चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!
ख्रिस्ताच्या जन्माचे चिंतन
प्रभूचा जन्म (नाताळचा दिवस)
मग ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरिया, योसेफ आणि गव्हाणीत निजलेले बाळ दिसले. हे पाहिल्यावर, या बाळाविषयी त्यांना सांगण्यात आलेला संदेश त्यांनी इतरांना सांगितला. मेंढपाळांनी सांगितलेले ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. मरियेने मात्र या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या आणि ती त्यांवर चिंतन करत राहिली. लूक 2:16–19
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! आगमनकाळातील आपली तयारी पूर्ण झाली आहे, आणि आता आपला प्रभू आपल्याला त्याच्या जन्माच्या गौरवशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे!
नाताळचे विस्मयकारक रहस्य तुम्हाला कितपत समजले आहे? देव मनुष्य झाला आणि एका कुमारीच्या पोटी जन्मला, याचे महत्त्व तुम्हाला किती खोलवर उमगले आहे? जगाच्या तारणकर्त्याच्या जन्माची सुंदर आणि साधी कथा अनेकांच्या चांगलीच परिचयाची आहे. पण या ओळखीचा एक अनपेक्षित दुष्परिणाम होऊ शकतो: आपण जे साजरे करतो त्याचा गहन अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्नच आपली बुद्धी करीत नाही.
वर उद्धृत केलेल्या सुवार्तेतील शेवटच्या वाक्याकडे लक्ष द्या: “मरियेने मात्र या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या आणि ती त्यांवर चिंतन करत राहिली.” नाताळच्या या दिवशी मनन करण्यासाठी किती सुंदर वाक्य आहे हे! आपल्या पुत्राच्या, म्हणजेच देवाच्या पुत्राच्या आणि जगाच्या तारणकर्त्याच्या जन्माचे रहस्य माता मरियेला इतर कोणाहीपेक्षा कितीतरी अधिक खोलवर उमगले असेल. गाब्रिएल प्रधानदूत तिलाच प्रकट झाला आणि ती गर्भवती होईल व तिच्या पुत्राचा जन्म होईल, अशी घोषणा त्याने केली. तिनेच आपल्या पुत्राला, देवाच्या पुत्राला, नऊ महिने आपल्या निष्कलंक गर्भात वाढवले. तिची चुलत बहीण एलिझाबेथ तिलाच मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू सर्वांत धन्य आहेस आणि तुझ्या गर्भाचे फळ धन्य आहे” (लूक 1:42). मरिया स्वतःच्या गर्भधारणेच्या क्षणापासूनच मूळ पापापासून मुक्त होती आणि आयुष्यभर सर्व पापांपासून जपली गेली. तिनेच या बाळाला जन्म दिला, त्याला कुशीत घेतले आणि अंगावर पाजले. आपल्या जीवनात घडलेली ही अद्भुत घटना आपल्या धन्य मातेला इतर कोणाहीपेक्षा अधिक खोलवर समजली होती.
पण पुन्हा लक्षात घ्या, वरच्या सुवार्तेत म्हटले आहे: “मरियेने मात्र या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या आणि ती त्यांवर चिंतन करत राहिली.” यावरून एक गोष्ट आपल्याला कळते: येशूची माता आणि देवमाता असलेल्या मरियेलाही या परमपवित्र रहस्याचे मनन व चिंतन करण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी वेळ हवा होता. तिने कधीही शंका घेतली नाही; उलट तिची श्रद्धा सतत अधिक गाढ होत गेली आणि तिचे अंतःकरण मानवी आकलनापलीकडील या अथांग देहधारणेच्या रहस्यावर चिंतन करत राहिले.
यावरून आणखी एक गोष्ट आपल्याला कळते: देवाच्या पुत्राच्या जन्माचे रहस्य अधिक खोलवर उलगडावे असे आपल्याला वाटत असेल, तर आपण निष्ठेने मनन करत राहिले पाहिजे, कारण हे मनन किती खोलवर जाऊ शकते याला मर्यादा नाही. जन्मकथा वाचणे, नाताळचा गोठा उभारणे, शुभेच्छापत्रे देणे, मिस्साबलिदानात सहभागी होणे आणि अशा इतर गोष्टींना नाताळच्या पवित्र उत्सवात महत्त्वाचे स्थान आहे. पण ‘मनन’ आणि ‘चिंतन’, विशेषतः प्रार्थनेत आणि नाताळच्या मिस्साबलिदानात, आपल्याला आपल्या श्रद्धेच्या या रहस्यात अधिकाधिक खोलवर घेऊन जातात.
आज आपल्या धन्य मातेसोबत चिंतन करा. देहधारणेच्या रहस्यावर मनन करा. त्या पहिल्या नाताळच्या प्रसंगात आपण स्वतः तिथे आहोत अशी कल्पना करा. गावातले आवाज ऐका. गोठ्यातले वास अनुभवा. बाळाची आराधना करण्यासाठी मेंढपाळ येत आहेत, ते पाहा. या रहस्यात आणखी खोलवर शिरा आणि हे मान्य करा: नाताळच्या रहस्याविषयी जितके अधिक जाणून घ्याल, तितकेच आपल्याला प्रत्यक्षात किती थोडे माहीत आहे आणि किती थोडे उमगले आहे, याची जाणीव होईल. पण ही नम्र जाणीव म्हणजे आज आपण जे साजरे करतो ते अधिक खोलवर समजून घेण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.
हे प्रभू, तुझ्या जन्माच्या अद्भुत रहस्याकडे मी विस्मयाने पाहतो. तू देव आहेस, परमपवित्र त्रिमूर्तीतील दुसरी व्यक्ती, देवापासून देव आणि प्रकाशापासून प्रकाश. तरीही तू आमच्यापैकी एक झालास. एका कुमारीच्या पोटी नम्र बालक म्हणून तू जन्मलास आणि तुला गव्हाणीत ठेवण्यात आले. या गौरवशाली घटनेवर चिंतन करण्यास, या रहस्याचा विस्मयाने विचार करण्यास आणि तू आमच्यासाठी जे केलेस त्याचा अर्थ अधिक पूर्णपणे समजून घेण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, जगातील तुझ्या जन्माचा हा गौरवशाली उत्सव साजरा करताना मी तुझे आभार मानतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
कुटुंब: प्रेमाचे जिव्हाळ्याचे नाते
येशू, मरिया आणि योसेफ यांचे पवित्र कुटुंब
नाताळच्या अष्टकातील रविवार (किंवा अष्टकात रविवार येत नसेल तर 30 डिसेंबर)
प्रभूच्या नियमशास्त्रातील सर्व विधी पूर्ण केल्यावर ते गालीलात आपल्या नाझरेथ या गावी परतले. बालक वाढत गेले, बलवान झाले आणि ज्ञानाने परिपूर्ण झाले; देवाची कृपा त्याच्यावर होती. लूक 2:39–40 (शुभवर्तमान वर्ष ब)
आज आपण थोडे थांबून येशू, मरिया आणि योसेफ यांच्या घरातील जगाच्या नजरेआड राहिलेल्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण जीवनावर मनन करतो. अशा रीतीने आपण कौटुंबिक जीवनाचा सन्मान करतो. अनेक बाबतींत त्यांचे दैनंदिन कौटुंबिक जीवन त्या काळातील इतर कुटुंबांसारखेच असावे. पण काही बाबतींत त्यांचे सहजीवन अगदी अद्वितीय होते आणि ते सर्व कुटुंबांसाठी एक परिपूर्ण आदर्श आहे.
देवाच्या दैवी योजनेनुसार, येशू, मरिया आणि योसेफ यांच्या कौटुंबिक जीवनाचा पवित्र शास्त्रात फार थोडा उल्लेख आहे. येशूचा जन्म, मंदिरात त्याचे समर्पण, इजिप्तला पलायन आणि बारा वर्षांचा येशू मंदिरात सापडणे, या प्रसंगांविषयी आपण वाचतो. पण त्यांच्या सहजीवनातील या प्रसंगांव्यतिरिक्त आपल्याला फार थोडी माहिती आहे.
तरीही, आजच्या सुवार्तेतील वर उद्धृत केलेले वाक्य आपल्याला मनन करण्यासारखी एक गोष्ट सांगते. सर्वप्रथम आपण पाहतो की या कुटुंबाने “प्रभूच्या नियमशास्त्रातील सर्व विधी पूर्ण केले…” हे येशूच्या मंदिरातील समर्पणाविषयी म्हटले असले, तरी ते त्यांच्या सहजीवनाच्या सर्व अंगांना लागू होते, हेही आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच आपले कौटुंबिक जीवनही प्रभूच्या नियमांनुसार चालले पाहिजे.
कौटुंबिक जीवनाविषयी प्रभूची मुख्य आज्ञा ही आहे की, परमपवित्र त्रैक्याच्या जीवनातील ऐक्यात आणि ‘प्रेमाच्या सहभागितेत’ कुटुंबानेही सहभागी व्हावे. पवित्र त्रैक्यातील प्रत्येक व्यक्ती इतरांचा पूर्ण आदर करते, निःस्वार्थपणे व काहीही राखून न ठेवता स्वतःला इतरांना अर्पण करते आणि प्रत्येकाचा संपूर्णपणे स्वीकार करते. त्यांचे प्रेमच त्यांना एक करते आणि दैवी व्यक्तींच्या सहभागितेत परिपूर्ण सुसंवादाने एकत्र कार्य करण्यास समर्थ करते. संत योसेफ स्वभावतः निष्कलंक नव्हते, तरी त्यांच्या दैवी पुत्राच्या आणि निष्कलंक पत्नीच्या जीवनात परिपूर्ण प्रेम नांदत होते. त्यांच्या परिपूर्ण प्रेमाची ही अपार देणगी संत योसेफांना दररोज त्यांच्या जीवनाच्या परिपूर्णतेत अधिकाधिक सहभागी करून घेत असेल.
आज तुमच्या सर्वांत जवळच्या नात्यांवर चिंतन करा. जिव्हाळ्याचे कुटुंब तुम्हाला लाभले असेल, तर त्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करा. तसे नसेल, तर तुमच्या जीवनात आलेल्या ज्या व्यक्तींवर स्वतःच्या कुटुंबीयांप्रमाणे प्रेम करण्यास तुम्हाला बोलावले आहे, त्यांचा विचार करा. सुखात आणि दुःखात तुम्ही कोणाच्या पाठीशी उभे राहायला हवे? कोणासाठी तुम्ही काहीही राखून न ठेवता आपले जीवन अर्पण करायला हवे? तुम्ही कोणाशी आदराने, करुणेने, दयेने आणि उदारतेने वागायला हवे, कोणासाठी आपला वेळ आणि शक्ती द्यायला हवी, आणि कोणाशी वागताना इतर सर्व सद्गुण आचरणात आणायला हवेत? आणि प्रेमाचे हे कर्तव्य तुम्ही किती चांगल्या प्रकारे पार पाडता?
आज या गोष्टीवर चिंतन करा: तुम्ही केवळ परमपवित्र त्रैक्याशीच नव्हे, तर तुमच्या भोवतालच्या लोकांशीही, विशेषतः आपल्या कुटुंबीयांशी, जीवनाच्या सहभागितेत राहावे अशी देवाची इच्छा आहे. येशू, मरिया आणि योसेफ यांच्या गुप्त जीवनावर मनन करा आणि इतरांवर प्रेम करताना त्यांच्या कौटुंबिक नात्याचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांची परिपूर्ण प्रेमसहभागिता आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरो.
हे प्रभू, तुझ्या निष्कलंक मातेसोबत आणि संत योसेफांसोबत तू ज्या प्रेमाने आणि ऐक्याने जीवन जगलास, त्या जीवनात मला सामावून घे. मी स्वतःला, माझ्या कुटुंबाला आणि ज्यांच्यावर विशेष प्रेम करण्यास मला बोलावले आहे अशा सर्वांना तुला अर्पण करतो. माझ्या सर्व नात्यांत तुझ्या कुटुंबातील प्रेमाचे आणि जीवनपद्धतीचे मला अनुकरण करता येवो. तुझ्या कौटुंबिक जीवनात अधिक पूर्णपणे सहभागी होण्यासाठी मी कसे बदलावे आणि माझी वाढ कशी व्हावी, हे समजून घेण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
देवाने वचन दिलेली प्रेरणा
प्रथम रक्तसाक्षी संत स्तेफन यांचा सण
नाताळच्या अष्टकाचा दुसरा दिवस, 26 डिसेंबर
“जेव्हा ते तुम्हाला ताब्यात देतील, तेव्हा कसे बोलावे किंवा काय बोलावे याची चिंता करू नका. काय बोलायचे हे त्याच क्षणी तुम्हाला सुचवले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नसाल, तर तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्यामधून बोलेल.” मत्तय 10:19–20
आपल्या प्रभूचे हे शब्द चर्चचे पहिले रक्तसाक्षी संत स्तेफन यांच्या जीवनात खरे ठरले. येशूच्या स्वर्गारोहणानंतर एक-दोन वर्षांतच संत स्तेफन यांना रक्तसाक्षित्व आले. चर्चचा विस्तार होऊ लागला तेव्हा गरिबांची काळजी घेण्याच्या कामात मदत करण्यासाठी प्रेषितांनी सात उपयाजक नेमले. स्तेफन त्यांच्यापैकी एक होते.
स्तेफन यांची श्रद्धा दृढ होती आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. उपयाजक म्हणून नेमणूक झाल्यावर ते धैर्याने उपदेश करू लागले. त्यांचे ऐकणाऱ्यांमध्ये ग्रीक संस्कृतीचा प्रभाव असलेल्या यहुद्यांच्या सभास्थानाचे सदस्यही होते. स्तेफन यांनी त्यांच्याशी जोरदार वादविवाद केला. त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे व अद्भुत कृत्ये करून आपण ज्ञानाने व सामर्थ्याने परिपूर्ण आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. पण यामुळे त्यांचे श्रोते इतके संतापले की ते स्तेफन यांचा जीव घेण्यास टपले. म्हणून त्यांनी स्तेफन मंदिराच्या आणि मोशेच्या नियमशास्त्राच्या विरोधात उपदेश करीत आहेत, असा खोटा आरोप केला.
प्रेषितांची कृत्ये या ग्रंथात (प्रेषितांची कृत्ये 7:2–53) दिल्याप्रमाणे, स्तेफन यांनी याला एका दीर्घ आणि सविस्तर भाषणाने उत्तर दिले. त्यात त्यांनी जुन्या कराराच्या प्रकाशात येशूविषयीचे संपूर्ण सत्य उलगडून सांगितले. शेवटी स्तेफन म्हणाले, “अहो ताठ मानेच्या लोकांनो, तुमची हृदये आणि कान सुंता न झालेले आहेत. तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता; तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखेच आहात.” हे ऐकून सभास्थानातील त्यांचे श्रोते आणखी संतापले. यानंतर खरोखरच एक चमत्कार घडला. स्तेफन यांना दर्शन झाले. त्यांनी स्वर्गाकडे पाहिले आणि म्हटले, “पाहा, स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र देवाच्या उजव्या हाताशी उभा असलेला मला दिसत आहे.” त्यांना आपला प्रभू पित्याच्या उजव्या हाताशी उभा असलेला दिसला. त्यांनी हे दर्शन उघडपणे सांगितले, तेव्हा संतप्त जमावाने अखेर त्यांना सभास्थानाबाहेर आणि शहराबाहेर फरफटत नेले व दगडमार करून ठार केले. तरीही स्तेफन यांच्या कथेचा शेवट सुंदर आणि ईशप्रेरित होता. जमाव त्यांच्यावर दगड मारीत असताना त्यांनी दोन प्रभावी वचने उच्चारली. प्रथम ते म्हणाले, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग त्यांनी मोठ्या आवाजात प्रार्थना केली, “प्रभू, हे पाप त्यांच्या खात्यावर धरू नकोस.”
वर सांगितल्याप्रमाणे, आजच्या शुभवर्तमानात आपला प्रभू जे बोलतो, ते संत स्तेफन यांच्या जीवनात प्रत्यक्ष घडले. सर्वप्रथम, आपल्या काही अनुयायांना त्यांचे स्वतःचे नातेवाईकच जिवे मारण्यासाठी इतरांच्या हाती देतील, हे येशूचे भाकीत संत स्तेफन यांच्या बाबतीत खरे ठरले. पण असे घडेल तेव्हा, “काय बोलायचे हे त्याच क्षणी तुम्हाला सुचवले जाईल,” असे अभिवचनही येशूने दिले होते. आणि “तुमच्याद्वारे बोलणारा” पित्याचा आत्माच असेल. संत स्तेफन यांच्या बाबतीत नेमके हेच घडले. प्रथम, त्यांना स्वर्गाचे तेजोमय दर्शन घडले. मग, आपला आत्मा पूर्णपणे येशूच्या हाती सोपवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. शेवटी, आपला छळ करणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची आणि त्यांना क्षमा करण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली. हे शब्द आणि या कृती केवळ स्तेफन यांच्याकडून आलेल्या नव्हत्या. शुभवर्तमानासाठी एखाद्याचा छळ होतो तेव्हा पिता विशेष रीतीने उपस्थित राहील आणि गरजेच्या क्षणी समर्थ प्रेरणा देईल, या येशूच्या अभिवचनाची ती पूर्तता होती.
देव आपल्याला कधीही सोडून देत नाही, या गहन सत्यावर आज चिंतन करा. खरे तर, आपण सर्वाधिक दुःख भोगतो किंवा छळ, नकार किंवा कोणत्याही प्रकारची गैरवागणूक सहन करतो, तेव्हा देव विशेष रीतीने आपल्याजवळ असतो. आपल्या जीवनाकडे पाहा आणि तुम्हाला सर्वांत कठीण वाटणाऱ्या प्रसंगांचा विचार करा. संत स्तेफन यांच्याकडे विनंती करा की त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना करावी, जेणेकरून ज्या क्षणी तुम्हाला सर्वाधिक गरज असेल, त्या क्षणी आपल्या प्रभूच्या प्रेरणेने येणारे शब्द आणि घडणाऱ्या कृती यांचा स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल.
हे परम गौरवशाली संत स्तेफन, माझ्यासाठी प्रार्थना करा. विशेषतः माझ्या जीवनातील सर्वांत जड क्रूस वाहावे लागतात तेव्हा माझ्यासाठी प्रार्थना करा. ज्या क्षणी मला सर्वाधिक गरज असेल, त्या क्षणी तुमच्याप्रमाणेच देवाची प्रेरणा आणि कृपा स्वीकारण्यास माझे मन खुले राहावे म्हणून प्रार्थना करा. संत स्तेफन, माझ्यासाठी प्रार्थना करा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रिय शिष्य
संत योहान, प्रेषित आणि सुवार्तिक यांचा सण
ख्रिस्तजन्माच्या अष्टकाचा तिसरा दिवस, 27 डिसेंबर
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मरिया मग्दालेना धावत शिमोन पेत्राकडे आणि येशूचे प्रेम असलेल्या दुसऱ्या शिष्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला थडग्यातून नेले आहे, आणि त्याला कुठे ठेवले आहे हे आम्हाला माहीत नाही.” तेव्हा पेत्र आणि तो दुसरा शिष्य निघाले आणि थडग्यापाशी आले. योहान 20:1–3
संत योहान स्वतःचा उल्लेख ‘ज्या शिष्यावर येशूचे प्रेम होते’ असा करतात, ही गोष्ट लक्षवेधी आहे. अर्थात, येशूचे सर्व लोकांवर प्रेम होते. त्याचे सर्व शिष्यांवरही प्रेम होते. पण योहान यांच्या शुभवर्तमानात ‘प्रिय शिष्य’ ही खास ओळख योहान यांनाच दिली आहे.
संत योहान प्रेषित हेच ते प्रिय शिष्य होते, असे मानण्याची अनेक कारणे आहेत. प्रथम, शेवटच्या भोजनाच्या वेळी योहान येशूच्या शेजारी पहुडले होते; त्यातून त्यांची येशूशी असलेली विशेष जवळीक आणि त्याच्याविषयीची माया दिसून येते, हे आठवा. हेही आठवा की क्रुसाच्या पायाशी येशूच्या आईबरोबर उभे राहणारे योहान हे एकमेव शिष्य होते. येशूने आपल्या आईला योहान यांच्या स्वाधीन केले आणि योहान यांना आपल्या आईच्या स्वाधीन केले. वर दिलेल्या उताऱ्यात हेही लक्षात घ्या की मरिया मग्दालेना हिने आपल्याला काय आढळले ते सांगताच रिकाम्या थडग्याकडे सर्वांत आधी धाव घेणारे योहानच होते. शिवाय, अनेक विद्वानांच्या मते योहान हे सर्वांत तरुण शिष्य होते. त्यामुळे आपल्या प्रभूने त्यांच्याकडे पित्याच्या मायेने विशेष लक्ष दिले असावे.
तरीही, योहान यांना प्रिय शिष्य का म्हणावे याचे आणखी एक कारण असू शकते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, आपले शुभवर्तमान लिहिताना योहान स्वतःकडे याच नजरेने पाहत होते. येशूच्या जीवनाची कथा सांगणे ही त्यांच्यासाठी अत्यंत वैयक्तिक गोष्ट होती, म्हणून कदाचित त्यांनी स्वतःचा असा उल्लेख केला असावा. आपल्या प्रभूविषयीचे प्रेम आणि जिव्हाळा ही त्यांच्या आत्म्याची सर्वांत प्रबळ ओढ होती; त्या ओढीने त्यांचे सारे जीवन व्यापले होते. येशूविषयी आणि त्याच्याशी झालेल्या स्वतःच्या भेटींविषयी सांगताना, येशूचे आपल्यावर असलेले पवित्र, आध्यात्मिक प्रेम प्रार्थनापूर्वक चिंतावे, अशी तीव्र ओढ योहान यांना वाटली असावी. म्हणूनच, प्रभूशी झालेल्या भेटींविषयी सांगताना, त्या दोघांना एकत्र बांधणाऱ्या दैवी प्रेमाचा उल्लेख केल्याशिवाय योहान यांना राहवत नसावे. जणू त्यांच्या शुभवर्तमानात येशूशी झालेली एखादी भेट वर्णन करताना प्रत्येक वेळी, देवाचा पुत्र, मशीहा येशू आपल्याला व्यक्तिशः ओळखतो आणि आपल्यावर प्रेम करतो, या साध्या सत्याने योहान भारावून जात असत. म्हणूनच ते सत्य पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नसे.
या दृष्टीने योहान यांच्या अंतःकरणाचे चिंतन करणे हा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव आहे. येशूच्या व्यक्तीत देवाने त्यांच्या अंतःकरणाला खोलवर स्पर्श केला होता, हे स्पष्ट दिसते. आणि येशू स्वर्गात आरोहण केल्यानंतर त्याच्यावरील योहान यांचे पवित्र प्रेम वाढतच गेले, असे दिसते. प्रेषित म्हणून ते आपल्या तारणाऱ्या आणि जिवलग मित्राद्वारे मिळणाऱ्या तारणाची सुवार्ता सांगत गेले, तसे ते दिवसेंदिवस आपल्या प्रभूच्या अधिक जवळ येत गेले, हे स्पष्ट आहे. आपल्या जीवनाच्या अखेरीस योहान यांनी शुभवर्तमान लिहिले, तेव्हा त्यांचे हृदय दैवी प्रेमाने जळत होते, हे स्पष्ट जाणवते. स्वर्गात आपल्या प्रभूशी पूर्णपणे एकरूप होण्याची त्यांना तीव्र आस लागली होती.
या अद्वितीय आणि पवित्र प्रेषिताचा सन्मान करताना आज या साध्या सत्यावर चिंतन करा: येशू आणि संत योहान यांच्या जिव्हाळ्याच्या पवित्र प्रेमात सहभागी होण्याचे आमंत्रण तुम्हालाही आहे. आपला प्रभू तुमच्यावरही किती जिव्हाळ्याने, परिपूर्ण आणि सर्वस्व देणारे प्रेम करतो, यावर मनन करा. या लाडक्या शिष्याच्या हृदयातील प्रेम तुम्हाला न्याहाळता आले, तर तुम्हीही त्या प्रेमात सहभागी होऊन प्रभूचे लाडके शिष्य बनू शकता.
हे माझ्या प्रिय प्रभू, योहान या शिष्यावर तू केलेले प्रेम सर्वार्थाने परिपूर्ण होते. तू स्वर्गात आरोहण केल्यानंतरही त्याच्याशी असलेले तुझे नाते अधिक दृढ करत राहिलास आणि त्याला तुझ्या पवित्र हृदयाच्या अधिकाधिक जवळ घेतलेस. तेच प्रेम माझ्यावरही विपुलपणे वर्षव आणि मला तुझ्या हृदयात सामावून घे, जेणेकरून मीही तुझा लाडका शिष्य होईन. हे संत योहान, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दुष्टाईला सामोरे जाण्याचे धैर्य
पवित्र निरपराध बालरक्तसाक्षींचा सण
ख्रिस्तजन्माच्या अष्टकाचा चौथा दिवस, 28 डिसेंबर
ज्ञानी पुरुष निघून गेल्यावर पाहा, प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इजिप्तला पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तिथेच राहा. हेरोद बालकाचा जीव घेण्यासाठी त्याचा शोध घेणार आहे.” मत्तय 2:13
आपल्या जगात आजवर घडलेल्या या सर्वांत गौरवशाली घटनेने काहींची मने मात्र द्वेषाने आणि संतापाने भरून गेली. आपल्या लौकिक सत्तेबाबत अत्यंत असूयेने वागणाऱ्या हेरोदाला ज्ञानी पुरुषांनी दिलेल्या बातमीमुळे आपल्या सत्तेला मोठा धोका आहे असे वाटले. नवजात राजा कुठे आहे हे सांगण्यासाठी ते हेरोदाकडे परत आले नाहीत, तेव्हा हेरोदाने कल्पनाही करवणार नाही असे कृत्य केले. बेथलेहेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातल्या दोन वर्षांच्या व त्याहून लहान वयाच्या प्रत्येक मुलाची हत्या करण्याचा त्याने आदेश दिला.
असे कृत्य समजून घेणेही कठीण आहे. सैनिकांना असा दुष्ट कट अमलात आणणे कसे शक्य झाले? त्यामुळे कितीतरी कुटुंबांवर किती खोल दुःख कोसळले आणि त्यांचे संसार कसे उद्ध्वस्त झाले असतील, याची कल्पना करा. एखादा राज्यकर्ता इतक्या निरपराध बालकांची हत्या कशी करू शकला?
आजही अनेक नागरी नेते गर्भातील निरपराध बालकांच्या हत्येला परवानगी देण्याच्या अमानुष प्रथेला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हेरोदाचे कृत्य आज जे घडते त्यापेक्षा अनेक बाबतींत फारसे वेगळे नाही.
वरील उताऱ्यातून आपल्याला पित्याची इच्छा कळते: केवळ त्याच्या दैवी पुत्राचे रक्षण व्हावे असे नव्हे, तर प्रत्येक मानवी जीवनाचे रक्षण व्हावे आणि त्याचे पावित्र्य जपले जावे, अशी त्याची दैवी इच्छा आहे. इतक्या वर्षांपूर्वी त्या अनमोल, निरपराध बालकांची हत्या करण्यास हेरोदाला सैतानानेच प्रवृत्त केले होते, आणि आजही तोच मृत्यू आणि विनाशाच्या संस्कृतीला चालना देत आहे. याला आपला प्रतिसाद काय असावा? संत योसेफांप्रमाणे आपणही सर्वांत निरपराध आणि असुरक्षित जीवांचे अढळ निर्धाराने रक्षण करणे हे आपले पवित्र कर्तव्य मानले पाहिजे. हे नवजात बालक स्वतः देव होते आणि स्वर्गीय पिता असंख्य देवदूतांकरवी आपल्या पुत्राचे रक्षण करू शकला असता. तरी एका मनुष्याने, म्हणजे संत योसेफांनी, आपल्या पुत्राचे रक्षण करावे, अशी पित्याची इच्छा होती. म्हणूनच, निरपराध आणि सर्वांत असुरक्षित जीवांचे, विशेषतः गर्भातील बालकाचे, रक्षण करण्यासाठी आपल्या परीने शक्य ते सर्व करावे, असे पिता आपल्यापैकी प्रत्येकाला सांगत आहे; त्याची ही हाक आपण ऐकली पाहिजे.
आज तुमच्या जीवनाविषयी देवाची काय इच्छा आहे, यावर चिंतन करा. संत योसेफांसारखे होऊन सर्वांत निरपराध आणि असुरक्षित जीवांचे रक्षण करण्यासाठी देव तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे बोलावत आहे? तुमच्या काळजीत सोपवलेल्या व्यक्तींचे रक्षण करण्यासाठी तो तुम्हाला काय करायला सांगत आहे? नागरी पातळीवर गर्भातील बालकांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत. पण प्रत्येक आई-वडिलांनी, आजी-आजोबांनी आणि ज्यांच्यावर इतरांची जबाबदारी सोपवली आहे अशा सर्वांनीही आपल्या काळजीतील व्यक्तींचे इतर असंख्य मार्गांनी रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जगातील दुष्टाईपासून आणि सैतान त्यांच्या जीवनावर करत असलेल्या असंख्य हल्ल्यांपासून त्यांना जपण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. आज या प्रश्नावर मनन करा आणि महान रक्षक संत योसेफ यांचे अनुकरण करण्याच्या तुमच्या कर्तव्याविषयी प्रभूला तुमच्याशी बोलू द्या.
हे प्रभू, मला अंतर्दृष्टी, सुज्ञपणा आणि बळ दे, म्हणजे या जगातील दुष्टतेपासून सर्वांत निरपराध जीवांचे रक्षण करण्यासाठी मला तुझ्या इच्छेनुसार कार्य करता येईल. दुष्टतेला सामोरे जाताना मी कधीही भिऊन मागे हटू नये आणि ज्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, त्यांचे रक्षण करण्याचे कर्तव्य मी नेहमी पार पाडावे. हे संत योसेफ, माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
विस्मय आणि आदरयुक्त आश्चर्य
नाताळच्या अष्टकाचा पाचवा दिवस, 29 डिसेंबर
बालकाविषयी जे सांगितले गेले ते ऐकून त्याच्या आई-वडिलांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बालकाची आई मरिया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलातील अनेकांच्या पतनासाठी आणि उत्थानासाठी, तसेच ज्याला विरोध केला जाईल असे चिन्ह होण्यासाठी, या बालकाची नेमणूक झाली आहे (आणि तलवार तुलाही भेदून जाईल), यासाठी की अनेकांच्या अंतःकरणातील विचार उघड व्हावेत.” लूक 2:33–35
एखादी खरोखरच अलौकिक घटना घडते, तेव्हा तिचे अलौकिक स्वरूप जाणणारे मानवी मन विस्मयाने आणि आदरयुक्त आश्चर्याने भरून जाते. आपल्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या घटना पाहून माता मरिया आणि संत योसेफ यांची मने सतत पवित्र विस्मयाने भरून जात होती.
सर्वप्रथम देवदूताने आपल्या धन्य मरियामातेला शुभसंदेश दिला. मग योसेफाला स्वप्नात देवदूत दिसला. त्यानंतर तो चमत्कारिक जन्म झाला. मेंढपाळ त्यांच्या बाळाची आराधना करायला आले आणि देवदूतांचा मोठा समुदाय आपल्याला दिसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर थोड्याच दिवसांत पूर्वेकडून ज्ञानी लोक त्यांच्या बाळाला वंदन करण्यासाठी आले. आणि आज मंदिरातील शिमोनाचा प्रसंग आपल्यासमोर येतो. या बालकाविषयी देवाने त्याला अलौकिक रीतीने जे प्रकट केले होते, त्याबद्दल तो बोलला. मरियामाता आणि संत योसेफ यांच्यासमोर घडत असलेला चमत्कार पुन्हा पुन्हा उलगडत गेला आणि प्रत्येक वेळी ते विस्मयाने व आदरयुक्त आश्चर्याने भारावून गेले.
देहधारणेची ही अलौकिक घटना मरिया आणि योसेफ यांच्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले नाही. तरीही प्रार्थनापूर्वक या घटनेचे चिंतन करून आपण त्यांच्या ‘आश्चर्यात’ आणि ‘आदरयुक्त विस्मयात’ सहभागी होऊ शकतो. देव मनुष्य झाला, हे प्रकट करणारे नाताळचे रहस्य काळ आणि अवकाश यांच्या पलीकडचे आहे. ते अलौकिक उगम असलेले आध्यात्मिक वास्तव आहे; म्हणून श्रद्धेने आपण हे रहस्य पूर्णपणे मननात अनुभवू शकतो. मरियामाता आणि संत योसेफ यांच्याप्रमाणे आपण शुभसंदेश देणाऱ्या देवदूताचे आणि योसेफाच्या स्वप्नात आलेल्या देवदूताचे म्हणणे ऐकले पाहिजे, मेंढपाळ व पूर्वेकडील ज्ञानी लोक यांच्या भेटींचे साक्षीदार झाले पाहिजे आणि आज जगाचा तारणारा नवजात मशीहा याच्याकडे पाहताना शिमोनाला झालेल्या आनंदात सहभागी झाले पाहिजे.
या पवित्र काळात आपण साजरे करत असलेल्या अद्भुत रहस्याच्या चिंतनात तुम्ही किती मन लावले आहे, याचा आज विचार करा. हा वृत्तांत पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक वाचण्यासाठी तुम्ही वेळ काढला आहे का? शिमोन आणि अन्ना यांना झालेला आनंद आणि लाभलेली कृतार्थता तुम्हाला जाणवते का? त्या पहिल्या नाताळचा अनुभव घेताना मरियामाता आणि संत योसेफ यांच्या मनात व हृदयात काय घडत असेल, याचा विचार करण्यासाठी तुम्ही वेळ दिला आहे का? या नाताळच्या काळात आपल्या श्रद्धेच्या या गहन, अलौकिक रहस्याला आपल्या अंतःकरणाला असा स्पर्श करू द्या की आपण जे साजरे करतो त्याने तुम्हीही ‘थक्क’ व्हाल.
हे प्रभू, तुझ्या देहधारणेच्या देणगीबद्दल मी तुझे आभार मानतो. सिमेओनसोबत मी आनंदित होतो, तुझी स्तुती करतो आणि तुझे आभार मानतो. माझ्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी तू जे केलेस ते विस्मयाने न्याहाळताना, खरा विस्मय आणि आदरभाव माझ्या अंतःकरणात पुन्हा जागव. तुझ्या जीवनाच्या या अलौकिक देणगीवर चिंतन करण्याचा मला कधीही कंटाळा येऊ नये. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
एक अनोखे आणि पवित्र पाचारण
नाताळच्या अष्टकाचा सहावा दिवस, 30 डिसेंबर
अन्ना नावाची एक संदेष्ट्री होती… ती मंदिर सोडून कधीच जात नसे, तर उपवास व प्रार्थना करत रात्रंदिवस देवाची उपासना करीत असे. त्याच वेळी ती पुढे आली, तिने देवाचे आभार मानले आणि यरुशलेमच्या मुक्तीची वाट पाहणाऱ्या सर्वांना त्या बालकाविषयी सांगितले. लूक 2:36–38
देवाने आपल्यापैकी प्रत्येकाला एक अनोखे आणि पवित्र पाचारण दिले आहे. उदार मनाने आणि पूर्ण निष्ठेने त्या पाचारणाला प्रतिसाद देण्यास आपल्यापैकी प्रत्येकाला बोलावले आहे. संत जॉन हेन्री न्यूमन यांच्या प्रसिद्ध प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे:
देवाने त्याची एक विशिष्ट सेवा करण्यासाठी मला निर्माण केले आहे. त्याने माझ्यावर असे एक कार्य सोपवले आहे, जे त्याने दुसऱ्या कोणावरही सोपवलेले नाही. माझे असे एक निश्चित कार्य आहे. या जीवनात कदाचित मला ते कधीच कळणार नाही, पण पुढील जीवनात ते मला सांगितले जाईल. मी साखळीतील एक दुवा आहे, व्यक्तींना एकमेकांशी जोडणारा एक बंध आहे…
अन्ना या संदेष्ट्रीवर एक अगदी अनोखे कार्य सोपवण्यात आले होते. तरुणपणी तिचा संसार सात वर्षे चालला. पतीच्या निधनानंतर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षापर्यंत ती विधवा राहिली. तिच्या आयुष्यातील त्या अनेक दशकांविषयी पवित्र शास्त्र सांगते: ‘ती मंदिर सोडून कधीच जात नसे, तर उपवास व प्रार्थना करत रात्रंदिवस देवाची उपासना करीत असे.’ देवाने तिला किती अद्भुत पाचारण दिले होते!
संदेष्ट्री होणे हे अन्नाचे अनोखे पाचारण होते. तिने आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ती पाचारणाचे प्रतीक बनू दिले आणि अशा रीतीने आपले पाचारण पूर्ण केले. तिचे जीवन प्रार्थनेत, उपवासात आणि विशेषतः प्रतीक्षेत गेले. वर्षांमागून वर्षे, दशकांमागून दशके, आपल्या आयुष्यातील त्या एकमेव आणि निर्णायक क्षणाची वाट पाहण्यासाठी देवाने तिला बोलावले होते: मंदिरात बाळ ख्रिस्ताशी होणाऱ्या भेटीची.
अन्नाचे संदेष्ट्री म्हणून जगलेले जीवन आपल्याला शिकवते की स्वर्गातील मंदिरात आपल्या दैवी प्रभूची भेट होईल, त्या क्षणासाठी सतत तयारी करणे हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. अन्नाप्रमाणे दररोज दिवसभर देवळात राहून प्रत्यक्ष उपवास आणि प्रार्थना करण्याचे पाचारण बहुतेकांना नसते. तरीही अन्नाप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणात सतत प्रार्थना व प्रायश्चित्ताचे जीवन जोपासले पाहिजे. आपल्या सर्व कृती देवाच्या स्तुतीसाठी व गौरवासाठी आणि आपल्या आत्म्यांच्या तारणासाठी केल्या पाहिजेत. सर्वांना लाभलेले हे पाचारण प्रत्येक जण आपापल्या परीने जगेल, तरी अन्नाचे जीवन प्रत्येकाच्या पाचारणाकडे निर्देश करणारे एक भविष्यसूचक प्रतीक आहे.
या पवित्र स्त्रीचे उदाहरण तुम्ही आपल्या जीवनात किती अनुसरता, यावर आज चिंतन करा. तुम्ही आपल्या अंतःकरणात प्रार्थनेचे व प्रायश्चित्ताचे जीवन जोपासता का? देवाच्या गौरवासाठी आणि आपल्या आत्म्याच्या तारणासाठी स्वतःला समर्पित करण्याचा दररोज प्रयत्न करता का? चिंतनासाठी आपल्यासमोर ठेवलेल्या अन्नाच्या अद्भुत, भविष्यसूचक जीवनाच्या प्रकाशात आज आपल्या जीवनाचे परीक्षण करा.
हे प्रभू, अन्ना या संदेष्ट्रीच्या प्रभावी साक्षीबद्दल मी तुझे आभार मानतो. अखंड प्रार्थना व त्याग यांतून व्यक्त झालेली तिची आयुष्यभराची तुझ्याप्रती भक्ती मला आणि तुझे अनुसरण करणाऱ्या सर्वांना आदर्श व प्रेरणा ठरो. माझे संपूर्ण जीवन तुला समर्पित करण्याचे जे पाचारण मला लाभले आहे, ते माझ्या जीवनात कोणत्या खास रीतीने जगावे, हे तू मला दररोज उलगडून दाखवावे, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रकाश अंधार दूर करतो
नाताळच्या अष्टकाचा सातवा दिवस, 31 डिसेंबर
त्याच्याद्वारे जे अस्तित्वात आले, ते जीवन होते, आणि हे जीवन मानवजातीचा प्रकाश होते; तो प्रकाश अंधारात चमकतो, आणि अंधाराने त्याच्यावर मात केलेली नाही. योहान 1:3–5
ध्यान करण्यासाठी किती सुंदर प्रतिमा आहे ही: “…प्रकाश अंधारात चमकतो, आणि अंधाराने त्याच्यावर मात केलेली नाही.” संत योहान आपल्या शुभवर्तमानात येशूची ओळख एका अनोख्या रीतीने करून देतो आणि या ओळीने ती ओळख पूर्ण होते. येशू हा सनातन “शब्द” आहे; तो आरंभापासून होता आणि त्याच्याद्वारे सर्व काही अस्तित्वात आले.
योहानाच्या शुभवर्तमानाच्या पहिल्या पाच ओळींत ध्यान करण्यासारखे पुष्कळ आहे. पण आज प्रकाश आणि अंधार यांविषयीच्या त्या शेवटच्या ओळीचा विचार करूया. भौतिक जगातील प्रकाश आणि अंधार या घटनांतून आपल्याला आपल्या दैवी प्रभूबद्दल बरेच काही शिकता येते. भौतिकशास्त्राच्या दृष्टीने क्षणभर विचार केला, तर लक्षात येते की प्रकाश आणि अंधार ही एकमेकांशी लढणारी दोन विरोधी बले नाहीत. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव. जिथे प्रकाश नाही, तिथे अंधार असतो. उष्णता आणि थंडी यांचेही तसेच आहे. थंडी म्हणजे उष्णतेचा अभाव, दुसरे काही नाही. उष्णता दिली की थंडी नाहीशी होते.
भौतिक जगाचे हे मूलभूत नियम आपल्याला आध्यात्मिक जगाविषयीही शिकवतात. अंधार, म्हणजेच दुष्टता, ही देवाशी लढणारी एखादी प्रबळ शक्ती नाही; ती देवाच्या उपस्थितीचा अभाव आहे. सैतान आणि त्याचे दुष्ट आत्मे दुष्टतेची एखादी अंधारी शक्ती आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट, आपल्या निवडींतून आपण देवाला नाकारावे, यासाठी ते प्रयत्न करतात. अशा रीतीने आपल्या जीवनातील देवाची उपस्थिती नाहीशी करून ते आपल्याला आध्यात्मिक अंधारात सोडू पाहतात.
हे आध्यात्मिक सत्य समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण जिथे आध्यात्मिक प्रकाश, म्हणजे देवाच्या कृपेचा प्रकाश, असतो, तिथे दुष्टतेचा अंधार दूर होतो. “आणि अंधाराने त्याच्यावर मात केलेली नाही” या ओळीतून हे स्पष्ट होते. सैतानावर मात करण्यासाठी एवढेच करायचे आहे: ख्रिस्ताच्या प्रकाशाला आपल्या जीवनात येण्याचे आमंत्रण द्यायचे आणि भीतीला किंवा पापाला आपल्याला त्या प्रकाशापासून दूर नेऊ द्यायचे नाही.
आज आपल्या आत्म्यात दररोज चालणाऱ्या या खऱ्याखुऱ्या आध्यात्मिक संघर्षावर चिंतन करा. पण या शुभवर्तमानाच्या उताऱ्यात प्रकट झालेल्या सत्याच्या प्रकाशात त्यावर चिंतन करा. हा संघर्ष सहज जिंकता येतो. ख्रिस्त हा प्रकाश आहे; त्याला आपल्या अंतःकरणात आमंत्रण द्या. त्याची दैवी उपस्थिती तुमच्यातला कोणताही अंधार क्षणात आणि सहजपणे दूर करील.
हे प्रभू येशू, सर्व अंधार दूर करणारा प्रकाश तूच आहेस. जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारे शाश्वत वचन तूच आहेस. आज मी तुला माझ्या जीवनात आमंत्रित करतो, जेणेकरून तुझ्या दैवी उपस्थितीने मला भरून टाकावे, माझे संपूर्ण अस्तित्व व्यापून घ्यावे आणि शाश्वत आनंदाकडे नेणाऱ्या मार्गावर मला पुढे न्यावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूची माता ही देवमाता आहे
धन्य कुमारी मरिया, देवमाता — महोत्सव
नाताळच्या अष्टदिनोत्सवाचा आठवा दिवस, 1 जानेवारी
आणि मरियेने या सर्व गोष्टी जपून ठेवल्या व आपल्या अंतःकरणात त्यांवर चिंतन केले. लूक 2:19
आज, 1 जानेवारीला, नाताळचा अष्टदिवसीय उत्सव पूर्ण होतो. आपण नाताळचा दिवस सलग आठ दिवस साजरा करतो, या उपासनाविधीविषयक गोष्टीकडे अनेकदा आपले लक्ष जात नाही. प्रभूच्या पुनरुत्थानाचा दिवसही आपण असाच साजरा करतो; त्या अष्टदिवसीय उत्सवाची सांगता दैवी दयेच्या रविवारच्या महान सोहळ्याने होते.
नाताळच्या अष्टकाच्या या आठव्या दिवशी आपण एका अनोख्या आणि सुंदर सत्याकडे लक्ष देतो: देवाने एका मानवी मातेच्या उदरी जन्म घेऊन आपल्या जगात येण्याचे निवडले. मरियेला “देवमाता” म्हणतात, याचे सरळ कारण म्हणजे तिचा पुत्र देव आहे. ती केवळ आपल्या पुत्राच्या देहाची माता नव्हती, किंवा केवळ त्याच्या मानवी स्वभावाचीही माता नव्हती. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ही एकच व्यक्ती आहे. आणि त्याच व्यक्तीने धन्य कुमारी मरियेच्या गर्भात देह धारण केला.
देवमाता होणे ही स्वर्गाकडून मिळालेली निव्वळ देणगी होती; मरियामातेला ती स्वतःच्या पुण्याईने मिळाली नव्हती. तरीही तिच्यात असा एक विशेष गुण होता, ज्यामुळे ही भूमिका पार पाडण्यास ती अनन्य रीतीने योग्य होती. तो गुण म्हणजे तिचा निष्कलंक स्वभाव.
पहिली गोष्ट अशी की, मरियामातेची गर्भधारणा तिची आई संत अण्णा हिच्या उदरी झाली, त्या क्षणीच तिला सर्व पापांपासून जपण्यात आले. तिच्या पुत्राचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान तेव्हा अजून घडायचे होते; तरी त्यांच्याद्वारे ही विशेष कृपा तिला देण्यात आली. ही तारणाची कृपा होती. पण देवाने काळाच्या मर्यादेपलीकडे जाऊन ही कृपादेणगी तिला तिच्या गर्भधारणेच्या क्षणीच देण्याचे ठरवले. अशा रीतीने, देवाला जगात आणण्यासाठी आवश्यक असे परिपूर्ण आणि शुद्ध साधन तिला बनवले.
दुसरी गोष्ट अशी की, मरियामाता आयुष्यभर या कृपादेणगीशी विश्वासू राहिली. तिने कधीही पाप करण्याचे निवडले नाही, ती कधी डळमळली नाही आणि देवापासून कधी दूर गेली नाही. ती आयुष्यभर निष्कलंक राहिली. विशेष म्हणजे, देवाच्या इच्छेचे सर्व बाबतींत सदैव आज्ञापालन करण्याच्या तिच्या या निवडीमुळेच, त्याला केवळ आपल्या उदरी धारण करण्यापेक्षा, ती अधिक पूर्ण अर्थाने देवमाता ठरते. आयुष्यभर देवाच्या इच्छेशी पूर्णपणे एकरूप राहिल्यामुळे ती दैवी कृपेची आणि दयेची परिपूर्ण माता ठरते. आध्यात्मिक अर्थानेही ती सदैव देवमाता आहे: ती त्याला अखंडपणे आणि परिपूर्ण रीतीने आपल्या जगात आणत राहते.
आज आपल्या श्रद्धेच्या या अतिपवित्र रहस्यांवर चिंतन करा. नाताळच्या अष्टकाचा हा आठवा दिवस हा एक महोत्सव आहे, आणि तो आपल्या चिंतनास पात्र आहे. वर दिलेल्या पवित्र शास्त्राच्या उताऱ्यात आपली धन्य माता या रहस्याकडे कशी पाहत होती, एवढेच नव्हे, तर आपणही त्याकडे कसे पाहावे, हे दिसून येते. तिने “या सर्व गोष्टी जपून ठेवल्या आणि आपल्या अंतःकरणात त्यांवर चिंतन केले.” तुम्हीही या रहस्यांवर आपल्या अंतःकरणात चिंतन करा आणि या पवित्र उत्सवाची कृपा तुम्हाला आनंदाने व कृतज्ञतेने भरून टाको.
हे परमप्रिय मरिया माते, तुला इतर सर्व कृपांहून श्रेष्ठ अशी कृपा लाभली. तुला सर्व पापांपासून जपण्यात आले आणि तू आयुष्यभर देवाच्या इच्छेचे पूर्णपणे पालन केलेस. अशा रीतीने, जगाच्या तारणाऱ्याची माता, म्हणजेच देवमाता, होऊन तू त्याच्या कार्याचे परिपूर्ण साधन बनलीस. आज आपल्या श्रद्धेच्या या महान रहस्यावर मला चिंतन करता यावे आणि तुझ्या मातृहृदयाच्या आकलनापलीकडील सौंदर्यात मला अधिकाधिक आनंद मानता यावा, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर. हे देवमाता मरिये, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
चारही खंड मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकांच्या & ई-पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत!
अॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल

