
पाहा, प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात दिसला आणि म्हणाला, “ऊठ, बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्तला पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा. हेरोद बाळाचा जीव घेण्यासाठी त्याचा शोध घेणार आहे.” योसेफ उठला आणि रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्तला निघाला. मत्तय 2:13-14
आपली धन्य माता आपल्या पुत्राच्या क्रुसासमोर उभी होती, तेव्हा संत योसेफाबरोबर इजिप्तला पळून गेल्याची आठवण तिला झाली असेल. हेरोदाच्या क्रूरतेपासून येशूचे रक्षण करण्यासाठी ते पळून गेले होते. पण आता ती क्रूरता येशूपर्यंत येऊन पोहोचली होती.
कदाचित मरिया मातेला प्रश्न पडला असेल: आज संत योसेफ इथे असते, तर त्यांनी काय केले असते? यरुशलेममधून पळून जाऊन त्यांनी पुन्हा येशूला वाचवले असते का? आपल्या पुत्रावर कोसळलेल्या या अनर्थापासून त्यांनी त्याचे रक्षण केले असते का?
या गोष्टींचा विचार करताना मरिया मातेने या दुःखाच्या रहस्याचा मनापासून स्वीकार केला असेल. फार पूर्वी ते हेरोदापासून पळून गेले होते, कारण तेव्हा येशूची वेळ आली नव्हती. जगाच्या तारणासाठी येशूने आपले प्राण अर्पण करण्याची ती वेळ नव्हती. पण आता त्याची घटिका आली होती. दुःखाच्या या महान रहस्याला सामोरे जाताना श्रद्धेने आणि भरवशाने तिथे उभे राहणे एवढेच आता तिच्या हाती होते.
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दुःख आणि वेदना यांपासून दूर जाण्याचे क्षण असतात, तसेच त्यांचा स्वीकार करण्याचेही क्षण असतात. काही प्रसंगी देव आपले रक्षण करील. तर काही प्रसंगी आपल्या वाट्याला आलेल्या क्रुसाचा पूर्णपणे स्वीकार करण्यास तो आपल्याला आमंत्रण देईल.
मरियामातेसोबत क्रुसाकडे पाहताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाची इच्छा अगदी योग्य वेळी पूर्ण होते. आपली वेळ येण्यापूर्वी येशूला दुःख सहन करावे लागले नाही. त्याच्या गौरवाचा क्षण येईपर्यंत स्वर्गातील पित्याने दुष्ट लोकांपासून त्याचे रक्षण केले. हा त्याचा दिवस होता. ही त्याची घटिका होती. पाप आणि मृत्यू यांना कवटाळण्याचा हा त्याचा क्षण होता.
आज आपल्या जीवनात देव कोणत्या वेळी काय घडू देतो, यावर चिंतन करा. आज तुम्ही कशाचा स्वीकार करावा म्हणून देव तुम्हाला बोलावत आहे? आज तुम्हाला कोणता क्रूस दिला जात आहे? योग्य वेळ आली असेल आणि तुमचा स्वतःचा क्रूस स्वीकारण्याचा दिवस उजाडला असेल, तर तो स्वीकारण्यास कचरू नका. त्यातून सुटण्याचा मार्ग किंवा पळून जाण्यासाठी एखादी जागा शोधू नका. येशू आणि आपल्या धन्य मातेसोबत क्रुसाला सामोरे जा. त्यांचे सामर्थ्य आणि आधार तुम्हाला लाभत आहेत, हे लक्षात ठेवा.
हे प्रिय माते, तुझ्या पुत्राचे आयुष्यभर रक्षण करण्यासाठी तुला पाचारण करण्यात आले होते. आईच्या मायेने त्याची काळजी घेताना सदैव दक्ष राहण्याचे आवाहन तुला करण्यात आले होते. आज माझी आई हो आणि तुझ्या प्रेमाच्या पदराखाली मला घे. देवाची इच्छा असेल तेव्हा मला दुष्टतेपासून मुक्त कर आणि पापापासून माझे सदैव रक्षण कर.
माझ्या माते, माझ्या स्वतःच्या दुःखाची आणि क्रुसाची वेळ येईल, तेव्हा तू माझ्या अगदी जवळ उभी आहेस या खात्रीने त्या क्रुसाला धैर्याने ‘हो’ म्हणायला मला मदत कर.
हे माझ्या प्रिय प्रभू, त्या दुष्टापासून तू माझे सदैव रक्षण करशील, हे मला माहीत आहे. त्याचा दुष्टपणा धैर्याने आणि आशेने सहन करण्याची कृपा मला दे. माझी दृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या क्रुसाच्या गौरवशाली सिंहासनावर खिळून राहो. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या परिपूर्ण आदर्शाप्रमाणे आचरण करण्यास मला मदत कर.
हे मरिया माते, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
बारावा दिवस – एकत्र सोसलेले दुःख
ई-पुस्तक & मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध!

