मराठी

सण आणि महासण

चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल – आणि इतर ठिकाणीही!

अनुक्रमणिका


सर्वस्वाचा त्याग

प्रेषित संत आंद्रेय यांचा सण, 30 नोव्हेंबर

येशू गालील समुद्राच्या किनाऱ्याने जात असताना त्याने दोन भाऊ पाहिले. पेत्र म्हणून ओळखला जाणारा सिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रे हे समुद्रात जाळे टाकत होते; ते मच्छीमार होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे मच्छीमार करीन.” त्यांनी लगेच आपली जाळी सोडली आणि ते त्याच्यामागे गेले. मत्तय 4:18–20

आज आपण संत आंद्रे प्रेषिताचा सण साजरा करतो. योहानच्या शुभवर्तमानानुसार, आंद्रे हा सुरुवातीला बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा शिष्य होता. योहानने “पाहा, देवाचे कोकरू!” (योहान 1:36) असे घोषित केले, तेव्हा आंद्रे तिथे होता. हे ऐकताच आंद्रे येशूकडे गेला आणि त्याने तो दिवस येशूबरोबर घालवला. थोड्याच वेळाने त्याने आपला भाऊ सिमोन याला सांगितले की त्यांना मशीहा सापडला आहे.

संत मत्तयच्या शुभवर्तमानातील वरील उताऱ्यात ही घटना थोड्या वेगळ्या रीतीने सांगितली आहे. आंद्रेची येशूशी झालेली पहिली भेट मत्तय सांगत नाही. त्याऐवजी, आंद्रेने सर्वस्व सोडून आपल्या भावाबरोबर प्रभूच्या मागे जाण्याचा पक्का निर्णय घेतला, त्या क्षणाकडे मत्तय आपले लक्ष वेधतो.

येशूने आंद्रेला कसे बोलावले, याचे मत्तयने केलेले वर्णन विशेष प्रेरणादायी आहे. योहानच्या शुभवर्तमानातील वृत्तांत आणि मत्तयचा वृत्तांत एकत्र वाचले, तर ज्याची इतके दिवस वाट पाहिली जात होती तो मशीहा येशूच आहे, अशी आंद्रे आणि पेत्र यांची लवकरच खात्री पटली असावी. ही खात्री पटल्यावरही त्यांनी मासेमारीचे काम चालू ठेवले. योहानच्या शुभवर्तमानात सांगितलेल्या येशूशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते मत्तयने वर्णन केलेल्या या निर्णायक क्षणापर्यंत या दोघा भावांमध्ये काय काय बोलणे झाले असेल, याची कल्पना करा. त्यांचे अंतःकरण आणि मन उत्साहाने व विस्मयाने भरून गेले असावे. त्यांचा विश्वास होता, पण तो अजून पूर्णत्वाला पोहोचला नव्हता. त्यांच्या मनात आशा होती, पण पुढे काय करावे हे त्यांना कळत नव्हते. मग येशू पुन्हा तिथून जाताना त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे मच्छीमार करीन.” ही साधीसुधी आज्ञा नव्हती; तरीही त्यांनी लगेच “आपली जाळी सोडली आणि ते त्याच्यामागे गेले.”

येशू आपल्या जीवनातही अशाच प्रकारे कार्य करतो. जेव्हा आपल्याला प्रथम त्याची ओळख होते आणि विश्वासाचे दान मिळते, तेव्हा तो कोण आहे यावर मनन करण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते. नव्याने ख्रिस्ती विश्वास स्वीकारलेली व्यक्ती अनेकदा आपल्या जीवनाचे अधिक बारकाईने परीक्षण करू लागते. कोणत्या पापांवर मात करायला हवी आणि नव्याने लाभलेला विश्वास आपल्याला पुढे कोणत्या दिशेने नेईल, याचा ती विचार करते. या मनपरिवर्तनाच्या सुरुवातीच्या काळात येशू आपल्याशी धीराने वागतो आणि नव्याने उमगलेल्या गोष्टींवर प्रार्थनापूर्वक मनन करण्यासाठी आपल्याला वेळ देतो. तरीही आपल्या प्रभूला आपल्याकडून नेहमीच अधिकाची अपेक्षा असते. आपण आपले सर्वस्व त्याला द्यावे, अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून त्या बदल्यात तो आपल्याला त्याहून कितीतरी अधिक देऊ शकेल.

आंद्रे आणि सिमोन यांच्या मनात विश्वास आहे हे येशूला कळल्यावर, त्याने त्यांना आपले जीवन आमूलाग्र बदलून त्याच्या मागे येण्यास बोलावले. त्यांनी आपले जुने जीवन मागे सोडावे, आपला व्यवसाय सोडावा, त्याच्यावर भरवसा ठेवावा आणि त्याच्या मागे यावे, असे त्याने त्यांना सांगितले. अंतःकरणात मिळालेल्या कृपेच्या दानामुळे आपल्याला काय करायचे आहे, हे त्या दोघांना उमगले. त्यांनी सर्व काही मागे सोडले आणि ते येशूच्या मागे गेले.

आपल्या प्रभूने तुम्हालाही असेच आमंत्रण दिले आहे, हे तुम्हाला ऐकू आले आहे का? असेल, तर आंद्रे आणि पेत्र यांनी दिला तसा प्रतिसाद तुम्ही दिला आहे का? असा प्रतिसाद दिल्याने तुमचे जीवन आमूलाग्र बदलेल. त्यासाठी मोठी जोखीम पत्करावी लागते, मोठा त्याग करावा लागतो आणि प्रभूवर दृढ भरवसा ठेवावा लागतो. पण आपल्या मागे येण्यास जो आपल्याला बोलावतो, तो देवाचा पुत्र, मशीहा आणि जगाचा तारणारा आहे, हे आपल्याला खरोखर उमगले, तर आपण कचरणार नाही.

येशू तुमच्याकडे पाहून “माझ्यामागे या” असे म्हणत आहे, यावर आज मनन करा. त्याच्या या आज्ञेत एक वचनही आहे: तुम्ही जे काही मागे सोडाल, त्याचे रूपांतर त्याहून कितीतरी मोठ्या गोष्टीत होईल—“मी तुम्हाला माणसे धरणारे मच्छीमार करीन.” तुम्ही अजूनही आपल्या जुन्या जीवनाचा त्याग करून आपले जीवन पूर्णपणे ख्रिस्ताला अर्पण केले नसेल, तर आपल्या प्रभूची हाक ऐका आणि न कचरता त्याला “हो” म्हणा. मग तुमचे जीवन पुन्हा पूर्वीसारखे राहणार नाही.

हे मला बोलावणाऱ्या प्रभू, जसे तू आंद्रे आणि सिमोन पेत्र यांना तुझ्यामागे येण्यास बोलावलेस, तसेच तू मलाही बोलावतोस. मला विश्वासाचे दान दे, म्हणजे तुला “हो” म्हणणे हेच मी करायला हवे, अशी माझ्या अंतःकरणात पक्की खात्री होईल. माझ्या स्वतःच्या इच्छेचा त्याग करायला आणि मी जे काही सोडावे अशी तुझी इच्छा आहे ते सारे सोडायला मला मदत कर, म्हणजे माझ्या संपूर्ण जीवनाची परिपूर्ती मला तुझ्यात लाभेल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


निष्कलंक देवमाता

मरियेच्या निष्कलंक गर्भधारणेचा महोत्सव, 8 डिसेंबर

देवाने गाब्रिएल देवदूताला गालीलमधील नाझरेथ नावाच्या नगरात एका कुमारिकेकडे पाठवले. दावीदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाशी तिचा विवाह ठरला होता. त्या कुमारिकेचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आला आणि म्हणाला, “हे कृपापूर्ण मरिये, तुला प्रणाम! प्रभू तुझ्याबरोबर आहे.” पण हे ऐकून ती फार अस्वस्थ झाली आणि हे कसले अभिवादन असावे, असा विचार करू लागली. लूक 1:26–29

धन्य कुमारी मरिया “कृपापूर्ण” होती! “पूर्ण” म्हणजे अगदी पूर्ण—कशाचीही उणीव नसलेली. कृपेच्या या परिपूर्णतेचा अर्थ असा की तिच्या ठायी प्रत्येक सद्गुण, विशेषतः नम्रता, परिपूर्ण होता. नम्रता म्हणजे सत्याच्या प्रकाशात स्वतःकडे पाहणे—स्वतःला आहोत त्याहून मोठेही न समजणे आणि कमीही न लेखणे. गाब्रिएल देवदूताच्या अभिवादनाला मरियेने दिलेल्या प्रतिसादात तिची नम्रता ठळकपणे दिसते—“हे ऐकून ती फार अस्वस्थ झाली” आणि त्या शब्दांवर तिने खोलवर मनन केले.

देवमाता अस्वस्थ का झाली असावी? “मी कृपापूर्ण आहे हे आपण ओळखले, त्याबद्दल धन्यवाद,” असे तिने आत्मविश्वासाने का म्हटले नाही? कारण आपण कृपापूर्ण आहोत ते आपल्या स्वतःच्या पुण्याईमुळे नव्हे, हे मरियेला माहीत होते. ही कृपेची परिपूर्णता तिच्या नैसर्गिक सामर्थ्याच्या पूर्णपणे पलीकडची होती; देवाने कृपापूर्वक स्वतःहून पुढाकार घेतल्याचे ते फळ होते. मरियेने आयुष्यभर स्वेच्छेने देवाच्या कृपेला प्रतिसाद दिला, आणि प्रत्येक देणगीचा उगम केवळ देवच आहे, हे तिला ठाऊक होते. म्हणून सुरुवातीला ती ‘अस्वस्थ झाली’ ती शंकेमुळे किंवा भीतीमुळे नव्हे, तर आपल्याला लाभलेले आकलनापलीकडचे आशीर्वाद पाहून तिच्या मनात आश्चर्य आणि आदरयुक्त विस्मय दाटून आला म्हणून. देवासमोर आपण किती लहान आणि अपात्र आहोत, याची तिला स्पष्ट जाणीव होती. याच गाढ नम्रतेमुळे ती सर्व सृष्टीत सर्वांत सुंदर ठरली.

आश्चर्याने भरलेले आणि चिंतनात रमलेले मरियेचे हृदय तिला निष्कलंक देवमाता बनवणारे ठरले; त्याचबरोबर ते परिपूर्ण शिष्यत्वाचा आदर्शही आपल्यापुढे ठेवते. तिच्यासारखे आपण कृपेने ‘परिपूर्ण’ नसलो, तरी दररोज आपल्याला कृपेच्या असंख्य देणग्या मिळतात. मरियेप्रमाणे आपणही या देणग्यांना नम्रतेने, आदरयुक्त विस्मयाने आणि कृतज्ञतेने प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आज धन्य कुमारी मरियेच्या निष्कलंक गर्भधारणेचा सन्मान करताना आपण स्मरतो की आदाम आणि हव्वा यांची निर्मिती मूळच्या निष्पाप अवस्थेत झाली होती; पण आज्ञाभंगामुळे त्यांनी कृपेची ती अवस्था गमावली. परिणामी, पतित स्वभाव मानवजातीला वारशाने मिळाला. मात्र एका अद्वितीय कृपेने, मरियेच्या स्वतःच्या गर्भधारणेच्या पहिल्याच क्षणापासून तिला मूळ पापाच्या डागापासून जपण्यात आले. ही पूर्वगामी कृपा—म्हणजे तिच्याकडून कोणतेही कार्य घडण्यापूर्वी किंवा तिने कोणतीही पुण्याई संपादन करण्यापूर्वी तिला मिळालेली कृपा—तिचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या भावी पुण्याईमुळे तिला देण्यात आली. अशा रीतीने मरियेचे तारण असामान्य प्रकारे झाले आणि तिच्या आत्म्याचे पापाकडे ओढणाऱ्या प्रवृत्तीपासून व पापाच्या सर्व परिणामांपासून रक्षण झाले. आदाम आणि हव्वा यांनी देवाकडे पाठ फिरवली; पण मरिया आयुष्यभर देवाशी विश्वासू राहिली. म्हणून तिला ‘नवी हव्वा’ ही पदवी लाभली.

आज निष्कलंक गर्भधारणेचा उत्सव साजरा करताना मरियेच्या जीवनाच्या आणि आत्म्याच्या रहस्यावर चिंतन करा. तारणाच्या इतिहासातील तिची अद्वितीय भूमिका आपल्याला काही प्रमाणात समजू शकते; पण तिच्या निष्कलंक हृदयाचे संपूर्ण सौंदर्य आणि गहनता स्वर्गातच पूर्णपणे उलगडेल. तोवर, तिची गाढ नम्रता, कृपेने भरलेले तिचे जीवन आणि ख्रिस्ती शिष्यत्वाचा आदर्श म्हणून तिचे स्थान यांवर मनन करण्याचे आमंत्रण आपल्याला आहे.

हे परमप्रिय देवमाते, तूच निष्कलंक गर्भधारणा आहेस; तुझ्या अस्तित्वाच्या पहिल्याच क्षणापासून तू कृपापूर्ण आहेस. तुझ्या पुत्राच्या पुण्याईने देवाने तुला दिलेल्या कृपेच्या देणगीकडे तू कधीही पाठ फिरवली नाहीस. तुझ्या जीवनात प्रकट झालेले सद्गुण मला समजावेत आणि तुझ्या पवित्रतेचे अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करावा, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. तुझ्या पुत्राच्या, आमच्या तारणाऱ्याच्या, अधिक जवळ नेणारी कृपा स्वीकारण्यास मला मदत कर. हे निष्कलंक गर्भधारणेच्या माते, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आपली माता मरिया, सुवार्तेची सर्वश्रेष्ठ प्रचारक

ग्वादालुपेची मरिया माता, 12 डिसेंबर

तेव्हा देवदूत तिला म्हणाला, “मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुला लाभली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल; त्याचे नाव येशू ठेव.” लूक 1:30–31

आजवरच्या सर्व संतांमध्ये देवमातेइतका प्रभावी सुवार्तेचा प्रचार करणारे दुसरे कोणी ठरले नाही. पृथ्वीवरील तिचे बहुतांश जीवन लोकांच्या नजरेआड गेले; परंतु तिच्या अगदी जवळच्या लोकांना तिच्या आचरणात सद्गुणांची परिपूर्णता दिसली. तरुण माता म्हणून ती आपल्या दैवी पुत्राच्या दैनंदिन गरजांची काळजी घेत असे. त्याच वेळी, त्याच्या देहधारणेचे रहस्य आपल्या डोळ्यांसमोर उलगडत असताना ती त्यावर सतत मनन करत असे. येशूच्या पृथ्वीवरील जीवनकाळात तिने आपल्या पुत्रावर केलेले प्रेम तिच्या निष्कलंक हृदयातून ओसंडून वाहत होते; ते आजही तसेच वाहत आहे.

शरीर आणि आत्म्यासह स्वर्गात घेतले गेल्यानंतरही तिचे कार्य थांबले नाही. स्वर्गाची आणि पृथ्वीची राणी म्हणून ती आपल्या आध्यात्मिक लेकरांसाठी आजही मध्यस्थी करते आणि पवित्रतेत वाढण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली कृपा मिळवून देते. इतिहासात मरियेच्या अनेक दर्शनांची नोंद झाली आहे. अशा अनेक दर्शनांना औपचारिक मान्यता मिळालेली नाही; मात्र काहींना ती मिळाली आहे. त्यांपैकी एक म्हणजे 1531 मध्ये संत हुआन दिएगो यांना झालेले ग्वादालुपेच्या मातेचे दर्शन.

1521 मध्ये हेर्नान कोर्तेसने अझटेक साम्राज्य जिंकल्यानंतर त्याच्या राजधानीची पुनर्बांधणी करण्यात आली. हेच शहर पुढे मेक्सिको सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. काही स्पॅनिश वसाहतकरूंनी स्थानिक आदिवासी लोकांशी क्रूरपणे वागणूक केली. तरीही कॅथलिक चर्चने मिशनरी आणि बिशप हुआन दे सुमारागा यांच्यासारख्या नेत्यांमार्फत त्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवताना त्यांच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. अनेक आदिवासींना मिशनरींबद्दल साशंक वाटणे साहजिक होते, तरी काहींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांत क्वाउत्लातोआत्सिन नावाचा एक पुरुष आणि त्याची पत्नी होते. बाप्तिस्म्यानंतर त्याने हुआन दिएगो हे ख्रिस्ती नाव घेतले, तर त्याच्या पत्नीने मारिया लुसिया हे नाव घेतले.

9 डिसेंबर 1531 रोजी हुआन दिएगो मिस्साला आणि ख्रिस्ती धर्मशिक्षणाच्या वर्गाला पायी जात असताना तेपेयाक टेकडीजवळून जात होता. तिथे धन्य कुमारी मरियेने त्याला दर्शन दिले. ती त्याच्याशी त्याच्या मातृभाषेत बोलली, तिने आपण देवमाता असल्याचे त्याला सांगितले आणि त्याच ठिकाणी आपल्या सन्मानार्थ एक छोटे प्रार्थनामंदिर बांधण्याची विनंती केली. हुआनने हा संदेश बिशप सुमारागा यांना सांगितला, तेव्हा बिशपांनी एक चिन्ह मागितले.

12 डिसेंबर रोजी हुआनचे काका गंभीर आजारी पडले. त्यांना अंतिम संस्कार देण्यासाठी एका धर्मगुरूला शोधायला हुआन घाईघाईने निघाला. वाटेत उशीर होऊ नये म्हणून त्याने दुसरी वाट धरली, पण देवमातेने त्याला पुन्हा दर्शन दिले. त्याचे काका आधीच बरे झाले आहेत, असे तिने त्याला आश्वासन दिले आणि बिशपांना दाखवण्यासाठी वचन दिलेली खूणही दिली. तिने हुआनला टेकडीवर त्या ऋतूत सहसा न फुलणारी गुलाबाची फुले तोडायला सांगितले. त्याने ती फुले आपल्या तिल्मा नावाच्या अंगवस्त्रातून बिशपांकडे आणली, तेव्हा त्याला जशी कुमारी मरिया दिसली होती, तशीच तिची प्रतिमा त्या वस्त्रावर उमटली. धन्य मातेच्या विनंतीनुसार हुआन दिएगोचे तिल्मा आज मेक्सिको सिटीतील ग्वादालुपेच्या देवमातेच्या बॅसिलिकामध्ये लावलेले आहे.

ती चमत्कारिक प्रतिमा विस्मयचकित करणारी होती; पण त्यानंतर जे घडले ते त्याहूनही आश्चर्यकारक होते. पुढील दहा वर्षांत लाखो स्थानिक आदिवासींनी ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारली. ख्रिस्तसभेच्या इतिहासातील विश्वासस्वीकाराच्या सर्वांत उल्लेखनीय सामूहिक घटनांपैकी ही एक होती. हे सर्व धन्य मातेने केलेल्या सुवार्तेच्या प्रसारामुळे आणि तिच्या हस्तक्षेपामुळे घडले. त्या आदिवासी लोकांवरील प्रेमापोटी आणि त्यांच्या तारणाच्या इच्छेने ती स्वतः त्यांच्याकडे आली. अशा रीतीने ख्रिस्तसभा जी सुवार्ता सांगत होती, तिच्या सत्यतेला तिने दुजोरा दिला.

ग्वादालुपेच्या देवमातेचा सन्मान करताना आज आपण देवमातेच्या ममतेचे चिंतन करू या. सर्वांचे तारण व्हावे अशी जशी तिची इच्छा आहे, तशीच त्या आदिवासी लोकांचे तारण व्हावे अशीही तिची उत्कट इच्छा होती. जगभरातील आणखी लाखो लोकांना देवाचा तारणदायी संदेश ऐकता यावा आणि तो स्वीकारता यावा, म्हणून तिच्या मध्यस्थीची याचना करा.

हे परम प्रेमळ ग्वादालुपेच्या कुमारी माते, स्वर्गातून ॲझ्टेक साम्राज्याच्या पराभूत जनतेचे हाल आणि दुःख पाहून तुझे निष्कलंक हृदय त्यांच्याविषयीच्या करुणेने भरून आले. म्हणून तू आपल्या पुत्राचा तारणदायी संदेश सांगण्यासाठी स्वतः त्यांच्याकडे गेलीस. आम्हा सर्वांना तुझ्या पुत्राकडे जाण्याचा मार्ग सापडावा आणि त्याने दिलेल्या तारणाच्या देणगीची ओळख व्हावी, म्हणून माझ्यासाठी, उत्तर व दक्षिण अमेरिकेसाठी आणि तुझ्या सर्व लेकरांसाठी प्रार्थना कर. हे ग्वादालुपेच्या देवमाते, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अनुक्रमणिका


चारही खंड पेपरबॅक & ई-पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल – आणि इतर ठिकाणीही!