
हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दयावर्षासाठी पोप फ्रान्सिस यांची प्रार्थना
हे प्रभू येशू ख्रिस्ता, स्वर्गीय पित्याप्रमाणे दयाळू व्हायला तू आम्हाला शिकवलेस आणि जो तुला पाहतो तो पित्याला पाहतो, असे तू आम्हाला सांगितलेस. आम्हाला तुझे मुख दाखव, म्हणजे आमचे तारण होईल.
तुझ्या प्रेमळ नजरेने जक्कय आणि मत्तय यांना पैशाच्या गुलामगिरीतून मुक्त केले;
व्यभिचारिणीला आणि मग्दालेनाला केवळ सृष्टीतील वस्तूंमध्ये सुख शोधण्यापासून मुक्त केले;
पेत्राने तुझ्याशी द्रोह केल्यानंतर त्याला रडायला लावले,
आणि पश्चात्ताप केलेल्या चोराला नंदनवनाची खात्री दिली.
शोमरोनी स्त्रीला तू जे शब्द बोललास, ते आमच्यापैकी प्रत्येकाला उद्देशून बोलले आहेत असे समजून ते आम्हाला ऐकू दे: “देवाची देणगी तुला माहीत असती तर!”
तू अदृश्य पित्याचे दृश्य मुख आहेस. तो देव आपले सामर्थ्य विशेषतः क्षमा आणि दया यांतून प्रकट करतो. हे पुनरुत्थित आणि गौरवप्राप्त प्रभू, तुझे चर्च जगात तुझे दृश्य मुख होऊ दे.
अज्ञानात आणि चुकीच्या मार्गावर असलेल्यांविषयी तुझ्या सेवकांना कळवळा वाटावा म्हणून त्यांनाही मानवी दुर्बलता लाभावी, अशी तुझी इच्छा होती. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला जाणवू दे की देव त्याचा शोध घेतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला क्षमा करतो.
तुझा पवित्र आत्मा पाठव आणि त्याच्या अभिषेकाने आम्हा प्रत्येकाला पवित्र कर, जेणेकरून दयेचे हे जुबिली वर्ष प्रभूकडून मिळालेल्या कृपेचे वर्ष ठरेल आणि तुझे चर्च नव्या उत्साहाने गरिबांना सुवार्ता सांगेल, बंदिवानांना आणि पीडितांना मुक्तीची घोषणा करेल आणि अंधांना पुन्हा दृष्टी देईल.
हे पित्याबरोबर आणि पवित्र आत्म्याबरोबर युगानुयुगे जिवंत राहणाऱ्या आणि राज्य करणाऱ्या प्रभू, दयामाता मरियेच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे ही विनंती करतो.
आमेन.
हेही पाहा: दैवी दयेवरील दैनिक चिंतने