मराठी

पहिला दिवस: आपल्या प्रभूबरोबर प्रवास

राखेचा बुधवार

राखेच्या बुधवारी मिस्साला उपस्थित राहणे बंधनकारक नसले, तरी आपल्या चर्चच्या उपासना दिनदर्शिकेतील ज्या उत्सवांना सर्वाधिक उपस्थिती असते, त्यांपैकी हा एक आहे. दरवर्षीचा प्रायश्चित्तकाळ फलदायी ठरावा आणि त्यातून आपल्या जीवनात परिवर्तन घडावे, अशी आपल्या अंतःकरणात इच्छा आहे, हेच कदाचित या उपस्थितीतून दिसते. बाप्तिस्म्यानंतर लगेच आणि सार्वजनिक सेवाकार्य सुरू करण्याच्या अगोदर येशूने वाळवंटात चाळीस दिवस घालवले. प्रायश्चित्तकाळाचे हे चाळीस दिवस म्हणजे त्या दिवसांचे आदरपूर्वक स्मरण करण्याचा आणि येशूचे अनुकरण करण्याचा काळ आहे. त्या चाळीस दिवसांत येशूने उपवास केला आणि प्रार्थना केली. त्यानंतर त्याने स्वतःहून सैतानाच्या प्रत्येक मोहाला तोंड दिले. आपल्यालाही याच मोहांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच आपल्या प्रभूने देहाला तीव्र भूक लागलेली असताना आणि पूर्ण एकांतात या मोहांना तोंड दिले.

प्रायश्चित्तकाळाचा प्रवास सुरू करताना एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, उपवास करणे, आज आणि शुक्रवारी मांसाहार वर्ज्य करणे, प्रार्थनेसाठी अधिक वेळ देणे आणि प्रेम व सेवाभावाची अधिकाधिक कृत्ये करणे, अशी आपली परंपरा आहे. ही चिंतने तुम्हाला एकेक पाऊल पुढे नेत वाळवंटात आपल्या प्रभूच्या सहवासात घेऊन जातील, जेणेकरून त्याचे अनुकरण करत तुम्ही प्रायश्चित्तकाळातील ही कर्तव्ये अधिक आस्थेने पार पाडू शकाल. त्या दिवसांत येशूला कशातून जावे लागले, यावर तुम्ही मनन कराल. त्याला जे जाणवले ते तुम्हाला जाणवेल, त्याने जे अनुभवले ते तुम्ही अनुभवाल. तुम्ही त्याच्या कृतींचे अनुकरण कराल, त्याच्याबरोबर उपवास व प्रार्थना कराल आणि त्याने ज्या मोहांना तोंड देऊन त्यांच्यावर मात केली, त्यांना तुम्हीही सामोरे जाल.

या राखेच्या बुधवारी आधी संपूर्ण चित्र समजून घेण्यासाठी थोडा वेळ मनन करा, म्हणजे येत्या दिवसांत येशूने वाळवंटात घालवलेल्या काळाच्या प्रत्येक तपशिलाकडे तुम्हाला लक्ष देता येईल. येशू हा देवाचा पुत्र असून त्याने मानवी स्वभाव धारण केला, या मूलभूत सत्यावर चिंतन करा. मग, नेमलेल्या वेळी त्याने स्वतःच्या इच्छेने वाळवंटात जाण्याचे ठरवले आणि भूक, उष्णता, एकांत, संघर्ष व मोह यांना सामोरे जाण्याचा काळ स्वेच्छेने स्वीकारला. त्याच्या त्या चाळीस दिवसांचे फल किती महान आहे, हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी एक आयुष्यही पुरणार नाही; अनंतकाळातही ते समजून घेण्याचा प्रवास चालू राहील. तरीही या प्रवासाला स्वतःला बांधून घ्या. मन खुले ठेवण्याचा निश्चय करा. वाळवंटात आपल्या प्रभूच्या सहवासात वेळ घालवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याचा निश्चय करा. लक्षात ठेवा, हा प्रवास सोपा नसेल आणि बहुधा सुखदही नसेल; पण तो आवश्यक आहे. तो योग्य रीतीने आणि मनापासून केलात, तर तो विलक्षण फलदायी ठरेल. देवाने तुमच्यावर सोपवलेल्या कार्याची तयारी करण्यासाठी वाळवंटात आपल्या प्रभूबरोबर राहण्याची हीच पहिली आणि एकमेव संधी आहे, अशा भावनेने हा प्रायश्चित्तकाळ स्वीकारा.

हे माझ्या दिव्य प्रभू, प्रार्थना व उपवास करण्यासाठी आणि मोहांना सामोरे जाण्यासाठी तू स्वेच्छेने वाळवंटात गेलास. तुझ्या जीवनातील हा काळ तू मनापासून स्वीकारलास. त्यातून मलाही तुझ्याबरोबर प्रवास करण्याचे आमंत्रण मिळते. या प्रायश्चित्तकाळाच्या आरंभी तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून वाळवंटात जाण्याचा मी दृढ निश्चय करतो. त्याग, प्रायश्चित्त आणि प्रार्थनेचा हा काळ निभावून नेण्याचा मी निश्चय करतो. तुझ्या प्रवासात मला तुझी सोबत करू दे, म्हणजे तुला जे उमगले ते मलाही उमगेल, तू जे सहन केलेस ते मलाही सहन करता येईल, तुला ज्याला सामोरे जावे लागले त्याला मलाही सामोरे जाता येईल आणि तू ज्या सर्व गोष्टींवर मात केलीस त्यांवर मलाही मात करता येईल. हे चाळीस दिवस सुरू करताना माझ्या मनात थोडी अनिच्छा आहे. तरी हा प्रायश्चित्तकाळ खरोखर फलदायी व्हावा म्हणून जे काही करणे आवश्यक आहे, ते करण्याचे धैर्य मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हेही पाहा: पहिले चिंतन – क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस

अनुक्रमणिका

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य