतीचे जड ओझे तुम्ही वाहता का? थोड्याफार प्रमाणात आपण सगळेच ते वाहतो. त्या जकातदारासारखी खरी नम्रता अंगी बाणवणे कठीण आहे. उलट, स्वतःच्या पापाचे समर्थन करण्याच्या सापळ्यात अडकणे आणि त्यामुळे स्वतःची बाजू सावरत स्वतःतच गुंतून राहणे किती सोपे आहे! पण हे सगळे अहंकारातून येते. दोन गोष्टी आपण नीट केल्या, तर अहंकार नाहीसा होतो.
पहिली गोष्ट म्हणजे देवाची दया समजून घेणे. देवाची दया समजली की आपले लक्ष केवळ स्वतःवर केंद्रित राहत नाही. आपणच नीतिमान आहोत ही भावना आणि स्वतःच्या वागण्याचे समर्थन करण्याची सवय बाजूला ठेवता येते. स्वतःची बाजू सावरण्याची गरज उरत नाही आणि सत्याच्या प्रकाशात आपण स्वतःकडे पाहू शकतो. का? कारण देवाची दया खरोखर कशी आहे हे उमगले की आपली पापेसुद्धा आपल्याला देवापासून दूर ठेवू शकत नाहीत, हेही लक्षात येते. खरे तर, पापी जितका मोठा, तितका तो देवाच्या दयेस अधिक पात्र असतो! म्हणूनच देवाची दया समजून घेतल्याने आपल्याला आपले पाप कबूल करता येते.
आपला अहंकार नाहीसा व्हावा असे आपल्याला वाटत असेल, तर आपले पाप कबूल करणे हे आपण उचलले पाहिजे असे दुसरे महत्त्वाचे पाऊल आहे. आपले पाप कबूल करण्यात काही गैर नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. याचा अर्थ रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून आपल्या पापाचे तपशील सर्वांना सांगायचे, असा नाही. पण आपण आपले पाप स्वतःपाशी आणि देवासमोर मान्य केले पाहिजे, विशेषतः पापस्वीकारात. काही वेळा इतरांकडेही आपली पापे कबूल करणे आवश्यक ठरेल, जेणेकरून आपण त्यांच्याकडे क्षमा आणि दया मागू शकू. अशी खोल नम्रता इतरांना भावते आणि सहज त्यांची मने जिंकते. ती प्रेरणा देते आणि आपल्या अंतःकरणात शांती व आनंद ही चांगली फळे निर्माण करते.
म्हणून या जकातदाराच्या उदाहरणाचे अनुसरण करण्यास घाबरू नका. आज त्याची प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणण्याचा प्रयत्न करा. ती तुमची स्वतःची प्रार्थना होऊ द्या; मग या प्रार्थनेची चांगली फळे तुम्हाला तुमच्या जीवनात दिसतील!
हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर. हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर. हे देवा, माझ्यासारख्या पाप्यावर दया कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध
