प्र. माझे वय ६४ वर्षे आहे. कदाचित ३० वर्षांपूर्वी केलेली पापेही मला वारंवार आठवतात आणि त्यांचा पापस्वीकार केला होता की नाही, असा प्रश्न मला पडतो. यापुढे मी काय लक्षात ठेवावे?
उ. धर्मगुरूंकडे पापस्वीकार करताना, अलीकडे केलेली पापे सांगून झाल्यावर, शेवटी असे काही म्हणणे चांगले: “आणि माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्व पापांबद्दल” “आणि माझ्या विस्मरणात गेलेल्या कोणत्याही पापांबद्दल.” याचा अर्थ असा नाही की पापस्वीकारात आपण जाणूनबुजून काही पापे सांगायची टाळावीत किंवा त्यांचा केवळ मोघम उल्लेख करावा. एखादे पाप विसरले असले, तरी योग्य रीतीने केलेल्या पापस्वीकारात त्याचीही क्षमा होते. नंतर, पूर्वी कधीही कबूल न केलेले एखादे गंभीर पाप तुम्हाला स्पष्टपणे आठवले, तर पुढच्या पापस्वीकारात ते सांगा. तुम्ही आधीच कबूल केलेल्या पापांची क्षमा झाली आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.
तुमच्या प्रश्नामागे कदाचित आणखी एक शंका असेल: जुनी पापे, अगदी कित्येक वर्षांपूर्वीची पापेसुद्धा, अजून आठवत असतील तर त्यांची खरोखर क्षमा झाली आहे का? त्या शंकेविषयी थोडक्यात सांगतो. संस्कारांचा उद्देश एक आहे, तर स्मरणशक्तीचे काम वेगळे आहे. पापस्वीकाराचा संस्कार म्हणजे काही मेंदू धुऊन काढण्याचा प्रकार नाही. जणू मेंदूच्या तळाशी बसवलेले बूच काढून सगळ्या आठवणी वाहून जाऊ द्याव्यात, असे या संस्कारात घडत नाही. आपल्याला कधीकधी आपली जुनी पापे, अगदी कित्येक वर्षांपूर्वीची पापेसुद्धा, आठवतात. पापाच्या जुन्या प्रसंगांचे जे ठसे स्मरणात राहतात, त्यांना धर्मशास्त्राच्या दृष्टीने काही अर्थ नाही. आठवणी हे मेंदूच्या किंवा मनाच्या कार्याशी संबंधित वास्तव आहे. पापस्वीकार हे धर्मशास्त्रीय वास्तव आहे.
आपल्या पापांची कबुली देणे आणि त्यांपासून पापमुक्ती मिळणे, हाच काळात मागे जाण्याचा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेला एकमेव मार्ग आहे. काळात मागे कसे जाता येईल हे दाखवण्यासाठी लेखकांनी आणि पटकथाकारांनी कितीही कल्पक मार्ग शोधले असले, तरी धर्मशास्त्रीय अर्थानेच आपल्याला असे मागे जाता येते. याजकाने उच्चारलेल्या पापमुक्तीच्या शब्दांचा परिणाम भूतकाळापर्यंत पोहोचतो. त्या क्षणी याजक ख्रिस्ताच्या व्यक्तीत कार्य करत असल्यामुळे तो देवाच्या सामर्थ्याने कार्य करतो. देव काळाच्या पलीकडे आहे; तो काळाच्या मर्यादेत येत नाही. देवानेच काळ निर्माण केला आणि तो काळाने बांधलेला नाही. “मी तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करतो,” या याजकाच्या शब्दांद्वारे ख्रिस्त आपल्या पापांचा दोष क्षमा करतो आणि त्या पापांमुळे भोगावी लागणारी सार्वकालिक शिक्षा माफ करतो. मात्र, त्या पापांची तात्कालिक शिक्षा शिल्लक राहू शकते. तुम्ही माणूस आहात, त्यामुळे ती पापे अजूनही तुमच्या स्मरणात असू शकतात. पण तुमची पापे देवाच्या स्मरणात नाहीत. आणि शेवटी, ज्या पापांची तुम्ही कबुली दिली आहे, त्यांची आठवण अजूनही तुम्हाला त्रास देत असेल, तर हे लक्षात ठेवा: पापाच्या आठवणीबरोबरच आणखी एक आठवण तितकीच जिवंत असायला हवी—तुम्ही त्या पापाची कबुली दिल्याची आठवण. तेही घडले आहे!
