
ज्ञानी पुरुषांनी आपल्याला फसवले आहे, हे लक्षात येताच हेरोद संतापला. ज्ञानी पुरुषांकडून त्याने जाणून घेतलेल्या वेळेनुसार, बेथलेहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षे व त्याहून कमी वयाच्या सर्व मुलांची कत्तल करण्याचा त्याने हुकूम दिला. मत्तय 2:16
मरिया मातेला हेरोदाच्या संतापाची पूर्ण जाणीव होती. आपल्या स्वतःच्या पुत्रामुळे असंख्य निरपराध बालकांना प्राण गमवावे लागले, हे तिला माहीत होते. येशूचे रक्षण करण्यासाठी ती आणि संत योसेफ इजिप्तला पळून गेले होते. हे हेरोदाला कळले तेव्हा त्याने त्या सर्व अनमोल बालकांची कत्तल करण्याचा हुकूम दिला.
काही लोक किती दुष्टपणा करू शकतात, हे पाहून धक्का बसतो आणि मन सुन्न होते. हेरोद असे कृत्य कसे करू शकला? आणि तेही मरियेच्या स्वतःच्या पुत्रामुळे, येशूमुळे, तो असे कसे करू शकला? आपल्या आणि आपल्या पुत्राच्या जीवनावर दुःखाची व वेदनेची छाया असेल, याची तिला मिळालेली पहिली स्पष्ट खूण म्हणजे ही कत्तल.
पण त्या पवित्र बालकांच्या हौतात्म्याने आपल्याला केवळ धक्का बसून दुःख होणे पुरेसे नाही. त्यांच्या यातनांपलीकडे पाहून त्यांनी दिलेली साक्ष आपण ओळखली पाहिजे. देवाच्या पुत्रामुळे त्यांना यातना सोसाव्या लागल्या. खऱ्या अर्थाने ते हुतात्मे होते.
दुःखाचा पूर्ण मनाने स्वीकार करणे हे एक पवित्र पाचारण आहे, हे त्या निरपराध बालकांच्या यातनांतून आपण शिकले पाहिजे. विशेषतः आपला काहीही दोष नसताना आपल्याला दुःख सोसावे लागते, तेव्हा हे अधिकच खरे ठरते. दुसऱ्याच्या दुष्टपणाला सामोरे जावे लागते तेव्हा अनेकदा आपण आपल्यावर झालेला अन्याय बोलून दाखवतो, संतापतो आणि प्रतिकार करायला उठतो. पण त्या निरपराध हुतात्म्यांनी असे केले नाही.
अनेक वर्षांनंतर मरिया माता आपल्या पुत्राच्या क्रुसासमोर उभी होती, तेव्हा त्याने पूर्ण मनाने आणि स्वेच्छेने हौतात्म्य स्वीकारले आहे, याची तिला जाणीव झाली असेल. अनेक वर्षांपूर्वी ज्या मरणापासून तो वाचला होता, तेच मरण आता त्याला आले होते. आपल्या पुत्राने क्रुसावर स्वेच्छेने स्वीकारलेल्या बलिदानाचे चिंतन करताना तिने इतक्या वर्षांपूर्वी मरण पावलेल्या त्या निरपराध बालकांचाही विचार केला असेल.
ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे, या स्वीकारायला कठीण असलेल्या सत्यावर आज चिंतन करा. जीवनात अन्यायाने सोसाव्या लागणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या दुःखाचा स्वीकार करून तुम्हाला ही साक्ष द्यायची आहे. हे दुःख राग न धरता, विरोध न करता, स्वेच्छेने स्वीकारण्याचे पाचारण तुम्हाला आहे. आपला प्रभू तुम्हाला कोणत्या प्रकारचे हौतात्म्य स्वीकारण्यास बोलावत आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे करताना, अशा गौरवशाली साक्षीत सहभागी होण्यास तुम्ही पात्र ठरलात, याचा आनंद माना.
परमप्रिय माते, तुझे सामर्थ्य गौरवशाली आहे. तुझ्या जीवनात तू इतकी क्रूरता पाहिलीस, तरी तुझी श्रद्धा कधीच ढळली नाही. तुझे हौतात्म्य हे आत्म्याने सोसलेले हौतात्म्य होते आणि ते तुझ्या अढळ प्रेमातून आले.
प्रिय माते, माझ्या सभोवतालच्या जगातील दुष्टपणा पाहताना मी कधीही रागाच्या किंवा निराशेच्या आहारी जाऊ नये म्हणून मला मदत कर. तुझ्या मातृवत मध्यस्थीवर सदैव भरवसा ठेवून श्रद्धेत आणि आशेत अढळ राहण्यास मला मदत कर.
प्रिय प्रभू, जगातील तुझ्या स्वतःच्या उपस्थितीमुळे निरपराधांना दुःख सोसावे लागले आणि तू ते होऊ दिलेस. जेव्हा तू मला दुःख सोसू देतोस, तेव्हा हौतात्म्याची ही रूपे धैर्याने आणि आशेने स्वीकारण्यासाठी मला आवश्यक ते सामर्थ्य आणि कृपा दे. तुझ्या आणि त्या पवित्र निरपराध बालकांच्या गौरवशाली उदाहरणाचे मला अनुकरण करता येवो.
हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तेरावा दिवस – एका मातेचे चिंतन
ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध!

