प्र. मी घराबाहेर पडताना कसे कपडे घालते, यावरून माझी आई नेहमी काही ना काही बोलत असते. मी जीन्स आणि टी-शर्ट घातला किंवा गुडघ्याच्या एक इंच वर येईल असा स्कर्ट घातला, तर ते चर्चच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे का?
उ. हं, आपली मुलगी कसे कपडे घालते याची एखाद्या प्रेमळ आईला काळजी का वाटत असेल, याचा जरा अंदाज घेऊया. एक मुद्दा आहे शालीनतेचा, तर दुसरा आहे मूलभूत प्रतिष्ठेचा आणि आदराचा. आधी शालीनतेविषयी बोलूया.
आपण अशा संस्कृतीत जगतो, जिथे स्त्री-पुरुषांना, विशेषतः स्त्रियांना, व्यक्ती म्हणून नव्हे तर वस्तू म्हणून वागवले जाते. जाहिराती आणि एकूणच लोकप्रिय संस्कृती आपल्यावर ‘आदर्श’ स्त्री-पुरुषांच्या प्रतिमांचा सतत मारा करतात. लोकप्रिय संस्कृतीच्या मते ‘आदर्श’ पुरुष किंवा स्त्री कशी असते? पोटावर उठून दिसणारे पीळदार ‘सिक्स-पॅक’ स्नायू असलेला पुरुष, किंवा तथाकथित ‘परिपूर्ण देहयष्टी’ असलेली आणि ती दाखवायला न संकोचणारी स्त्री. टीव्हीवरच्या जाहिराती पाहा, दुकानात पैसे देण्याच्या काउंटरजवळची मासिके चाळा, इंटरनेटवर नजर टाका (पण पुन्हा विचार केला तर… तसे करणे टाळलेलेच बरे). आपली संस्कृती काय सांगते, ते लगेच लक्षात येईल: शरीर म्हणजे लैंगिक आकर्षणाची वस्तू, बस्स. एवढेच नव्हे, तर तुम्हाला स्वतःची काही ओळख निर्माण करायची असेल, तर सुपरमॉडेलसारखे दिसलेच पाहिजे. सतत असा संदेश दिला जातो, हे किती खेदजनक आहे! आणि तो स्त्री-पुरुष दोघांच्याही प्रतिष्ठेला किती कमी लेखतो!
मग याचा आपल्या पोशाखाशी काय संबंध आहे? आजकाल अनेकदा कपडे अशा पद्धतीने बनवले जातात की लैंगिक आकर्षणाला दिलेल्या अवाजवी आणि चुकीच्या महत्त्वावरच भर पडतो. कपड्यांचं काम अंग झाकणं, एवढंच. पण दुर्दैवाने, अंग सभ्यपणे आणि सन्मान राखून झाकण्याऐवजी शरीराचा प्रत्येक आकार आणि वळण ठळकपणे दिसेल अशा बेताने कपडे बनवले जातात. ही खरोखरच एक समस्या आहे. पुरुषांच्या बाबतीत ती विशेष जाणवते, कारण जे दिसतं त्याने पुरुष सहज लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होऊ शकतात. पोशाख असभ्य असेल, तर तो पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषाला असा संदेश जातो की तू त्याला स्वतःकडे एक वस्तू म्हणून पाहायला आमंत्रण देतेस. स्त्रिया जेव्हा सभ्य पोशाख निवडतात, तेव्हा त्या पुरुषांना आपलं खरं सौंदर्य आणि प्रतिष्ठा ओळखायला मदत करतात. ही पुरुषांसाठी मोठी मदत आहे. म्हणूनच छोटे स्कर्ट किंवा घट्ट जीन्स यांचा विपरीत परिणाम तुला वाटतो त्यापेक्षा जास्त असू शकतो.
मग साधी जीन्स आणि टी-शर्ट घालण्याबद्दल काय? त्यात नेमकी काय काळजी वाटते, हे मला नक्की माहीत नाही; पण इथेही मी एक अंदाज लावू शकतो. हे समजून घेण्यासाठी एक गमतीशीर उदाहरण पाहूया. दर आठवड्याच्या शेवटी आपल्या धर्मगुरूंनी मिस्सासाठी जीन्स आणि टी-शर्ट घालून यायचं ठरवलं तर? काहींना वाटेल, ‘वा, किती मोकळेपणाने वागतात!’ पण बहुतेकांना यातलं विचित्रपण लगेच जाणवेल. आपण कोण आहोत, याबद्दल आपला पोशाख बरंच काही सांगतो. आपण धर्मगुरू आहोत हे व्यक्त करण्यासाठी याजक धर्मगुरूंचा विशिष्ट पोशाख घालतात. हीच गोष्ट आपल्या सगळ्यांनाही लागू होते. आपण काय घालतो, यावरून आपण स्वतःकडे कसं पाहतो हे दिसतं. अर्थात, काही प्रसंगी जीन्स आणि टी-शर्ट अगदी योग्य असतात. पण प्रत्येक प्रसंगी सगळे असाच पोशाख करू लागले तर? घरच्या लग्नात सगळे असेच कपडे घालून आले तर? किंवा रविवारच्या मिस्सालाही सगळे इतक्या साध्या पोशाखात आले तर? त्यातून साहजिकच असा संदेश जाईल की या प्रसंगांत आणि घरी सुट्टी घालवण्यात काहीच फरक नाही. म्हणून आपण प्रसंगाला साजेसा पोशाख करावा. त्यातून स्वतःचा सन्मान राखला जावा आणि, कदाचित तितकाच महत्त्वाचा म्हणजे, त्या प्रसंगाचाही आदर दिसावा. उदाहरणार्थ, रविवारच्या मिस्सासाठी किंवा लग्नासाठी नीटनेटका पोशाख केल्याने हा प्रसंग आपल्याला महत्त्वाचा वाटतो, हे इतरांना कळतं. त्यातून आपला आदर व्यक्त होतो.
आशा आहे, याने तुला मदत होईल! आणि तरीही हे नीटसं स्पष्ट झालं नसेल, तर माझं एवढंच सुचवणं आहे: तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आईचा किंवा वडिलांचा सल्ला विश्वासाने ऐकलास, तर तुझं काही चुकणार नाही.
