प्र. ‘हा संदेश १२–१५ जणांना पाठवा, म्हणजे तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तो पुढे पाठवला नाहीत, तर तुमच्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल,’ असे सांगणारे ‘साखळी संदेश’ पाठवले जातात. अशा संदेशांबद्दल काय समजावे? हे कसे समजावून सांगावे? धन्यवाद.
उ. तुम्ही ईमेल किंवा समाजमाध्यमे वापरत असाल, तर ‘हा संदेश पुढे पाठवलात तर तुम्हाला अमुक लाभ मिळेल,’ असे आश्वासन देणारे ईमेल किंवा पोस्ट बहुधा तुमच्या पाहण्यात आले असतील. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादी विशेष प्रार्थना पाठवली जाते आणि तिच्या शेवटी अशी सूचना जोडलेली असते: ‘ही प्रार्थना बारा मित्रांना पाठवा, म्हणजे बारा दिवसांच्या आत तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला मिळेल.’
मग अशा दाव्यात काही तथ्य आहे का? नाही. ही अंधश्रद्धा आहे. तरीही याबाबत एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. पण आधी यात अंधश्रद्धा नेमकी कुठे आहे ते पाहूया.
देवाची कृपा आणि दया मिळण्यासाठी तुम्ही एखादा ईमेल अनेक मित्रांना पुढे पाठवला पाहिजे, अशी अट देव घालत नाही. त्या ईमेलमधली प्रार्थना अतिशय सुंदर आणि म्हणण्यासारखीही असेल. तरीही त्या प्रार्थनेचे फल तुम्ही ईमेलमधल्या सूचना पाळता की नाही यावर अवलंबून नसते. प्रार्थनांशी कृपेचे दान जोडण्याचा अधिकार केवळ ख्रिस्ताला आणि त्याच्या चर्चला आहे. चर्च हे पापदंडमुक्तीद्वारे करते. पापदंडमुक्तीविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: प्र. पापदंडमुक्ती. असा एखादा ईमेल तुम्हाला आला, तर त्यातले आश्वासन किंवा इशारा काढून टाकून फक्त प्रार्थना पुढे पाठवणे अधिक योग्य ठरेल.
वर उल्लेख केलेले स्पष्टीकरण असे: गूढानुभवी व्यक्तींना मिळालेल्या काही खाजगी प्रकटीकरणांत विशिष्ट प्रार्थनांशी काही आश्वासने जोडलेली आहेत. अशा खाजगी प्रकटीकरणांची आणि आश्वासनांची पडताळणी नेहमी चर्चनेच केली पाहिजे. चर्चने त्यांना मान्यता दिली, तर त्या प्रार्थनांद्वारे देव विशेष कृपा देतो, असा विश्वास आपण ठेवू शकतो. पण महत्त्वाचे हे की, सर्व खाजगी प्रकटीकरणांबाबत आपण आपल्या चर्चचे मार्गदर्शन घ्यावे.
