जीवन खरोखर ‘सामान्य’ आहे का?
सामान्य काळातील पहिल्या आठवड्याचा सोमवार
गालील सरोवराच्या काठाने जात असताना येशूने सिमोन व त्याचा भाऊ आंद्रेया यांना सरोवरात जाळी टाकताना पाहिले. ते मच्छीमार होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे चला; मी तुम्हाला माणसे पकडणारे मच्छीमार करीन.” तेव्हा त्यांनी आपली जाळी सोडली आणि ते त्याच्यामागे गेले. मार्क 1:16-18
नाताळचा काळ आता संपला आहे आणि आपण सामान्य काळाच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश करत आहोत. आता जीवनाच्या ‘सामान्य’ दिनक्रमाकडे परतण्याची वेळ आली आहे. पण ख्रिस्ती जीवन सामान्य आहे का? येशूच्या मार्गाने चालण्यात खरोखर काही ‘सामान्य’ आहे का?
आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला त्याच्यामागे चालण्याचे असामान्य, जीवनाला आमूलाग्र वळण देणारे आवाहन करतो. या उताऱ्यात सिमोन आणि आंद्रेया त्या हाकेला प्रतिसाद देतात. पण त्यांचा प्रतिसाद हे आपल्या सर्वांसाठीही एक आमंत्रण आहे: नेहमीच्या जीवनाच्या चौकटीतून बाहेर पडून असामान्य जीवनात पाऊल ठेवण्याचे आमंत्रण.
या उताऱ्यात विशेषतः दोन गोष्टी दिसून येतात: १) या प्रेषितांनी लगेच दिलेला प्रतिसाद आणि २) त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. आपल्या मागे येण्याच्या येशूच्या आमंत्रणाला प्रतिसाद देताना त्यांनी ना हातचे राखून ठेवले, ना कचरले.
आणि तुमचे काय? येशूची हाक तुम्हाला ऐकू येते का? आपल्या मागे येण्यासाठी तो तुम्हाला बोलावत आहे, हे तुम्हाला ऐकू येते का? आपला प्रभू आपल्यापैकी प्रत्येकाशी बोलतो, तेव्हा आपण त्याला ताबडतोब आणि पूर्ण मनाने प्रतिसाद देऊ, अशी आशा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला मिळालेल्या या गौरवशाली पाचारणाचा स्वीकार करण्यास आपण कचरू नये.
आज या गोष्टीवर मनन करा: तुम्हालाही कृपेचे असामान्य जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. या जीवनासाठी पूर्ण आत्मसमर्पण आणि निष्ठा आवश्यक आहेत. येशूच्या आमंत्रणाला तत्काळ आणि स्वेच्छेने प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात आले आहे. उपासनेतील सामान्य काळाच्या या प्रारंभी, कृपेच्या या असामान्य जीवनात उत्साहाने पाऊल टाका आणि त्याचा संपूर्ण अंतःकरणाने स्वीकार करा.
हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. कृपेचे हे विलक्षण जीवन जगण्यासाठी तू मला पाचारण केलेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझे मन आणि माझी इच्छा पूर्णपणे तुला समर्पित करून तुझ्या आमंत्रणाला प्रतिसाद देण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूचा अधिकार स्पष्टपणे दिसतो
सामान्य काळाच्या पहिल्या आठवड्यातील मंगळवार
येशू आपल्या अनुयायांसह कफर्णहूम येथे आला. शब्बाथ दिवशी त्याने सभास्थानात जाऊन शिकवले. त्याची शिकवण ऐकून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्र्यांसारखा नव्हे, तर अधिकार असलेल्या व्यक्तीप्रमाणे शिकवत होता. मार्क 1:21-22
सामान्य काळाच्या या पहिल्या आठवड्यात प्रवेश करताना, सभास्थानात शिकवणारा येशू आपल्यासमोर येतो. त्याचे शिकवणे ऐकताना त्याच्यात काहीतरी विशेष आहे, हे स्पष्ट होते. तो एका नव्या अधिकाराने शिकवतो.
मार्कच्या शुभवर्तमानातील हे विधान येशू आणि शास्त्री यांच्यातला फरक दाखवते. शास्त्री शिकवत असत, पण त्यांच्या शिकवण्यात येशूच्या शिकवणीत जाणवणारा तो स्पष्ट अधिकार दिसत नाही. या विधानाकडे आपण दुर्लक्ष करू नये.
येशूने अधिकाराने शिकवले, ते केवळ तसे करण्याची त्याची इच्छा होती म्हणून नव्हे, तर तसे करणे त्याला आवश्यक होते म्हणून. कारण तो मुळात असाच आहे. तो देव आहे, आणि जेव्हा तो बोलतो, तेव्हा देवाच्या अधिकाराने बोलतो. त्याचे शब्द जीवनाला नवे वळण देऊ शकतात, हे त्याच्या बोलण्यातून लोकांना उमगते. त्याचे शब्द लोकांच्या जीवनात खरोखर बदल घडवतात.
यावरून आपल्या जीवनातील येशूच्या अधिकाराविषयी आपल्यापैकी प्रत्येकाने चिंतन करावे. तो तुमच्याशी अधिकाराने बोलतो, हे तुम्हाला जाणवते का? पवित्र शास्त्रातून तो जे बोलतो, त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असल्याचे तुम्हाला दिसते का?
सभास्थानात शिकवणाऱ्या येशूच्या या दृश्यावर आज मनन करा. हे ‘सभास्थान’ म्हणजे तुमचाच आत्मा आहे आणि तिथे तुमच्याशी अधिकाराने बोलण्याची येशूची इच्छा आहे, हे लक्षात घ्या. त्याचे शब्द तुमच्या अंतःकरणात रुजू द्या आणि त्यांना तुमचे जीवन बदलू द्या.
हे माझ्या प्रभू, तू अधिकाराने बोलतोस. तुझे ऐकण्यासाठी आणि तुझा स्वीकार करण्यासाठी मी माझे अंतःकरण उघडतो. तू जे सत्य मला स्पष्टपणे सांगतोस, ते ऐकण्यास मला मदत कर. तू माझ्याशी बोलताना माझे जीवन बदलण्याचे स्वातंत्र्य मी तुला द्यावे, यासाठी मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूच्या कार्याचा उद्देश
सामान्य काळाच्या पहिल्या आठवड्यातील बुधवार
पहाट होण्याच्या बऱ्याच आधी येशू उठला आणि तेथून एका निर्जन ठिकाणी गेला. तिथे त्याने प्रार्थना केली. सिमोन आणि त्याचे सोबती त्याच्या शोधात गेले. तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सगळे जण तुमचा शोध घेत आहेत.” तो त्यांना म्हणाला, “चला, आपण जवळच्या गावांत जाऊया, म्हणजे मलाही तिथे उपदेश करता येईल. याच उद्देशाने मी आलो आहे.” मार्क 1:35-38
येशू का आला? पृथ्वीवरील त्याच्या जीवनाचा उद्देश काय होता? सर्व लोकांना सुवार्तेचा संदेश देण्यासाठी तो आला, हे या उताऱ्यातून स्पष्ट होते.
पण या विधानाचा अर्थ नीट समजून घ्या. येशूच्या जीवनाचे महत्त्व केवळ त्याच्या शिकवणीतच आहे, असा याचा अर्थ नाही. आपले ज्ञान आपल्याला देण्यासाठी आलेला एक थोर ज्ञानी पुरुष एवढीच त्याची ओळख नाही. त्या विधानात तथ्य असले, तरी त्यातून येशूविषयी आणि त्याच्या कार्याविषयीचे संपूर्ण सत्य उलगडत नाही.
मग त्याच्या कार्याचे सार काय होते? तो स्वतःच ते सत्य आहे, ज्याची तो घोषणा करीत होता. येशू हाच स्वर्गातील पित्याचे संपूर्ण प्रकटीकरण आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सत्य प्रकट होते. म्हणून येशूच्या म्हणण्याचा अर्थ असा की, स्वतःला आपल्या पूर्णत्वासह सर्व लोकांना देण्यासाठी तो आला. तो गावोगावी फिरून ज्यांना उपदेश करीत होता, त्यांना तो शब्दशः स्वतःलाच देत होता. याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा आपण त्याचे जिवंत वचन ऐकतो आणि स्वीकारतो, तेव्हा तेव्हा तो आपणा सर्वांना स्वतःला देत राहतो. हे त्याच्या स्वतःच्या जीवनाचे जिवंत वचन आहे.
आज या गोष्टीवर चिंतन करा: येशूला तुमच्या मनाच्या आणि हृदयाच्या गावी “प्रवास” करून यायचे आहे. त्याला तुम्हाला शोधून तुमच्यापर्यंत यायचे आहे; तो केवळ सार्वकालिक जीवनाची वचने घेऊन येत नाही, तर स्वतःलाही तुम्हाला देऊ इच्छितो. येशूला तुमची सेवा करू द्या आणि तो तुम्हाला जे सत्य स्पष्टपणे सांगतो ते ऐका.
हे सर्व सत्याच्या प्रभू, मी तुझा शोध घेत आहे आणि तूही माझा शोध घ्यावास यासाठी माझे अंतःकरण खुले आहे. तुला माझ्यासमोर जे काही प्रकट करायचे आहे, ते स्वीकारण्यास मला तयार कर. जिवंत सुवार्ता म्हणून तुझा स्वीकार करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
लोकप्रियता नव्हे, तर मनपरिवर्तन
सामान्य काळाच्या पहिल्या आठवड्यातील गुरुवार
तो मनुष्य निघून गेला आणि घडलेली सगळी गोष्ट जाहीरपणे सांगू लागला. त्याने ही बातमी इतकी पसरवली की येशूला कोणत्याही नगरात उघडपणे प्रवेश करणे अशक्य झाले. तो नगराबाहेर निर्जन ठिकाणी राहिला, आणि चोहीकडून लोक त्याच्याकडे येत राहिले. मार्क 1:44-45
तो मनुष्य तिथून निघून गेला आणि “सगळा वृत्तांत सर्वांना सांगू लागला.” त्याने असे का केले, हे समजण्यासारखे आहे. तो कुष्ठरोगासारख्या भयंकर आजाराने पीडित होता आणि बहुधा त्याची आशा मावळत चालली होती. तो येशूकडे आला, त्याच्यासमोर नम्रपणे गुडघे टेकले आणि आपली दृढ श्रद्धा व्यक्त केली. तो म्हणाला, “तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करू शकतोस.” अर्थातच, त्याला शुद्ध करण्याची येशूची इच्छा होती आणि त्याने त्या कुष्ठरोग्याला लगेच बरे केले.
विशेष म्हणजे, त्या मनुष्याला बरे केल्यावर येशूने त्याला याविषयी कोणालाही सांगू नकोस, असे बजावले. पण उत्साहाच्या भरात तो मनुष्य तिथून निघाला आणि सर्वांना सांगू लागला. त्यामुळे येशूचा लौकिक झपाट्याने वाढला आणि सर्वत्र लोकांना त्याच्याविषयी कुतूहल वाटू लागले. लोक इतक्या उत्सुकतेने त्याचा शोध घेऊ लागले की, या उताऱ्यात वर म्हटल्याप्रमाणे, “येशूला उघडपणे एखाद्या नगरात प्रवेश करणे अशक्य झाले.”
या प्रसंगामुळे आपल्या मनात साहजिकच काही प्रश्न उभे राहतात. विचार करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, येशूला “लोकप्रिय” होण्यात काहीच रस नव्हता, असे दिसते. तो सहज एका नगरातून दुसऱ्या नगरात जाऊ शकला असता आणि प्रत्येक नव्या नगरात प्रवेश करताना, “सर्वांनी ऐका… मी इथे आलो आहे!” अशी घोषणा करू शकला असता. लोकांनी लगेच त्याच्याभोवती गर्दी केली असती. पण अचानक मिळालेल्या प्रसिद्धीचा लाभ घेण्याऐवजी तो निर्जन ठिकाणी निघून गेला. पोहोचायला कठीण असलेल्या अशा निर्जन ठिकाणीही लोक त्याच्याकडे आले.
लोकांनी आपल्याला शोधत यावे म्हणून येशू निर्जन ठिकाणी जाऊन त्यांची वाट पाहत होता. कारण त्याच्या जीवनाचा हेतू लोकांमध्ये लोकप्रिय होणे नव्हे, तर त्यांच्या आत्म्यांचे खरे मनपरिवर्तन घडवणे हा होता. जगाने आपल्याला मान द्यावा याची त्याला पर्वा नव्हती; त्याला फक्त लोकांची अंतःकरणे बदलायची होती. म्हणून तो निर्जन ठिकाणी गेला, जेणेकरून खऱ्या मनपरिवर्तनाला तयार असलेल्यांना स्वर्गातील पिता त्याच्याकडे आणू शकेल.
आपल्याबाबतीतही हेच खरे आहे. “लोकप्रिय येशू” म्हणजे नेहमीच “खरा येशू” असे नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपल्या लोकप्रिय संस्कृतीत ज्या गोष्टींचा गाजावाजा केला जातो, त्यांत सुवार्तेचा खरा संदेश सहसा आढळत नाही. येशू आणि त्याच्या सुवार्तेचा खरा संदेश यांना राष्ट्रीय बातम्यांत नेहमीच ठळक स्थान मिळेल असे नाही. उलट, आपल्याला तो सापडावा असे वाटत असेल, तर जिथे तो आपली वाट पाहत आहे, अशा नजरेआडच्या शांत ठिकाणी आपण त्याचा मनापासून शोध घेतला पाहिजे.
आज शांततेत तुमची वाट पाहणाऱ्या येशूचे चित्र मनात आणून त्यावर चिंतन करा. तो जिथे तुमची वाट पाहतो, ते शांत ‘निर्जन ठिकाण’ कुठे आहे? तुम्ही येऊन त्याला भेटावे म्हणून तो कुठे थांबला आहे? त्याचा शोध घ्या. तो तुम्हाला सापडेल तेव्हा, त्याला शोधण्यासाठी तुम्ही घेतलेल्या श्रमांबद्दल तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल.
हे माझ्या गुप्तपणे वसणाऱ्या प्रभू, मी तुझा शोध घेतो खरा, पण तो कधीच पुरेसा घेत नाही, हेही मला जाणवते. तू कितीतरी प्रकारे माझी वाट पाहत असतोस. अधिक गाढ शांततेत आणि एकांतात यायला तू मला बोलावतोस. जीवनाच्या ओसाड वाटांवर तुला माझ्या आत्म्याची काळजी घ्यायची आहे. तुझे ऐकायला आणि तुझ्याकडे वाटचाल करायला मला मदत कर. आणि जेव्हा तू मला सापडशील, तेव्हा माझ्या अंतःकरणात जो बदल घडावा अशी तुझी इच्छा आहे, तो मनापासून स्वीकारायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूची ओढ
सामान्य काळातील पहिल्या आठवड्याचा शुक्रवार
काही दिवसांनी येशू कफर्णहूमला परत आला. तो घरी आहे हे लोकांना कळले. इतके लोक जमले की दाराजवळही जागा उरली नाही. तेव्हा येशूने त्यांना वचन सांगितले. मार्क 2:1-2
येशूकडे इतके लोक येत होते की सगळ्यांना मावायला जागाच नव्हती. तो ज्या घरात होता, त्या घराच्या दाराभोवतीही जागा उरली नव्हती. ही परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तर, ही अडचण येशूच्या लक्षात का आली नसावी आणि त्याने त्याबद्दल काही का केलं नसावं? जिथे सगळ्यांना त्याला पाहता आलं असतं आणि त्याचं बोलणं ऐकता आलं असतं, अशा एखाद्या मोकळ्या जागी तो का गेला नाही?
या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, पण एका गोष्टीची आपण खात्री बाळगू शकतो. जे त्याचं बोलणं ऐकायला आले होते, त्यांना आत जाता आलं नसलं तरी त्यांच्या श्रद्धेचं मोठं फळ त्यांना मिळालं. या उताऱ्यातून एक अतिशय महत्त्वाचं आध्यात्मिक तत्त्व उलगडतं: येशूच्या सान्निध्यात राहण्याची आध्यात्मिक ओढ ही स्वतःच परिवर्तन घडवणारी होती.
अनेकदा आपल्यालाही असाच अनुभव येतो. येशूने आपल्याशी बोलावे अशी आपल्याला ओढ असते, पण त्याचा आवाज काही आपल्याला ऐकू येत नाही. कदाचित तो मौन बाळगून आहे असे आपल्याला वाटत असेल, किंवा तो कुठे सापडेल हेच आपल्याला ठाऊक नसेल. पण तुम्हाला असा अनुभव येत असेल तर खचून जाऊ नका. त्याच्या सहवासात राहण्याची तुमची इच्छा हीच एक मोठी देणगी आहे आणि ती तुमचे जीवन बदलू शकते.
ज्याला ‘देवाचे मौन’ म्हणता येईल, त्यावर आज चिंतन करा. तुमच्या आयुष्यात कधी कधी देव दूर आहे आणि तो कुठेच सापडत नाही असं वाटू शकतं. अशा वेळी लक्षात घ्या की या मौनातून देव तुम्हाला आपल्या आणखी जवळ बोलावत आहे. तो जणू हळूच कुजबुजून तुमचं संपूर्ण लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. अधूनमधून तुम्हाला असा ‘संघर्ष’ अनुभवावा लागत असेल, तर अधिक एकाग्रतेने आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे वळवा आणि त्याच्याविषयीची ओढ वाढू द्या. त्याचा आवाज तुम्हाला अगदी स्पष्टपणे ऐकू आला असता, त्यापेक्षाही अधिक फळ येशूच्या सान्निध्याची ही ओढ तुमच्या जीवनात देऊ शकते.
हे माझ्या मौन धारण करणाऱ्या प्रभू, तुझ्या जवळ राहण्याची इच्छा माझ्यात वाढव. संपूर्ण अंतःकरणाने तुझी ओढ धरायला मला मदत कर. त्या ओढीतून जे काही तुझे नाही ते सारे सोडून द्यायला आणि माझे संपूर्ण लक्ष तुझ्यावर केंद्रित करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तुम्ही कोणाच्या सहवासात राहता?
सामान्य काळातील पहिल्या आठवड्याचा शनिवार
“तो जकातदार आणि पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?” हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोगी लोकांना वैद्याची गरज नसते, पण आजाऱ्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना बोलावण्यासाठी आलो आहे.” मार्क 2:16-17
येशूने तर असं केलं; तुमचं काय? ‘पापी’ समजल्या जाणाऱ्या लोकांबरोबर इतरांनी तुम्हाला पाहिलं तरी तुम्हाला चालेल का? पवित्र शास्त्रातील या उताऱ्याच्या संदर्भात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे: प्रत्येक जण पापी आहे. त्यामुळे येशू ज्यांच्या सहवासात राहिला, त्यांपैकी प्रत्येक जण पापी होता, हेच खरं.
पण या उताऱ्यात येशूवर झालेली टीका मुख्यतः त्याने पाप केलेल्या लोकांशी संबंध ठेवले म्हणून नव्हती. समाजातील उच्चभ्रू लोक ज्यांना तुच्छ लेखत होते, अशा लोकांशी त्याने संबंध ठेवले, हा त्या टीकेचा मुख्य मुद्दा होता. समाजाला ‘नकोसे’ वाटणाऱ्या लोकांबरोबर येशू मोकळेपणाने वेळ घालवत असे. इतर लोक ज्यांचा तिरस्कार करत, त्यांच्याबरोबर आपल्याला कोणी पाहील याची त्याला भीती नव्हती. येशू आणि त्याचे शिष्य या लोकांचं स्वागत करत होते, हे शास्त्री आणि परुशी यांच्या लगेच लक्षात आलं. ते जकातदार, लैंगिक पापे करणारे, चोर आणि अशा इतर लोकांबरोबर खातपीत असत. एवढंच नव्हे, तर या लोकांना दोष न लावता ते त्यांचं स्वागत करत होते, असं दिसतं.
तर पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळूया… जे लोक इतरांना आवडत नाहीत, ज्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे, जे दुःखात आहेत किंवा गोंधळलेले आहेत, अशा लोकांशी तुम्ही संबंध ठेवाल का? त्यांच्याबरोबर इतरांनी तुम्हाला पाहिलं तरी तुम्हाला चालेल का? गरजू लोकांवर प्रेम केल्यामुळे आणि त्यांची काळजी घेतल्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, तरी तो स्वीकारण्याची तुमची तयारी आहे का? एखाद्या व्यक्तीशी मैत्री केल्याने समाजातील तुमची प्रतिष्ठा कमी होणार असेल, तरीही तुम्ही तिच्याशी मैत्री करायला तयार आहात का?
आज तुमच्या जीवनात ज्या व्यक्तीला टाळावेसे वाटते, तिच्याविषयी चिंतन करा. तुम्हाला असे का वाटते? कोणाबरोबर तुम्हाला इतरांनी पाहू नये असे वाटते, किंवा कोणाशी संबंध ठेवायला तुम्ही सहज तयार होत नाही? कदाचित, इतर कोणापेक्षाही, याच व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवावा अशी येशूची इच्छा असेल.
हे माझ्या प्रेमळ प्रभू, तू सर्वांवर गाढ आणि परिपूर्ण प्रेम करतोस. ज्यांचे जीवन विस्कटलेले होते आणि जे पापात जगत होते, त्यांच्यासाठी तू विशेषतः आलास. ज्यांना मदतीची गरज आहे अशांना नेहमी शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचायला आणि कोणालाही दोष न लावता सर्वांवर अढळ प्रेम करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध
