प्र. माझ्या भावाने मला सांगितलं की आता त्याचा देवावर विश्वास नाही. त्याने हे आमच्या आईवडिलांना सांगितलेलं नाही, हे मला माहीत आहे. तो अजूनही आमच्यासोबत मिस्साला येतो आणि पवित्र परमप्रसाद घेतो. मी काय करावं?
उ. सर्वांत आधी, तुम्हाला याची काळजी वाटते, यावरून तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम आहे हे दिसतं. ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर असलेलं हे प्रेम जपा. मनापासून केलेलं प्रेम अनेकदा शब्दांपेक्षा कितीतरी अधिक परिणामकारक ठरतं.
तुमच्या भावाची नेमकी परिस्थिती मला माहीत नाही. तरीही काही सर्वसाधारण विचार मांडतो. त्यांपैकी निदान काही तरी तुमच्या उपयोगी पडतील, अशी आशा आहे.
विशेष म्हणजे, मोठं होताना अशा टप्प्यातून जाणं हे एखाद्या चांगल्या बदलाचं लक्षणही असू शकतं. देवावरची श्रद्धा गमावणं कधीच चांगलं नाही, हे खरं आहे. पण यामागे काहीतरी अधिक खोलवर घडत असावं, असं मला वाटतं. काही बाबतींत हा मोठं होण्याच्या प्रक्रियेचा स्वाभाविक भाग आहे. लहानपणी आपल्याला देवावर विश्वास ठेवायला शिकवलं जातं आणि सहसा आपण तो ठेवतोही. लहान मुलाची साधी आणि खरीखुरी श्रद्धा आपल्यात असते. आपण मोठे होतो, आपल्यात परिपक्वता येते, तशी आपली श्रद्धाही वाढली पाहिजे आणि परिपक्व झाली पाहिजे. अधिक खोलवर आणि स्वतःच्या मनापासून देवावर विश्वास ठेवण्याची निवड आपण केली पाहिजे. म्हणजेच, आपल्याला खरोखर विश्वास आहे म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. पण कधीकधी परिस्थिती किंवा काही घटना या प्रक्रियेच्या आड येतात.
उदाहरणार्थ, टीव्हीवर ऐकलेल्या किंवा कदाचित वर्गात कुणीतरी बोललेल्या एखाद्या गोष्टीमुळे तुमच्या भावाच्या मनात त्याच्या श्रद्धेच्या एखाद्या अंगाविषयी गोंधळ निर्माण झाला असेल. असा गोंधळ असणे चांगले नाही, पण अनेकदा गोष्टींचा उलगडा करून घेण्याच्या आणि त्या समजून घेण्याच्या प्रयत्नातूनच तो निर्माण होतो. मला वाटते, ज्याला आपण ‘शंका घेणे’ म्हणतो, तो अनेकदा खरे तर ‘प्रश्न विचारण्याचा’ काळ असतो. कदाचित तुमच्या भावाने ‘आता माझा देवावर विश्वास नाही’ असे तुम्हाला सांगितले, कारण देवावर पुन्हा विश्वास ठेवण्यासाठी त्याला तुमची मदत हवी होती. मनातल्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी मदत मागण्याची कदाचित ही त्याची पद्धत असेल.
जर तसे असेल, तर माझ्या मते तुम्ही अवलंबू शकता असा एक उत्तम मार्ग हा आहे. तुमचा भाऊ पुन्हा हा विषय काढेपर्यंत थांबा. त्याने विषय काढला की, फक्त हसून त्याला याबद्दल आणखी सांगायला प्रेमाने सांगा. मग फक्त ऐका. तो असा विचार का करू लागला, हे ऐकून घ्या. त्याला त्याचे म्हणणे समजावून सांगू द्या. त्याला याबद्दल मोकळेपणाने बोलू द्या. तो काहीही म्हणाला तरी, बहुतेक वेळ त्याचे ऐकण्यात आणि त्याचे म्हणणे समजून घेण्यात घालवा, असे मी सुचवेन. त्याने काही चांगले मुद्दे मांडले आणि तुमच्याकडे त्यांना चांगले उत्तर असेल, तर तो ऐकून घ्यायला तयार असेल तेव्हा ते त्याला सांगा. पण काय उत्तर द्यावे हे तुम्हाला नक्की माहीत नसेल, तर तसे त्याला सरळ सांगा. मग थोडा वेळ विचार, प्रार्थना आणि अभ्यास करण्यात घालवा आणि योग्य उत्तर सापडावे म्हणून देवाकडे प्रार्थना करा. गरज भासली तर तुम्ही तुमच्या धर्मगुरूंचाही सल्ला घेऊ शकता. आपल्याला चांगले उत्तर सापडले आहे असे वाटले की, ते त्याला सांगण्याची दुसरी संधी शोधा. त्याच्या मनातला प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला आणि त्याला चांगले उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, याचा त्याच्यावर चांगला प्रभाव पडू शकतो.
तो अजूनही मिस्साला जातो आणि पवित्र परमप्रसाद घेतो, याबद्दल सांगायचे तर, आपली श्रद्धा नसेल तर आपण पवित्र परमप्रसाद घेऊ नये, हे खरे आहे. पण सध्या तरी ही गोष्ट तुमचा भाऊ आणि देव यांच्यावर सोपवावी, असे मला वाटते. त्याने बोलून दाखवले त्यापेक्षा प्रत्यक्षात त्याच्या मनात अधिक श्रद्धा असू शकते. आणि या संघर्षाच्या काळात मिस्साला जाणे ही त्याच्यासाठी सर्वांत चांगल्या गोष्टींपैकी एक असू शकते. पण शेवटी, या गोष्टीचे तुम्हाला फार ओझे वाटत असेल, तर त्याबद्दल आई-वडिलांशी बोलणे चांगले ठरेल. त्यांना प्रार्थनापूर्वक तुमच्या भावाशी बोलू द्या. पुढे काय करावे याबद्दल त्यांना बहुधा काही चांगले मार्ग सुचतील.
