मराठी

सामान्य काळातील चोविसावा आठवडा

चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अनुक्रमणिका

क्षमा न करण्याची यातना

सामान्य काळातील चोविसावा रविवार (वर्ष अ)

“‘अरे दुष्ट सेवका! तू मला विनवणी केलीस म्हणून मी तुझे सगळे कर्ज माफ केले. जशी मी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सहकारी सेवकावर दया करायला नको होतीस का?’ मग त्याच्या धन्याने रागाने त्याला छळ करणाऱ्यांच्या हवाली केले, जेणेकरून तो आपले संपूर्ण कर्ज फेडेपर्यंत त्यांच्या ताब्यात राहील. तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही, तर माझा स्वर्गीय पिता तुमच्याशीही असेच वागेल.” मत्तय 18:32–35

प्रेम, आपुलकी, सौम्यता, दया… या आणि यांसारख्या अनेक गुणांवर विचार करणे सोपे आहे. सद्गुणांत वाढून पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला त्यांच्यापासून मिळते. पण कधीकधी आपल्याला याहून अधिक काहीतरी लागते. पवित्र जीवनाचा स्वीकार करण्यासाठी सद्गुणांच्या आणि पवित्र आत्म्याच्या फळांच्या सौंदर्याचे चिंतन करणे कधीकधी पुरेसे ठरत नाही. याच कारणांपैकी एका कारणासाठी आजचा दाखला आपल्याला दिला आहे.

लोयोलाचे संत इग्नेशियस यांच्या आध्यात्मिक साधना या ग्रंथात तीस दिवसांच्या वैयक्तिक आध्यात्मिक साधनाशिबिराची रूपरेषा दिली आहे. तिच्या आधारे आध्यात्मिक मार्गदर्शक साधकाला मार्गदर्शन करू शकतो. इग्नेशियस तीस दिवसांसाठी चिंतनाचे विषय सुचवतात. विशेष म्हणजे, ज्या सुंदर सद्गुणांचे आचरण करण्यास साधकाला बोलावले आहे, त्यांचे चिंतन करण्यास सांगून ते सुरुवात करत नाहीत. त्याऐवजी, पहिल्या आठवड्यात ते साधकाला पापाची भीषणता आणि पापामुळे आत्म्याचे होणारे भयंकर नुकसान यांवर चिंतन करायला लावतात. त्यामुळे साधकाला स्वतःच्या पापांची अधिक स्पष्ट जाणीव होते. पुढील तीन आठवड्यांत ख्रिस्ताच्या प्रेरणादायी जीवनाचे आणि त्याच्या अनेक सद्गुणांचे चिंतन करण्यासाठी त्याचे मन अधिक चांगल्या प्रकारे तयार होते.

एका अर्थाने, इग्नेशियस यांच्या पद्धतीनुसार केलेल्या आध्यात्मिक साधनेच्या पहिल्या आठवड्यात चिंतन करण्यासाठी आजचे शुभवर्तमान अगदी योग्य आहे. त्याच कारणाने, आपले आध्यात्मिक जीवन नीट मार्गावर आणावेसे वाटते, तेव्हाही या शुभवर्तमानाचे चिंतन करणे उपयुक्त ठरते. ख्रिस्ती जीवनाच्या वाटचालीत ‘आपले सगळे ठीक चालले आहे’ असे समजून गाफील राहणे फार सोपे आहे. प्रार्थनेत आणि अगदी आपल्या नैतिक जीवनातही उदासीनता येणे सोपे आहे. तुमच्या बाबतीत थोडे जरी असे होत असेल, तर या शुभवर्तमानाचे काळजीपूर्वक आणि सखोल चिंतन करा.

या उताऱ्यात येशू क्षमा न करण्याच्या पापाबद्दल बोलतो. जे इतरांना क्षमा करण्यास नकार देतात, त्यांच्यावर देवाचा कोप कसा ओढवेल, हे या उताऱ्यात स्पष्टपणे दाखवले आहे. ज्या ‘दुष्ट सेवका’ला उद्देशून हे शब्द म्हटले आहेत, त्याचे ‘प्रचंड मोठे कर्ज’ देवाने माफ केले होते. तो सेवक म्हणजे आपण सगळेच. आपल्यापैकी प्रत्येकाचे इतके मोठे कर्ज देवाने माफ केले आहे, की त्यासाठी येशूला स्वतःचा जीव द्यावा लागला. आपल्या पापांचा परिणाम म्हणजे देवाच्या पुत्राचा मृत्यू. आपल्यापैकी प्रत्येक जण मृत्युदंडास पात्र आहे. पण पापांच्या क्षमेमुळे मृत्यूच आता नव्या जीवनाचे साधन बनला आहे. आपल्याला पापांची क्षमा आणि आपली वाट पाहत असलेले नवे जीवन प्राप्त करायचे असेल, तर देवाच्या क्षमेत आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. आपण केवळ त्याची क्षमा स्वीकारून चालणार नाही; ज्यांनी आपल्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांनाही आपण क्षमा केली पाहिजे. पूर्णपणे. अगदी मनापासून. काहीही राखून न ठेवता.

या दाखल्यात दुष्ट सेवकाने आपल्या सहकारी सेवकाचे किरकोळ कर्ज माफ केले नाही. खरे तर, आपल्याविरुद्ध केलेले कोणतेही पाप देवाच्या दृष्टीने कितीही गंभीर असले, तरी देवाचे आपल्यावर जे कर्ज आहे त्याच्या तुलनेत ते किरकोळच आहे. म्हणून क्षमा करायला आपण कधीही कचरू नये. कधीच नाही. क्षमा करणे तुम्हाला कठीण जात असेल आणि देवाची दया, आपुलकी, करुणा आणि प्रेम यांचे चिंतन करूनही प्रत्येकाला पूर्णपणे क्षमा करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळत नसेल, तर या दाखल्यावर चिंतन करण्यासाठी वेळ द्या. “अरे दुष्ट सेवका! तू मला विनवणी केलीस म्हणून मी तुझे सगळे कर्ज माफ केले. जशी मी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सहकारी सेवकावर दया करायला नको होतीस का?” जेव्हा आपण अंतःकरणाच्या तळापासून पूर्ण क्षमा करत नाही, तेव्हा हे शब्द आपल्यालाच उद्देशून आहेत. आपण काय केले पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी येशूने दयेने उच्चारलेले हे शब्द आहेत.

या उताऱ्यावरील संत थॉमस अक्विनास यांच्या भाष्यानुसार, आपण क्षमा केली नाही तर ज्या ‘छळ करणाऱ्यांच्या’ हवाली आपल्याला केले जाईल, ते म्हणजे दुरात्मे. आपण इतरांना क्षमा करत नाही तेव्हा ते आपल्याला यातना देतात. सध्या हा छळ असा अनुभवास येतो: आपण आपल्या मनाच्या जखमांबद्दल सतत विचार करत राहतो, सूडाचे विचार मनात घोळवत राहतो, राग धरून बसतो आणि मनःशांती गमावतो. हे दुरात्म्यांचे काम आहे. आपण क्षमा करेपर्यंत ते अशाच प्रकारे आपल्याला छळत राहतील.

ख्रिस्ती जीवनात क्षमा करणे किती अनिवार्य आहे, यावर आज चिंतन करा. दया दाखवणे अन्यायकारक वाटू शकते. काटेकोर न्यायाच्या दृष्टीने ते तसे आहेही. पण स्वातंत्र्य आणि स्वर्गीय सद्गुण यांच्या दृष्टीने पाहिले, तर दया दाखवणे अगदी योग्य ठरते. क्षमा करायला कचरू नका. तुम्ही अगदी अंतःकरणापासून क्षमा केलीत, तर देव स्वर्गराज्याची संपदा तुमच्यावर विपुल प्रमाणात ओतेल.

हे परमदयाळू प्रभू, तू माझे फार मोठे कर्ज माफ केले आहेस. माझ्या पापाची किंमत तुला क्रुसावर प्राण देऊन चुकवावी लागली. या देणगीबद्दल माझे हृदय इतके कृतज्ञतेने भरून टाक की मीही इतरांवर तितकीच दया करीन. अशी दया दाखवण्यात मी कधीही डळमळू नये, म्हणजे क्षमा न केल्याने होणाऱ्या यातनांतून माझी सुटका होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आध्यात्मिक जीवनात उलट दिशेने वळणे

सामान्य काळातील चोविसावा रविवार (वर्ष ब)

त्याने लोकसमुदायाला व आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, “ज्याला माझ्यामागे यायचे आहे, त्याने स्वतःचा त्याग करावा, आपला क्रूस उचलावा आणि माझ्यामागे यावे. कारण जो आपला जीव वाचवू पाहतो तो तो गमावील; पण जो माझ्यासाठी आणि सुवार्तेसाठी आपला जीव गमावतो तो तो वाचवील.” मार्क 8:34–35

प्रत्यक्ष जीवनात आपण येशूचे अनुसरण कसे करावे आणि आपल्या आत्म्याचे तारण कसे साधावे? येशूवर आपला विश्वास आहे असे जाहीर करणे पुरेसे आहे का? येशू हाच देव आणि जगाचा तारणारा आहे, या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलो, तर तेवढ्याने आपले तारण होईल का? मुळीच नाही. दुष्ट आत्मेसुद्धा हे सत्य मानतात. तारणासाठी आपल्याकडून कृती आवश्यक आहे, हे येशू स्पष्टपणे सांगतो. आपण स्वतःचा त्याग केला पाहिजे, आपापला क्रूस उचलला पाहिजे आणि त्याच्यामागे गेले पाहिजे. इतकेच नव्हे, तर तारणाच्या मार्गावर ख्रिस्तासाठी आणि सुवार्तेसाठी आपण स्वतःला गमावले पाहिजे. प्रत्यक्ष जीवनात याचा नेमका अर्थ काय?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, आधी अनेक लोक कसे जगतात ते पाहूया. जीवनात जे सर्वांत सोपे, सर्वांत आनंददायक, सर्वांत उत्तम आणि सर्वाधिक दिलासा देणारे आहे, त्याचीच इच्छा करण्याकडे आपला कल असतो. ज्यामुळे आपल्याला छान वाटते अशाच गोष्टी आपण अनेकदा शोधतो आणि ज्यात कमीत कमी अडचणी येतील असाच मार्ग निवडतो. उदाहरणार्थ, फक्त भाकर आणि पाणी घेऊन उपवास करणे किंवा अतिशय रुचकर पदार्थांची मेजवानी घेणे, यांपैकी तुम्ही काय निवडाल? एखाद्या अनोख्या आणि अतिशय आलिशान ठिकाणी सुट्टी घालवणे किंवा आठवडाभर अतिशय कष्टाचे काम करणे, यांपैकी तुम्ही काय निवडाल? अगदी नवी, उच्च दर्जाची गाडी आणि जुनी खटारा गाडी यांपैकी कोणती गाडी चालवायला तुम्हाला आवडेल? बहुतेक लोक चविष्ट जेवण, आलिशान सुट्टी आणि नवी कोरी शानदार गाडी क्षणाचाही विलंब न करता निवडतील.

संत योहान ऑफ द क्रॉस यांनी आपल्या कार्मेल पर्वताची चढण या अभिजात आध्यात्मिक ग्रंथात एक अगदी वेगळा मार्ग दाखवला आहे. प्रार्थना आणि ध्यानासाठी त्यांनी काही आध्यात्मिक सूत्रे दिली आहेत. आत्म्याला अपायकारक अशा सर्व आसक्तींपासून शुद्ध होण्यास ही सूत्रे मदत करतात, जेणेकरून तुम्ही देवाशी आणि त्याच्या पवित्र इच्छेशी अधिक पूर्णपणे एकरूप होऊ शकाल. संत योहान म्हणतात, “जे सर्वांत सोपे आहे त्याऐवजी जे सर्वांत कठीण आहे ते निवडण्याचा नेहमी प्रयत्न करा; जे सर्वांत आकर्षक आहे त्याऐवजी जे सर्वांत अप्रिय आहे ते निवडा; जे सर्वाधिक सुख देते त्याऐवजी जे सर्वांत कमी सुख देते ते निवडा…” ही आध्यात्मिक सूत्रे संपूर्ण वाचली, तर ती आपल्या अंतःकरणालाच आव्हान देतात. स्वतःशी प्रामाणिक असणाऱ्यांना लगेच दिसून येते की हे जग देऊ शकते त्यातले सर्वांत सोपे, सर्वांत सुखद आणि सर्वांत उत्तम तेच ते अनेकदा निवडतात. पण तुमच्या चिरंतन आत्म्यासाठी सर्वांत हिताचे काय आहे?

स्वतःचा त्याग करा, आपला क्रूस उचला आणि माझ्यामागे या, ही येशूची शिकवण तुमच्या चिरंतन आत्म्याच्या तारणाचा मार्ग दाखवते. हे जग किंवा आपला देह देऊ शकतो त्यापेक्षा कितीतरी अधिक खोल आध्यात्मिक तृप्ती याच मार्गावर मिळते. पण हा मार्ग समजून घेऊन त्यावर चालण्यासाठी अनेकदा आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाची दिशा पूर्णपणे उलटवावी लागते. आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक पातळीवर क्रुसाची निवड करण्यापासून या बदलाची सुरुवात होते. शेवटी देव आपल्या सर्व स्वार्थी इच्छा दूर करतो आणि त्यांच्या जागी त्यागमय प्रेमाची इच्छा निर्माण करतो.

दिवसभर मनात येणाऱ्या विचारांचे तुम्ही बारकाईने परीक्षण केले, तर तुमचे बरेचसे विचार स्वतःभोवतीच फिरतात, असे तुम्हाला दिसेल. “मला हे आवडते, मला ते करायचे नाही, मला याचा राग येतो, आणि ते टाळण्याचा मी प्रयत्न करत आहे…” कितीतरीदा आपले विचार ‘मी’पासून सुरू होतात आणि ‘माझ्यावर’ येऊन थांबतात. स्वतःचा त्याग करणे, आपला क्रूस उचलणे आणि आपला जीव गमावणे, याचा अर्थ यापुढे स्वतःचाच विचार करत न राहणे. म्हणजे तुमच्या आत्म्याची नजर स्वतःवरून हटून केवळ देवाच्या इच्छेवर आणि इतरांवर प्रेम करण्यावर स्थिरावते. पण दिवसेंदिवस आपल्या बहुतेक कृतींना दिशा देणाऱ्या असंख्य स्वार्थी इच्छांपासून आपण मुक्त होत नाही, तोवर हे शक्य होणार नाही.

आज दिवसभर तुम्हाला कशाची इच्छा होत असते, यावर मनन करा. कोणती गोष्ट तुमचे मन सर्वांत जास्त व्यापून राहते? तुम्हाला सर्वांत जास्त ओढ कशाची वाटते? देवाची अधिक चांगली सेवा कशी करता येईल आणि त्याची पवित्र इच्छा अधिक चांगल्या रीतीने कशी पूर्ण करता येईल, या विचारात तुमचा बहुतांश दिवस जातो का? की दिवसाचा बहुतेक वेळ तुम्ही स्वतःचाच विचार करता? तुमच्या आत्म्याची नजर बहुतेक वेळा इतरांच्या निःस्वार्थ सेवेकडे वळते का? की तुम्हाला स्वतःला काय हवे आहे, याचाच स्वार्थी विचार तुमच्या मनात अधिक वेळा येतो? या कठीण प्रश्नांवर मनन करा आणि तुमच्यात जे काही स्वार्थी आहे ते मुळासकट दूर करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनाची दिशा पूर्णपणे बदलता येईल आणि जीवनाचे रूपांतर घडवणारा ख्रिस्ताचा गौरवशाली क्रूस वाहता येईल.

हे स्वतःचे बलिदान देणाऱ्या माझ्या प्रभू, तू निःस्वार्थ जीवन जगलास. स्वर्गातील पित्याचा गौरव आणि जगाचे तारण हाच तुझा एकमेव ध्यास होता. कृपया मला सर्व स्वार्थापासून मुक्त कर, म्हणजे मला सर्व बाबतींत स्वतःचा त्याग करता येईल, जीवनातील प्रत्येक क्रुसाकडे धाव घेता येईल आणि तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून निःस्वार्थ व त्यागमय प्रेमाचे सुंदर जीवन जगता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


स्वर्गातील पित्याची दया

सामान्य काळातील चोविसावा रविवार (वर्ष C)

“एका मनुष्याला दोन मुलगे होते. धाकटा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, तुमच्या मालमत्तेतला जो वाटा मला मिळायला हवा, तो मला द्या.’ तेव्हा वडिलांनी दोघांमध्ये मालमत्ता वाटून दिली. काही दिवसांनी धाकटा मुलगा आपले सर्व सामान घेऊन दूरच्या देशात निघून गेला. तिथे त्याने उधळपट्टीचे जीवन जगून आपली वारसाहक्काची संपत्ती उधळली.” लूक 15:11–13

ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. शुभवर्तमानातील या उताऱ्यात आपण उधळ्या पुत्राची कथा वाचली आहे आणि त्याच्या जीवनात घडलेल्या गोष्टींचा अनुभव आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आला आहे. काही जण उधळ्या पुत्रासारखे जगले आहेत. अनीतीच्या जीवनात ते सतत सुख शोधत राहिले, त्यांनी आपले गुण आणि पैसा उधळला आणि भोगसुख मिळवणे हेच आपले मुख्य ध्येय मानले. तर काहींनी आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला भरकटताना दुःखाने पाहिले आहे. या मुलाची कथा अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनाशी जवळची वाटते.

या कथेतील सर्वांत हृदयस्पर्शी गोष्टींपैकी एक म्हणजे पित्याच्या मनाची वृत्ती. वडील जिवंत असतानाच मुलाने आपल्या वारसाहक्काचा वाटा घेतला, वडिलांना सोडून तो निघून गेला आणि त्याने ती संपत्ती मूर्खपणाने उधळली. तरीही पित्याने आपल्या मुलावरचे प्रेम सोडले नाही. त्याचे मन दुःखाने भरले होते, तरी मुलगा परत येईल ही आशा त्याने सोडली नाही. आपल्याजवळ काहीच उरले नाही हे पाहून मुलगा घराकडे निघाला. वडील आपल्याला मजूर म्हणून तरी ठेवतील, अशी त्याला आशा होती. पण तो घराजवळ पोहोचण्याआधीच पित्याने त्याला दुरून पाहिले. त्या क्षणाबद्दल आपण असे वाचतो: “तो अजून बराच दूर असतानाच त्याच्या पित्याने त्याला पाहिले आणि त्याचे हृदय करुणेने भरून आले. तो आपल्या मुलाकडे धावत गेला, त्याने त्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले.”

जीवनात अनेकदा, विशेषतः पाप केल्यानंतर, आपण आपल्या मानवी अनुभवाच्या चष्म्यातून देवाकडे पाहतो. आपण इतरांशी जसे वागलो असतो, तसाच देवही आपल्याशी वागेल असे आपल्याला वाटते. पण देवाची करुणा आपण कल्पना करू शकू अशा कोणत्याही मानवी करुणेपेक्षा कितीतरी पलीकडे आहे. स्वर्गातील पित्याच्या हृदयात धगधगणाऱ्या प्रेमाला सामोरे जाण्यासाठी आपला कोणताही मानवी अनुभव आपल्याला पुरेसा तयार करू शकत नाही.

या दाखल्यातील दोन सर्वांत महत्त्वाचे धडे म्हणजे मुलाची पापी वृत्ती आणि पित्याची क्षमा. तुम्हीच तो मुलगा आहात. तुम्ही पापी आहात. तुम्ही देवापासून दूर गेला आहात आणि ज्या गोष्टींनी कधीच समाधान मिळणार नाही, अशा अनेक गोष्टींत तुम्ही समाधान शोधले आहे. म्हणून या दाखल्याला प्रतिसाद देताना आपण पहिले पाऊल हे उचलले पाहिजे: स्वर्गातील पित्यापासून दूर राहून आपल्याला कधीही आनंद मिळणार नाही, हे मान्य केले पाहिजे. आपण कितीही प्रयत्न केले, तरी आपल्याला तो मिळणार नाही. कारण देवाने आपल्याला स्वतःसाठी घडवले आहे आणि त्याच्यासोबतच आपल्या जीवनाला पूर्णता लाभेल.

या दाखल्यातील दुसरा आणि अधिक महत्त्वाचा धडा आपल्याला पहिला धडा आचरणात आणायला मदत करतो. स्वर्गातील पित्याची करुणा आणि दया समजून घेण्याचा आपण प्रार्थनापूर्वक प्रयत्न केला, तर आपले पाप कबूल करणे आणि न घाबरता घरी परतणे आपल्याला सोपे जाईल. आपल्या लज्जेचे ओझे दूर करू देण्यास आणि आपल्या प्रेमाने आपल्याला कवेत घेऊ देण्यास आपण देवाला मोकळीक देऊ.

आज या दोन गोष्टींवर चिंतन करा. पहिले म्हणजे, संकोच किंवा भीती न बाळगता आपले पाप कबूल करा. आपल्या आत्म्यातील पाप देवाच्या नजरेतून पाहता आले, तर आपण हादरून जाऊ. गर्व आपल्याला आंधळे करतो आणि आपली पापे स्पष्टपणे दिसू देत नाही. आपला आत्मा जसा आहे तसा पाहण्याची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करा. दुसरे म्हणजे, हे करताना देवाच्या न्यायाची भीती बाळगू नका. जे पश्चात्ताप करून पापापासून वळण्यास नकार देतात, त्यांच्यासाठीच न्याय राखून ठेवला आहे. तुम्ही दररोज देवाकडे परत आलात, आपली पापे कबूल केलीत आणि ती प्रामाणिकपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलात, तर न संकोचता त्याच्याकडे वळा. तो तुम्हाला क्षमा करील आणि तुम्ही वाहत असलेल्या ओझ्यांतून तुम्हाला मुक्त करील. पिता दूर उभा राहून तुमची वाट पाहत आहे. त्याला तुमच्याकडे धावत येऊ द्या, तुम्हाला कवेत घेऊ द्या आणि तुमच्यावर त्याच्या दयेचा वर्षाव करू द्या.

हे सर्व दयेचा उगम असलेल्या पित्या, आम्ही तुझ्याकडे परत यावे म्हणून तू सदैव उभा राहून आमची वाट पाहतोस. तुझे हृदय अथांग करुणेने भरलेले आहे. माझी पापे तुला जशी दिसतात तशी ती मला पाहता यावीत आणि तुझ्या दयाळू हृदयावर मला पूर्ण विश्वास ठेवता यावा, म्हणून कृपया मला मदत कर. मी वाहत असलेली ही जड ओझी माझ्यावरून दूर करण्यासाठी तू माझ्याकडे धावत येतोस आणि माझ्या पापाची क्षमा करतोस, याबद्दल मी तुझा आभारी आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


मध्यस्थीतील नम्रता

सामान्य काळातील चोविसाव्या आठवड्याचा सोमवार

“प्रभू, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण तू माझ्या घरात यावेस अशी माझी पात्रता नाही. म्हणूनच तुझ्याकडे येण्यासही मी स्वतःला पात्र समजलो नाही. पण तू फक्त शब्द बोल आणि माझा सेवक बरा होऊ दे.” लूक 7:6–7

विशेष म्हणजे, हे नम्र शब्द एका रोमी शताधिपतीचे असले, तरी त्याने ते स्वतः येशूला सांगितले नाहीत. कारण स्वतः येशूकडे जाण्यासही आपण पात्र आहोत, असे त्याला वाटत नव्हते. म्हणून आपल्या वतीने हे शब्द येशूला सांगण्यासाठी त्याने आपल्या काही मित्रांना पाठवले. अशा रीतीने त्या शताधिपतीच्या मित्रांनी खरोखरच येशूसमोर त्याच्यासाठी मध्यस्थी केली. येशूने त्या शताधिपतीच्या श्रद्धेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आपल्याबरोबर असलेल्या लोकसमुदायाला तो म्हणाला, “मी तुम्हाला सांगतो, इस्राएलातही मला अशी श्रद्धा आढळली नाही.” आणि त्याच क्षणी येशूने दुरूनच त्या सेवकाला बरे केले.

एखाद्या व्यक्तीला महत्त्वाची विनंती करायची असेल, तर बहुतेकदा आपण ती स्वतःच करतो. आपण त्या व्यक्तीकडे जातो आणि समोरासमोर बोलतो. प्रार्थनेत आपण आपल्या प्रभूकडे नक्कीच थेट जाऊ शकतो आणि त्याच्याशी समोरासमोर, वैयक्तिकपणे बोलू शकतो. तरीही दुसऱ्या कुणाच्या मध्यस्थीने आपल्या गरजा प्रभूसमोर मांडण्यात एक विशेष नम्रता आहे. विशेषतः संतांची मध्यस्थी मागण्यात ही नम्रता दिसून येते.

आपल्याला प्रभूची भीती वाटते म्हणून किंवा आपण थेट त्याच्याकडे गेलो तर त्याला वाईट वाटेल म्हणून आपण प्रभूसमोर संतांची मध्यस्थी मागत नाही. खरे तर ती अत्यंत नम्रतेने केलेली कृती असावी. स्वर्गात देवाचे मुख पाहत असलेल्या संतांकडे आपली प्रार्थना सोपवताना आपण ती देवाकडेच सोपवतो. पण संतांच्या मध्यस्थीवर विसंबणे म्हणजे आपल्या स्वतःच्या गुणवत्तेच्या बळावर प्रभूसमोर उभे राहून त्याच्यापुढे आपली विनंती मांडण्यास आपण पात्र नाही, हेही मान्य करणे. ही नम्रता समजून घेणे कधीकधी कठीण असते, पण तसा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

सध्या तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे? ती गोष्ट मनात आणा आणि देवासमोर तुमचा मित्र व मध्यस्थ म्हणून एखाद्या संताची निवड करा. नम्रपणे त्या संताकडे वळा आणि प्रार्थना करा. स्वतःच्या बळावर आपल्या प्रभूकडे जाण्यास आपण पात्र नाही, हे त्या प्रार्थनेत मान्य करा. मग तुमची विनंती त्या संताकडे सोपवा आणि तुमच्या वतीने ती प्रार्थना आपल्या प्रभूसमोर मांडण्यास त्या संताला सांगा. एखाद्या संताच्या मध्यस्थीने आपल्या प्रभूकडे प्रार्थना करणे म्हणजे येशू आपल्याला जो प्रतिसाद देतो, तो केवळ त्याच्या दयेतून येतो, याची आपल्याला जाणीव आहे, असेही व्यक्त करणे. आणि आनंदाची बातमी ही आहे की, जेव्हा आपण येशूसमोर नम्र होतो, विशेषतः संतांच्या मध्यस्थीने त्याच्याकडे येतो, तेव्हा आपल्यावर आपल्या दयेचा वर्षाव करण्याची त्याची मनापासून इच्छा असते.

आज या आदरणीय रोमन शताधिपतीच्या नम्रतेवर मनन करा. त्याने आपल्या वतीने मित्रांना येशूकडे पाठवले; त्याच्या या नम्र कृतीचे सामर्थ्य समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे मनन करताना, स्वर्गातील एखाद्या संताची निवड करा आणि त्या संताला विनंती करा की, त्याने तुमच्या वतीने आपल्या प्रभूकडे जाऊन या शताधिपतीसारखीच नम्रता आणि श्रद्धा तुम्हाला लाभावी म्हणून प्रार्थना करावी. असे केल्याने तुमची श्रद्धा आणि नम्रता पाहून आपल्या प्रभूलाही आश्चर्य वाटेल.

देवाच्या संतांनो, माझी नम्र विनंती येशूकडे मांडा, की माझी नम्रता आणि श्रद्धा अधिकाधिक वाढावी. हे माझ्या प्रिय प्रभू, ही विनंती आणि माझ्या सर्व प्रार्थना मी तुझ्यासमोर ठेवतो. त्या तुझ्यासमोर ठेवताना मी कबूल करतो की तुझ्या दैवी दयेस मी पात्र नाही. पण स्वर्गातील संतांच्या मध्यस्थीने माझ्यावर दया करावी अशी तुझी इच्छा असेल, तर त्यांच्याद्वारे मी तुला ही नम्र विनंती करतो. हे मरिया माते, माझ्या सर्व प्रार्थना मी विशेषतः तुझ्या पवित्र मध्यस्थीकडे सोपवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


करुणा, आशा आणि श्रद्धा

सामान्य काळातील चोविसाव्या आठवड्याचा मंगळवार

येशू नाईन नावाच्या एका नगराकडे निघाला. त्याचे शिष्य आणि लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर होता. तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा एका मृत माणसाला नगराबाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती. नगरातील लोकांचा मोठा जमाव तिच्याबरोबर होता. लूक 7:11–12

या आईची परिस्थिती डोळ्यांसमोर आणा. तिचे लग्न झाले होते. तिला आणि तिच्या पतीला एक मुलगा झाला आणि दोघांनी मिळून त्याला वाढवले. तिच्या आणि तिच्या मुलाच्या डोळ्यांदेखत तिचा पती मरण पावला. नंतर तिच्या डोळ्यांदेखत तिचा मुलगाही मरण पावला, आणि आता ती त्याच्या अंत्ययात्रेत चालत होती. तो तिचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे आता ती एकटी पडली होती.

या स्त्रीचा विचार केला की तिच्याविषयी सहजच करुणा वाटते. तिचे अंतःकरण अशा दुःखाने भरून गेले असेल, की दुसऱ्याच्या वेदना समजून घेणाऱ्या कुणालाही त्या दुःखाची तीव्रता जाणवेल. तिच्या मनात भीतीही दाटली असेल. त्या काळी एखाद्या खेड्यात विधवेला स्वतःचा उदरनिर्वाह करणे फार कठीण होते. पतीच्या मृत्यूनंतर, वाढत्या वयात आपल्या गरजा भागवण्यासाठी तिला मुलावर अवलंबून राहावे लागले असते. पण आता तोही गेला होता. त्यामुळे मुलगा गमावल्याचे दुःख तर तिला झाले असेलच, पण आपल्या पुढच्या आयुष्याची भीतीही वाटली असेल. आता तिचे काय होणार? पुढची कित्येक वर्षे तिच्या पोटापाण्याची सोय कोण करणार? दारिद्र्यात दिवस काढत भीक मागण्याची वेळ तिच्यावर येणार का?

अशा खऱ्याखुऱ्या दुःखाच्या आणि भीतीच्या क्षणी येशू तिच्या जीवनात येतो. तिला येशूविषयी काही माहीत होते की नाही, हे आपल्याला ठाऊक नाही. ती त्याच्या अनुयायांपैकी होती असे दिसत नाही. येशूचे सार्वजनिक सेवाकार्य नुकतेच सुरू झाले असल्याने तिने कदाचित त्याच्याविषयी ऐकलेही नसेल. येशूची त्या स्त्रीशी आणि तिच्या मृत मुलाशी झालेली भेट ठरवून झालेली नव्हती आणि ती अनपेक्षित होती असे दिसते. या माणसाला मृतांतून उठवण्यास येशूला कशामुळे प्रेरणा मिळाली? गावातील कोणाच्या श्रद्धेला दिलेला हा प्रतिसाद होता असे दिसत नाही. कोणाच्या विनंतीवरूनही त्याने हे केले नाही. उलट, केवळ त्या आईविषयी वाटलेल्या करुणेतून येशूने हे केले असे दिसते. निदान पहिल्या वाचनात तरी तसे वाटते. येशूने तिच्याविषयीच्या करुणेतून हे केले, हे तर स्पष्ट आहे; पण संपूर्ण प्रसंग लक्षात घेतला, तर त्यामागे आणखीही एक हेतू असावा.

येशू, त्याचे शिष्य आणि लोकांचा मोठा जमाव या गावातून एकत्र चालत होते. येशू सहसा लोकांच्या श्रद्धेला प्रतिसाद म्हणून चमत्कार करत असे. त्यामुळे या चमत्कारातही श्रद्धेचा वाटा असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ज्या श्रद्धेमुळे हा चमत्कार घडला, ती श्रद्धा कफर्णहूमहून येशूबरोबर चालत आलेल्या लोकांचीच असू शकते. आदल्या दिवशी याच लोकांनी येशूला एका शताधिकाऱ्याच्या सेवकाला बरे करताना पाहिले होते. त्यांची येशूवर श्रद्धा होती, हे स्पष्ट आहे. ते त्याच्याबरोबर चालत असताना ही अंत्ययात्रा त्यांना दिसली. तेव्हा केवळ येशूचेच अंतःकरण करुणेने द्रवले नाही, तर त्याच्या अनुयायांचीही अंतःकरणे द्रवली. त्या आईचे दुःख पाहून आणि मग येशूलाही, एक मनुष्य म्हणून, तिचे दुःख जाणवले व तिच्याविषयी करुणा वाटली हे पाहून, तो काहीतरी करील अशी आशा त्याच्या अनुयायांना वाटली असेल. त्या आशेचा उगम अलौकिक होता; म्हणूनच ती श्रद्धेशीही जोडलेली होती. येशू नक्की काहीतरी करील, याची त्यांना श्रद्धेमुळे खात्री होती. अशा रीतीने, येशूबरोबर चालणाऱ्या लोकांची करुणा, आशा आणि श्रद्धा ही त्याने आपल्या सर्वशक्तिमान सामर्थ्याने बरे करावे अशी जणू एक विनवणीच ठरली, आणि येशूने तिला प्रतिसाद दिला.

देवाची कृपा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अनेक प्रकारे मध्यस्थी करू शकतो. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे इतरांविषयीची करुणा आणि देवावर ठेवलेली आशा वाढवत नेणे. जेव्हा आपण इतरांचे दुःख पाहतो, त्यांच्याविषयीची करुणा मनात जागी होऊ देतो, बरे करण्याच्या देवाच्या सामर्थ्यावरची आशा व्यक्त करतो आणि मग तिथेच श्रद्धेने उभे राहून देव कृती करील याची वाट पाहतो, तेव्हा देवाला कृती केल्यावाचून राहवणार नाही. आपली पवित्र करुणा, आशा आणि श्रद्धा ही एक प्रार्थनाच ठरते, जिला देव नेहमी प्रतिसाद देतो. नाईन गावातून येशूबरोबर चालणारे लोक अशाच रीतीने वागले असे दिसते. त्यांच्या साक्षीतून प्रेरणा घेऊन आपणही त्याच रीतीने इतरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे.

आज आपल्या जीवनातील अशा एखाद्या व्यक्तीचा विचार करा, जिची परिस्थिती नाईनच्या या विधवेसारखी आहे. तुम्ही कोणाकडे लक्ष द्यावे आणि कोणाविषयी करुणा बाळगावी, अशी देवाची इच्छा आहे? तुमच्या सहृदय अंतःकरणाला ज्यांना तुमच्या करुणेची गरज आहे अशा व्यक्ती दिसू लागतील, तेव्हा आशेच्या अलौकिक देणगीचाही स्वीकार करा. देव त्यांना बरे करील, अशी दैवी आशा बाळगा. त्या आशेतून देवावरील तुमची श्रद्धा प्रकट होऊ द्या आणि ही करुणा, आशा व श्रद्धा गरजूंसाठी प्रार्थना म्हणून देवाला अर्पण करा.

हे परम करुणामय प्रभू, आमच्या गरजांकडे आणि दुःखांकडे तुझे सदैव लक्ष असते. तुझे हृदय सर्वांविषयीच्या करुणेने भरलेले आहे. गरजू लोक मला दिसावेत म्हणून मला खरे सहृदय अंतःकरण दे. त्यांच्याकडे माझे लक्ष जाईल, तेव्हा तू त्यांच्यावर तुझ्या दयेचा वर्षाव करशील, अशी आशा आणि श्रद्धा माझ्यात भर, म्हणजे मला सर्वांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


सुव्यवस्थित आत्मा

सामान्य काळातील चोविसाव्या आठवड्याचा बुधवार

“‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत. आम्ही शोकगीत गायले, पण तुम्ही रडला नाहीत.’ स्नानकर्ता योहान आला; तो अन्न खात नसे आणि द्राक्षारस पीत नसे. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘त्याला भूत लागले आहे.’ मानवपुत्र आला; तो खातो आणि पितो. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी आहे, जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र आहे.’ पण ज्ञानाच्या सर्व लेकरांकडून तिचे खरेपण सिद्ध होते.” लूक 7:32–35

उपदेशकाच्या पुस्तकातील 3रा अध्याय अंत्यविधीच्या वेळी अनेकदा वाचला जातो. त्यात म्हटले आहे, “प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली वेळ असते आणि आकाशाखालील प्रत्येक कार्याला एक वेळ असते. जन्म देण्याची एक वेळ आणि मरण्याची एक वेळ; लावण्याची एक वेळ आणि लावलेले उपटण्याची एक वेळ… रडण्याची एक वेळ आणि हसण्याची एक वेळ; शोक करण्याची एक वेळ आणि नाचण्याची एक वेळ.” जीवनात अनेक प्रकारच्या भावना आणि अनुभव असतात. म्हणून अंत्यविधीच्या वेळी शोक करणाऱ्यांना या वाचनातून सांत्वन मिळते. अंत्यविधीला जमलेले लोक आपल्या दिवंगत प्रिय व्यक्तीची आठवण काढतात, तेव्हा त्यांना चांगले आणि वाईट दिवस, दुःखाचे आणि आनंदाचे क्षणही आठवतात. या आठवणी त्यांना जाणीव करून देतात की अंत्यविधी ही दुःखाची वेळ असली तरी पुढे आनंदाचे क्षणही येतील. हीच जीवनाची नैसर्गिक लय आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशूने अशा लोकांना जाब विचारला, ज्यांनी योग्य वेळी प्रसंगाला साजेसा मानवी प्रतिसाद दिला नाही. “आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत. आम्ही शोकगीत गायले, पण तुम्ही रडला नाहीत.” बासरी वाजवूनही कोणी नाचले नाही आणि शोकगीत गाऊनही कोणी रडले नाही, या प्रतिमेतून दिसते की स्नानकर्ता योहान आणि स्वतः येशू यांच्या सेवाकार्याला अनेक लोकांनी साजेसा प्रतिसाद दिला नाही. या उताऱ्यावर भाष्य करताना संत ऑगस्टीन म्हणतात की स्नानकर्ता योहानाचा उपदेश शोकगीतासारखा होता; तो लोकांना पश्चात्तापाने “रडण्याचे” आवाहन करत होता. परंतु त्याचा उपदेश ऐकूनही अनेकांनी पश्चात्ताप केला नाही. येशू आला तेव्हा त्याने जे कृपामय नवे जीवन देण्यासाठी तो आला होता, त्याविषयी उपदेश केला आणि त्या जीवनाची साक्ष दिली. काहींनी त्याचे ऐकले आणि त्याला प्रतिसाद दिला, पण अनेकांनी तसे केले नाही. येशूचा संदेश बासरीच्या सुरांसारखा होता; त्या सुरांनी लोकांना “नाचण्याची” प्रेरणा मिळायला हवी होती. पण त्याचे जीवन बदलणारे वचन आणि त्याची कृपा यांमधून जो आनंद अनुभवण्याचे आणि जगण्याचे आमंत्रण त्यांना मिळाले होते, त्या आनंदाने अनेकांनी प्रतिसाद दिला नाही.

खरोखरच, आकाशाखालील प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक कार्याची एक ठरलेली वेळ असते. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी देव आपल्याला काय सांगत आहे, याकडे लक्ष देणे ही आपल्याला सोपवलेली जबाबदारी आहे. काही वेळा आपल्याला “रडावे” लागते: आपल्या पापांकडे प्रामाणिकपणे पाहावे, त्यांचे भयंकरपण जाणावे आणि ती पापे निर्धाराने नाकारावीत. तर काही वेळा आपण “नाचू”: देव आपल्याला त्याच्या सांत्वनदायी कृपेचा अनुभव घेण्यास बोलावतो आणि त्याचे दयाळू प्रेम स्पष्टपणे पाहण्यास सांगतो. अशा क्षणी मनापासून कृतज्ञ राहण्याचे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने ती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते.

आज तुम्हाला मिळालेल्या सुव्यवस्थित जीवन जगण्याच्या आवाहनावर चिंतन करा. त्यासाठी तुमच्या सभोवतालच्या लोकांकडे तुमचे किती लक्ष असते, याचा विचार करा. प्रेमाने त्यांच्याकडे लक्ष दिल्याने, दुःख भोगणाऱ्यांच्या अंतःकरणातील वेदना तुम्हाला जाणवतात का? त्यांचे म्हणणे करुणेने ऐकावे आणि त्यांच्याशी दयाळूपणे वागावे, अशी ओढ तुम्हाला वाटते का? इतर लोक जीवनातील आनंद अनुभवत असताना तुम्ही त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकता का? कोणत्याही प्रकारची ईर्ष्या किंवा मत्सर न बाळगता तुम्ही त्यांच्या आनंदात मनापासून सहभागी होऊ शकता का? जेव्हा देव तुम्हाला जीवनात परिवर्तन घडवणारी एखादी कृती करण्याची प्रेरणा देतो आणि काही कृपा बहाल करतो, तेव्हा तुम्ही त्याचे ऐकून तत्परतेने त्याच्या आज्ञेचे पालन करता का आणि सर्वांत योग्य प्रकारे प्रतिसाद देता का? आपले आत्मे कृपेच्या प्रेरणांबाबत संवेदनशील झाले पाहिजेत आणि आपण त्या प्रेरणांना अनुरूप प्रतिसाद दिला पाहिजे. आपला आत्मा सुव्यवस्थित व्हावा यासाठी प्रयत्न करा, म्हणजे देव आपल्या परिपूर्ण इच्छेनुसार दररोज तुमच्यासमोर जे जीवन ठेवतो, ते तुम्ही जगाल आणि अनुभवाल.

हे प्रभू, तुझ्या आत्म्यात सर्व काही योग्य स्थानी होते; पित्याच्या इच्छेला तू नेहमी परिपूर्णपणे प्रतिसाद दिलास. प्रेमाची मागणी होती तेव्हा तू ठाम राहिलास, संकटांना धैर्याने सामोरा गेलास, पश्चात्ताप करणाऱ्या पाप्यांवर दया केलीस आणि सर्वांच्या मनपरिवर्तनाने आनंदित झालास. तुझ्या कृपेच्या प्रेरणांकडे नेहमी लक्ष द्यायला आणि तू मला ज्या प्रकारे प्रतिसाद द्यायला बोलावतोस, त्याच प्रकारे तुला प्रतिसाद द्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


पापक्षमेसमोरचा विस्मय

सामान्य काळातील चोविसाव्या आठवड्याचा गुरुवार

तो तिला म्हणाला, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” जेवायला बसलेले इतर जण मनात म्हणाले, “हा कोण आहे, जो पापांचीही क्षमा करतो?” पण तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या श्रद्धेने तुझे तारण केले आहे; शांतीने जा.” लूक 7:48–50

येशू एका परुश्याच्या घरी जेवत असताना एक पापी स्त्री कोणतीही पूर्वसूचना न देता तिथे आली. तिलाच उद्देशून येशू हे प्रेमळ शब्द बोलला. त्या परुश्याने तिला दोषी ठरवून तुच्छ लेखले, पण तिने त्याची पर्वा केली नाही. आपल्या पापांबद्दल दुःख झाल्याने तिने येशूच्या पायांना सुगंधी तेल लावले आणि त्याच्यासमोर नम्र झाली. तिने त्याचे पाय आपल्या अश्रूंनी धुतले आणि आपल्या केसांनी पुसले.

शेवटी येशू तिच्याकडे पाहून म्हणतो, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मेजाशी बसलेल्यांची प्रतिक्रिया लक्षात घ्या. त्यांच्या मनात काय चालले होते, याची झलक आपल्याला मिळते. ते मनात म्हणाले, “पापांचीही क्षमा करणारा हा कोण आहे?”

श्रद्धावान कुटुंबात जन्मलेल्या आणि त्याच श्रद्धेत वाढलेल्या आपल्याला देव क्षमा करतो, हे लहानपणापासून माहीत आहे. लहान वयातच आपल्याला हे शिकवले गेले. समेटाच्या संस्काराची तयारी करताना आपण याविषयी बरेच काही शिकलो आणि आयुष्यभर हा संदेश कोणत्या ना कोणत्या रूपात ऐकला आहे. पण कल्पना करा की देवाच्या क्षमेविषयी तुम्ही आयुष्यभर कधी ऐकलेही नाही, तिचा अनुभवही घेतला नाही, आणि मग अचानक एके दिवशी ती क्षमा तुम्ही अनुभवता. येशूने या पापी स्त्रीला क्षमा केली, तेव्हा त्याच्या व्यक्तीतून प्रकट झालेल्या पापक्षमेशी पहिल्यांदाच सामना झाल्यावर त्या लोकांना काय वाटले असेल, याची कल्पना करा. ते कदाचित थोडे गोंधळले असतील; पण देवाने जे केले, ते पाहून इतर कोणत्याही भावनेपेक्षा पवित्र आदर आणि विस्मय यांचाच अनुभव त्यांना अधिक आला असेल. त्यांनी त्या पापी स्त्रीला आत येताना पाहिले. परुशी तिला दोष देत होते आणि तुच्छ लेखत होते, हे त्यांना जाणवले. त्या स्त्रीने आपले दुःख आणि अवमानाची भावना व्यक्त केली, हे त्यांनी पाहिले. आणि मग येशूने तिला क्षमा केली, हेही त्यांनी पाहिले.

तुमच्या आणि इतरांच्या पापांची क्षमा होते, ही देणगी तुम्हाला विस्मयचकित करते का? की तुम्ही क्षमा गृहीत धरता? या स्त्रीच्या पापांची क्षमा झाली तेव्हा लोकांनी व्यक्त केलेला विस्मय आणि आदरभाव यांमुळे आपण देवाच्या दयेकडे आणि क्षमेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, हे तपासायला आपल्याला मदत झाली पाहिजे. देवाच्या दयेबद्दल त्या लोकांना वाटला तसाच विस्मय आपणही आपल्या अंतःकरणात सतत जोपासला पाहिजे. क्षमा कधीही गृहीत धरू नये किंवा ती जीवनातली इतर अनेक गोष्टींसारखी एक साधी गोष्ट आहे असे मानू नये, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. उलट, ती असामान्य आहे, सदैव नवी आणि गौरवशाली आहे आणि कायमच आदरयुक्त विस्मय जागवणारी आहे, हे आपण ओळखले पाहिजे.

येशूच्या या पहिल्या अनुयायांनी विस्मयाने उच्चारलेल्या शब्दांवर आज चिंतन करा: “पापांचीही क्षमा करणारा हा कोण आहे?” हे चिंतन करताना, देवाने तुम्हाला देऊ केलेल्या क्षमेबद्दल त्यानेच तुमचे अंतःकरण गाढ कृतज्ञतेने भरून टाकावे, असे त्याला करू द्या. तुम्ही कमावलेली नसूनही देवाकडून मिळालेल्या या देणगीचे मोल पुन्हा जाणून घ्या. ही कृतज्ञताच तुमच्या मनात देवाच्या दयेबद्दल सतत विस्मय जागवत राहू दे.

हे माझ्या क्षमाशील प्रभू, पाप्यांविषयीची तुझी दया आणि करुणा खरोखर विस्मयकारक आहे. माझ्यावर आणि तुझ्या सर्व अनुयायांवर इतके गाढ प्रेम केल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या अतुलनीय दयेपुढे माझे हृदय पवित्र विस्मयाने भरून टाक. तुझ्या क्षमेचे मला नेहमी आश्चर्य वाटो आणि माझ्या जीवनात तिचा अनुभव घेताना माझे हृदय सदैव गाढ कृतज्ञतेने भरून जावो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


पूर्ण मनाने समर्पण!

सामान्य काळातील चोविसाव्या आठवड्याचा शुक्रवार

येशू नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तो देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत व तिची घोषणा करत होता. बारा शिष्य त्याच्याबरोबर होते. दुष्ट आत्म्यांपासून मुक्त झालेल्या आणि व्याधींतून बऱ्या झालेल्या काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या… लूक 8:1–2

आपला प्रभू एका कार्यासाठी निघाला होता. “देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत व तिची घोषणा करत” तो एका नगरातून दुसऱ्या नगरात पायी जात होता. त्याचा संदेश खरोखरच “सुवार्ता” होता. त्याने रोग्यांना बरे केले, भुते घालवली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्याने पापांची क्षमा केली. त्यामुळे अनेक जण त्याच्यामागे जाऊ लागले. येशूने स्वतः बोलावलेले आणि पुढे ज्यांना आपले प्रेषित म्हणून तो पाठवणार होता असे बारा शिष्य तर त्याचे अनुयायी होतेच, पण इतरही जण त्याच्यामागे गेले. आजच्या शुभवर्तमानात तीन स्त्रियांचाही नावाने उल्लेख आहे: मग्दालाची मरिया, योआन्ना आणि सुसान्ना. आपल्या प्रभूने ज्यांच्या अंतःकरणाला खोलवर स्पर्श केला आणि ज्यांनी त्याला अनुसरण्यासाठी सर्वस्व सोडले, अशा लोकांपैकी या काही जणी होत्या.

सर्वस्व सोडून येशूला अनुसरण्याच्या या पहिल्या अनुयायांच्या निर्णयामुळे, आपणही त्याला अनुसरण्यासाठी आपले जीवन कितपत समर्पित केले आहे, हे तपासण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते. येशूचा उपदेश ऐकणाऱ्या अनेक लोकांनी निःसंशय वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला. काहींनी त्याला नाकारले, काहींच्या मनात त्याच्याविषयी कुतूहल जागे झाले, तर काहींनी त्याच्यावर श्रद्धा ठेवली, पण त्याचे शिष्य होण्याची त्यांची तयारी नव्हती. काहींनी मात्र येशूला आणि त्याच्या सुवार्ता सांगण्याच्या कार्याला पूर्ण मनाने स्वतःला समर्पित केले. त्यांनी ऐकलेल्या सुवार्तेने त्यांचे जीवन बदलले.

आपल्या प्रभूला तुम्ही कसा प्रतिसाद देता? या प्रश्नाचे नीट उत्तर देण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही आपल्या प्रभूसाठी आणि त्याच्या शुभवर्तमानासाठी किती वेळ आणि शक्ती दिली आहे, याचा विचार करणे. त्याचे पवित्र वचन वाचण्यात, त्याची प्रार्थना करण्यात, त्याच्याविषयी बोलण्यात आणि त्याने शिकवलेला विश्वास समजून घेण्यात तुम्ही किती वेळ घालवला आहे? जीवनात तुम्ही घेत असलेल्या निर्णयांवर त्याच्या संदेशाचा किती परिणाम होतो? ख्रिस्ती म्हणून जगणे ही जीवनाच्या एखाद्या कप्प्यापुरती मर्यादित ठेवण्याची गोष्ट नाही. दर आठवड्यातले काही क्षण ‘विश्वासासाठी’ राखून ठेवून बाकीचा सगळा वेळ इतर गोष्टींत घालवणे आपल्याला चालणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक नेहमीची कामे असतात, हे खरे आहे. आपल्या सर्वांचीच अशी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यांत दिवसाचा बराच वेळ जातो. पण स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे म्हणजे आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत येशूला आणि त्याच्या संदेशाला स्थान देणे. आपले काम, घरची कामे आणि इतर साधीसुधी दैनंदिन कामेसुद्धा देवाच्या गौरवासाठी आणि त्याच्या दैवी इच्छेनुसार केली पाहिजेत.

येशूचे पहिले अनुयायी त्याच्यासोबत गावोगावी फिरले आणि त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाची दिशाच बदलली. तरीही ते अनेक नेहमीची कामे करत असतील. पण ती साधीसुधी कामेसुद्धा शेवटी त्यांना आणि इतरांना त्यांचे अंतिम ध्येय साधण्यास मदत व्हावी म्हणून केली जात होती. ते ध्येय म्हणजे देवाचे वचन ऐकणे आणि त्याला प्रतिसाद देणे.

आज तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रत्येक भाग आपल्या प्रभूला आणि त्याच्या कार्याला कितपत अर्पण केला आहे, यावर चिंतन करा. त्यासाठी तुम्ही जाहीरपणे सुवार्तेचा प्रचार करावा किंवा दिवसभर चर्चमध्ये घालवावा, असे काही आवश्यक नाही. याचा एवढाच अर्थ आहे की दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जे काही करता, त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही येशूचे स्वागत करता आणि त्याच्या कार्याला स्थान देता. आपण आपल्या प्रभूची कितीही सेवा केली, तरी ती पुरेशी ठरणार नाही. आपल्या रोजच्या कामांकडे पाहताना, त्या प्रत्येक कामात आपल्या प्रभूला कसे सामावून घेता येईल, हे पाहा. असे केल्याने आपले संपूर्ण जीवन त्याला अर्पण करणाऱ्या त्याच्या विश्वासू शिष्यांपैकी तुम्ही खरोखर एक व्हाल.

हे माझ्या दैवी प्रभू, आत्म्यांचे तारण करण्याचे आणि तुझे वैभवशाली राज्य उभारण्याचे कार्य तू करीत आहेस. तुझ्या पवित्र वचनाने माझे जीवन बदलावे एवढ्यासाठीच नव्हे, तर ते वचन इतरांपर्यंत पोहोचवण्यास हातभार लावण्यासाठीही तू मला बोलावलेस, याबद्दल मी तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू, माझे जीवन तुझे आहे. माझ्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक भागात ये आणि तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


विपुल प्रमाणात चांगले फळ देणे

सामान्य काळातील चोविसाव्या आठवड्याचा शनिवार

“ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे.” लूक 8:8

एका अर्थाने, हे छोटेसे वाक्य पेरणाऱ्याच्या दाखल्याचे सार सांगते. देवाचे वचन चार वेगवेगळ्या प्रकारे कसे स्वीकारले जाते, हे या दाखल्यातून आपल्याला दिसते. पेरलेले बी म्हणजे देवाचे वचन. चार प्रकारच्या लोकांची तुलना वाटेवर, खडकाळ जमिनीवर, काटेरी झुडपांमध्ये आणि चांगल्या जमिनीत पेरलेल्या बियांशी केली आहे.

येशू स्पष्ट करतो की वाटेवर पेरलेले बी म्हणजे असे लोक, “ज्यांनी वचन ऐकले आहे, पण सैतान येतो आणि त्यांच्या अंतःकरणातून ते वचन काढून नेतो.” खडकाळ जमिनीवर पेरलेले बी म्हणजे असे लोक, “जे आनंदाने वचन स्वीकारतात, पण त्यांना मुळं नाहीत. ते थोड्या काळापुरता विश्वास ठेवतात आणि मोहाच्या वेळी विश्वासापासून दूर जातात.” काटेरी झुडपांमध्ये पेरलेले बी म्हणजे ज्यांनी वचन ऐकले आणि स्वीकारले असे लोक; पण कालांतराने “जीवनातील चिंता, संपत्ती आणि सुखोपभोग यांमुळे त्यांची वाढ खुंटते आणि त्यांना परिपक्व फळ देता येत नाही.” शेवटी, सुपीक जमिनीसारखे असलेले लोक म्हणजे जे वचन ऐकतात आणि “ते उदार व चांगल्या अंतःकरणाने स्वीकारतात आणि चिकाटीने फळ देतात.”

या प्रकारच्या लोकांचा विचार करता, तुम्ही स्वतः कोणत्या प्रकारात मोडता? जे दररोज प्रार्थना करतात आणि आपल्या प्रभूचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात, ते बहुधा शेवटच्या दोन प्रकारांपैकी एका प्रकारात मोडतात. हे लक्षात घ्या की काटेरी झुडपांमध्ये पेरलेल्या बियांसारखे लोक असोत किंवा सुपीक जमिनीत पेरलेल्या बियांसारखे लोक असोत, दोघांच्याही जीवनात देवाच्या वचनामुळे फळ येते. म्हणजेच, देवाच्या पवित्र वचनामुळे आणि त्यांच्या जीवनातील देवाच्या उपस्थितीमुळे त्यांचे जीवन खरोखर बदलते आणि त्यांच्यामुळे जगातही फरक पडतो. मात्र फरक असा आहे की “जीवनातील चिंता, संपत्ती आणि सुखोपभोग” यांच्याशी झगडणाऱ्यांना “परिपक्व फळ” देता येत नाही. विश्वासू ख्रिस्तीजनांनी या शिकवणीवर चिंतन करावे.

तुम्ही आपल्या जीवनाकडे पाहता तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारचे फळ दिसते? आपला प्रभू ज्या “फळाविषयी” बोलतो, ते पवित्र आत्म्याच्या फळांच्या रूपाने ओळखता येते: प्रीती, आनंद, शांती, धीर, दयाळूपणा, चांगुलपणा, सहनशीलता, सौम्यता, श्रद्धा, नम्रता, आत्मसंयम आणि पावित्र्य. म्हणून, तुमच्या जीवनात परिपक्व फळे येत आहेत की अजून कच्चीच फळे येत आहेत, हे ओळखायचे असेल तर या पवित्र गुणांकडे बारकाईने पाहा. तुमच्या जीवनात दिसणारे पवित्र आत्म्याचे यांपैकी प्रत्येक फळ कितपत “परिपक्व” झाले आहे? केवळ दहा आज्ञा किंवा सात घोर पापे यांच्यापुरते न थांबता अधिक सखोल विवेकपरीक्षण करू इच्छिणाऱ्यांसाठी ही फळे उत्तम आधार ठरतात. तुमच्या जीवनात ही चांगली फळे खरोखर परिपक्व झाली असतील, तर तुमच्याद्वारे त्यांचा इतरांवर कसा परिणाम होतो, हे तुम्हाला दिसून यायला हवे. उदाहरणार्थ, तुमचा दयाळूपणा, धीर, श्रद्धा आणि आत्मसंयम यांमुळे इतरांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत कशी मदत झाली आहे?

आज पवित्र आत्म्याच्या फळांवर मनन करा. आपल्या जीवनाचे परीक्षण करताना प्रार्थनापूर्वक आणि काळजीपूर्वक या फळांचा विचार करा. जिथे ती विपुल प्रमाणात दिसतात, तिथे आनंद माना, प्रभूचे आभार माना आणि ती आणखी वाढावीत म्हणून प्रयत्न करा. जिथे ती कमी पडतात, तिथेही हे लक्षात आले म्हणून आनंद माना आणि ती का कमी पडतात याचा विचार करा. सांसारिक चिंता, संपत्तीची हाव किंवा सुखोपभोगांची ओढ यांमुळे त्यांच्या वाढीत अडथळा येतो का? खरोखर सुपीक जमीन होण्याचा प्रयत्न करा. मग आपला प्रभू तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे नक्कीच विपुल चांगले फळ आणील.

हे माझ्या दैवी पेरणाऱ्या, तू तुझ्या वचनाची परिपूर्ण बीजे उदारपणे पेरतोस. भरपूर चांगले फळ यावे म्हणून तुझे वचन स्वीकारण्यासाठी माझे हृदय उघडायला मला मदत कर. तुझे पवित्र वचन मला स्पष्टपणे ऐकू यावे आणि ते माझ्या हृदयात रुजवून वाढवता यावे, म्हणून जीवनातील चिंता आणि फसव्या गोष्टींपासून मला मुक्त कर. प्रिय प्रभू, माझ्या अंतःकरणात आणि माझ्याद्वारे तू जे काही केलेस आणि अजूनही करीत आहेस, त्या सर्वांचा मला आनंद आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अनुक्रमणिका


चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल