मराठी

तेरावा दिवस – एका मातेचे चिंतन


व्हिडिओ आवृत्ती

त्याला पाहून त्याच्या आईवडिलांना आश्चर्य वाटले. त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याशी असे का वागलास? तुझे वडील आणि मी किती काळजीत पडून तुला शोधत होतो!” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही मला का शोधत होतात? मी माझ्या पित्याच्या घरी असले पाहिजे, हे तुम्हाला माहीत नव्हते का?” पण तो त्यांना काय म्हणाला, हे त्यांना समजले नाही. तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथला आला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या हृदयात जपून ठेवल्या. लूक 2:48-51

आपली धन्य माता क्रुसाच्या पायथ्याशी उभी होती, तेव्हा तिला कदाचित तो प्रसंग आठवला असेल, जेव्हा बारा वर्षांचा येशू तीन दिवस यरुशलेममध्ये मागे राहिला होता. आपली धन्य माता आणि संत योसेफ यरुशलेमला परतले आणि त्यांनी येशूचा कसून शोध घेतला. अखेर तो त्यांना मंदिरात धर्मशिक्षक आणि धर्मनेते यांच्यासोबत सापडला.

त्या वेळी बाल येशू इस्राएलच्या धर्मशिक्षकांमध्ये बसला होता. त्याचे बोलणे ऐकून ते फार प्रभावित झाले. त्याने त्यांना विचार करायला लावणारे, विषयाच्या मुळाशी जाणारे प्रश्न विचारले आणि आपल्या वयाच्या मानाने विलक्षण सुज्ञता दाखवली. पवित्र शास्त्र सांगते की, “त्याचे बोलणे ऐकणारे सर्व जण त्याची समज आणि त्याची उत्तरे पाहून थक्क झाले” (लूक 2:47). अवघ्या दोन दशकांनंतर, हेच धर्मनेते आपल्या पुत्राला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत असल्याचे पाहून आपल्या धन्य मातेला फार दुःख झाले. येशूच्या सार्वजनिक सेवाकार्याच्या त्या तीन वर्षांत हे धर्मनेते आपल्या पुत्राच्या विरोधात कसे उभे राहिले, हे तिने पाहिले. त्याला प्रश्नांच्या जाळ्यात पकडण्याचा, त्याच्यावर आरोप करण्याचा आणि त्याच्या गहन सुज्ञतेला कमी लेखण्याचा ते प्रयत्न करत होते. एवढ्या वर्षांत किती फरक पडला होता! बारा वर्षांच्या मुलाच्या तोंडून जे ऐकताना त्यांना कुतूहल वाटले होते, तेच तीस वर्षांच्या मनुष्याच्या तोंडून ऐकताना त्यांना धोक्याचे वाटू लागले. आता ते धर्मनेते त्याचा हेवा आणि मत्सर करू लागले होते. मुख्यतः त्यांच्या मनात नव्याने निर्माण झालेल्या या द्वेषामुळेच ती आता वधस्तंभावर खिळलेल्या आपल्या पुत्रासमोर उभी होती. तो आपल्या मानवी जीवनाचे बलिदान अर्पण करत असताना ती त्याच्याकडे पाहत होती.

आपण आपल्या प्रभूच्या आणि आपल्या धन्य मातेच्या अधिक जवळ जातो, तेव्हा आपल्या जीवनातही काही लोक आपल्या विरोधात उभे राहतात, असे आपल्याला दिसून येऊ शकते. येशूला जशी वागणूक मिळाली, तशीच वागणूक आपल्यालाही मिळू शकते, याची तयारी आपण ठेवली पाहिजे. कधी कधी जे एकेकाळी आपले मित्र होते, तेच आपला सर्वांत जास्त छळ करू लागतात.

येशूवरील तुमच्या श्रद्धेमुळे जे लोक तुमच्या विरोधात गेले किंवा ज्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांच्याशी आलेल्या अनुभवांवर आज चिंतन करा. आपल्या प्रभूला ज्या प्रमाणात हे सहन करावे लागले, त्या प्रमाणात सर्वांनाच ते सहन करावे लागत नाही. पण असा अनुभव आला, तर त्यातून गोंधळ, मनस्ताप, राग आणि अगदी निराशाही निर्माण होऊ शकते. आपल्या पुत्राशी होत असलेले क्रूर वर्तन पाहताना आपल्या धन्य मातेने त्याला अशी वागणूक देणाऱ्या धर्मनेत्यांना क्षमा केली असेल. स्वतः दुःखात असतानाही तिने त्यांच्यावर दया केली असेल आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली असेल. आपल्या प्रभूचे आणि आपल्या धन्य मातेचे अनुकरण करून आपणही तसेच करावे, असे आपल्याला आवाहन आहे.

माझ्या प्रिय धन्य माते, येशू अजून लहान होता तेव्हा मंदिरातील धर्मनेते त्याचे बोलणे ऐकून आणि त्याची सुज्ञता पाहून थक्क झाले. त्यांची ही प्रतिक्रिया पाहून तुलाही आश्चर्य वाटले. पुढे तुझ्या पुत्राच्या सार्वजनिक सेवाकार्याच्या काळात हेच धर्मनेते त्याच्या विरोधात कसे उभे राहिले, हेही तू पाहिलेस. त्याच्याविषयी वाटणाऱ्या आपुलकीची जागा तिरस्काराने आणि विस्मयाची जागा मत्सराने घेतली, हे तू पाहिलेस.

माझ्या प्रिय माते, जेव्हा मी तुझ्या पुत्राचे साधन बनून त्याच्या सुज्ञतेचे शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते शब्द सर्वांनाच पटतात असे नाही. मी नेहमी क्षमा करावी आणि वधस्तंभासमोर उभी असताना तुझ्या ठायी जी श्रद्धा आणि आशा होती, त्याच श्रद्धेने आणि आशेने माझ्याविषयीचे गैरसमज आणि माझी होणारी थट्टा स्वीकारावी, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर.

हे प्रिय प्रभू येशू, तू तुझी परिपूर्ण सुज्ञता आणि प्रेम यांची घोषणा जगाला करणे कधीही थांबवले नाहीस. पुष्कळांनी तुझे शब्द स्वीकारले, पण पुष्कळांनी ते स्वीकारले नाहीत. तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचे मला आवाहन आहे, हे समजून घेण्यास मला मदत कर. माझा किंवा इतर कोणाचा छळ झाला, तरी त्यामुळे माझ्या श्रद्धेला कधीही ठेच लागू नये किंवा ती डळमळू नये, यासाठी मला मदत कर. तुझ्याशी आणि तुझ्या पवित्र वचनाच्या घोषणेशी मला सदैव एकनिष्ठ ठेव. 

हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

चौदावा दिवस – “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा”

अनुक्रमणिका

ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध!