साध्या गोष्टींतून मिळणारी कृपा
प्रायश्चित्तकाळातील चौथा रविवार (वर्ष अ)
(टीप: वर्ष ब & क मध्ये बाप्तिस्मार्थींचे आत्मपरीक्षण विधी होतात तेव्हा हे शुभवर्तमानही पर्याय म्हणून वाचता येते.)
येशू वाटेने जात असताना त्याला जन्मापासून आंधळा असलेला एक मनुष्य दिसला… तो जमिनीवर थुंकला, त्याने लाळेने चिखल केला, तो चिखल त्या मनुष्याच्या डोळ्यांवर लावला आणि त्याला म्हणाला, “जा, शिलोआमच्या कुंडात डोळे धू.” ‘शिलोआम’ म्हणजे ‘पाठवलेला’. तेव्हा तो गेला, त्याने डोळे धुतले आणि त्याला दिसू लागले; मग तो परत आला. योहान 9:1, 6–7
हा मनुष्य कोण होता? विशेष म्हणजे, त्याचे नाव दिलेले नाही. त्याचा उल्लेख फक्त ‘जन्मापासून आंधळा असलेला मनुष्य’ असा केला आहे. योहानाच्या शुभवर्तमानात ही बाब अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ, ‘विहिरीजवळच्या स्त्रीच्या’ कथेतही तिचे नाव दिलेले नाही. या मनुष्याचे नाव दिलेले नाही, यातून आपण या कथेत स्वतःला पाहावे, असे सूचित होते.
आपल्या सभोवताली देवाचा हात कसा कार्यरत आहे, हे आपल्याला दिसत नाही, हेच आपले ‘आंधळेपण’ आहे. आपल्या आणि इतरांच्या जीवनात देवाची कृपा दररोज जे चमत्कार घडवते, ते पाहणे आपल्याला कठीण जाते. म्हणून पवित्र शास्त्रातील हा उतारा वाचताना सर्वप्रथम आपली दृष्टी किती कमी पडते, हे ओळखण्याचा प्रयत्न करूया. देवाचे कार्य कितीतरी वेळा आपल्या नजरेस पडत नाही, हे आपण जाणून घेतले पाहिजे. या जाणिवेतून आध्यात्मिक आरोग्य लाभावे, अशी इच्छा आपल्या मनात जागी होईल. देवाचे कार्य पाहण्याची आसही आपल्यात निर्माण होईल.
आनंदाची बातमी हीच आहे की येशूने या मनुष्याला बरे केले आणि तो आपल्यालाही बरे करण्यास तयार आहे. दृष्टी परत देणे येशूसाठी सोपे आहे. म्हणून या कथेतून प्रेरणा घेऊन आपण सर्वप्रथम एवढीच प्रार्थना करावी: “प्रभू, मला पाहायचे आहे!” आपले आंधळेपण नम्रपणे ओळखले, तर देवाच्या कृपेला आपल्यात कार्य करण्यास वाव मिळेल. पण आपण आपले आंधळेपण नम्रपणे मान्य केले नाही, तर बरे होण्यासाठी त्याच्याकडे वळू शकणार नाही.
येशूने या मनुष्याला ज्या रीतीने बरे केले, तीही महत्त्वाची आहे. तो स्वतःच्या थुंकीने चिखल करतो आणि तो त्या मनुष्याच्या डोळ्यांवर लावतो. हे प्रथमदर्शनी फारसे सुखावह वाटत नाही. पण यातून एक फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळते: येशू अगदी साध्यासुध्या गोष्टीतूनही आपली दैवी कृपा देऊ शकतो!
या प्रसंगाकडे प्रतीक म्हणून पाहिले, तर त्यातून आपल्याला काही गहन सत्ये उमगतात. आपण बहुतेकदा देवाचे कार्य असामान्य गोष्टींत शोधतो. पण तो कितीतरी वेळा अगदी साध्या गोष्टींत आपल्याजवळ असतो. प्रेमाच्या किंवा त्यागाच्या एखाद्या असामान्य कृतीतूनच देवाची कृपा कार्य करते, असे आपल्याला वाटू शकते. आपल्या रोजच्या साध्या कामांतून देव चमत्कार घडवू शकत नाही, असेही कदाचित आपल्याला वाटेल. पण ते खरे नाही. जीवनातल्या अशा साध्यासुध्या कृतींतच देव उपस्थित असतो. भांडी घासताना, घरची कामे करताना, मुलाला गाडीने शाळेत सोडताना, घरच्यांपैकी कोणाबरोबर खेळताना, सहज गप्पा मारताना किंवा कोणाला मदतीचा हात देताना तो उपस्थित असतो. खरे तर, काम जितके साधे, तितकाच त्यात देवाचे कार्य पाहण्याचा आपण अधिक प्रयत्न करावा. आणि जीवनातल्या साध्या कामांत देवाचे कार्य जेव्हा आपल्याला खरोखर ‘दिसेल’, तेव्हा आपले आध्यात्मिक आंधळेपण दूर होईल.
आज येशूच्या या कृतीवर मनन करा. आपल्या प्रभूला त्याच्या थुंकीने केलेला चिखल तुमच्या डोळ्यांवर लावू द्या. आध्यात्मिक दृष्टीची देणगी त्याला तुम्हाला देऊ द्या. तुमच्या जीवनात त्याची उपस्थिती तुम्हाला दिसू लागेल, तेव्हा जे सौंदर्य तुमच्या नजरेस पडेल, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.
हे चमत्कार करणाऱ्या माझ्या प्रभू, मला पाहायचे आहे. माझे आंधळेपण दूर होऊ दे. माझ्या जीवनातील प्रत्येक साध्या कृतीत तू कसा कार्यरत आहेस, हे मला पाहू दे. माझ्या दिवसातील अगदी लहानसहान घटनांतही तुझी दैवी कृपा मला दिसू दे. तू जिवंत आहेस आणि कार्यरत आहेस, हे मला दिसू लागेल तेव्हा या दृष्टीबद्दल माझे हृदय कृतज्ञतेने भरून टाक. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
संपूर्ण सुवार्तेचा सारांश
प्रायश्चित्तकाळातील चौथा रविवार (वर्ष ब)
“कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणाचाही नाश होऊ नये, तर त्याला शाश्वत जीवन मिळावे.” योहान 3:16
योहानाच्या शुभवर्तमानातील पवित्र शास्त्राचा हा उतारा अनेकांच्या परिचयाचा आहे. क्रीडा सामन्यांसारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांत ‘योहान: 3:16’ असे लिहिलेला फलक उंच धरलेली एखादी व्यक्ती आपल्याला अनेकदा दिसते. कारण या उताऱ्यात संपूर्ण शुभवर्तमानाचा सारांश साध्या पण स्पष्ट शब्दांत दिला आहे.
या शास्त्रभागातून आपल्याला चार मूलभूत सत्ये समजतात. त्यांपैकी प्रत्येकाचा थोडक्यात विचार करूया.
पहिली गोष्ट यात स्पष्ट होते, ती म्हणजे स्वर्गातील पिता आपल्यावर प्रेम करतो. हे आपल्याला माहीत आहे, पण या सत्याची खोली आपल्याला कधीच पूर्णपणे उमगणार नाही. देवपित्याचे आपल्यावरचे प्रेम गहिरे आणि परिपूर्ण आहे. जीवनात आपण अनुभवू शकू अशा कोणत्याही गोष्टीपेक्षा हे प्रेम अधिक खोल आहे. त्याचे प्रेम परिपूर्ण आहे.
दुसरे म्हणजे, पित्याने आपल्याला आपला पुत्र येशू दिला आणि या देणगीतून त्याचे प्रेम प्रकट झाले. पित्याने आपला पुत्र आपल्याला देणे ही त्याच्या अपार प्रेमाची अभिव्यक्ती आहे. पुत्र हाच पित्याचे सर्वस्व होता. म्हणून पुत्राला आपल्याला देऊन पिता आपल्याला आपले सर्वस्व देतो. येशूच्या व्यक्तीतून तो आपले स्वतःचे जीवनच आपल्याला देतो.
तिसरे म्हणजे, अशा देणगीला आपण देऊ शकणारा एकमेव योग्य प्रतिसाद म्हणजे श्रद्धा. पुत्राला आपल्या जीवनात स्वीकारल्याने आपले जीवन बदलू शकते, यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. आपल्याला जे काही आवश्यक आहे ते सर्व या देणगीतून मिळते, हे आपण ओळखले पाहिजे. पुत्राच्या कार्यावर श्रद्धा ठेवून आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपले जीवन त्याला अर्पण करून आपण त्याला आपल्या जीवनात स्वीकारले पाहिजे.
चौथे म्हणजे, त्याला स्वीकारून आणि प्रत्युत्तर म्हणून आपले जीवन त्याला अर्पण करून आपले तारण होते. आपल्या पापांत आपला नाश होणार नाही; उलट, आपल्याला अनंत जीवन दिले जाईल. पुत्राशिवाय तारणाचा दुसरा कोणताही मार्ग नाही. हे सत्य आपण जाणून घेतले पाहिजे, त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, ते स्वीकारले पाहिजे आणि मनापासून आपलेसे केले पाहिजे.
आज संपूर्ण सुवार्तेच्या या सारांशावर चिंतन करा. तो पुन्हा पुन्हा वाचा आणि पाठ करा. प्रत्येक शब्दाचा आस्वाद घ्या आणि हे लक्षात ठेवा की पवित्र शास्त्रातील हा छोटासा उतारा मनापासून स्वीकारताना तुम्ही देवाचे संपूर्ण सत्य स्वीकारत आहात.
हे स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त येशू या परिपूर्ण देणगीबद्दल मी तुझे आभार मानतो. येशूला आम्हाला देताना तू आम्हाला तुझे हृदय आणि आत्मा देतोस. माझ्या जीवनात तुला आणि येशूच्या परिपूर्ण देणगीला अधिक पूर्णपणे स्वीकारण्यास माझे अंतःकरण खुले होऊ दे. हे माझ्या देवा, माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. कृपा करून माझी श्रद्धा आणि माझे प्रेम वाढव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
भानावर येणे
प्रायश्चित्तकाळातील चौथा रविवार (वर्ष क)
भानावर आल्यावर तो मनात म्हणाला, “माझ्या वडिलांच्या कितीतरी मजुरांना खाऊन उरेल इतके अन्न मिळते, आणि मी मात्र इथे उपाशी मरत आहे. मी उठून माझ्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी आता पात्र नाही; तुमच्या मजुरांपैकी एकाला जसे वागवता, तसे मला वागवा.’” लूक 15:17–19
आपण आपल्या पापांना का चिकटून राहतो? हा उतारा उधळ्या पुत्राच्या दाखल्यातून घेतला आहे. हा दाखला आपल्याला चांगला ठाऊक असायला हवा. त्या मुलाने आपल्या वाट्याचा वारसा आधीच घेऊन वडिलांना सोडून जाण्याचे ठरवले आणि तो सारा पैसा पापमय जीवन जगण्यात उधळला. त्याच्याजवळचा पैसा संपला तेव्हा त्याची फार दयनीय अवस्था झाली. मग त्याने काय केले? तो भानावर आला!
ही एक ओळही चिंतन करण्यासारखी आहे. सर्वप्रथम, पापमय जीवनात गुरफटलेल्या माणसाचे काय होते, हे ती दाखवते. शेवटी त्या मुलाला आपल्या पापाचे फळ भोगावे लागले. पापामुळे आपण कंगाल आणि एकटे पडलो आहोत, हे त्याच्या लक्षात आले. कोणाकडे जावे, हेही त्याला कळत नव्हते. आपली पापे त्या मुलाच्या पापांइतकी गंभीर नसली, तरी त्याच्याप्रमाणेच आपणही आपल्या पापांमुळे येणारी पोकळी अनुभवू.
या मुलाकडून आपल्याला मिळणारी महत्त्वाची शिकवण ही की तो खरोखर भानावर आला. ‘भानावर आल्यावर’ त्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी उमगल्या. पहिली म्हणजे, अशा दीनवाण्या अवस्थेत जगण्यापेक्षा आपले जीवन अधिक मोलाचे आहे, हे त्याला जाणवले. दारिद्र्याने आणि पोकळीने भरलेले जीवन जगण्याची वेळ कोणावरही येऊ नये. स्वतःचा मान ओळखल्यावर, आपली निर्मिती याहून अधिक अर्थपूर्ण जीवनासाठी झाली आहे, हे त्याला उमगले.
दुसरे म्हणजे, आपण आपल्या वडिलांकडे परत जाऊ शकतो, हे त्याला माहीत होते. ही जाणीव त्याच्यासाठी किती मोठी आशीर्वादाची गोष्ट होती! आपल्या वडिलांचे आपल्यावर निरपेक्ष प्रेम आहे, हे त्याला स्पष्टपणे दिसत होते. म्हणूनच आपण त्यांच्याकडे परत जाऊ शकतो, हे त्याला माहीत होते. वडिलांच्या अंतःकरणातील दया इतकी गाढ होती की मुलाला ती जाणवत होती, आणि त्या जाणिवेने त्याला वडिलांकडे परत जाण्याचा धीर दिला.
आज या दोन गोष्टींवर चिंतन करा. त्या मुलाला स्वतःची दयनीय अवस्था दिसते आणि आपण निःसंकोचपणे वडिलांकडे जाऊ शकतो, हेही त्याला उमगते. आपणही आपल्या जीवनात असेच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वर्गीय पिता आपल्याला कधीही नाकारणार नाही. आपण काहीही केले असले किंवा त्याच्यापासून कितीही दूर गेलो असलो, तरी पित्याचे प्रेम परिपूर्ण आहे, ते कधी आटत नाही, ते निरपेक्ष आहे आणि ते आपल्याला सदैव त्याच्याकडे बोलावते. आपण फक्त विश्वासाने त्याच्याकडे वळलो, तर आपण केलेल्या प्रत्येक चुकीची क्षमा करण्यास तो तयार आहे आणि ती करायला तो उत्सुक आहे. भानावर या आणि आपली पापे ओळखा! ती सोडून द्या, पश्चात्ताप करून देवाकडे वळा आणि त्याच्या दयेवर विश्वास ठेवा.
हे परिपूर्ण प्रेमाच्या प्रभू, माझ्या पापांमुळे माझे अंतःकरण खरोखरच कोरडे आणि रिकामे होते. माझ्या पापमय निवडींमुळे किती दुःख आणि वेदना निर्माण होतात, हे मला दिसते. हे प्रिय प्रभू, मला भानावर येण्यास आणि मी करीत असलेल्या प्रत्येक पापापासून दूर वळण्यास मदत कर. मी केलेल्या कोणत्याही पापापेक्षा तुझी दया कितीतरी मोठी आहे, हे मला जाणू दे. तुझ्या परिपूर्ण प्रेमाबद्दल मी तुझे आभार मानतो आणि माझ्या गरजेच्या वेळी तुझ्याकडे वळतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
एक लक्षवेधी चमत्कार
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा सोमवार
येशू त्याला म्हणाला, “चिन्हे आणि अद्भुत कृत्ये पाहिल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवणार नाही.” तो राजाधिकारी त्याला म्हणाला, “महाराज, माझे मूल मरण्यापूर्वी खाली या.” येशू त्याला म्हणाला, “तुम्ही जाऊ शकता; तुमचा मुलगा जगेल.” योहान 4:48–50
खरोखरच तो मुलगा वाचतो. घरी परतल्यावर आपला मुलगा बरा झाला आहे हे पाहून त्या राजाधिकाऱ्याला अतिशय आनंद होतो. येशूने तो बरा होईल असे सांगितले, त्याच वेळी तो बरा झाला.
या उताऱ्यात येशूच्या बोलण्यात दिसणारा विरोधाभास लक्षवेधी आहे. “चिन्हे आणि अद्भुत कृत्ये पाहिल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवणार नाही,” असे तो म्हणतो तेव्हा, प्रथमदर्शनी तो जणू रागावला आहे असे वाटते. पण लगेचच तो त्या माणसाला, “तुमचा मुलगा जगेल,” असे सांगून मुलाला बरे करतो. येशूच्या शब्दांत आणि कृतीत असा विरोधाभास का दिसतो?
येशूचे सुरुवातीचे शब्द ही टीका नव्हे; तो केवळ वस्तुस्थिती सांगतो, हे आपण लक्षात घ्यायला हवे. अनेकांमध्ये श्रद्धा नाही, किंवा असली तरी ती दुर्बल आहे, हे त्याला माहीत आहे. “चिन्हे आणि अद्भुत कृत्ये” कधीकधी लोकांना विश्वास ठेवण्यास मदत करतात, हेही त्याला माहीत आहे. “चिन्हे आणि अद्भुत कृत्ये” पाहण्याची गरज भासणे ही काही आदर्श स्थिती नाही, तरीही येशू त्या गरजेचा उपयोग करतो. चमत्कार पाहण्याच्या या इच्छेचा उपयोग तो श्रद्धेची देणगी देण्यासाठी करतो.
इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे: मुलाला शारीरिक व्याधीतून बरे करणे हे येशूचे अंतिम ध्येय नव्हते, जरी ती त्याच्या अपार प्रेमाची कृती होती. उलट, मुलाला आरोग्याची देणगी देऊन त्या पित्याची श्रद्धा वाढवणे हे त्याचे अंतिम ध्येय होते. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्या जीवनात प्रभूकडून येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचा उद्देश आपली श्रद्धा अधिक दृढ करणे हाच असतो. कधी हा अनुभव ‘चिन्हे आणि अद्भुत कृत्ये’ यांच्या रूपाने येतो, तर कधी परीक्षेच्या काळात कोणतेही दिसणारे चिन्ह किंवा अद्भुत कृत्य नसतानाही प्रभूची उपस्थिती आपल्याला आधार देते. श्रद्धा वाढवणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. त्यासाठी आपल्या जीवनात प्रभू जे काही करतो, त्यातून आपली श्रद्धा वाढू दिली पाहिजे.
आज आपली श्रद्धा किती दृढ आहे आणि प्रभूवर आपला किती भरवसा आहे, यावर चिंतन करा. देव तुमच्या जीवनात कसा कार्य करतो हे ओळखण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याच्या कृतींमुळे तुमची श्रद्धा वाढेल. त्याला धरून राहा, तो तुमच्यावर प्रेम करतो असा विश्वास ठेवा, तुम्हाला हवे असलेले उत्तर त्याच्याजवळ आहे हे जाणून घ्या आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा शोध घ्या. तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही.
हे माझ्या प्रेमळ प्रभू, कृपा करून माझी श्रद्धा वाढव. माझ्या जीवनात तू कसा कार्य करतोस हे पाहण्यास आणि सर्व गोष्टींत तुझे परिपूर्ण प्रेम शोधण्यास मला मदत कर. माझ्या जीवनातील तुझे कार्य पाहताना तुझ्या परिपूर्ण प्रेमाची मला अधिक खात्री पटू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पापामुळे आलेला पक्षाघात
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा मंगळवार
येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली चटई उचल आणि चालू लाग.” तो मनुष्य लगेच बरा झाला, त्याने आपली चटई उचलली आणि तो चालू लागला. योहान 5:8–9
वर दिलेल्या उताऱ्यातील एक स्पष्ट प्रतीकात्मक अर्थ पाहूया. येशूने ज्या मनुष्याला बरे केले, त्याला पक्षाघात झाला होता. त्याला चालता येत नव्हते आणि स्वतःची काळजीही घेता येत नव्हती. कोणीतरी आपल्याकडे लक्ष द्यावे आणि दयाळूपणे वागावे, या आशेने तो कुंडाजवळ बसला होता; पण इतरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. येशू त्याला पाहतो आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष देतो. थोडे बोलणे झाल्यावर येशू त्याला बरे करतो आणि उठून चालायला सांगतो.
यातून एक स्पष्ट प्रतीकात्मक संदेश मिळतो: त्या मनुष्याचा शारीरिक पक्षाघात हा आपल्या जीवनावर पापामुळे होणाऱ्या परिणामाचे चित्र आहे. जेव्हा आपण पाप करतो, तेव्हा आपण स्वतःलाच ‘अधू’ करतो. पापाचे आपल्या जीवनावर गंभीर परिणाम होतात. त्यांपैकी सर्वांत स्पष्ट परिणाम असा की आपल्याला उठून देवाच्या मार्गाने चालता येत नाही. विशेषतः गंभीर पापामुळे प्रेम करण्याची आणि खऱ्या स्वातंत्र्यात जगण्याची आपली शक्ती नाहीशी होते. आपण पापात असे अडकतो की आपल्याला स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घेता येत नाही, ना इतरांची कोणत्याही प्रकारे काळजी घेता येते. पापाचे परिणाम ओळखणे महत्त्वाचे आहे. अगदी किरकोळ पापेसुद्धा आपल्या क्षमतांवर मर्यादा आणतात, आपली शक्ती हिरावून घेतात आणि आपल्याला कमी-अधिक प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या अधू करतात.
हे तुम्हाला आधीच माहीत असेल आणि यात तुम्हाला काही नवीन वाटत नसेल, अशी आशा आहे. पण आज तुमच्याकडून ज्या पापांची चूक होत आहे, ती तुम्ही नव्याने आणि प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे. या प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिले पाहिजे. येशूने त्या माणसाला केवळ त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी बरे केले नाही. तुमच्या पापाचे परिणाम भोगताना तुम्ही ज्या खचलेल्या अवस्थेत आहात, त्या अवस्थेतही तो तुम्हाला पाहतो, हे तुम्हाला सांगणे हाही त्या माणसाला बरे करण्यामागचा एक हेतू होता. तुम्हाला मदतीची गरज आहे हे तो पाहतो, तुमच्याकडे पाहतो आणि तुम्हाला उठून चालायला सांगतो. येशूला तुमच्या जीवनात बरे करण्याचे कार्य करू देणे किती महत्त्वाचे आहे, हे कमी लेखू नका. ज्या पापाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागत आहेत, ते कितीही लहान असले तरी ते ओळखण्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या पापाकडे पाहा, ते येशूपासून लपवू नका आणि तुम्हाला बरे करणारे व मुक्त करणारे त्याचे शब्द ऐका.
आज या अपंग माणसाच्या येशूशी झालेल्या प्रभावी भेटीवर चिंतन करा. त्या प्रसंगात स्वतःला त्या माणसाच्या जागी पाहा आणि येशू तुम्हालाही असेच आरोग्यदान देतो, हे लक्षात घ्या. या प्रायश्चित्तकाळात तुम्ही अजून पापस्वीकार केला नसेल, तर पापस्वीकारासाठी जा आणि त्या संस्कारात येशू देत असलेले आरोग्यदान अनुभवा. तुमची वाट पाहत असलेले स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग म्हणजे पापस्वीकार, विशेषतः जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे आणि काहीही न लपवता आपली पापे कबूल करता.
हे परमदयाळू प्रभू, कृपा करून माझ्या पापांची मला क्षमा कर. माझी पापे मला दिसावीत आणि त्यांचे माझ्यावर होणारे परिणाम मी मान्य करावेत, अशी माझी इच्छा आहे. या ओझ्यांतून मला मुक्त करावे आणि जिथून ही दुःखे उद्भवतात तिथेच मला बरे करावे, अशी तुझी इच्छा आहे, हे मला माहीत आहे. हे प्रभू, तुझ्यासमोर माझी पापे कबूल करण्याचे धैर्य मला दे, विशेषतः समेटाच्या संस्कारात. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
देवाशी ऐक्य
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार
येशूने यहुद्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजवर कार्य करत आहे, म्हणून मीही कार्य करत आहे.” त्यामुळे त्यांनी त्याला ठार मारण्याचा आणखी जास्त प्रयत्न केला. कारण त्याने शब्बाथाचा नियम मोडलाच, पण देवाला आपला स्वतःचा पिता म्हणत त्याने स्वतःला देवाच्या बरोबरीचेही ठरवले. योहान 5:17–18
येशूला ठार मारू पाहणाऱ्यांच्या मते, तो गंभीर पापांचा दोषी होता, यात शंकाच नव्हती. त्यांच्या मते त्याने ज्या रीतीने शब्बाथाचे नियम पाळायला हवे होते, त्या रीतीने त्याने ते पाळले नाहीत. शिवाय, आपण पित्याच्या बरोबरीचे आहोत, हे त्याने प्रकट केले. येशूचे हे म्हणणे चुकीचे असते, तर ते त्याच्याकडून घडलेले गंभीर पाप ठरले असते. पण तो चुकीचा नव्हता, हे स्पष्ट आहे.
पिता आणि पुत्र यांचे ऐक्य हा या उताऱ्याचा गाभा आहे. यापुढील वचनांतून आणखी स्पष्ट होते की पिता आणि पुत्र एक आहेत आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यातच येशूचे संपूर्ण जीवन वाहिलेले आहे. त्यांच्या इच्छेतील हे एकपणच त्यांच्यातील ऐक्य घडवते.
यातून पिता आणि पुत्र यांच्यातील नात्याविषयी, तसेच त्या दोघांशी असलेल्या आपल्या नात्याविषयीही आपल्याला बरेच काही समजते. सर्वप्रथम, पिता आणि पुत्र या दोन भिन्न दैवी व्यक्ती आहेत आणि दोघांचीही बुद्धी व इच्छाशक्ती परिपूर्ण आहे. त्यांच्या एकतेचा आधार असा आहे की त्यांच्या विचारांत पूर्ण सुसंवाद आहे: सर्व गोष्टी दोघांनाही सारख्याच ज्ञात आहेत आणि जे त्यांना ज्ञात आहे त्यावर दोघांचाही पूर्ण विश्वास आहे. दोघांनाही एकच परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे, जगाच्या स्थापनेपासून पित्याने आखलेल्या योजनेचा प्रत्येक तपशील त्यांनी मनापासून स्वीकारला.
पिता आणि पुत्र यांच्यातील एकता समजून घेतल्यावर, आपण देवाशी कसे एकरूप होऊ शकतो, याचा एक उदात्त धडा आपल्याला मिळतो. याची सुरुवात देवाचे मन जाणून घेण्याच्या प्रयत्नाने होते. देवाच्या मनातील गौरवशाली रहस्यांचा आपण सखोल शोध घेतला पाहिजे आणि ती रहस्ये स्वतः समजून घेतली पाहिजेत. त्यानंतर, जे आपल्याला समजते त्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय आपण आपल्या इच्छेने घेतला पाहिजे. सत्य जसे आपल्याला उमगत जाते, तसे आपण ते आपल्या जीवनासाठी निवडले पाहिजे. अडचण अशी आहे की अनेक वेगवेगळे आवाज आपले लक्ष वेधून घेण्यासाठी धडपडत असतात. त्या आवाजांमधून विवेकाने निवड करताना, देव जे प्रकट करतो तेवढेच आपण स्वीकारतो. असे केल्याने देवाच्या विचारांकडे आणि इच्छेकडे आपण आपोआप ओढले जातो आणि ते विचार व ती इच्छा आपलीशी करतो. अशा रीतीने आपणही देवाशी एकरूप होतो.
पिता आणि पुत्र यांच्याशी ऐक्यात जगण्यासाठी तुम्हाला जे पाचारण आहे, त्यावर आज चिंतन करा. हेच ऐक्य तुमच्या जीवनाला परिपूर्णता देते. यासाठीच तुम्हाला निर्माण केले आहे. याऐवजी दुसरे काही शोधणे, ते खरे मानणे आणि स्वीकारणे म्हणजे असत्याच्या आधारावर जगणे. प्रत्येक गोष्टीत देवाचे विचार आणि त्याची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग तुम्ही संपूर्णपणे देवाशी अधिक गाढ ऐक्याकडे ओढले जाल.
हे स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशू आम्हाला दिल्याबद्दल आणि तुम्हा दोघांमधील एकतेबद्दल मी तुझे आभार मानतो. तुमच्या विचारांच्या आणि इच्छांच्या सुसंवादातून असलेल्या त्या गौरवशाली एकतेत मलाही सामावून घे. मला तुझ्याशी एकरूप कर, जेणेकरून तू माझाही पिता होशील. हे स्वर्गीय पित्या, हे पुत्र येशू, माझा तुम्हा दोघांवर विश्वास आहे.
देवाच्या कार्यांची साक्ष
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा गुरुवार
“पित्याने मला पूर्ण करण्यासाठी दिलेली जी कार्ये मी करतो, तीच कार्ये माझ्या वतीने साक्ष देतात की पित्याने मला पाठवले आहे.” योहान 5:36
येशूने केलेली कार्ये स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेल्या जीवनकार्याची साक्ष देतात. हे समजून घेतल्याने आपल्या स्वतःच्या जीवनाचे ध्येय स्वीकारण्यास आपल्याला मदत होईल.
सर्वप्रथम, येशूची कार्ये कशी साक्ष देत होती, ते पाहूया. म्हणजेच, येशू कोण होता, हे त्याची कार्ये इतरांना सांगत होती. त्याच्या कृतींनी त्याचे खरे स्वरूप प्रकट केले आणि तो पित्याच्या इच्छेशी किती एकरूप होता, हे दाखवले.
यातून असा प्रश्न पडतो, “कोणत्या कार्यांनी ही साक्ष दिली?” येशू ज्या कार्यांविषयी बोलत होता, ती म्हणजे त्याने केलेले चमत्कार, असा निष्कर्ष आपण लगेच काढू शकतो. त्याने केलेले चमत्कार पाहून स्वर्गीय पित्यानेच त्याला पाठवले, अशी लोकांची खात्री पटली असेल, नाही का? तसे नाही. खरे तर, येशूला चमत्कार करताना पाहूनही अनेक जण आपल्या मतावर हट्टाने ठाम राहिले. त्याचे चमत्कार हा त्याच्या देवत्वाचा पुरावा आहे, हे मानण्यास त्यांनी नकार दिला.
येशूचे चमत्कार विलक्षण होते आणि ज्यांची विश्वास ठेवण्याची तयारी होती, त्यांच्यासाठी ते चिन्हे होती. तरीही, त्याचे सर्वांत गहन ‘कार्य’ म्हणजे त्याने नम्रपणे केलेले खरे प्रेम. येशू मनमोकळा, प्रामाणिक आणि शुद्ध अंतःकरणाचा होता. त्याच्या ठायी सर्व सद्गुण दिसून येत होते. म्हणून, त्याच्या रोजच्या कृतींतून दिसणारे प्रेम, काळजी, आस्था आणि त्याची शिकवण यांतून मिळालेल्या साक्षीनेच सर्वप्रथम अनेकांची मने जिंकली असतील. खरे तर, ज्यांनी आपली मने खुली ठेवली होती, त्यांच्यासाठी त्याचे चमत्कार म्हणजे एका अर्थाने दुधात साखर पडल्यासारखे होते. मुख्य गोष्ट होती त्याची खरीखुरी उपस्थिती, जिच्यातून पित्याची दया प्रकट होत होती.
देवाकडून त्यासाठी एखादे असाधारण कृपादान मिळाले नसेल, तर तुम्ही देवाच्या सामर्थ्याने चमत्कार करू शकत नाही. पण आपले अंतःकरण निर्मळ असावे म्हणून तुम्ही नम्रपणे प्रयत्न केलात आणि स्वर्गीय पित्याच्या हृदयाचे तेज तुमच्या रोजच्या कृतींतून दिसू दिलेत, तर तुम्ही सत्याचे साक्षीदार होऊ शकता आणि स्वर्गीय पित्याचे हृदय इतरांपर्यंत पोहोचवू शकता. खऱ्या प्रेमाची अगदी छोटीशी कृतीही इतरांना खूप काही सांगून जाते.
स्वर्गातील पित्याची साक्ष देण्यासाठी तुम्हाला जे पाचारण मिळाले आहे, त्यावर आज चिंतन करा. भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पित्याचे प्रेम पोहोचवण्यासाठी तुम्हाला बोलावले आहे. छोट्या-मोठ्या कृतींतून तुम्ही हे ध्येय स्वीकारले, तर तुमच्याद्वारे इतरांना शुभवर्तमान प्रकट होईल आणि आपल्या जगात पित्याची इच्छा अधिक पूर्णपणे साकार होईल.
हे माझ्या सत्यस्वरूप आणि पवित्र प्रभू, तुझ्या हृदयातून वाहणाऱ्या प्रेमाची साक्ष माझ्या वागण्यातून देता यावी, अशी मी प्रार्थना करतो. माझ्या वागण्यात दिखावा नसावा आणि मी खरेपणाने व मनापासून वागावे, यासाठी मला कृपा दे. मला तुझ्या दयाळू हृदयाचे निर्मळ साधन बनण्यास मदत कर, म्हणजे माझ्या सर्व कृती तुझ्या दयेची साक्ष देतील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
ओळखीतून उद्भवणारा मोह
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा शुक्रवार
मंदिराच्या परिसरात शिकवत असताना येशू मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कोठून आलो हेही तुम्हाला माहीत आहे. तरीही मी स्वतःहून आलो नाही. ज्याने मला पाठवले तो सत्य आहे; त्याला तुम्ही ओळखत नाही.” योहान 7:28
कधी कधी एखाद्या व्यक्तीशी आपला जितका अधिक परिचय असतो, तितकेच तिच्यातले चांगुलपण आणि तिच्या जीवनातली देवाची उपस्थिती ओळखणे आपल्याला कठीण जाते. अनेकदा त्या व्यक्तीकडे पाहून, ‘तिच्याबद्दल आपल्याला सगळे काही माहीत आहे,’ असे गृहीत धरण्याचा मोह आपल्याला होतो. त्यामुळे तिचे दोष आणि उणिवा तेवढ्याच आपल्या मनात ठळक होतात आणि आपण तिच्याकडे फक्त त्याच नजरेतून पाहू लागतो.
येशूच्या बाबतीत असेच घडले. येशू यहुद्यांच्या मंडपांच्या सणाला गेला, तेव्हा तिथे त्याला ओळखणारे काही लोक होते. ते बहुधा त्याला एका सुताराचा साधासुधा मुलगा म्हणून ओळखत असावेत. कदाचित ते त्याच्याच गावचे असतील. येशूशी असलेल्या या ओळखीमुळे ‘हा मशीहा असू शकेल का?’ अशी शंका त्यांच्या मनात लगेच आली. पण अर्थातच, त्यांचा हा समज अगदी चुकीचा होता.
यातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो: आपल्या चांगल्या ओळखीच्या लोकांबद्दल घाईने मत बनवू नये आणि त्यांच्यावर अति टीका करू नये. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जितके अधिक माहीत असते, तितके तिचे दोष आणि कमकुवतपणा आपल्या लक्षात येतात. आणि आपण सावध राहिलो नाही, तर त्या व्यक्तीतले जे चांगले गुण देवाला आपण पाहावेत असे वाटते, त्यांच्याऐवजी आपण तिच्या दोषांवरच लक्ष केंद्रित करू.
येशूच्या बाबतीत असेच घडले. अर्थात, त्याच्यात खरोखर कोणतेही दोष नव्हते. तो परिपूर्ण होता. तरीही, त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींवरून लोकांनी त्याच्याबद्दल चुकीचे निष्कर्ष काढले असावेत आणि त्याच्यावर टीका केली असावी. त्याचा आत्मविश्वास, त्याच्या शिकवणीतून प्रकट होणारा अधिकार, पापी लोकांबद्दल त्याला वाटणारी विलक्षण करुणा, असे अनेक असामान्य गुण काहींना समजले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर टीका करण्याचे निवडले. ‘तो कोठून आला हे आम्हाला माहीत आहे,’ असे ते म्हणाले. म्हणजेच, आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीत इतके मोठेपण असू शकते, असे त्यांना वाटत नव्हते.
तुमच्या सभोवतालच्या लोकांविषयी तुम्हाला काय वाटते? तुमच्या अगदी जवळच्या लोकांविषयी तुम्हाला काय वाटते? त्यांच्यात दिसणाऱ्या कमकुवतपणापलीकडे जाऊन त्यांच्या जीवनात देवाचा हात कसा कार्य करीत आहे, हे तुम्हाला पाहता येते का? वरवर दिसणाऱ्या गोष्टींपलीकडे जाऊन त्यांच्या जीवनाचे मोल आणि प्रतिष्ठा तुम्हाला जाणवते का? जेव्हा तुम्ही इतरांमधले चांगुलपण ओळखता, ते त्यांच्या लक्षात आणून देता आणि त्याबद्दल कृतज्ञ राहता, तेव्हा तुम्ही खरे तर देवाचा प्रकट झालेला चांगुलपणा पाहता आणि त्यावर प्रेम करता. तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यात देव जिवंत आहे आणि कार्य करीत आहे. तो चांगुलपणा पाहणे आणि त्यावर प्रेम करणे ही तुमची जबाबदारी आहे. यासाठी तुमच्या ठायी खरी नम्रता असावी लागते; पण शेवटी, तुमच्यामध्ये वावरणाऱ्या देवावर प्रेम करण्याचा हा एक मार्ग आहे.
आज तुमच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, यावर चिंतन करा. त्यांच्या जीवनात देवाचे जिवंत कार्य कशा प्रकारे दिसून येते, याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. असे केल्याने तुम्ही तुमच्यामध्येच असलेल्या देवावर प्रेम कराल.
हे माझ्या सदैव उपस्थित असलेल्या प्रभू, माझे तुझ्यावर खरोखर प्रेम आहे. इतरांमध्ये तुला पाहण्यास आणि त्यांच्यामध्ये तुझ्यावर प्रेम करण्यास मला मदत कर. इतरांना दोष देण्याचा मोह सोडून, तुझ्या सर्व पुत्रकन्यांमधील चांगुलपणाकडे नम्रपणे ओढले जाण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे; इतरांमध्येही तुझ्यावर प्रेम करता यावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूविषयी विस्मय
प्रायश्चित्तकाळाच्या चौथ्या आठवड्यातील शनिवार
पहारेकऱ्यांनी उत्तर दिले, “या माणसासारखे यापूर्वी कोणीही बोलले नाही.” योहान 7:46
पहारेकरी आणि इतर अनेक जण येशूने उच्चारलेले शब्द ऐकून विस्मित झाले; त्याच्याविषयी त्यांच्या मनात आदर दाटून आला. मुख्य याजक आणि परुशी यांच्या आज्ञेवरून या पहारेकऱ्यांना येशूला अटक करण्यासाठी पाठवले होते, पण त्याच्यावर हात टाकणे त्यांना जमले नाही. येशूमुळे त्यांच्या मनात दाटून आलेल्या त्या आदरयुक्त विस्मयापुढे ते असमर्थ ठरले.
येशू शिकवत असे, तेव्हा त्याच्या शब्दांच्या पलीकडचेही काहीतरी लोकांपर्यंत पोहोचत असे. त्याच्या शब्दांत सामर्थ्य होते आणि ते जीवन बदलणारे होते, हे खरे; पण तो ज्या पद्धतीने बोलत असे, तिचाही परिणाम होत असे. हे नेमके सांगणे कठीण आहे; पण तो बोलत असे, तेव्हा त्याचे सामर्थ्य, शांतता, ठाम विश्वास आणि उपस्थिती लोकांना जाणवत असे, हे स्पष्ट आहे. त्याची दैवी उपस्थिती त्यांना इतकी स्पष्टपणे जाणवत असे की त्याबद्दल शंकेला जागाच नव्हती. येशू नावाचा हा मनुष्य इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे, हे लोकांना आपोआप कळत असे आणि ते त्याचा प्रत्येक शब्द कान देऊन ऐकत असत.
देव आजही आपल्याशी अशाच प्रकारे संवाद साधतो. येशू आजही आपल्याशी बोलतो तेव्हा असाच विस्मय जागवतो. आपण फक्त त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. देव अधिकाराने, स्पष्टपणे आणि ठामपणे बोलतो, तेव्हा तो कोणकोणत्या मार्गांनी आपल्याला आपले म्हणणे पटवून देतो, याकडे आपण लक्ष द्यायला हवे. कदाचित एखाद्याचे बोलणे किंवा एखाद्याची कृती आपल्या मनाला स्पर्श करेल. कदाचित आपण वाचलेले एखादे पुस्तक किंवा ऐकलेले एखादे प्रवचन यांतून तो आपल्याशी बोलेल. प्रसंग कोणताही असो, हा विस्मय कुठे जाणवतो, हे आपण पाहावे; कारण तिथेच आपल्याला स्वतः येशू भेटेल.
विशेष म्हणजे, येशूविषयी वाटणारा हाच आदरयुक्त विस्मय कठोर टीकेचेही कारण ठरला. साधी आणि प्रामाणिक श्रद्धा असलेल्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला; पण जे आत्मकेंद्रित होते आणि स्वतःलाच नीतिमान समजत होते, त्यांनी संतापाने त्याची निंदा केली. त्यांना येशूचा हेवा वाटत होता, हे उघड होते. येशूने प्रभावित झालेल्या पहारेकऱ्यांवर आणि इतरांवरही त्यांनी टीका केली.
देवाच्या संदेशाने आणि त्याच्या प्रेमाने तुम्हाला कशा प्रकारे विस्मित केले आहे, यावर आज चिंतन करा. त्याचा स्पष्ट आणि ठाम स्वर ऐकण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्याशी कशा प्रकारे संवाद साधू पाहत आहे, याकडे मन लावा. त्याच्या आवाजाला अनुसरून वागण्याचा प्रयत्न करताना कुणी तुमची थट्टा केली किंवा तुमच्यावर टीका केली, तर त्याकडे लक्ष देऊ नका. इतर सर्व आवाजांपेक्षा त्याचाच आवाज वरचढ ठरू दे आणि तुम्हाला त्याच्याकडे ओढून घेऊ दे, म्हणजे त्याला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही मनापासून आस्वाद घेत ऐकू शकाल.
हे माझ्या प्रभू, तुझ्याविषयी माझ्या मनात गाढ आदर आणि विस्मय आहे. तुझा आवाज ओळखण्यात चूक होणे शक्य नाही; त्या आवाजाकडे आणि तू ज्या अधिकाराने बोलतोस त्याकडे मला लक्ष देता यावे. तुला जे काही सांगायचे आहे ते ऐकून मी विस्मित व्हावे. हे प्रिय प्रभू, तुझे ऐकताना इतरांची प्रतिक्रिया काहीही असली, तरी श्रद्धेने प्रतिसाद देण्याचे धैर्य मला दे. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या प्रत्येक वचनात माझे मन गुंतून राहावे आणि ते मी आश्चर्याने व आदराने ऐकावे, अशी माझी इच्छा आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रायश्चित्तकाळाचा पाचवा आठवडा
मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध
