मराठी

विसावा दिवस – देवाच्या कोकराचे निर्दोषत्व


व्हिडिओ आवृत्ती

तेव्हा सैनिकांच्या तुकडीने, तिच्या अधिकाऱ्याने आणि यहुदी पहारेकऱ्यांनी येशूला पकडले, बांधले आणि प्रथम हन्नाकडे नेले. त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा तो सासरा होता. योहान 18:12-13

येशूला अटक केल्यावर त्याला बांधून हन्ना या प्रमुख याजकासमोर नेण्यात आले. हन्नाने मग त्याला कैफाकडे पाठवले. कैफाने त्याची चौकशी केली, त्याची थट्टा केली आणि मग त्याला पिलाताकडे पाठवले. पिलाताने येशूला हेरोदाकडे पाठवले. हेरोदाने त्याची चौकशी केली, त्याचा उपहास केला आणि मग त्याला पिलाताकडे परत पाठवले. येशूला एकामागून एक चौकशीला सामोरे जावे लागले.

येशूची चौकशी केल्यानंतर पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “मला या मनुष्यात काहीही दोष आढळत नाही” (लूक 23:4). हेरोदानेही येशूची चौकशी केली. त्यालाही येशू “निर्दोष” आढळला, म्हणून त्याने येशूला पिलाताकडे परत पाठवले. पिलात दुसऱ्यांदा मुख्य याजकाला आणि जमावाला उद्देशून म्हणाला, “हा मनुष्य लोकांना बंड करण्यास चिथावतो, असा आरोप करून तुम्ही त्याला माझ्याकडे आणले. तुमच्यासमक्ष मी त्याची चौकशी केली. तुम्ही त्याच्यावर केलेल्या आरोपांपैकी एकाही बाबतीत तो मला दोषी आढळला नाही. हेरोदालाही त्याच्यात दोष आढळला नाही, कारण त्याने त्याला आपल्याकडे परत पाठवले आहे. तेव्हा या मनुष्याने मृत्युदंड देण्याजोगा कोणताही अपराध केलेला नाही. म्हणून मी त्याला फटके मारवून नंतर सोडून देईन” (लूक 23:14-16).

येशू निर्दोष होता. हेरोद आणि पिलात या दोघांचाही तोच निकाल होता, जरी शेवटी पिलाताने येशूला मृत्युदंड देण्यास संमती दिली. पण आध्यात्मिक दृष्टीने सर्वांत महत्त्वाची गोष्ट हीच की येशू निर्दोष होता. तो निर्दोष होता, म्हणूनच त्याचा मृत्यू एक बलिदान ठरला. तो दोषी असता, तर त्याला झालेली शिक्षा न्याय्य ठरली असती. पण त्याच्या निर्दोषत्वामुळे त्याची शिक्षा जगाच्या तारणासाठी पापांचे प्रायश्चित्त करणारे बलिदान ठरली.

आपल्या पुत्राला निर्दोष ठरवणारे पिलाताचे शब्द ऐकताना आपल्या धन्य मातेला ते मनापासून पटले असतील. पण आपला पुत्र निर्दोष असला, तरी या जगात त्याची सुटका होणार नाही, हेही तिला उमगले असेल. उलट, पिलाताचे बोलणे ऐकताना तिला हे नीट समजले असेल की तिचा पुत्र लवकरच अनेकांच्या पापांसाठी अर्पण केले जाणारे निर्दोष कोकरू होणार आहे. या दुष्ट लोकांच्या हातून आपल्या पुत्राची सुटका होईल, अशी ऐहिक आशा तिने धरली नसती. त्याऐवजी, निर्दोष येशूच्या दुःखसहनाने आणि मृत्यूने सर्व मानवांची पापातून सुटका होईल, ही आशा तिने धरली असती.

आज येशूच्या निर्दोषत्वावर चिंतन करा. “तो निष्पाप असूनही पाप्यांसाठी त्याने स्वेच्छेने दुःख सोसले. निर्दोष असूनही दोषींचे तारण करण्यासाठी त्याने मृत्यू स्वीकारला” (झावळ्यांच्या रविवारची प्रस्तावना). आपल्या प्रभूच्या निर्दोषत्वामुळेच त्याचा मृत्यू परिपूर्ण बलिदान ठरला. हे आपल्या धन्य मातेला चांगले उमगले होते. या सत्यावर मनन करताना त्याच्या धन्य मातेच्या नजरेतून येशूचे निर्दोषत्व पाहा. त्याचे निर्मळ आणि परिपूर्ण हृदय तिला किती चांगले माहीत होते, यावर मनन करा. आपला निर्दोष पुत्र जगाच्या तारणासाठी प्राण देत असताना क्रुसासमोर उभ्या असलेल्या मरिया मातेच्या मनात जी कृतज्ञता आणि आशा होती, त्यांवर चिंतन करा. तिने जसे आपले निष्पाप हृदय त्याच्या हृदयाशी एकरूप केले, तसे तुम्हीही आपले पापी हृदय त्या दोघांच्या हृदयांशी एकरूप करा. देवाच्या कोकर्‍याचे बलिदान तुमची सर्व पापे दूर करील, असा विश्वास ठेवा.

माझ्या प्रिय माते, तू तुझ्या निष्कलंक हृदयातील मायेने आपल्या निर्दोष पुत्राकडे पाहिलेस. या सत्याची खात्री पटण्यासाठी तुला पिलाताचे शब्द ऐकण्याची गरज नव्हती. तो निर्दोष आहे, हे इतर कोणाहीपेक्षा तुला अधिक चांगले माहीत होते. पण हेही तुला माहीत होते की जे कोणी ही देणगी स्वीकारतील, त्या सर्वांसाठी तुझ्या निर्दोष पुत्राचे दुःखसहन तारणाचा उगम ठरेल.

माझ्या प्रिय माते, मी दोषी आहे. तुझ्या पुत्राला अन्यायाने जो मृत्यू सोसावा लागला, तो माझ्या अपराधांमुळे मला भोगावा लागायला हवा होता. तरीही येशूच्या परिपूर्ण बलिदानामुळे मला माझ्या पापांतून मुक्ती मिळाली आहे, याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. 

हे माझ्या निर्दोष प्रभू, तुझे बलिदान परिपूर्ण होते. तू स्वेच्छेने स्वीकारलेला क्रूस, तो स्वीकारणाऱ्या सर्वांसाठी तारणाचा उगम आहे. तुझ्या प्रेमाच्या देणगीसाठी माझा आत्मा खुला करण्याची कृपा मला दे. माझ्या जीवनप्रवासात वाट्याला येणारे क्रूस आणि अन्याय श्रद्धेने व आशेने स्वीकारून, तू निर्दोष असताना जसे दुःख सोसलेस तसे सोसण्याची कृपा मला दे.

हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुढे: एकविसावा दिवस – फटके आणि उपहास

अनुक्रमणिका

ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध!