मराठी

सामान्य काळातील नववा आठवडा

विश्वास ठेवणे म्हणजे कृती करणे

सामान्य काळातील नववा रविवार, वर्ष अ

“जो कोणी माझी ही वचने ऐकतो आणि त्यांप्रमाणे वागतो, तो खडकावर आपले घर बांधणाऱ्या एका शहाण्या माणसासारखा आहे.” मत्तय 7:24

येशूने दिलेल्या खडकावर बांधलेल्या घराच्या प्रतिमेपासून सुरुवात करूया. ही प्रतिमा महत्त्वाची आहे आणि तिच्यावर प्रार्थनापूर्वक मनन करावे.

प्रथम, समुद्रकिनाऱ्यावर वाळूवर बांधलेल्या घराची कल्पना करा. भक्कम पायाचे महत्त्व ज्यांना समजते, त्यांच्या लगेच लक्षात येईल की वादळ आले किंवा समुद्राचे पाणी वाढले की असे घर मोठ्या धोक्यात येते. त्याचा पाया वाहून जाईल आणि घर कोसळून त्याचे अवशेष उरतील.

आजच्या शुभवर्तमानात येशू स्पष्ट करतो की भक्कम खडकावर बांधलेले घर पाऊस, पूर आणि वारे यांना तोंड देऊनही टिकून राहील. याउलट, त्याच परिस्थितीत वाळूवर बांधलेले घर पूर्णपणे कोसळेल.

या दोन घरांमधला ठळक फरक लक्षात घेतला, तर येशू सांगत असलेल्या पायाच्या दोन बाजू स्पष्ट होतात. पहिली म्हणजे, जेव्हा आपण देवाचे वचन “ऐकतो”, तेव्हा आपल्या आत्म्याचे “घर” भक्कम खडकावर बांधतो. दुसरी म्हणजे, जे ऐकतो त्याप्रमाणे जेव्हा आपण “वागतो”, तेव्हाही आपण भक्कम खडकावर बांधणी करतो.

ऐकणे: हे करणे कठीण आहे. ऐकणे म्हणजे शब्द केवळ कानावर पडणे नव्हे; त्यांचा अर्थही समजून घेणे होय. समजून घेणे म्हणजे येशू तुम्हाला जे सांगतो ते अंतःकरणात उतरू देणे. त्याच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही उमजून घेता आणि ते शब्द मनात खोलवर रुजू देता.

कृती करणे: सुवार्ता समजून घेणे आणि ती मनात रुजवणे एवढेच पुरेसे नाही. खऱ्या श्रद्धेने जगण्यासाठी, जे तुम्हाला समजले आहे त्याला पूर्णपणे शरण जाणेही आवश्यक आहे. म्हणजेच, जे तुम्ही ऐकता त्याचा तुमच्या कृतींवर ठोस परिणाम होऊ देणे. देवाचे वचन स्वीकारल्याने तुमच्यात बदल घडतो. खरे सांगायचे तर, सुवार्तेवर विश्वास ठेवणे हे तिच्याप्रमाणे जगण्यापेक्षा कितीतरी सोपे आहे.

पण जेव्हा एखादी व्यक्ती बुद्धीने आणि स्वेच्छेने शुभवर्तमानाचा पूर्ण स्वीकार करते, तेव्हा तिचे जीवन भक्कम व स्थिर होते. जीवनात येणारे कोणतेही संकट ते डळमळीत करू शकत नाही.

आज यावर मनन करा: देवाचे वचन तुमच्या मनात आणि कृतीत किती खोलवर रुजले आहे? प्रामाणिकपणे पाहिल्यास, कुठे सुधारणा करायला हवी हे तुम्हाला नक्कीच दिसेल. जिथे उणीव जाणवते, तिथे प्रभूला तुमच्या जीवनात येऊ द्या, म्हणजे तो तुमच्या जीवनाचा पाया भक्कम करू शकेल.

हे माझ्या प्रभू, माझ्या जीवनाच्या भक्कम पायासारख्या खडका, माझा विश्वास आहे. जिथे माझा विश्वास कमी पडतो, तिथे मला मदत कर. तुझ्यावरची माझी श्रद्धा केवळ मनातल्या धारणांपुरती मर्यादित न राहता माझ्या रोजच्या कृतींत उतरू दे. ये आणि माझे जीवन बदलून टाक, म्हणजे मी तुझ्या पवित्र वचनाचे जिवंत साधन होईन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


पापाची अतिरेकी शंका 

सामान्य काळातील नववा रविवार, वर्ष ब

शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतातून जात असताना त्याचे शिष्य वाट काढत कणसे तोडू लागले. तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करण्याची परवानगी नाही, ते हे का करीत आहेत?” मार्क 2:23-24

परुश्यांसाठी हे किती जड ओझे होते! नियमशास्त्राचा त्यांना इतका ध्यास लागला होता की त्यांनी त्याच्या पवित्र आणि खऱ्या अर्थाचा विपर्यास केला. ज्यांना ते दोष देत होते, त्यांच्यापेक्षा स्वतः परुश्यांवरच या ओझ्याचा अधिक भार होता.

एका दृष्टिकोनातून पाहता, शिष्य शब्बाथाचा नियम मोडत होते. गव्हाचे दाणे तोडणे हे काम आहे, असे परुशी मानत होते. शब्बाथाच्या दिवशी काम करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे शिष्य शब्बाथाचा नियम मोडून पाप करत होते, असा त्यांचा समज होता. परुश्यांचा हा अर्थ गैरसमजावर आधारलेला होता. याच उताऱ्यात पुढे येशू लगेच त्यांचा गैरसमज दूर करतो.

परुश्यांनी असा चुकीचा निकाल का लावला असावा, याचा विचार करणे उपयोगी ठरेल. त्यांनी शिष्यांना दोष का दिला आणि शब्बाथ दिवशी विश्रांती घेण्याच्या नियमाचा खरा अर्थ का विपर्यस्त केला? त्यांच्या मनात नेमकी कोणती प्रेरणा होती, हे खात्रीने सांगता येत नाही. तरीही, सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या एक-दोन प्रवृत्तींकडे पाहून, आपल्यालाही अशाच प्रवृत्तींशी झगडावे लागते का, याचा विचार करता येईल.

पहिली प्रवृत्ती म्हणजे आपल्या हातून पाप झाले असावे अशी अतिरेकी शंका घेणे. हे जड ओझे देवाचे प्रेम, दया आणि सत्य प्रामाणिकपणे समजून घेण्यातून नव्हे, तर स्वतःभोवती फिरणाऱ्या भीतीतून निर्माण होते. अशा शंकेने ग्रासलेल्या व्यक्तीला स्वतःच्या “चांगुलपणाचा” इतका ध्यास लागतो की खरा चांगुलपणा काय, याविषयी तिचा गोंधळ होतो. आपले पावित्र्य देवाच्या दयेवर आणि कृपेवर अवलंबून असण्यापेक्षा स्वतःवरच अधिक अवलंबून आहे, असे मानण्याच्या सापळ्यात ती अडकते. दुसऱ्या शब्दांत, तिला स्वतःचाच ध्यास लागतो. विशेषतः परुश्यांना असे वाटत असल्याचे दिसते की नियमशास्त्राच्या बाह्य आज्ञा जशा त्यांना समजल्या, तशा काटेकोरपणे पाळण्याकडे अतोनात लक्ष दिल्यानेच ते पवित्र ठरतात. असे करताना देवाच्या नियमाचा खरा हेतू त्यांच्या लक्षात आला नाही.

दुसरे म्हणजे, शिष्यांच्या कृतींचा न्याय करताना ते आणखी गंभीर चूक करतात असे दिसते. नियम पाळण्याच्या स्वतःच्या अतिरेकी आग्रहालाच ते शिष्यांच्या कृती तोलण्याचे माप बनवतात. बहुधा मत्सर आणि हेवा यांमुळे ते असे करतात. हे निंद्य पाप आहे आणि वर म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे शिष्यांपेक्षा त्यांचे स्वतःचेच अधिक नुकसान होते. देवाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे असे जिथे जिथे त्यांना वाटे, तिथे तिथे ते दाखवून देण्याच्या धडपडीत ते सतत असत. ती त्यांची जबाबदारी नव्हती.

देवाच्या नियमांचे आपण किती काटेकोरपणे ‘पालन’ करतो, यावरून इतरांचा न्याय करण्याची प्रवृत्ती आपल्यात आहे का, यावर आज चिंतन करा. न्याय करणे ही आपली जबाबदारी नाही; तो देवाचा अधिकार आहे. प्रेम करणे हे आपले कर्तव्य आहे: सर्वप्रथम आणि सर्वांपेक्षा अधिक देवावर प्रेम करणे आणि त्या प्रेमातून आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे. इतरांच्या ज्या कृती तुम्हाला पाप वाटतात त्यांचाच विचार तुम्ही सतत करत असाल, तर परुश्यांनी केलेल्या त्याच पापात तुम्ही पडत असाल.

हे प्रभू, इतरांना दोषी ठरवण्याच्या वृत्तीपासून आणि पापाबद्दलच्या अनाठायी धास्तीपासून मला मुक्त कर. तुझ्या प्रेमाच्या दैवी नियमाचे खरे सौंदर्य पाहायला आणि केवळ तू दाखवलेल्या मार्गानेच तो नियम जगायला मला मदत कर. सर्वांबद्दल खरी करुणा बाळगणारी व्यक्ती होण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


येशूची नम्रता

सामान्य काळातील नववा रविवार, वर्ष क

लोकांना जे काही सांगायचे होते ते सर्व सांगून झाल्यावर येशू कफर्णहूममध्ये गेला. तेथे एका शताधिपतीचा एक गुलाम आजारी होता आणि मरणाच्या बेतात होता. तो गुलाम त्याच्यासाठी फार मोलाचा होता. येशूविषयी ऐकल्यावर त्याने यहुद्यांच्या काही वडीलधाऱ्यांना येशूकडे पाठवले. येशूने येऊन आपल्या गुलामाचे प्राण वाचवावेत, अशी त्याची विनंती होती. ते येशूकडे आले आणि त्याने यावे म्हणून त्याला कळकळीने विनंती करू लागले: “आपण त्याच्यासाठी हे करावे, याला तो पात्र आहे. कारण तो आपल्या राष्ट्रावर प्रेम करतो आणि त्यानेच आमच्यासाठी सभास्थान बांधले आहे.” लूक 7:1-5

येशूने येऊन आपल्यासाठी चमत्कार करावा, यास हा शताधिपती खरोखरच ‘पात्र’ होता का? येशूच्या दयेवर त्याचा हक्क होता का? मुळीच नाही. देवाकडून काहीही मिळण्याचा हक्क कोणालाच नाही. तरीही, येशूकडे बरे करण्याची विनंती घेऊन आलेले सेवक असे बोलले की जणू तो मनुष्य विशेष हक्क असलेल्या वर्गातला होता, कारण त्याने सभास्थानाच्या बांधकामासाठी पुष्कळ पैसा आणि साधनसामग्री दिली होती.

येशू असे उत्तर देऊ शकला असता, “माझ्याकडून काहीही मिळण्यास कोणीही पात्र नाही. सर्व काही देणगी आहे, आणि हे सत्य तुम्ही नम्रपणे मान्य केल्याशिवाय मी येणार नाही.” पण शताधिपतीच्या सेवकांच्या या आग्रहाचा अपमान वाटून घ्यावा, असा येशू नव्हता; तो खरोखर नम्र होता. म्हणून तो शांतपणे आणि नम्रतेने त्या सेवकाला बरे करण्यासाठी निघाला.

या उताऱ्याचा केंद्रबिंदू चमत्कार आणि शेवटी खुद्द शताधिपतीची नम्रता हा असला, तरी एका गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करू नये: कृपेवर कोणाचाही हक्क नाही, हे सत्य विनंती करणाऱ्यांना समजले नव्हते, तरीही येशू त्या सेवकाकडे जाऊन त्याला बरे करण्यास तयार होता. यातून देवाच्या दयेचे सौंदर्य अधिक ठळकपणे दिसते: आपल्याला पुरेशी समज नसली तरीही तो आपल्यावर प्रेम करायला तयार असतो.

शताधिपती आणखी काही निरोप्यांना येशूकडे पाठवतो, तेव्हा या प्रसंगाला एक विलक्षण वळण मिळते. येशूने आपल्याकडे यावे इतकी आपली पात्रता नाही, असे सांगून तो आपली नम्रता दाखवतो. तो म्हणतो, “तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवावे, इतकी माझी पात्रता नाही.” उलट, आपला सेवक बरा व्हावा म्हणून येशूने दुरूनच केवळ शब्द उच्चारावा अशी तो विनंती करतो. येशूला त्याच्या श्रद्धेचे आश्चर्य वाटते आणि तो दुरूनच त्या सेवकाला लगेच बरे करतो.

हा उतारा समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे नम्रता: प्रथम येशूची नम्रता आणि नंतर शताधिपतीची नम्रता.

तितकीच खोल नम्रता आपल्यात आहे का, यावर आज चिंतन करा. देवाने आपल्यावर दया केलीच पाहिजे, असा आग्रह तुम्ही धरता का? त्याच्या कृपेवर आपला हक्क आहे, असे तुम्हाला वाटते का? की सर्व काही देणगी आहे आणि सर्व काही कृपा आहे, या सत्याची तुम्हाला जाणीव आहे? देवासमोर नम्र होण्याचा प्रयत्न करा. तो तुमची नम्रता निष्फळ जाऊ देणार नाही.

हे सर्व चांगुलपणाच्या प्रभू, मी खरोखरच तुझ्या आणि माझ्या जीवनात तू दाखवलेल्या दयेच्या योग्यतेचा नाही. तू मला जे काही देण्याचे ठरवतोस, ते तुझ्या चांगुलपणातून विनामोल मिळालेले दान आहे, हे मी मान्य करतो. दररोज तुझ्यापुढे नम्र व्हायला आणि तुझ्या अपार चांगुलपणावर भरवसा ठेवायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


देवाचा न्याय

सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा सोमवार

“त्याच्याकडे पाठवायला अजून एक जण होता: त्याचा लाडका मुलगा. ‘ते माझ्या मुलाचा आदर करतील,’ असा विचार करून त्याने सगळ्यांच्या शेवटी त्याला त्यांच्याकडे पाठवले. पण त्या कुळांनी एकमेकांना म्हटले, ‘हा तर वारस आहे. चला, याला ठार मारू, म्हणजे वारसा आपलाच होईल.’ मग त्यांनी त्याला पकडून ठार मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. आता द्राक्षमळ्याचा मालक काय करील? तो येईल, त्या कुळांना ठार मारील आणि द्राक्षमळा इतरांना देईल.” मार्क 12:6-9

या उताऱ्यात आपल्याला देवाच्या न्यायाचे स्पष्ट दर्शन घडते!

पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सुरुवातीला त्या दुष्ट कुळांचे डाव यशस्वी होतात. ते एकामागून एकाचा जीव घेतात. मग द्राक्षमळ्याचा मालक आपल्या एकुलत्या एका मुलाला पाठवतो, तेव्हा द्राक्षमळा आपल्याला वारशाने मिळेल, या समजुतीने ते दुष्ट कुळे त्याचाही जीव घेतात.

या कथेत पिता आपल्या पुत्राला जगात पाठवतो, हे स्पष्ट आहे. त्या काळच्या धर्मनेत्यांना येशूचा हेवा आणि मत्सर वाटत होता आणि त्यांना आपली सत्ता टिकवून ठेवायची होती. म्हणून त्यांनी आपला दुष्ट कट अमलात आणला आणि येशूला ठार मारले. मशीहा आणि इस्राएलचा नवा राजा असलेल्या येशूला संपवले, तर आपली धार्मिक सत्ता टिकून राहील, अशी त्यांना आशा होती.

पण देवाच्या न्यायाचा त्यांना विसर पडला. शेवटी देवाच्या न्यायाचाच विजय होतो. देव सर्व गोष्टींचा निवाडा करील आणि प्रत्येकाच्या अंतःकरणानुसार न्याय करील व दया दाखवील.

यातून आपल्याला दोन महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला धडा असा की, त्या क्षणी दुष्टाई जिंकत आहे असे वाटू शकते. असंख्य प्रकारे आपल्याला याचा अनुभव येतो. आपल्याला न्याय मिळत नाही, छळ सहन करावा लागतो आणि मनाला ठेच पोहोचते. कधीकधी आपल्या सभोवती दुष्टाईचाच विजय होताना दिसतो, तेव्हा आपण खचून जातो आणि निराशेच्या गर्तेत सापडू शकतो.

पण इतर कोणत्याही वेळेपेक्षा अशाच वेळी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की दैवी न्यायाचा अखेर विजय होईल, ही आशा सोडायची नाही! शेवटी देवच जिंकेल. आणि अखेरीस अंतिम परिणामच महत्त्वाचा ठरतो. म्हणून शाश्वत जीवनाच्या दृष्टीने पाहिले तर, देवाशी विश्वासू राहणे आणि त्याच्यावर आशा ठेवणे, एवढेच महत्त्वाचे आहे. आपल्याला जे अन्यायकारक दिसते त्यात अडकून न राहता पुढे जाण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. होय, इथे आणि आत्ताच दुष्टाईला सामोरे जाण्याची प्रेरणा देव आपल्याला देतो, तेव्हा आपण तसे केले पाहिजे. पण हेही लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या परिपूर्ण ज्ञानाने देव कधीकधी अन्यायाला काही काळ चालू देणेच अधिक योग्य ठरवतो. हे समजून घेणे आणि स्वीकारणे कठीण जाऊ शकते. तरीही देव अखेरपर्यंत विश्वासू राहील आणि त्याच्या सत्याचा अंतिम विजय होईल, ही आशा आपण धरून ठेवली पाहिजे.

आज दैवी न्यायाच्या अंतिम विजयावर चिंतन करा. एखाद्या अन्यायामुळे किंवा संकटामुळे तुमचे धैर्य खचत असेल, तर ख्रिस्तामध्ये मिळणाऱ्या अंतिम विजयाकडे आपली दृष्टी वळवण्याचा प्रयत्न करा. देव अखेरीस परिपूर्ण न्याय प्रस्थापित करील, याची खात्री बाळगा. त्या वेळी, त्या वचनावर आशा ठेवली याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल.

हे न्यायाच्या प्रभू, मी खचून जातो आणि माझ्या जीवनात जुलूम व अन्याय पाहतो, तेव्हा तुझ्याकडे नजर वळवायला आणि आशा टिकवून ठेवायला मला मदत कर. माझी आशा नेहमी तुझ्यावर असो आणि तू पूर्णपणे विश्वासू आहेस, यावर माझी श्रद्धा असो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


जीवनातील सापळे टाळत वाटचाल

सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा मंगळवार

“गुरुजी, आपण सत्य बोलणारे आहात आणि कोणाच्या मताची पर्वा करत नाही, हे आम्हाला माहीत आहे. आपण कोणाचाही हुद्दा न पाहता देवाचा मार्ग सत्याला धरून शिकवता.” मार्क 12:14a

येशूला त्याच्याच बोलण्यात ‘पकडण्यासाठी’ पाठवलेल्या काही परुशी आणि हेरोदपंथीयांनी हे विधान केले. येशूला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ते कपटाने आणि चलाखीने वागतात. येशूने कैसराविरुद्ध काही बोलावे आणि त्यामुळे त्याला रोमन अधिकाऱ्यांपुढे अडचणीत आणता यावे, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण विशेष म्हणजे, ते येशूविषयी जे म्हणतात ते अगदी खरे आहे आणि त्याच्यातील एका मोठ्या सद्गुणाचे ते वर्णन आहे.

ते दोन गोष्टी सांगतात, ज्यांतून येशूची नम्रता आणि प्रामाणिकपणा दिसून येतात: १) “कोणाचे काय मत आहे, याची तुम्ही पर्वा करत नाही”; २) “तुम्ही कोणाचे पद किंवा प्रतिष्ठा पाहत नाही.” अर्थात, त्यानंतर येशूने रोमन कायदा मोडावा म्हणून त्यांनी त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण येशू त्यांच्या डावाला बळी पडत नाही. उलट, शेवटी तो त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवतो.

या सद्गुणांवर चिंतन करणे आपल्यासाठी चांगले आहे, कारण ते आपल्या जीवनातही कृतीत उतरावेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पहिले म्हणजे, इतरांच्या मतांची आपण पर्वा करू नये. पण याचा योग्य अर्थ समजून घेतला पाहिजे. इतरांचे ऐकणे, त्यांचा सल्ला घेणे आणि खुल्या मनाने विचार करणे अर्थातच महत्त्वाचे आहे. जीवनात चांगले निर्णय घेण्यासाठी इतरांची दृष्टी मोलाची ठरू शकते. मात्र, इतरांच्या भीतीपोटी आपण कसे वागावे हे त्यांनाच ठरवू देण्याचा धोका आपण टाळला पाहिजे. कधीकधी इतरांची ‘मते’ नकारात्मक आणि चुकीची असतात. आपल्या बरोबरीच्या लोकांचा दबाव आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतो. येशू इतरांच्या चुकीच्या मतांपुढे कधीही झुकला नाही, आणि त्या मतांच्या दबावामुळे त्याने आपली वागणूकही बदलली नाही.

दुसरी गोष्ट ते दाखवून देतात ती अशी की, एखाद्या व्यक्तीच्या ‘हुद्द्याचा’ प्रभाव येशू स्वतःवर पडू देत नाही. हासुद्धा एक सद्गुण आहे. देवाच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे सत्ता किंवा प्रभाव आहे म्हणून तिचे म्हणणे दुसऱ्याच्या म्हणण्यापेक्षा अधिक बरोबर ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीचा निष्कपटपणा, सचोटी आणि सत्यनिष्ठा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. येशूने हा सद्गुण परिपूर्णपणे आचरणात आणला.

हे शब्द तुमच्याबद्दलही म्हणता येतील का, यावर आज चिंतन करा. परुशी आणि हेरोदपंथीयांच्या या बोलण्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करा आणि सचोटीने व नम्रतेने जगा. असे केल्यास, येशूच्या ज्ञानात तुम्हालाही वाटा मिळेल आणि जीवनातील अत्यंत कठीण सापळ्यांतूनही तुम्हाला मार्ग काढता येईल.

हे सत्यनिष्ठेच्या प्रभू, मला खरोखरच प्रामाणिक आणि सचोटीने वागणारी व्यक्ती व्हायचे आहे. इतरांचा चांगला सल्ला मला ऐकायचा आहे, पण त्यांच्या चुकीच्या विचारांना किंवा माझ्यावर येणाऱ्या दबावाला मला बळी पडायचे नाही. प्रत्येक गोष्टीत तुझा आणि तुझ्या सत्याचा शोध घेत राहायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


देवाचे मन जाणून घेणे

सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा बुधवार

येशू त्यांना म्हणाला, “तुम्हाला पवित्र शास्त्र किंवा देवाचे सामर्थ्य माहीत नाही, म्हणूनच तुमची दिशाभूल होत नाही का?” मार्क 12:24

पवित्र शास्त्रातील हे वचन त्या उताऱ्यातले आहे, ज्यात काही सदूकी येशूला त्याच्याच बोलण्यात पकडण्याचा प्रयत्न करत होते. अलीकडच्या दैनंदिन वाचनांत हा विषय वारंवार आला आहे. येशूचे उत्तर थेट समस्येच्या मुळाशी जाते. तो त्यांचा गोंधळ दूर करतो; पण सुरुवातीलाच एक सत्य स्पष्टपणे सांगतो: सदूक्यांना पवित्र शास्त्रही माहीत नाही आणि देवाचे सामर्थ्यही माहीत नाही, म्हणून त्यांची दिशाभूल झाली आहे. हे ऐकून आपण थोडे थांबावे आणि पवित्र शास्त्र व देवाचे सामर्थ्य यांविषयीची आपली स्वतःची समज तपासून पाहावी.

जीवनाचा उलगडा आपण स्वतःच करून घ्यायचा प्रयत्न सहज करतो. ही घटना का घडली, ती का घडली, याचा आपण पुन्हा पुन्हा विचार करत राहतो आणि त्याची कारणे शोधू पाहतो. इतरांच्या कृतींचा, इतकेच नव्हे तर स्वतःच्या कृतींचाही आपण उलगडा करू पाहतो. पण अनेकदा शेवटी आपला गोंधळ दूर झालेला नसतो आणि सुरुवातीइतकेच आपण ‘दिशाभूल झालेले’ असतो.

जीवनातील एखादी गोष्ट समजून घेताना तुम्ही अशा गोंधळात सापडलात, तर थोडा वेळ शांत बसा आणि येशूचे ते शब्द जणू तो तुम्हालाच उद्देशून बोलत आहे, अशा भावनेने ऐका.

हे शब्द कठोर टीका किंवा फटकार म्हणून घेऊ नका. उलट, त्यांतून येशू आपल्याला एक मोलाची जाणीव करून देतो: थोडे थांबून पाहिले, तर जीवनातील अनेक गोष्टींबाबत आपली दिशाभूल होत असते, हे आपल्या लक्षात येते. भावना आणि चुकीच्या समजुतींमुळे आपले विचार आणि तर्क धूसर होतात आणि आपली पावले चुकीच्या वाटेकडे वळतात. असे सहज घडू शकते. मग आपण काय करावे?

आपली ‘दिशाभूल’ होत आहे असे वाटते, किंवा देवाला अथवा त्याचे सामर्थ्य कसे कार्य करते हे आपण खरोखर समजून घेतलेले नाही असे जाणवते, तेव्हा आपण थोडे थांबून परिस्थितीकडे नव्याने पाहावे. मग प्रार्थना करून देवाला काय सांगायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, प्रार्थना करणे आणि विचार करणे या एकच गोष्टी नाहीत. देवाच्या गोष्टींवर चिंतन करण्यासाठी आपल्याला बुद्धीचा उपयोग करावा लागतो, हे खरे. पण ‘विचार, विचार आणि आणखी विचार’ केल्याने नेहमीच योग्य समज येते असे नाही. विचार करणे म्हणजे प्रार्थना करणे नव्हे. हे आपल्याला अनेकदा उमगत नाही.

नम्रपणे एक पाऊल मागे घेऊन, देवाचे मार्ग आणि त्याची इच्छा आपल्याला समजत नाहीत, हे देवासमोर आणि स्वतःशीही कबूल करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. मनात चाललेली विचारांची गर्दी शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काय योग्य व काय अयोग्य याविषयीचे आपले पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजेत. आपण नम्रपणे शांत बसून ऐकले पाहिजे आणि प्रभू आपल्याला दिशा दाखवेपर्यंत वाट पाहिली पाहिजे. सगळ्याचा ‘उलगडा करून घेण्याची’ आपली सततची धडपड आपण सोडू शकलो, तर देवच आपल्यासाठी उलगडा करील आणि आपल्याला हवा तो प्रकाश देईल, असा अनुभव आपल्याला येऊ शकतो. सदुकी लोकांच्या मनात एक प्रकारचा गर्व आणि अहंकार होता. त्यामुळे त्यांची विचारशक्ती झाकोळली गेली आणि आपणच नीतिमान आहोत, असा त्यांचा समज झाला. येशू त्यांना सौम्यपणे पण ठामपणे पुन्हा स्पष्ट विचार करण्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतो.

दिशाभूल करणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या विचारांशी तुमचा काही झगडा चालला आहे का, यावर आज चिंतन करा. नम्र व्हा, म्हणजे येशू तुमच्या विचारांना योग्य दिशा देईल आणि सत्यापर्यंत पोहोचण्यास तुम्हाला मदत करील.

हे प्रभू, तुला सर्व काही अगदी स्पष्ट आहे. सत्य जाणून घेण्याची माझी खरोखर इच्छा आहे. कधीकधी मी स्वतःची दिशाभूल होऊ देतो. तुझ्यासमोर नम्र व्हायला मला मदत कर, म्हणजे तू मला मार्ग दाखवू शकशील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


प्रेम इतरांपर्यंत पसरले पाहिजे

सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा गुरुवार

“तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि सर्व शक्तीनिशी प्रेम कर… जसे तू स्वतःवर प्रेम करतोस तसेच आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर.” मार्क 12:30-31b

या दोन महान आज्ञा एकमेकींशी कशा जोडलेल्या आहेत, हे पाहणे खरोखर रंजक आहे!

सर्वप्रथम, आपल्या संपूर्ण हृदयाने, आत्म्याने, मनाने आणि सामर्थ्याने देवावर प्रेम करण्याची आज्ञा अगदी स्पष्ट आहे. ही आज्ञा समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे: हे प्रेम आपले संपूर्ण जीवन व्यापणारे आणि सर्वस्व अर्पण करणारे आहे. देवावर प्रेम करताना आपण काहीही राखून ठेवू शकत नाही. आपले संपूर्ण अस्तित्व देवाच्या प्रेमाला वाहिलेले असले पाहिजे.

हे प्रेम अधिकाधिक खोलवर समजून घेण्यासाठी त्याविषयी पुष्कळ काही सांगता येईल. पण पहिल्या आणि दुसऱ्या आज्ञेचा परस्पर संबंध पाहणेही महत्त्वाचे आहे. मोशेने दिलेल्या दहा आज्ञांचे सार या दोन आज्ञांमध्ये सामावलेले आहे. मात्र या दोन्ही आज्ञा एकमेकींशी कशा जोडलेल्या आहेत, हे समजून घेणे अत्यावश्यक आहे.

दुसरी आज्ञा सांगते, “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम कर.” यातून असा प्रश्न पडतो, “मी स्वतःवर प्रेम कसे करावे?” याचे उत्तर पहिल्या आज्ञेत सापडते. आपल्या सर्वस्वाने देवावर प्रेम करणे, हा स्वतःवर प्रेम करण्याचा पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. देवावर प्रेम करणे ही आपण स्वतःसाठी करू शकणारी सर्वांत चांगली गोष्ट आहे. म्हणूनच स्वतःवर प्रेम करण्याची गुरुकिल्ली देवावरील प्रेमात आहे.

म्हणून या दोन आज्ञांचा संबंध असा आहे: आपण स्वतःवर करतो तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे म्हणजे आपण इतरांसाठी जे काही करतो, त्यातून त्यांना आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, जिवाने, मनाने आणि सामर्थ्याने देवावर प्रीती करण्यास मदत झाली पाहिजे. ही मदत आपण आपल्या शब्दांनी करतो, पण विशेषतः आपल्या आचरणाचा त्यांच्यावर जो प्रभाव पडतो, त्यातून करतो.

आपण सर्वस्वाने देवावर प्रेम करतो, तेव्हा आपल्या प्रेमाचा प्रभाव इतरांवरही पडतो. देवावरचे आपले प्रेम, त्याच्याविषयीची आपली उत्कटता, त्याच्यासाठीची आपली ओढ, आपली भक्ती आणि आपली निष्ठा इतरांना दिसेल. हे पाहून त्यांनाही त्या प्रेमाची ओढ लागेल, कारण देवावरचे प्रेम खरोखरच मनाला आकर्षून घेते. असे प्रेम पाहून इतरांना प्रेरणा मिळते आणि आपल्यासारखे प्रेम करण्याची इच्छा त्यांच्यातही जागी होते.

आज तुमची देवावरील प्रीती किती खोल आहे, यावर मनन करा. तितकेच महत्त्वाचे म्हणजे, ती प्रीती इतरांना दिसावी इतक्या स्पष्टपणे तुमच्या जीवनातून प्रकट होते का, याचाही विचार करा. देवावरील तुमची प्रीती मोकळेपणाने जगा आणि निःसंकोचपणे व्यक्त करा. असे केल्याने ती इतरांना दिसेल आणि जशी तुम्ही स्वतःवर प्रीती करता तशीच तुम्ही त्यांच्यावरही प्रीती कराल.

हे माझ्या देवा, तुझे प्रेम परिपूर्ण आहे. प्रेमाच्या या आज्ञा पाळायला मला मदत कर. माझ्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रेम करायला मला मदत कर. तुझ्यावर प्रेम करताना हे प्रेम इतरांनाही देता यावे, यासाठी मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


प्रभूमध्ये आनंद मानणे

सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा शुक्रवार

मोठ्या जनसमुदायाने हे आनंदाने ऐकले. मार्क 12:37b

हे वचन आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी येते. येशूने नुकतीच जनसमुदायाला शिकवण दिली होती आणि लोकांनी ती “आनंदाने” ऐकली. येशूच्या शिकवणीने त्यांच्या जिवाला मोठा आनंद झाला.

येशूची शिकवण ऐकताना आणि आपल्या जीवनात त्याची उपस्थिती अनुभवताना अनेकांना असाच आनंद होतो. स्तोत्रांमध्ये या आनंदाची अनेक चित्रे दिसतात. “प्रभूमध्ये मला आनंद मिळतो.” “तुझी वचने किती गोड आहेत!” “तुझ्या आज्ञांमध्ये मला आनंद मिळतो.” या आणि अशा अनेक ओळींमधून येशूच्या वचनांचा आणि त्याच्या उपस्थितीचा आपल्या जीवनावर होणारा एक परिणाम दिसून येतो. त्याची वचने आणि आपल्या जीवनातील त्याची उपस्थिती आपल्याला विलक्षण आनंद देतात.

यावरून असा प्रश्न पडतो, “येशूच्या वचनांत मला आनंद मिळतो का?” अनेकदा ख्रिस्ताची वचने आपल्याला ओझ्यासारखी वाटतात, जणू ती आपल्या इच्छांवर बंधने घालतात किंवा जीवनात आपल्याला हवे ते मिळवण्याच्या आड येतात. म्हणूनच देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे आपल्याला अनेकदा कठीण आणि जड वाटते. खरे सांगायचे तर, आपले मन पापात किंवा जगातील सुखांत गुंतलेले असेल, तर आपल्या प्रभूची वचने आपल्याला बोचू शकतात आणि ओझ्यासारखी वाटू शकतात. पण याचे कारण एवढेच की, ज्या अनेक अपायकारक गोष्टींशी आपण जडून गेलो आहोत, त्यांच्याशी ही वचने जुळत नाहीत.

देवाचे वचन, म्हणजे येशूची वचने, ऐकणे तुम्हाला कठीण वाटत असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर पहिले पाऊल टाकत आहात. शेवटी आपल्याला कोरडे आणि रिकामे करून सोडणाऱ्या इतर अनेक मोहांशी आणि प्रलोभनांशी त्याच्या वचनाला एक प्रकारे “झुंज देऊ” लागलात, असे म्हणता येईल. प्रभूमध्ये आणि त्याच्या वचनांत आनंद मानण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.

आनंदाची गोष्ट अशी की, जीवनातील अनेक अहितकारक आसक्तींची पकड त्याच्या वचनाने तोडू दिलीत, तर त्याचे वचन तुम्हाला किती प्रिय आहे आणि तुमच्या जीवनातील त्याच्या उपस्थितीत तुम्हाला किती आनंद मिळतो, हे हळूहळू उमगेल. त्याच्या उपस्थितीतून मिळणारे सुख आणि आनंद हे इतर कोणत्याही क्षणभंगुर आसक्तीपेक्षा किंवा सुखापेक्षा कितीतरी अधिक मोलाचे आहेत, हे तुम्हाला जाणवू लागेल. पापातूनही समाधानाचा खोटा भास निर्माण होऊ शकतो. पण असे समाधान एखाद्या नशेसारखे असते; तिचा परिणाम लवकरच ओसरतो. प्रभूमध्ये मिळणारा आनंद मात्र तुम्हाला सतत उंचावतो आणि दिवसेंदिवस अधिक खोलवर तृप्त करतो.

प्रभूच्या उपस्थितीचा आणि त्याच्या वचनांचा आनंद तुम्ही खरोखरच आपल्या अंतःकरणात भरू देता का, यावर आज थोडा वेळ मनन करा. त्यांचा गोडवा चाखून पाहा. त्यांच्याकडे आपले मन ओढले जाऊ द्या. एकदा ही गोडी लागली की तुम्ही आणखी उत्कटतेने त्याचा शोध घ्याल.

हे प्रभू, तू सर्व आनंदाचा स्रोत आहेस. तुझ्यामध्ये आनंद मिळावा, अशी माझी इच्छा आहे. या जगातील अनेक आकर्षणांपासून आणि प्रलोभनांपासून दूर व्हायला मला मदत कर. तुझा आणि तुझ्या वचनाचा सदैव शोध घ्यायला मला मदत कर. तुझे वचन मला उमगते तेव्हा माझा आत्मा परम आनंदाने भरून टाक. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आध्यात्मिक संपत्ती आणि भौतिक संपत्ती

सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा शनिवार

“आमेन, मी तुम्हाला सांगतो: या गरीब विधवेने दानपेटीत देणगी टाकणाऱ्या इतर सर्वांपेक्षा जास्त टाकले. कारण त्या सर्वांनी आपल्याकडील जास्तीच्या संपत्तीतून दिले; परंतु तिने आपल्या गरिबीतून, आपल्याजवळ होते ते सर्व, म्हणजे आपल्या उदरनिर्वाहाचे सारे साधन, देऊन टाकले.” मार्क 12:43-44

तिने टोपलीत अवघ्या काही सेंटांची दोन छोटी नाणी टाकली. तरीही येशू म्हणतो की तिने इतर सर्वांपेक्षा जास्त दिले. हे तुम्हाला पटते का? हे खरे आहे, असे मानणे कठीण जाते. या गरीब विधवेने देणगी देण्याआधी इतरांनी टाकलेल्या मोठमोठ्या रकमांकडे, त्यांच्या पैशाच्या मोलाकडे, आपले लक्ष जाते. तिने टाकलेल्या दोन छोट्या नाण्यांपेक्षा त्या मोठ्या देणग्या आपल्याला अधिक हव्या वाटतात. बरोबर ना? की नाही?

येशूचे म्हणणे आपण मनापासून मानले, तर त्या विधवेने अर्पण केलेल्या दोन नाण्यांबद्दल, तिच्या आधी अर्पण केलेल्या मोठ्या रकमांपेक्षा, आपण कितीतरी अधिक कृतज्ञ असले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्या मोठ्या रकमा चांगल्या आणि उदार देणग्या नव्हत्या. बहुधा त्याही तशाच होत्या. देवाने त्याही देणग्या स्वीकारल्या आणि त्यांचा उपयोग केला.

पण इथे येशू आध्यात्मिक संपत्ती आणि भौतिक संपत्ती यांच्यातला फरक ठळकपणे दाखवतो. भौतिक संपत्ती आणि भौतिक देणग्यांतील उदारता यांपेक्षा आध्यात्मिक संपत्ती आणि आध्यात्मिक उदारता कितीतरी अधिक महत्त्वाची आहे, असे तो सांगतो. ती गरीब विधवा भौतिकदृष्ट्या गरीब होती, पण आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत होती. ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता ते भौतिकदृष्ट्या श्रीमंत होते, पण आध्यात्मिकदृष्ट्या त्या विधवेपेक्षा गरीब होते.

आपण ज्या भौतिकवादी समाजात राहतो, तिथे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आध्यात्मिक संपत्ती हा कितीतरी मोठा आशीर्वाद आहे, हे मान्य करून जाणीवपूर्वक तिची निवड करणे फार कठीण आहे. हे इतके कठीण का आहे? कारण आध्यात्मिक संपत्ती स्वीकारण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. आपण सर्वांनी त्या गरीब विधवेसारखे होऊन आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व, म्हणजे “आपल्या उदरनिर्वाहाचे सारे साधन,” अर्पण केले पाहिजे.

हे विधान ऐकताच काहींना वाटेल की ही अतिरेकी मागणी आहे. पण तसे नाही. भौतिक संपत्तीचा आशीर्वाद लाभण्यात काहीच गैर नाही; गैर आहे ते त्या संपत्तीला चिकटून राहण्यात. त्या गरीब विधवेची उदारता आणि तिचे आध्यात्मिक दारिद्र्य आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीत उतरवणे, हेच आवश्यक आहे. तिला द्यायचे होते आणि आपल्या देण्याने काहीतरी फरक पडावा, अशी तिची इच्छा होती. म्हणून तिने आपल्याजवळ होते ते सर्व दिले.

ही वृत्ती प्रत्यक्ष जीवनात कशी जगायची, हे प्रत्येकाने विवेकाने ठरवले पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने आपल्याजवळचे सर्व काही खरोखर विकून संन्यासी व्हावे, असा नाही. पण प्रत्येकाच्या अंतःकरणात पूर्ण उदारता आणि भौतिक वस्तूंबद्दल अनासक्ती असली पाहिजे. अशी वृत्ती जोपासली की, तुमच्याजवळच्या भौतिक वस्तूंचा उपयोग तुमच्या सर्वोत्तम हितासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी कसा करायचा, हे प्रभू तुम्हाला दाखवील.

आज या दोन प्रकारच्या संपत्तींमधील फरकावर चिंतन करा आणि जी संपत्ती अनंतकाळ टिकते ती निवडा. आपल्याजवळ जे काही आहे आणि आपले संपूर्ण अस्तित्व प्रभूला अर्पण करा. तुमच्या अंतःकरणातील उदारतेला त्याच्या परिपूर्ण इच्छेनुसार दिशा देऊ द्या.

हे माझ्या परम उदार प्रभू, त्या गरीब विधवेसारखे उदार आणि निःस्वार्थ हृदय मला दे. काहीही राखून न ठेवता स्वतःला पूर्णपणे तुला अर्पण करण्यासाठी तू मला कोणकोणत्या मार्गांनी बोलावतोस, हे ओळखायला मला मदत कर. इतर सर्व गोष्टींपेक्षा तुझ्या राज्यातील आध्यात्मिक संपत्तीचा शोध घ्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळातील दहावा आठवडा

अनुक्रमणिका


मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध