मराठी

चोविसावा दिवस – माता आणि पुत्राची नजरेतून झालेली भेट


व्हिडिओ आवृत्ती

कालवारीच्या वाटेवर पुत्राला त्याची माता कशी भेटली, याचे चिंतन करा. येशू आणि मरिया यांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या नजरा जणू बाण बनून एकमेकांवर इतके कोमल प्रेम करणाऱ्या त्या दोघांच्या हृदयांना भेदून गेल्या.

हे माझ्या परमप्रेमळ येशू, या भेटीत तू सोसलेल्या वेदनेमुळे तुझ्या परमपवित्र मातेची खरी भक्ती करण्याची कृपा मला दे. आणि हे माझ्या राणी, तू दुःखाने व्याकूळ झाली होतीस. तुझ्या प्रार्थनांनी मला ही कृपा मिळवून दे की तुझ्या दिव्य पुत्राच्या दुःखसहनाचे स्मरण माझ्या हृदयात सदैव आणि प्रेमाने राहो. हे येशू, माझ्या प्रिया, सर्वांपेक्षा अधिक प्रेम मी तुझ्यावर करतो. आजवर जेव्हा जेव्हा मी तुझे मन दुखावले, त्याबद्दल मी पश्चात्ताप करतो. पुन्हा कधीही माझ्याकडून तुझे मन दुखावले जाऊ देऊ नकोस. मी सदैव तुझ्यावर प्रेम करावे, अशी कृपा मला दे; मग तुझ्या इच्छेप्रमाणे माझे जे करायचे ते कर. (क्रूसमार्गाचे चौथे स्थान — संत अल्फोन्सस लिगोरी)

कालवारीच्या वाटेवर आपल्या पुत्राची भेट झाली, तो क्षण मरियामाता कशी विसरू शकली असती? आपल्या पुत्राच्या क्रुसासमोर उभी असताना ती पवित्र भेट तिच्या मनात आणि हृदयात पुन्हा पुन्हा जिवंत झाली असेल. येशू आपला क्रूस वाहत कालवारीकडे जात असताना, जणू ते दोघे एकच होते, अशा एकरूपतेने त्यांनी तो हळुवार क्षण अनुभवला.

पहिल्यांदा पडल्यावर येशू उठला आणि पुन्हा चालू लागला. शरीर रक्तबंबाळ झालेले असताना आणि इतक्या वेदना होत असतानाही, आईच्या प्रेमळ नजरेने त्याला क्षणभर दिलासा दिला. त्यांची नजरानजर झाली आणि दुःखात व आनंदात त्यांची हृदये एक झाली.

एकमेकांच्या खोल वेदना जाणवताच येशूचे पवित्र हृदय आणि मरियेचे निष्कलंक हृदय दुःखाने भरून आले. आपल्या प्रिय मातेकडे पाहताच येशूला जाणवले की, त्याला इतक्या क्रूरपणे वागवताना पाहून तिच्या निष्कलंक हृदयात जणू तलवार खुपसली गेली होती. आपल्या धन्य मातेने येशूकडे पाहिले, तेव्हा तिला त्याच्यात केवळ जगाचा तारणाराच दिसला नाही, तर जिचे त्याच्यावर जिवापाड प्रेम होते, ती त्याच्याकडे आपले लेकरू म्हणूनही पाहत होती.

आई आणि पुत्र यांच्यातील नात्याच्या तीव्र भावना दोघांनाही जाणवल्या आणि त्यांच्या हृदयांत आनंद व दुःख एकवटले. प्रेम दुःखापेक्षा प्रबळ होते आणि तारण मृत्यूपेक्षा सामर्थ्यवान होते. जगाने आजवर अनुभवली नव्हती अशी सर्वांत मोठी कृपा येशू जगाला मिळवून देत होता. या जाणिवेतून उमटलेल्या आनंदाने त्या क्षणी माता आणि पुत्र यांची अंतःकरणे भरून गेली आणि हे बलिदान पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक असलेले बळ त्या दोघांनाही मिळाले.

आपल्या मायाळू काळजीने आणि प्रेमळ नजरेने दुसऱ्याचे दुःख हलके करण्याची संधी आपण प्रत्येकाला जीवनात मिळते. गरजू व्यक्ती भेटते, तेव्हा आपल्याला करुणा व्यक्त करण्याची संधी मिळते. आपण दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत अशा भावनेतून वाटणारी कीव त्याच्याकडे तुच्छतेने पाहते; पण खरी करुणा मनापासून त्याचे दुःख समजून घेते आणि त्याच्याबरोबर ते सोसते. खरी करुणा दुसऱ्याचा क्रूस आपल्या खांद्यावर घेते, त्याच्या मनात आणि हृदयात शिरते आणि प्रत्येक खडतर वाटेवर त्याच्या खांद्याला खांदा लावून चालते.

कालवारीच्या वाटेवर माता आणि पुत्र यांनी एकमेकांकडे प्रेमाने पाहिले, त्या सुंदर पण दुःखद प्रसंगावर आज चिंतन करा. क्रुसाकडे जाणाऱ्या तुमच्या स्वतःच्या वाटेवरही माता आणि पुत्र तुम्हाला भेटतात, याचाही विचार करा. तुमच्यासमोर काहीही आले आणि तुम्हाला काहीही सोसावे लागले, तरी ते तुमच्याजवळ आहेत. त्यांचे तुमच्याकडे लक्ष आहे, ते तुमच्यावर प्रेम करतात आणि आपली हृदये तुम्हाला अर्पण करतात. दररोज भेटणाऱ्या लोकांशी वागताना येशूच्या आणि आपल्या धन्य मातेच्या हृदयांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. दुःख सोसणाऱ्या सर्वांबद्दलची तुमची करुणा आणि कळकळ वाढू द्या. ते आपापल्या विया दोलोरोसा (दुःखाच्या वाटेवर) एकेक पाऊल टाकत असताना त्यांना साथ द्या.

हे माझ्या दुःखी माते, तू आधीच किती तरी दुःख सोसले होतेस. तरीही आपल्या पुत्रावरचे कोमल प्रेम व्यक्त करण्याची ती क्षणभराची संधी तू दवडली नाहीस. तू त्याच्याकडे पाहिलेस, तेव्हा तुझे हृदय त्याच्या हृदयाशी एकरूप झाले. त्याला झालेल्या वेदना तुलाही जाणवल्या. तू त्याला असा अलौकिक आनंद दिलास, की जगाच्या तारणासाठी आपले जीवन अर्पण करण्याचा त्याचा निर्धार अधिक दृढ झाला.

हे माझ्या प्रिय माते, तू मायेने घेत असलेल्या माझ्या जीवनाची काळजी मला स्वीकारता यावी म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. मी माझा क्रूस वाहताना आणि माझ्या वाट्याला येणारी दुःखे सोसताना, माझ्यासाठी मध्यस्थी कर. तुझ्या मायाळू हृदयातून मला लाभणारे तुझ्या पुत्राचे सामर्थ्य स्वीकारण्यासाठी माझा आत्मा खुला कर.

हे माझ्या दुःख सोसणाऱ्या प्रभू, पहिल्यांदा पडल्यावर तू पुन्हा कालवारीच्या वाटेने चालू लागलास, तेव्हा किती प्रेमाने तू आपल्या मातेकडे पाहिलेस! तुला स्वतःची काळजी नव्हती; तुला काळजी होती ती तुझ्या मातेची आणि तुझ्या क्रुसाची कृपा ज्यांना लाभणार होती त्या सर्वांची. हे प्रिय प्रभू, जे सदैव तुझ्यासाठी आपले हृदय उघडे ठेवतात आणि तू देत असलेल्या कृपा अंतःकरणात सामावून घेतात, त्यांच्यापैकी मीही एक असावे, जेणेकरून मला तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून चालता येईल.

हे दयेच्या माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पंचविसावा दिवस – येशू पडतो

अनुक्रमणिका

ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध!