मराठी

सामान्य काळातील अठ्ठाविसावा आठवडा

चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अनुक्रमणिका

वास्तव आणि दिखावा

सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार (वर्ष अ)

येशूने मुख्य याजकांना आणि लोकांच्या वडीलधाऱ्यांना पुन्हा दाखल्यांतून उत्तर दिले: “स्वर्गाच्या राज्याची तुलना अशा एका राजाशी करता येईल, ज्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली. आमंत्रित पाहुण्यांना मेजवानीला बोलावण्यासाठी त्याने आपल्या सेवकांना पाठवले; पण त्यांनी येण्यास नकार दिला.” मत्तय 22:1–3

तुम्हीही येण्यास नकार देता का? येशूने मुख्य याजकांना आणि लोकांच्या वडीलधाऱ्यांना हा दाखला सांगितला. कारण आपण खरोखर देवाच्या इच्छेनुसार वागतो, असा भास ते इतरांना करून देत असले, तरी वस्तुतः देवाच्या कोकराच्या लग्नाच्या मेजवानीला येण्यास नकार देणाऱ्यांपैकी ते होते. ते प्रत्यक्षात जसे नव्हते तसे स्वतःला दाखवण्यात पटाईत होते. लोकांच्या नजरेत चांगले कसे दिसावे, लोकांकडून होणारी टीका कशी टाळावी आणि पवित्र असल्याचा आव कसा आणावा, हे त्यांना चांगले ठाऊक होते. पण ते दिसत होते तसे मुळीच नव्हते. आतून ते दांभिक, खोटारडे आणि खुनी होते.

या दाखल्यात तीन वेळा आमंत्रण पाठवले जाते. पहिली दोन आमंत्रणे आधीच आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना दिली जातात. हे “आमंत्रित पाहुणे” विशेषतः मोशे आणि संदेष्टे यांच्याकडून चालत आलेल्या श्रद्धेत वाढलेल्या इस्राएलच्या लोकांना सूचित करतात. पण आज ख्रिस्ती श्रद्धेत वाढलेल्यांनाही हा दाखला लागू होतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. पहिल्या आमंत्रणानंतर पाहुण्यांनी येण्यास नकार दिला. दुसऱ्या आमंत्रणानंतर काहींनी उदासीनता दाखवली, तर काहींनी वैरभावाने प्रतिसाद दिला. आजही अशा प्रतिक्रिया सर्रास दिसतात.

आज येशू आपल्या लग्नाच्या मेजवानीत सहभागी होण्याचे आमंत्रण देतो, तेव्हा त्याला निरनिराळे प्रतिसाद मिळतात. काही जण आपल्या प्रभूबद्दल उदासीन असतात. ते सांसारिक कामांत इतके गढून गेलेले असतात की देवासाठी फारसा वेळ देत नाहीत किंवा त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. रोजची प्रार्थना, मिस्साबलिदानात सहभागी होणे आणि प्रेमभावनेने सातत्याने इतरांची सेवा करणे, अशा रीतीने श्रद्धा आचरणात आणणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. पैसा कमावणे, वस्तू मिळवणे, करमणुकीत रमणे आणि इतर सांसारिक गोष्टी यांतच त्यांचा बराच अधिक वेळ आणि शक्ती खर्च होते. मुख्य याजक आणि वडीलधाऱ्यांसारखे काही जण विश्वासू अनुयायी असल्याचे सोंग उत्तम वठवतात; पण प्रत्यक्षात ते देवाच्या इच्छेला विरोध करतात. आपण इतरांना कसे दिसतो, याचीच त्यांना काळजी असते; आपल्या आत्म्याची खरी अवस्था काय आहे, याची त्यांना फिकीर नसते. कोणी त्यांना कोणत्याही प्रकारे जाब विचारला, तर ते संतापतात आणि उलट हल्ला चढवतात. शुभवर्तमानातील सत्य स्वीकारायला त्यांचे मन तयार नसते. आयुष्यात त्यांनी धरलेल्या वाटेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस कोणी केले, किंवा कशामुळेही असा प्रश्न उभा राहिला, तर त्यावर हल्ला चढवून ते स्वतःलाच बरोबर ठरवत राहतात.

तिसरे निमंत्रण सर्व लोकांना पाठवण्यात आले, तेव्हा काहींनी त्याला प्रतिसाद दिला. येशूच्या निमंत्रणाला तुम्ही किती पूर्णपणे प्रतिसाद देता? या प्रश्नाचे नीट उत्तर देण्यासाठी आपण ते निमंत्रण ‘वाचले’ पाहिजे आणि आपल्याला कशात सहभागी होण्यासाठी बोलावले आहे, हे समजून घेतले पाहिजे. आपल्याला देवाच्या पुत्राच्या विवाहभोजनात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले आहे. पण त्या मेजवानीला जाण्यासाठी आपण निःस्वार्थ प्रेमाचे वस्त्र परिधान केले पाहिजे. असे प्रेम त्यागमय, निःस्वार्थ आणि संपूर्ण असते. या प्रेमाची सुरुवात देवाला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याने होते, आणि त्याची परिपूर्ती देवाची इच्छा पूर्ण करणे हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय बनते तेव्हा होते. खरे प्रेम आपल्या जीवनातील सर्व स्वार्थ दूर करते. म्हणूनच काहींनी त्या निमंत्रणाला विरोध केला. जेव्हा देव आपल्याला निःस्वार्थ प्रेमाचे जीवन जगण्यास बोलावतो, तेव्हा आपल्याला बदलण्याची गरज आहे, हे मान्य करावे लागते. काहींना हे फार कठीण जाते. त्यांनी निवडलेली पापमय जीवनपद्धती टिकवून ठेवण्यासाठी ते एकतर उदासीन राहतात, किंवा स्वतःचे समर्थन करत शत्रुत्वाने तुटून पडतात.

या दाखल्याच्या शेवटी, निमंत्रित पाहुण्यांपैकी एकाने लग्नाला योग्य असे वस्त्र परिधान केलेले नसल्यामुळे त्याला ‘बाहेरच्या अंधारात फेकून दिले जाते; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’ पण हे लग्नाचे वस्त्र म्हणजे देवाच्या खऱ्या उपासनेतून उमलणाऱ्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे.

आज इतरांवर तुम्ही किती निःस्वार्थपणे प्रेम करता, यावर मनन करा. कारण प्रभूच्या मेजवानीत सहभागी होण्यास तुम्ही योग्य आहात की नाही, हे त्यावर ठरेल. खरे प्रेम इतरांचे जास्तीत जास्त भले व्हावे म्हणून नेहमी उदारपणे झटते. देवावरील प्रेमात वाढण्यास इतरांना मदत व्हावी म्हणून जे काही करणे आवश्यक आहे, ते करण्याचा ते प्रयत्न करते. खरे प्रेम माणसाला स्वतःतच गुरफटून राहू देत नाही. त्याचे लक्ष नेहमी इतरांकडे असते आणि त्यातून केलेल्या निवडी निःस्वार्थ असतात. तुमच्यात असे प्रेम किती आहे किंवा कुठे कमी पडते, यावर मनन करताना, तुम्हाला शुद्ध करणारे येशूचे निमंत्रण खुल्या मनाने स्वीकारा; त्याला शत्रुत्वाने प्रतिसाद देऊ नका. बदल घडवण्याच्या त्याच्या निमंत्रणाचे स्वागत करा आणि त्याची मनःपूर्वक उपासना करताना स्वतःला असे घडू द्या की तुम्ही इतरांसाठी प्रेमाची भेट बनाल.

हे परिपूर्ण प्रेमाच्या प्रभू, स्वर्गातील वैभवशाली मेजवानीत सहभागी होण्यासाठी तू सर्व लोकांना निमंत्रण दिले आहेस. त्यासाठी एकच अट आहे: आपल्या जीवनातील सर्व पाप आणि स्वार्थ दूर होऊ द्यावा, म्हणजे आपल्याला निःस्वार्थ प्रेमाचे वस्त्र लाभेल. हे प्रिय प्रभू, आज मी तुझे निमंत्रण स्वीकारतो आणि तुझ्या परिपूर्ण प्रेमाच्या शुद्ध करणाऱ्या अग्नीत स्वतःला समर्पित करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


अत्यंत विस्मित

सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार (वर्ष ब)

“मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे! श्रीमंत माणसाने देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा उंटाला सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.” ते अत्यंत विस्मित झाले आणि एकमेकांना म्हणाले, “मग कोणाचे तारण होऊ शकते?” येशू त्यांच्याकडे पाहून म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे.” मार्क 10:24–27

ख्रिस्ती जीवनात आपल्याकडून जे अपेक्षित आहे ते पाहून तुम्ही कधी ‘अत्यंत विस्मित’ झाला आहात का? तुम्हाला असा अनुभव आला असेल, अशी आशा आहे. आणि आला असेल, तर आता तुम्ही त्या विस्मयातून पुढे गेला असाल, अशीही आशा आहे. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला शुद्धीकरणाच्या अनेक टप्प्यांतून जावे लागते; असा विस्मय वाटणे हा त्यांपैकी एक टप्पा आहे.

‘सुईचे नेढे’ हा यरुशलेम शहराभोवतीच्या तटबंदीतील एका प्रवेशद्वाराचा उल्लेख आहे. अंधार पडल्यावर ते प्रवेशद्वार बंद केले जाई. मग आत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या प्रवेशद्वाराच्या मधोमध असलेले एक लहान दार. माणूस वाकून त्यातून जाऊ शकत असे; पण उंटाला जमिनीवर बसून अक्षरशः रांगत गेल्याशिवाय आत जाता येत नसे. त्यासाठी उंटाच्या मालकाला खूप प्रयत्न करावे लागत आणि उंटाला मार्ग दाखवावा लागे; पण ते शक्य होते.

या कथेतला मुख्य मुद्दा असा आहे की स्वर्गात आपल्याला सहजासहजी प्रवेश करता येणार नाही. इथे येशू सांगत होता की पैसा असलेली व्यक्ती किती सहजपणे पैशाच्या इतकी आहारी जाऊ शकते की तिला स्वर्गाची संपत्ती मिळत नाही. येशू ज्याच्याशी नुकताच बोलला होता, तो श्रीमंत तरुण दुःखी होऊन निघून गेला. कारण स्वर्गाची संपत्ती मिळवण्यासाठी ऐहिक संपत्तीची आसक्ती सोडण्याचे प्रेमळ निमंत्रण येशूने त्याला दिले होते. येशू त्याला म्हणाला, “जा, तुझ्याजवळ जे आहे ते विकून गरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; मग ये, माझ्यामागे चल.” हे ऐकून तो श्रीमंत तरुण दुःखी होऊन निघून गेला.

लोभ आणि भौतिक संपत्तीची जीवन व्यापून टाकणारी आसक्ती तुमच्या आत्म्याचा नाश करू शकतात. ही वस्तुस्थिती आहे; ती नाकारता येत नाही. पण ही शिकवण इतर सर्व प्रकारच्या आसक्तींनाही लागू होते. एखाद्या पापाशी आपली खोल आसक्ती असेल आणि आपण ते पाप सोडण्यास नकार दिला, तर आपल्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. म्हणून देवावरील प्रेमाने आपल्याला पापापासून दूर होण्याची प्रेरणा मिळत नसेल, तर कदाचित नरकाची भीती आपल्याला तशी प्रेरणा देईल.

त्या श्रीमंत तरुणाने स्वर्गापेक्षा आपल्या संपत्तीला प्राधान्य दिले आणि येशूने आपल्या भूमिकेवर ठाम राहून स्वर्गात प्रवेश मिळवणे फार कठीण आहे हे स्पष्ट केले. हे पाहून शिष्य थक्क झाले असतील आणि त्या आश्चर्याने त्यांना स्वतःच्या जीवनाचा विचार करायला लावला असेल. पण हे चांगलेच होते. कारण त्यातून दिसते की त्यांनाही आपल्या अपवित्र आसक्तींची जाणीव झाली होती आणि त्यांच्या अंतःकरणातील पवित्र भयातून ते आश्चर्य उद्भवले होते. त्या श्रीमंत तरुणाला निघून जाताना पाहून, आपणही कोणकोणत्या गोष्टींना धरून आहोत आणि त्या आपल्या जीवनातून दूर करण्याची गरज आहे, असा विचार त्यांच्या मनात आला असेल. इथे ‘आश्चर्य’ म्हणजे आपल्याला बदलण्याची गरज आहे, याची झालेली पवित्र जाणीव. पण आनंदाची बातमी अशी आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर बदलते आणि तिला देवापासून दूर ठेवणाऱ्या आसक्तींतून मुक्त होते, तेव्हा देवाच्या मागण्यांनी तिला थक्क करून सोडेल अशी कोणतीही आसक्ती तिच्यात उरत नाही. शिष्यत्वाच्या मागण्यांमुळे वाटणाऱ्या आश्चर्यावर मात करणे, जेणेकरून त्या मागण्यांनुसार जगणे हीच आपली जीवनपद्धती बनेल, हे अंतिम ध्येय आहे.

आपल्या प्रभूच्या शिकवणीतली एखादी गोष्ट स्वीकारणे तुम्हाला कठीण वाटत असेल, तर आज तिच्यावर चिंतन करा. एखाद्या आज्ञेकडे दुर्लक्ष करण्याची तुमची प्रवृत्ती आहे का? एखादी शिकवण टाळण्यासाठी तुम्ही सबबी शोधता का? एखादी मागणी तुम्हाला अवाजवी वाटते का? सुईच्या नेढ्यातून जायचे असेल, तर तुम्ही मनापासून आणि पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. तुम्ही आपले संपूर्ण जीवन त्याला अर्पण करावे, अशी मागणी करण्यास येशू मागेपुढे पाहणार नाही. ज्या आसक्ती तुम्ही अजूनही सोडलेल्या नाहीत, त्यांच्यावर चिंतन करा. त्या श्रीमंत तरुणाशी येशू जसा बोलला, तसाच तो या आसक्तींविषयी तुमच्याशी बोलत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशा सर्व आश्चर्यावर मात करा आणि देवाच्या इच्छेला अढळपणे शरण जाऊन जगणे हीच तुमची जीवनपद्धती बनू द्या. देवाच्या राज्याच्या द्वारांतून आत जाण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

हे सर्वस्व मागणाऱ्या प्रभू, शिष्य होण्याचे तुझे आमंत्रण म्हणजे प्रत्येक पापमय आसक्ती तुझ्या स्वाधीन करून त्या पापांतून मुक्त होण्याचे आमंत्रण आहे. प्रिय प्रभू, तू माझ्याकडे माझे सर्वस्व मागतोस आणि ते देण्याचा आग्रह धरतोस. तुझ्या पवित्र प्रेमाच्या मागण्या मी स्वीकाराव्यात आणि स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता उदार मनाने त्यांना प्रतिसाद द्यावा, जेणेकरून तुझ्या राज्याच्या संपत्तीत मला वाटा मिळेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


केवळ आपल्या गरजांसाठी नव्हे, तर त्यापलीकडेही प्रार्थना करणे

सामान्य काळातील अठ्ठाविसावा रविवार (वर्ष क)

यरुशलेमकडे आपला प्रवास चालू ठेवत येशू शोमरोन आणि गालील या प्रदेशांतून गेला. तो एका गावात प्रवेश करत असताना दहा कुष्ठरोगी त्याला भेटले. ते त्याच्यापासून काही अंतरावर उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले, “येशू, गुरुजी! आमच्यावर दया कर!” लूक 17:11–13

या दहाही कुष्ठरोग्यांसाठी या कथेची सुरुवात फार चांगली होते. त्यांपैकी नऊ जणांसाठी तिचा शेवट दुःखद ठरतो. मात्र एका जणासाठी तिचा शेवट सुरुवातीपेक्षाही अधिक चांगला आणि गौरवशाली ठरतो.

हे कुष्ठरोगी आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा रोग सर्व प्रकारच्या पापांचे आणि पापांच्या परिणामांचे प्रतीक होता. रोगाची सुरुवात झाली की त्याचे परिणाम त्यांना जाणवू लागत. त्वचेचा रंग बदलत असे, ती जाड आणि कोरडी होई, तसेच त्वचेवर जखमा आणि पुरळ येत. रोगाचे निदान होताच त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक कुष्ठरोग्याला समाजापासून वेगळे केले जाई. त्यांना फक्त इतर कुष्ठरोग्यांबरोबर राहण्याची व वावरण्याची मुभा असे. एकाकीपणा आणि लाज त्यांच्या वाट्याला येई; आपल्या प्रियजनांना पूर्वीसारखे मोकळेपणाने भेटणे त्यांना शक्य नसे. त्याचप्रमाणे प्रत्येक पापाचेही असेच परिणाम होतात. पापामुळे आपल्या आत्म्याला होणाऱ्या जखमा वाढत आहेत हे जाणवते, तेव्हा आपल्याला अंतःकरणात वेदना होतात. पापाचा परिणाम आपल्या नात्यांवर आणि आपल्या प्रियजनांशी मोकळेपणाने वागण्याच्या क्षमतेवर होतो.

पापावरचा पहिला उपाय सोपा आहे. आपण कळवळून हाक मारतो, “येशू, गुरुजी! माझ्यावर दया कर!” पण ही केवळ पहिली पायरी आहे. कुष्ठरोग्यांना बरे करून येशूने आपल्याला दाखवले की आपल्या पापांवर त्याचा अधिकार आहे. तो आपल्याला क्षमा करू शकतो आणि आपण त्याची दया मागितली तर तो आपल्याला क्षमा करील. पण क्षमेमुळे जर आपल्यात श्रद्धा जागी झाली नाही आणि आपण उत्साहाने व दृढनिश्चयाने देवाच्या इच्छेनुसार वागू लागलो नाही, तर त्याचा शेवट दुःखद होईल. पापांची क्षमा आपल्याला मिळणारच असे गृहीत धरले, तर आपली अवस्था पूर्वीपेक्षाही अधिक दयनीय होईल. देवाचे आभार मानण्यासाठी परत न आलेले ते नऊ कुष्ठरोगी अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतात, जे देवाच्या दयाळू हाताचा स्पर्श होऊनही आपले जीवन बदलून देवाकडे वळत नाहीत.

देव आपल्याला स्पर्श करतो तेव्हा आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, हे किती महत्त्वाचे आहे, ते या कथेतून स्पष्ट होते. आपण मोठ्या आवाजात देवाचा गौरव केला पाहिजे, त्याच्यासमोर गुडघे टेकले पाहिजेत आणि अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तो एक कुष्ठरोगी असे करतो, तेव्हा येशू त्याला म्हणतो, “ऊठ आणि जा; तुझ्या श्रद्धेने तुला तारले आहे.” आपल्या प्रभूच्या त्या दयेने त्याच्या आत्म्याला स्पर्श केला. त्या दयेतून त्याला श्रद्धेचे दान मिळाले, आणि त्यामुळे त्याला पुढे जाता आले व शाश्वत कृपादानांनी त्याचा आत्मा बरा झाला.

बरेचदा आपण अडचण आली तरच प्रार्थनेत देवाकडे वळतो. मग अडचण दूर झाली की आपण आपल्या प्रभूकडे फारसे लक्ष देत नाही, किंवा अजिबातच देत नाही. आपल्या अडचणी सोडवून आपण पुन्हा नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन जीवन जगावे, एवढ्यासाठी देव आपल्या जीवनात नाही. त्याच्या दयेमुळे आपल्या मनात गाढ आणि कायम टिकणारी कृतज्ञता जागी झाली पाहिजे. देवाबद्दल कृतज्ञ असणे म्हणजे सत्य मान्य करणे, यापलीकडे काही नाही. आपल्याकडे जे काही आहे ते सर्व देवामुळेच आहे. त्याच्याशिवाय आपण काहीच नाही. आपण आपल्या पापांत मृत आहोत. हे फक्त एका कुष्ठरोग्याला उमगले. त्याला श्रद्धेचे वरदान लाभले आणि त्या श्रद्धेने केवळ त्याचे शरीरच नव्हे, तर त्याचा आत्माही वाचवला.

आज तुम्ही प्रार्थनेत देवाकडे कसे वळता, यावर चिंतन करा. आपल्या गरजा आणि अडचणी घेऊन त्याच्याकडे येणे चांगले आहे. “हे येशू, गुरुदेव! माझ्यावर दया कर!” अशी हाक मारणे चांगले आहे. तुमच्या आत्म्याचा वैद्य आणि तुम्हाला आवश्यक असलेल्या आरोग्यदानाचा स्रोत म्हणून त्याच्याकडे येणे चांगले आहे. पण ते पुरेसे नाही. खरे तर, तुमची प्रार्थना तिथेच थांबली, तर शेवटी तुमची अवस्था फार दयनीय होईल. तुम्ही देवाचा उपयोग केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी करत असाल. श्रद्धेच्या वाटेवरचे पुढचे आणि सर्वांत महत्त्वाचे पाऊल तुम्हाला टाकता येते का, यावर चिंतन करा. सगळे सुरळीत असतानाही तुम्ही त्याच्याकडे येता का? त्याने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल तुम्ही सर्व सामर्थ्यानिशी त्याची स्तुती करता का? अंतःकरणात गाढ कृतज्ञता घेऊन तुम्ही त्याच्यापुढे गुडघे टेकता का? तुमच्या प्रार्थनेवर चिंतन करा आणि त्या एका कुष्ठरोग्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. तसे केलेत, तर तुमची श्रद्धा तुमचेही तारण करील आणि खऱ्या अर्थाने बरे झाल्यावर उठून पुढे जाण्यास आपला प्रभू तुम्हाला बोलावील.

हे परमदयाळू प्रभू, तुला सर्व काही शक्य आहे. तू माझ्या सर्व जखमा बऱ्या करू शकतोस, माझ्या पापांची क्षमा करू शकतोस आणि माझ्यासमोर येणारी प्रत्येक अडचण सोडवू शकतोस. माझ्या गरजेच्या वेळी मी तुला हाक मारत आहे; कृपा करून मला बरे कर. त्याला प्रतिसाद म्हणून मी सदैव गाढ कृतज्ञतेने आणि स्तुती करत तुझ्याकडे पुन्हा वळावे, जेणेकरून तुझ्यावरील माझी श्रद्धा वाढेल आणि तुझ्यावरचे माझे प्रेम खऱ्या अर्थाने बहरेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


देवाकडून मिळणारे चिन्ह

सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा सोमवार

“ही पिढी दुष्ट आहे. ती चिन्ह शोधते, पण योनाच्या चिन्हाशिवाय तिला दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही. योना जसा निनवेच्या लोकांसाठी चिन्ह ठरला, तसाच मनुष्यपुत्रही या पिढीसाठी चिन्ह ठरेल.” लूक 11:29–30

तुम्ही कधी देवाकडून काही चिन्ह मिळावे म्हणून वाट पाहता का? जीवनात आपण सर्वजण चढउतार अनुभवतो. त्यांना तोंड देताना, या किंवा त्या बाबतीत आपण काय करावे, हे समजण्यासाठी आपण सहजच देवाकडून एखादे चिन्ह शोधू लागतो. देव कधीकधी स्वर्गातून मिळणाऱ्या चिन्हांसारख्या विशेष कृपांद्वारे आपल्याशी नक्कीच बोलतो. पण वरील उतारा आपल्याला कोणत्या चिन्हाकडे सर्वाधिक लक्ष द्यायला हवे, हे स्पष्ट करतो.

शुभवर्तमानातील या उताऱ्यात आपला प्रभू एक साधा संदेश देतो: आजवर दिलेल्या सर्वांत गहन चिन्हाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि तो आपल्या जीवनातील सर्व निर्णयांचा आधार केला पाहिजे. येशूचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान हे केवळ अनंत जीवनाचे उगमस्थान नाहीत; जीवनातील प्रत्येक निर्णय घेताना आपल्याला आवश्यक असलेले सर्वांत स्पष्ट चिन्हही तेच आहे.

एखादे गहन आणि गुप्त रहस्य उलगडून दाखवणारी कृती म्हणजे चिन्ह. येशूचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान यातून उलगडणारे एक रहस्य असे आहे: त्याने आपल्या क्रुसाद्वारे आपल्यासाठी मिळवलेल्या नव्या जीवनात सहभागी व्हायचे असेल, तर आपण त्याच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे. त्याच्यासारखे निःस्वार्थ त्यागाचे जीवन जगून आपण इतरांसाठी आपले जीवन अर्पण केले पाहिजे, जेणेकरून त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातून मिळणाऱ्या नव्या जीवनाचा शोध लागेल आणि ते त्याचा स्वीकार करतील. व्यवहारात याचा अर्थ असा: जीवनात उत्तरांचा शोध घेताना, एखाद्या प्रसंगी काय करावे हे समजण्यासाठी तुम्ही देवाकडून चिन्ह शोधत असाल, तर ख्रिस्ताच्या जीवनाकडे नजर वळवा. रोजच्या व्यवहारातील प्रत्येक निर्णयात तुम्ही त्याचे अधिक पूर्णपणे अनुकरण कसे करू शकता, यावर मनन करा. जीवनातील एखादा महत्त्वाचा निर्णय असो किंवा व्यवहारातील एखादा छोटासा निर्णय असो, हे दोन्हींना लागू पडते.

असा विवेक करताना आपल्याला काय सोयीचे आहे, याचाच अधिक विचार करण्याकडे आपला कल असतो. या स्वार्थी विचारसरणीतून बाहेर पडणे कठीण आहे. पण मनुष्यपुत्राचे ‘चिन्ह’ मार्गदर्शक मानले, तर जीवनातील निर्णयांचा विचार करण्याची आपली पद्धतच बदलेल. आपल्या प्रभूचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान यांना आपण विवेकाचा आणि निर्णय घेण्याचा आधार बनवतो, तेव्हा आपल्या निर्णयांत त्याच्या निःस्वार्थ प्रेममय बलिदानाचे अनुकरण दिसून येते. म्हणून एखादा निर्णय घ्यायचा असेल, तेव्हा ‘मला काय सोपे जाईल?’ किंवा ‘मला काय आवडेल?’ असा विचार करण्याऐवजी ‘कोणता पर्याय अधिक निःस्वार्थ आहे आणि इतरांच्या हिताचा आहे?’ असा विचार करा. कोणत्या पर्यायातून येशूच्या त्यागमय प्रेमाचे सर्वांत चांगले अनुकरण होईल?

आज तुम्ही जो एखादा निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहात, त्यावर मनन करा. मग तो निर्णय तुम्ही कसा घेत आहात, याचाही विचार करा. येशूने आपल्याला दिलेली साक्ष तुम्ही आपल्या विवेकाचा आधार बनवता का? इतरांसाठी त्यागमय देणगी म्हणून तुम्ही स्वतःचे जीवन कसे अर्पण करू शकता, यावर मनन करता का? आपल्या प्रभूच्या क्रुसाच्या प्रकाशात तुम्ही प्रेमाकडे पाहता का? ज्यांच्यावर तो प्रेम करतो, त्यांच्या तारणासाठी त्याने दाखवलेल्या गौरवशाली आणि निःस्वार्थ समर्पणाचे अनुकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता का? आपल्या प्रभूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या कृतींमधून मिळणारी साक्ष तुमच्या जीवनातील सर्व विवेकाचा आणि निर्णयांचा आधार बनवा. मग जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले एकमेव खरे चिन्ह तुम्हाला सापडेल.

हे माझ्या परिपूर्ण प्रभू, तुझ्या जीवनातील प्रत्येक निर्णय तू प्रेमापोटी घेतलास आणि तो पित्याच्या परिपूर्ण इच्छेनुसार होता. तुझ्या परिपूर्ण उदाहरणाचे अनुकरण करून जीवनातील प्रत्येक निर्णय घेण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. इतरांसाठी तू आपले प्राण अर्पण केलेस; तसेच माझेही जीवन तुझ्या उदाहरणानुसार घडो. माझ्या जीवनाला दिशा देणारे चिन्ह म्हणून मी तुला आणि तुझ्या गौरवशाली, आत्मबलिदानी जीवनाला निवडतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


अंतःकरणाचे परिवर्तन

सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा मंगळवार

येशूचे बोलणे संपल्यावर एका परुश्याने त्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. येशू घरात गेला आणि जेवायला बसला. जेवणापूर्वी विधीनुसार करायचे धुणे त्याने केले नाही, हे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. प्रभू त्याला म्हणाला, “अहो परुश्यांनो! तुम्ही प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता, पण तुमच्या अंतःकरणात लूट आणि दुष्टपणा भरला आहे. अहो मूर्खांनो!” लूक 11:37–40

येशू एखाद्याला ‘मूर्ख’ म्हणेल, अशी कल्पना करणे कठीण आहे. पण त्याने नेमके तेच केले. या परुश्याने नुकतीच येशूची अनेक शिकवण ऐकली होती. मग वरकरणी सद्भावनेने त्याने आपल्या प्रभूला घरी जेवायला बोलावले. पण हा प्रसंग जसजसा उलगडत जातो, तसतसे स्पष्ट होते की हा परुशी येशूचा मित्र नाही. उलट, त्याचे आदरातिथ्य आणि आपुलकी हा त्याच्या अंतःकरणातील दुष्टपणा झाकणारा केवळ एक पडदा आहे.

येशू इतक्या कठोरपणे उत्तर देऊन त्या परुश्याला मूर्ख का म्हणतो? कारण तो परुशी दांभिकतेने भरलेला आहे. त्याचे बाह्य आचरण प्रेम आणि श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणातून येत नाही. उलट, त्याचे आचरण म्हणजे निव्वळ दिखावा आहे. तो ढोंगी आहे. इतर अनेक परुश्यांप्रमाणेच तोही जेवण्यापूर्वी काटेकोरपणे हात धुण्यासारख्या निरनिराळ्या बाह्य विधींना फार महत्त्व देत असे. असे करणे हे आपल्या पवित्रतेचे आणि देवाशी असलेल्या जवळिकीचे लक्षण आहे, असे त्याला वाटत होते. पण तसे नव्हते. त्याचे अंतःकरण इतरांना दोष देण्याच्या वृत्तीने आणि आपणच नीतिमान आहोत या अहंभावाने भरलेले होते. तो इतरांना तुच्छ लेखत असे आणि स्वतःला श्रेष्ठ समजत असे. असे करून त्याने इतरांना तर फसवलेच, पण स्वतःलाही फसवले.

यातून आपण घ्यायचा मुख्य बोध हा आहे की आपल्या अंतःकरणात काय आहे, याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपल्या अंतःकरणात, आपल्या अंतरंग जीवनात, देवावरील आणि इतरांवरील प्रेम बहरले पाहिजे. आपल्या अंतरंगात खरे सद्गुण जोपासण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. प्रार्थना आणि नम्रता यांद्वारे हे घडते. नम्रतेमुळे आपले डोळे उघडतील आणि आपण खरोखर कसे आहोत हे आपल्याला दिसेल. आपल्यात काय बदलायला हवे हे दिसल्यावर, तो बदल करण्याचे बळ प्रार्थनेतून मिळेल. आपण खरोखर कसे आहोत हे आपल्याला स्पष्ट दिसेल आणि प्रार्थनेतून मिळणाऱ्या कृपेवर आपण प्रार्थनापूर्वक विसंबून राहू, तेव्हाच आपल्या जीवनात खरा सचोटीपणा आणि पवित्रता येईल. आणि तेव्हाच आपल्या अंतरंगातील पवित्रता आपल्या कृतींतून दिसून येईल.

आज येशूच्या या प्रभावी शब्दांवर मनन करा: “अहो मूर्खांनो!” हे शब्द ऐकून दुखावून घेऊ नका; हे आपल्या प्रभूचे प्रेमाचे शब्द आहेत. त्या परुश्याला जागे करण्याचा आणि दांभिकतेपासून दूर नेण्याचा हा प्रभूचा कठोर प्रयत्न आहे. हे शब्द तुम्हालाही उद्देशून म्हटले आहेत, अशा रीतीने ते ऐका. येशूची ही प्रेमळ कानउघाडणी आपण नम्रपणे स्वीकारली, तर आपल्या प्रत्येकाचे भले होईल. आपल्या प्रत्येकाने नम्रपणे आपल्या अंतरंगात अधिक खोलवर परिवर्तन घडू दिले पाहिजे. येशूचे शब्द तुमच्या मनाला भिडू द्या आणि तुमच्यात कुठे बदल हवा आहे हे त्यांना दाखवू द्या. कदाचित तुमच्या गर्वामुळे मनातल्या मनात इतरांना दोष देण्याची सवय तुम्हाला लागली असेल. ज्या पापांची कबुली देण्याची गरज आहे, तीच पापे कदाचित गर्वामुळे तुम्हाला दिसेनाशी झाली असतील. हे शब्द तुम्हालाच उद्देशून म्हटले आहेत असे समजून तुम्ही ते ऐकले, तर येशूच्या शब्दांमागची कळकळ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या आत्म्यात काय बदलण्याची गरज आहे, हे पाहण्यासाठी तुमचे डोळे उघडतील. याकडे डोळेझाक करू नका. मन मोकळे ठेवा, नम्र राहा आणि ऐका.

हे माझ्या उत्कट प्रेमळ प्रभू, तू अनेक प्रकारे प्रेमाचे शब्द बोललास. कधी तू सौम्य होतास, तर कधी ठाम. तू प्रेमाने पण ठामपणे माझी कानउघाडणी करतोस, तेव्हा तुझे बोलणे मनापासून स्वीकारण्यासाठी मला आवश्यक ती कृपा आणि नम्रता दे. माझ्या जीवनात कुठे बदल करणे गरजेचे आहे, हे मला प्रामाणिकपणे पाहता येऊ दे, म्हणजे तुझी कृपा माझे अंतर्जीवन बदलून टाकील आणि तिचा प्रभाव माझ्या कृतींतूनही दिसेल. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


विवेकबुद्धीला टोचणी

सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा बुधवार

तेव्हा एका शास्त्रज्ञाने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, असे बोलून तुम्ही आमचाही अपमान करत आहात.” तो म्हणाला, “अहो शास्त्रज्ञांनो, तुमचीही धिक्कार असो! वाहायला कठीण अशी ओझी तुम्ही लोकांवर लादता, पण स्वतः मात्र त्या ओझ्यांना हात लावण्यासाठी एक बोटही उचलत नाही.”  लूक 11:45–46

येशू परुश्यांना ठामपणे फटकारत असताना हा शास्त्रज्ञ ऐकत होता. ते ऐकताना त्याच्या स्वतःच्या विवेकबुद्धीला टोचणी लागली आणि त्याने आपल्या प्रभूच्या बोलण्याला आक्षेप घेतला. येशू काय करतो? तो लगेच त्या शास्त्रज्ञालाही ठामपणे फटकारतो आणि तो धर्मशास्त्राचा उपयोग लोकांवर जड ओझी लादण्यासाठी करतो, हे त्याच्या निदर्शनास आणून देतो. प्रेमापोटी केलेल्या या कानउघाडणीत येशूने माघार घेतली नाही. उलट, जिथे त्याच्या शब्दांचा परिणाम आधीच दिसत होता, तिथेच त्याने आपले शब्द रोखले: त्या शास्त्रज्ञाच्या विवेकबुद्धीवर.

या शास्त्रज्ञाच्या अनुभवातून आपल्याला दोन महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला म्हणजे, आपल्या विवेकबुद्धीला ‘टोचणी’ लागते तेव्हा तिच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. दुसरा म्हणजे, अशा वेळी आपण किती सहजपणे स्वतःची बाजू सावरू लागतो, हे या अनुभवातून दिसते.

तुमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीला कशामुळे टोचणी लागते? गेलेला महिना आठवून पाहा आणि कोणत्या प्रसंगी तुम्ही स्वतःची बाजू सावरू लागलात, यावर मनन करा. कुणाचे बोलणे तुम्हाला खटकले का? तसे असेल तर त्याकडे लक्ष द्या. कधीकधी आपल्या स्वतःच्या पापाशी काहीही संबंध नसलेल्या कारणांनीही आपल्याला एखादी गोष्ट खटकते. पण पुष्कळदा खरे कारण असे असते की ज्या पापाशी आपला संघर्ष चालू आहे, तेच पाप आपल्यासमोर येते आणि ते मान्य करायची आपली इच्छा नसते.

या शास्त्रज्ञाने येशूचे बोलणे ऐकून घेतले असते आणि दुखावून घेण्याऐवजी त्याच्या शब्दांबद्दल कृतज्ञता बाळगली असती, तर काय झाले असते? त्याने नम्रपणे स्वतःच्या जीवनाकडे पाहिले असते आणि ज्या गोष्टींबद्दल येशू परुश्यांना दोष देत होता, त्याच गोष्टींबाबत आपणही दोषी आहोत हे त्याला उमगले असते, तर काय झाले असते? असे केले असते, तर त्याला आपल्या कृतींचे प्रामाणिकपणे परीक्षण करता आले असते आणि स्वतःत बदल घडवण्यास सुरुवात करता आली असती. पण हे करणे कठीण आहे.

अलीकडे कोणत्या गोष्टीने तुम्ही दुखावले गेलात, यावर आज चिंतन करा. प्रामाणिकपणे हे मान्य करा की अनेकदा देव एखाद्या मार्गाने तुमचे पाप तुमच्या निदर्शनास आणून देतो—उदाहरणार्थ, दुसरी एखादी व्यक्ती प्रेमाने तुमची चूक दाखवून देते—तेव्हा मनातल्या अहंकारावर मात करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक झटावे लागते. आणि जेव्हा स्वतःची बाजू सावरण्याची धडपड तुम्हाला जाणवते, तेव्हा तुमच्या जीवनात काहीतरी बदलण्याची गरज आहे, हे त्यावरून लगेच ओळखा. सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लागणे ही देवाची देणगी आहे. असे घडते तेव्हा दुखावून घेण्याऐवजी आनंद माना. आपला प्रभू तुमच्या निदर्शनास आणून देत असलेल्या त्याच पापातून मुक्त होऊन जीवनात पवित्रतेत वाढण्याचा एक उत्तम मार्ग तुम्हाला सापडेल.

हे मला आव्हान देणाऱ्या माझ्या प्रभू, तू निरनिराळ्या प्रकारे सतत माझ्याशी बोलत असतोस. कधी तू सौम्यपणे बोलतोस, तर कधी प्रेमाने माझी कानउघाडणी करतोस. माझे पाप मला दिसू दे. ते दिसल्यावर मी माझ्या चुकीच्या कृतींचे समर्थन करत बसू नये, स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्या चुकांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मी प्रार्थना करतो. तू मला जे काही सांगतोस त्यात आनंद मानायला मला शिकू दे, विशेषतः जेव्हा तू प्रेमाने माझी कानउघाडणी करतोस. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


कट रचण्याच्या प्रवृत्तीवर मात

सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा गुरुवार

येशू तेथून निघाल्यावर शास्त्री आणि परुशी त्याच्याशी वैरभावाने वागू लागले आणि अनेक गोष्टींबद्दल त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करू लागले. कारण त्याच्या बोलण्यातले एखादे वाक्य पकडून त्याला अडचणीत आणण्याचा कट ते रचत होते. लूक 11:53–54

गेल्या काही दिवसांत आपण संत लूकने नोंदवलेली येशूची ‘धिक्कार असो तुम्हाला!’ ही वचने वाचत आहोत. त्या वचनांत येशूने शास्त्री, परुशी आणि नियमशास्त्राचे पंडित यांना फटकारले. प्रेमापोटी दिलेल्या या कानउघाडणीचा शेवट करताना आजचे शुभवर्तमान दाखवून देते की या धर्मनेत्यांचे मनपरिवर्तन झाले नाही. उलट, ‘त्याच्या बोलण्यातले एखादे वाक्य पकडून त्याला अडचणीत आणण्यासाठी’ ते येशूविरुद्ध कट रचू लागले. लोक देवाच्या पवित्र नियमशास्त्राचा वापर दुसऱ्यांवर हल्ला करण्यासाठी शस्त्रासारखा करतात, तेव्हा असेच घडते.

सहसा आपण पवित्र शास्त्रातून चांगल्या गोष्टींची प्रेरणा घेतो. म्हणजेच, येशूच्या वचनांवर आणि कृतींवर चिंतन करतो आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करतो. पण इतरांच्या वाईट कृत्यांतूनही आपण शिकू शकतो. त्यांनी केलेले पाप आपण टाळावे, अशी प्रेरणा त्यांच्या कृतींतून घेऊ शकतो. आजचे शुभवर्तमान आपल्याला या धर्मनेत्यांच्या कट रचण्याच्या ध्यासावर चिंतन करायला आणि आपणही त्याच पापाचे दोषी आहोत का, हे तपासायला आमंत्रण देते.

सर्वप्रथम हे लक्षात घ्या की येशूने त्यांना फटकारल्यानंतर हे धर्मनेते त्याच्याशी ‘वैरभावाने वागू लागले.’ सहसा आपण एखाद्याशी वैरभावाने वागतो, तेव्हा आपण बरोबर आहोत आणि समोरच्या व्यक्तीने काहीतरी चुकीचे केले आहे, अशी आपली समजूत असते. त्या व्यक्तीने पाप केले आहे असे मानून आपण आपल्या वैरभावाचे समर्थन करतो. पण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या हातून घडणारी वैरभावाची प्रत्येक कृती हे स्पष्ट लक्षण आहे की आपण पापाच्या वाटेवर पाऊल टाकले आहे आणि आपण धरून बसलेला हा ध्यास योग्य नाही.

हेही लक्षात घ्या की या धर्मनेत्यांनी येशूवर प्रश्नांचा भडिमार करून आपला वैरभाव व्यक्त केला. म्हणजेच, रागाच्या भरात ते त्याच्यात काहीतरी दोष शोधण्यासाठी त्याला सतत प्रश्न विचारत राहिले. मोशे आणि संदेष्ट्यांमार्फत मिळालेल्या देवाच्या नियमशास्त्राचाच आधार घेऊन त्यांनी येशूला बोलण्यात गुंतवण्याचा आणि आपल्या प्रश्नांनी त्याला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. पण स्वतःच्या वैरभावाचे समर्थन करण्यासाठी आणि अहंकारापोटी येशूवर खोटा आरोप लावण्यासाठी त्यांनी त्या नियमशास्त्राचा विपर्यास केला.

तुमच्या जीवनात असे प्रसंग आठवा, जेव्हा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे कृत्य तुम्हाला पाप वाटले आणि त्याचाच विचार तुमच्या मनात वारंवार घोळत राहिला. अशा वेळी वैरभाव उघडपणे दिसेलच असे नाही. वरवर तुम्ही त्या व्यक्तीशी आपुलकीने वागत असाल, पण मनात मात्र तिला दोषी कसे ठरवता येईल, हाच विचार सतत करत असाल. असे घडते तेव्हा अनेकदा आपल्याला आपली भूमिका योग्य वाटते. कारण न्याय झालाच पाहिजे आणि तो करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे, अशी आपण स्वतःची समजूत घालतो. पण आपल्या जीवनाची सूत्रे देवाच्या हाती असतील, तर तो आपल्याला दुसऱ्या कोणाविरुद्ध कट रचण्याचा ध्यास घ्यायला लावणार नाही. उलट, आपण देवाच्या इच्छेनुसार चालत असू, तर विलंब न करता, शांतपणे, आनंदाने, ममतेने आणि प्रामाणिकपणे वागण्याची, तसेच सर्व राग आणि अशा ध्यासापासून मुक्त राहण्याची प्रेरणा तो आपल्याला देत आहे, हे आपल्याला जाणवेल.

ही चुकीची प्रवृत्ती तुमच्या स्वतःच्या जीवनात कशा प्रकारे दिसून आली आहे, यावर आज चिंतन करा. एखाद्या व्यक्तीविषयी मनातला वैरभाव आवरणे तुम्हाला कठीण गेले, असा एखादा प्रसंग आठवत असेल, तर त्याचे फळ काय झाले ते पाहा. तुमच्या कृतींतून देवाचा गौरव झाला का? त्यातून तुम्हाला मनःशांती मिळाली की मन अस्वस्थ झाले? तुम्ही परिस्थितीचा पूर्णपणे निष्पक्ष विचार केला का? या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्या. अशा विचारांच्या ध्यासातून मुक्त होण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागेल. तुम्ही शांतचित्त असावे, अशी देवाची इच्छा आहे. काही अन्याय झाला असेल, तर आपला प्रभू तो दूर करील, असा विश्वास ठेवा. तुम्ही मात्र क्षमा करण्याचा आणि प्रेमाने वागण्याचा सतत प्रयत्न करा. देव ज्या सौम्यपणे त्याची इच्छा तुम्हाला कळवतो, तिकडे तुमचे लक्ष असू द्या.

हे माझ्या संयमी आणि कनवाळू प्रभू, तू प्रेमाने, स्पष्टपणे आणि धैर्याने शुद्ध सत्य सांगितलेस, म्हणून तुझ्या काळातील अनेक धर्मनेत्यांनी तुझ्यावर खोटे आरोप केले आणि तुला दोषी ठरवले. जेव्हा मी दुसऱ्याशी वैरभावाने आणि रागाने वागतो, तेव्हा मला या पापांपासून दूर फिरण्यास मदत कर, म्हणजे मी कधीही कोणाला दोषी ठरवणार नाही, कोणाचाही न्याय करणार नाही आणि माझा हेतू साधण्यासाठी तुझ्या दैवी नियमाचा कधीही विपर्यास करणार नाही. हे प्रिय प्रभू, केवळ तुझ्या शांतीने आणि प्रेमाने मला भरून टाक. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


मनाचा प्रामाणिकपणा आणि आचरणातील सचोटी

सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा शुक्रवार

“जे उघड होणार नाही असे काहीही लपवलेले नाही, आणि जे कळणार नाही असे कोणतेही गुपित नाही. म्हणून तुम्ही अंधारात जे काही बोललात, ते उजेडात ऐकू येईल; आणि बंद दारांमागे तुम्ही जे कुजबुजलात, ते घरांच्या छपरांवरून जाहीर केले जाईल.” लूक 12:2–3

वर उद्धृत केलेल्या उताऱ्याच्या अगदी आधी येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “परुश्यांच्या खमिरापासून, म्हणजेच त्यांच्या ढोंगीपणापासून, सावध राहा.” याआधीच्या अध्यायात येशूने या धर्मनेत्यांचा अनेकदा अगदी स्पष्ट शब्दांत निषेध केला आहे. त्यांच्या घातक कृत्यांकडे येशू अतिशय गांभीर्याने पाहतो. म्हणून त्या नेत्यांना थेट जाब विचारल्यानंतर तो आपल्या शिष्यांकडे वळतो आणि या ढोंगी नेत्यांच्या वागणुकीच्या परिणामांविषयी त्यांना सावध करतो.

दांभिक माणूस आपल्यात काही नैतिक सद्गुण आहेत असे भासवतो; पण प्रत्यक्षात तो स्वतःचीच फसवणूक करत असतो आणि इतरांनाही फसवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून येशू आपल्या शिष्यांना हे समजावून सांगतात की अखेरीस सर्व सत्य उघड होईल. त्यामुळे प्रत्येक सत्कृत्याचे चांगुलपण शेवटी सर्वांना दिसेल आणि प्रत्येक दुष्ट हेतू, तो कितीही लपवलेला असला तरी, अखेरीस उघड होईल.

हा उतारा ऐकताच, आपल्या मते जे दांभिकपणाच्या पापात पडतात अशा इतर लोकांचा विचार करण्याचा मोह अनेकांना होईल. पण ही सत्ये स्वतःला कशी लागू होतात, यावर मनन करणे अधिक उपयुक्त ठरेल. येशूंचा संदेश साधा आहे: आपण सर्व बाबतींत सत्यनिष्ठ असले पाहिजे. आपण स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे, आपल्या अंतर्मनात काय चालले आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव असली पाहिजे आणि देव आपल्याकडे ज्या दृष्टीने पाहतो, त्याच दृष्टीने आपण स्वतःकडे पाहिले पाहिजे. अशा प्रामाणिकपणाने आणि सचोटीने वागणे हा शाश्वत जीवनासाठी स्वतःची तयारी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आपण जसे नाही तसे असल्याचे सोंग आयुष्यभर घेत राहिलो आणि अंतिम न्यायाच्या वेळी, बदलण्यास फार उशीर झाल्यावरच, सारे सत्य उघड झाले, तर ते किती दुःखद ठरेल!

स्वतःशी प्रामाणिक राहणे कठीण जाऊ शकते. आपण चांगले असावे, पवित्र असावे आणि इतरांनाही आपण तसेच आहोत असे वाटावे, अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. म्हणून आपली केवळ चांगली बाजू इतरांना दाखवणे आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला संकोच वाटेल किंवा आपली मान खाली जाईल अशा अनेक गोष्टी लपवणे, हे आपल्या बाबतीत सर्रास घडते. मनातल्या मनात ज्या पापांशी आपला संघर्ष चालतो, त्यांपैकी प्रत्येक पाप सर्वांना सांगण्याचे नैतिक बंधन आपल्यावर नाही. तरीही, त्या पापांना आपण स्वतः सामोरे जाणे आणि देवाच्या कृपेने तसे करणे नैतिकदृष्ट्या आवश्यक आहे.

हे करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे वरील पवित्र शास्त्रातील उताऱ्यावर मनन करणे. आपल्या हृदयात आणि मनात जे काही आहे, ते कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या प्रकारे उघड होईल, हे येशू स्पष्ट करतात. काहींच्या बाबतीत देवाच्या कृपेने हे याच जीवनात घडेल आणि त्यामुळे त्यांना बदलण्याची संधी मिळेल. इतरांच्या बाबतीत मात्र या गुप्त गोष्टी त्यांच्या अंतिम न्यायाच्या वेळीच उघड होतील. पण सत्य हे आहे की आपण खरोखर कोण आहोत, आपण काय काय विचार करतो आणि गुप्तपणे काय काय करतो, हे सर्व उघड होईल. या विचाराने तुम्हाला काहीशी भीती वाटत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. कधीकधी स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची आणि आपण इतरांपासून लपवलेल्या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळण्यासाठी अशा पवित्र भीतीची गरज असते.

खऱ्या पारदर्शकतेने आणि सचोटीने जगण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे आहे, यावर आज मनन करा. यासाठी सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे आपल्या हृदयातले सर्व काही प्रत्येकाला दिसत आहे, असे समजून प्रत्येक दिवस जगणे. जे अखेरीस उघड होईल त्याबद्दल मनात शांती असावी म्हणून तुमच्यात काही बदल करणे गरजेचे असेल, तर तो बदल इथे आणि आत्ताच घडवून आणण्यासाठी मन लावून प्रयत्न करा. ज्या दांभिकपणाबद्दल परुश्यांचा कठोर निषेध करण्यात आला, त्याच्या अगदी उलट गुण म्हणजे प्रामाणिकपणा आणि मनाचा खरेपणा. या सुंदर सद्गुणांवर मनन करण्यासाठी वेळ द्या आणि प्रभूने तुम्हाला हे गुण द्यावेत म्हणून प्रार्थना करा. अशा रीतीने तुम्हाला इथे आणि आत्ताच खऱ्या सचोटीने जगता येईल आणि न्यायाच्या त्या गौरवशाली दिवसासाठी तयारी करता येईल, जेव्हा सर्व काही “सर्वांना कळेल” आणि “घरांच्या छपरांवरून जाहीर केले जाईल.”

हे सत्य उलगडून दाखवणाऱ्या माझ्या प्रभू, तुला सर्व काही दिसते. माझे अंतःकरण तुला पूर्णपणे ठाऊक आहे. तू मला जसे पाहतोस तसे मला स्वतःकडे पाहता यावे आणि माझ्या अंतःकरणाचा गाभा तुला जसा ठाऊक आहे तसा मलाही जाणता यावा, ही कृपा मला दे. मी खरोखर कोण आहे याविषयीचे सर्वांत खोल सत्य माझ्यासमोर उलगडत असताना, मनापासून बदलण्याची कृपाही मला लाभो, अशी मी प्रार्थना करतो, जेणेकरून माझ्या कृतींनी मी खरोखर तुझा गौरव करू शकेन आणि सर्वांना खरी प्रेरणा देऊ शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


न्यायाला सामोरे जाताना मनःशांती

सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा शनिवार

जेव्हा ते तुम्हाला सभास्थानांसमोर, राज्यकर्त्यांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर नेतील, तेव्हा आपला बचाव कसा करायचा किंवा बचावासाठी काय सांगायचे, अथवा आपण काय बोलायचे, याची चिंता करू नका. कारण त्या क्षणी तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवील.” लूक 12:11–12

सुवार्तेतील हा उतारा येशू आपल्या जीवनात परिपूर्ण रीतीने जगले. त्यांना अटक करण्यात आली, त्यांची चौकशी झाली आणि खोट्या आरोपांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले. मुख्य याजक, हेरोद आणि पोंतियुस पिलात यांनी त्यांना प्रश्न विचारले. चौकशीच्या वेळी ते कधी बोलले, तर कधी मौन राहिले. या चौकशींच्या तयारीसाठी येशूंनी प्रत्येक राज्यकर्त्याचा आधीच अभ्यास करून काय बोलावे आणि काय बोलू नये, याचा अंदाज बांधला नाही. त्यांनी स्वतःच्या बचावाची तयारी केली नाही. उलट, आपल्या मानवी स्वभावात प्रत्येक क्षणी मार्गदर्शन मिळावे यासाठी ते पवित्र आत्मा आणि पिता यांच्याशी असलेल्या आपल्या परिपूर्ण ऐक्यावर विसंबून राहिले.

तुमच्या श्रद्धेमुळे तुम्हाला अटक होण्याची आणि तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून नागरी अधिकाऱ्यांनी तुमच्यावर खटला चालवण्याची शक्यता कमी असेल. तरीही, इतर प्रकारच्या चौकशीला किंवा दोषारोपांना तुम्हाला कधी कधी सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी काय उत्तर द्यावे, हे तुमच्यासाठी आव्हान ठरू शकते. त्याहून अधिक शक्यता अशी आहे की, कोणी तुम्हाला दोषी ठरवले, तर रागाच्या भरात स्वतःचा बचाव करताना त्याच्यावर उलट टीका करण्याचा मोह तुम्हाला होईल.

शुभवर्तमानातील हा उतारा नीट समजून घेऊन त्याप्रमाणे जगलात, तर कोणीही तुमच्याविषयी कसाही निर्णय केला तरी तुम्हाला शांत राहण्यास मदत होईल आणि धीर मिळेल. कॅथलिक चर्चची धर्मशिक्षणसंहिता असे सांगते: “घाईघाईने मत बनवणे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याचे विचार, शब्द आणि कृती यांचा शक्य तितका अनुकूल अर्थ लावण्याची काळजी घ्यावी” (# 2478). तुम्ही स्वतः असे वागण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे; तरीही इतर जण तुमच्याशी तितक्याच काळजीने आणि सत्यनिष्ठेने वागणार नाहीत, असे प्रसंग बहुधा येतील. म्हणून, दुसऱ्या कोणी तुमच्याविषयी निर्णय केला आणि त्याच्या बोलण्यात काही तथ्य असले, तरी पवित्र आत्म्याने तसे करण्यास अगदी स्पष्टपणे मार्गदर्शन केले नसेल, तर रागाने स्वतःची बाजू सावरायला धावू नका. येशूचा मुख्य संदेश असा आहे: पवित्र आत्म्याच्या प्रत्येक प्रेरणेनुसार वागण्याचा नम्रपणे आणि सातत्याने प्रयत्न कराल, तर तो तुम्हाला नेहमी मार्ग दाखवेल, असा विश्वास ठेवा. तुमच्या सदसद्विवेकबुद्धीत ऐकू येणाऱ्या देवाच्या वाणीकडे लक्ष देण्याची पक्की सवय तुम्ही लावून घेतली असेल, तरच हे शक्य आहे.

कोणी आपल्याविषयी घाईघाईने मत बनवणे, आपले खरे दोष विनाकारण इतरांना सांगून आपली बदनामी करणे, आपल्यावर खोटे आरोप लावणे अशा गोष्टी वेदनादायक असतात. म्हणून अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी आधीपासूनच तयारी करा: प्रत्येक गोष्टीत केवळ पवित्र आत्म्यावर विसंबून राहायला शिका. येशू आपल्याला हेच करण्याचे आवाहन करतो! म्हणून दररोज नम्रपणे देवाची इच्छा पूर्ण करण्याचा, त्याची वाणी ऐकण्याचा आणि उदार मनाने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केलात, तर अशा प्रकारच्या दोषारोपांना सामोरे जाण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही तयार असाल, याची खात्री बाळगा. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल, तुम्हाला प्रेरणा देईल, तुमचे सांत्वन करेल आणि देवाच्या इच्छेनुसार प्रतिसाद देण्यासाठी लागणारी सर्व कृपा तुम्हाला देईल. याबद्दल शंका बाळगू नका. आपल्या प्रभूच्या या शब्दांवर श्रद्धा ठेवा आणि त्याच्या या वचनावर विश्वास ठेवा.

इतरांनी तुमच्याविषयी निर्णय केला तेव्हा पूर्वी तुम्ही कसा प्रतिसाद दिलात, यावर आज चिंतन करा. असे घडलेले काही विशिष्ट प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हीही उलट त्यांच्याविषयी तसेच मत बनवले का? तुमचे मन रागाने भरून गेले का? झालेली दुखापत तुम्ही मनात घोळवत राहिलात का? तुमच्या मनाची शांती हरपली का? या प्रलोभनांना तुम्ही बळी पडला असाल, तर येशू आज जे सांगतो त्यावर श्रद्धेने विश्वास ठेवण्याचा निर्धार करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. भविष्यात अशा कठीण प्रसंगी तो तुमच्याबरोबर असेल, असा भरवसा ठेवा. पवित्र आत्मा दाखवेल त्याच मार्गाने प्रतिसाद देण्याची कृपा तुम्हाला मिळावी म्हणून प्रार्थना करा.

माझ्या निरपराध प्रभू, तुझ्यावर खटला चालवण्यात आला, तुझा न्याय करण्यात आला आणि खोट्या आरोपांवरून तुला दोषी ठरवण्यात आले. तरीही, या सगळ्यात तू ते निष्कलंक कोकरू होतास, ज्याने नेहमी परिपूर्ण प्रेम केले आणि सत्य सांगण्यात कधीही कसूर केली नाही. माझ्या जीवनात जेव्हा इतर लोक माझा न्याय करतात, तेव्हा माझे हृदय शांतीने भरून टाक आणि तुझ्या या वचनावर मला भरवसा ठेवू दे: पवित्र आत्मा माझ्यासोबत राहील, मला प्रेरणा देईल आणि तुझ्या परिपूर्ण इच्छेनुसार मला मार्ग दाखवील. हे पवित्र आत्म्या, आता आणि सदैव मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अनुक्रमणिका


चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल