
वंदनीय पॉलिन मारी जारिको यांची प्रार्थना
माझी आशा येशूमध्ये आहे, क्रूस हाच माझा एकमेव ठेवा आहे… मी सर्वकाळ प्रभूचा धन्यवाद करीन आणि त्याची स्तुती सदैव माझ्या मुखी असेल. माझ्या देवाच्या इच्छेपुढे मी भक्तिभावाने नतमस्तक होते.
हे देवाच्या प्रिय आणि प्रेम करण्याजोग्या इच्छे, तू माझी सारी ऐहिक संपत्ती, प्रतिष्ठा, मान, आरोग्य आणि प्राणही हिरावून घेतलेस, तरी मला त्याचे काय? तू मला अपमानाच्या गर्तेत उतरवलेस, तरी मला त्याचे काय? तुझ्या स्वर्गीय प्रेमाची गुप्त ज्वाला मला सापडली, तर या साऱ्याचे काय? तुझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच तुझ्या इतर जीवांसाठी मला मरता आले, तर मला किती आनंद होईल!
हे येशू, याजक आणि यज्ञबळी, माझ्या जीवनाचे बलिदान आणि मी वाहत असलेला क्रूस, माझ्यासाठी सांडलेल्या तुझ्या रक्ताशी मी एकरूप करते. तुझ्या जखमांत मी आश्रय घेते आणि मला लागणारे सर्व बळ तुझ्याकडूनच मिळेल अशी आशा ठेवते. हे प्रभू, माझे हृदय तयार आहे, माझे हृदय तयार आहे. तुझा अधिकाधिक गौरव व्हावा म्हणूनच मला सर्व काही करायचे आहे. तो अंतिम क्षण येईल तेव्हा मी माझ्या स्वतःच्या बळावर नव्हे, तर तुझ्या बळावर विसंबून राहीन. मी माझी आशा तुझ्या दयेवर ठेवली आहे. माझ्या मृत्यूसमयी मी ज्या कोणाची देणेकरी असेन, त्या सर्वांना मी तुझ्या हाती सोपवते. त्यांच्यासाठी माझे जीवन आणि रक्त अर्पण केल्यावर, माझ्या मृत्यूनंतर माझ्या मित्रांनी माझी देणी फेडावीत, अशी मी तुला विनंती करते.
आमेन.
