मराठी

एकविसावा दिवस – चाबकाचे फटके आणि उपहास


व्हिडिओ आवृत्ती

तेव्हा त्याने बरब्बाला त्यांच्यासाठी सोडून दिले. पण येशूला कोरडे मारविल्यानंतर त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केले. मग राज्यपालाच्या सैनिकांनी येशूला राज्यपालाच्या प्रासादात नेले आणि सैन्याची संपूर्ण तुकडी त्याच्याभोवती जमवली. त्यांनी त्याचे कपडे काढले आणि त्याच्या अंगावर किरमिजी रंगाचा लष्करी झगा घातला. त्यांनी काट्यांचा मुकुट विणून त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच्या उजव्या हातात एक बोरू दिला. मग त्याच्यासमोर गुडघे टेकून ते त्याची थट्टा करत म्हणाले, “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!” ते त्याच्यावर थुंकले आणि त्याच्या हातातला बोरू घेऊन त्याच्या डोक्यावर वारंवार मारू लागले. त्याची थट्टा करून झाल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरचा झगा काढला, त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले. मत्तय 27:26-31

येशूला खांबाशी कोरडे मारले जात होते, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट चढवला जात होता आणि सैनिक त्याची थट्टा करत होते, तेव्हा आपल्या पुत्राला असह्य यातना होत आहेत, हे माता मरियेला आईच्या अंतःप्रेरणेने जाणवले. प्रत्येक फटक्याची वेदना तिने सोसली, प्रत्येक काट्याची टोचणी तिला जाणवली आणि आपल्या लाडक्या बाळावर ओरडून उच्चारलेला प्रत्येक हीन शब्द तिने ऐकला.

त्याच दिवशी नंतर ती वधस्तंभाच्या पायथ्याशी उभी राहिली, तेव्हा येशूच्या विदीर्ण देहावरील प्रत्येक जखम आणि त्याच्या पवित्र शरीरावर उठलेला प्रत्येक वळ पाहून तिच्या अंगावर शहारा आला असेल. तरीही माराने घायाळ झालेल्या आपल्या पुत्राकडे पाहताना तिने आपली मायेची नजर वळवली नाही. येशूने धैर्याने सोसलेल्या क्रौर्याचे परिणाम तिला पाहायचे होते. त्याच्या रक्तबंबाळ मस्तकावरचा काट्यांचा मुकुट न्याहाळताना तिला त्यात कृपेचा आणि दयेचा खरा मुकुट दिसला.

आपल्या लेकराशी इतके क्रूरपणे वागताना पाहूनही एका आईचे मन द्वेषाने कसे भरून जात नाही? ती निराश होऊन खचून कशी जात नाही? उत्तर सोपे आहे. या आईने, देवमातेने, आपल्या निष्कलंक हृदयातून सर्व काही पाहिले आणि अनुभवले. आपल्या पुत्रावरचे तिचे प्रेम इतके गहिरे होते की त्याला मारणाऱ्या आणि त्याची थट्टा करणाऱ्यांपर्यंतही ते ओसंडून पोहोचले. इतक्या द्वेषासमोर प्रेम हाच एकमेव पर्याय होता. ती आणि तिचा पुत्र द्वेष व हिंसा झेलत असताना तिला देण्यासारखी होती ती केवळ दया. ते सारे दुष्टपण तिच्या निष्कलंक हृदयातून गाळले गेले, शुद्ध झाले आणि दयेच्या रूपाने ओसंडून वाहिले.

आपल्या जीवनातील सर्वांत वेदनादायक अनुभवांपैकी एक म्हणजे दुसऱ्याने केलेली आपली थट्टा. लोकांनी आपल्याला हसणे, तुच्छतेने वागवणे, आपली खिल्ली उडवणे आणि आपल्याकडे दुर्लक्ष करणे, हे फार दुखावणारे असते. त्याला प्रत्युत्तर द्यावेसे वाटणे ‘स्वाभाविक’ आहे. पण आपल्या धन्य मातेच्या हृदयातील शांत प्रेमाचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. द्वेषाला द्वेषाने, वाईटाला वाईटाने किंवा दुखापतीला दुखापतीने आपण कधीही उत्तर देऊ नये.

आज, आपल्या पुत्राला कोरडे मारले जाताना आणि त्याची थट्टा होताना वेदनेने पाहणाऱ्या देवमातेच्या भावना, विचार आणि तिच्या अंतःकरणातील अनुभव यांवर चिंतन करा. तिच्या हृदयातून वाहणाऱ्या निष्कलंक प्रेमाच्या प्रवाहात स्वतःला सामावून घ्या; तो प्रवाह द्वेष करण्याचा मोह शमवतो. विशेषतः, इतरांच्या वाईट वागणुकीचा तुम्हाला ज्या ज्या प्रकारे अनुभव आला आहे, त्यावर चिंतन करा. हे लक्षात ठेवा की तुमच्या या वधस्तंभापाशीही आपली धन्य माता उभी आहे. इतरांनी तुम्हाला वाईट वागणूक दिली असो किंवा तुम्ही स्वतः दुसऱ्या कोणाला वाईट वागणूक दिली असो, तुम्हाला जे काही वाटते आणि तुम्ही जे काही अनुभवता, ते सर्व ती पाहते. आईच्या मायेने ती तुमच्या पाठीशी उभी आहे आणि तिच्या हृदयातील प्रेम ओसंडून तुमच्या हृदयात वाहत आहे.

हे माझ्या परमप्रिय माते, माराने घायाळ आणि विदीर्ण झालेल्या तुझ्या पुत्राकडे पाहताना तुझ्या हृदयाला काय वाटले असेल, याची मी केवळ कल्पनाच करू शकतो. त्याच्यावर पडणाऱ्या प्रत्येक फटक्याच्या वेळी तू त्याची आराधना केलीस आणि त्याची केलेली प्रत्येक थट्टा ऐकलीस; तेव्हा तुला किती वेदना झाल्या असतील, याचीही मी केवळ कल्पनाच करू शकतो. पण तुझ्या हृदयातील प्रेम रागावण्याच्या आणि निराश होण्याच्या प्रत्येक मोहावर मात करून गेले. तुझे तुझ्या पुत्रावरचे प्रेम निष्कलंक आणि तेजोमय होते.

हे माझ्या निष्कलंक माते, तू माझीही विश्वासू आणि प्रेमळ आई आहेस, यासाठी मी तुझे आभार मानतो. माझ्या जीवनातील वधस्तंभांचा अनुभव घेताना मला माहीत आहे की तू माझ्या पाठीशी उभी आहेस, माझी प्रत्येक जखम पाहतेस आणि तिची वेदना अनुभवतेस. तुझ्या या लेकरावर तू प्रेम करतेस आणि त्याची काळजी घेतेस, यासाठी तुझे आभार. तुझ्या हृदयातून ओसंडणाऱ्या प्रेमाचा स्वीकार करण्यास मला मदत कर, जेणेकरून हे प्रेम माझी आशा आणि माझे बळ होईल.

हे माझ्या येशू, तुला कोरडे मारण्यात आले आणि तुझी थट्टा करण्यात आली. तुझे अंग जखमांनी भरले होते आणि चहूकडून तुझा उपहास होत होता, तरीही तू कधीही द्वेषाला शरण गेला नाहीस. तू ही वाईट वागणूक पूर्णपणे स्वीकारलीस आणि त्या कृतीने पापाचे रूपांतर कृपेत केलेस. हे प्रिय प्रभू, ती कृपा माझ्यावर ओत. गरजेच्या वेळी तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. 

हे माझ्या प्रिय माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

बाविसावा दिवस – “पाहा, तुमचा राजा!”

अनुक्रमणिका

ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध!