प्रायश्चित्तकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार
“मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेले आणि मंदिराच्या छपराच्या कठड्यावर उभे केले…” (मत्तय 4:5). येशूच्या या दुसऱ्या मोहप्रसंगावर चिंतन करताना, तो ज्या ठिकाणी घडला त्याचा थोडा अधिक विचार करूया. सैतानाने येशूला मंदिराच्या छपरावरच्या उंच कठड्यावर नेले. तो कठडा मंदिराच्या सपाट छपराचाच भाग होता. धर्मशास्त्राचे शिक्षक आपले उच्च स्थान दाखवण्यासाठी तिथे बसत असत. स्वतःचे मोठेपण मिरवण्याची, व्यर्थ गौरव मिळवण्याची आणि गर्व करण्याची ती जागा होती. पूर्वीच्या अनेक धर्मनेत्यांना सैतानाने अशा व्यर्थ गौरवाचा मोह घातला होता आणि त्यांनी तो स्वतःहून स्वीकारला होता.
गौरव आणि सन्मानाचे प्रतीक असलेल्या त्या उंच स्थानातून मिळणारा गौरव खरा नव्हता, तर पोकळ होता. तो पोकळ होता, कारण त्या क्षणभंगुर, वरवरच्या झगमगाटात न्हाऊन निघण्यास जे फारच उत्सुक होते, त्यांनाच ‘या जगाचा अधिपती’ असलेल्या सैतानाने तो दिला होता.
पण येशूला अशा पोकळ गौरवाची मुळीच आस नव्हती. देवाचा पुत्र म्हणून सर्वांनी आपल्याला ओळखावे, जेणेकरून ते आपल्याकडे वळतील आणि त्यांचे तारण होईल, अशी त्याची नक्कीच आशा होती. पण आपण देव आहोत आणि सर्व स्तुतीस पात्र आहोत, या सत्यामुळे सर्वांनी आपला सन्मान करावा आणि आपला गौरव करावा, अशीही येशूची इच्छा होती. सैतान देऊ करत असलेल्या पोकळ गौरवापेक्षा हा गौरव अगदी वेगळा होता.
जेव्हा आपण इतरांच्या मतांची अवाजवी काळजी करतो, तेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण पोकळ गौरवाच्या मोहाला बळी पडतो. लोक माझ्याबद्दल काय बोलतात? त्यांना माझ्याबद्दल काय वाटते? लोकांमध्ये माझी किती पत आहे? अशा प्रकारचा पोकळ गौरव सत्यावर नव्हे, तर लोकांच्या गोंधळलेल्या मतांवर आधारलेला असतो. मतांना महत्त्व नाही. केवळ सत्यालाच महत्त्व आहे.
आपण पापी आहोत, पण येशू ख्रिस्ताने आपले उद्धार केले आहे, या सत्यातच आपला खरा गौरव आहे. आपण दुर्बळ आहोत, पण ख्रिस्तामध्ये आपल्याला सामर्थ्य मिळते. आपण मेंढरे आहोत आणि आपल्याला मेंढपाळाची गरज आहे. आपल्या जीवनात देवाची तारणदायी कृपा नसेल, तर आपण काहीच नाही. ही सत्ये आपल्याला उमगतात आणि आपण आपल्या जिवाच्या सर्व शक्तीनिशी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा जगाची मते आपले मोल ठरवत नाहीत. ख्रिस्तामध्ये आपली जी ओळख आहे, तिलाच महत्त्व आहे. आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत. आपल्या गौरवाचा हा उगम कधीही बदलणार नाही, जोपर्यंत आपण स्वतःच्या इच्छेने पाप करण्याचे आणि देवाला नाकारण्याचे निवडत नाही.
सैतान तुम्हाला व्यर्थ आणि पोकळ गौरवाचा मोह कोणकोणत्या प्रकारे घालतो, यावर चिंतन करा. कुटुंबीयांना आणि मित्रांना आपली छायाचित्रे दाखवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या घडामोडी त्यांना सांगण्यासाठी समाजमाध्यमे खूप उपयोगी ठरू शकतात. पण सैतान आजच्या काळात आपल्याला व्यर्थ गौरवाचा मोह कसा घालतो, याचेही ते एक ठळक उदाहरण आहे. मला किती लाइक्स मिळाले? माझे किती मित्र आहेत? लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या? अशा प्रश्नांची आपण अवाजवी काळजी करू लागतो, तेव्हा देवाच्या दृष्टीने आपण कोण आहोत, या जाणिवेपेक्षा इतरांच्या मतांनाच आपण जास्त महत्त्व देत आहोत, हे दिसून येते.
हे माझ्या गौरवशाली प्रभू, जगाच्या दिखाऊ गौरवाची तुला मुळीच आस नव्हती. या जगात लोकांनी तुझ्याविषयी बनवलेली चुकीची मते आणि दिलेले अन्यायकारक निवाडे तुला सहन करावे लागले, पण तू त्यांची पर्वा केली नाहीस. उलट, तू जो आहेस, जो सदैव होतास आणि जो सदैव राहशील, त्या शाश्वत सत्याच्या खऱ्या गौरवात तू पूर्णपणे सहभागी होतास. चुकीच्या मतांचा पगडा आणि लौकिक गौरवाचे मोह झटकून टाकण्यास मला मदत कर, जेणेकरून केवळ तुझ्यातच मला माझी ओळख आणि माझा गौरव सापडेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हेही पाहा: अठरावा दिवस: क्रूसाच्या पायाशी 40 दिवस
प्रायश्चित्तकाळासाठी आणखी साहित्य
