मराठी

पुनरुत्थानकाळाचा पाचवा आठवडा

तारणाचा एकमेव मार्ग

इस्टरचा पाचवा रविवार (वर्ष अ)

“मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येत नाही.” योहान 14:6

तुमचे तारण झाले आहे का? या प्रश्नाला तीन अर्थांनी “होय” असे उत्तर देता यावे, अशी आशा आहे: बाप्तिस्म्याद्वारे देवाच्या कृपेने तुमचे तारण झाले; तुम्ही स्वेच्छेने देवाचे अनुसरण करण्याचे निवडता, तेव्हा त्याच्या कृपेने आणि दयेने तुमचे तारण होत राहते; आणि आपल्या अंतिम क्षणी तारण प्राप्त होऊन स्वर्गाच्या वैभवात प्रवेश मिळावा, अशी तुम्ही आशा बाळगता. या तिन्ही अर्थांनी आपल्याला “होय” म्हणता येत नसेल, तर जीवनात आपण जे काही साध्य करतो त्याला काहीच अर्थ नाही.

आपले तारण कसे होते, याचेही स्मरण ठेवणे महत्त्वाचे आहे. तारणाचे अमूल्य दान आपल्याला पूर्वी कसे मिळाले, आज कसे मिळते आणि पुढे ते मिळण्याची आशा आपण कशाच्या आधारावर बाळगतो? उत्तर सोपे आहे: पित्याकडे जाण्याचा आपला एकमेव मार्ग जो येशू ख्रिस्त, त्याचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान यांद्वारे. त्याच्याशिवाय आपल्याला तारण मिळण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही.

केवळ “चांगले” असण्याने आपल्याला तारण मिळते, अशा समजुतीत आपण कधी कधी अडकतो. दुसऱ्या शब्दांत, तुमची सत्कृत्ये तुमचे तारण करतात का? याचे योग्य उत्तर “होय” आणि “नाही” असे दोन्ही आहे. “होय” ते एवढ्याच अर्थाने की ख्रिस्ताशी असलेल्या ऐक्याचा सत्कृत्ये हा एक आवश्यक भाग आहे. त्याच्याशिवाय आपण काहीही चांगले करू शकत नाही. पण आपण ख्रिस्ताचा आपल्या जीवनात स्वीकार केला असेल आणि त्यामुळे आपण तारणाच्या मार्गावर असू, तर आपल्या जीवनात सत्कृत्ये नक्कीच दिसून येतील. पण उत्तर “नाही” असेही आहे, कारण येशूच एकमेव तारणारा आहे. चांगले होण्याचा आपण कितीही प्रयत्न केला, तरी आपण स्वतःचे तारण करू शकत नाही.

ही चर्चा आपल्या इव्हँजेलिकल ख्रिस्ती बंधुभगिनींना विशेष परिचयाची आहे. पण तिच्याशी आपलाही चांगला परिचय असायला हवा. या चर्चेच्या केंद्रस्थानी स्वतः येशू ख्रिस्त आहे. तो आणि तोच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. तोच मार्ग, सत्य आणि जीवन आहे, हे आपण ओळखले पाहिजे. स्वर्गाकडे जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. ज्या सत्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्या सत्याची परिपूर्णता त्याच्यात आहे. जे जीवन जगण्यासाठी आपल्याला बोलावले आहे, ते जीवन तोच आहे आणि कृपेच्या या नव्या जीवनाचा उगमही तोच आहे.

तुमच्या जीवनात येशूचे स्थान किती मध्यवर्ती आणि अद्वितीय आहे, यावर आज चिंतन करा. त्याच्याशिवाय तुम्ही काहीच नाही; पण त्याच्यासोबत तुम्हाला परिपूर्णतेचे जीवन लाभते. आज अगदी वैयक्तिक पातळीवर ठोस निर्णय घेऊन त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून निवडा. त्याच्याशिवाय तुम्ही काहीच नाही, हे नम्रपणे कबूल करा आणि त्याला तुमच्या जीवनात येऊ द्या, जेणेकरून तो तुम्हाला स्वर्गातील आपल्या प्रेमळ पित्याला अर्पण करू शकेल.

हे माझ्या प्रभू, माझ्या तारणाऱ्या, आज मी तुला “हो” म्हणतो आणि माझा प्रभू व तारणारा म्हणून माझ्या जीवनात तुझा स्वीकार करतो. ज्या बाप्तिस्म्यामुळे माझ्या कृपामय जीवनाची सुरुवात झाली, त्या दानाबद्दल मी तुझे आभार मानतो. आज मी पुन्हा तुझ्या मार्गाने चालण्याचा निर्णय घेतो, जेणेकरून तू माझ्या जीवनात अधिक पूर्णपणे प्रवेश करावा. माझ्या जीवनात प्रवेश करताना मला स्वर्गातील पित्याला अर्पण कर. हे प्रिय येशू, माझी प्रत्येक कृती तुझ्या मार्गदर्शनाने घडो, म्हणजे तुझ्यासह मी पित्याला चिरंतन अर्पण होईन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


नम्रता आणि कृतज्ञता

इस्टरचा पाचवा रविवार (वर्ष ब)

“मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, त्याला पुष्कळ फळ येईल, कारण माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही.” योहान 15:5

किती थोडक्या शब्दांत किती मोलाची आठवण… “माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही.”

हे ऐकून सुरुवातीला आपल्याला वाईट वाटू शकते. आपल्या अहंकाराला ठेच लागू शकते आणि हा विचार स्वीकारायला आपण तयार नसू शकतो. हे खरेच आहे का? देवाशिवाय आपण खरोखरच काहीही करू शकत नाही का? याचे उत्तर अर्थातच “होय” असे आहे. येशू खोटे बोलत नाही. आपल्या जीवनात देव नसेल तर आपण काहीही करू शकत नाही.

खरे तर, देवाला क्षणभर जरी आपला विसर पडला, तरी आपले अस्तित्वच संपून जाईल. आपण अस्तित्वात असावे अशी देवाची इच्छा सतत असते, म्हणूनच आपण अस्तित्वात आहोत. सत्कृत्ये करणे, इतरांच्या जीवनात चांगला बदल घडवणे, फलदायी जीवन जगणे यांसारख्या कोणत्याही बाबतीत देवाच्या कृपेशिवाय आपण काहीही चांगले करू शकत नाही.

सुरुवातीला हे ऐकणे कठीण वाटले, तरी आपण यावर नियमितपणे चिंतन केले पाहिजे. आपण यावर चिंतन केले आणि हे सत्य मनापासून स्वीकारले, तर आपल्या आत्म्यात दोन गोष्टी घडतील. पहिली म्हणजे, आपली नम्रता वाढेल. आपण जोपासू शकतो अशा सर्व सद्गुणांमध्ये नम्रता हा सर्वांत महत्त्वाचा सद्गुण आहे. तिला “सर्व सद्गुणांची जननी” म्हटले गेले आहे. कारण या सद्गुणातून इतर सर्व सद्गुण उगम पावतात. देवच सर्वकाही आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहोत, हे जाणणे म्हणजे नम्रता. हे सत्य नम्रपणे मान्य केल्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीत देवाचा शोध घेता येईल आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात त्याला मनापासून आमंत्रित करता येईल.

देवाशिवाय आपण काहीही करू शकत नाही, हे उमगल्यावर आपल्या अंतःकरणात होणारा दुसरा बदल म्हणजे आपली कृतज्ञता वाढेल. देवच सर्वस्व आहे आणि आपल्या जीवनात तो आपल्याला सतत कृपा देत असतो, हे जसजसे आपल्या लक्षात येईल, तसतसा ‘देवा, तुझे आभार!’ हाच आपला योग्य प्रतिसाद असेल. जे काही चांगले आहे ते सर्व त्याच्याकडून मिळालेली देणगी आहे, हे उमगल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभारी राहू.

आज नम्रता आणि कृतज्ञता यांविषयीच्या या सत्यांवर चिंतन करा आणि ती अंतःकरणात खोलवर रुजू द्या. या चिंतनातून हे सद्गुण तुमच्या जीवनात अधिक बहरून फळाला येऊ द्या.

हे माझ्या देवा, तूच माझे सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय मी काहीही करू शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. हा विश्वास माझ्या मनात अधिक दृढ कर आणि तो दृढ होत असताना नम्रता व कृतज्ञता यांत वाढण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


दुःखसहनातून गौरव

इस्टरचा पाचवा रविवार (वर्ष क)

यहूदा त्यांच्यातून निघून गेल्यावर येशू म्हणाला, “आता मानवपुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्यामध्ये देवाचा गौरव झाला आहे.” योहान 13:31

या घटनेचा शेवट काय होणार होता, हे जाणून घेणे आवश्यक आहे. शेवटच्या भोजनाच्या वेळी, यहूदा येशूचा विश्वासघात करण्यासाठी बाहेर पडताच, येशूने प्रेषितांना हे शब्द सांगितले. तेव्हा पुढे काय घडणार आहे, हे त्याला माहीत होते. या प्रसंगाकडे येशूच्या दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. केवळ मानवी दृष्टीने पाहता, येशूच्या सर्वांत जवळच्या मित्रांपैकी एक जण पैशासाठी त्याचा विश्वासघात करणार होता. आपल्यापैकी बहुतेक जण अशा प्रसंगाने कोलमडून गेलो असतो; आपल्याला राग आला असता आणि मनही दुखावले असते. पण या घटनेचा शेवट येशूला माहीत असल्यामुळे, यहूदाचा विश्वासघात हा आपल्या पराभवाचे नव्हे, तर आपल्या गौरवाचे साधन आहे, हे त्याला दिसले. लवकरच सहन कराव्या लागणाऱ्या वेदनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, त्याने आपली दृष्टी स्वर्गाकडे आणि आपल्या दुःखसहनातून जे काही साध्य होणार होते त्याकडे वळवली.

हा आपल्या सर्वांसाठी एक प्रभावी धडा आहे. सर्वप्रथम, येशूचा विश्वासघात झाला, त्याने दुःख सोसले आणि तो मरण पावला; या साऱ्यांतून त्याचा गौरव कसा झाला, हे पाहणे आवश्यक आहे. पण आपली स्वतःची दुःखे जगाच्या तारणाऱ्याच्या दुःखाशी जोडली, तर त्यांतून काय घडू शकते, हेही पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

कोणी तुमच्याविरुद्ध पाप केले, तर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? यहूदाने तुमच्या प्रेमाचा विश्वासघात केला असता, तर तुम्ही कसे वागला असता? या प्रश्नाला प्रामाणिकपणे सामोरे जाणे फार कठीण आहे; आणि येशू जसा वागला तसे प्रत्यक्षात वागणे त्याहून कठीण आहे. पण सत्य असे आहे की, जेव्हा जेव्हा कोणी आपल्याशी वाईट वागते, तेव्हा तेव्हा आपल्याला क्षमा करून, आपले दुःख ख्रिस्ताच्या दुःखाशी जोडून आणि दया दाखवून देवाचा गौरव करण्याची व स्वर्गाच्या राज्याच्या वाढीस हातभार लावण्याची संधी मिळते. हे बोलणे प्रत्यक्षात तसे वागण्यापेक्षा कितीतरी सोपे आहे.

आज शुभवर्तमानातील या प्रसंगावर चिंतन करा. यहूदा शेवटच्या भोजनातून उठून आपल्या प्रभूचा विश्वासघात करण्यासाठी रात्री बाहेर पडतो, हे दृश्य डोळ्यांसमोर आणा. पण येशूने जसे पाहिले तसे या प्रसंगाकडे पाहा. जगाचे तारण घडवून आणण्यासाठी पित्याने निवडलेले हे साधन होते, हे लक्षात घ्या. येशू जसा वागला तसे वागण्याची जी प्रत्येक संधी तुम्हाला मिळते, तिचाही विचार करा. तुम्ही सहन करत असलेल्या प्रत्येक दुःखाचा नेमका विचार करा आणि त्यात देवाची दया इतरांपर्यंत पोहोचवण्याची गौरवशाली संधी पाहा. सुरुवातीला हे कठीण वाटले, तरी प्रेमाच्या याच कृतीतून स्वर्गातील पित्याचा मोठा गौरव होईल!

हे माझ्या प्रिय प्रभू, तुझ्या सर्वांत जवळच्या मित्रांपैकी एकाने चुंबन देऊन तुझा विश्वासघात केला. पण तुझ्या परिपूर्ण ज्ञानाने तू या विश्वासघातात आपल्या दयेने आणि क्षमेने पित्याचा गौरव करण्याची सर्वोत्तम संधी पाहिलीस. हे प्रभू, मीही असंख्य वेळा तुझा विश्वासघात केला आहे. त्याबद्दल मला खेद आहे. तरीही तू माझ्यावर प्रेम करतोस आणि तुझ्या परिपूर्ण दयेने भरलेल्या हृदयातून मला क्षमा करतोस, याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझी दया स्वीकारायला आणि ज्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे त्यांनाही ती दाखवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आपल्यामध्ये पवित्र त्रैक्याचा निवास

पास्काच्या पाचव्या आठवड्यातील सोमवार

“जो माझ्यावर प्रेम करतो, तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील, आणि आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर वस्ती करू.” योहान 14:23

मुलांना हे उमजते असे दिसते. देव आपल्या हृदयात राहतो, हे जणू त्यांना कळते. अर्थात, ‘हे तुम्हाला कसे माहीत?’ असे तुम्ही विचारले, तर ती कदाचित गोंधळून तुमच्याकडे पाहतील आणि काय उत्तर द्यावे हे त्यांना सुचणार नाही. तरीही, देव आपल्या अंतर्यामी राहतो, हे त्यांना कुठेतरी उमगलेले असते.

मग कोणी तुम्हाला विचारले, “देव येऊन तुमच्यामध्ये वस्ती करतो, हे तुम्हाला कसे माहीत?” तर तुम्ही काय सांगाल? आपल्या श्रद्धेचे हे विलक्षण रहस्य सांगायला कदाचित तुम्हालाही शब्द सापडणार नाहीत. देवाला तुमच्या हृदयात आणि आत्म्यात वस्ती करायची आहे, हे तुम्हाला खरे वाटते का? तसे असेल, तर हे कसे घडते?

श्रद्धेच्या देणगीमुळे आपल्याला लहान मुलांसारखे सहज कळते की देवाला आपल्यामध्ये वास करायचा आहे. आपले आत्मे त्याचे व्हावेत, आपल्याशी बोलावे, आपल्याला बळ द्यावे, आपल्याला पुढे न्यावे आणि वाट दाखवावी, अशी त्याची इच्छा आहे, हे आपल्याला ठाऊक असते. श्रद्धेच्या देणगीमुळे आपल्याला कळते की देव खरोखर आहे आणि आपल्याशी अत्यंत खोल व जिव्हाळ्याचे नाते असावे, अशी त्याची इच्छा आहे. हे आपल्याला अगदी सहज कळते.

आनंदाची बातमी ही आहे की श्रद्धेतून समज येते. देव आपल्या अंतःकरणात आपल्याशी बोलतो, आपल्याला पुढे नेतो आणि मार्ग दाखवतो. त्याच्या वाणीकडे आपण जितके अधिक लक्ष देतो, तितकी त्याच्या आपल्या अंतर्यामी असलेल्या उपस्थितीची जाणीव आपल्याला होऊ लागते. संत ऑगस्टीन यांनी म्हटल्याप्रमाणे, “जे तुम्हाला दिसत नाही, त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता, ते तुम्हाला दिसणे हे श्रद्धेचे फळ आहे.” देव आपल्या अंतर्यामी वास करतो, या श्रद्धेतून आपल्याला वरच्या प्रश्नाचे उत्तर सापडते. हे उत्तर केवळ देवच आपल्याला देऊ शकतो. आपण आपली श्रद्धा इतरांबरोबर वाटून घेऊ शकतो, आपल्या जीवनातील त्याच्या उपस्थितीची साक्ष देऊ शकतो आणि श्रद्धेद्वारे आपल्या सभोवतालच्या लोकांना त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. देव माझ्या अंतर्यामी वास करतो, हे मला कसे कळते? उत्तर असे: कारण माझ्या अंतर्यामी मला तो दिसतो, तिथे मी त्याच्याशी बोलतो आणि तो माझ्याशी बोलतो.

आज तुमच्या अंतर्यामी वास करणाऱ्या प्रभूवर चिंतन करा. त्याला तुमच्याशी बोलू द्या. हा संवाद अधिकाधिक सखोल होत जाईल, तशी तुमच्या अंतर्यामी असलेली त्याची उपस्थिती अधिक दृढ होऊ द्या आणि ती इतरांनाही जाणवू द्या. देवाला केवळ तुमच्यात वास करायचा नाही, तर तुमच्याद्वारे त्याचा प्रकाशही पसरवायचा आहे.

हे परमपवित्र त्रैक्य, ये, माझ्या हृदयात वास कर. माझे हृदय तुझे निवासस्थान बनव. तिथे तुला पाहायला, तुला भेटायला, तुझ्याशी संवाद साधायला आणि माझ्या आत्म्यात तुझ्यावर प्रेम करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


अस्वस्थ हृदय

पुनरुत्थानकाळातील पाचव्या आठवड्याचा मंगळवार

“तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा घाबरू देऊ नका.” योहान 14:27

आपणा सर्वांना वारंवार ऐकण्याची गरज आहे अशी ही किती सुंदर आठवण आहे! “तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका.” आणि “तुमचे हृदय घाबरू देऊ नका.” हा सल्ला तुम्ही किती वेळा पाळता?

विशेष म्हणजे, हा केवळ सल्ला नाही. ही आपल्या प्रभूने प्रेमाने दिलेली आज्ञा आहे. भयभीत आणि अस्वस्थ मनोवृत्ती त्याच्याकडून येत नाही, हे त्याला आपल्याला स्पष्टपणे सांगायचे आहे. भीती आणि अस्वस्थता हे मोठे ओझे आहे; त्याखाली आपण दबून जातो. या ओझ्यांपासून आपण मुक्त व्हावे, अशी येशूची तीव्र इच्छा आहे. आपल्याला जीवनाचा आनंद अनुभवता यावा म्हणून आपण मुक्त असावे, असे त्याला वाटते.

मग तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीचे ओझे तुम्हाला सर्वांत जास्त जाणवते? अशी एखादी गोष्ट आहे का जिचा विचार तुम्ही सतत करता, जिचा तुम्हाला राग येतो, जी तुम्हाला मनातून सोडवत नाही किंवा जी तुमच्या जीवनावर वरचढ ठरते? किंवा कदाचित तुमचे ओझे सहज लक्षात येत नसेल. कदाचित तुम्हाला अगदी भारावून टाकणारी कोणतीही गोष्ट नसेल; पण एखादी गोष्ट मनाच्या कोपऱ्यात सतत राहून थोडाथोडा भार टाकत असेल. अशी ओझी वर्षानुवर्षे टिकून राहिली, तर ती वाहणे फार कठीण होऊ शकते.

मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे आपले ओझे नेमके काय आहे हे ओळखणे. ते ओळखा आणि त्यामागचे मूळ कारण शोधा. तुमच्या स्वतःच्या पापामुळे हे ओझे आले असेल, तर त्या पापाचा पश्चात्ताप करा आणि पापस्वीकाराच्या संस्काराकडे वळा. मुक्तीचा तात्काळ अनुभव घेण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

पण जर तुमचे ओझे दुसऱ्या कुणाच्या कृतीमुळे किंवा तुमच्या हातात नसलेल्या एखाद्या परिस्थितीमुळे आले असेल, तर ती परिस्थिती पूर्णपणे आपल्या प्रभूच्या हाती सोपवून त्याला स्वतःचे समर्पण करण्याची ही तुमच्यासाठी एक विशेष संधी आहे. पूर्ण समर्पणात, प्रभूवर भरवसा ठेवण्यात आणि स्वतःला त्याच्या इच्छेवर पूर्णपणे सोपवण्यात मुक्ती मिळते.

आज थोडा वेळ काढून जीवनात कोणत्या गोष्टीचे ओझे तुम्हाला सर्वांत जास्त जाणवते, यावर चिंतन करा. कोणती गोष्ट तुमच्या मनावर इतकी जड झाली आहे? इतर सर्व गोष्टींपेक्षा नेमक्या याच बाबतीत येशूला तुमच्या जीवनात यायचे आहे आणि ते ओझे तुमच्यावरून उतरवायचे आहे. तुम्ही मुक्त व्हावे, अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तो तुम्हाला जीवनात देऊ इच्छित असलेला आनंद तुम्ही अनुभवू शकाल.

हे खऱ्या आनंदाच्या प्रभू, मला मुक्त व्हायचे आहे. तू माझ्यासाठी राखून ठेवलेला आनंद मला अनुभवायचा आहे. जीवनाच्या ओझ्याखाली मी दबून जातो तेव्हा, माझ्या गरजेच्या वेळी तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आपली छाटणी होऊ देणे

पुनरुत्थानकाळातील पाचव्या आठवड्याचा बुधवार

“मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता द्राक्षमळ्याचा माळी आहे. माझ्यातील जी फांदी फळ देत नाही, ती तो काढून टाकतो; आणि जी फांदी फळ देते, तिची तो छाटणी करतो, जेणेकरून तिला आणखी फळ यावे.” योहान 15:1–2

तुम्ही स्वतःची छाटणी होऊ द्यायला तयार आहात का? एखाद्या झाडाला भरपूर चांगली फळे किंवा सुंदर फुले यावीत, यासाठी त्याची छाटणी करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, द्राक्षवेलाची छाटणी न करता तो तसाच वाढू दिला, तर त्याला खूप लहान, निरुपयोगी द्राक्षे लागतील. पण वेलाची काळजीपूर्वक छाटणी केली, तर त्याला जास्तीत जास्त चांगली द्राक्षे लागतील.

येशू छाटणीच्या या दृष्टान्तातून आपल्याला त्याच्या राज्यासाठी चांगले फळ देण्याविषयी असाच धडा शिकवतो. आपले जीवन फलदायी व्हावे आणि जगात त्याची कृपा पोहोचवण्यासाठी आपण प्रभावी साधने व्हावे, अशी त्याची इच्छा आहे. पण वेळोवेळी आध्यात्मिक छाटणीतून शुद्ध होण्याची आपली तयारी नसेल, तर देवाला उपयोगी पडणारी साधने आपण होऊ शकणार नाही.

आध्यात्मिक छाटणी म्हणजे देवाला आपल्या जीवनातील दुर्गुण दूर करू देणे, जेणेकरून सद्गुणांना योग्य पोषण मिळेल. विशेषतः, देव आपल्याला नम्र करतो आणि आपला अहंकार दूर करतो, तेव्हा ही छाटणी घडते. हे वेदनादायक असू शकते; पण देव आपल्याला नम्र करतो तेव्हा होणाऱ्या वेदनांना आपल्या आध्यात्मिक वाढीत महत्त्वाचे स्थान आहे. आपण जसजसे नम्र होत जातो, तसतसे स्वतःवर, स्वतःच्या कल्पनांवर आणि योजनांवर अवलंबून राहण्याऐवजी जिथून आपल्याला पोषण मिळते त्या उगमावर अधिकाधिक अवलंबून राहू लागतो. देव आपल्यापेक्षा अमर्याद ज्ञानी आहे. आपल्याला पोषण देणारा तोच आहे हे ओळखून आपण सतत त्याच्याकडे वळलो, तर आपण अधिक खंबीर होऊ आणि त्याला आपल्याद्वारे मोठी कार्ये करू देण्यास अधिक तयार होऊ. पण यासाठी आपण त्याला आपली छाटणी करू दिली पाहिजे.

आध्यात्मिक छाटणी होऊ देणे म्हणजे स्वतःच्या इच्छेचा आणि कल्पनांचा आग्रह जाणीवपूर्वक सोडून देणे. म्हणजे आपल्या जीवनाची सूत्रे स्वतःच्या हातात न ठेवता ती वेलीची निगा राखणाऱ्या माळ्याच्या हाती सोपवणे. म्हणजे स्वतःपेक्षा त्याच्यावर कितीतरी अधिक विश्वास ठेवणे. यासाठी खऱ्या अर्थाने स्वतःला मरणे आणि खऱ्या नम्रतेने हे मान्य करणे आवश्यक आहे की, जशी फांदी वेलीवर अवलंबून असते तसे आपण पूर्णपणे देवावर अवलंबून आहोत. वेलीशिवाय आपण कोमेजून मरतो. वेलीशी घट्ट जोडलेले राहणे हाच जीवनाचा एकमेव मार्ग आहे.

तुमच्या जीवनात जे काही प्रभूपासून आलेले नाही, ते सारे त्याला छाटून टाकू द्याल, अशी आज प्रार्थना करा. त्याच्यावर आणि त्याच्या दैवी योजनेवर विश्वास ठेवा. देवाला तुमच्याद्वारे जे चांगले फळ आणायचे आहे, ते देण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, हे लक्षात ठेवा.

हे प्रभू, माझा सगळा अभिमान आणि स्वार्थ छाटून टाक, अशी मी प्रार्थना करतो. माझ्या अनेक पापांपासून मला शुद्ध कर, म्हणजे प्रत्येक बाबतीत मला तुझ्याकडे वळता येईल. तुझ्यावर विसंबायला शिकत असताना माझ्या जीवनात तुझ्यामुळे भरपूर चांगले फळ येऊ लागो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


अमर्याद आणि निरपेक्ष प्रेम

पुनरुत्थानकाळातील पाचव्या आठवड्याचा गुरुवार

“पिता जसे माझ्यावर प्रेम करतो, तसेच मीही तुमच्यावर प्रेम करतो.” योहान 15:9

या उताऱ्यातून तीन सुंदर गोष्टी आपल्याला उमजायला हव्यात.

पहिली गोष्ट अशी की, पित्याचे पुत्रावरचे प्रेम सर्वार्थाने परिपूर्ण आहे. ते बिनशर्त आहे आणि पुत्राचे संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकते. ते पूर्ण आणि निःस्वार्थ आहे. पित्याचे प्रेम स्वीकारताना येशूला आवश्यक असलेले सर्व काही मिळते.

दुसरी गोष्ट अशी की, पित्याकडून येशूला मिळणारे प्रेम त्याच्यापुरते मर्यादित राहू शकत नाही. ते तो केवळ स्वतःपुरते ठेवू शकत नाही. पित्याचे प्रेम असे आहे की ते येशूच्या हृदयातून ओसंडून वाहते. हेच ओसंडून वाहणारे प्रेम येशूकडून आपल्यापर्यंत येते.

तिसरी आणि मनन करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही की, आता आपल्याला मिळालेले हे ओसंडणारे प्रेम आपल्यालाही स्वतःपुरते ठेवता येत नाही. ते आपल्या हृदयातून ओसंडून इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून, पित्याचे आणि पुत्राचे प्रेम आपण खऱ्या अर्थाने स्वीकारायचे असेल, तर ते प्रेम आपल्याकडूनही इतरांकडे ‘अमर्यादपणे’ आणि ‘कोणतीही अट न घालता’ वाहू दिले पाहिजे.

याचा विचार करा. “अमर्याद.” “बिनशर्त.” हे खरोखर शक्य आहे का? आपण इतरांवर इतक्या निःशेषपणे, इतक्या पूर्णपणे प्रेम करू शकतो का? हो, पण तेव्हाच, जेव्हा त्या प्रेमाचा उगम पित्याच्या हृदयात होतो, ते पुत्राला दिले जाते आणि मग आपल्यावर ओतले जाते, जेणेकरून आपण ते मुक्तहस्ते इतरांना देऊ शकू.

इतरांना जे प्रेम देण्यासाठी तुम्हाला बोलावले आहे, त्याचा उगम स्वर्गातील पित्याच्या हृदयात आहे, या सत्यावर आज मनन करा. पित्याच्या हृदयाने प्रेम करायला शिकण्याची पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे देवाला तुमच्यावर प्रेम करू देणे. हे करणे फार कठीण जाऊ शकते. देवाला तुमच्यावर प्रेम करू देणे, ते प्रेम स्वीकारणे आणि त्याला तुमच्या अंतःकरणाच्या खोलवर स्पर्श करू देणे कठीण जाऊ शकते. पण तुम्ही देवाला त्याच्या परिपूर्ण प्रेमाने तुमच्यावर सतत प्रेम करू दिलेत, तर हे प्रेम तुमच्यातून आपोआप वाहू लागले आहे, असे तुम्हाला दिसेल—जणू कृपेची आणि दयेची नदीच भरून वाहत आहे.

हे प्रेमळ पित्या आणि पुत्रा, माझे तुमच्यावर खरोखर प्रेम आहे आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करता, हे मला माहीत आहे. तुमचे प्रेम स्वीकारण्यासाठी माझे हृदय खुले ठेवण्यास मला मदत करा. ते प्रेम माझ्या अंतःकरणात खोलवर मुरू द्या, म्हणजे ते माझ्याही हृदयातून ओसंडून इतरांपर्यंत पोहोचेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


तुमची निवड झाली आहे

पुनरुत्थानकाळातील पाचव्या आठवड्याचा शुक्रवार

“तुम्ही मला निवडले नाही, तर मीच तुम्हाला निवडले आणि तुम्ही जाऊन टिकणारे फळ द्यावे म्हणून तुम्हाला नेमले.” योहान 15:16

मुलांना खेळ खेळायला आवडते. दोन संघांमध्ये एखादा खेळ ठरला की, मुलं अनेकदा रांगेत उभी राहून आपली निवड होण्याची वाट पाहतात. आपली निवड सर्वांत आधी व्हावी, अशी प्रत्येक मुलाची आशा असते. संघात आपल्याला घ्यायला इतर जण उत्सुक आहेत, हे जाणवलं की आपल्याला आपली किंमत कळते. एखाद्या मुलाची निवड शेवटी झाली तर ते पचवणं त्याला कठीण जाऊ शकतं आणि त्याचं मन दुखावू शकतं.

यातून आपल्या प्रत्येकाच्या मनातली एक इच्छा दिसून येते: आपण कुणाचे तरी असावे आणि कुणाला तरी आपण हवे असावे. आनंदाची बातमी अशी की देव खरोखरच आपल्यापैकी प्रत्येकाची निवड करतो. आपण त्याच्या कुटुंबात असावे आणि त्याचे होऊन राहावे, अशी त्याची इच्छा आहे. हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा ते आपल्याला उमगते, तेव्हा आपल्याला आपली किंमत नव्याने जाणवते.

आपला जन्म होण्याआधीच देवाने आपली निवड केली, या सत्यावर नियमितपणे चिंतन करणे ही एक चांगली आध्यात्मिक साधना आहे. तो अनादी काळापासून आपल्याला ओळखत होता. त्याची नजर आपल्यावर होती आणि आपल्याला आपल्या कळपात आणण्याची त्याला उत्कंठा होती. हे आपण समजून घेतले पाहिजे, स्वीकारले पाहिजे आणि त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण खरोखरच त्याचे आहोत.

आपण त्याचे होऊन राहावे एवढ्यासाठीच नव्हे, तर त्याच्या कार्यासाठीही देव आपली निवड करतो. आपण जावे आणि त्याच्या राज्यासाठी फळ द्यावे, अशी त्याची इच्छा आहे. एका पवित्र उद्देशासाठी, त्याच्या दैवी पाचारणाला प्रतिसाद देण्यासाठी, तो आपल्याला कामी लावू इच्छितो. त्याच्या “संघाचे” सदस्य असणे म्हणजे आपल्या जीवनाला उद्देश आणि अर्थ असणे. आपल्या हातून काही बदल घडवून आणण्याची “पात्रता” आपल्यात नाही, असे कधी कधी आपल्याला कितीही वाटले, तरी देव आपल्याकडे त्या नजरेने पाहत नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. उलट, तो आपल्यापैकी प्रत्येकामधली अमर्याद क्षमता पाहतो आणि आपल्या राज्याच्या उभारणीसाठी त्या क्षमतेचा उपयोग करतो.

आज या दोन छोट्या वाक्यांवर चिंतन करा: “मी तुमची निवड केली आहे” आणि “जा आणि फळ द्या.” देवाचे पाचारण स्वीकारल्याने तुमचे जीवन बदलेल आणि ज्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे, त्यांचेही जीवन बदलेल.

हे मला आपलेसे करणाऱ्या प्रभू, तू मला निवडले आहेस, हे मला माहीत आहे. माझ्या जीवनात तू दिलेले पाचारण मी स्वीकारतो. तुझे कार्य एका अनोख्या आणि गौरवशाली रीतीने पूर्ण करण्यासाठी तू मला नेमले आहेस, हे मी मान्य करतो. तुझ्या पाचारणाला सतत “हो” म्हणण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


छळ

पास्काच्या पाचव्या आठवड्यातील शनिवार

“मी तुम्हाला सांगितलेले वचन लक्षात ठेवा: ‘कोणताही दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही.’ त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.” योहान 15:20

तुम्हाला येशूसारखे व्हायचे आहे का? तसे असेल, तर त्याचा नेमका अर्थ काय आहे, हे लक्षात घ्या. आपण ख्रिस्ताच्या जितके जवळ जाऊ, तितके जग आपल्यावर अधिक प्रेम करेल आणि आपल्याला अधिक समजून घेईल, असे सहज वाटू शकते. आपले पावित्र्य सर्वांना दिसेल, ते त्याची प्रशंसा करतील आणि आयुष्यात सगळे काही चांगले व सोपे होईल, असेही आपल्याला वाटू शकते.

पण तसे नाही, हे समजण्यासाठी ख्रिस्ताच्या जीवनाकडे एकदा पाहणे पुरेसे आहे. तो सर्व बाबतींत परिपूर्ण होता, हे उघड आहे. आणि तरी त्याच्याशी अत्यंत द्वेषाने वागण्यात आले आणि त्याचा छळ करण्यात आला. त्यांनी खरोखरच त्याला ठार मारले, हे भीषण सत्य समजून घेणे कठीण आहे. रात्रीच्या अंधारात त्याला अटक करण्यात आली, न्यायाचा केवळ देखावा करून त्याला दोषी ठरवण्यात आले आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ती शिक्षा लगेचच अमलात आणण्यात आली.

त्यांनी देवाच्या पुत्राशी असे का केले? सर्व बाबतींत इतक्या परिपूर्ण आणि दयाळू असलेल्या व्यक्तीला कोणी इतकी क्रूर वागणूक का द्यावी?

त्याच्या पहिल्या अनुयायांपैकी आपण असतो आणि त्या वेळी तिथे असतो, तर बहुधा आपल्याला धक्का बसला असता, आपण घाबरलो असतो, आपली श्रद्धा हादरली असती आणि आपण गोंधळून गेलो असतो. येशूकडून काहीतरी चूक झाली असे आपल्याला वाटले असते आणि त्याच्यावरची आपली आशाही मावळली असती. पण त्याची योजना सर्व बाबतींत परिपूर्ण होती. खोटे आरोप आणि द्वेषातून होणारा छळ त्याने सहन करणे, हा त्या योजनेचा मध्यवर्ती भाग होता. ही क्रूर वागणूक स्वेच्छेने स्वीकारून त्याने जगाचे तारण केले.

तर पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळूया: “तुम्हाला येशूसारखे व्हायचे आहे का?” त्याच्याबाबतीत जे घडले ते लक्षात घेतले, तर हा प्रश्न कठीण आहे. “कोणताही दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नसतो.” “जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील.” ही वचने स्वीकारणे आणि त्यांना मनापासून होकार देणे कठीण आहे.

छळापासून आपण पळ काढू नये. छळ झाला तर आपण निराश होऊ नये, आणि मानही खाली घालू नये. का? कारण छळ हे आपण आपल्या प्रभूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहोत याचे स्पष्ट चिन्ह आहे. छळामुळे आपण ख्रिस्ताशी किती खोलवर एकरूप होतो, याची आपल्याला कल्पनाही येणार नाही.

महत्त्वाची गोष्ट ही आहे: आपल्याला मिळालेल्या सर्व वाईट वागणुकीतून चांगले घडवण्याची देवाची इच्छा आहे, पण आपण त्याला तसे करू दिले पाहिजे. जेव्हा आपण हे सगळे त्याच्या हाती सोपवतो आणि मनात कुरकुर न करता स्वेच्छेने स्वीकारतो, तेव्हा त्यातून चांगले घडवू देतो. आपल्या दैवी प्रभूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्यास आपण पात्र ठरलो, म्हणून “आनंद करा आणि हर्षित व्हा” या वचनाप्रमाणे आपला प्रतिसाद असला पाहिजे.

आपल्या श्रद्धेमुळे आणि शुभवर्तमानाचा स्वीकार केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा छळ किंवा अन्याय सहन करावा लागत असेल, तर आज त्यावर चिंतन करा. तुम्ही प्रभूला तसे करू दिले, तर त्यातून चांगले घडवण्याची त्याची इच्छा आहे.

हे छळ सोसलेल्या माझ्या प्रभू, माझ्यावर जे काही ओझे आहे ते सर्व मी तुला समर्पित करतो. तुझ्या अनुयायी असल्यामुळे जे काही दुःख मला सोसावे लागते, ते मी तुला अर्पण करतो. तू जसे दुःख सोसलेस तसे ते सोसण्यातच नव्हे, तर तू जसे ते स्वेच्छेने स्वीकारलेस तसे ते स्वीकारण्यातही मला तुझे अनुकरण करता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थान काळातील सहावा आठवडा

अनुक्रमणिका


मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध