मराठी

प्रकरण दहावे: ख्रिस्तसभेशी एकचित्त होऊन विचार करण्याचे नियम

संत इग्नेशियस संघर्षशील ख्रिस्तसभेचे सदस्य म्हणून ख्रिस्तसभेच्या विचारांशी एकरूप राहण्यासाठी अठरा नियम सांगतात. ‘संघर्षशील ख्रिस्तसभा’ म्हणजे स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे पृथ्वीवरील सर्व जण. दुसऱ्या शब्दांत, ती म्हणजे या जगात सध्या जिवंत असलेले सर्व ख्रिस्ती.

देवाचा जास्तीत जास्त गौरव करण्यासाठी आणि त्याची पवित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची मनोवृत्ती कशी असावी, याचे सर्वसाधारण मार्गदर्शन हे नियम करतात. ख्रिस्तसभेचे सदस्य म्हणून तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्या या नियमांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत:

  • पापस्वीकार करण्याची आणि पवित्र परमप्रसाद ग्रहण करण्याची आवड
  • मिस्साबलिदान, प्रार्थना, उपासनाविधी इत्यादींमध्ये सहभागी होण्याची आवड
  • समर्पित धार्मिक जीवनाची प्रशंसा
  • दारिद्र्य, ब्रह्मचर्य आणि आज्ञापालन या सुवार्ताप्रणीत व्रतांची प्रशंसा.
  • संत, भक्तिपद्धती, संस्कारसदृश पवित्र वस्तू व विधी, तीर्थयात्रा इत्यादींची प्रशंसा.
  • ख्रिस्तसभेत पाळल्या जाणाऱ्या उपवासांची, आत्मसंयमासाठी केल्या जाणाऱ्या तपश्चर्येची आणि अशाच इतर आचरणांची प्रशंसा
  • देवालयांच्या इमारतींची प्रशंसा
  • ख्रिस्तसभेच्या सर्व आज्ञांची प्रशंसा
  • ख्रिस्तसभेतील वरिष्ठांची आणि नेत्यांची जाहीरपणे प्रशंसा करणे; त्यांच्याविषयी काही चिंता असल्यास, त्यांच्या चुका सुधारण्यास मदत करू शकतील अशाच व्यक्तींशी आणि तेही खाजगीत बोलणे
  • ईश्वरविद्येच्या अभ्यासाची, ख्रिस्तसभेच्या धर्माचार्यांची आणि धर्मसिद्धांतांची प्रशंसा
  • जिवंत व्यक्तींची तुलना महान संतांशी करणे टाळणे
  • ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीशी दृढपणे निष्ठावान राहणे
  • तारण, श्रद्धा आणि कृपा यांविषयी बोलताना सावधगिरी बाळगणे
  • तारणाविषयी बोलताना, आपल्या बोलण्यामुळे लोकांची दिशाभूल होणार नाही किंवा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे
  • श्रद्धेविषयी बोलताना, आपल्या बोलण्यामुळे लोक आळशी बनणार नाहीत, याची काळजी घेणे
  • श्रद्धा आणि कृती यांविषयी बोलताना, कोणाचीही दिशाभूल होऊ नये म्हणून स्पष्टपणे बोलणे.
  • लोकांच्या मनात गंभीर पापाची भीती निर्माण करण्यास न कचरणे; आणि केवळ देवावरील प्रेमापोटी त्याचा किंचितही अपराध करण्याची भीती त्यांच्या मनात रुजवण्याचे धैर्य बाळगणे, कारण ही भीती अधिक परिपूर्ण आहे.

तुमचे मन आणि कृती ख्रिस्तसभेशी एकरूप ठेवा. तिच्या प्रथा, शिकवण, पवित्र संस्कार, प्रेमसेवेची कार्ये, सुवार्ताप्रसाराचे उपक्रम आणि ज्या सर्व गोष्टींमुळे ती ख्रिस्ताची वधू ठरते, त्या सर्वांवर प्रेम करा. ख्रिस्तसभेवर प्रेम केल्याने, तिचा वर असलेल्या खुद्द ख्रिस्ताला ओळखण्यासाठी तुमचे मन अधिक तयार होईल.

अनुक्रमणिका

प्रकरण अकरावे: देवाची इच्छा ओळखणे