मराठी

सेवकाचे समर्पण

माझा सेवक हो,
  आणि मी तुला मार्गदर्शन करीन.
माझ्या प्रेरणांकडे लक्ष दे,
  आणि मी तुला मार्ग दाखवीन.
इतरांच्या बोलण्यात माझा स्वर ओळख
  आणि त्यातून मी काय सुचवतो ते जाणून घे.
मी बोलतो तेव्हा माझे ऐक.
मी तुला मार्गदर्शन करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे.

मी तुला मार्गदर्शन करत असताना कोणत्या भीतीला महत्त्व द्यावे?
मी दाखवलेल्या वाटेबद्दल तुला कसली चिंता असावी?

मला शरण ये,
  आणि मी तुला मार्ग दाखवीन.
माझ्याकडे वळ,
  आणि तुझी भीती कमी होईल.
माझ्याकडे ये
  आणि माझ्या कृपेत आनंद मान.
माझ्याकडे दृष्टी लाव
  आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे सापडतील.

तू माझ्या अधीन होण्याची मी वाट पाहतो.
तू स्वतःला माझ्या स्वाधीन करावे, अशी मला उत्कंठा आहे.
असे कर,
  म्हणजे तुझ्यासाठीचा माझा संकल्प पूर्ण होताना मला आनंद होईल.
त्यातून जे घडेल त्याचा आनंद घे
  आणि त्याच्या फळांतून आशीर्वाद प्राप्त कर.

कोणत्या विलंबाकडे तू लक्ष द्यावे?
माझ्या कृपेशिवाय दुसरे कोणते ध्येय किंवा स्वप्न आहे?

माझ्याकडे वळ
  आणि तुझी वाट पाहत असलेल्या देणग्यांचा स्वीकार कर.
तुझे ध्येय माझ्या हाती सोपव
  आणि तुझे अंतःकरण शांतीने भरून जाऊ दे.

माझ्या शांतीने तुला भरून टाकावे, तुझ्यात बदल घडवावा, तुला उभारी द्यावी
  आणि तुझे हृदय माझ्यासाठी खुले करावे.
माझ्या शांतीने तुझ्या जखमा भरून याव्यात
  आणि तुला दररोज दिलासा मिळावा.
माझ्या शांतीने तुझे अंधत्व दूर होऊन तुझे डोळे उघडावेत
  आणि तुझ्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश पडावा.
तुझ्यासाठीचा माझा संकल्प स्वीकार
  आणि मी तुला प्रकाश देईन, असा माझ्यावर विश्वास ठेव.
माझा सेवक हो,
  आणि तुला माझी ओळख होईल.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका