
24 जून 2022 रोजी, येशूच्या परमपवित्र हृदयाच्या महापर्वाच्या दिवशी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल रद्द केले: रो विरुद्ध वेड आणि प्लॅन्ड पॅरेंटहूड विरुद्ध केसी. डॉब्स विरुद्ध जॅक्सन या निकालामुळे गर्भपातासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार पुन्हा राज्यांच्या विधिमंडळांकडे आला आहे. म्हणून प्रत्येक राज्याने गर्भपात थांबवण्यासाठी आणि प्रत्येक गर्भस्थ बालकाच्या हक्कांचे व प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी आता पूर्वीपेक्षाही अधिक प्रार्थनेची गरज आहे. त्यासाठी खाली काही प्रार्थना आणि साधने दिली आहेत.
आपण प्रार्थना करूया…
हे स्वर्गीय पित्या, रो विरुद्ध वेड हा निकाल रद्द झाल्याचा आनंद साजरा करताना आज आम्ही तुझा गौरव करतो. आता अनेक गर्भस्थ बालकांचे प्राण वाचतील, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी वर्षानुवर्षे अथक परिश्रम घेतलेल्या अनेक जीवनरक्षणवादी नेत्यांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. धैर्यवान विधिमंडळ सदस्यांसाठी आणि विशेषतः तुझ्या दैवी नियमाला अनुसरून कृती करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठी आम्ही तुझे आभार मानतो.
जगण्याच्या हक्कासाठी ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा अनेकांना देत राहा. गर्भपातासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आता पुन्हा प्रत्येक राज्याकडे आला आहे. म्हणून प्रत्येक राज्यातील विधिमंडळ सदस्याने प्रामाणिकपणे, नीतिनिष्ठेने, सन्मानाने, करुणेने आणि सत्याला धरून वागावे, अशी आम्ही प्रार्थना करतो. त्यांची मने आणि इच्छाशक्ती तुझ्या इच्छेने भरून टाक. गर्भधारणेच्या क्षणापासून नैसर्गिक मृत्यूपर्यंत जीवनाचे रक्षण करण्यासाठी लागणारे धैर्य त्यांना दे. तुझे सत्य त्यांच्या अंतःकरणात ठसव.
हे प्रभू येशू, जगाच्या तारणाऱ्या, गर्भपातात असंख्य जीवांचा बळी जावा अशी इच्छा बाळगणाऱ्या सैतानाला आणि सर्व दुरात्म्यांना आम्ही तुझ्या परमपवित्र नावाने जखडतो. प्रत्येक दुष्ट आत्म्याला जखडून टाक. त्यांना काहीही करू देऊ नकोस. त्यांची दुष्कृत्ये थांबव. त्यांच्या असत्यापासून सर्व लोकांचे रक्षण कर. त्यांच्या अत्याचारातून आमच्या राष्ट्राला मुक्त कर.
हे मरिये माते, या जगात देवाच्या पुत्राचे तू अत्यंत गौरवशाली साधन होतीस. सनातन पुत्राला तू आपल्या पवित्र गर्भात धारण केलेस. आमच्यासाठी प्रार्थना कर. सर्व गर्भवती मातांसाठी प्रार्थना कर. आपल्या लेकरांवर प्रेम करण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची प्रेरणा त्यांना दे. त्यांना भीती आणि चिंतेतून मुक्त कर. मातृत्वाचे त्यांचे बोलावणे स्वीकारण्यासाठी त्यांना आवश्यक ती मदत दे.
हे संत योसेफ, मुक्तिदात्याच्या रक्षणकर्त्या, येशूचे रक्षण करण्याची आणि त्याची काळजी घेण्याची विशेष जबाबदारी तुला देण्यात आली होती. जन्मलेल्या आणि गर्भस्थ अशा सर्व बालकांचीही तशीच काळजी घे. जसे प्रेम तू येशूवर केलेस, तसेच प्रेम आपल्या लेकरांवर करण्याची प्रेरणा प्रत्येक पित्याला दे.
हे पवित्र आत्म्या, ये! आमच्या राष्ट्राला आणि जगातील सर्व राष्ट्रांना पूर्णपणे व्यापून टाक. सर्वांत आधी आम्हाला तारणाच्या मार्गावर ने. आम्हाला स्वर्गात घेऊन जा. वाईटापासून आम्हाला मुक्त कर. प्रत्येक आत्म्याचे पापापासून रक्षण कर आणि प्रत्येक मानवी जीवाला गर्भपाताच्या भयावहतेपासून वाचव.
आमेन.
आणखी प्रार्थना आणि साधने
सर्व जीवनाचा पिता असलेल्या देवाला प्रार्थना
पवित्र युकरिस्तातील येशूला जीवनरक्षणासाठी प्रार्थना
कैवारी पवित्र आत्म्याला प्रार्थना
कुमारी मरियेला जीवनरक्षणासाठी प्रार्थना
गर्भपातामुळे आपले बालक गमावलेल्यांसाठी प्रार्थना
जीवनरक्षणासाठी जपमाळेची चिंतने
जीवनरक्षणासाठी क्रूसमार्गाची चिंतने
खालील प्रार्थनांचा स्रोत: priestsforlife.org/prayers
सर्व जीवनाचा पिता असलेल्या देवाला प्रार्थना
हे सनातन देवा, तू सर्व जीवनाचा पिता म्हणून स्वतःला प्रकट केले आहेस. तू संपूर्ण सृष्टीची, आणि विशेषतः तुझ्या प्रतिमेनुसार व तुझ्या सादृश्याने घडवलेल्या आम्हा मानवांची, पित्याप्रमाणे काळजी घेतोस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो.
हे पित्या, गर्भपाताचा धोका असलेल्यांवर तुझा रक्षणाचा हात ठेव आणि त्याच्या विनाशकारी शक्तीपासून त्यांना वाचव. सर्व पित्यांना तुझे बळ दे, म्हणजे गर्भपात घडवून आणण्यास हातभार लावण्याचा मोह ज्या भीतीमुळे होऊ शकतो, त्या भीतीपुढे ते कधीही झुकणार नाहीत.
आमच्या कुटुंबांना आणि आमच्या देशाला आशीर्वाद दे, म्हणजे ज्या जीवनाचा तू उगम आणि सनातन पिता आहेस, त्या जीवनाचे स्वागत करण्याचा आणि त्याचे संगोपन करण्याचा आनंद आम्हाला लाभेल. आमेन.
पवित्र युकरिस्तातील येशूला जीवनरक्षणासाठी प्रार्थना
“माझे शरीर”
“हे माझे शरीर आहे, जे तुमच्यासाठी अर्पण केले आहे.” हे प्रभू येशू, मिस्साबलीत आम्ही दररोज तुझे हे शब्द ऐकतो. या शब्दांतून तू आम्हाला तुझ्या प्रेमाचा अर्थ शिकवला आहेस. याच प्रेमामुळे तू क्रूसावर गेलास आणि आम्हाला जीवन मिळावे म्हणून स्वतःचे जीवन अर्पण केलेस. याच शब्दांतून तू आम्हाला एकमेकांवरील प्रेमाचाही अर्थ शिकवतोस. हे प्रेम इतरांना जगता यावे म्हणून स्वतःला अर्पण करायला आम्हाला प्रवृत्त करते.
“हे माझे शरीर आहे.” हे प्रभू, एखादा जीव आपल्या शरीरात वाढत आहे एवढ्याच कारणाने त्याचा जीव घेण्याचा अधिकार आपल्याला आहे असे मानणाऱ्यांच्या तोंडूनही आम्ही हे शब्द ऐकतो. गर्भपाताचे समर्थन करणारे या शब्दांचा विपर्यास करतात, हेही आम्ही ऐकतो.
दुसऱ्या कोणाला बाजूला सारण्यात माणसाला खरे जीवनसाफल्य कधीच लाभत नाही; ते नेहमी स्वतः बाजूला होण्यातच लाभते, हे तुझ्या सर्व लोकांना उमजू दे. “हे माझे शरीर आहे, जे तुमच्यासाठी अर्पण केले आहे!” या तुझ्या परमपवित्र शब्दांनुसार तुझे सर्व लोक जगोत.
ऐक्य
हे प्रभू येशू, पवित्र युकरिस्ताच्या देणगीबद्दल, म्हणजेच तुझ्या पवित्र शरीरासाठी, आम्ही तुझे आभार मानतो. या देणगीद्वारे तू आम्हा सर्वांना तुझ्यामध्ये एक शरीर बनवतोस. “आपण अनेक असलो तरी एकच शरीर आहोत, कारण आपण सर्व एकाच भाकरीत सहभागी होतो” (1 करिंथकरांस 10:17). हे प्रभू, आम्ही तुझा स्वीकार करतो तेव्हा तूही आमचा स्वीकार करतोस. तू आम्हाला स्वतःकडे उचलून घेतोस आणि त्याच वेळी आम्हाला एकमेकांशीही जोडतोस. “तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण त्याचा एक अवयव आहे” (1 करिंथकरांस 12:27).
हे प्रभू, तुझ्या देहाच्या इतर कोणत्याही अवयवाला आम्ही आमच्या प्रेमापासून कधीही वंचित ठेवू नये, असे वरदान आम्हाला दे. पवित्र सहभागितेत आम्ही जसा तुझा देह ग्रहण करतो, तसाच तुझ्या देहाच्या सर्व अवयवांचाही आम्ही स्वीकार व स्वागत करू दे, मग ते आम्हाला कितीही गैरसोयीचे वाटले तरी. विशेषतः ज्यांचे स्वागत करण्यास आमचे जग सर्वांत जास्त नाखूष आहे, म्हणजेच ज्यांनी या जगात नुकतेच पाऊल ठेवले आहे, त्यांचे स्वागत करण्यास आम्हाला मदत कर. गर्भातील आमच्या बंधुभगिनींना आशीर्वाद दे. हे प्रभू, गर्भपाताच्या पापापासून आमच्या जगाला मुक्त कर; हे पाप आईवडिलांना त्यांच्या स्वतःच्या मुलांपासून, एकमेकांपासून, स्वतःपासून आणि तुझ्यापासून दुरावते.
पवित्र युखरिस्तात आम्हाला लाभणाऱ्या ऐक्याच्या सामर्थ्याने गर्भातील बालकाविषयीची भीती दूर होऊ दे आणि त्या बालकाचे आमचा भाऊ किंवा बहीण म्हणून, तुझ्या देहाचा एक अवयव म्हणून, स्वागत करण्यास आम्ही समर्थ होऊ दे. आमेन.
श्रद्धा
हे प्रभू येशू, परमपवित्र संस्कार म्हणजे खरोखर तुझाच देह, रक्त, आत्मा आणि देवत्व आहे, असा माझा दृढ विश्वास आहे. हे अद्भुत रहस्य इंद्रियांना आकलन होत नाही. पण डोळ्यांना जे दिसते त्यापलीकडे श्रद्धा पोहोचते आणि तू उपस्थित आहेस, अशी खात्री आम्हाला देते.
हे प्रभू, पवित्र युखरिस्तावरील आमच्या श्रद्धेमुळे प्रत्येक मानवी जीवनाची प्रतिष्ठा ओळखण्याची आमची क्षमताही वाढू दे. याबाबतीतही आपली इंद्रिये आपल्याला फसवू शकतात, हे आम्हाला ठाऊक आहे. काही जण दिसायला आकर्षक नसतील, काही फारच लहान वाटतील, तर काही जण जणू पूर्णपणे माणूसच नाहीत असे भासतील.
पण पवित्र होस्तियात तुला पाहू शकणारे आम्ही आमच्या बंधुभगिनींमध्येही तुला नक्कीच पाहू शकतो. हे प्रभू, गर्भातील बालकांमध्येही आम्ही तुला पाहू शकतो. आज इतक्या लोकांना या बालकांचा विसर पडला आहे आणि जन्मलेल्या बालकांपेक्षा त्यांचे मोल कमी लेखून ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अशा काळात या बालकांच्या प्रतिष्ठेविषयी आणि मोलाविषयी आमची खात्री अधिकच दृढ होऊ दे.
आणि मग, हे प्रभू, त्या खात्रीला साजेसे वागण्यास आम्हाला साहाय्य कर. आमेन.
कैवारी पवित्र आत्म्याला प्रार्थना
हे देवाच्या पवित्र आत्म्या, प्रभू येशूने आमचा कैवारी म्हणून तुला आम्हाला देण्याचे वचन दिले. स्वर्गाच्या उंचीवर तू आमची बाजू मांडतोस आणि आमच्या वतीने बोलतोस. “मी पित्याला विनंती करीन, आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल, जेणेकरून तो सदैव तुमच्यासोबत राहील…” (योहान 14:15).
शब्दांत व्यक्त करता येत नाहीत अशा कण्हण्यांनी तू आमच्यासाठी मध्यस्थी करतोस, असे प्रेषित पौलाने आम्हाला शिकवले आहे (रोमकरांस 8:26).
तारणाच्या देणगीबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो, कारण आम्ही स्वतःचे तारण करू शकत नाही, याची आम्हाला खोल जाणीव आहे. आम्ही पाप केले आहे आणि आमच्या स्वतःच्या बळावर आम्ही क्षमा मिळवू शकत नाही. आम्हाला एका कैवाऱ्याची गरज आहे.
हे पवित्र आत्म्या, ज्यांना आम्ही त्यांची बाजू मांडण्याची गरज आहे, त्यांची आम्हाला अधिकाधिक जाणीव करून दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. अजून गर्भात असलेल्या आमच्या सर्वांत लहान, सर्वांत चिमुकल्या बंधुभगिनींचा आक्रोश आम्हाला ऐकू येऊ दे. त्यांना बोलता येत नाही, स्वतःचा बचाव करता येत नाही आणि प्रार्थनाही करता येत नाही.
हे पवित्र आत्म्या, जसा तू आमचा कैवारी आहेस, तसे आम्हालाही इतरांचे कैवारी बनव. दयेसाठी केलेला आमचा धावा जसा तू ऐकतोस, तसा आम्हालाही दयेसाठी इतरांनी केलेला धावा ऐकू दे. इतरांच्या आक्रोशाकडे कानाडोळा करून केवळ स्वतःसाठी दया मागण्याच्या दुर्दैवापासून आम्हाला वाचव. पेन्टेकॉस्टच्या दिवशी तू प्रेषितांच्या जिभा जशा मोकळ्या केल्यास, तसाच गर्भातील बालकांसाठी आज आम्हाला पेन्टेकॉस्टचा अनुभव दे, जेणेकरून थोरामोठ्यांसमोर आणि सामान्य जनांसमोर, शासनांसमोर आणि संस्थांसमोर, तसेच तुझ्या सर्व लोकांसमोर आम्ही त्या बालकांची बाजू मांडू शकू. आमेन.
कुमारी मरियेला जीवनरक्षणासाठी प्रार्थना
हे मरिये, येशूची आणि आम्हा सर्वांची माते, जीवनाला “होय” म्हणणारी माता म्हणून आज आम्ही तुझ्याकडे वळतो. “तू गर्भधारणा करशील आणि एका पुत्राला जन्म देशील,” असे देवदूताने तुला सांगितले. तुला आश्चर्य वाटले आणि हे कसे घडेल हे तुला समजत नव्हते, तरीही तू होकार दिलास. “तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.”
हे मरिये, आई होण्याची भीती वाटणाऱ्या सर्व मातांसाठी आज आम्ही प्रार्थना करतो. गर्भधारणेमुळे ज्यांना असुरक्षित वाटते आणि ज्या या परिस्थितीने गोंधळून गेल्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी मध्यस्थी कर, म्हणजे होकार देण्याची कृपा आणि पुढे जाण्याचे धैर्य देव त्यांना देईल. गर्भपाताचा खोटा उपाय नाकारण्याची कृपा त्यांना लाभो. त्यांनाही तुझ्यासोबत म्हणता येवो, “तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” त्यांना ख्रिस्ती बांधवांकडून मदत मिळो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यातून लाभणारी शांती त्यांना अनुभवता येवो. आमेन.
गर्भपातामुळे आपले बालक गमावलेल्यांसाठी प्रार्थना
लेखक: फा. फ्रँक पावोन
हे सर्व जीवनाच्या प्रभू,
तू आम्हाला एकमेकांच्या काळजीसाठी सोपवले आहेस
आणि ख्रिस्तामध्ये एक देह होण्यास बोलावले आहेस.
आनंद करणाऱ्यांसोबत आनंद करण्यास
आणि रडणाऱ्यांसोबत रडण्यास तू आम्हाला बोलावतोस.
गर्भपातामुळे आपली बालके गमावलेल्या
आमच्या बंधुभगिनींसाठी आज आम्ही केलेली प्रार्थना ऐक.
त्यांच्या अंतःकरणातील वेदना
समजून घेण्यास आम्हाला मदत कर.
तू त्यांचा स्वीकार करतोस, त्यांच्यावर दया करतोस आणि त्यांच्या जखमा भरून काढतोस,
याची जिवंत खूण आम्ही त्यांच्यासाठी बनू दे.
दुःखातून जाताना आणि त्यांच्या जखमा भरून येण्याच्या वाटेवर
धैर्याने पुढे जाण्यास त्यांना मदत कर.
आपण एकटे आहोत असे त्यांना कधीही वाटू देऊ नकोस;
तुझ्या आत्म्याच्या आणि ख्रिस्तातील त्यांच्या बंधुभगिनींच्या सान्निध्यात
त्यांना सदैव नवे बळ दे.
तू त्यांच्या मुलांवर प्रेम करतोस आणि त्यांची काळजी घेतोस,
या दृढ आशेने त्यांचे सांत्वन कर.
त्यांना नवे बळ दे,
म्हणजे जे त्यांनी गमावले त्याचे दुःख करत असतानाही,
तू अजूनही त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या सर्व चांगल्या गोष्टींची
ते आशेने वाट पाहू शकतील.
हे आरोग्य आणि आशा देणाऱ्या प्रभू,
आम्हा सर्वांना आमच्या पापांची क्षमा
आणि तुझ्या तारणाचा आनंद दे.
ही विनंती आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
आनंदाची रहस्ये
देवदूताचा मरियेला संदेश
देवदूताच्या अभिवादनाने मरिया अस्वस्थ झाली, तरी देवाची इच्छा पूर्ण करण्यात तिला आनंद झाला. आपल्या गर्भधारणेमुळे अस्वस्थ झालेल्या स्त्रियांना देवाच्या इच्छेवर भरवसा ठेवण्याची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
मरियेची एलिझाबेथला भेट
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आपल्या आईच्या गर्भात आनंदाने उडी मारली. गर्भपाताचा प्रश्न जगात ‘कदाचित’ येतील अशा बालकांचा नाही, तर जी बालके या जगात आधीच आहेत, आईच्या गर्भात जगत आहेत आणि वाढत आहेत, आणि ज्यांचा जीव घेण्याचे ठरवले गेले आहे, त्यांचा आहे, हे लोकांना उमगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
येशूचा जन्म
देव स्वतः बालक म्हणून जन्माला आला. एखाद्या व्यक्तीचे मोठेपण तिच्या आकारावर अवलंबून नसते, कारण हा नवजात राजा अगदी लहान आहे. गर्भपाताचा धोका असलेल्या चिमुकल्या बालकांविषयीचा पूर्वग्रह नाहीसा व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
बालयेशूचे मंदिरात समर्पण
हे बालक देवाचे आहे, म्हणून त्याला मंदिरात देवाला अर्पण केले जाते. मुले ही ना त्यांच्या आईवडिलांची मालमत्ता आहेत, ना सरकारची.
ती मुले आणि आपणही खुद्द देवाचे आहोत.
बालयेशू मंदिरात सापडतो
बालयेशू ज्ञानाने परिपूर्ण होता, कारण तो देव आहे. मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेविषयीच्या त्याच्या शिकवणीतले ज्ञान सर्वांना दिसावे आणि ही शिकवण केवळ एक मत नसून सत्य आहे हे त्यांना उमगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
प्रकाशाची रहस्ये
योर्दान नदीत ख्रिस्ताचा बाप्तिस्मा
येशूचा बाप्तिस्मा होतो तेव्हा पित्याची वाणी ऐकू येते: “हा माझा प्रिय पुत्र आहे.” बाप्तिस्म्याद्वारे देवाचे दत्तक पुत्र आणि कन्या होण्यासाठी सर्वांना पाचारण आहे. गर्भातील बालकांचे रक्षण व्हावे, जेणेकरून ती जन्माला येतील आणि बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्ती समुदायात त्यांचे स्वागत होईल, म्हणून आपण प्रार्थना करूया.
कानाच्या लग्नात ख्रिस्त स्वतःची ओळख प्रकट करतो
काना येथे केलेल्या चमत्काराद्वारे येशूने आपले वैभव प्रकट केले. नवदांपत्याला केवळ द्राक्षारसाचाच नव्हे, तर ख्रिस्तावरील श्रद्धेचाही आशीर्वाद लाभला. वैवाहिक नाती दृढ असावीत, प्रभूमध्ये रुजलेली असावीत आणि नवजीवनाची देणगी स्वीकारण्यास तयार असावीत, म्हणून आपण प्रार्थना करूया.
ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा करतो आणि सर्वांना मनपरिवर्तनासाठी बोलावतो
“पश्चात्ताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.” येशूच्या सार्वजनिक सेवाकार्याच्या आरंभीचे हे शब्द ज्यांनी गर्भपात केला आहे त्या सर्वांच्या कानी पडावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू त्यांना मनपरिवर्तनासाठी बोलावत आहे हे त्यांना उमगावे आणि नवजीवन देणाऱ्या पश्चात्तापाचा अनुभव त्यांना यावा.
ख्रिस्ताचे रूपांतर
डोंगरावर ख्रिस्ताचे रूपांतर होते आणि शिष्य त्याचे वैभव पाहतात. सर्वांची दृष्टी बदलो, जेणेकरून प्रत्येक मानवी जीवनात त्यांना खुद्द देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब दिसो.
येशू आपल्याला पवित्र युखरिस्त देतो
“हे माझे शरीर आहे, जे तुमच्यासाठी अर्पण केले जाते.” पवित्र युखरिस्त आपल्याला कसे जगावे आणि कसे प्रेम करावे हे शिकवतो. जे आईवडील स्वतःच्या हितासाठी आपल्या बालकांचा बळी देतात, त्यांनी त्याऐवजी आपल्या बालकांच्या हितासाठी स्वतःचे हित बाजूला ठेवायला शिकावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
दुःखाची रहस्ये
बागेतील येशूची व्यथा
गर्भपात करण्याचा मोह होत असल्यामुळे व्याकूळ झालेल्या आईवडिलांसाठी आपण प्रार्थना करूया. गर्भपाताशिवाय इतर पर्याय आहेत ही दिलासादायक बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि उपलब्ध मदतीचा त्यांनी उपयोग करावा.
येशूला चाबकाचे फटके
ख्रिस्ताला फटके मारणाऱ्यांच्या हत्यारांनी जसे त्याचे मांस फाटले, तसेच गर्भपात करणाऱ्यांच्या उपकरणांनी गर्भातील बालकांची शरीरे विदीर्ण होतात. बालकांचा जीव घेणाऱ्या या कृत्यांबद्दल गर्भपात करणाऱ्यांनी पश्चात्ताप करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट
मस्तकात रुतलेल्या काट्यांची वेदना येशूने निमूटपणे सहन केली. गर्भपातात जीव गमावलेल्या बालकांच्या आईवडिलांसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांच्यापैकी कितीतरी जणांना आता बदलता येणार नाही अशा निर्णयामुळे खोल दुःख आणि खंत वाटते. यात काही मोठी गोष्ट नाही असे इतर जण सांगतात, म्हणून कितीतरी जण हे दुःख मुकाट्याने सहन करतात.
येशू क्रूस वाहून नेतो
दुष्ट लोकांच्या सामर्थ्यामुळे येशूला शिक्षा ठोठावली गेली नाही. चांगल्या लोकांच्या मौनामुळे त्याला शिक्षा ठोठावली गेली. मौनाचा फायदा नेहमी अन्याय करणाऱ्यालाच होतो, अन्याय सोसणाऱ्याला कधीच नाही. गर्भपाताविषयी आपण कधीही गप्प बसू नये, तर बालकांचे प्राण वाचवण्यासाठी स्पष्टपणे आवाज उठवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
येशूला क्रूसावर खिळले जाते
ख्रिस्ताच्या मृत्यूचे चिंतन करताना, तथाकथित ‘सुरक्षित, कायदेशीर’ गर्भपातांमुळे मरण पावलेल्या अनेक स्त्रियांचे आपण स्मरण करूया. त्यांच्यासाठी आपण क्षमा आणि दया मागूया. त्यांच्या स्मरणामुळे इतर स्त्रिया ही दुःखद चूक करण्यापासून वाचोत.
गौरवाची रहस्ये
पुनरुत्थान
ख्रिस्त उठला आहे! आपल्या पुनरुत्थानाने त्याने मृत्यूची सत्ता नष्ट केली आणि त्यामुळे गर्भपाताची सत्ताही नष्ट केली. जीवनासाठीच्या लढ्याचा निकाल आधीच लागला आहे: जीवनाचा विजय झाला आहे! गर्भपाताविरोधात जीवनाचे समर्थन करणाऱ्या सर्वांनी हा विजय आपल्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
ख्रिस्ताचे स्वर्गारोहण
पित्याच्या सिंहासनाकडे आरोहण करताना ख्रिस्त आपल्या मानवी स्वभावाला, जो आपल्याला आईच्या गर्भात लाभतो, स्वर्गाच्या उंचीवर नेतो. कचऱ्यात फेकून देण्यासाठी नव्हे, तर स्वर्गात उचलून घेण्यासाठी मानवाची निर्मिती झाली आहे, हे तो आपल्याला दाखवतो. जगाला हे सत्य समजावे आणि जगाने गर्भपात नाकारावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
पवित्र आत्म्याचे अवतरण
पवित्र आत्मा आपला कैवारी आहे. आपण स्वतःचे तारण करू शकत नाही, म्हणून तो आपली बाजू मांडतो. ज्या गर्भातील बाळांना बोलता येत नाही, लिहिता येत नाही, मतदान करता येत नाही, निषेध नोंदवता येत नाही, इतकेच काय, प्रार्थनाही करता येत नाही, त्यांचे कैवारी त्याने आपल्याला बनवावे, अशी आपण प्रार्थना करूया.
धन्य कुमारी मरियेचे सदेह स्वर्गग्रहण
धन्य कुमारी मरिया देवमाता असल्यामुळे तिला शरीर आणि आत्म्यासह स्वर्गात घेण्यात आले. आई आणि मूल यांचे अतूट नाते आहे. मरियेचे स्वर्गग्रहण आपल्याला आठवण करून देते की आई आणि मूल यांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. स्त्रियांच्या मुलांचा जीव घेत असताना स्त्रियांवर प्रेम करता येत नाही आणि मातांना मदत केल्याशिवाय त्यांच्या मुलांना वाचवता येत नाही, हे समाजाला उमगावे, अशी आपण प्रार्थना करूया. जीवनाच्या रक्षणासाठी विचारलेला हा प्रश्न लोकांच्या हृदयाला भिडावा, अशीही आपण प्रार्थना करूया: “आपण त्या दोघांवरही प्रेम का करू शकत नाही?”
मरियेचा राज्याभिषेक
मरिया विश्वाची राणी आहे. देवाखालोखाल, त्याने निर्माण केलेल्या सर्वांमध्ये ती सर्वश्रेष्ठ आहे, अशी चर्चची शिकवण आहे. चर्च स्त्रियांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करते. जीवनाची बाजू घेणे म्हणजे स्त्रियांची बाजू घेणे, आणि स्त्रियांची बाजू घ्यायची असेल तर जीवनाचीही बाजू घेतली पाहिजे, हे लोकांना समजावे, अशी आपण प्रार्थना करूया.
जीवनरक्षणासाठी क्रूसमार्गाची चिंतने
पहिले स्थान: येशूला मरणाची शिक्षा ठोठावली जाते
येशू निरपराध असूनही राज्यसत्ता त्याला मरणाची शिक्षा ठोठावते. त्याचप्रमाणे गर्भातील आपल्या निरपराध बंधुभगिनींनाही मरणाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांचे हक्क आणि त्यांची प्रतिष्ठा मान्य केली जात नाही. या बाबतीत त्यांचे येशूशी विशेष साम्य आहे.
दुसरे स्थान: येशूला आपला क्रूस वाहायला लावला जातो
जगाच्या तारणासाठी आपल्या प्रभूला क्रूसावरील यातनांची मोठी किंमत मोजावी लागली. तो आपला क्रूस स्वीकारतो, तेव्हा इतरांना जगता यावे म्हणून आपणही दुःख सोसण्याचा निर्धार करूया. गर्भातील आपल्या बंधुभगिनींच्या बाजूने उभे राहण्यासाठी जी किंमत मोजावी लागेल, ती मोजूया.
तिसरे स्थान: येशू पहिल्यांदा पडतो
सर्वशक्तिमान देवाने आपल्यासारखे होण्याचे निवडले, म्हणून तो दुर्बल झाला. अनादिकाळापासून सामर्थ्य आणि गौरव त्याचे होते; तरीही त्याने दुःखाने भरलेल्या या जगात पूर्णपणे उतरायचे निवडले. आपल्या जीवनात आपल्याला लाभलेल्या सोयी-सवलतींमुळे गर्भातील आपल्या बंधुभगिनींचा विसर पडू नये, अशी आपण प्रार्थना करूया.
चौथे स्थान: येशू आपल्या दुःखाने व्याकूळ झालेल्या आईला भेटतो
आई आणि मूल यांच्यातल्या नात्यापेक्षा अधिक जिव्हाळ्याचे नाते नाही. ते एकमेकांचे आहेत. एकाला दुःख झाले की दुसऱ्यालाही ते जाणवते. एकावर प्रेम करणे आणि त्याचे रक्षण करणे म्हणजे दुसऱ्यावरही प्रेम करणे आणि त्याचेही रक्षण करणे. जीवनाची बाजू घेणे म्हणजे मूल आणि आई या दोघांचीही सेवा करणे. म्हणजेच आपल्या समाजाला विचारणे: “आपण त्या दोघांवरही प्रेम का करू शकत नाही?”
पाचवे स्थान: कुरेनेचा शिमोन येशूला क्रूस वाहण्यास मदत करतो
प्रभूचे दुःख अनेकांनी पाहिले. कुरेनेच्या शिमोनाने ते दुःख हलके करण्यास मदत केली. गर्भपाताबद्दल अनेक जण खेद व्यक्त करतात. काही जण मात्र तो थांबवण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करतात. सर्वांनी जीवनाच्या रक्षणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी आपण प्रार्थना करूया.
सहावे स्थान: वेरोनिका येशूचा चेहरा पुसते
वेरोनिकेच्या करुणेत आपल्या रुग्णांशी सन्मानाने वागणाऱ्या असंख्य डॉक्टर आणि परिचारिकांच्या करुणेचे प्रतिबिंब दिसते. वैद्यकीय क्षेत्रात पश्चात्ताप आणि नवजीवन यावे, अशी आपण प्रार्थना करूया. रोग बरे करण्यासाठी असलेली साधने आणि कौशल्ये जीव घेण्यासाठी यापुढे कधीही वापरली जाऊ नयेत.
सातवे स्थान: येशू दुसऱ्यांदा पडतो
जीवनाचे रक्षण करताना अनेकदा अपयश येते आणि अडथळेही येतात. तरीही क्रूसाचा अर्थ आपल्याला ठाऊक आहे. दुर्बलतेत सामर्थ्य परिपूर्ण होते. आपण केवळ स्वतःच्या बळावर आणि गुणांवर विसंबून राहत नाही; आपण ख्रिस्तावर विसंबतो. त्याचेच सामर्थ्य आपल्याला टिकवून ठेवील.
आठवे स्थान: येशू यरुशलेमच्या स्त्रियांशी बोलतो
ख्रिस्ताने या स्त्रियांना स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी रडायला सांगितले. त्याला दिखाऊ उपासना नको, तर पश्चात्ताप हवा आहे. त्याचा धावा करून नंतर अन्याय आणि रक्तपाताकडे दुर्लक्ष करणारे अनुयायी त्याला नकोत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनीही असहाय मुलांच्या बाजूने उभे राहावे.
नववे स्थान: येशू तिसऱ्यांदा पडतो
वारंवार पडूनही आपल्या प्रभूला काहीही थांबवू शकत नाही, कारण तो प्रेमाचे कार्य पूर्ण करण्यासाठी निघाला आहे. जीवनाच्या रक्षणाची चळवळ प्रेमाची चळवळ नसेल, तर तिला काहीच अर्थ नाही; पण ती प्रेमाची चळवळ असेल, तर तिला काहीही थांबवू शकणार नाही. प्रेम मृत्यूपेक्षा बलवान आहे आणि नरकापेक्षाही अधिक सामर्थ्यवान आहे.
दहावे स्थान: येशूची वस्त्रे काढून घेतली जातात
गर्भातील आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आपल्याहून बलवान लोक आपली लोकप्रियता, मालमत्ता किंवा सत्ता हिरावून घेऊ शकतील; पण आपले प्रेम ते हिरावून घेऊ शकत नाहीत. ख्रिस्ताने आपल्यावर जसे प्रेम केले, तसेच प्रेम आपण इतरांवर करतो.
अकरावे स्थान: येशूला क्रूसावर खिळले जाते
या जगाच्या सत्ताधाऱ्यांनी हे जग निर्माण करणाऱ्या देवालाच क्रूसावर खिळले. सर्व सत्ता आणि अधिकार देवाकडून येतात. जे कोणी सत्तेचा वापर करतात, त्या सर्वांना देवाच्या सिंहासनासमोर त्याचा हिशेब द्यावा लागेल. शासनकर्त्यांनी गर्भातील निरपराध बाळांचे रक्षण करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करावा, अशी आपण प्रार्थना करूया.
बारावे स्थान: येशू क्रुसावर मरण पावतो
आपला प्रभू मरण पावला. त्याची कितीतरी लेकरे त्याच्याबरोबर मरण पावली आहेत. प्रत्येक गर्भपातात त्याच्या दुःखयातना पुन्हा घडतात; आपल्या देशात दर वीस सेकंदांनी एक गर्भपात होतो. देवाच्या दृष्टीने हे कृत्य किती भयंकर आहे, याची आपल्याला केवळ थोडीशी जाणीव आहे. ख्रिस्ताला क्रुसावर खिळण्याची घटना किती भयंकर होती, याचीही आपल्याला केवळ थोडीशी जाणीव आहे. गर्भपातामुळे ज्यांचा जीव घेतला गेला, त्या आपल्या सर्व बंधुभगिनींना ख्रिस्ताच्या शांतीत विसावा लाभो आणि त्याच्या क्रुसाद्वारे त्यांचे तारण होवो.
तेरावे स्थान: येशूला क्रुसावरून खाली उतरवतात
आपल्या मृत पुत्राला कुशीत घेताना मरीयेने ती वेदना अनुभवली. गर्भपातानंतर कितीतरी माता दुःख करतात. मरीयेने त्यांचे सांत्वन करावे, गर्भपाताविषयीच्या सत्याला सामोरे जाण्यास त्यांना मदत करावी आणि त्यांना क्षमा व मनाची जखम भरून येण्याच्या वाटेवर न्यावे, अशी आपण प्रार्थना करूया.
चौदावे स्थान: येशूला कबरीत ठेवतात
कबर हे एक स्मृतिस्थळ आहे. जी व्यक्ती आता बोलू शकत नाही, तिची आठवण ठेवण्यास ती आपल्याला मदत करते. ज्या बालकांना बोलता येत नाही, त्यांची आठवण आपण आणि आपल्या समाजाने ठेवावी. आपल्या प्रभूचे पुनरुत्थान आणि त्याने दिलेले सार्वकालिक जीवनाचे वचन यांचेही आपण स्मरण ठेवूया. त्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे, म्हणून त्याने गर्भपातावरही विजय मिळवला आहे. त्याचा विजय आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया!
संसाधने:
अनेक संसाधने: priestsforlife.org
रो निकालाचा अंत: marchforlife.org
तुमच्या राज्यात कोणते कायदे लागू आहेत? familypolicyalliance.com
रो विरुद्ध वेड निकाल रद्द झाल्यावर व्हॅटिकनची प्रतिक्रिया
अमेरिकेतील बिशपांची प्रतिक्रिया
गर्भपातानंतरची आशा
राहेल प्रकल्प
