मराठी

तेविसावा दिवस – मृत्युदंडाची शिक्षा


व्हिडिओ आवृत्ती

आपले काहीच चालत नाही, उलट दंगल उसळू लागली आहे, हे पाहून पिलाताने पाणी घेतले आणि जमावासमोर हात धुऊन म्हटले, “या माणसाच्या रक्तपाताचा दोष माझ्यावर नाही. आता तुमचे तुम्ही पाहा.” तेव्हा सर्व लोकांनी उत्तर दिले, “त्याचे रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलांवर येवो.” मग त्याने बाराब्बाला त्यांच्यासाठी सोडून दिले; पण येशूला फटके मारवून त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी त्यांच्या हवाली केले. मत्तय 27:24-26

निर्णय झाला होता. येशू निर्दोष आहे असे आपल्याला वाटते, हे पिलाताने जाहीर केले होते. तरीही मुख्य याजकांचा आणि जमावाचा विरोध व त्यांच्या धमक्यांमुळे त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याचा आदेश दिला. उठाव टाळण्याचा हा पिलातासाठी सर्वांत सोपा मार्ग होता. तो भ्याडपणे वागला आणि मग येशूच्या रक्तपाताचा दोष आपल्यावर नाही, असे त्याने जाहीर केले. मुख्य याजक, वडीलजन आणि तिथे उपस्थित असलेले सर्व जण ओरडून म्हणाले, “त्याचे रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलांवर येवो.”

पिलाताने आपल्या पुत्राला मृत्युदंड ठोठावल्याचे ऐकून आपल्या धन्य मातेला काय वाटले असेल? धर्मनेत्यांनी आणि जमावातील चिथावणीखोरांनी मोठ्याने ओरडून त्या शिक्षेला संमती दिली, तेव्हा तिच्या मनात काय आले असेल? “त्याचे रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलांवर असो,” या शब्दांवर ती चिंतन करत राहिली, तेव्हा कदाचित तिने त्यांनाच आपल्या अंतःकरणातील सर्वांत गहन प्रार्थनेचे रूप दिले असेल.

क्रुसावर खिळलेल्या आपल्या पुत्रासमोर उभी राहून, काही तासांपूर्वी उच्चारलेल्या त्या शब्दांवर चिंतन करताना, आपल्या धन्य मातेला उमगले असेल की त्या शब्दांत येशूची सर्वांत गहन इच्छा व्यक्त झाली होती. आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांसह सर्व लोकांवर आपले परमपवित्र रक्त खरोखरच ओतले जावे, अशी त्याची इच्छा होती. त्या रक्ताने त्या सर्वांना व्यापून टाकावे, त्यांची पापे धुऊन टाकावीत आणि त्यांना पवित्र करावे, जेणेकरून त्यांना त्याच्या शाश्वत राज्यात प्रवेश करता यावा, असे त्याला वाटले असेल. आपल्या प्रभूची हीच इच्छा मरिया मातेलाही होती. पिलाताच्या भ्याडपणाबद्दल तिने त्याला आणि जमावाच्या कठोरपणाबद्दल तिने त्यांनाही क्षमा केली असेल.

इतरांच्या पवित्रीकरणासाठी आपले रक्त सांडण्याचे आवाहन आपल्या सर्वांना केले आहे. येशू हाच जगाचा एकमेव तारणारा आहे; तरीही त्याच्या अर्पणात सहभागी होण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. आपले रोजचे त्याग त्याच्या एकमेव शाश्वत बलिदानाशी जोडण्याचे आवाहन आपल्याला केले आहे. यासाठी दुखावलेला अभिमान, राग, मनातली वेदना आणि सूडभावना यांचा लवलेशही आपण मनात ठेवू नये. ज्यांनी आपल्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांच्यासह सर्वांच्या भल्यासाठी आपला रोजचा त्याग अर्पण व्हावा, अशी इच्छा आपण बाळगली पाहिजे. लौकिक न्याय मिळवण्याचा आग्रह आपण सोडला पाहिजे आणि दया व क्षमा यांतून देवाचा न्याय पूर्णत्वास येतो, हे ओळखले पाहिजे.

“त्याचे रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलांवर असो,” या लोकांच्या शब्दांवर चिंतन करणाऱ्या आपल्या धन्य मातेचे आज मनन करा. येशू क्रुसावर असताना त्या तीन तासांत हेच शब्द तिच्या अंतःकरणातील सर्वांत गहन प्रार्थना बनले, हे लक्षात घ्या. मरिया माता या शब्दांनी प्रार्थना करत आहे, हे मनात आणताना, तुम्हाला मिळालेली वाईट वागणूक, तुमची दुःखे आणि मनाच्या जखमा ख्रिस्ताच्या क्रुसाशी जोडण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःचा त्याग स्वेच्छेने स्वीकारलात, तर ज्यांना कृपेची आणि दयेची सर्वांत जास्त गरज आहे, त्यांना त्या त्यागातून कृपेची आणि दयेची पाखर लाभू शकते, हे लक्षात ठेवा.

हे माझ्या प्रिय माते, आपल्या निष्कलंक हृदयात केलेल्या चिंतनातून तू तुझ्या पुत्राचा छळ करणाऱ्यांच्या कठोर शब्दांना स्वतःच्या सुंदर प्रार्थनेचे रूप देऊ शकलीस. तुझ्या पुत्राने सांडलेले रक्त हे कृपेचे आणि दयेचे झरे आहे, हे तुला उमगले. सर्वांनी ती कृपा आणि दया मागितली नसली, तरी सर्वांनाच त्यांची गरज होती.

माझ्या प्रेमळ माते, तुझ्या दयाळू हृदयाचे मला अनुकरण करता यावे आणि गरजू सर्वांवर तुझ्या पुत्राचे रक्त विपुल प्रमाणात ओतले जावे अशी मला प्रार्थना करता यावी, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. 

हे माझ्या दुःखसहणाऱ्या प्रभू, माझी दुःखे तुझ्या दुःखांशी आणि मला सहन करावे लागणारे अन्याय तुझे परमपवित्र रक्त सांडण्यात जो अन्याय झाला, त्याच्याशी जोडण्याची कृपा मला दे. सर्व गोष्टींकडे तुझ्या नजरेने पाहण्यास आणि सर्व लोकांवर तुझ्या पवित्र हृदयाने प्रेम करण्यास मला मदत कर.

हे माझ्या प्रिय माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

चोविसावा दिवस – माता आणि पुत्राची नजरेतून झालेली भेट

अनुक्रमणिका

ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध!