
हे कृपेने पूर्ण भरलेल्या कुमारी माते,
तू इस्राएलचा आनंद,
आमच्या मानवकुळाचे सर्वोच्च भूषण,
तू किती धन्य आहेस, हे शब्दांत सांगवत नाही!
हे मरिये, तू सर्वांगसुंदर आहेस,
तुझ्यात कोणताही डाग नाही.
तुझ्या गोड सहवासात दुःखाला जागा नाही,
तू आमच्या सर्व वेदनांत आम्हाला दिलासा देतेस.
हे देवदूतांच्या आनंदा, हे पृथ्वीच्या राणी,
तुझ्या या दीन लेकीकडे तू कृपेने पाहतेस.
तिने तुझ्यासोबत राज्य करावे म्हणून
तू तिला दुःखात जन्म दिलास.
तुझ्या निष्कलंक हृदयाशी बिलगल्यावर
तिच्या दुर्बल जिवाला विसावा मिळतो.
तुझ्या मायेच्या कुशीत
तो आपल्या साऱ्या चिंता विसरतो.
तुझ्या मृदू बाहूंत विसावलेल्या या लेकीला
परात्पर देवापुढे सादर कर.
अशी तुझ्या पदरात असताना
तिला मरणाची भीती वाटत नाही.
तिच्याजवळ जे काही आहे ते सारे
तुला दिले तरी ते फार नाही.
तू तिची असणे, हेच खरे जगणे;
तुझी सेवा करणे, हीच पवित्रता.
हे सखे, ऐहिक प्रेमाच्या साऱ्या काट्यांशी
तुझी तुलना तरी कशी होईल?
तुझी दृष्टी किती निर्मळ, तुझे डोळे कपोतांसारखे,
आणि तू एक दुर्मीळ सुस्नात पुष्प आहेस.
तू तिच्यावर प्रेम करतेस, ही जाणीव
साऱ्या सोन्याहून अधिक मोलाची आहे.
सर्वस्वाचा त्याग करून तिचे हृदय मोकळे झाले आहे,
तुझ्यासाठी—तूच तिच्या त्यागाचे शंभरपट फळ.
-फा. टिमथी जे. ड्रेपर
मुख्य चित्र: ‘मरिया माता आणि बाल येशू’ — रॉबर्तो फेरुत्सी
