
यानंतर, आता सर्व काही पूर्ण झाले आहे हे जाणून, पवित्र शास्त्रातील वचन पूर्ण व्हावे म्हणून येशू म्हणाला, “मला तहान लागली आहे.” तेथे साध्या द्राक्षारसाने भरलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी द्राक्षारसात भिजवलेला स्पंज हिसोपाच्या एका फांदीवर ठेवला आणि तो त्याच्या मुखाजवळ नेला. योहान 19:28-29
“मला तहान लागली आहे,” हे आपल्या पुत्राचे शब्द ऐकताच, त्याची तहान भागवावी असे आपल्या धन्य मातेला लगेच वाटले असेल. तिला त्याच्या शरीराच्या तहानेची जाणीव होती, पण त्याच्या आध्यात्मिक तहानेची तिला त्याहूनही अधिक जाणीव होती.
शिपायाने स्पंज द्राक्षारसात भिजवून येशूच्या ओठांना लावला, तेव्हा त्या दयाळू कृतीने तिला थोडा दिलासा मिळाला असेल. पण त्या कृतीतला खोल अर्थही तिला उमगला असेल. तो शिपाई पतित मानवजातीचे प्रतीक होता, तर आंबट द्राक्षारस आपल्या विस्कटलेल्या अवस्थेचे प्रतीक होता. पण नेमके या अवस्थेतूनच आपल्याला मुक्त करण्याची येशूला उत्कट इच्छा होती. त्याला “ताजा द्राक्षारस” किंवा “झऱ्याचे निर्मळ पाणी” नको होते. त्याला पतित मानवजात हवी होती. आपण आपल्या दुर्बलतेसह आणि पापांसह त्याच्याकडे यावे, हीच त्याची तहान होती. या प्रतीकाचा गहन अर्थ आपल्या धन्य मातेला उमगला असेल.
आजही येशू आर्त स्वरात म्हणतो, “मला तहान लागली आहे!” त्याला तुमची तहान आहे. कित्येकदा आपल्याला वाटते की त्याची तहान भागवायला त्याच्याकडे जायचे असेल, तर आपण देवदूतांसारखे निष्पाप असले पाहिजे. आपण पापाविना त्याच्याकडे गेलो तरच येशू आपल्याकडे पाहून हसेल, असेही आपल्याला कित्येकदा वाटते. पण हे खरे नाही. आपण आपल्या भग्न अवस्थेतही त्याच्याकडे जाऊ शकावे, म्हणूनच त्याने इतके क्रूर मरण पत्करले. दुःख सोसणाऱ्या, तहानलेल्या ख्रिस्ताकडे आपण आपली पापे आणि आपल्या जीवनातला विस्कळीतपणा घेऊन येतो. आपण ताजा द्राक्षरस नाही, तर आंबट द्राक्षरस आहोत. पण अशा अवस्थेतही आपण आपल्या प्रभूकडे येतो, तेव्हा त्याची तहान भागते.
तुमच्या आत्म्याची अवस्था कशी आहे? तुम्हाला तुमच्या पापाची लाज वाटते का? तुम्ही परिपूर्ण असाल तरच येशू तुमचा स्वीकार करील, असे समजून तुम्ही खोटा आव आणता का? हा समज सत्यापासून फार दूर आहे. आपल्या सर्व दुर्बलता, संघर्ष आणि पापे घेऊन आपल्या प्रभूकडे यायला कचरू नका. तो काय विचार करील किंवा काय म्हणेल, याची काळजी करू नका. त्याच्याकडे या. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, तर पापी असतानाही स्वतःला नम्रपणे त्याला अर्पण करण्याच्या तुमच्या कृतीने त्याच्या आत्म्याला दिलासा मिळेल.
आज, मरणाच्या क्षणी आपल्या प्रभूने उच्चारलेल्या त्या पवित्र उद्गारांवर चिंतन करा: “मला तहान लागली आहे.” त्याला तुमचीच तहान आहे आणि तुम्ही जसे आहात तसेच त्याला हवे आहात, हे जाणून घ्या. त्याच्याकडे जा, स्वतःला त्याच्या स्वाधीन करा आणि त्याला आनंद द्या. आपल्या धन्य मातेचे तुमच्याकडे लक्ष आहे. तिच्या दैवी पुत्राच्या हृदयातील आस तुम्ही पूर्ण करावी, याची ती वाट पाहत आहे.
माझ्या परमप्रिय माते, तुझ्या पुत्राच्या हृदयातील आध्यात्मिक तहान तुला जाणवली. त्याला माझी आणि संपूर्ण मानवजातीची तहान होती, हेही तू जाणलेस. तुझ्या दैवी पुत्राच्या ओठांशी नेलेल्या त्या आंबट द्राक्षरसासारखे मला होता यावे, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर.
माझ्या प्रेमळ माते, मला माझे पाप दिसावे आणि अशा अवस्थेतही तुझ्या पुत्राकडे जायला मी कचरू नये, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. माझ्या दुर्बल अवस्थेतही त्याच्याकडे येण्याचे धैर्य मला मिळावे, जेणेकरून तुझ्या पुत्राच्या हृदयाची आणि तुझ्या स्वतःच्या निष्कलंक हृदयाची तहान मला भागवता येईल, अशी मी प्रार्थना करतो.
हे माझ्या तहानलेल्या प्रभू, क्रुसावरून तू उच्चारलेल्या शब्दांतून तुझ्या आध्यात्मिक हृदयातील आस पूर्ण करण्यासाठी तू मला बोलावलेस, हे मला ठाऊक आहे. मी जसा आहे तसाच तू माझ्यावर प्रेम करतोस, असा विश्वास ठेवायला मला मदत कर. तुझ्या दयेवर भरवसा ठेवून आज तुझ्याकडे वळण्याचे धैर्य मला दे. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करायला मला मदत कर.
हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध!

