पापस्वीकार कसा करावा…
छपाईसाठी सोयीची आवृत्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रथम थोडा वेळ शांतपणे प्रार्थना करा आणि खाली दिलेले सदसद्विवेकबुद्धीच्या परीक्षणाचे प्रश्न वाचा. यासाठी जितका वेळ लागेल तितका घ्या.
वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण
वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण – १० आज्ञा
(किंवा सात प्रमुख पापांच्या आधारे परीक्षण करण्यासाठी पानावर आणखी खाली जा.)
पहिली आज्ञा: “मी प्रभू, तुझा देव आहे. माझ्याशिवाय इतर कोणत्याही देवांना मानू नकोस.”मी देवाला नाकारले आहे का? इतरांसमोर मला माझ्या श्रद्धेची लाज वाटली आहे का किंवा मी माझी श्रद्धा नाकारली आहे का? मी चर्चच्या शिकवणुकीची किंवा धार्मिक आचारांची थट्टा केली आहे का? मी प्रार्थनेकडे दुर्लक्ष केले आहे का? मी जादूटोणा, विक्का किंवा इतर गूढविद्येचे आचार केले आहेत का? भविष्य सांगणारे, मृतात्म्यांशी संपर्क साधण्याचा दावा करणारे माध्यम, ओइजा फलक किंवा टॅरोची पत्ते अशा अंधश्रद्धेच्या प्रकारांचा मी आधार घेतला आहे का?
दुसरी आज्ञा: “प्रभूचे नाव व्यर्थ घेऊ नका.”
मी देवाचे नाव निष्काळजीपणे, रागाच्या भरात किंवा आश्चर्याच्या भरात घेतो का? मी कोणाला किंवा कशाला शाप दिला आहे का?
तिसरी आज्ञा: “शब्बाथ दिवस पवित्र पाळा.”
माझ्याच चुकीमुळे एखाद्या रविवारी किंवा मिस्साला उपस्थित राहणे बंधनकारक असलेल्या एखाद्या सणाच्या दिवशी मी मिस्साला गैरहजर राहिलो आहे का? योग्य कारण नसताना मी मिस्साला उशिरा येतो किंवा मिस्सा संपण्याआधी निघून जातो का? मिस्साच्या वेळी मी माझे लक्ष विचलित होऊ देतो का?
चौथी आज्ञा: “आपल्या आईवडिलांचा आदर कर.”
मी माझ्या आईवडिलांची आज्ञा मोडली आहे का किंवा त्यांच्याशी अनादराने वागलो आहे का? मी माझ्या कुटुंबीयांशी अनादराने, उद्धटपणे किंवा असभ्यपणे वागतो का? मी माझ्या कामाकडे किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष केले आहे का? मी घरच्या कामांत मदत केली आहे का? मी गांभीर्याने आणि मेहनतीने अभ्यास करण्यात कसूर केली आहे का? आळसामुळे मी शाळेची एखादी परीक्षा दिली नाही का? मी वडीलधाऱ्या व्यक्तींशी अनादराने वागतो का? मी नागरी कायद्याचे उल्लंघन करतो का किंवा पोलिसांसारख्या अधिकारपदावरील व्यक्तींचे आदेश पाळत नाही का?
पाचवी आज्ञा: “खून करू नका.”
मी गर्भपात करून घेतला आहे का किंवा दुसऱ्या कोणाला गर्भपात करण्यास मदत केली आहे का? मी स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या शरीराला विद्रूप केले आहे का? मी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे का किंवा आत्महत्या करण्याचा गंभीरपणे विचार केला आहे का? मी मारामारी करून किंवा इतरांना मारून हिंसकपणे वागतो का? माझ्या मनात कोणाविषयी द्वेषाचे विचार आले आहेत का? मी बेकायदेशीर अमली पदार्थ घेतले आहेत का किंवा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा गैरवापर केला आहे का? मी बेकायदेशीर अमली पदार्थ विकले किंवा वाटले आहेत का? मी माझ्या शरीराची योग्य काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो का? मी जास्त खातो किंवा जास्त झोपतो का? मी बिअर किंवा इतर मद्य अतिप्रमाणात पितो का? मी स्वतःला नशा होईपर्यंत मद्यपान केले आहे का? मला माझ्या आरोग्याची किंवा दिसण्याची अति काळजी वाटते का? मी इतरांविषयी निर्दयी किंवा सूडाचे विचार जाणूनबुजून मनात बाळगतो का? मी सूड घेतला आहे का? मी कोणाशी कठोरपणे किंवा अपमानास्पद भाषेत बोललो आहे का? मी इतरांशी उद्धटपणे किंवा असभ्यपणे वागतो का, किंवा त्यांची खिल्ली उडवतो का? मी वंशभेदाचे पाप केले आहे का? मी प्राण्यांशी क्रूरपणे वागतो का?
सहावी & नववी आज्ञा: “व्यभिचार करू नकोस. आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीची अभिलाषा धरू नकोस.”
मी अशुद्ध गोष्टींची इच्छा धरली आहे का किंवा अशुद्ध कृत्ये केली आहेत का? अशुद्ध विचार किंवा इच्छा मनात घोळवत राहण्यात मी आनंद मानला आहे का? मी अश्लील साहित्य वाचले आहे का, अश्लील शब्द असलेली गाणी ऐकली आहेत का किंवा छायाचित्रांत, दूरचित्रवाणीवर, चित्रपटांत किंवा इंटरनेटवर अश्लील दृश्ये पाहिली आहेत का? अशुद्ध हेतूने चुंबन घेऊन, मिठी मारून किंवा स्पर्श करून मी स्वतःमध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीमध्ये लैंगिक इच्छा जागवली आहे का? मी एकट्याने अशुद्ध कृत्य केले आहे का, म्हणजेच हस्तमैथुन केले आहे का? मी समलिंगी लैंगिक कृत्ये किंवा इतर अनैसर्गिक कृत्ये केली आहेत का? मी शस्त्रक्रिया, अडथळा निर्माण करणारी साधने किंवा रासायनिक उपाय यांपैकी कोणत्याही कृत्रिम गर्भनिरोधक पद्धतीचा वापर करतो का? माझ्या पोशाखात शालीनतेचा अभाव होता का किंवा माझ्या दिसण्याची मी अवाजवी काळजी केली आहे का? मी अश्लील भाषा वापरतो का किंवा अश्लील विनोद किंवा गोष्टी सांगतो अथवा ऐकतो का?
सातवी आणि दहावी आज्ञा: “चोरी करू नकोस. आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेची अभिलाषा धरू नकोस.”
माझ्या मालकीची नसलेली एखादी वस्तू मी घेतली आहे का? मी खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे का किंवा तोडफोड करून ती विद्रूप केली आहे का? मी दुकानातून एखादी वस्तू चोरली आहे का? मी चोरीचा माल स्वीकारला किंवा विकत घेतला आहे का किंवा कोणाला चोरी करण्यास मदत केली आहे का? मी कोणाला लाच दिली आहे का? मी अति प्रमाणात जुगार खेळतो का? मालकाच्या परवानगीशिवाय मी एखादी वस्तू वापरण्यासाठी घेतली आहे का? उधार घेतलेली एखादी वस्तू मी परत केली नाही का? मी पैसा वाया घालवतो का किंवा उधळपट्टी करतो का? मी पैशाचा किंवा ऐहिक संपत्तीचा लोभ मनात बाळगला आहे का? पैसा किंवा एखादी वस्तू यांना मी देवाचे स्थान दिले आहे का? मी वस्तू किंवा अन्न वाया घालवतो का? मी परीक्षेत किंवा शालेय कामात गैरप्रकार केला आहे का? मी खेळात किंवा क्रीडास्पर्धेत फसवणूक केली आहे का?
आठवी आज्ञा: “आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.”
मी जाणूनबुजून खोटे बोललो आहे का? एखादे पापाचे किंवा बेकायदेशीर कृत्य करण्याची मी शपथ घेतली आहे का? इतरांनी न केलेल्या पापांचा किंवा ज्यांचा माझ्याकडे पुरावा नव्हता अशा पापांचा आरोप करून मी त्यांची बदनामी केली आहे का? मी इतरांची कुचाळकी करतो का किंवा ती ऐकतो का? गुप्त ठेवायला सांगितलेली एखादी गोष्ट मी इतरांना सांगितली आहे का? मी कोणाचा विश्वासघात केला आहे का? मी कोणावर निर्दयपणे टीका केली आहे का? मी इतरांविषयी घाईघाईने निष्कर्ष काढतो का आणि निराधार संशय बाळगतो का? मी जाणूनबुजून कोणाची दिशाभूल केली आहे का किंवा कोणाला फसवले आहे का? मी कोणाला क्षमा करण्यास नकार दिला आहे का किंवा त्या व्यक्तीविषयी मनात आकस धरला आहे का? मी ज्याला दुखावले त्याची माफी मागण्यात किंवा झालेली चूक सुधारण्यात कसूर केली आहे का?
विचार करण्यासारख्या इतर बाबी: मी लोभी किंवा स्वार्थी आहे का, किंवा स्वतःची कीव करण्यात गुंतून राहतो का? मला गर्व आहे का, मी स्वतःवरच भाळलो आहे का किंवा दिखावा करतो का? माझी वृत्ती उथळ आहे का आणि मी ऐहिक गोष्टींतच रमतो का? माझे यश वाढवून सांगून इतरांकडून कौतुक मिळवण्याची मला इच्छा असते का? मी लगेच दुखावतो का किंवा अतिसंवेदनशील आहे का? कोणी किंचित दुर्लक्ष केले किंवा अविचाराने वागले, तर मी त्याचा बाऊ करून तो अपमान किंवा मुद्दाम केलेली अवहेलना समजतो का? मी बढाया मारल्या आहेत का? मी इतरांशी उद्धटपणे वागलो आहे का? स्वतःच्या किंवा इतरांच्या पापी कृत्यांचे मी हट्टाने समर्थन केले आहे का? माझी वृत्ती बंडखोर आहे का? अधिक उपयोगी कामे करता आली असती, तेव्हा मी दूरचित्रवाणीसमोर बसून वेळ वाया घालवला आहे का? मला इतरांच्या वस्तूंचा हेवा वाटतो का आणि त्या माझ्याच व्हाव्यात अशी अवाजवी इच्छा मी धरतो का? इतरांवर आलेल्या संकटांत मला आनंद वाटतो का?
(७ घातक पापांच्या संदर्भात सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण करण्यासाठी खाली पाहा.)
आपल्या पापांवर मनन केल्यानंतर पापस्वीकार कक्षात जा आणि पुढीलप्रमाणे समेटाचा संस्कार साजरा करा:
पापस्वीकार कक्षात जाऊन म्हणा, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. आमेन. फादर, मला क्षमा करा, कारण मी पाप केले आहे. माझ्या शेवटच्या पापस्वीकाराला (किती काळ?) झाला आहे आणि माझी पापे अशी आहेत…(आपली सर्व पापे कबूल करा… घाबरू नका!).
फादर तुम्हाला प्रायश्चित्त देतील आणि मग पश्चात्तापाची प्रार्थना म्हणायला सांगतील. तुम्ही पुढील प्रार्थना म्हणू शकता:
पश्चात्तापाची प्रार्थना
हे माझ्या देवा, तुझ्याविरुद्ध पाप केल्याबद्दल मला मनापासून पश्चात्ताप होतो. तुझ्या न्याय्य शिक्षांमुळे मला माझ्या सर्व पापांचा तिटकारा आहे; पण सर्वांत जास्त तिटकारा यासाठी आहे की त्या पापांनी मी तुझा अपराध केला. तू माझा परम चांगला देव आहेस आणि माझ्या संपूर्ण प्रेमास पात्र आहेस. तुझ्या कृपेच्या साहाय्याने यापुढे पाप न करण्याचा आणि पापात पडण्याचा धोका असलेले प्रसंग टाळण्याचा मी दृढ निश्चय करतो. आमेन.
त्यानंतर धर्मगुरू पापमुक्तीची प्रार्थना म्हणतील.
प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला काही प्रार्थना म्हणायला सांगितले असेल, तर कृपया लगेच आपल्या जागेवर परत जाऊन त्या प्रार्थना म्हणा.
एवढेच! तुमच्या पापांना क्षमा मिळाली आहे!
वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण – 7 घोर पापे
गर्व: “गर्व म्हणजे स्वतःविषयीचे खोटे मत, म्हणजे आपण प्रत्यक्षात जसे नाही तसे आहोत अशी चुकीची समजूत.” माझ्या विचारांत, बोलण्यात किंवा वागण्यात श्रेष्ठत्वाची भावना दिसते का? मी इतरांना कमी लेखतो का? माझ्या वागण्यात किंवा वावरण्यात इतरांना दुखावणारा ताठा असतो का? मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो का? मला मान मिळालाच पाहिजे असा मी आग्रह धरतो का? नेहमी पहिला क्रमांक माझाच असावा असे मला वाटते का? मी इतरांचा सल्ला घेतो का? सल्ला स्वीकारण्याची माझी तयारी असते का? मी कोणत्याही प्रकारे इतरांवर दादागिरी करतो का? इतरांवर हुकूम गाजवण्याकडे माझा कल असतो का? मी इतरांबद्दल वाईट बोलतो का? मी इतरांबद्दल खोटे बोललो आहे का? मी इतरांचे दोष लोकांसमोर उघड करतो का? स्वतःची सबब सांगून मी दोष इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न करतो का? अशी कोणी व्यक्ती आहे का जिच्याशी बोलण्यास मी नकार देतो? अशी कोणी व्यक्ती आहे का जिच्याशी मी बराच काळ बोललो नाही? वाद घालण्याकडे माझा कल असतो का? वाद घालताना मी इतरांना दुखावेल असे बोलतो का? वाद घालताना ‘मलाच सगळे माहीत आहे’ असा आव मी आणतो का? इतरांना मी कसा दिसतो किंवा माझ्याबद्दल ते काय विचार करतात, याची मला फार काळजी वाटते का? मी संवेदनशील आहे का? मी सहज दुखावतो का?
मत्सर: “आपल्या शेजाऱ्याचे भले झाले म्हणून आपल्याला जे दुःख वाटते, तो मत्सर.” इतरांची भरभराट पाहून मला वाईट वाटते का? त्यांना खेळांत यश मिळाले तर? मैदानी क्रीडाप्रकारांत यश मिळाले तर? त्यांच्या अपयशाने मला आनंद होतो का? मला इतरांच्या संपत्तीचा हेवा वाटतो का?
आळस: “आळस हा भित्रेपणाचा आणि तिटकाऱ्याचा एक प्रकार आहे. त्यापायी आपण स्वतःला शिस्त लावण्याऐवजी आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो आणि ती पार पाडत नाही.” विश्रांतीची हद्दीपलीकडची आवड असल्यामुळे मी माझ्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो का? मी आळशीपणे वागतो का? मला आरामाची फारच आवड आहे का? प्रार्थनेला प्रतिसाद देताना मी आळसटपणे बसतो किंवा उभा राहतो का? गुडघे टेकताना मी ढिलाई करतो का? मला निरर्थक गप्पांमध्ये रमायला आवडते का? देवाच्या सेवेत माझा उत्साह कमी पडतो का?
कामवासना: “पावित्र्याच्या विरुद्ध असलेल्या सुखांची आसक्ती म्हणजे कामवासना.” मी अशुद्ध गोष्टींची इच्छा केली आहे का किंवा तशी काही कृत्ये केली आहेत का? अशुद्ध विचार किंवा इच्छा मनात घोळवत राहण्यात मला आनंद वाटला आहे का? मी अश्लील साहित्य वाचले आहे का, अश्लील शब्द असलेली गाणी ऐकली आहेत का किंवा छायाचित्रांत, दूरचित्रवाणीवर, चित्रपटांत किंवा इंटरनेटवर अश्लील दृश्ये पाहिली आहेत का? अशुद्ध हेतूने चुंबन, आलिंगन किंवा स्पर्श करून मी स्वतःमध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीमध्ये लैंगिक इच्छा जागवली आहे का? मी एकांतात अशुद्ध कृत्य केले आहे का, म्हणजेच हस्तमैथुन केले आहे का? माझा पोशाख अमर्याद असतो का, किंवा मी कसा दिसतो याची मला अति चिंता असते का? मी अश्लील भाषा वापरतो का, किंवा अश्लील विनोद किंवा गोष्टी सांगतो किंवा ऐकतो का? निदान कल्पनेत तरी मी व्यभिचाराच्या इच्छेला बळी पडलो आहे का?
लोभ: “या जगातील धनसंपत्तीची अयोग्य आसक्ती म्हणजे लोभ.” मी माझ्या पैशाचा योग्य वापर करतो की स्वार्थीपणे वापर करतो? इतरांप्रती न्यायाने पार पाडायला हवीत ती कर्तव्ये मी पार पाडतो का? चर्चप्रती न्यायाने पार पाडायला हवीत ती कर्तव्ये मी पार पाडतो का?
खादाडपणा: “खाण्यापिण्याची अयोग्य आसक्ती म्हणजे खादाडपणा.” मी जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो? मी प्रमाणाबाहेर मद्य पितो का? मी नशा होईपर्यंत मद्य पितो का? डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा मी गैरवापर करतो का? मी बेकायदेशीर अमली पदार्थ घेतो का? मी स्वतःला मद्याच्या, अमली पदार्थांच्या किंवा दोन्हींच्या आहारी जाऊ दिले आहे का?
राग: “जे आपल्याला दुखावते किंवा अप्रिय वाटते, ते आवेशाने झिडकारायला लावणारी मनाची भावना.” मला लवकर राग येतो का? जवळजवळ कोणत्याही क्षुल्लक गोष्टीने माझा पारा चढतो का? लोक ज्याला ‘चिडका’ म्हणतात, तसा माझा स्वभाव आहे का? रागाची पहिली चाहूल लागताच त्याला आवर घालण्यात मी कमी पडतो का? सर्वांशी जुळवून घेण्यात मी कमी पडतो का? झालेला अपमान किंवा मनाला लागलेली गोष्ट मी मनात घोळवत ठेवतो का? काही घडले नसतानाही माझा अपमान झाला असे गृहीत धरतो का? इतरांवर संकट आले की मला आनंद होतो का? सूड कसा घ्यावा, ‘हिशेब कसा चुकता करावा’, याचा मी विचार करतो का? वाद घालण्याची माझी वृत्ती आहे का? प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची मला सवय आहे का? व्यक्ती, ठिकाणे किंवा गोष्टी यांची मी खिल्ली उडवतो का? माझ्याशी जुळवून घेणे इतरांना कठीण जाते का? मी मनात आकस धरून ठेवतो का किंवा कोणाशी अबोला धरतो का? मी इतरांच्या दोषांबद्दल बोलतो का? मी इतरांच्या चुका किंवा उणिवा उघड करतो का? मी इतरांचे दोष चुकीच्या हेतूने उघड करतो का?
