मराठी

सामान्य काळातील चौदावा आठवडा

चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अनुक्रमणिका

कृपेचे हलके ओझे

सामान्य काळातील चौदावा रविवार (वर्ष अ)

“कष्ट करणाऱ्यांनो आणि ओझ्याने दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझे जू आपल्या खांद्यांवर घ्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी मनाने सौम्य व नम्र आहे; आणि तुम्हाला विसावा मिळेल. कारण माझे जू पेलायला सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.” मत्तय 11:28–30

इ.स.पू. 167 च्या सुमारास यहुदी धर्मात धार्मिक नेत्यांचे दोन नवे गट उदयास आले: शास्त्री आणि परुशी. येशू पृथ्वीवर वावरत होता त्या काळापर्यंत या धार्मिक नेत्यांनी अनेक रूढी, चुकीच्या शिकवणी आणि धार्मिक आचार प्रचलित केले होते. हे सर्व मोशेच्या नियमशास्त्रातून आले आहे, असा त्यांचा दावा होता. पण त्यांच्या शिकवणीत नियमांचा अतिरेकी आग्रह, स्वार्थ आणि दांभिकपणा असल्यामुळे येशूने तिचा निषेध केला. ते जे शिकवत, त्यातून अनेकदा नियमशास्त्राचा विपर्यास होत असे. उदाहरणार्थ, शब्बाथ दिवशी गव्हाची कणसे तोडून खाल्ल्याबद्दल परुश्यांनी शिष्यांना दोष दिला, हे आठवा. त्यामुळे तिसऱ्या आज्ञेचा भंग झाला, असा त्यांचा दावा होता. तसे झाले नाही, हे येशूने स्पष्टपणे शिकवले.

आजच्या शुभवर्तमानात येशू ‘कष्ट करणाऱ्यांशी आणि ओझ्याने दबलेल्यांशी’ बोलतो. तो त्यांना आपण देऊ केलेले हलके आणि पेलायला सोपे जू घ्यायला बोलावतो. म्हणजेच, शास्त्री आणि परुशी यांनी मोशेच्या नियमशास्त्राचा इतका विपर्यास केला होता की यहुदी श्रद्धेनुसार जगणे म्हणजे न पेलणारे ओझे वाहण्यासारखे झाले होते, हे येशू दाखवून देतो. याउलट, येशूचा कृपेचा नवा नियम मुक्त करणारा, हलका आणि पाळायला सोपा होता.

येशूच्या विविध शिकवणींचा विचार करता, त्या आचरणात आणणे तुम्हाला सोपे वाटते का? की कधी कधी त्या आपल्या आवाक्याबाहेरच्या वाटतात? उदाहरणार्थ, येशू म्हणाला, “तुमचा स्वर्गीय पिता जसा परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा” (मत्तय 5:48). हे केवळ आमंत्रण नव्हते; ती एक आज्ञाही होती आणि तिचे पालन करणे आवश्यक होते. मग येशूच्या शिकवणी आचरणात आणणे सोपे आहे का? की त्या आपल्याला न पेलणाऱ्या आहेत?

येशू स्वतः म्हणतो, “माझे जू पेलायला सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.” त्यामुळे त्याच्या शिकवणी आचरणात आणणे सोपे आहे, याची आपण खात्री बाळगू शकतो. येशू आपल्याला केवळ नैतिक परिपूर्णतेसाठी बोलावत नाही, तर ती प्राप्त करण्याची साधनेही देतो. एक उदाहरण घ्या. समजा, कुणीतरी तुम्हाला 2,000 पौंड वजनाचा एक मोठा धोंडा हलवायला सांगितले. तुम्हाला ते जमेल का? त्या व्यक्तीने या कामासाठी तुम्हाला एक मोठा ट्रॅक्टरही दिला, तर ते जमेल. मग तुम्हाला फक्त ते यंत्र नीट वापरायचे आहे. आपला प्रभू आपल्याला जे काही करायला सांगतो, त्याबाबतही असेच आहे. एखादे नैतिक कर्तव्य पार पाडणे आपल्याला कठीण किंवा अगदी आवाक्याबाहेरचे वाटत असेल, तर त्याचा अर्थ असा की देवाची आज्ञा पाळण्यासाठी त्याने आपल्याला दिलेल्या कृपेवर आपण विसंबत नाही.

परिपूर्णतेचे ‘जू’ स्वीकारण्याच्या येशूच्या सौम्य आमंत्रणावर आज चिंतन करा. हे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे असे समजू नका. उलट, ते आपल्या प्रभूकडून आलेले आनंददायी आमंत्रण आहे असे माना. देव तुम्हाला केवळ पावित्र्याची शिखरे गाठण्यासाठी बोलावत नाही, तर ती गाठण्याची साधनेही पुरवतो, यावर मनन करा. त्याच्या सर्वशक्तिमान सामर्थ्यावर श्रद्धा ठेवा आणि त्या सामर्थ्याला आपल्या जीवनात अधिक पूर्णपणे कार्य करू द्या, म्हणजे आपला प्रभू तुम्हाला जे जे करायला सांगतो ते सर्व तुम्ही सहजपणे आणि आनंदाने करू शकाल.

हे माझ्या सौम्य प्रभू, तू आपले स्वतःचे जू माझ्या खांद्यांवर ठेवतोस, जेणेकरून मी ते वाहावे. तू मला जे काही करायला सांगतोस त्या सर्वाला मी ‘हो’ म्हणतो. तू माझ्यावर दया केलीस म्हणून मी तुझे आभार मानतो. जे जू तुझ्याकडून आलेले नाही, ते माझ्या खांद्यांवरून कृपया काढून टाक, म्हणजे तुझ्या कृपेचे हलके ओझे आनंदाने वाहत मी तुझ्या मागे चालू शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


श्रद्धा आणि चमत्कार

सामान्य काळातील चौदावा रविवार (वर्ष ब)

येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याला त्याच्या गावात, त्याच्या नातेवाइकांत आणि त्याच्या स्वतःच्या घरात मान मिळत नाही; इतरत्र मात्र त्याला मान मिळतो.” म्हणून काही आजाऱ्यांवर हात ठेवून त्यांना बरे करण्यापलीकडे त्याला तेथे कोणतेही सामर्थ्याचे कृत्य करता आले नाही. त्यांच्यात श्रद्धा नसल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. मार्क 6:4–6

येशूला आपल्या नाझरेथ गावात “कोणतेही सामर्थ्यशाली कृत्य करता आले नाही,” असे का? कारण येशूला लहानपणापासून ओळखणाऱ्या लोकांची त्याच्यावर श्रद्धा नव्हती. पण त्यांची मने जिंकण्याच्या आशेने येशूने थक्क करणारे चमत्कार का केले नाहीत? एखाद्या मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करून किंवा रूपांतराच्या डोंगरावर आपल्या तीन शिष्यांना जसे आपले तेज दाखवले, तसे आपल्या नातलगांनाही दाखवून त्यांची खात्री पटवण्याचा प्रयत्न त्याने का केला नाही? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या आत्म्यात श्रद्धा कशी कार्य करते, या मर्माशी निगडित आहे.

आपण देवाचा पुत्र, मशीहा आहोत, हे आपल्या गावच्या लोकांना पटवून देणे हा येशूचा उद्देश नव्हता. अत्यंत विस्मयकारक चमत्कार करून तो त्यांची सहज खात्री पटवू शकला असता आणि आपण कोण आहोत हे सिद्ध करू शकला असता. पण तसे केल्याने त्याच्या येण्याचा मूळ हेतूच बाधित झाला असता. तो लोकांच्या हृदयात खरी श्रद्धा जागवण्यासाठी आला होता, चतुर युक्तिवादाने किंवा चमत्कारांचा पुरावा देऊन त्यांची खात्री पटवण्यासाठी नव्हे. ज्यांच्या ठायी आधीच श्रद्धा होती, त्यांची श्रद्धा वाढावी आणि त्यांच्यावर दया दाखवावी म्हणून चमत्कार केले गेले. पण जिथे श्रद्धाच नव्हती, तिथे चमत्काराने वाढणार तरी काय? चमत्कारामुळे त्यांच्या बुद्धीला ते पटले असते किंवा निदान ते फार प्रभावित झाले असते; पण ती खरी श्रद्धा नव्हे.

एक उदाहरण घेऊ या. समजा, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला म्हटले, “माझे तुझ्यावर प्रेम आहे,” आणि तुम्ही उत्तर दिले, “ते सिद्ध कर.” तर तुमचा जोडीदार ते कसे सिद्ध करेल? तुमच्यावर खरोखर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमचा जोडीदार काय करू शकेल? कदाचित प्रेमभावाने, दयाळूपणे आणि करुणेने वागून ते दाखवता येईल. या गुणांतून खरे प्रेम नक्कीच प्रकट होते. पण मुळात, आपले दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे हे कोणीही सिद्ध करू शकत नाही. प्रेम आध्यात्मिक पातळीवर दिले आणि स्वीकारले जावे लागते. असे घडते तेव्हा आपण प्रेम करतो आणि आपल्यावरही प्रेम केले जाते, हे दोघांनाही कसेतरी उमगते. हेच खऱ्या, आध्यात्मिक प्रेमाचे रहस्य आहे.

श्रद्धेचेही तसेच आहे. श्रद्धा सिद्ध करता येत नाही. तर्काच्या आधारे तिचे विश्लेषण करता येत नाही. ती स्वीकारावी लागते आणि जगावी लागते. येशूच्या गावातील लोकांना त्याच्यावर श्रद्धा ठेवायची असेल, तर श्रद्धेच्या या देणगीची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या आत्म्यातच झाली असती. त्यांनी त्याच्याकडे पाहिले असते आणि त्याचे ऐकले असते. त्यांच्या मनाच्या खुलेपणामुळे आणि देवाने प्रत्येकाला दिलेल्या विशेष प्रकटीकरणामुळे, येशू कोण आहे हे त्यांना उमगले असते आणि त्यावर त्यांनी श्रद्धा ठेवली असती. देव हृदयाशी बोलतो, तेव्हा श्रद्धा प्रथम आतूनच जन्म घेते.

आज येशूवरील तुमची श्रद्धा किती खोल आहे, याचे चिंतन करा. स्वतःच्या आत्म्यात डोकावून पाहता तुम्हाला काय दिसते? ख्रिस्त येशूला आपला प्रभू म्हणून ओळखणारे हृदय तुम्हाला दिसते का? तुमच्याशी बोलणाऱ्या आणि स्वतःची ओळख तुम्हाला करून देणाऱ्या देवाची उपस्थिती तुम्हाला आपल्या अंतर्यामी जाणवली आहे का? की तुम्ही मुख्यतः देवाच्या उपस्थितीची आणि प्रेमाची बाह्य चिन्हे व पुरावे शोधता? आज आपल्या आत्म्यात डोकावून पाहा आणि तिथे तुम्हाला गवसणाऱ्या श्रद्धेच्या खोलीचे चिंतन करा. ही देणगी गवसली की तिच्याकडे प्रेमाने पाहा, कारण देव स्वतःला तुमच्यासमोर प्रकट करत आहे, हेच तुम्ही पाहत आहात.

हे माझ्या प्रभू, तू माझ्या हृदयाच्या गाभ्यात माझ्याशी सतत बोलतोस आणि तुझी दैवी उपस्थिती व प्रेम मला प्रकट करतोस. माझी श्रद्धा वाढावी आणि तुझ्या दैवी प्रेमाची मला खात्री पटावी, म्हणून अगदी अंतःकरणापासून तुझ्यासाठी खुले असलेले हृदय मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


प्रेषितीय कार्य

सामान्य काळातील चौदावा रविवार (वर्ष क)

त्या वेळी प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमले आणि ज्या ज्या नगरांना व ठिकाणांना तो स्वतः भेट देणार होता, तिथे त्याने त्यांना दोघा-दोघांच्या गटाने आपल्यापुढे पाठवले. लूक 10:1

येशूचे अनेक अनुयायी त्याच्याशी मनापासून एकनिष्ठ होते. त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचे कार्य पूर्ण होण्यास हातभार लावण्यासाठी त्यांनी सर्वस्व सोडले होते. येशूच्या पहिल्या अनुयायांविषयी बोलताना आपण बहुतेक वेळा बारा प्रेषितांवरच अधिक लक्ष केंद्रित करतो. पण आजच्या शुभवर्तमानात येशूने बहात्तर शिष्यांना, तो लवकरच भेट देणार होता त्या सर्व नगरांत पाठवले. क्षणभर याचा विचार करा. बहात्तर ही काही लहान संख्या नाही. ते केवळ नावापुरते येशूचे अनुयायी नव्हते. उलट, त्यांनी स्वतःला पूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित केले होते, हे स्पष्ट आहे. येशूने त्यांच्यावर सुवार्तेच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली आणि त्यांना दुष्ट आत्म्यांवर अधिकार दिला.

बहात्तर जणांची व्यवस्था करून त्यांना कार्यासाठी पाठवणे कसे असेल, याची कल्पना करा. येशूची या शिष्यांशी वैयक्तिक ओळख झाली असणार, त्याने त्यांची श्रद्धा प्रत्यक्ष पाहिली असणार आणि त्यांना पुष्कळ शिकवले असणार. आपले पवित्र कार्य पार पाडण्यासाठी ते तयार आहेत, हेही त्याने ओळखले असणार. त्याचे आणखीही अनेक निष्ठावान अनुयायी असतील, पण त्यांच्यावर दैवी अधिकार सोपवून त्यांना कार्यासाठी पाठवण्याची वेळ अजून आली नव्हती, असेही आपण मानायला हवे. अशा प्रकारे, येशूने सुरू केलेल्या चळवळीने त्याच्या सार्वजनिक सेवाकार्याच्या पहिल्या काही वर्षांतच अनेकांचे जीवन खरोखर बदलून टाकले.

आज आपल्याबाबतीतही हेच खरे आहे. येशू आजही मिशनरींना आपल्या कार्यासाठी पाठवत आहे. तो सेवकांचा एक विशाल सेवकवर्ग एकत्र करीत आहे. तो त्यांना आपल्या जवळ बोलावतो, त्यांच्याशी अगदी वैयक्तिक नाते जोडतो, त्यांना शिकवतो व घडवतो, त्यांना विशेष कृपा आणि कृपादाने देतो आणि मग आपले प्रेषितीय कार्य पुढे चालवण्यासाठी त्यांना पाठवतो. आपला प्रभू ज्यांना पाठवेल, अशा तयार असलेल्या सेवकांपैकी तुम्ही आहात का?

ख्रिस्ताच्या कार्यासाठी तुम्ही तयार आहात की नाही, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे येशूने त्या बहात्तर जणांना दिलेल्या आज्ञेवर विचार करणे. त्या आज्ञेचा काही भाग असा होता: “जा; पाहा, मी तुम्हांला लांडग्यांमध्ये कोकरांसारखे पाठवत आहे. पैशांची थैली, झोळी किंवा पादत्राणे बरोबर घेऊ नका; आणि वाटेत कोणालाही अभिवादन करू नका.” दुसऱ्या शब्दांत, आपला प्रभू त्यांना सांगत होता की त्याच्या कार्यासाठी त्याग, धैर्य, देवाच्या पालनपोषणावर भरवसा आणि एकनिष्ठ निर्धार आवश्यक आहे. त्याचे कार्य वरवर त्याचे अनुसरण करणाऱ्यांसाठी नाही. जे आपल्या श्रद्धेबाबत गंभीर आहेत आणि येशूची दैवी आज्ञा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यास कचरत नाहीत, त्यांच्यासाठी हे कार्य आहे.

येशू तुमच्यावर जे प्रेषितीय कार्य सोपवू इच्छितो, ते पार पाडण्यासाठी तुम्ही तयार आहात का, यावर आज चिंतन करा. या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तुमची तयारी आहे का? तो तुम्हांला जे काही करायला बोलावेल, ते करण्याइतके धैर्य तुमच्यात आहे का? त्याने तुमच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून जे काही लागेल ते देव पुरवेल, असा तुम्हांला भरवसा आहे का? तुमचे लक्ष त्या एकाच ध्येयावर आहे का आणि तुमचा निर्धार पक्का आहे का? कचरू नका. आपल्या प्रभूच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण करा आणि तुमच्या जीवनात त्याच्या गौरवशाली पाचारणाची वाट पाहा.

हे माझ्या गौरवशाली प्रभू, तू असंख्य लोकांना आपल्या जवळ बोलावलेस, आपल्या कृपेने त्यांना घडवलेस, त्यांना तुझी दाने दिलीस आणि अनेकांच्या मनांना व हृदयांना स्पर्श करण्यासाठी त्यांना पाठवलेस. प्रिय प्रभू, जे कार्य तू माझ्यावर सोपवू इच्छितोस, ते पूर्ण करण्यासाठी माझा उपयोग कर. माझ्याआधी असंख्य लोकांना जसे तू घडवलेस, आपल्या कार्यासाठी त्यांचा उपयोग केलास आणि त्यांना पाठवलेस, तसेच मलाही घडव, माझा उपयोग कर आणि मला पाठव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


देवाच्या वाणीला प्रतिसाद देणे

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा सोमवार

बारा वर्षे रक्तस्रावाने पीडित असलेली एक स्त्री त्याच्या मागून आली आणि तिने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला. ती मनात म्हणाली, “मला फक्त त्याच्या वस्त्राला स्पर्श करता आला, तरी मी बरी होईन.” येशूने मागे वळून तिला पाहिले आणि म्हटले, “मुली, धीर धर! तुझ्या श्रद्धेने तुझे तारण केले आहे.” आणि त्या क्षणापासून ती स्त्री बरी झाली. मत्तय 9:20–21

या स्त्रीची श्रद्धा किती विलक्षण होती! अनेक वर्षे तिने रक्तस्रावाचा त्रास सोसला होता आणि अजूनही तो त्रास होतच होता. येशूच्या अंगरख्याला स्पर्श केल्याने आपण बरे होऊ, हे तिला कसे कळले? याचे एकच उत्तर आहे: श्रद्धा. श्रद्धा म्हणजे केवळ मनासारखे घडेल अशी कल्पना करणे किंवा आशा बाळगणे नव्हे. श्रद्धा म्हणजे देवाच्या विशेष कृपेने आणि प्रकटीकरणाने मिळणारे निश्चित ज्ञान, ज्यामुळे व्यक्ती प्रकट केलेले सत्य स्वेच्छेने स्वीकारते. देव तिच्या हृदयाशी बोलला; तिने ऐकले, प्रतिसाद दिला आणि ती बरी झाली.

या शुभवर्तमानातील प्रसंगात विशेष प्रेरणादायी गोष्ट म्हणजे ती स्त्री ज्या नम्रतेने येशूजवळ आली. येशूला थांबवून त्याच्याशी बोलावे किंवा आपली अडचण सांगून त्याला त्रास द्यावा, असे तिला वाटले नाही. उलट, तिला लाभलेल्या श्रद्धेच्या दानाद्वारे तिने नम्रपणे, मनातल्या मनात आणि निःशब्दपणे आपली गरज येशूसमोर मांडली. तिला देवाची कृपा लाभली, कारण देव अंतःकरण पाहतो आणि अशा नम्र व प्रामाणिक श्रद्धेला प्रतिसाद देतो.

आपल्या प्रभूवर प्रत्येकाची इतकी गाढ श्रद्धा असती, तर कसे झाले असते, याची कल्पना करा. देव आपल्या प्रत्येक गरजेची काळजी घेईल, अशी अढळ खात्री आपल्या सर्वांना असती, तर कसे झाले असते, याचा विचार करा. आणि त्याच अढळ खात्रीने आपण दररोज आपली प्रत्येक गरज घेऊन प्रभूकडे वळलो, अशी कल्पना करा. असे आपल्याला करता आले, तर आपला प्रभू सर्व प्रकारे आपली सतत काळजी घेऊ शकेल.

ती स्त्री बरी होण्यामागची एक महत्त्वाची गोष्ट अशी की, देवपित्याने स्वतः तिच्याशी संवाद साधला आणि आपला पुत्र येशू याच्या वस्त्राला स्पर्श करण्याची प्रेरणा तिला दिली. येशूला ती बरी झाल्याचे जाणवले, कारण तो आपल्या पित्याच्या इच्छेशी पूर्णपणे एकरूप होता. म्हणून येशूच्या वस्त्राला स्पर्श करणे ही काही जादूची कृती नव्हती, की जिच्यामुळे त्या स्त्रीला हवे ते मिळणार होते. उलट, पित्याने तिच्या अंतःकरणात दिलेल्या आमंत्रणाला तिने दिलेला तो प्रतिसाद होता.

आपल्या जीवनातही आपण असेच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुष्कळदा आपण आपल्या इच्छा देवासमोर मांडतो आणि त्याने काय करावे हे त्याला सांगतो. देव अशा विनंत्यांना प्रतिसाद देत नाही. त्याऐवजी आपण त्याची इच्छा जाणून घेतली पाहिजे… केवळ त्याचीच इच्छा. आपण बरे होऊ, हे त्या स्त्रीला ठाऊक होते, कारण देवपित्याने तिच्या मनात आणि अंतःकरणात तिच्याशी संवाद साधला आणि आपला पुत्र येशू याच्या वस्त्राला स्पर्श करण्याची प्रेरणा तिला दिली. तिने प्रतिसाद दिला आणि ती बरी झाली. देवाने प्रथम बोलले पाहिजे; आपण त्याचे ऐकून प्रतिसाद दिला पाहिजे. मग त्याची इच्छा पूर्ण होते.

आज तुमच्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात देव तुमच्याशी ज्या सौम्य वाणीने बोलतो, तिच्यावर चिंतन करा. त्याची वाणी तुम्हाला ऐकू येते का? तो तुम्हाला काय करण्यास आमंत्रित करतो? तो तुम्हाला कोणते आरोग्यदान देऊ इच्छितो? देवाच्या वाणीवर चिंतन करताना केवळ त्यालाच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वतःच्या सर्व इच्छा आणि देवाने काय करावे याबद्दलच्या तुमच्या कल्पना बाजूला ठेवा. तो तुम्हाला काय सांगत आहे, तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला पूर्ण खात्रीने आणि दृढ निश्चयाने “होय” म्हणा. तो जे काही तुम्हाला सांगतो, त्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेवली, तर तो ते पूर्ण करील, असा विश्वास ठेवा.

हे माझ्या प्रेमळ प्रभू, तू रात्रंदिवस माझ्याशी बोलतोस आणि मला ज्या आरोग्याची गरज आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी मला बोलावतोस. तुझी वाणी ऐकण्यास आणि श्रद्धेने तुला प्रतिसाद देण्यास मला मदत कर. माझी तुझ्यावरील श्रद्धा आणि भरवसा अधिक दृढ होवोत आणि त्यांतून माझ्या जीवनात तुझे गौरवशाली कार्य घडो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


आत्म्यांच्या तारणासाठीचा उत्साह

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा मंगळवार

येशू सर्व नगरांत व गावांत फिरत होता. तो त्यांच्या सभास्थानांत शिकवत होता, राज्याचे शुभवर्तमान घोषित करत होता आणि सर्व प्रकारचे रोग व आजार बरे करत होता. लोकसमुदाय पाहून त्याला त्यांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते त्रस्त आणि निराधार होते. मत्तय 9:35–36

आत्म्यांच्या तारणासाठी येशूला फार कळकळ होती. एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी जी ऊर्जा, तळमळ आणि प्रेरणा आपल्याला पुढे नेतात, त्यांतून असा उत्साह प्रकट होतो. आपल्या भेटीस येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हृदयपरिवर्तन व्हावे, यासाठी येशू तळमळत होता. एका नगरातून दुसऱ्या नगरात जाताना त्याला अनेक लोक भेटत आणि त्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे, हे त्याला दिसत असे. कितीतरी लोक “त्रस्त आणि निराधार” असल्याचे त्याने पाहिले. ते “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे” होते, हे त्याला दिसले. त्यामुळे त्याला त्यांचा कळवळा आला आणि त्यांचा मेंढपाळ होण्याची, त्यांच्या अंतःकरणातील क्लेश दूर करण्याची आणि आपल्या नव्या राज्याचे सदस्य होण्यासाठी त्यांना आमंत्रण आहे हे त्यांना सांगण्याची तळमळ त्याला वाटली.

व्याकूळ आणि निराधार अशा अनेक लोकांना येशू भेटतो, या दृश्यावर चिंतन करणे योग्य आहे. कारण त्या लोकांमध्ये आपलेच प्रतिबिंब दिसते. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात काही ना काही खळबळ असते. कधीकधी आपल्याला एकटे, गोंधळलेले, साशंक आणि दिशाहीन वाटू शकते. ज्याला असे कधीच वाटत नाही, ती व्यक्ती एकतर पूर्णत्वाला पोहोचलेली संत व्यक्ती आहे किंवा ती स्वतःशी प्रामाणिक नाही. अनेकांना जाणवणारा हा अंतर्गत संघर्ष, अर्थातच, सखोल पावित्र्याने आणि देवाशी असलेल्या ऐक्याने दूर होतो. अशा व्यक्तीला आपण देवाच्या कुटुंबातील आहोत याची स्पष्ट जाणीव असते; आपण देवाचे पुत्र किंवा कन्या आहोत हे तिला उमगते आणि या सत्यात तिला गाढ शांती लाभते. पण तुम्ही असा संघर्ष अनुभवत असाल, तर पवित्र शास्त्रातील हा उतारा खास तुमच्यासाठी आहे.

पहिली गोष्ट म्हणजे, “त्रस्त” असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही जण भूतकाळातील आठवणी, तुटलेली नाती, जीवनाला दिशा नसणे, गंभीर पाप, राग अशा गोष्टींशी झुंजत असतात. म्हणून प्रामाणिकपणे स्वतःला विचारण्याचा पहिला प्रश्न असा आहे: माझे अंतःकरण त्रस्त आहे का? अगदी थोर संतांनाही जीवनाच्या काही बाबतींत संघर्ष करावा लागतो. मग तुम्हाला कोणत्या गोष्टीशी झुंज द्यावी लागते?

दुसरी गोष्ट म्हणजे, आपण “निराधार” आहोत असे वाटणे हा एक जड क्रूस आहे. आपल्याला त्याच्या कुटुंबाचे सदस्य होता यावे, यासाठी येशू आला. हे शाश्वत तारणाच्या दानाने शक्य होते, आणि त्या तारणाची सुरुवात आताच झाली पाहिजे. पापांची क्षमा स्वीकारून आणि प्रार्थनामय जीवनात वाढत जाऊन आपल्याला देवाची अगदी जवळून आणि वैयक्तिक ओळख होते. होय, तो सर्वशक्तिमान देव आणि सर्वांचा निर्माणकर्ता आहे. पण तो आपल्याला अगदी जवळचा आहे; त्याला तुमच्याशी खरेखुरे प्रेमाचे नाते जोडायचे आहे.

तुम्ही त्रस्त असाल, तुम्हाला कुणी सोडून दिले असेल किंवा या दोन्ही गोष्टींना तुम्ही तोंड देत असाल, तर येशूला तुमच्याविषयी किती कळकळ आहे याचा विचार करा. आपल्या सार्वजनिक सेवाकार्याच्या काळात तो न थकता कितीतरी ठिकाणी पायी फिरला. तुमच्यापर्यंत स्वतः येऊन तुमचा मेंढपाळ होण्याची त्याला किती कळकळ आहे, याची खूण तुम्हाला त्याच्या त्या प्रवासांत दिसू द्या. तुमचे प्रत्येक ओझे दूर करावे आणि त्याच्या कुटुंबात तुमचे स्थान कोणते हे तुम्हाला उमगावे म्हणून वाट मोकळी करावी, अशी त्याची इच्छा आहे. येशूने जाहीर केलेल्या ‘राज्याच्या शुभवर्तमानात’ त्या राज्याचे सदस्य होण्याचे आमंत्रण सर्वांना होते. तो तुमच्याकडे येतो तेव्हा हे लक्षात ठेवा की, इतक्या वर्षांपूर्वी तो गावोगावी फिरत होता तेव्हा जसे त्याचे हृदय करुणेने भरले होते, तसेच आजही त्याचे हृदय तुमच्यासाठी करुणेने भरलेले आहे. तो तुम्हाला पाहतो, तुमच्या हृदयाकडे प्रेमाने पाहतो आणि तुमच्या गरजांत, दुर्बलतेत आणि पापातही तो तुमच्यावरून आपली नजर कधीच हटवत नाही.

तुमचे शाश्वत तारण व्हावे आणि तुमचे जीवन पवित्र व्हावे यासाठी येशूला किती कळकळ आहे, यावर आज चिंतन करा. त्याच्याविना तुम्ही या जगातून वाटचाल करू शकत नाही. येशूला तुमचा शोध घेऊ द्या, तुमच्याकडे येऊ द्या आणि तुमच्याशी बोलू द्या. तुमचा मेंढपाळ होण्याचे त्याचे आमंत्रण स्वीकारा. त्याची ही इच्छा अगदी अंतःकरणापासून आहे; त्याचे कार्य तुमच्यामध्ये पूर्ण होऊ द्या.

हे माझ्या दैवी मेंढपाळा, तू मोठ्या तळमळीने आणि करुणेने प्रत्येकाचा शोध घेतोस. प्रत्येक दुःखी आणि भग्न हृदय तुला दिसते आणि प्रत्येकाची जखम भरून काढण्याची तुझी इच्छा आहे. प्रिय प्रभू, तू माझ्याकडे आलास आणि माझा मेंढपाळ व मार्गदर्शक झालास, याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझ्या दुर्बलतेत आणि वेदनेत तू माझ्याकडे पाहतोस, तेव्हा मलाही तुला पाहता येऊ दे. आताही आणि आयुष्यभर माझे हृदय तुझ्यासाठी उघडे ठेवण्यास मला मदत कर. माझ्या प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


राज्याची घोषणा

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा बुधवार

येशूने त्या बारा जणांना अशा सूचना देऊन पाठवले: “परराष्ट्रीयांच्या प्रदेशात जाऊ नका आणि शमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. त्याऐवजी इस्राएल घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. जाताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” मत्तय 10:5–7

येशूने आपल्या प्रेषितांना दिलेली जी आज्ञा आपण वर वाचली, तिची व्याप्ती त्याने स्वर्गारोहणाच्या अगदी आधी उच्चारलेल्या आपल्या अखेरच्या शब्दांनी वाढवली. पुढे तो म्हणतो, “म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या…” (मत्तय 28:19). पुढे येशू बारा प्रेषितांना आणि आपल्या सर्व शिष्यांना पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठवतो, जेणेकरून त्यांनी प्रत्येक सृष्टीप्राण्याला सुवार्ता सांगावी. पण येथे, पवित्र आत्म्याच्या आगमनापूर्वी आणि येशूचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण होण्यापूर्वी, तो बारा प्रेषितांना फक्त “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे” जाण्याची आज्ञा देतो. अशा रीतीने, जुन्या करारातील प्रकटीकरणे—म्हणजे मोशेच्या नियमशास्त्राची आणि संदेष्ट्यांची शिकवण—ज्यांच्याकडे आधीच सोपवण्यात आली होती, त्यांना सुवार्ता सांगण्यास येशू एक प्रकारे प्राधान्य देतो.

आज ‘सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा’ हे आपल्या प्रभूचे आवाहन आपण सर्वांनी ऐकले पाहिजे. पण त्याचबरोबर, जे आधीपासूनच देवाच्या कुटुंबाचे सदस्य आहेत त्यांना प्रथम शुभवर्तमान सांगण्याची ही विशेष आज्ञाही आपण ऐकली पाहिजे. पवित्र आत्मा येऊन गेला आहे आणि शुभवर्तमान दूरदूरवर पोहोचले आहे. तरीही, येशूने हे कार्य टप्प्याटप्प्याने सोपवले—प्रथम देवाच्या कुटुंबातील लोकांकडे आणि नंतर ज्यांना अजून शुभवर्तमानाची ओळख नाही त्यांच्याकडे पाठवले—यातून आपल्याला एक महत्त्वाचा आध्यात्मिक धडा शिकण्यासारखा आहे.

स्वतःपासून सुरुवात करा. इस्राएल घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांकडे प्रथम जावे, असे येशू आपल्या बारा प्रेषितांना आग्रहाने सांगतो. हे ऐकताना आपला प्रभू विशेषतः तुमच्याविषयी बोलत आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही बाप्तिस्मा व दृढीकरण हे संस्कार घेतले आहेत आणि पवित्र परमप्रसादही स्वीकारला आहे. त्यामुळे ख्रिस्ताचे शुभवर्तमान ऐकून त्याला प्रतिसाद देण्याची विशेष जबाबदारी आता तुमच्यावर आहे. त्यानंतर, तुमच्याप्रमाणेच श्रद्धा बाळगणाऱ्यांपर्यंत शुभवर्तमान पोहोचवण्याची विशेष जबाबदारी देव तुमच्यावर सोपवतो. म्हणून आपल्या मुलांना शुभवर्तमान सांगण्याचे विशेष कर्तव्य पालकांचे आहे. एकाच श्रद्धासमुदायातील मित्रांचेही कर्तव्य आहे की त्यांनी आपलीच श्रद्धा बाळगणाऱ्या इतरांपर्यंत पोहोचावे. चर्चच्या धर्मपालकांनीही असेच केले पाहिजे. शुभवर्तमान आता सर्वांसाठी आहे आणि ते सर्व लोकांना जाहीर केले पाहिजे. मात्र हा उतारा ख्रिस्ताच्या इतर शिष्यांना शुभवर्तमान सांगण्याचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित करतो, असे दिसते.

आपल्या रोजच्या जीवनात आपण पाहतो की ख्रिस्तावरील श्रद्धा जाहीर करणारे अनेक जण आहेत; पण शुभवर्तमान अजूनही त्यांच्या जीवनात पूर्णपणे रुजलेले नाही. अनेकांनी संस्कार स्वीकारले आहेत, पण ज्या सखोल श्रद्धेकडे त्यांना बोलावले आहे ती त्यांच्यात नाही. बहुतेक जण दररोज आपल्या प्रभूची उपासना करत नाहीत आणि अनेक जण दर आठवड्यालाही प्रार्थनापूर्वक उपासना करत नाहीत, असे दिसते. म्हणून शुभवर्तमानातील या प्रसंगात आपण स्वतः आहोत अशी कल्पना करणे उपयुक्त ठरेल. जे आधीपासूनच त्याच्या चर्चचे सदस्य झाले आहेत, मग ते केवळ नावापुरते का असेनात, त्यांच्यापर्यंत शुभवर्तमान पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे प्रभूचे आवाहन ऐका.

आपण स्वतःपासून सुरुवात केली, आपले श्रद्धाजीवन दिवसेंदिवस अधिक सखोल करण्याचा प्रयत्न केला, प्रार्थना केली आणि देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर देवाला आपल्या इच्छेनुसार आपल्याद्वारे अशा लोकांपर्यंत श्रद्धा पोहोचवणे अधिक सहज शक्य होईल, जे त्याच्या कुटुंबाचे आहेत पण ज्यांची श्रद्धा कदाचित दुर्बल आहे. आणि तुम्ही जर ख्रिस्ताशी पूर्णपणे बांधील राहून स्वतःला खरोखर त्याच्या स्वाधीन केले असेल, तर ज्यांना श्रद्धेच्या देणगीद्वारे अजून ख्रिस्ताची ओळख झालेली नाही, त्यांनाही तुमच्याद्वारे देव नक्कीच शुभवर्तमान सांगेल.

आपले शुभवर्तमान सांगणारे व्हावे म्हणून येशू तुम्हाला जे आमंत्रण देतो, त्यावर आज चिंतन करा. प्रथम स्वतःच्या जीवनाकडे पाहा. तुम्ही ख्रिस्ताचे निष्ठावान आणि उत्साही अनुयायी व्हावे यासाठी शुभवर्तमानाला तुमचे जीवन बदलू द्या; त्यासाठी तुमच्याकडून होईल ते सर्व करा. मग इतरांनाही आपल्या प्रभूचे अनुयायी होण्याची प्रेरणा मिळावी यासाठी देव दररोज तुमच्याद्वारे अनेक प्रकारे कार्य करू इच्छितो, त्याला तयार मनाने प्रतिसाद द्या. आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देव आपल्या कृपेने तुम्हाला ज्या प्रेरणा देतो, त्यांच्याकडे लक्ष द्या. मग आपल्या कुटुंबापलीकडील समाजाकडेही लक्ष द्या. प्रभूला तुमचे मार्गदर्शन करू द्या, त्याची वाणी ऐकून त्याप्रमाणे चला. इतरांना आपल्यावरील त्याचे उत्कट प्रेम कळावे म्हणून तो तुमच्याद्वारे अनेक प्रकारे कार्य करील.

हे माझ्या विश्वराजा, सर्व लोकांच्या जीवनात तुझे राज्य प्रस्थापित करण्यासाठी तू आलास. तू तुझ्या सर्व सृष्टीला तुझ्यावर श्रद्धा ठेवण्यास बोलावतोस. जे पूर्ण अंतःकरणाने तुझ्याकडे वळतात, त्यांच्यात मी अग्रेसर असावे, म्हणून मला मदत कर. तू ज्या लोकांना माझ्या जीवनात आणले आहेस, त्यांच्यापर्यंत तुझी तारणदायी कृपा पोहोचवण्यासाठी माझा साधन म्हणून उपयोग कर. हे प्रिय प्रभू, माझे जीवन तुझे आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


तुमचे हृदय मृदू करा

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा गुरुवार

“जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत किंवा तुमचे शब्द ऐकणार नाहीत, त्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडा आणि आपल्या पायांची धूळ झटकून टाका. आमेन, मी तुम्हांला सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा यांच्या प्रदेशाची दशा अधिक सुसह्य असेल.” मत्तय 10:14–15

परुश्यांच्या कठोर अंतःकरणामुळे येशूने त्यांचा किती कडक शब्दांत निषेध केला, हे आठवा. मत्तयच्या शुभवर्तमानाच्या 23 व्या अध्यायात येशू या परुश्यांच्या दांभिकपणामुळे आणि ते आंधळे मार्गदर्शक असल्यामुळे सात वेळा “तुमचा धिक्कार असो” असे म्हणतो. येशूचा हा निषेधही प्रेमातूनच होता, कारण त्यांना मनपरिवर्तनासाठी बोलावणे हा त्यामागचा उद्देश होता. त्याचप्रमाणे, आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या बारा प्रेषितांना सांगतो की, एखाद्या नगरात शुभवर्तमानाची घोषणा केल्यावर लोकांनी त्यांना नाकारले, तर त्यांनी काय करावे. त्यांनी आपल्या पायांची “धूळ झटकून टाकावी.”

येशूने बारा प्रेषितांना “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे” शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी पाठवले, तेव्हा त्याने ही सूचना दिली. मोशेच्या नियमशास्त्राचा आणि संदेष्ट्यांचा संदेश ज्यांच्याकडे आधीच सोपवण्यात आला होता, त्यांच्याकडे त्या वेळी प्रेषितांनी जायचे होते. पण आता देवाचे राज्य आले आहे, अशी घोषणा त्यांना करायची होती. येशू हाच वचन दिलेला मशीहा होता आणि आता तो त्यांच्यामध्ये आला होता. इस्राएलच्या घराण्यातील जे लोक येशूला नाकारतील, त्यांच्या नगराची धूळ आपल्या पायांवरून झटकून टाकण्याच्या या संदेष्ट्याच्या कृतीद्वारे प्रेषितांनी त्यांचा निषेध करायचा होता.

पहिल्यांदा हे काहीसे कठोर वाटू शकते. संयम दाखवणे, संवाद चालू ठेवणे, सौम्यपणे वागणे अशा गोष्टी अधिक परिणामकारक ठरतील, असे वाटू शकते. आज आपल्या अनुभवातील अनेक प्रसंगांत तसे असेलही; तरी येशूने बारा प्रेषितांना ही आज्ञा दिली, ही वस्तुस्थिती बदलत नाही.

परुश्यांचा निषेध करण्याप्रमाणेच, पायांची धूळ झटकून टाकण्याची ही संदेष्ट्याची कृतीही प्रेमाची होती. अर्थात, प्रेषितांनी ती अविचारी रागाच्या भरात करायची नव्हती. लोकांनी नाकारल्यामुळे आपला अहंकार दुखावला म्हणून किंवा त्या लोकांबद्दल तुच्छता वाटली म्हणूनही ती करायची नव्हती. उलट, नगरातील लोकांना त्यांच्या कृतीचे परिणाम दाखवून देण्यासाठी प्रेषितांनी असे करायचे होते. निवडलेल्या लोकांच्या या नगरांनी वचन दिलेल्या मशीहाला नाकारले, तेव्हा त्या नकाराचे परिणाम त्यांना समजणे आवश्यक होते. संदेशवाहकांना नाकारून आपण शुभवर्तमानाची तारणदायी कृपाच नाकारत आहोत, हे त्यांना कळणे गरजेचे होते.

सर्वप्रथम, येशू कोणाविषयी बोलत होता, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जे शुभवर्तमानाचा संदेश “स्वीकारणार नाहीत” आणि तो “ऐकूनही घेणार नाहीत,” अशा लोकांविषयी तो बोलत होता. या लोकांनी देवाला आणि त्याच्या तारणदायी संदेशाला पूर्णपणे नाकारले आहे. त्यांनी स्वतःच्या इच्छेने देवापासून आणि त्याच्या पवित्र शुभवर्तमानापासून स्वतःला दूर केले आहे. ते हट्टी आणि दुराग्रही आहेत; त्यांची अंतःकरणे कठोर झाली आहेत. म्हणून, जेव्हा लोक शुभवर्तमानासाठी आपल्या अंतःकरणाची दारे पूर्णपणे बंद करतात, अशा टोकाच्या परिस्थितीतच येशू आपल्या प्रेषितांना ही संदेष्ट्याची कृती करून तेथून निघून जाण्यास सांगतो. ही कृती पाहून काहींना कदाचित आपण काहीतरी गमावले आहे असे वाटेल. कदाचित काहींना आपली चूक उमगेल. कदाचित काहींच्या मनात आपल्या चुकीची पवित्र जाणीव जागी होईल आणि कालांतराने त्यांची अंतःकरणे मृदू होतील.

येशूच्या या शिकवणीने तुमचेही डोळे उघडले पाहिजेत. तुम्ही शुभवर्तमानाचा संदेश किती मनापासून स्वीकारता आणि ऐकता? देवाच्या राज्याची तारणदायी घोषणा तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकता? तुम्ही जितके मन उघडे ठेवाल, तितका देवाच्या दयेचा प्रवाह तुमच्यावर भरभरून वाहील. पण तुम्ही जितके मन बंद ठेवाल, तितके काय गमावले आहे याची जाणीव तुम्हाला होईल.

आज कल्पना करा की तुम्ही या नगरांपैकी एका नगरात आहात आणि त्यावर चिंतन करा. देवाला तुमच्याशी जे काही बोलायचे आहे, ते ऐकण्यास तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे मनाची दारे बंद केली आहेत, याचा विचार करा. आपले अंतःकरण पूर्णपणे उघडा, अगदी लक्षपूर्वक ऐका, शुभवर्तमानाच्या संदेशासमोर नम्र व्हा आणि तो स्वीकारून त्यानुसार आपले जीवन बदलण्यास तयार राहा. देवाच्या राज्याचे सदस्य होण्याचा दृढ निश्चय करा, म्हणजे देव तुम्हाला जे काही सांगतो, त्याने तुमच्या जीवनाचे रूपांतर होईल.

हे माझ्या दयाळू प्रभू, कठोर अंतःकरणाच्या लोकांशी तू जेव्हा कठोरपणे वागतोस आणि त्यांना शिक्षा करून शिस्त लावतोस, तेव्हा त्यांच्यावर तू परम दया करतोस. हे प्रिय प्रभू, माझे अंतःकरण मृदू कर. जेव्हा मी हट्ट धरतो आणि माझ्या अंतःकरणाची दारे बंद करतो, तेव्हा तुझ्या अपार प्रेमाने माझी कानउघाडणी कर, म्हणजे मी नेहमी पूर्ण अंतःकरणाने पुन्हा तुझ्याकडे आणि तुझ्या तारणदायी संदेशाकडे वळेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


पित्याच्या आत्म्याच्या प्रेरणेने बोलणे

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा शुक्रवार

“जेव्हा ते तुम्हाला ताब्यात देतील, तेव्हा कसे बोलावे किंवा काय बोलावे याची चिंता करू नका. काय बोलायचे हे त्याच क्षणी तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नसाल, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्यामधून बोलेल.” मत्तय 10:19–20

हा धडा समजायला सोपा आहे, पण आचरणात आणायला फार कठीण आहे. देवाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी प्रेषित बाहेर पडतील, तेव्हा त्यांना न्यायालयांच्या हवाली केले जाईल, सभास्थानांत फटके मारले जातील आणि राज्यपाल व राजे यांच्यासमोर नेले जाईल, असे सांगताना येशू ही शिकवण देतो. शुभवर्तमान सांगितल्यामुळे नगरोनगरी त्यांचा छळ होईल. धीर देण्यासाठी सांगितलेले हे शब्द सुरुवातीला फारसे उत्साहवर्धक वाटणार नाहीत; तरी वर उद्धृत केलेल्या शुभवर्तमानाच्या उताऱ्यातून त्यांना मोठा धीर मिळायला हवा. अर्थात, त्यांनी श्रद्धेने येशूच्या सल्ल्याप्रमाणे वागले तरच.

जेव्हा लोक आपला निषेध करतात, आपल्याबद्दल निकाल लावतात किंवा आपला गैरसमज करून घेतात, तेव्हा आपण लगेच मनातल्या मनात स्वतःची बाजू मांडू लागतो. आपण आपल्या कृतींचे समर्थन करतो आणि मनातच न्यायालय भरवतो. तिथे न्यायाधीश आणि पंच या दोन्ही भूमिका आपणच घेतो आणि समोरच्यांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावतो. परंपरेने ज्याला “आत्मप्रेम” म्हटले जाते, ते पाप अहंकारातून उद्भवते; ते खरे प्रेम मुळीच नाही. केवळ आपल्या मानवी शहाणपणावर आणि सल्ल्यावर विसंबून स्वतःचा बचाव करण्याचा मोह ते आपल्याला पाडते.

वर दिलेल्या येशूच्या शिकवणीचा नीट विचार केला, तर ती स्वीकारणे फार कठीण आहे, हे बहुतेकांच्या लक्षात येईल. या शिकवणीचा गाभा असा आहे: कोणी तुमचा दोष लावला किंवा तुम्हाला वाईट वागणूक दिली, तर मनात मौन राखा. त्या व्यक्तीने केलेल्या जखमेचा लगेच विचार करत बसू नका. तुमच्यावर अन्याय झाला असे वाटले, तरी त्याच विचाराने पछाडून जाऊ नका. आपला छळ होत आहे असे वाटले, तरी काळजी करू नका किंवा मनात चिंता भरू देऊ नका. त्याऐवजी येशूकडे दृष्टी वळवा आणि केवळ त्याच्या वाणीकडे व त्याच्या सत्याकडे लक्ष द्या. तुम्हाला झालेल्या जखमेकडे पाहण्याऐवजी ती जखम करणाऱ्या व्यक्तीकडे पाहा. आणि तिच्याकडे प्रेमाने पाहा. ती व्यक्ती तुमची शत्रू नाही; सत्यासाठीचा संघर्ष तिच्या अंतःकरणात चालला आहे. देवाचे सत्य तिला ऐकू यावे यासाठी मदत करणे, हे तुमचे ध्येय आहे. हे कसे करायचे? येशूचे उत्तर सरळ आहे: “काय बोलायचे, ते त्याच क्षणी तुम्हाला दिले जाईल.” शिवाय, अशा प्रसंगी तुमच्याद्वारे बोलणारा “तुमच्या पित्याचा आत्मा” असला पाहिजे, हे येशू स्पष्ट करतो.

ही शिकवण आचरणात आणण्यासाठी विशेषतः दोन गोष्टी आवश्यक आहेत: नम्रता आणि विश्वास. नम्रतेमुळे स्वतःवरच प्रेम करण्याचा मोह (अहंकार) बाजूला सारता येतो. देव तुमच्याशी बोलत असताना त्याचा आवाज ऐकण्यासाठी आणि शेवटी त्याला तुमच्यामार्फत बोलू देण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. दुसरे म्हणजे, येशू जे सांगतो ते खरे आहे, असा विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही नम्र असाल आणि त्याचा आवाज ऐकण्यास तयार असाल, तर त्याचे शब्द बोलले जावेत अशी त्याची इच्छा असेल तेव्हा तो ते शब्द तुम्हाला देईल, असा तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. हे कठीण आहे, कारण देव जितके बोलायचे ठरवतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक बोलण्याची आपल्याला अनेकदा इच्छा होते. अन्यायाला सामोरे जाताना मौन पाळण्यास देव आपल्याला अनेकदा बोलावतो. त्या मौनात आपला छळ करणाऱ्याविषयीही प्रेम असते. यासाठी देवाच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवावा लागतो, आणि त्यातून तुमच्यात देवाविषयी व इतरांविषयी विपुल प्रेम फुलते.

आज आपल्या प्रभूच्या या शिकवणीवर चिंतन करा. कोणी तुम्हाला दोष देतो किंवा तुमच्याविषयी न्यायनिवाडा करतो, तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते, याचा विचार करा. अशा छळाला तुम्ही कसा प्रतिसाद देता? प्रथम मौन राखा, मग त्या व्यक्तीकडे प्रेमाने पाहा आणि प्रभू काय सांगतो ते ऐकण्यासाठी थांबा. काय बोलायचे ते शब्द तो तुम्हाला देईपर्यंत वाट पाहा. हे केवळ तुमचा छळ करणाऱ्या व्यक्तीच्या हिताचे नाही, तर तुमच्या आत्म्यासाठी आणि तुमच्या जीवनाच्या पवित्रतेसाठीही विशेष हिताचे आहे.

हे माझ्या सहनशील प्रभू, तू जगाचा तारणारा आणि सर्वांचा देव असूनही, लोकांना तुझ्यावर खोटे आरोप करू दिलेस, तुझा न्याय करू दिलास आणि तुला दोषी ठरवून शिक्षा सुनावू दिलीस. हे सर्व घडत असताना तू मौन पाळलेस आणि पिता तुझ्यामार्फत बोलला तेव्हाच तू बोललास. हे प्रिय प्रभू, सर्व अहंकारातून मुक्त होण्यास मला मदत कर, म्हणजे मी केवळ तुझे पवित्र शब्द बोलेन, तू प्रेरणा दिलेले विचारच मनात बाळगेन आणि केवळ तुझ्या प्रेमाच्या पवित्र आज्ञेनुसार वागेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


देवाची कुजबुज

सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा शनिवार

“मी तुम्हाला अंधारात जे सांगतो, ते उजेडात बोला; कुजबुजून सांगितलेले जे तुम्ही ऐकता, ते घरांच्या छतांवरून जाहीर करा.” मत्तय 10:27

आपला प्रभू “अंधारात” तुम्हाला काय सांगतो? त्याच्या “कुजबुजीतून” तुम्हाला काय ऐकू येते? या प्रश्नाचा विचार करणे महत्त्वाचे आहे, कारण अशा रीतीने जे काही सांगितले जाते, ते “प्रकाशात” सांगितले पाहिजे आणि “घरांच्या छपरांवरून” जाहीर केले पाहिजे.

आठवा: येशूविषयी कुतूहल वाटून लोक प्रथम त्याच्याकडे येत, तेव्हा तो अनेकदा आपला अर्थ थेट उघड न करता, लाक्षणिक भाषेत आणि दाखल्यांतून बोलत असे. आपल्याला देवाचे सत्य अधिकाधिक खोलवर उलगडून दाखवण्याच्या येशूच्या कार्यातील ही पहिली पायरी आहे. ऐकणाऱ्याचे लक्ष वेधून घेऊन त्याने त्यातील अधिक खोल संदेशाकडे लक्ष द्यावे, हाच येशूच्या दाखल्यांचा आणि त्याने वापरलेल्या विविध लाक्षणिक अभिव्यक्तींचा हेतू आहे.

येशूने आपल्या शिष्यांना काय सांगितले, तेही आठवा: “हे मी तुम्हाला लाक्षणिक भाषेत सांगितले आहे. अशी वेळ येत आहे, जेव्हा मी तुमच्याशी यापुढे लाक्षणिक भाषेत बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन” (योहान 16:25). आपला प्रभू तुमच्याशी कोणत्या रीतीने बोलतो?

आपण श्रद्धेत वाढतो आणि आपल्या प्रभूशी आपली जवळीक वाढत जाते, तसतसा तो जणू काही “पडदा बाजूला सारू” लागतो. आपल्या आत्म्याच्या अगदी गाभ्यात तो आपली सर्वांत गहन सत्ये हळुवारपणे सांगू लागतो. त्याच्या दाखल्यांत आणि लाक्षणिक भाषेत दडलेल्या संदेशाच्या कितीतरी पलीकडे जाऊन तो आपल्याशी संवाद साधतो आणि शब्दांच्या पलीकडच्या रीतीने स्वतःलाच आपल्यासमोर प्रकट करतो.

वरचा शुभवर्तमानातील उतारा स्वतंत्रपणे पाहिला, तर देवाला आपल्याशी पुष्कळ काही स्पष्टपणे बोलायचे आहे, असे त्यातून दिसते. पण हे त्याला आपल्या अंतर्जीवनाच्या “अंधारात” हळुवार कुजबुजत सांगायचे आहे. आपण आपले सारे लक्ष त्याच्याकडे लावतो, तेव्हाच ती कुजबुज ऐकू येते. उदाहरणार्थ, संत योहान क्रूसकर “श्रद्धेच्या अंधाराविषयी” पुष्कळ बोलतात. त्याच अंधारातून प्रभूकडून येणारा सर्वांत गहन संवाद आपल्याला अनुभवता येतो. हा संवाद शब्द, संकल्पना आणि प्रतिमा यांच्या पलीकडचा आहे. तो थेट आणि आध्यात्मिक रीतीने, केवळ देवाने अंतःकरणात ओतलेल्या प्रार्थनेद्वारेच घडू शकतो. अशी प्रार्थना आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी साध्य करता येत नाही; ती देवाची देणगी आहे. तिच्याद्वारे देव तुम्हाला सतत अधिक खोलवर नेतो. तुम्ही त्याला प्रतिसाद देता, तो तुम्हाला आणखी खोलवर बोलावतो आणि तुम्ही प्रतिसाद देत राहता.

वरच्या शुभवर्तमानातील उताऱ्यातून हेही स्पष्ट होते की ही अत्यंत निर्मळ श्रद्धा आपण इतरांपर्यंत पोहोचवावी, अशी देवाची इच्छा आहे. ती प्रकाशात सांगावी आणि घरांच्या छपरांवरून जाहीर करावी. हे सर्वप्रथम आपल्या जीवनाच्या साक्षीतून घडते: केवळ देवच घडवू शकतो अशा रीतीने त्याची परिवर्तन घडवणारी कृपा आपल्यातून उजळून दिसू द्यायची. देवाला तुमच्याद्वारे आपली अधिक गहन आणि अनेकदा दडलेली सत्ये इतरांना सांगायची असतात, अशा क्षणांकडे लक्ष देऊनही हे घडते. देवाने प्रथम ती सत्ये तुम्हाला सांगितली पाहिजेत. मग कधी कधी तो आपल्या कृपेची प्रेरणा देऊन तुमच्याद्वारे इतरांना स्वतःची ओळख करून देतो.

आपल्या प्रभूने सांगितलेल्या या दोन कृतींवर आज चिंतन करा. प्रथम त्याचे ऐका. ‘श्रद्धेच्या अंधारात’ त्याचे ऐका. त्याच्या प्रेमाविषयी, दयेविषयी आणि तो स्वतः कोण आहे याविषयी तुमच्या अंतःकरणात खोल आणि अढळ खात्री निर्माण करू द्या. मग, आपल्या प्रभूने पवित्र रीतीने तुमच्या अंतःकरणात जे उलगडले आहे त्याचा आस्वाद घेत असताना, तो तुमच्याद्वारे इतरांशी कोणत्या मार्गांनी बोलू इच्छितो हे पाहा. त्याचा संदेश सांगण्याची सुरुवात तुम्ही स्वतःहून करण्याची गरज नाही; तो दिशा दाखवेल तेव्हा तुम्ही फक्त प्रतिसाद द्या. अशा रीतीने तुमचे प्रार्थनाजीवन सखोल होत जाईल, तशी तुम्हाला आपल्या प्रभूची शब्दांपलीकडची ओळख तर होईलच, पण तो तुमच्याद्वारे इतरांशी कसे आणि केव्हा बोलू इच्छितो हेही समजेल.

हे माझ्या प्रेमळ येशू, माझ्याशी आणि तुझ्या सर्व मुलांशी अगदी अंतःकरणापर्यंत पोहोचेल अशा, शब्दांच्या पलीकडच्या रीतीने बोलण्याची तुझी इच्छा आहे. तुझ्या प्रेमाच्या या संवादात मला आणखी खोलवर ने, म्हणजे मला पडद्यापलीकडे पाहता येईल आणि तू जसा आहेस तसा तुला ओळखता येईल. हे प्रिय प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे इतरांशी बोलण्यासाठीही माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अनुक्रमणिका


चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!

अ‍ॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल