ईस्टरच्या दुसऱ्या आठवड्यातील सोमवार
“आमेन, आमेन, मी तुला सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.” योहान 3:5
तुम्हाला नवा जन्म मिळाला आहे का? अनेक सुवार्तावादी ख्रिस्ती हा प्रश्न नेहमी विचारतात. पण आपणही स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा. मग, तुम्हाला नवा जन्म मिळाला आहे का? आणि त्याचा नेमका अर्थ काय?
आपल्यापैकी प्रत्येक जण या प्रश्नाला मनापासून “होय!” असे उत्तर देईल, अशी आशा आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला नवा जन्म मिळणे आवश्यक आहे, असे पवित्र शास्त्र स्पष्ट सांगते. आपल्यातील जुना मनुष्य मरण पावला पाहिजे आणि नव्या मनुष्याचा जन्म झाला पाहिजे. ख्रिस्ती होणे म्हणजे हेच. आपण ख्रिस्तामध्ये नवे जीवन स्वीकारतो.
पाणी आणि पवित्र आत्मा यांच्याद्वारे आपल्याला नवा जन्म मिळतो. हे बाप्तिस्म्यात घडते. बाप्तिस्मा घेताना आपण पाण्यात उतरतो आणि ख्रिस्ताबरोबर मरतो. पाण्यातून वर येताना आपल्याला ख्रिस्तामध्ये नवा जन्म मिळतो. म्हणजेच, बाप्तिस्मा आपल्यामध्ये खरोखरच अद्भुत कार्य करतो. बाप्तिस्म्यामुळे आपल्याला दत्तक संतती म्हणून परमपवित्र त्रैक्याच्या जीवनातच सहभागी करून घेतले जाते. आपल्यापैकी बहुतेकांचा बाप्तिस्मा आपण तान्ही बालके असतानाच झाला. त्याचा आपण फारसा विचार करत नाही. पण तो करायला हवा.
बाप्तिस्मा हा असा संस्कार आहे, ज्याचा परिणाम आपल्या जीवनात सतत घडत राहतो आणि अनंतकाळ टिकतो. तो आपल्या आत्म्यावर अमिट आध्यात्मिक मुद्रा उमटवतो. ही “मुद्रा” आपल्या जीवनातील कृपेचा अखंड झरा आहे. ती कधीही न आटणाऱ्या कृपेच्या विहिरीसारखी आहे. आपल्याला ज्या प्रतिष्ठेला साजेसे जीवन जगण्यास बोलावले आहे, त्यासाठी या विहिरीतून आपल्याला सतत पोषण आणि नवे बळ मिळते. आपल्या स्वर्गीय पित्याची मुले म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेली कृपा आपल्याला याच विहिरीतून मिळते.
आज आपल्या स्वतःच्या बाप्तिस्म्यावर चिंतन करा. विशेषतः इस्टरच्या काळात आपल्याला या संस्काराचे नूतनीकरण करण्याचे आवाहन केले जाते. त्यासाठी पवित्र पाण्याचा वापर करणे हा एक चांगला मार्ग आहे. पुढच्या वेळी चर्चमध्ये जाल, तेव्हा पवित्र पाण्याने कपाळावर क्रुसाचे चिन्ह करा आणि आपल्या बाप्तिस्म्याचे तसेच या संस्कारातून आपल्याला मिळालेल्या प्रतिष्ठेचे व कृपेचे जाणीवपूर्वक स्मरण करा. बाप्तिस्म्याने तुम्हाला नवी सृष्टी बनवले आहे. या इस्टरच्या काळात तुम्हाला लाभलेले हे नवे जीवन समजून घेण्याचा आणि ते जगण्याचा प्रयत्न करा.
हे स्वर्गीय पित्या, आज मी माझ्या बाप्तिस्म्याचे नूतनीकरण करतो. मी पापाचा कायमचा त्याग करतो आणि तुझा पुत्र ख्रिस्त येशू याच्यावरील माझी श्रद्धा जाहीर करतो. ज्या प्रतिष्ठेला साजेसे जीवन जगण्यास तू मला बोलावले आहेस, तसे जगण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याच्या कार्याचे परिणाम
ईस्टरच्या दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार
येशू निकोदेमाला म्हणाला: “‘तुम्हाला वरून जन्म मिळाला पाहिजे.’ वारा त्याला वाटेल तिथे वाहतो. त्याचा आवाज तुला ऐकू येतो, पण तो कुठून येतो आणि कुठे जातो, हे तुला माहीत नसते. आत्म्यापासून जन्मलेल्या प्रत्येकाचे असेच आहे.” योहान 3:7-8
तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याची उपस्थिती तुम्हाला जाणवते का? या उताऱ्यात येशू पवित्र आत्मा आपल्यामध्ये कसे कार्य करतो, हे एका उदाहरणातून दाखवतो. तो पवित्र आत्म्याची तुलना वाऱ्याशी करतो. वारा वाहताना आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतो, पण वारा दिसत नाही. मात्र त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ, एखादे झाड हेलकावताना दिसले की वारा वाहत आहे हे आपल्याला कळते.
आपल्या जीवनातील पवित्र आत्म्याच्या बाबतीतही असेच आहे. पवित्र आत्मा कोठून येतो हे आपल्या इंद्रियांना जाणवणार नाही, पण त्याच्या कार्याचे परिणाम आपल्याला दिसू शकतात. आपल्यात नवे बळ जाणवते, सद्गुण वाढताना दिसतात किंवा क्षमा करणे जमू लागते, तेव्हा पवित्र आत्मा आपल्यात उपस्थित आहे, आपल्याला पुढे नेत आहे, आपले रूपांतर करीत आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, हे आपल्याला उमगते.
शिवाय, वारा आपल्याजवळून वाहून गेल्यावर कुठे जातो, हे आपल्याला माहीत नसते. पवित्र आत्म्याच्या बाबतीतही असेच आहे. आपले जीवन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली आणि त्याच्या देखरेखीखाली असेल, तर तो आपल्याला कुठे नेईल, हे आपल्याला माहीत नसते. पवित्र आत्मा त्या त्या क्षणी आपल्याला मार्ग दाखवतो, पण सहसा आपले संपूर्ण भविष्य उलगडून दाखवत नाही. देवाच्या रोजच्या सौम्य उपस्थितीत तो दाखवतो त्या मार्गाने जाण्यात आपण समाधानी असले पाहिजे आणि तो नेईल तिकडे जाऊ दिले पाहिजे. यासाठी गाढ विश्वास आणि पूर्ण आत्मसमर्पण आवश्यक आहे.
आज तुमच्या जीवनातील पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यशाली उपस्थितीचे चिंतन करा. देव खरोखरच तुम्हाला मार्ग दाखवत आहे की नाही, हे ओळखण्यासाठी पवित्र आत्म्याच्या कार्याची फळे पाहा. देवाच्या श्वासाला तुम्हाला मार्ग दाखवू द्या आणि पुढे नेऊ द्या; तुमच्या जीवनात मोठ्या गोष्टी घडतील अशी आशा बाळगा.
हे पवित्र आत्म्या, ये. माझ्या बाप्तिस्म्याची कृपा माझ्यात नव्याने जागव आणि तुझ्या दैवी इच्छेनुसार मला दररोज मार्ग दाखव. तुझ्या गौरवशाली काळजीवर मी स्वतःला पूर्णपणे सोपवतो आणि माझ्या जीवनातील तुझ्या उपस्थितीतून मिळणाऱ्या प्रेरणांवर विश्वास ठेवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
तुम्ही कशाला प्राधान्य देता?
ईस्टरच्या दुसऱ्या आठवड्यातील बुधवार
आणि न्यायाचा निर्णय हा आहे: प्रकाश जगात आला, पण लोकांनी प्रकाशापेक्षा अंधार पसंत केला, कारण त्यांची कृत्ये वाईट होती. योहान 3:19
हे किती विचित्र आहे, आणि तरीही किती खरे आहे! देव पित्याने पुत्राला आपल्या सर्वांसाठी प्रकाश होण्याकरिता जगात पाठवले. सर्व अंधार दूर करणारा प्रकाश तोच आहे. पण वरील शुभवर्तमानानुसार, “लोकांनी प्रकाशापेक्षा अंधार पसंत केला.” पापातून मुक्त होण्यापेक्षा त्यांनी स्वतःची पापेच पसंत केली. असे का?
याचे उदाहरण पाहायचे असेल तर बातम्या पाहा किंवा वर्तमानपत्र वाचा. वृत्तमाध्यमांत जे काही दाखवले किंवा सांगितले जाते, त्यापैकी ९० टक्के भाग म्हणजे अंधाराचे सनसनाटी चित्रण आहे, असे वाटते. एकामागून एक खून किंवा एकामागून एक घोटाळे यांच्याच बातम्या आपल्या कानावर पडतात. माध्यमे यावर इतका भर का देतात? कारण अशाच बातम्यांना खप असतो. आणि त्यांना खप का असतो? कारण आपल्यालाही अनेकदा प्रकाशापेक्षा अंधाराचेच अधिक आकर्षण वाटते.
अर्थात, प्रत्येकाच्या बाबतीत असे नसते. जगातल्या अंधारात आणि आपल्या भोवताली घडणाऱ्या, सनसनाटी ठरणाऱ्या पापकृत्यांत अनेकांना काहीच रस नसतो. पण दुष्टतेचा अंधार सतत इतका ठळकपणे आपल्या नजरेसमोर असतो, ही गोष्ट आपल्या पतित मानवी स्वभावाबद्दल आपल्याला सावध करणारी आहे. आपण चिखलाकडे ओढले जातो आणि बरेचदा त्यातच अगदी रमून जातो.
आपल्याला कशाची ओढ वाटते, हे तपासून पाहण्याचा हा ईस्टरचा काळ आहे. तुम्ही स्वतःला प्रकाशाकडे ओढले जाऊ देता का? तुमचा दिवस उजळून टाकणाऱ्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करतात का? तुमच्या सभोवतालच्या जगात देव अनेक प्रकारे उपस्थित आहे आणि कार्य करतो; त्या साऱ्याची तुम्हाला ओढ वाटते का? तशी ओढ तुम्हाला वाटत असेल, अशी आशा आहे. पण अव्यवस्था, पाप आणि अंधार यांचीही थोडीफार ओढ तुम्हाला असण्याची शक्यता आहे. असा आंतरिक संघर्ष प्रत्येकालाच जाणवू शकतो. त्याची जाणीव ठेवणे, तो आपल्या पतित मानवी प्रवृत्तीचा भाग आहे हे ओळखणे आणि आपल्या भोवतालच्या गोंधळात व दुष्टतेत जो काही रस वाटतो तो सोडून देण्याचा प्रयत्न करणे, हे चांगले आहे.
ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपली नजर त्याच्यावर आणि केवळ त्याच्यावरच खिळवून ठेवण्याचे आवाहन आपल्याला आहे. आपल्या श्रद्धेने अंधार भेदण्याचे आणि आपल्या संपूर्ण अस्तित्वाला ख्रिस्त येशूकडे आकृष्ट होऊ देण्याचे आवाहन आपल्याला आहे. परिपूर्णता म्हणजे आपल्या प्रबळ भावना आणि इच्छादेखील अखेरीस आपल्या जीवनाचा प्रकाश असलेल्या ख्रिस्ताकडे ओढल्या जाणे.
आज चिंतन करा: तुम्हाला सर्वांत जास्त ओढ कशाची वाटते? या ईस्टर काळात स्वतःला प्रकाशाला समर्पित करा. आपल्या भोवतालच्या दुष्टतेच्या मोहात पडून तिच्यात गुंतण्याऐवजी, जिवंत असलेल्या आणि आपल्या सभोवताली कार्य करणाऱ्या पुनरुत्थित प्रभूकडे आनंदाने पाहा. हा प्रकाश तुमच्या दैनंदिन जीवनाला दिशा देवो.
हे प्रभू, मला प्रकाशात जगण्यास मदत कर. माझी दृष्टी तुझ्या पुनरुत्थानाच्या गौरवावर स्थिर राहू दे. तुझा गौरव पाहण्यातून मिळणारा आनंद माझ्या सभोवतालच्या, लक्ष विचलित करणाऱ्या असंख्य वाईट गोष्टींपासून मला दूर ठेवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याचे दान मोजून दिले जात नाही
ईस्टरच्या दुसऱ्या आठवड्यातील गुरुवार
तो आत्म्याचे दान मोजून देत नाही. योहान 3:34
युद्धकाळात सैनिकांकडे अन्नाचा साठा कमी असतो, तेव्हा त्यांना तो पुरवून वापरावा लागतो. अन्न शक्य तितके दिवस टिकावे म्हणून ते दररोज मोजून थोडेच खातात. तसे केले नाही तर त्यांचे अन्न संपून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
देव आणि त्याची कृपा यांच्याही बाबतीत असेच असते तर? पवित्र आत्म्याने आपल्याला असे म्हटले तर, “आता मी तुम्हाला ठरावीक मर्यादेपर्यंतच मदत करणार आहे. मी तुम्हाला देत असलेली कृपा एकदा संपली की मग तुमचे तुम्हालाच पाहावे लागेल.” अरे बापरे! मग तर आपली अडचणच होईल.
पण आनंदाची बातमी अशी आहे की देव आपल्याशी याच्या अगदी उलट वागतो. तो आपल्यावर पवित्र आत्म्याचा पूर्ण वर्षाव करण्यास कटिबद्ध आहे. आपल्याला कधीही लागेल किंवा हवी असेल, तेवढी सर्व कृपा तो देऊ करतो. अडचण अशी आहे की तरीही आपण अनेकदा त्याची कृपा ‘मोजूनच’ स्वीकारतो. देवाला मर्यादा आहेत असे आपल्याला वाटते म्हणून आपण असे करत नाही. उलट, देवाला आपल्या जीवनात त्याचे सर्वसामर्थ्य प्रकट करू देण्याची आपल्याला भीती वाटते, म्हणून आपण अनेकदा असे करतो.
आज यावर चिंतन करा: देवाला तुमच्या जीवनात त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू दिले, तर तुमचे जीवन कसे असेल? काय बदलेल? तुमचे दैनंदिन जीवन, तुमची नाती, तुमचे बोलणे, तुमच्या कृती आणि तुमचे भविष्य कसे वेगळे असेल? प्रत्येक बाबतीत देवाच्या इच्छेचा पूर्णपणे स्वीकार करणे योग्य आहे, हे आपल्याला बुद्धीने पटते. पण प्रत्यक्षात तसे करण्याची वेळ येते, तेव्हा आपण अनेकदा खूप कचरतो. पुढे काय होईल हे माहीत नसल्याची भीती त्यामागे असू शकते. किंवा बदलण्याची आपली पूर्ण तयारी नसेल. कारण काहीही असो, पवित्र आत्म्याचा पूर्ण वर्षाव करून देव तुम्हाला अमर्याद कृपा देऊ करतो. ती मोजून स्वीकारायची की नाही, हे तुमच्या हातात आहे.
हे प्रभू, माझ्या जीवनात तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडू द्यावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुझ्या कृपेत मला पूर्णपणे बुडून जायचे आहे. त्यातून पुढे काहीही घडले, तरी तुला “हो” म्हणण्यास मला मदत कर. असा गौरवशाली “हो” म्हणण्यास तू मला बोलावत आहेस; तो विश्वासाने म्हणण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
श्रद्धेची परीक्षा
पुनरुत्थानकाळातील दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवार
येशूने वर पाहिले, तेव्हा लोकांचा मोठा जमाव आपल्याकडे येत असल्याचे त्याला दिसले. तो फिलिपला म्हणाला, “या लोकांना खायला पुरेल इतके अन्न आपण कुठून विकत आणायचे?” फिलिपची परीक्षा पाहण्यासाठी त्याने असे विचारले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला स्वतःला माहीत होते. योहान 6:5-6
आपण काय करणार आहोत हे देवाला नेहमी माहीत असते. आपल्या जीवनासाठी त्याच्याकडे नेहमीच एक परिपूर्ण योजना असते. अगदी नेहमीच. वरच्या उताऱ्यात भाकरी आणि मासे वाढवण्याच्या चमत्काराचा एक छोटासा भाग आपण वाचतो. आपल्याजवळ असलेल्या थोड्याशा भाकरी आणि मासे वाढवून आपण पाच हजारांहून अधिक लोकांना जेवू घालणार आहोत, हे येशूला माहीत होते. पण ते करण्याआधी त्याला फिलिपची परीक्षा घ्यायची होती, आणि त्याने ती घेतली. येशू फिलिपची परीक्षा का घेतो? आणि तो आपलीही परीक्षा कधीकधी का घेतो?
फिलिप काय उत्तर देईल याची उत्सुकता येशूला होती, असे नाही. आणि तो फिलिपची गंमत करत होता, असेही नाही. उलट, फिलिपला आपली श्रद्धा व्यक्त करता यावी म्हणून येशू या प्रसंगाचा उपयोग करतो. त्यामुळे ही “परीक्षा” खरे तर फिलिपसाठी एक देणगी होती, कारण तिच्यामुळे त्याला परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी मिळाली.
या परीक्षेचा हेतू असा होता की फिलिपने केवळ मानवी तर्कावर अवलंबून न राहता श्रद्धेच्या भरवशावर कृती करावी. तर्कशुद्ध विचार करणे नक्कीच चांगले आहे. पण अनेकदा देवाचे शहाणपण मानवी तर्काच्या पलीकडे जाते. म्हणजे, ते तर्काला एक नवी उंची देते: विचार करताना देवावरील श्रद्धेलाही स्थान मिळते.
त्या क्षणी, देवाचा पुत्र आपल्याबरोबर आहे हे लक्षात घेऊन काही उपाय सुचवण्याची संधी फिलिपला दिली जात होती. पण तो परीक्षेत नापास होतो. एवढ्या जमावाला खाऊ घालायला दोनशे दिवसांची मजुरीही पुरणार नाही, असे तो सांगतो. पण आंद्रे काही प्रमाणात मदतीला येतो. एका मुलाजवळ थोड्या भाकरी आणि काही मासे आहेत, असे तो सांगतो. पण दुर्दैवाने तो पुढे म्हणतो, “पण एवढ्या लोकांना त्यांचा काय उपयोग?”
तरीही आंद्रेच्या श्रद्धेची ही छोटीशी ठिणगी येशूला पुरेशी ठरते. तो लोकांना बसायला सांगतो आणि अन्न वाढवण्याचा चमत्कार करतो. त्या थोड्याशा भाकरी आणि माशांबद्दल येशूला सांगणे महत्त्वाचे आहे, एवढी तरी जाणीव आंद्रेला झाली असावी. आंद्रेने दाखवलेली ही थोडीशी श्रद्धा येशू स्वीकारतो आणि बाकी सर्व सांभाळतो.
आज चिंतन करा की अगदी थोडीशी श्रद्धाही किती मौल्यवान देणगी आहे. अनेकदा आपण अशा कठीण परिस्थितीत सापडतो की काय करावे ते आपल्याला कळत नाही. निदान थोडी तरी श्रद्धा ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे त्या श्रद्धेच्या आधाराने येशूला आपल्या जीवनात कार्य करता येईल. त्याला काय करायचे आहे याचे संपूर्ण चित्र कदाचित आपल्याला दिसणार नाही, पण देव आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे याची निदान थोडी तरी चाहूल आपल्याला लागली पाहिजे. निदान एवढीशी श्रद्धा तरी आपल्याला दाखवता आली, तर आपणही या कसोटीत उतरू.
हे प्रभू, माझ्या जीवनासाठी असलेल्या तुझ्या परिपूर्ण योजनेवर श्रद्धा ठेवण्यास मला मदत कर. जीवन हाताबाहेर गेल्यासारखे वाटते, तेव्हाही सर्व काही तुझ्या हातात आहे, हे मला उमजू दे. अशा क्षणी मी दाखवलेली श्रद्धा तुझ्यासाठी एक अर्पण ठरो, जे तुला तुझ्या गौरवासाठी वापरता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
रोजच्या भीतीवर मात
पुनरुत्थानकाळातील दुसऱ्या आठवड्याचा शनिवार
ते वल्हवत सुमारे तीन-चार मैल गेले होते, तेव्हा येशू समुद्रावरून चालत नावेजवळ येताना त्यांना दिसला, आणि ते घाबरले. पण तो त्यांना म्हणाला, “मीच आहे. भिऊ नका.” योहान 6:19-20
हे अगदी ओळखीचे शब्द पुन्हा एकदा उच्चारले गेले: “भिऊ नका.”
या प्रसंगाची परिस्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. अंधार पडला आहे आणि प्रेषित समुद्रात आहेत. अंधारात भर समुद्रात जाण्याचा अनुभव तुम्हाला कधी आला असेल, तर ते किती भयावह वाटू शकते हे तुम्हाला कळेल. किनारा दिसत नाही आणि चहूकडे जणू काहीच नाही असे वाटते. आपण कुठे आहोत याचा काहीच अंदाज नसल्यासारखे, जणू वाट चुकल्यासारखे, प्रेषितांना वाटले असेल.
पण अशा परिस्थितीत येशू चालत त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, “मीच आहे. भिऊ नका.” या शब्दांनी त्यांना किती दिलासा मिळाला असेल!
प्रेषितांच्या या अनुभवात अनेकांच्या दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला दिसले पाहिजे. अनेकांना असे वाटू शकते की आपल्या भोवती जणू काहीच नाही, आपण एकटे आहोत आणि आपली वाट हरवली आहे. काहींना ही भावना फार तीव्रतेने जाणवत नसेल; पण कमी-अधिक प्रमाणात अनेकांना हा अनुभव वारंवार येतो.
शुभवर्तमानातील हा उतारा आपल्याला दाखवून देतो की आपण कुठेही असलो किंवा कोणत्याही परिस्थितीत सापडलो, तरी येशू आपल्याकडे येतो. आपण त्याला शोधत त्याच्याकडे यावे म्हणून तो वाट पाहत बसत नाही. उलट, आपण जिथे आहोत तिथेच तो आपल्या जीवनात येतो.
अंधारात समुद्रात सापडल्यासारखा हा अनुभव अनेक प्रकारे येऊ शकतो. कदाचित तुमचे जीवन धावपळीने भरलेले असेल, तरीही तुम्हाला एकटे वाटत असेल. कदाचित तुमच्या आसपास फारशी माणसे नसतील आणि तुम्हाला सतत एकाकीपणा जाणवत असेल. किंवा कदाचित आतून तुम्ही खूप झगडत असाल, पण वरवर हसतमुख राहून सगळे काही सुरळीत आहे असे दाखवत असाल. परिस्थिती कोणतीही असो, येशूला तुमच्याकडे येऊन तुमचे सांत्वन करायचे आहे.
आज येशूच्या या शब्दांवर मनन करा. “मीच आहे,” असे तो तुम्हाला म्हणतो, ते ऐका. हे शब्द ऐकताना त्याच्याकडे वळा आणि त्याची उपस्थिती ओळखा. अंधारलेला समुद्र आपल्याला चारही बाजूंनी वेढून आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर त्या समुद्रात त्याला येऊ द्या. “भिऊ नका,” असे तो म्हणतो, ते ऐका. जीवनात असे अनेक प्रसंग येतात की आपल्याला भीती वाटू शकते. कितीतरी वेळा भीती आपल्याला ग्रासते. आपण फक्त आपले लक्ष येशूवर केंद्रित केले, तर आपल्या रोजच्या परिस्थितीची वाटणारी भीती नाहीशी होते. येशू अगदी आपल्या जवळ आहे, तो आपली काळजी घेतो आणि सर्व काही त्याच्या हाती आहे, म्हणून सर्व काही ठीक आहे, याची आपल्याला अंतःकरणात खोलवर जाणीव होते. त्याला तुमच्या हृदयाच्या नावेत येऊ द्या आणि नाव त्याच्या हाती सोपवा. तो तुमच्याकडे येत आहे आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.
हे प्रभू, माझ्या जीवनातील तुझी दैवी उपस्थिती कितीतरी वेळा माझ्या लक्षात येत नाही. तू माझ्याकडे येत आहेस, हेही अनेकदा मला दिसत नाही. तू नेहमी माझ्याजवळ असतोस, हे मला उमजू दे. हे प्रिय प्रभू, जीवनातील अनेक भीतींपासून मला मुक्त कर आणि माझ्या जीवनात तुझे पूर्ण मनाने स्वागत करण्याचे धैर्य मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मऊ बांधणीच्या पुस्तकाच्या स्वरूपात & ई-पुस्तक म्हणूनही उपलब्ध
