मराठी

प्र. रोज प्रार्थना करायची?

प्र. मी रोज प्रार्थना केलीच पाहिजे का?

उ. यासोबत आणखी काही प्रश्न स्वतःला विचारा: “मी रोज जेवलंच पाहिजे का?” “मी रोज झोपलंच पाहिजे का?” “मी रोज दात घासलेच पाहिजेत का?” एखादा दिवस, कदाचित त्याहूनही अधिक काळ, या गोष्टी न करता राहता येईल. पण त्याचा परिणाम आपल्याला आवडणार नाही; उलट त्याने नुकसानही होऊ शकते. प्रार्थना न केल्याने माणूस आत्मकेंद्री, स्वार्थी आणि खिन्न होऊ शकतो. हे त्याचे काही मोजके परिणाम आहेत. म्हणूनच कदाचित ख्रिस्त आपल्या शिष्यांना सदैव प्रार्थना करण्याची आज्ञा देतो.

प्रार्थना करताना आपल्या घरातल्या आतल्या खोलीत जाऊन एकांतात प्रार्थना करावी, असेही ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो. पण त्याचबरोबर, जिथे दोन किंवा तीन जण त्याच्या नावाने एकत्र येतात, तिथे तो उपस्थित असतो, असेही तो सांगतो. आपण वैयक्तिक आणि सामुदायिक अशा दोन्ही प्रकारे प्रार्थना करावी, अशी ख्रिस्ताची इच्छा आहे. वैयक्तिक असो वा सामुदायिक, प्रार्थनेची अनेक रूपे आहेत: आशीर्वाद आणि आराधना, विनवणी, मध्यस्थीची प्रार्थना, स्तुती आणि कृतज्ञता व्यक्त करणे. या सर्व रूपांत प्रार्थना म्हणजे देवाशी संभाषण. कधी ती संवादाच्या रूपात घडते, तर अनेकदा ती देवाचे ऐकण्यात घडते. दुर्दैवाने, अनेकांना वाटते की आपल्याला काय हवे आहे किंवा कशाची गरज आहे, हे देवाला सांगणे म्हणजे प्रार्थना. हवे ते मिळाले नाही की त्यांची निराशा होते. म्हणून प्रार्थनेकडे असे संभाषण म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे, ज्यात देवाला तुमच्यासाठी काय हवे आहे, हे त्याने तुम्हाला सांगावे म्हणून तुम्ही त्याचे ऐकता.

“माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी मी रोज बोललंच पाहिजे का?” असा प्रश्न कोणी विचारेल का? नक्कीच नाही! कारण आपली मैत्री अधिक घट्ट व्हावी म्हणून आपल्या जिवलग व्यक्तीशी बोलण्याची आपल्याला ओढ असते. तसेच आपल्या शिष्यांनी आपल्या अधिक जवळ यावे, अशी देवाची इच्छा आहे. हे प्रार्थनेतून घडते. रोज प्रार्थना करण्याची सवय लावली, तर आपण देवाच्या अधिक जवळ येतो, स्वर्गातील संतांच्याही अधिक जवळ येतो आणि आपले लक्ष स्वतःवर कमी व देवावर अधिक केंद्रित होते.

म्हणून देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात करा! एकाच दिवशी खूप काही करण्याचा प्रयत्न करू नका. व्यायामाप्रमाणेच प्रार्थनेचाही सराव हळूहळू वाढवावा लागतो. व्यायामाची सवय नसलेली व्यक्ती पहिल्याच दिवशी मॅरेथॉन धावू शकत नाही. परमपवित्र संस्कारासमोर रात्रभर जागरण करता येत नाही म्हणून काही जण निराश होतात. एखाद्या धर्मगुरूंशी बोला आणि प्रार्थनेसाठी तुम्हाला जमेल असा क्रम ठरवा. चर्चमध्ये जाता येत असेल, तर तिथे पाच मिनिटे थांबून आराधना करा. रोज म्हणता येईल अशी सकाळची प्रार्थना निवडा. दिवसाच्या अगदी सुरुवातीलाच ती म्हणा आणि आपला दिवस ख्रिस्ताला अर्पण करा. बायबलमधील एखादा उतारा वाचा, विशेषतः शुभवर्तमानांमधून किंवा स्तोत्रसंहितेतून. उतारा वाचताना देव तुम्हाला जे सांगत आहे ते स्वीकारण्यासाठी तुमचे हृदय उघडावे, अशी त्याच्याकडे साधी विनंती करा. जपमाळ म्हणण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला संपूर्ण जपमाळ म्हणणे जड वाटले, तर तिचे एकच दशक म्हणा. लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट ही की निराश न होता प्रभू काय सांगतो ते ऐका. प्रार्थनेत तुम्ही बोलता तेव्हा इतरांसाठी देवाकडे मदत मागण्यावर भर द्या. विशेषतः आजारी आणि दुःख भोगणाऱ्यांसाठी, तसेच शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी प्रार्थना करा.

जेएल