मराठी

सामान्य काळातील चौदावा आठवडा

बालकासारखी श्रद्धा

सामान्य काळातील चौदावा रविवार, वर्ष अ

“हे पित्या, स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझी स्तुती करतो, कारण या गोष्टी तू ज्ञानी व विद्वान लोकांपासून लपवून ठेवल्यास, पण लहानग्यांना त्या उघड करून दाखवल्यास.” मत्तय 11:25

किती गहन सत्य आहे हे! ‘लहानग्यांपैकी एक’ व्हायचे की ‘ज्ञानी व विद्वान’ व्हायचे, असा पर्याय दिला तर अनेकांना ज्ञानी व विद्वान होणेच अधिक आकर्षक वाटेल. पण येशूच्या म्हणण्यानुसार, जे लहान मुलांसारखे आहेत ते केवळ ज्ञानी व विद्वान असल्याचा आव आणणाऱ्यांपेक्षा खरे तर कितीतरी अधिक ज्ञानी व विद्वान असतात.

ज्यांचे मन बालकासारखे आहे, त्यांनाच स्वर्गराज्याची रहस्ये उलगडून दाखवली जातात. देवाच्या अंतरंगातील जीवनाची सत्ये खोलवर समजून घेण्यासाठी त्यांना विशेष कृपा दिली जाते. यातून देवाच्या अंतरंगातील जीवन किती साधे आहे, याची काही अंशी झलक मिळते. देव आणि त्याची इच्छा यांत कधीही गोंधळ किंवा गुंतागुंत नसते. आपणच देवाविषयीचा विचार गुंतागुंतीचा करून टाकतो आणि त्यामुळे त्याचे ज्ञान आपल्याला फार गुंतागुंतीचे वाटू शकते. पण प्रत्यक्षात, जे साध्या मनाने आणि नम्रतेने जगतात, त्यांनाच देवाचे सत्य आणि सौंदर्य उमगते.

‘देवाची इच्छा नेमकी काय आहे हे शोधून काढण्यात’ गरजेपेक्षा जास्त वेळ आणि शक्ती खर्च करण्याची प्रवृत्ती आपल्या सर्वांमध्ये असू शकते. आपण विचार करत राहतो, चर्चा करत राहतो, आणि शेवटी या ना त्या गोष्टीबद्दल गोंधळातच राहतो. खूप विचार करूनही शेवटी आपला गोंधळ दूर होत नाही, असे तुम्हाला जाणवले, तर ते एक लक्षण आहे: कदाचित तुम्ही देवाची इच्छा योग्य रीतीने ओळखत नाही आणि तो काय सांगतो हे नीट ऐकण्यासाठी स्वतःला मोकळे ठेवत नाही.

जेव्हा आपल्याला जे जाणून घेण्याची गरज असते, तेव्हा देव तेवढेच आपल्याला साधेपणाने आणि स्पष्टपणे सांगतो. म्हणून आपल्या प्रभूकडे नेहमी नम्रतेने आणि साधेपणाने जाणे महत्त्वाचे आहे. आपल्याला ऐकण्याची गरज असलेले साधे पण गहन सत्य तो त्याच्या वेळेनुसार सांगेल, याची आपण वाट पाहावी. शेवटी, महत्त्वाचे हेच की आपण प्रभूची धीराने वाट पाहावी.

आज यावर चिंतन करा: जीवनातील रहस्यांवर तुम्ही इतका वेळ विचार करता का, की शेवटी तुमच्या हाती केवळ गोंधळच उरतो? तसे असेल, तर नम्रतेत वाढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे प्रभूला जी साधी पण गहन सत्ये तुम्हाला उलगडून दाखवायची आहेत, ती तुम्हाला उमगतील. देवाच्या दृष्टीने लहान मुलासारखे होण्याचा प्रयत्न करा. मग केवळ स्वतःच्या बळावर जितके ज्ञानी व विद्वान होता आले असते, त्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञानी व विद्वान तुम्ही व्हाल.

हे सर्व ज्ञानाच्या प्रभू, बालकासारखी साधी श्रद्धा तुझ्यावर ठेवण्यास मला मदत कर. या साध्या श्रद्धेतून, जी सुंदर रहस्ये तू मला उलगडून दाखवू इच्छितोस, ती मला उमजू दे. प्रिय प्रभू, माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनी मला कधीही मिळू शकणार नाही इतके शहाणपण आणि ज्ञान मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


इतरांमध्ये ख्रिस्ताला पाहणे

सामान्य काळातील चौदावा रविवार, वर्ष ब

येशू त्यांना म्हणाला, “आपल्या गावात, आपल्या नातलगांमध्ये आणि आपल्या घरात यांखेरीज संदेष्ट्याचा अनादर होत नाही.” म्हणून काही आजाऱ्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्यापलीकडे त्याला तेथे कोणतेही सामर्थ्याचे कार्य करता आले नाही. त्यांच्या अश्रद्धेचे त्याला आश्चर्य वाटले. मार्क 6:4-6

येशूची त्याच्या स्वतःच्या गावात त्याच्या नातलगांशी झालेली भेट निराशाजनक ठरली. त्याची सुज्ञता आणि त्याने केलेली सामर्थ्याची कार्ये पाहून ते थक्क झाले. तरीही त्यांनी ‘त्याच्याविषयी आक्षेप घेतला.’ कारण त्यांच्या चांगल्या परिचयाचा, त्यांच्याच नात्यातला माणूस इतका विशेष कसा असू शकतो, हे त्यांना समजले नाही. येशूशी असलेली जवळीक आणि त्याचा परिचय यांनाच त्यांनी आपल्या श्रद्धेच्या आड येऊ दिले. त्यामुळे त्यांना त्याच्यावर श्रद्धा ठेवता आली नाही किंवा त्याच्या महानतेचा आनंदही घेता आला नाही.

अगदी तशीच अडचण आपल्याला थेट येत नाही. आपल्यापैकी कोणीही येशूच्या गावचे नाही किंवा रक्ताच्या नात्याने त्याच्या विस्तारित कुटुंबातले नाही. तरीही, आपल्या सर्वांत जवळच्या माणसांमध्ये, म्हणजे आपल्या स्वतःच्या कुटुंबात आणि आपल्या जिवलग मित्रांमध्ये उपस्थित असलेल्या येशूलाच नाकारण्याच्या सापळ्यात आपण पडू शकतो.

येशूला आलेल्या या अनुभवातून आपली एक प्रवृत्ती दिसून येते: आपण आपल्या सर्वांत जवळच्या व्यक्तींकडे श्रद्धेच्या नजरेने पाहत नाही. लोकांनी येशूविषयी चुकीचा न्याय केला. तसेच कधी कधी आपणही आपल्या जवळच्या व्यक्तींच्या पापांमुळे किंवा त्यांच्या चांगल्या कृतींचाही चुकीचा अर्थ लावल्यामुळे त्यांच्याविषयी दोषारोप करणारे मत बनवतो. तुम्हाला इतरांकडे सत्याच्या प्रकाशात पाहता येते का? त्यांच्या दुर्बलता आणि पापे यांपलीकडे पाहून त्यांच्या जीवनात देवाची जिवंत उपस्थिती आणि कार्यरत कृपा तुम्हाला दिसते का? त्यांच्यातील चांगुलपणा तुम्हाला दिसतो का, आणि तुमच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींद्वारे देवाला तुमच्याशी बोलू देता का? हे आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक कठीण असू शकते.

येशूच्या बाबतीत असे घडले, तर आपल्या कुटुंबांतही असे घडेल. यातून आपण हा धडा घ्यावा: आपल्या सर्वांत जवळच्या माणसांच्या जीवनात केवळ उणिवाच पाहण्याचा मोह आपल्याला होतो, हे ओळखावे. त्या मोहावर मात केली, तर त्यांच्या जीवनातील देवाच्या जिवंत उपस्थितीकडे आपले लक्ष जाईल. दररोज सर्वप्रथम आपण हीच उपस्थिती ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आज यावर चिंतन करा: आपल्या सर्वांत जवळच्या माणसांमध्ये देवाची उपस्थिती तुम्हाला कितपत जाणवते? ती ओळखणे तुम्हाला कठीण जात असेल, तर त्याकडे तुम्ही ज्यावर मात करावी असा मोह म्हणून पाहा. तुमच्या भोवतालच्या लोकांमध्ये देवाची जिवंत उपस्थिती ओळखल्याने त्यांच्यावरचे आणि देवावरचे तुमचे प्रेम वाढेल.

हे माझ्या गुप्तपणे उपस्थित असलेल्या प्रभू, माझ्या सर्वांत जवळच्या माणसांच्या जीवनात तुला पाहण्यास मला मदत कर. त्यांच्या जीवनात तू कार्य करीत आहेस हे पाहताना, तुझ्या उपस्थितीत आनंद मानण्यास आणि इतरांवरचे व तुझ्यावरचे माझे प्रेम वाढवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


धैर्य, विश्वास आणि दृढनिश्चय

सामान्य काळातील चौदावा रविवार, वर्ष क

“जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवीत आहे. पैशांची पिशवी, झोळी किंवा पादत्राणे बरोबर घेऊ नका आणि वाटेत कोणालाही अभिवादन करू नका.” लूक 10:3-4

देवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकणे ही जीवनातल्या सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक आहे. पण आपल्या श्रद्धेच्या जीवनासाठी ती सर्वांत फलदायी गोष्टींपैकीही एक आहे. देवावर असा भरवसा आपोआप निर्माण होत नाही. आपला प्रभू आपल्याला अधिक खोल विश्वासाकडे बोलावतो; त्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सतत आत्मसमर्पण आणि दृढनिश्चय आवश्यक असतात.

वरील उताऱ्याच्या सुरुवातीलाच येशू ठामपणे म्हणतो: “लांडग्यांमध्ये कोकरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवीत आहे.” या प्रभावी प्रतिमेतून हे स्पष्ट होते की आपला प्रभू आपल्यावर जी कामगिरी सोपवणार आहे, ती आपण आपल्या बळावर पार पाडू शकत नाही. एखादे लहान कोकरू लांडग्यांच्या कळपात शिरले तर त्याची धडगत नाही… पण मेंढपाळ अगदी त्याच्या शेजारी असेल, तर गोष्ट वेगळी.

आपण त्याने सोपवलेली कामगिरी पार पाडण्यासाठी मोठे धैर्य लागेल, एवढेच नव्हे, तर त्याच्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही, हेही येशू दाखवून देतो. म्हणून तो पुढे अशी व्यावहारिक सूचना देतो: “पैशांची पिशवी, झोळी किंवा पादत्राणे बरोबर घेऊ नका आणि वाटेत कोणालाही अभिवादन करू नका.” या वचनाकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर येशू आपल्याला दोन गोष्टी सांगतो, असे आपल्याला ऐकू येईल. पहिली, “जीवनात तुम्हाला सोपवलेली कामगिरी पार पाडताना माझ्या दैवी देखभालीवर भरवसा ठेवा.” दुसरी, “आपल्या अंतिम ध्येयावर लक्ष ठेवा आणि इकडेतिकडे भरकटू नका.” पैसे बरोबर घेणे किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलणे यात मुळात काही गैर आहे, असा याचा अर्थ नाही. त्याऐवजी, त्याच्यावर भरवसा ठेवून त्याने सोपवलेली कामगिरी निर्धाराने पूर्ण करावी, हा त्यातील सखोल आध्यात्मिक अर्थ आपण समजून घ्यावा.

देवाची इच्छा धैर्याने स्वीकारण्याचा प्रयत्न करताना त्याच्या दैवी देखभालीवर आपण किती भरवसा ठेवतो, यावर आज चिंतन करा. आपल्या प्रभूने सोपवलेले काम शेवटपर्यंत नेऊन पूर्ण करण्याचा आपला निर्धार किती पक्का आहे, याचाही विचार करा. श्रद्धेचे जीवन जगताना असा भरवसा ठेवण्याचा आणि हा निर्धार जपण्याचा संकल्प पुन्हा करा. चांगला मेंढपाळ प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल.

हे माझ्या उत्तम मेंढपाळा, तुझ्या परमपवित्र इच्छेचा सर्व शक्तिनिशी स्वीकार करण्याचा मी निश्चय करतो. तू जिथे नेशील तिथे तुझ्यामागे जाण्यासाठी मला धैर्य, विश्वास आणि दृढ निश्चय दे. प्रिय प्रभू, मी स्वतःला तुला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


सर्वशक्तिमान देवावर भरवसा

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा सोमवार

येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी पोहोचला. तेथे बासरी वाजवणारे लोक आणि गोंधळ करणारा जमाव पाहून तो म्हणाला, “चालते व्हा! मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.” तेव्हा त्यांनी त्याची थट्टा केली. जमावाला बाहेर घालवल्यावर येशू आत गेला, त्याने मुलीचा हात धरला आणि ती उठली. ही बातमी त्या संपूर्ण प्रदेशात पसरली. मत्तय 9:23-26

येशूने अनेक चमत्कार केले. त्याने वेळोवेळी निसर्गाच्या नियमांवर मात केली. शुभवर्तमानातील या उताऱ्यात तो या लहान मुलीला पुन्हा जिवंत करून मृत्यूवर विजय मिळवतो. आणि तो हे इतक्या सहजतेने करतो की जणू त्याच्यासाठी ही अगदी स्वाभाविक आणि सोपी गोष्ट आहे.

येशूने चमत्कार कशा प्रकारे केले, यावर चिंतन केले तर आपल्याला बरेच काही उमगते. त्याचे चमत्कार करण्याचे सामर्थ्य पाहून अनेक जण थक्क झाले, काही तर अगदी अवाक् झाले. पण येशू ते इतक्या सहजतेने करतो की जणू ते त्याच्या रोजच्या जीवनाचाच एक भाग आहेत. तो त्यांचा गाजावाजा करत नाही. उलट, आपल्या चमत्कारांविषयी कुणाला सांगू नका, असे तो अनेकदा लोकांना सांगतो.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते: भौतिक जगावर आणि निसर्गाच्या सर्व नियमांवर येशूचे पूर्ण प्रभुत्व आहे. तो विश्वाचा निर्माणकर्ता आहे आणि जे काही अस्तित्वात आहे त्या सर्वांचा तो उगम आहे, याची आठवण हा प्रसंग आपल्याला करून देतो. केवळ आपल्या इच्छेने तो सर्वकाही निर्माण करू शकतो, तर त्याच इच्छेने निसर्गाचे नियम नव्याने घडवणे आणि बदलणे त्याला सहज शक्य आहे.

निसर्गावर त्याचा पूर्ण अधिकार आहे, हे सत्य आपल्याला पुरेपूर उमगले, तर आध्यात्मिक जगावर आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगावरही त्याचा पूर्ण अधिकार आहे, असा भरवसा आपल्याला वाटायला हवा. तो सर्व काही करू शकतो, आणि तेही सहजपणे.

त्याच्या सर्वशक्तिमान सामर्थ्यावर आपली गाढ श्रद्धा असेल, आणि तो आपल्यावर परिपूर्ण प्रेम करतो व आपल्याला पूर्णपणे ओळखतो हे आपल्याला स्पष्टपणे उमगले, तर त्याच्यावर इतका खोल विश्वास ठेवणे शक्य होईल की यापूर्वी ते आपल्याला शक्य वाटले नसते. जो सर्व काही करू शकतो आणि आपल्यावर परिपूर्ण प्रेम करतो, त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास का ठेवू नये? ज्याला आपल्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ज्याला केवळ आपले भले हवे आहे, त्याच्यावर आपण विश्वास का ठेवू नये? आपण त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे! तो त्या विश्वासाला पात्र आहे, आणि आपल्या विश्वासामुळे त्याचे सर्वशक्तिमान सामर्थ्य आपल्या जीवनात कार्य करू लागेल.

आज दोन गोष्टींवर चिंतन करा. पहिले, त्याचे सामर्थ्य किती अपार आहे, हे तुम्हाला समजते का? दुसरे, तुमच्यावरील प्रेमामुळे तो ते सामर्थ्य तुमच्या भल्यासाठी वापरतो, हे तुम्हाला माहीत आहे का? ही सत्ये जाणून घेतल्याने आणि त्यांवर विश्वास ठेवल्याने तुमचे जीवन बदलेल आणि त्याला तुमच्या जीवनात कृपेचे चमत्कार घडवता येतील.

हे सर्व सामर्थ्याच्या आणि प्रेमाच्या प्रभू, सर्व गोष्टींवर तुझा निरपवाद अधिकार आहे आणि माझ्या जीवनावरही तुझा पूर्ण अधिकार आहे, यावर माझी श्रद्धा आहे. तुझ्यावर आणि माझ्यावर असलेल्या तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


अविवेक आणि सहजता

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा मंगळवार

ज्याला बोलता येत नव्हते अशा एका भूतबाधित माणसाला येशूकडे आणण्यात आले. भूताला हाकलून दिल्यावर तो मुका माणूस बोलू लागला. लोकसमुदाय थक्क झाला आणि म्हणाला, “इस्राएलमध्ये असे काही पूर्वी कधीच पाहिले नाही.” पण परुशी म्हणाले, “तो भुतांच्या अधिपतीच्या बळाने भुते हाकलतो.” मत्तय 9:32-34

लोकसमुदायाच्या प्रतिक्रियेत आणि परुश्यांच्या प्रतिक्रियेत किती ठळक फरक दिसतो! हा फरक खरोखरच खेदजनक आहे.

जमलेले लोक म्हणजे आपल्यासारखीच साधीसुधी माणसे. जे घडले ते पाहून ते थक्क झाले. जे दिसते त्याचा स्वीकार करणारी साधी आणि निर्मळ श्रद्धा त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते. अशी श्रद्धा लाभणे किती मोठा आशीर्वाद आहे!

परुश्यांच्या प्रतिक्रियेत दोषारोप, अविवेक, मत्सर आणि कठोरपणा दिसून आला. विशेषतः ती प्रतिक्रिया तर्काला धरून नव्हती. येशू “दुष्टात्म्यांच्या अधिपतीच्या साहाय्याने दुष्टात्म्यांना हाकलून देतो,” असा निष्कर्ष परुश्यांनी कशावरून काढला? येशूने केलेल्या कोणत्याही कृतीतून असा निष्कर्ष निघणे शक्य नव्हते. त्यामुळे तर्काला धरून एकच निष्कर्ष निघतो: परुश्यांची मने मत्सर आणि हेव्याने भरली होती. याच पापांमुळे ते या हास्यास्पद आणि तर्कहीन निष्कर्षापर्यंत पोहोचले.

यातून आपण हा धडा घेतला पाहिजे की इतरांकडे मत्सराने नव्हे, तर नम्रतेने आणि प्रामाणिकपणे पाहावे. आपल्या सभोवतालच्या लोकांकडे नम्रतेने आणि प्रेमाने पाहिल्यास त्यांच्याविषयीचे आपले निष्कर्ष स्वाभाविकपणे वास्तवाला धरून आणि प्रामाणिक असतील. नम्रता आणि निखळ प्रेम यांमुळे इतरांमधले चांगुलपण आपल्याला दिसेल आणि त्याचा आनंदही घेता येईल. अर्थात, पापही आपल्या नजरेस पडेल; पण हेव्या-मत्सरापोटी इतरांविषयी घाईघाईने अविवेकी निर्णय देणे टाळायला नम्रता आपल्याला मदत करेल.

तुम्ही सहसा इतरांविषयी कसा विचार करता आणि कसे बोलता, यावर आज चिंतन करा. येशूने केलेली चांगली कृत्ये पाहून विश्वास ठेवणाऱ्या आणि थक्क होणाऱ्या लोकांसारखी तुमची वृत्ती आहे का? की निष्कर्ष काढताना मनाने गोष्टी रचणाऱ्या आणि त्या फुगवून सांगणाऱ्या परुश्यांसारखी तुमची वृत्ती आहे? त्या लोकांची सरळ, स्वाभाविक वृत्ती अंगीकारण्याचा निश्चय करा, म्हणजे तुम्हालाही ख्रिस्तामध्ये आनंद आणि विस्मय अनुभवता येईल.

हे माझ्या अद्भुत प्रभू, माझी श्रद्धा साधी, नम्र आणि निर्मळ असावी, अशी माझी इच्छा आहे. इतरांमध्येही तुला नम्रतेने पाहायला मला मदत कर. रोज भेटणाऱ्या माणसांच्या जीवनात तुला पाहायला आणि तुझी उपस्थिती अनुभवून विस्मित व्हायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


चमत्कार आणि श्रद्धा

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा बुधवार

येशूने आपल्या बारा शिष्यांना बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला, जेणेकरून ते त्या आत्म्यांना हाकलून लावू शकतील आणि सर्व प्रकारचे रोग व आजार बरे करू शकतील. मत्तय 10:1

येशू आपल्या प्रेषितांना पवित्र अधिकार देतो. ते दुष्ट आत्म्यांना हाकलून लावू शकत होते आणि आजाऱ्यांना बरे करू शकत होते. त्यांच्या उपदेशामुळे अनेकांनी ख्रिस्ताचा स्वीकारही केला.

चमत्कार करण्यासाठी प्रेषितांना लाभलेल्या या विलक्षण कृपादानाचा विचार करणे रंजक आहे, कारण आज असे चमत्कार फारसे पाहायला मिळत नाहीत. मात्र, ख्रिस्तसभेच्या सुरुवातीच्या काळात चमत्कार बऱ्याचदा घडत असत असे दिसते. याचे एक कारण असे की या कार्याला चालना देण्यासाठी येशूने सुरुवातीलाच आपल्या कृतीतून ठळक संदेश दिला. त्याने आणि त्याच्या प्रेषितांनी केलेले चमत्कार ही देवाच्या सामर्थ्याची आणि उपस्थितीची प्रभावी चिन्हे होती. या चमत्कारांमुळे प्रेषितांच्या प्रचारावर विश्वास ठेवणे लोकांना सोपे गेले आणि अनेकांनी ख्रिस्तावरील श्रद्धा स्वीकारली. ख्रिस्तसभा वाढत गेली तशी देवाच्या वचनाची सत्यता पटवून देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने चमत्कारांची गरज उरली नाही, असे दिसते. कालांतराने, अनेक चमत्कारांच्या मदतीशिवायही सुवार्ता पसरवण्यासाठी श्रद्धावंतांचे स्वतःचे जीवन आणि त्यांची साक्ष पुरेशी ठरली. श्रद्धेसाठी पत्करलेले हौतात्म्य आणि गाढ श्रद्धेतून केलेली कृत्ये ही देवाच्या उपस्थितीची खरी चिन्हे ठरली.

हे समजून घेणे उपयुक्त आहे, कारण आपल्या स्वतःच्या श्रद्धेच्या आणि मनपरिवर्तनाच्या वाटचालीतही असेच काहीसे घडते. श्रद्धेच्या प्रवासाच्या सुरुवातीला अनेकदा आपण देवाच्या सान्निध्याचे अनेक उत्कट अनुभव घेतो. मनाला खोलवर दिलासा देणाऱ्या आध्यात्मिक अनुभूती येऊ शकतात आणि देव आपल्या सोबत आहे याची स्पष्ट जाणीव होऊ शकते. पण काळ जसा पुढे जातो, तशा या अनुभूती ओसरू लागतात. मग त्या कुठे गेल्या किंवा आपल्याकडून काही चूक झाली का, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. यात एक महत्त्वाचा आध्यात्मिक धडा आहे.

आपली श्रद्धा अधिक खोल होत जाते, तसा सुरुवातीला मिळालेला आध्यात्मिक दिलासा अनेकदा ओसरू लागतो. कारण आपली श्रद्धा आणि आपले प्रेम अधिक शुद्ध व्हावे आणि त्यातून आपण देवावर प्रेम करावे व त्याची सेवा करावी, अशी त्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते म्हणून नव्हे, तर त्याच्यावर प्रेम करणे आणि त्याची सेवा करणे चांगले व योग्य आहे म्हणून आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्याच्या मार्गाने चालावे. हा धडा शिकणे कठीण असू शकते, पण तो शिकणे अत्यावश्यक आहे.

आज चिंतन करा: तुमची श्रद्धा किती खोल आहे आणि ती तुम्हाला किती आधार देते? परिस्थिती कठीण असते आणि देव दूर आहे असे वाटते, तेव्हाही तुम्ही त्याला ओळखता का आणि त्याच्यावर प्रेम करता का? इतर कोणत्याही क्षणांपेक्षा अशाच क्षणी तुमची वैयक्तिक श्रद्धा अधिक दृढ होऊ शकते आणि तुमचे मनपरिवर्तन अधिक खोलवर होऊ शकते.

हे चमत्कार करणाऱ्या माझ्या प्रभू, तुझ्यावरची माझी श्रद्धा आणि तुझ्यावरील माझे प्रेम खोल, स्थिर आणि दृढ होऊ दे. बाहेर दिसणाऱ्या कोणत्याही “चमत्कारांपेक्षा” किंवा मनात उठणाऱ्या भावनांपेक्षा त्या श्रद्धेवर अधिक विसंबून राहायला मला मदत कर. सर्वांत आधी आणि सर्वांत अधिक, केवळ तुझ्यावरील निर्मळ प्रेमापोटी तुझ्यावर प्रेम करायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


शुभवर्तमानाची किंमत

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा गुरुवार

तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे; तुम्हीही विनामूल्य द्या. मत्तय 10:8b

शुभवर्तमानाची किंमत काय आहे? त्याची किंमत ठरवता येईल का? विशेष म्हणजे, इथे आपण दोन किंमतींचा विचार करायला हवा. पहिली म्हणजे शुभवर्तमान स्वीकारण्यासाठी आपण किती किंमत मोजावी. दुसरी म्हणजे शुभवर्तमान इतरांना देताना, एका अर्थाने, आपण त्यांच्याकडून किती किंमत ‘घ्यावी’.

तर मग शुभवर्तमानासाठी आपण किती किंमत मोजावी? उत्तर असे आहे की त्याचे मूल्य अनंत आहे. पैशाने त्याची किंमत मोजणे आपल्याला कधीच परवडणार नाही. शुभवर्तमान अमूल्य आहे.

इतरांना शुभवर्तमान देताना आपण किती किंमत ‘घ्यावी’, याचे उत्तर असे आहे की ते विनामूल्य द्यायचे आहे. जे आपल्या मालकीचे नाही, ते देताना मोबदला घेण्याचा किंवा कशाचीही अपेक्षा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. शुभवर्तमानाचा तारणदायी संदेश ख्रिस्ताचा आहे, आणि तो तो संदेश विनामूल्य देतो.

वर दिलेल्या शास्त्रवचनाच्या दुसऱ्या भागापासून सुरुवात करूया. “तुम्ही विनामूल्य द्यावे.” म्हणजेच, आपण इतरांना विनामूल्य सुवार्ता द्यायची आहे. पण सुवार्ता विनामूल्य देण्यात एक अप्रत्यक्ष अपेक्षा आहे. सुवार्ता देताना आपण स्वतःलाही द्यावे लागते. म्हणजेच, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आपण स्वतःला द्यायचे आहे. आपण स्वतःला असे पूर्णपणे आणि विनामूल्य का द्यावे? कारण आपल्यालाच सर्व काही “विनामूल्य” मिळाले आहे.

साधी गोष्ट अशी आहे की शुभवर्तमान हे आपल्याला विनामूल्य आणि पूर्णपणे दिलेले दान आहे; त्यामुळे आपणही इतरांना स्वतःचे संपूर्ण दान कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करायला हवे. शुभवर्तमान म्हणजे एक व्यक्ती—येशू ख्रिस्त. जेव्हा तो आपल्यामध्ये येतो आणि कोणतीही किंमत न घेता आपल्यामध्ये वास करतो, तेव्हा आपणही इतरांसाठी स्वतःला पूर्णपणे आणि विनामोबदला द्यायला हवे.

आज या दोन्ही गोष्टींवर चिंतन करा: शुभवर्तमान पूर्णपणे स्वीकारण्यासाठी तुम्ही किती खुले आहात आणि स्वतःला देण्यासाठी किती तयार आहात? देवाचे हे गौरवशाली दान समजून घेतल्याने आणि स्वीकारल्याने तुम्ही स्वतः इतरांसाठी एक दान व्हावे.

हे माझ्या अमोल प्रभू, माझे हृदय तुझ्यासाठी पूर्णपणे खुले होऊ दे, म्हणजे जिवंत सुवार्ता म्हणून मी तुझा स्वीकार करू शकेन. तुझा स्वीकार केल्यावर मलाही माझ्या संपूर्ण अस्तित्वातून तुला इतरांना देता येऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


छळाला सामोरे जाण्याची तयारी करा

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा शुक्रवार

येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला: ‘पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवीत आहे; म्हणून सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरागस राहा. पण लोकांपासून सावध राहा, कारण ते तुम्हाला न्यायालयांच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांत तुम्हाला फटके मारतील. माझ्यामुळे तुम्हाला राज्यपालांसमोर आणि राजांसमोर नेले जाईल, यासाठी की तुम्ही त्यांच्यासमोर आणि परराष्ट्रीयांसमोर साक्ष द्यावी.’ मत्तय 10:16-18

येशू उपदेश करत होता, त्या काळात तुम्ही त्याचे अनुयायी आहात, अशी कल्पना करा. त्याच्याविषयी लोकांमध्ये मोठा उत्साह आहे; तोच मशीहा आहे असा त्यांना विश्वास आहे आणि तो नवा राजा होईल अशी त्यांना मोठी आशा आहे, अशी कल्पना करा. पुढे काय घडणार याबद्दल किती आशा आणि उत्सुकता असती!

पण मग येशू अचानक हा उपदेश करतो. आपल्या अनुयायांचा छळ होईल, त्यांना फटके मारले जातील आणि हा छळ पुन्हा पुन्हा होत राहील, असे तो सांगतो. हे ऐकून त्याचे अनुयायी क्षणभर थबकले असतील. त्यांच्या मनात येशूविषयी गंभीर प्रश्न उभे राहिले असतील आणि त्याच्या मागे जाणे खरोखरच आपल्या हिताचे आहे का, असेही त्यांना वाटले असेल.

ख्रिस्ती लोकांचा छळ शतकानुशतके होत आला आहे. प्रत्येक काळात आणि प्रत्येक संस्कृतीत तो घडला आहे. आजही तो सुरू आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करावे? त्याला कसा प्रतिसाद द्यावा?

ख्रिस्ती जीवन म्हणजे केवळ ‘सर्वांशी जुळवून घेणे’, असे समजण्याच्या सापळ्यात अनेक ख्रिस्ती पडू शकतात. आपण प्रेमाने आणि दयाळूपणे वागलो तर सगळेच आपल्यावर प्रेम करतील, असे सहज वाटू शकते. पण येशूने असे सांगितले नाही.

येशूने स्पष्ट केले की छळ हा ख्रिस्तसभेच्या वाट्याला येणारच आहे आणि आपला छळ झाला तर त्याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. आपल्या समाजातलेच लोक आपल्याला पायदळी तुडवतात आणि आपल्याशी दुष्टपणे वागतात, तेव्हाही आपल्याला आश्चर्य वाटू नये. असे घडते तेव्हा आपली श्रद्धा आणि धीर सहज ढळू शकतात. आपण निराश होऊ शकतो आणि आपली श्रद्धा लपवून जगावे असे आपल्याला वाटू शकते. आपल्या समाजाला आणि जगाला आपण श्रद्धेनुसार जगणे आवडत नाही आणि ते त्याचा स्वीकार करणार नाहीत, हे माहीत असताना आपली श्रद्धा उघडपणे जगणे कठीण असते.

याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहेत. सर्वसाधारण वृत्तमाध्यमांतील बातम्या वाचल्या तरी ख्रिस्ती श्रद्धेविषयीचा वाढता विरोध आपल्या लक्षात येतो. म्हणूनच आज पूर्वीपेक्षा अधिक येशूच्या शब्दांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याने दिलेला इशारा आपण लक्षात ठेवावा आणि त्याच्या वचनावर आशा ठेवावी: तो आपल्याबरोबर असेल आणि गरज पडेल तेव्हा काय बोलावे यासाठी आपल्याला शब्द देईल. या वचनातून सर्वांत महत्त्वाचे आवाहन आपल्याला हेच आहे की आपण आपल्या प्रेमळ देवावर आशा आणि भरवसा ठेवावा.

जगाच्या विरोधाला सामोरे जाण्यास तुम्ही किती तयार आहात आणि किती इच्छुक आहात, यावर आज चिंतन करा. विरोधाला तशाच वैरभावाने उत्तर देऊ नका. त्याऐवजी, ख्रिस्ताच्या साहाय्याने, त्याच्याकडून मिळणाऱ्या सामर्थ्याने आणि सुज्ञतेने, कोणताही छळ सहन करण्यासाठी लागणारे धैर्य आणि बळ मिळवण्याचा प्रयत्न करा.

हे अपरंपार सामर्थ्याच्या प्रभू, तुझ्याशी वैरभाव बाळगणाऱ्या जगात माझ्या श्रद्धेनुसार जगताना मला बळ, धैर्य आणि शहाणपण दे. कठोर वागणुकीला आणि गैरसमजांना मी प्रेमाने आणि दयेने प्रतिसाद देऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आपले लपलेले जीवन

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा शनिवार

“जे उघड होणार नाही असे काहीही लपवलेले नाही, आणि जे कळणार नाही असे कोणतेही गुपित नाही.” मत्तय 10:26b

तुम्ही काय ‘लपवले’ आहे किंवा आपल्या हृदयात कोणते ‘गुपित’ जपून ठेवले आहे, यावर हा विचार तुम्हाला फार दिलासादायक वाटेल की फार भयावह, हे अवलंबून आहे. तुमच्या सदसद्विवेकबुद्धीच्या गाभ्यात काय आहे? सध्या केवळ देवाच्या नजरेला दिसते असे काय तिथे दडलेले आहे? या बाबतीत लोक दोन टोकांपैकी एका टोकाला जाऊ शकतात; या दोन टोकांमध्येही अनेक अवस्था आहेत.

पहिल्या टोकाला अशी व्यक्ती असते जी लोकांसमोर खोटा दिखावा करते, पण गुप्तपणे अगदी वेगळे जीवन जगते. अशा व्यक्ती दांभिकपणाच्या पापात पडतात; त्यांना आपण ‘दुटप्पी’ असेही म्हणू शकतो. ही अवस्था भयावह आहे, कारण अशा प्रकारचे जीवन जगणाऱ्यांना कधीच खरी शांती लाभत नाही. इतर लोक आपल्याविषयी काय विचार करतात आणि लोकांसमोर आपली प्रतिमा कशी आहे, याच विचारांत ते पूर्णपणे गुरफटलेले असतात. त्यांच्या अंतःकरणात खूप दुःख, चिंता आणि भीती असते. खरा नम्रपणा, प्रामाणिकपणा आणि सचोटी कोणत्याही प्रकारे आचरणात आणणे अशा व्यक्तीला फार कठीण जाते.

पण हे म्हटल्यावर, ज्यांचे जीवन इतरांच्या नजरेआड असते अशा व्यक्तींचा आणखी एक प्रकार आहे. ते म्हणजे संतांचे गुप्त जीवन! उदाहरणार्थ, धन्य कुमारी मरियेकडे पाहा. तिच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात तिने विवाहाबाहेर लैंगिक संबंध ठेवले होते, असे लोक समजत होते. लोकांच्या मनातली तिची ही प्रतिमा या जगात कधीच बदलली नाही. नाहीतर येशू तिच्या गर्भात आलाच कसा असता? असा अनेकांचा समज होता. पण सत्य असे होते की देवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींपैकी तिचा आत्मा सर्वांत सुंदर, निर्मळ आणि पवित्र होता. आता तिच्या अंतःकरणातील जीवनाचे सौंदर्य देवदूतांसमोर आणि संतांसमोर प्रकट झाले आहे आणि ते अनंतकाळ प्रकट राहील!

वर दिलेल्या पवित्र शास्त्रातील वचनाचे आश्वासन असे आहे की आपल्या हृदयात आणि सदसद्विवेकबुद्धीत जे काही आहे, ते सर्व अनंतकाळासाठी प्रकट केले जाईल. म्हणून जे आता खरोखर पवित्र, नम्र, प्रामाणिक आणि सद्गुणी जीवन जगतात, ते जसे खरोखर आहेत तसे अनंतकाळ दिसतील. जे आपले अंधकारमय जीवन लपवून जगतात, त्यांचे जीवनही देवाच्या दयेला आणि न्यायाला अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारे अनंतकाळासाठी उघड होईल.

पुन्हा सांगायचे तर, आपल्या अंतःकरणाच्या स्थितीनुसार ही गोष्ट आपल्याला बहुधा दिलासा देईल किंवा भय वाटायला लावेल. पण यातून आपण सर्वांत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी: इथे आणि आत्ताच आपले अंतःकरण खरोखर पवित्र आणि निर्मळ व्हावे म्हणून प्रयत्न करणे. तुमचे पावित्र्य इतर कोणाच्याही नजरेस पडले नाही तरी चालेल; ते केवळ देवाला दिसले पाहिजे. देवाला तुमचे अंतरंग सुंदर घडवू देणे आणि तुमचा आत्मा त्याच्या दृष्टीने सुंदर होऊ देणे, हेच ध्येय आहे.

हे तुम्ही कितपत करता, याचे आज चिंतन करा. तुमचे हृदय आणि विवेकबुद्धी देवाचीच आहेत अशा भावनेने तुम्ही ती रोज कितपत त्याच्या स्वाधीन करता, जेणेकरून तो तिथे खरे सौंदर्य फुलवू शकेल आणि ते सौंदर्य त्याच्या हृदयाला व तुमच्याही हृदयाला खूप आनंद देईल?

हे खऱ्या सौंदर्याच्या प्रभू, ये आणि माझ्या हृदयात तुझे निवासस्थान कर. माझा आत्मा सर्व बाबतींत तुला आवडेल असा घडव. तुझे वैभव तिथे प्रकट होऊ दे आणि ते वैभव अनंतकाळ प्रकट राहू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

 
सामान्य काळातील पंधरावा आठवडा

अनुक्रमणिका


मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध