मराठी

प्र. मिस्साला येणे

प्र. माझ्या शेजारणीला दोन लहान मुलं आहेत. ती आणि तिचे पती (ते कॅथलिक नाहीत) मुलांना धर्मशिक्षणाच्या वर्गांना पाठवतात, पण ते दोघे मिस्साला आलेले मला कधीच दिसत नाहीत. त्यांना मिस्साला यायला प्रोत्साहन देण्यासाठी मी काही बोलू शकते का? की मी या बाबतीत पडू नये?

उ. या बाबतीत पडू नये? मी तर म्हणेन, नक्की बोला, अजिबात संकोच करू नका! पण मला काय म्हणायचं आहे ते सांगतो.

दुर्दैवाने, तुम्ही सांगितलेली परिस्थिती तशी काही दुर्मीळ नाही. पण आधी एक खूप चांगली गोष्ट लक्षात घेऊया. हे दांपत्य आपल्या मुलांना धर्मशिक्षणाच्या वर्गांना पाठवतं, हीच फार चांगली गोष्ट आहे. माझ्या अनुभवात, स्वतःच्या श्रद्धेनुसार नेहमी आचरण होत नसलं, तरी आपल्या मुलांना निदान श्रद्धेच्या मूलभूत गोष्टी समजाव्यात, अशी ओढ पालकांना असते. मला वाटतं, यातून एक गोष्ट दिसते: आपली श्रद्धा मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जमेल ते सगळं करावं, ही खोल जाणीव देव पालकांच्या मनात रुजवतो. त्यामुळे मुलांना धर्मशिक्षणाच्या वर्गांना पाठवणं ही उत्तम सुरुवात आहे, पण तेवढ्यावर थांबायचं नाही.

मिस्साला जाण्याची सवय निरनिराळ्या कारणांनी सुटते. काही जण चर्चमधल्या व्यक्तींकडून दुखावले गेलेले असतात. काहींना चर्चच्या शिकवणीतला एखादा मुद्दा नीट समजत नाही आणि ते गोंधळून किंवा रागावून दूर जातात. काहींची मिस्साला जायची सवय सहजच सुटलेली असते, तर काही जण इतके व्यस्त असतात की रविवारी सकाळी उशिरापर्यंत झोपणंच त्यांना सोपं वाटतं. पण माझ्या मते, अनेकांच्या बाबतीत एक कारण असतं, ज्याबद्दल ते सहसा बोलत नाहीत: पूर्वी केलेल्या पापांमुळे त्यांच्या मनावर अपराधीपणाचं मोठं ओझं असतं आणि का कोण जाणे, आपल्याला इथे स्थान नाही असं त्यांना वाटतं. ते मिस्साला आले तरी आपण इथे परके आहोत असं त्यांना वाटतं, आणि मग न आलेलंच बरं असं वाटतं. पण मिस्साला न येण्याचं कारण काहीही असो, आपली श्रद्धा मुलांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे, हे बहुतेक पालक अजूनही ओळखतात. यावरून दिसतं की निदान मनाच्या तळाशी तरी त्यांची श्रद्धा अजून टिकून आहे.

तर मी अशी सुरुवात करेन. आपल्या श्रद्धेविषयी सहजपणे बोलायला सुरुवात करता येईल अशा संधी शोधा. तुमच्या मित्राला तुमचे स्वतःचे काही चांगले अनुभव सांगा. उदाहरणार्थ, एखादे प्रवचन तुमच्या विशेष लक्षात राहिले, तर गप्पांच्या ओघात सहज असे काहीतरी सांगा, “गेल्या आठवड्यात मी चर्चमध्ये गेलो होतो. तेव्हा फादर असं म्हणाले… आणि त्याचा मला खूप उपयोग झाला.” तुम्ही स्वतःचा अनुभव सांगता तेव्हा समोरच्याला त्याच्यावर दबाव येतोय असं वाटत नाही. तुम्ही काय करावं हे त्याला न सांगता फक्त तुमचा अनुभव सांगितलात, तर योग्य बी पेरण्याचा तो कदाचित सर्वांत चांगला मार्ग ठरेल. त्या बीजाला पुढे अंकुरही फुटू शकेल.

पण याला वेळ लागू शकतो. तुमच्या मित्रांच्या बाबतीत धीर सोडू नका. त्यांना दोष दिल्यासारखं न वाटू देता बी पेरत राहा. कधीकधी नेमक्या वेळी नेमकं बी पेरलं जाण्याची गरज असते. असा योग जुळून आला, तर त्याचा परिणाम पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. “बिनधास्त सुरुवात करा!” असं मी म्हणतो, त्याचा अर्थ हाच. मनमोकळेपणाने, संकोच न बाळगता आणि वारंवार आपले अनुभव सांगा. तुमच्या मित्राला गप्पा पुढे चालू ठेवायच्या असतील, तर उत्तम. नसेल, तर चर्चमधलं काही किंवा तुमच्या श्रद्धेविषयी काही सांगण्याची पुढची संधी शोधा.


आणखी कॅथलिक प्रश्न & उत्तरे