मराठी

परिचय

प्रायश्चित्तकाळ हा वर्षातील एक पवित्र काळ आहे. प्रायश्चित्तकाळ जवळ आला आहे, या विचाराने वरवर पाहता अनेक जण धास्तावतात. पण श्रद्धावान ख्रिस्ती मनोमन या पवित्र काळाची आशेने वाट पाहतात, कारण या काळात आपल्या जीवनात चांगली फळे येतील, अशी त्यांना आशा असते.

येशूचे जीवन त्याग आणि दुःख यांनी व्यापलेले होते. त्यांतूनच त्याने आपल्याला आपले परिपूर्ण प्रेम दिले. स्वर्गातही आपल्याला त्याचे दैवी व्यक्तित्व पूर्णपणे समजणार नाही. प्रत्येक दैवी व्यक्तीची परिपूर्णता केवळ परमपवित्र त्रैक्यालाच दिसते. तरीही आपल्या प्रभूचे मानवी जीवन समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्या जीवनात सहभागी होता येईल, त्याचे अनुकरण करता येईल आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना तो देऊ इच्छित असलेली शाश्वत पारितोषिके प्राप्त होतील.

येशूचे हे शब्द आठवा: “अरुंद दरवाजातून आत जा; कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद आहे आणि रस्ता प्रशस्त आहे. त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. जीवनाकडे नेणारा दरवाजा किती अरुंद आहे आणि रस्ता किती संकुचित आहे! तो रस्ता सापडणारे थोडेच आहेत” (मत्तय 7:13–14). त्या “अरुंद दरवाजातून” आत जाण्यासाठी दृढ निश्चय आणि त्यागमय प्रेम आवश्यक आहे. त्या अरुंद आणि खडतर वाटेने जायचे असेल, तर आपल्या जीवनातील कठीण गोष्टींना, त्यात आपल्या पापांनाही, सामोरे जावे लागते.

आपल्या पापांना सामोरे जाण्यासाठी मनापासून प्रामाणिक आणि नम्र असावे लागते. सबबी देऊन पापाचे समर्थन करणे आणि देव दयाळू आहे म्हणून तो नेहमीच क्षमा करील असे गृहीत धरणे सोपे आहे. देव आपल्याला क्षमा करतो; पण त्यासाठी आपण आपल्या पापांना सामोरे गेले पाहिजे, त्यांचा पश्चात्ताप केला पाहिजे आणि आपले जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे सोपे काम नाही.

शिवाय, आपण देवाच्या जितके जवळ येतो, तितके पूर्वी न दिसलेले सर्व काही आपल्याला अधिक स्पष्ट दिसू लागते. अगदी लहान दोषही प्रकाशात येतात, तेव्हा पाप अधिक स्पष्टपणे दिसू लागते. अशी जागरूकता येण्यासाठी खूप परिश्रम, प्रार्थना आणि मनाचा खुलेपणा आवश्यक आहे.

आपल्या पापांचा विचार करण्यासाठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा काळ म्हणजे प्रायश्चित्तकाळ. म्हणून आपल्या उणिवांकडे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून पाहण्यासाठी वेळ द्या. हे करताना निराश होऊ नका. त्या पापांतून मुक्त होण्याची आशा बाळगून त्यांचे चिंतन करा. पण देवाच्या दृष्टीने स्वतःच्या आत्म्याचे प्रामाणिकपणे, सखोलपणे आणि सातत्याने परीक्षण केले नाही, तर ती मुक्ती कधीच मिळणार नाही. तुम्हाला खरोखर पवित्र जीवन जगायचे असेल, तर ही प्रक्रिया कधीकधी कंटाळवाणी वाटू शकते. पण ती कंटाळवाणी वाटणे आणि पापाविषयी अतिरेकी शंका बाळगणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवाच्या अपार दयेवर श्रद्धा किंवा भरवसा न ठेवता, पापाचा ध्यास घेऊन सतत स्वतःची तपासणी करणे, ही पापाविषयीची अतिरेकी शंका आहे. पण देवाच्या दयेवर भरवसा ठेवला, तर प्रार्थनापूर्वक आपल्या जीवनातून अगदी लहानसे पापही दूर करण्यात मोठा आनंद मिळतो आणि विलक्षण स्वातंत्र्याकडे नेणारी वाट खुली होते.

पास्काकाळ सुरू होताच प्रायश्चित्तकाळ संपतो. प्रायश्चित्तकाळात वाटचाल करताना, त्याग करताना, सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण करताना आणि आपल्या पापांची कबुली देताना पास्काचा सण ध्यानात ठेवणे अत्यावश्यक आहे. त्याग, दुःख आणि मृत्यू हे एखाद्या अधिक उदात्त ध्येयाकडे नेणारे मार्ग नसतील, तर ते निराशाजनक ठरतात. ते ध्येय म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान आणि त्याच्या नवजीवनात तुमचा सहभाग.

या पुस्तकात येशूच्या वाळवंटातील चाळीस दिवसांवर आधारित प्रायश्चित्तकाळासाठीची ध्यानचिंतने दिली आहेत. त्यासोबत रविवारची शुभवर्तमानवाचने, सात प्रमुख पापे आणि पवित्र सप्ताह यांवरही चिंतने दिली जातील. रविवार धरले तर प्रायश्चित्तकाळ चाळीस दिवसांपेक्षा अधिक असतो. म्हणून पुस्तकात प्रायश्चित्तकाळातील प्रत्येक रविवारसाठी स्वतंत्र चिंतन दिले जाईल. पवित्र शनिवारसह उरलेले दिवस मिळून परंपरेनुसार चाळीस दिवस होतील.

प्रभूच्या वाळवंटातील चाळीस दिवसांपासून त्याच्या उपदेशातून व चमत्कारांतून त्याच्या पवित्र दुःखसहनापर्यंत तुम्ही त्याच्यासोबत वाटचाल करत असताना, हा प्रायश्चित्तकाळ तुमच्यासाठी फलदायी ठरो आणि तुमच्या जीवनात परिवर्तन घडवो, अशी कृपा प्रभू तुम्हाला देवो.

हे सर्व आशेच्या प्रभू, या पवित्र प्रायश्चित्तकाळाच्या आरंभी मी अशी प्रार्थना करतो की तू मला बदल, माझ्यात परिवर्तन घडव आणि जे काही मला सांगू इच्छितोस ते सर्व माझ्या जाणिवेस आण. मला जितके शक्य आहे तितके पूर्णपणे मी स्वतःला तुझ्या पवित्र इच्छेसाठी खुले करतो आणि उरलेले तुझ्या कृपेवर सोपवतो. माझ्या पापांपासून मी शुद्ध व्हावे आणि तुझ्या त्यागमय प्रेमाचे अधिक परिपूर्णपणे अनुकरण करावे, म्हणून नम्रतेने आणि प्रामाणिकपणे माझ्या जीवनाचे परीक्षण करण्यास मला मदत कर. प्रिय प्रभू, तुझ्या पुनरुत्थानाच्या गौरवात मला सहभागी होता यावे म्हणून तुझ्या दुःखसहनात आणि मृत्यूत मला सहभागी करून घे. हे येशू, मशीहा आणि राजा, माझा तुझ्यावर विश्वास आहे!

अनुक्रमणिका