मराठी

तेहत्तिसावा दिवस: गर्व

प्रायश्चित्तकाळाच्या पाचव्या आठवड्यातील शुक्रवार

गर्व म्हणजे स्वतःविषयीची चुकीची समजूत. स्वतःच्या सदोष विचारांमुळे किंवा सैतानाच्या मोहाला बळी पडल्यामुळे आपण स्वतःविषयी किंवा आपल्या कृतींविषयी चुकीची समजूत करून घेतो. या खोट्या समजुतीमुळे अनेकदा आपल्या जीवनात नसलेले सद्गुण आपल्याला असल्यासारखे वाटतात आणि आपल्या पापांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाही आणि आपल्याला आवश्यक असलेले स्वातंत्र्यही शोधत नाही. गर्व ही ‘सर्व पापांची जननी’ आहे, म्हणजेच इतर सर्व पापे गर्वातूनच उगम पावतात. गर्वाच्या पापामुळे सैतानाचे आणि त्याच्याबरोबरच्या इतर देवदूतांचे पतन झाले. त्यामुळे आपल्यालाही त्यांच्या पापात ओढण्याचे एक खास सामर्थ्य त्यांना मिळाले.

गर्वावरचा उपाय म्हणजे नम्रता. हा सद्गुण आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देतो आणि देव आपल्याकडे जसा पाहतो तसे स्वतःकडे पाहण्यास मदत करतो. आपण खरोखर कोण आहोत, याचे संपूर्ण सत्य जाणून घ्यायला आपल्यापैकी कोणाला आवडणार नाही? देवाच्या नजरेतून स्वतःच्या आत्म्याकडे पाहावे, असे आपल्याला वाटणार नाही का? हे भयावह वाटू शकते, कारण जे दिसेल ते कदाचित आपल्याला आवडणार नाही. पण आपल्या आत्म्याची खरी स्थिती स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे पाहिल्याशिवाय आपली पुढची वाढ होऊ शकणार नाही.

गर्वामुळे आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. गर्विष्ठ व्यक्ती सहज दुखावते, इतरांना दोषी ठरवते, आपली दखल घेतलीच पाहिजे आणि आपले कौतुक झालेच पाहिजे असा आग्रह धरते. ती मनापासून इतरांचा सल्ला घेत नाही, हुकूम गाजवते, इतरांविषयी वाईट बोलते, पटकन रागावते, वाद घालते आणि छोट्याशा गोष्टीही फार मनाला लावून घेते.

नम्र लोक खऱ्या अर्थाने इतरांचे सेवक असतात. स्वतःच्या फायद्याचा विचार न करता ते प्रेमाने इतरांच्या गरजा भागवण्यासाठी तत्पर असतात. टीका, इतकेच नव्हे तर दोषारोपही ते शांतपणे स्वीकारतात. स्वतःत गुरफटून न जाता किंवा आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सतत विचार करत न बसता, आणखी प्रेम कसे करता येईल याचा ते विचार करतात. क्षमा करणे ही त्यांच्यासाठी स्वाभाविक गोष्ट असते. नम्र लोक दयाळू असतात, त्यांना सेवा करायला आवडते आणि त्यांच्या सेवेची कोणी दखल घेतली नाही तरी त्यांना आनंद होतो, कारण देव एकटाच सर्व काही पाहतो. ते वाद घालत नाहीत किंवा आपली मते इतरांवर लादत नाहीत. उलट, ते इतरांचे ऐकतात आणि त्यांना सहृदयतेने व सौम्यपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे करताना ते देवाच्या गहन सत्यांना नेहमी धरून राहतात.

देवाच्या कृपेत आपली वाढ होत असताना गर्वाचे एक अधिक खोलवरचे रूप आपल्यात शिरू शकते—आध्यात्मिक गर्व. आध्यात्मिक जीवनात प्रगती होत असताना आपण प्रत्यक्षात आहोत त्यापेक्षा अधिक पवित्र आहोत असे मानणाऱ्यांमध्ये हा गर्व उद्भवतो. आपण किती चांगले आहोत हे इतरांना दिसावे आणि आपल्या पावित्र्याबद्दल त्यांनी आपले कौतुक करावे, असे त्यांना वाटते. पापाशी झगडताना त्यांना लाज वाटते. ते आपले पाप लपवतात, सबबी सांगतात आणि पापाची प्रामाणिकपणे कबुली देत नाहीत.

तुझ्या जीवनातील गर्वाच्या पापावर नम्रता कशी उपाय ठरते, याचे चिंतन कर. तुलाही गर्वाशी झगडावे लागते, यात शंका नाही. म्हणून हे सत्य देवासमोर आणि स्वतःशीही मान्य कर. स्वतःची खरी ओळख होण्याचे दान मिळावे म्हणून प्रार्थना कर, कारण स्वतःची खरी ओळख हे नम्रतेचेच दुसरे नाव आहे. देव तुला जसा ओळखतो तसे स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर; त्यामुळे सर्व प्रकारच्या गर्वावर मात करण्यासाठी तू अधिक तयार होशील.

हे माझ्या नम्र प्रभू, तू नम्रतेचे मूर्तिमंत रूप होतास. तू देव आहेस, परमपवित्र त्रैक्याची दुसरी दैवी व्यक्ती आहेस; तरीही लोकांना तुझा न्याय करू दिलास, तुला दोषी ठरवू दिलेस आणि तुझा जीव घेऊ दिलास. हे सर्व घडत असताना तू मौन पाळलेस आणि द्वेषाला प्रेमाने उत्तर दिलेस. हे प्रिय प्रभू, मला नम्र कर आणि सर्व प्रकारच्या गर्वातून मुक्त कर. तू माझ्याकडे जसा पाहतोस तसे मला स्वतःकडे पाहता येऊ दे, म्हणजे मला माझ्या प्रत्येक पापाची जाणीव होईल आणि त्या पापांपासून दूर होऊन मी तुझ्याकडे वळेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हेही पाहा: तेहत्तिसावा दिवस: क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस

अनुक्रमणिका

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य